Sunday, September 25, 2011

जालन्यात प्रवेश करताना

'जालना आयकॉन्स' या माझ्या २५६ पानी पुस्तकाचे प्रकाशन २६ सप्टेंबर २०११ रोजी आहे. या पुस्तकाच्या प्रारंभी मी लिहिलेले प्रास्ताविक येथे देत आहे. या विषयाकडे पाहण्याची दृष्टी यातून स्पष्ट होईल.
.................................................
फेब्रुवारी 2011 चा पहिला आठवडा... साधारण सकाळचीच वेळ... मी माझ्या औरंगाबादच्या ऑफिसमध्ये रुटीन काम करीत होतो, तेवढ्यात मोबाईल खणाणला... जालना येथील विख्यात उद्योजक श्री. सुनील रायठठ्ठा यांचे नाव स्क्रीनवर झळकत होते. त्यांच्याबद्दल माझ्या मनात नेहमीच कौतुकमिश्रित आदर राहिलेला आहे. त्यांच्याशी होणारा संवाद माझ्यासाठी नेहेमीच आनंददायी ठरलेला आहे. याच आनंदी वृत्तीने मी त्यांच्याशी संवाद सुरू केला आणि प्राथमिक वास्तपुस्त झाल्यानंतर त्यांनी एक कल्पना मांडली, तेव्हा मी खूपच आनंदलो. साधारण तीन वर्षांपूर्वी मी ‘झेप’ हे पहिल्या पिढीतील उद्योजकांवर आधारित पुस्तक लिहिलेले होते. त्यामध्ये श्री. रायठठ्ठा यांचाही परिचय मी करून दिलेला होता. शून्यातून उभी राहिलेली अनेक माणसे आपण पाहतो. श्री. रायठठ्ठा यांनी तर आपले कार्य ‘मायनस’मधून उभे केलेले आहे! स्वतःच्या उद्योजकीय घोडदौडीबरोबरच जालन्याच्या भावी पिढीच्या विकासासाठी ते करीत असलेल्या प्रयत्नांविषयी मी ऐकून होतो. याच दृष्टीतून त्यांनी त्यांच्या मनातील ही कल्पना माझ्याशी ‘शेअर’ केली होती. ‘झेप’च्याच धर्तीवर पण फक्त औद्योगिक विश्वापुरतेच मर्यादित न राहता सर्व क्षेत्रांमध्ये जालन्याची ओळख असलेल्या व्यक्तींचा परिचय नव्या पिढीला करून देणारे एक पुस्तक प्रकाशित करावे, असा त्यांचा मनोदय होता आणि या पुस्तकाच्या लेखनाची जबाबदारी मी उचलावी, अशी त्यांची मनःपूर्वक इच्छा होती. मी अंतर्बाह्य थरारलो. त्यांनी त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी माझी निवड केली होती हा जसा माझ्यासाठी सन्मानाचा आणि भाग्याचा भाग होता तसाच अशाप्रकारचे चाकोरीबाहेरचे काम हा माझ्या आवडीचा विषय होता. मी तातडीने त्यांना होकार दिला आणि दुसर्‍याच दिवशी सकाळी जालन्यानजीकच्या दावलवाडी येथील त्यांच्या प्रसन्न कार्यालयात प्राथमिक चर्चेसाठी दाखल झालो.

जालन्यातील भाग्यलक्ष्मी स्टीलचे श्री. सुनील गोयल आणि विख्यात सीए श्री. कुमार देशपांडे थोड्याच वेळात या चर्चेत सहभागी झाले. साधारण 20 व्यक्तींचा परिचय करून देणारे हे पुस्तक प्रकाशित करायचे आणि त्यासाठी तातडीने कामाला प्रारंभ करायचा असे ठरवून ही पहिली बैठक संपली. पुढील साधारण 15 दिवसांत त्यांनी नावांची अंतिम यादी तयार केली तेव्हा ही संख्या साधारण 30 पर्यंत पोहोचेल, असे लक्षात आले. पहिली पाच नावे निवडून मुलाखती घेण्यास सुरवात करायची असे ठरले आणि 28 फेब्रुवारी 2011 रोजी मी जालन्यात दाखल झालो. ज्यांचा परिचय करून द्यावयाचा, अशा व्यक्तींच्या नावांची यादी तयार होती आणि त्यातील जवळजवळ प्रत्येक जण माझ्यासाठी अनोळखी होता. काही मोजकी दोन-तीन नावे थोड्याबहुत परिचयाची होती, इतकेच!

