Saturday, February 24, 2018

तेलुगु-मराठी सांस्कृतिक सेतू...

तेलुगु-मराठी या भाषाभगिनींच्या संवादसेतूच्या रुपाने लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी बजावलेली भूमिका अमूल्य आहे. पिढीजात उद्योजक असलेल्या बोल्ली यांनी आपला उद्योग सांभाळतानाच सहित्याच्या प्रांगणात वेगळे अस्तित्त्व सिद्ध केले. भाषांवरून भेद निर्माण करणार्‍या प्रादेशिकवादावर सांस्कृतिक एकात्मता, भाषिक सौहार्द हेच उत्तर ठरू शकते. याच संदर्भातील श्री. बोल्ली यांच्या प्रयत्नांबद्दल...
-------------------------------------

मागे रहो नको मजू बाप म्हणता 
भागवते वटे भक्त ते म्हणता
चरलिंग गुरुलिंग शंभु तु म्हणता
पुरवर कितिदूर हर हो ते म्हणता
मग मरहाटाचा महादेवु आमचा
गगनराणा आमचा, सुखदेवु आमचा

मराठी भाषेला साक्षात महादेवाची उपमा देत, गगनराणा म्हणत, एवढेच नव्हे, तर सुखदेव - अर्थात सुखकर्ता म्हणत ‘पालकुर्कि सोमनाथ’ या प्राचीन काळी होऊन गेलेल्या तेलुगू कवीने मराठीची पताका उंचावली आहे. तेलुगू-मराठीच्या आदानप्रदानाचा हा शुभारंभ होता?

मराठीतील आद्यकवी म्हणून मुकुंदराज यांचा उल्लेख होतो. आद्यकवी मुकुंदराज यांनी सन 1160 मध्ये ‘विवेकसिंधू’ची रचना केली. ती मराठीतील / प्राकृतातील पहिली रचना मानली जाते. पण सन 1130 मध्ये पालकुर्की सोमनाथ या तेलुगू कवीने ‘पंडिताराध्य चरित्र’ या ग्रंथातील पर्वत प्रकरणात 220 व्या पानावर 22 ओळींची ही रचना मांडली आहे. हे लेखन तेलुगू लिपीत आहे पण भाषा प्राकृत आहे. तेलुगूंना ते उच्चार कळत नसत, त्यामुळे अर्थ लागत नसे. लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी हे वाचले आणि त्यांच्या असे लक्षात आले, की भाषिक एकात्मतेचा हा आगळा आविष्कार आहे. त्याच बरोबर ‘विवेकसिंधू’च्याही आधी मराठीत आलेली ही रचना ऐतिहासिक ठरणारी आहे. हा विषय त्यांनी पु. ल. देशपांडे यांच्यासमोर ठेवला. 1988 मध्ये ठाण्याच्या षण्मुखानंद सभागृहात पार पडलेल्या  जागतिक मराठी परिषदेत पुलंनी लक्ष्मीनारायण बोल्ली यांची याच विषयावर मुलाखत घेतली. मराठी- तेलुगू या दोन भाषाभगिनींतील दुवे बोल्ली यांच्यामुळे जगासमोर येण्यास प्रारंभ झाला. सहित्य जगाला जोडते, याची प्रचिती या दोन भाषांत येऊ लागली ती त्यांच्याच मुळे...!

प्रासादिक मराठी काव्यरचना करणार्‍या, तेलुगुची मराठीत भाषांतरे करणार्‍या आणि मराठीतून तेलुगू भाषांतर करण्याचा अनुभव असलेल्या लक्ष्मीनारायण बोल्ली त्यांच्या वयाच्या 18 व्या वर्षापयर्यंत नीटपणे मराठी भाषा बोलता येत नव्हती आणि तेलुगू सुद्धा ते पुढे वाचून वाचून शिकले, असे सांगितले तर आश्चर्य वाटते. आंध्रप्रदेशातून सोलापुरात आलेल्या असंख्य विणकरांपैकी हा एक परिवार. त्यांच्या आजोबांनी मेहनतीने स्वतःचा छोटा कारखाना टाकला, वडिलांनी त्याचा विस्तार केला. ती परंपरा जोपासतानाच लक्ष्मीनारायण यांच्यात भाषेचे बीज पेरले गेेले. त्यातून पुढचा प्रवास उलगडत गेला.

