Thursday, August 25, 2011
साहित्यिक जमात मंगळावर वास्तव्यास असते काय?
`दैनिक लोकमत` च्या `हेलो औरंगाबाद` मध्ये दर शुक्रवारी प्रकाशित होत असलेल्या 'संस्कृती, साहित्य वगैरे' या स्तंभात 26-8-2011 रोजी प्रकाशित झालेला हा लेख.
...................................................................................
साहित्यिक जमातीबद्दल मला नेहेमीच मोठे औत्सुक्य वाटत आले आहे. जगन्नियंत्याने या जमातीला एखादा अतिरिक्त अवयव देऊन जन्माला घातले आहे की काय, असा संशय मला अनेक वर्षे होता. पण कालांतराने तो दूर झाला आणि हे लोकही मर्त्य मानवाप्रमाणेच जन्माला येतात, जगतात आणि मरतात असे लक्षात आले. असे असताना ही मंडळी ज्या प्रमाणे प्रत्येक ठिकाणी आपले वेगळे अस्तित्व सिद्ध करण्यास धडपडत असते आणि योग्य त्या ठिकाणी स्वतःचे अस्तित्व अजिबात लक्षात येणार नाही अशा प्रकारे दडून बसत असते, ते पाहता मात्र त्यांच्यात ‘काहीतरी’ वेगळे आहे, असे नक्की जाणवू लागते.
या मंडळींबाबत या वेळी एवढे ‘चिंतन’ करण्याचे ताजे कारण म्हणजे अण्णा हजारे यांचे उपोषण. या उपोषणाने प्रभावित झाला नाही असा एकही घटक या देशात राहिला नाही. मुंबईच्या डबेवाल्यांपासून दिल्लीच्या चाटवाल्यांपर्यंत सर्वांनी आपापल्या परीने या आंदोलनाला पाठिंबा दिला. काही सामाजिक संस्था, काही आंतरराष्ट्रीय पातळीवरील बुद्धिवादी यांनी विरोधही नोंदविला. ‘अण्णांना शिव्या तरी द्यावात किंवा त्यांच्या ओव्या तरी गाव्यात’, अशा दोन गटांमध्ये सध्या भारत विभागलेला आहे. हे आंदोलन, त्यामागचे राजकारण, एनजीओंचा प्रश्न, अण्णांची विश्र्वासार्हता, परदेशाचा हात, देशातील भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यांवर चर्चा झडत आहे. या पार्श्वभूमीवर फक्त एक वर्ग अद्यापही मौन बाळगून आहे. तो आहे साहित्यिकांचा! म्हणूनच प्रश्न पडला, की ही जमात मंगळावर राहते की काय?
त्याचे असे झाले, की सध्या अण्णांच्या उपोषणाला पाठिंबा देण्याची किंवा विरोध करण्याची अहमहमिका लागली आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध देश जागा होतो आहे ही मोठी आनंदाची बाब आहे. विशेषतः विद्यार्थी व युवक वर्ग या आंदोलनात रस्त्यावर उतरलेला दिसतो आहे आणि आंदोलनात उतरलेला प्रत्येक जण कोणा एका प्रांतासाठी किंवा जातीसाठी न लढता हाती तिरंगा घेऊन ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ या घोषणा देतो आहे. स्वातंत्र्योत्तर भारतात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि
गुजरातपासून पूर्वांचलातील राज्यांपर्यंत सर्वत्र हाच घोष दुमदुमतो आहे. राष्ट्रभावनेचे एक अर्थपूर्ण प्रगटन या निमित्ताने होते आहे. अण्णांना विरोध करणारा वर्गसुद्धा आपला विरोध करतो आहे तो त्यांच्या कथित ‘ब्लॅकमेल’च्या पद्धतीला. हा विरोध करताना हा वर्गसुद्धा भ्रष्टाचाराविरुद्धची आपली मते ठाशीवपणे मांडतो आहेच. या पार्श्वभूमीवर सारा देश ढवळून निघालेला असताना साहित्यिक मंडळी मात्र गप्प बसावी, ही गोष्ट सुखावणारी नाही. अरुंधती रॉय यांच्यासारख्या व्यक्ती काही वक्तव्ये करतात, पण ती वक्तव्ये साहित्यिक म्हणून न राहता एका सामाजिक कार्यकर्तीची वक्तव्ये म्हणून गणली जातात.