तयार करण्यात आलेल्या यादीतील नावांपैकी पहिली भेट ठरली होती श्री. परेश रुणवाल यांच्याशी. जालन्यात त्यांचा शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय आहे, एवढीच प्राथमिक माहिती मला मिळालेली होती. जुना मोंढा भागातील एका अत्यंत अनाकर्षक इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील पाठीमागच्या भागात थाटलेल्या एका हॉलमध्ये आम्ही पोहोचलो तेव्हा तेथे शेअर ट्रेडिंगचे काही काम चालत असावे, असे वाटणार्‍या काही खाणाखुणा दिसल्या. जेमतेम पस्तिशीत असलेल्या श्री. रुणवाल यांच्याशी चर्चा सुरू झाली आणि साधारण अडीच तासांच्या अवधीच्या चर्चेनंतर लक्षात आले, की मी साधारणतः वार्षिक आठ हजार कोटींची उलाढाल करणार्‍या तरुणाशी चर्चा केली आहे! माझ्यासाठी हा आपादमस्तक शहारण्याचा क्षण होता. (औरंगाबादच्या तुलनेत) जालन्यासारख्या छोट्या शहरात शेअर मार्केट हा विषय कितीसा मोठा असेल, अगदी हे शहर मोठी व्यापारपेठ असतानाही हे काम किती मोठे असू शकेल, याचा पुसटसाही अंदाज मी बांधू शकलो नव्हतो. हा माझा पराभव होता पण तो आनंददायी होता. बहुदा शेअर आणि वायदेबाजाराच्या क्षेत्रात एकाच छताखाली सर्व सेवा मिळणारे आपल्या राज्यातील मुंबईखालोखाल हे एकमेव केंद्र असावे...!

या खणखणीत सलामीनंतर मी सावध झालो. हे काम करण्याचे ठरवताना झालेल्या आनंदाला आता एका जबाबदारीची जाणीव प्रकर्षाने होत होती. ‘जालन्यासारख्या शहरात काय असणार?’ अशा मनःस्थितीत सुरू केलेले काम ‘जालन्यासारख्या भागात आणखी काय काय पाहायला मिळणार बरे?’ या उत्सुकतेपर्यंत पोहोचले. यानंतर पुढील महिनाभरात एक - एक करीत मुलाखती पुढे सरकत गेल्या. प्रारंभी 20 जणांचा समावेश 30 पर्यंत पोहोचला होता पण जालन्याच्या विकासात लक्षणीय योगदान देणार्‍यांची नवनवी नावे समोर येतच होती. तेव्हा 40 नावांवर थांबायचे असे सर्वांनी मिळून ठरविले. ही सर्व नावे विविध प्रकारच्या क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यक्तींची होती. यातील काही उद्योजक आहेत तर काही व्यावसायिक, काही सामाजिक क्षेत्रांत काम करणारे आहेत, तर काही शैक्षणिक... यातील एक बाब एकसमान आहे - त्या त्या क्षेत्रात काम करण्याची त्यांची ‘पॅशन’.