इतिहासाचा धावता आढावा घेताना ते सांगतात, “रझाकाराच्या छळाला कंटाळून आंध्रप्रदेशातील (तेव्हाच्या हैदराबाद संस्थानातून) मोठ्या संख्येने हिंदू विणकर तेथून बाहेर पडू लागले. या छळात तेथील रेड्डी किंवा भूस्वामी यांनीही आपापला वाटा उचलला होता! आजच्या कर्नाटकचा सुद्धा काही भाग त्या संस्थानात होता. अशा प्रकारे कन्नड आणि तेलुगू भाषक लोकांचा ओघ त्या काळात इंग्रजांची राजवट असलेल्या सोलापुरात वाढला. कारण हे अंतर त्यांच्या गावांपासून मजल दरमजल करत चालत गाठण्यासारखे होते. साधारणपणे 1890-1900 च्या दरम्यान हे स्थलांतर सुरू झाले. हा समाजातील आर्थिक दुर्बल घटक होता. अज्ञानी होता. पण त्यांच्या हातात कला होती. विणकामाच्या काठ्या, धोटे घेऊन हे लोक सोलापूरच्या हद्दीत आले. अगदी सुरवातीला आलेल्या गटाला त्या वेळी पोलिसांनी अडवले. हातात काठ्या असल्यामुळे त्यांचा गैरसमज झाला होता. पण हे निरुपद्रवी विणकर असल्याचे लक्षात येताच तेव्हाच्या कलेक्टरनी त्यांची सुटका केली. पुढे कुठे जाणार हा प्रश्नच होता. त्यांनी कलेक्टरकडेच आसरा देण्याची विनंती केली. तेव्हा वेशींच्या आतील सोलापूर गच्च भरलेले होते. शहराच्या पूर्वेला त्यांनी या समाजाला जागा दिली आणि सारा समाज तेथे एकवटला. अन्य कोठेही नसलेले विणकर एकत्र राहण्याचे चित्र सोलापुरात दिसते ते त्यामुळे. याच कारणामुळे त्यांनी आपली भाषा, संस्कृती जोपासली. जिवंत ठेवली.”

“तेव्हा सोलापुरात कापड मिल चालू होती. काही काळाने तोट्यात गेलेली ही मिल त्याच्या मालकाने तोडली. तेव्हा या विणकरांपैकी काहींनी त्यांना विनंती करून तेथील यंत्रसामुग्री मिळविली. त्या काळात खड्डामाग चालत. त्यावर विमकाम सुरू झाले. पुढे खड्डामागांची रुपांतरे पायडल मागात झाली आणि त्यानंतर फ्रेमलूम आल्या. प्रत्येक स्थित्यंतरात उत्पादनात सुधारणा होत गेल्या. विणकर सहकार तत्वावर एकत्र आले...

“पुढे सरकारने त्याला उद्योगाचा दर्जा दिला त्याच वेळी परवाने पद्धतीचा फासही आवळला. अशिक्षित विणकरांना त्यातील कायदेशीर तरतुदी ठावूकच नव्हत्या. अधिकार्‍यांनी त्या काळात या विणकरांना खूप नाडल्याच्या तक्रारी आल्या. तंत्र सुधारत होते. उत्पादन अधिकाधिक चकचकीत होऊ लागले होते. पण आता कामगारांचा प्रश्न निर्माण होऊ लागला होता. कामगारांच्या दुर्लक्षामुळे मालाचा दर्जा घसरणीला लागला. परिणामी सोलापुरातील वस्त्रोद्योग डबघाईला आला. आज जे उद्योग चालू आहेत, त्या प्रत्येक उद्योगाबाहेर कामगार हवे असल्याच्या पाट्या सदोदित लावलेल्या असतात. कामगार हवे आहेत. पण ते मिळत नाहीत. या उद्योगातील नवी पिढी यात उतरण्यास तयार नाही...”

अशा पार्श्वभूमीवर नरसय्या बोल्ली आंध्र प्रदेशातून सोलापुरात सुमारे 100 वर्षांपुर्वी आले. ते कष्टाळू आणि दूरदृष्टीचे होते. त्यांनी वैयक्तिक काम करताकरता हळूहळू स्वतःची मिल उभी करण्यास सुरवात केली. लोकांना एकत्र करणे, एकत्र ठेवणे, त्यांच्याकडून कामे करून घेणे, ही कौशल्ये नरसय्या बोल्ली यांच्याकडे होती. त्यांच्या पुढच्या पिढीत इरय्या बोल्ली जन्माला आले. त्यांच्यात वडिलांपेक्षा अधिक चांगले गुण होते. त्यांनी आपल्या कारखान्याबरोबरच शहरातील जनजीवनावरही प्रभाव टाकला. त्यामुळे सोलापूरचे पहिले महापौर म्हणून ते निवडून आले. लक्ष्मीनारायण त्यांचे पुत्र. यांनीही वस्त्रोद्योग सांभाळलाच, पण त्यांची रुची साहित्यात निर्माण झाली. ती सुद्धा वेगळीच कथा आहे.