फार दूर न जाता आपण मराठीतील साहित्यिकांबद्दलच चर्चा करू. आणीबाणीच्या काळातही दुर्गाबाई भागवतांसारखी एखादीच अपवाद वगळता इतर सर्व साहित्यिक मंडळी आपापल्या बिळात जाऊन सुरक्षित बसलेली होती. या वेळीही तसेच घडताना दिसते आहे. अत्यंत फालतू विषयावर घसा कोरडा होईपर्यंत (आणि नंतर ओला राहीपर्यंत!) बाष्फळ बडबड करणार्या मंडळींची तोंडं आता गप्प का आहेत? देशासमोरील खरोखरीच्या महत्वाच्या प्रश्नांवर आपल्या लाडक्या साहित्यिकांची काय मते आहेत हे जाणून घ्यायला वाचक उत्सुक असतात. ही मंडळी त्यांची मोठी निराशा करीत आहेत. (अ.भा.!) मराठी साहित्य संमेलनाच्या आजी, माजी व भावी अध्यक्षांनीही या विषयावर आपली मते मांडलेली नाहीत. बरे, साहित्यिक मंडळी साहित्यबाह्य गोष्टींवर बोलत नसतात असेही नाही. उलट अशाच गोष्टींसाठी ते अधिक (कु)प्रसिद्ध असतात! अशा स्थितीत प्रश्न पडतो, की साहित्यिक जमातीला सामान्य माणसांच्या मनातील
सुखदुःखाची दखल घ्यावीशी वाटत नाही का? असे साहित्य आणि असे साहित्यिक लोकाभिमुख आहेत, असे म्हणण्याचे धाडस या प्रत्यंतरानंतर कोणी करेल का?
मुळात या साहित्यिकांच्या साहित्यनिर्मितीच्या
प्रेरणा काय आहेत? ‘गांजेकसाने चार आण्याचा झुरका घेतल्यानंतर वाट्टेल तेवढ्या कल्पना सुचतात, अशा कल्पना काय कामाच्या?’ अशा अर्थाचे एक विधान एका विख्यात साहित्यिकाने करून ठेवले आहे. साहित्यिकांच्या निर्मितीला समाजाभिमुखतेचे अधिष्ठान असेल, तर ती निर्मिती आणि तो साहित्यिक चिरस्मरणीय ठरतो हे सांगायला भविष्यवेत्त्याची गरज पडत नाही. प्रवासवर्णने लिहितात म्हणून मीना प्रभूच काय पण पु. ल. देशपांडे यांनाही कमी लेखणारी ही ‘जमात’ साहित्यविश्र्वात काय दिवे लावते? संशोधन, समीक्षा, दलित साहित्य, आत्मकथा, विज्ञानकथा, औद्योगिक यशकथा ही आणि अशी सारी साहित्याची ‘अनुभवाधारित अभिन्न अंगे’ आहेत. यांना कमी लेखून भाकड गोष्टींना वरचे स्थान देणार्या आणि देशकालवर्तमानाकडे सोयिस्कर दुर्लक्ष करणार्या, बेमुर्वतखोर मौन बाळगणार्या आणि संमेलनाच्या ठिकाणी किती स्वच्छतागृहे असावीत, यासारख्या विषयावर तोंडची वाफ दवडणार्या मंडळींविषयी म्हणूनच प्रश्न मनात निर्माण होतो - ‘साहित्यिक जमात मंगळावर वास्तव्यास असते का?’
- दत्ता जोशी
९२२५ ३० ९० १०
Subscribe to:
Posts (Atom)