‘जालना- सोनेका पालना’ ही म्हण खूप वर्षांपासून कानावर येते आहे, पण हा ‘सोने का पालना’ कसा ठरला? या परिसराच्या माती-पाण्यात आणि माणसांच्या रक्तात कोणते गुण आहेत, याचाही शोध घेण्याचा प्रयत्न या निमित्ताने मी केला. ही प्रातिनिधिक नावे निवडताना निवड समितीने ही निवड अतिशय काळजीपूर्वक केलेली होती, याचे प्रत्यंतर पावलापावलावर येत होते. एकेकाळी असलेली जालना शहराची ‘व्यापार्‍यांचे शहर’ ही ओळख बदलणारी नवी पिढी या निमित्ताने जवळून पाहता आली तसेच विविध क्षेत्रांमध्ये अतिशय महत्वाचे योगदान देणार्‍या जुन्या पिढीतील खंबीर माणसांचा परिचयही या निमित्ताने झाला. अत्यंत प्रतिकूल स्थितीत शिक्षण घेत 1950 मध्ये हैदराबादेत इंजिनइरिंगसाठी गेलेले आणि 20 वर्षांच्या नोकरीनंतर वयाच्या पन्नाशीत ‘कॅबसन’ हा स्वतंत्र उद्योग सुरू करणारे श्री. जी. के. काबरा आणि पुण्यातील ‘बजाज टेम्पो’च्या जवळजवळ प्रत्येक वाहनाच्या डिझाईनमध्ये महत्वाची भूमिका असणारे श्री. विनयकुमार मुंदडा ही दोन्ही व्यक्तिमत्वे साठीच्या पुढची आहेत. तिसरे, साठीत पोहोचलेले व्यक्तिमत्व आहे रमेशभाई पटेल यांचे. 1975च्या सुमारास सुटा चहा विकण्यासाठी जालन्यात आलेल्या रमेशभाईंनी आपल्या प्रचंड मेहनतीने ‘विक्रम चहा’चे साम्राज्य जालन्यात उभारले. या वयातही या तिघांचाही उत्साह तरुणांना सुद्धा लाजविणारा आहे. ‘स्टील इंडस्ट्री’ उभी करणे, त्यात अभिनव प्रयोग करणे ही खासीयत असलेले श्री. नितीन काबरा आणि केवळ पैसा कमावण्यासाठी नव्हे, तर समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून उद्योगाचा विस्तार करणारा त्यांचा ‘भाग्यलक्ष्मी स्टील’ हा ग्रुप आजच्या जगात स्वतःची वेगळी ओळख सिद्ध करणारा आहे. ‘स्टील सिटी’ जालन्यात कारखाने तर अनेक आहेत पण प्रचंड आर्थिक उलाढाल असलेल्या अशा उद्योगात पार्टनरशिप यशस्वी होण्याची किमया ‘राजुरी स्टील’ने घडविली. या ‘किमयागारां’मध्ये ‘फर्स्ट अमंग इक्वल’ असलेले श्री. द्वारकाप्रसाद सोनी यांची वाटचालही प्रेरणादायी आहे.