सोलापुरात राहायचे, तर मराठी आले पाहिजे, या प्रेरणेतून इरय्या बोल्ली यांनी मराठी शिकून घेतली. लक्ष्मीनारायण यांचीही मराठीशी तोंडओळख झाली. पण शाळेत त्यांचा पाय टिकत नसे. प्रगती ठीक नव्हती. त्यातच, त्यांच्या वडिलांचा शिक्षणाला विरोध होता. शिकलेली पोरे वाया जातात, असा त्यांचा पक्का समज होता. त्यामुळे ते मुलाला शाळेत जाण्यापासून रोखत. मुलाने शिकून ‘ब्राह्मण पंडित’ व्हायची गरज नाही, असे सांगत; त्यांनी थेट मिलमध्ये जाऊन कामाला लागावे, असे त्यांना वाटत असे.

15 एप्रिल 1944 रोजी जन्माला आलेल्या लक्ष्मीनारायणने 1962 मध्ये वयाच्या अठराव्या वर्षी मॅट्रिकचा उंबरठा ओलांडला. त्या आधी दोन वेळा त्याची शाळा सुटली होती. वडिलांनी त्याला कामालाही लावले होते. ही समाजातील प्रथाच होती. पण शरीरप्रकृती अतिशय क्षीण असल्याने जेथे कामाला लागला, त्यांनी या मुलाला घरी परत पाठवले. अशा स्थितीतून अभ्यास करत या मुलाने मॅट्रिकची परीक्षा दिली व उत्तीर्णही झाला.
आता मात्र त्याने नोकरी करणे आवश्यक आहे, असे वडिलांना वाटत होते. कमी कष्टाची नोकरी मिळविण्याच्या दृष्टीने त्यांनी शब्द टाकला आणि इंडस्ट्रियल बँकेत लक्ष्मीनारायण यांना नोकरी मिळाली. ही खरे तर अगदी सामान्य, म्हणजे एका ‘पोर्‍या’ची नोकरी होती. बँकेत अधिकारी, कर्मचारी होते, वेगवेगळे वरिष्ठ तेथे येत. हे वेगळेच वातावरण या मुलाला अनुभवण्यास मिळत गेले. एक चुणचुणीत पोरगा आपल्याकडे कामाला आहे, याचे त्यांनाही कौतुक होते. या परस्पर पूरक वातावरणातून लक्ष्मीनारायण यांच्यासमोर वेगळे विश्व उलगडत गेले.
तेथे असलेली सारी मंडळी तेलुगू नव्हती. त्यात बहुसंख्य मराठी लोक होते. ते मराठीतून बोलत आणि लक्ष्मीनारायण यांच्या मराठीला हसत. कारण ती मराठी नव्हती...! वेगळीच भाषा होती! बँकेत 80 जणांचा स्टाफ होता. या सर्वांसोबत राहायचे तर आपले मराठी सुधारले पाहिजे, असे त्यांना वाटू लागले आणि त्यांनी पुढाकार घेत बँकेत वाचनालय सुरू केले. बँकेकडे त्यासाठी थोडे बजेटही असे पण जबाबदारी कोण सांभाळणार, असे म्हणत ते दुर्लक्ष करीत. हा मुलगा ते करतोय म्हटल्यानंतर सगळेच तयार झाले. ही गोष्ट साधारण 1963 ची. लायब्ररीतून पुस्तके नेऊन वाचणे, जाणीवपूर्वक चांगले मराठी बोलणे, सर्वांसोबत संवाद वाढविणे अशा पद्धतीने त्यांनी मराठी शिकण्यास प्रारंभ केला. त्यांची जिद्द पाहून बँकेनेही साथ दिली. सर्व जण त्यांना सहकार्य करीत.

आपल्या धडपडीतून सर्वांचा विश्वास जिंकत त्यांनी 1966 मध्ये मराठी व्याख्यानमाला सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला. (तेव्हा सुरू झालेली उद्योग बँक व्याख्यानमाला आजही सुरळीत सुरू आहे...!) गणेशोत्सव बँकेतही होत असे. याच निमित्ताने दहा दिवस दहा व्याख्याने आयोजण्याची त्यांची कल्पना सर्वांनीच उचलून धरली आणि व्याख्यानमालेला प्रारंभ झाला. हा लक्ष्मीनारायण यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा होता. मराठी साहित्यातील अनेक ज्येष्ठ-श्रेष्ठ व्यक्तींचा संपर्क त्यांना या निमित्ताने मिळाला. हा अनुभव त्यांचे आयुष्य समृद्ध करणारा ठरला. ते सांगतात, ‘शरीर दुर्बळ असले तरी लोकांना एकत्र आणण्याचा वडिलांचा गुण मात्र माझ्यात आलेला होता.’
प्रारंभी सोलापूरातील स्थानिक लोक आणि नंतर हळूहळू बाहेरचे निमंत्रित आणण्यास प्रारंभ झाला आणि व्याख्यानमाला प्रतिष्ठा पावू लागली. तेथे त्यांची बोलण्याची हौसही फिटू लागली. त्यांचा व्यासपीठावरील वावर सहजपणे होऊ लागला. मराठी प्रमाण पद्धतीने बोलली जाऊ लागली.