बालवयातच चांगले संस्कार करण्यासाठी मागील दोन दशकांपासून नर्सरी चालविणार्‍या सौ. विशाखा देशपांडे आणि ‘इंटरनॅशनल स्कूल’च्या स्पर्धेत उतरून जालन्यात एक उत्तम शाळा उभी करणार्‍या सौ. मनीषा पुरी यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान जेवढे महत्वाचे आहे, तितकाच महत्वाचा भाग श्री. संजय टिकारिया यांच्या ‘लॅब असिस्टंट’च्या माध्यमातून सीटीएमके गुजराती विद्यालयात ते बजावत असलेल्या कामगिरीचा आहे. अनेक राज्य पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या श्री. टिकारिया यांनी विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानवृत्ती जागविण्यासाठी घेतलेली मेहनत आणि त्यांची प्रयोगशीलता एखाद्या शास्त्रज्ञालाही अचंबित करणारी आहे. सांस्कृतिक क्षेत्रात नृत्य-गायनाचे योगदान देणार्‍या सौ. विद्या राव जालन्यात एखाद्या ‘ओऍसिस’प्रमाणे कार्यरत आहेत. सौ. रेखा बैजल हे साहित्य क्षेत्रात तळपणारे नावही जालन्यातीलच. एक लेखिका म्हणून विकसित झालेले त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या साहित्यकृतींच्या निर्मितीमागील प्रेरणा अभ्यासणे हा ही आनंदाचा भाग असतो. स्त्री शक्तीतील जिद्दीचे  जालन्यातील उत्तम उदाहरण म्हणजे ‘जैन बंधू पावभाजी’च्या सौ. बसंती चोरडिया - उने. आपल्या वडिलांनी सुरू केलेल्या पावभाजीच्या गाड्याचे रूपांतर त्यांनी आज एका प्रशस्त फास्ट फुड सेंटरमध्ये केले आहे. ‘रुची प्रॉडक्टस्‌’च्या माध्यमातून जालनेकरांच्या जिभेचे चोचले पुरविणार्‍या प्रिया जोशी यांचा उद्योगही हळूहळू विस्तारत आहे. ‘सील्स’च्या उद्योगात कार्यरत असलेल्या सौ. मीनाक्षी मेहुणकर यांनी आपल्या पतीच्या मदतीने घेतलेली व्यवसायातील झेपही अतुलनीय आहे. एकेकाळी दाल मिलला लागणारी यंत्रे दुरुस्त करणार्‍या श्री. नरोत्तम हंसोरा यांनी मोठ्या हिमतीने अशा प्रकारच्या मिल उभ्या करण्यासाठी लागणारी यंत्रणा तयार करण्याचा कारखाना सुरू केला आणि काळानुरूप त्यात बदल करीत दाल मिलच्या व्याप्तीमध्ये अनेक बदल केले. त्यांचे व त्यांना मदत करणार्‍या त्यांच्या दोन्ही मुलांचे उदाहरण सर्वच दृष्टीने अनुकरणीय आहे.
शालेय शिक्षणात अजिबात गती नसणार्‍या आणि एकेकाळी ‘एसटीडी-पीसीओ’वर नोकरी करणार्‍या श्री. नारायण सोनुने यांनी आपल्या असामान्य जिद्द, चिकाटी व प्रयोगशीलतेच्या बळावर स्टेशनरीच्या बाजारपेठेत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्यांनी तयार केलेल्या फाईल्स आज जालना जिल्ह्याच्या बाहेरही जात आहेत. सतत काठावर पास होणार्‍या किंवा नापास होणार्‍या विद्यार्थ्यांसाठी स्वतःचे विश्व निर्माण करणारे हे एक उत्तम उदाहरण आहे. एकेकाळी खरपुडीच्या कृषि विज्ञान केंद्रात सालदार म्हणून काम करणार्‍या सौ. सीताबाई मोहिते आज या केंद्राच्या सल्लागार संचालिका आहेत. त्यांनी आपल्या व्यावसायिक कुशाग्रतेच्या बळावर आवळ्यासह विविध फळांवर प्रक्रियांचा उद्योग सुरू केला. विविध पुरस्कार मिळवीत परदेशात जाऊनही आपली छाप पाडली. विशेष म्हणजे त्या अशिक्षित आहेत...! केळीच्या चिप्स तयार करणारे डोंगरगावचे श्री. ईश्वरदास घनगाव यांचे उदाहरणही ग्रामीण भागात राहून वेगळ्या वाटा चोखाळणार्‍यांसाठी मागदर्शक आहे. मंठासारख्या ग्रामीण भागातून पुढे आलेले आणि आज पुण्यात स्वतःची ‘आयटी कंपनी’ चालविणारे जेमतेम 25 वर्षीय राहुल बन्सल हे इंजिनइरिंगनंतर परदेशात जाऊन पैसा कमावण्याऐवजी देशातच राहून स्वतःच्या मेहनतीने काम उभे करण्यातील एक महत्वाचे उदाहरण आहे. वेब डिझायनिंगच्या क्षेत्रात आज त्यांची स्वतःची ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर सिद्ध झालेली आहे.

मुंबईच्या ‘यूडीसीटी’तून केमिकल इंजिनइर झालेले आणि याच विषयात काही अलौकिक काम उभे करणारे श्री. आशीष मंत्री यांच्याबद्दल काय बोलणार? रसायनांच्या जगात विरघळून गेलेले हे एक अजब रसायन आहे. अतिशय कमी वयात अनिश्चित आर्थिक चढ-उतार पाहिलेल्या या माणसाने अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाने युक्त, पशुखाद्यासाठी वापरले जाणारे अतिशय उच्च दर्जाचे प्रोटिन निर्माण करणारा ‘रिस्की’ उद्योग जालन्यात उभारला. अशा प्रकारचा यशस्वीपणे कार्यरत असलेला हा भारतातील पहिलाच उद्योग आहे आणि याची दोन पेटंट या उद्योगाच्या नावावर आहेत, यातच सगळे आले...!

जालन्यात सुसज्ज रक्तपेढी उभी करण्याच्या ध्यासाने झपाटलेले पूसाराम मुंदडा, पुण्या-मुंबईची ‘सुपर मार्केट’ची संकल्पना जालन्यात राबविणारे मो. युसूफ हाजी अहमदभाई व त्यांचा संपूर्ण ‘परिवार’, पेटीकोटसारख्या व्यवसायात उतरून नवी बाजारपेठ निर्माण करतानाच निराधार महिलांना काम देऊन त्यांच्या संसाराला आधार देणारे रामेश्वर व ज्ञानेश्वर संदूपटला बंधू, ‘लॅपटॉप क्लिनिक’ या संकल्पनेचे जाळे सार्‍या महाराष्ट्रभर विणण्यास निघालेले मनीष राठी, कोरुगेटेड बॉक्स आणि ‘एसी’ उपकरणांमध्ये लागणारे तांब्याचे सुटे भाग तयार करणारे जितेंद्र राठी यांच्याबरोबरच एका लोडिंग रिक्षापासून सुरू झालेला व्यवसाय दहा चाकी ट्रकच्या खरेदीपर्यंत नेणारे हिकमती श्री. संजय केदार यांची कहाणीही मुळातूनच वाचण्यासारखी आहे.

ही आणि अशी एकंदर 42 व्यक्तिमत्वे आपणास या पुस्तकात वाचण्यास मिळतील. 40 जणांविषयीच या पुस्तकात लिहिण्याचे ठरल्यानंतर शेवटच्या क्षणी 2 नवी नावे नाव यामध्ये समाविष्ट करणे भाग पडले. हा अपवाद आवश्यक होता, कारण एका वेगळ्याच विश्वात रमलेल्या श्री. राहुल लाहोटी यांचे नाव समोर आले आणि योगायोगाने ते याच काळात सुटीवर जालन्यात आले होते. ‘बिट्‌स, पिलानी’ येथून कॉम्प्युटर इंजिनइर झालेल्या श्री. राहुल यांनी आपली मायक्रोसॉफ्टमधील चांगल्या पगाराची नोकरी सोडून ‘पब्लिक पॉलिसी’ या विषयात उच्च शिक्षण घेतले आणि सध्या ते ‘पॉलिसी मेकिंंग’च्या क्षेत्रात रिसर्चर म्हणून बेंगलोरच्या ‘आयआयएम’मध्ये कार्यरत आहेत. आपल्या ‘पॅशन’ला ‘प्रोफेशन’मध्ये बदलण्याचे त्यांचे धाडस नव्या पिढीसाठी अतिशय अनुकरणीय आहे. दुसरे नाव होते मनोज पटवारी यांचे. मूकबधिर असून त्यांनी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात केलेले काम आणि मूकबधिरांसाठी ते घेत असलेले कष्ट हे असे व्यंग असणार्‍यांसाठी प्रेरक ठरतील.

‘बजाज’चे प्लांट इंचार्ज श्री. कैलास झांझरी, विख्यात सर्जन डॉ. संजय राख, होमिओपथी तज्ज्ञ डॉ. सतीश मोरे, ‘गणपती छाप मेहंदी’चे श्री. सूरजमल मुथा, डॉ. हेडगेवार हॉस्पिटलच्या उभारणीत महत्वाची भूमिका बजावणारे डॉ. अनंत पंढरे, ‘स्पर्म प्रोसेसर’ या आपल्या अभिनव क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवरील कामगिरी बजावणारे डॉ. प्रमोद बजाज, खरपुडीच्या कृषिविज्ञान केंद्राद्वारे शेतकर्‍यांच्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावणारे श्री. विजयअण्णा बोराडे, इंडस्ट्रियल सप्लायमध्ये वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी बजावणारे श्री. दिनेश छाजेड, जालन्यात इन्व्हर्टर - यूपीएस तयार करणारे श्री. विजयकुमार अग्रवाल, साधे डिप्लोमा इंजिनइर असूनही उत्तम कामगिरीच्या आधारावर बहुराष्ट्रीय कंपनीत झेप घेणारे श्री. कैलाश मालोदे, अतिशय छोट्या पातळीवर केटरिंगचा व्यवसाय सुरू करून आज आपले स्वतःचे स्थान निर्माण करणार्‍या सौ. कल्पना शाह, आपल्या विक्रमी रांगोळीद्वारे गिनिज बुकात नाव नोंदविणारे श्री. रवी कोंका, आपल्या वैशिष्ट्यपूर्ण ‘बर्फ गोळ्या’ने जालनेकरांना थंडावा देणारे श्री. मोहन खोडवे... ही या पुस्तकातील नावे अशीच उल्लेखनीय आहेत. ही प्रत्येक कथा आपणास नक्कीच काहीतरी विचार देऊन जाईल, हे निश्चित.

आणि  सर्वात महत्वाचे नाव - बद्रीनारायणजी बारवाले. जालना म्हटले की जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात ‘महिको’ची ओळख सांगितली जाते आणि ‘महिको’ म्हटले की बद्रीनारायणजी समोर येतात. रूढ अर्थाने साधे पदवीधरही नसलेल्या बद्रीनारायणजींनी आपली हिंमत, मेहनत आणि दूरदृष्टीच्या जोरावर उभारलेले बियाण्यांचे साम्राज्य वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहेच, पण त्याच बरोबर आपण समाजाचे देणे लागतो, या भावनेतून त्यांनी उभ्या केलेल्या संस्था त्यांचे मोठेपण सांगून जातात. त्यांची ओळख सांगायला या पुस्तकाची सगळी पानेही कमी पडावीत...!

असा माझा हा जालना जिल्ह्याचा प्रवास! एखादी टेकडी चढून जाण्याचं ठरवावं आणि चढायला लागल्यानंतर लक्षात यावं, की तो पर्वत आहे, असं काहीसं माझं झालं. पण पर्वताची अवघड चढण चढताना वाटेत फुलांचे छानसे ताटवे लागावेत, मध्येच सुंदर जलाशय असावेत, पुढे जाणार्‍या पायवाटांच्या दोन्ही बाजूंनी ताजीतवानी फुले डोकावत असावीत आणि चढण्याचे कष्ट वाटूच नयेत, असाच काहीसा हा अनुभव होता. प्रसन्न आणि अनुभवसंपन्न करणारा...!

हा अनुभव मला आणि हे पुस्तक वाचणार्‍या सर्वांनाच ज्यांच्यामुळे घेता आला, त्या श्री. सुनील रायठठ्ठा यांच्याबद्दल चार शब्द सांगितले नाहीत, तर मी अपराधी ठरेन. हे पुस्तक प्रत्यक्षात येण्यासाठी श्री. रायठठ्ठा यांनी घेतलेले परिश्रम अतुलनीय आहेत. ते स्वतःही एक यशस्वी उद्योजक आहेत. आज 40 हून अधिक देशांमध्ये त्यांची उत्पादने निर्यात होतात. मात्र आजचे हे यश सहजपणे आलेले नाही. श्री. रायठठ्ठा यांच्या घोडदौडीची कहाणी खूपच वेगळी आहे. ही कहाणी आहे एका जिद्दीची, शून्यातून विश्व निर्माण करणार्‍या फिनिक्स पक्ष्याची. 1977 मध्ये औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी आरंभीच्या काळात ‘एल ऍँड टी’मध्ये नोकरी केली. 1981 मध्ये त्यांनी नोकरी सोडून स्वतःच्या व्यवसायास सुरवात केली. आज त्यांनी आपल्या व्यवसायातील एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. छोट्या देशांपासून सुरवात करून आपल्या निर्यातीचेे क्षेत्र त्यांनी आता फ्रान्ससारख्या देशापर्यंत विस्तारले आहे. आपल्या माणसांवर विश्वास कसा आणि किती टाकावा, हे रायठठ्ठा यांच्याकडूनच शिकावे ! परदेशातील बाजारपेठ मिळवताना आणि वाढवताना ते स्वतः जेवढ्या वेळा परदेशात गेले नसतील, त्याहून अधिक वेळा त्यांच्याकडील कामगार परदेशी जाऊन आलेला आहे ! उद्योगाच्या क्षेत्रात ही नवी संकल्पना रुजविताना त्यांनी माणसं उभी केली, जोडली आणि सर्वांना घेऊन ते पुढे जात आहेत...!

श्री. रायठठ्ठा यांच्या ‘विनोदराय इंजिनइरिंग प्रा. लि.’मध्ये पाण्याच्या टाक्यांच्या उत्पादकांना लागणारी यंत्रे तयार होतात. बाजारपेठेत शे-दोनशे लिटर्सपासून पाण्याच्या टाक्या उपलब्ध आहेत. या टाक्या बनविण्याचे तंत्रज्ञान आणि यंत्रे श्री. रायठठ्ठा तयार करतात. या व्यवसायाला त्यांनी साधारणपणे सन 1991 मध्ये सुरवात केली. सन 2000 मध्ये दिल्लीत ‘प्लास्ट इंडिया’ नावाच्या औद्योगिक प्रदर्शनात त्यांनी भाग घेतला आणि तेथून सारे चित्र पालटले. त्याच प्रदर्शनातून त्यांना निर्यातीची पहिली ऑर्डर मिळाली. श्री. रायठठ्ठा सांगतात, ‘‘या प्रदर्शनात आम्ही सर्वात लहान स्टॉल बुक केला होता. स्टॉलचे पैसेही हप्त्याहप्त्याने भरले. यंत्रे घेऊन जाण्याइतका पैसा नव्हता, म्हणून त्याचे फोटो आणि माहितीचे तक्ते आम्ही सोबत नेले होते. मशिन्सची डायमेन्शन्स काय, याचे उत्तर देण्याइतकीही आमची तयारी नव्हती. तेथे आम्ही जागतिक बाजारपेठेचे चित्र पाहिले. आमच्यातील त्रुटी आमच्या लक्षात आल्या. तेथूनच आमच्या प्रगतीला वेग आला.’’ सध्या ते सौदी अरेबिया, कुवेत, टांझानिया, मलेशिया, हैती, नायजेरिया, फिजी, लिबिया, येमेन, मलेशिया, ट्युनिशिया, सुदान, मादागास्कर, झांबिया, कतार, संयुक्त अरब अमिराती आदी देशांना यंत्रे निर्यात करतात. त्यांच्या उत्पादनांचा दर्जा पाहून नुकतीच त्यांच्याकडे फ्रान्समधूनही ऑर्डर आली. निर्यातीबाबत असलेल्या अनेक शंकांचे ते समाधान करतात. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो भाषेच्या अडथळ्याचा. पण हा मुद्दा गैर आहे, असे सांगताना ते म्हणतात - आपले प्रॉडक्ट दर्जेदार असेल आणि किंमत वाजवी असेल, तर तेथे व्यवहार जुळण्यासाठी भाषेचा अडथळा अजिबात येत नाही. तिथं अर्थकारण महत्त्वाचं असतं, कारण फायद्याची भाषा प्रत्येकाला समजते !

मागील दोन वर्षांपासून त्यांनी जालन्यात ‘यंग इनोव्हेटर्स’ ही चळवळ उभारली आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या सहकार्याने ते विद्यार्थ्यांतील अभिनव कल्पनांना खतपाणी घालण्याचे व त्या फुलविण्याचे काम करतात. यंत्रमानव निर्मितीची कार्यशाळा, फोटोग्राफी कार्यशाळा यांच्यासह अनेक उपक्रम ते जालन्यात राबवितात. स्वतः दीड-दोन लाख रुपयांचा खर्च करून त्यांनी खास विद्यार्थ्यांसाठी जालन्यात एक संपन्न ग्रंथालय उभारले आहे. जालन्यातील पुढची पिढी अधिक सक्षम आणि परिपूर्ण होण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न सुरू आहे. हे पुस्तकही या प्रयत्नांचाच एक भाग आहे.

आज कॉर्पोरेट जगतात ‘सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज’ हा स्वतंत्र विभाग कार्यरत असतो. या द्वारे समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी काही निधी राखून ठेवलेला असतो. अनेकदा यातून फक्त देखावे उभारले जात असल्याची टीका होत असते. मात्र, अशा प्रकारचे कसलेही बंधन नसताना श्री. रायठठ्ठा यांनी जालन्याच्या भावी पिढीसाठी उभारलेला ‘यंग इनोव्हेटर्स’ हा महायज्ञ आणि त्यातील या पुस्तकाच्या रूपाची समिधा सर्वांसाठीच अनुकरणीय ठरावी.

एक बाब येथे आवर्जून स्पष्ट करावीशी वाटते, की हे 42 जण म्हणजे जालना जिल्ह्याचा परिपूर्ण परिचय नव्हे. ही नावे केवळ प्रातिनिधिक अशी आहेत. यात समाविष्ट करता न आलेली अनेक नावे अत्यंत जड अंतःकरणाने आम्हाला बाजूला ठेवावी लागली. यामागे पुस्तकाच्या पानांची मर्यादा, एवढे एकच कारण आहे. कदाचित, या पुस्तकाचा दुसरा भाग भविष्यात प्रकाशित करावयाचे ठरल्यास ही नावेही त्यात समाविष्ट करणे शक्य होईल.
हेच पुस्तक इंग्रजीतूनही प्रकाशित व्हावे असा आग्रह श्री. आशीष मंत्री यांनी धरला. प्रकाशनाची जबाबदारी स्वीकारलेल्या श्री. रायठठ्ठा यांनीही त्यावर लक्ष केंद्रित केले. लवकरच हे पुस्तक इंग्रजीतूनही प्रकाशित होईल. या 42 व्यक्तींच्या प्रत्यक्ष भेटींसाठी मी जालना, हैदराबाद, पुणे इथे प्रवास केला. हैदराबादेतील भेटीसाठी श्री. सत्यनारायण सोनी यांची मदत झाली. अतिशय उमद्या मनाच्या या गृहस्थांनी आपल्या व्यवसायात अनेक प्रयोग केले आहेत. त्यांची भेट हाही आनंददायी अनुभव होता. जालना आणि पुण्याच्या भेटीगाठींमध्ये ‘विनोदराय’मधील श्री. श्रीकांत देशपांडे यांनी केलेले सहकार्य आभाराच्याही पलीकडचे आहे. पहिल्या दिवशीच्या पहिल्या भेटीपासून अगदी अखेरच्या भेटीपर्यंत प्रत्येक ठिकाणी ते माझ्यासोबत होते. सर्व व्यक्तींशी सुसंवाद प्रस्थापित करणे, त्यांच्यातील समन्वय, बहुतेक वेळा तेथील फोटोग्राफी आणि अनेकदा ड्रायव्हिंगमध्येही ते माझे वाटेकरी झाले. त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे माझा भार खूपच हलका झाला. त्यांचे आभार मानणे हा निव्वळ देखावा ठरेल. आणखी एक नाव घेतल्याशिवाय हे लेखन अपूर्ण राहील. श्री. सुनील गोयल यांनी अगदी पहिल्या बैठकीत या लेखनाविषयी काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. या लेखनादरम्यान त्या मार्गदर्शक ठरल्या. अनेक लेखांमध्ये त्यांनी केलेल्या सूचनांमुळे हे लेख अधिक परिपूर्ण होण्यास मदत झाली. आभाराचे हे प्रदर्शन कदाचित त्यांना आवडणार नाही! आणि सर्वात महत्वाचे... श्री. सुनील रायठठ्ठा. आपली सामाजिक जाणीव प्रत्यक्ष कृतीतून ते व्यक्त करतात. त्यांच्या संकल्पना आणि पुढाकारामुळेच हे पुस्तक आज आपल्या हाती आहे. त्यांच्या कायम ऋणातच राहणे मला आवडेल.

जालन्याच्या प्रेरणादायी विश्वात आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत!

- दत्ता जोशी

2 comments:

ATUL NIVARGI said...

DEAR Datta,

It is great !

Jar Prastavana Itaki sunder va utkanthaverthak asel tar pudhe kay asel?
Zep Contributed in great way in my life , i always use Zep to refersh and make me readty to over come difficulties and accept chalanges.

Book on Jalna will be a positively help to boost the enterprenuership amongs the Marathwada !

Thanks and all the best!
ATUL NIVARGI

shirish said...

dear datta,

heartly congrates,
tase hi tujhya likhanat sakshat saraswati ahe, wachun khup anand jhala, ani tu kahi tari alag kartos yache samadhan watle.
Wish u all the best, keep it up.
thanks

shirish