व्याख्यानमालेपाठोपाठ त्यांनी बँकेत नाटके बसविण्याच्या चळवळीलाही जन्म दिला. ते स्वतः लक्ष घालून नाटके - एकांकिका निवडत, त्या बसवून घेत, स्वतः त्यात भूमिका करत. वेगवेगळ्या स्पर्धांत सहभागी होऊन त्यांच्या टीमने बरीच बक्षिसेही मिळविली. शिक्षण बेताचे असले, तरी या ‘एक्स्पोजर’मुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलत गेले. पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकर, शिवाजी सावंत, वपु काळे अशी साहित्यातील मोठी मंडळी पाहायला-अनुभवायला मिळाली. त्यांच्याशी संवाद वाढला.

असेच दिवस जात होते. बँकेच्या वाचनालयातील पुस्तके आणून वाचन चालू होते. भाषेचा तो संस्कार मनावर होत होता. असेच एकदा रवींद्र भट यांनी लिहिलेले ‘इंद्रायणी काठी’ हे पुस्तक त्यांनी आणले आणि ती रात्र त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडविणारी रात्र ठरली. बँकेतून घरी आल्यानंतर वडिलांनी त्यांना त्या रात्री मिलमध्ये जाऊन लक्ष ठेवण्यास सांगितले. ते पुस्तक घेऊन मिलमध्ये पोहोचले. रात्री गेट बंद करून तेथेच ते पुस्तक घेऊन वाचायला बसले आणि संत ज्ञानेश्वर व त्यांच्या परिवारावर कोसळलेल्या संकटांची मालिका वाचून त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. सारे पुस्तक त्यांनी रात्रीतून तन्मयतेने वाचून काढले. पहाटे चार-साडेचारलाच ते घरी परतले. पाच-साडेपाचला तयार होऊन घराबाहेर पडले. वडिलांनी विचारले, ‘कुठे निघालास?’ त्यांनी सांगितले ‘आळंदी’ आणि ते पुण्याच्या बसमध्ये बसले.
पुण्यातून ते आळंदीत आले. संजीवन समाधीवर डोके टेकले. अश्वत्थवृक्षाचे दर्शन घेतले. एकटेच दिवसभर त्या परिसरात फिरत-भटकत राहिले. ‘ही जागा मला आईप्रमाणे बोलावत होती,’ असे ते सांगतात. सारा दिवस तेथे घालवून ते संध्याकाळी बसमध्ये बसले आणि पुण्याला निघाले. त्यांच्या मनात काहीतरी दाटून आले. सोबतचा कागद पेन काढून ते लिहू लागले

माझ्या मराठीचे बोल । चाखिले अमृताचे फळ
त्याहुनि रसाळ । ऐसे बोल मराठीचे
माझ्या मराठीची अक्षरे । उडती संध्येची पाखरे
घेऊनिया कण चोचीत । ज्ञान अमृताचे
माझ्या मराठीची चाल । जाई जुईची वेल
अक्षर फुलांचे पाऊल । वाजे सकाळ संध्याकाळ
माझ्या मराठीची माया । पुष्ट कामधेनुची छाया
सस्नेहे चोखिता तान्हा । वाग्र्साचा फुटे पान्हा
माझ्या मराठीची जादू । कैसी मी मुखे वदू?
अमृताचा की चंद्रू । सांडी अक्षरे भूवनी
ऐसी माय मराठी माझी । देखिली मी कधी न दुजी

ही कविता त्यांनी तेव्हा ‘स्वराज्य’ या साप्ताहिकाकडे पाठविली आणि त्यांनी ती मुखपृष्ठावर प्रकाशित केली. ‘कवी’ लक्ष्मीनारायण बोल्ली यांचा जन्म अशा प्रकारे ज्ञानदेवांचे आशीर्वाद घेऊन आळंदीहून परतताना आला. तेथून त्यांची मराठी सारस्वतातील सेवा सुरू झाली. वयाच्या विसाव्या वर्षी लक्ष्मीनारायण यांनी पहिला लेख लिहिला. तेथून हा लिहिता झाला. त्या काळात पुण्यात ‘सकाळ’ची धुरा ना. भि. परुळेकर सांभाळत. त्यांना या मुलाचे भारी कौतुक. तेलुगू भाषक हा मुलगा उत्तम मराठी लिहितो, त्यामुळे तेव्हा इतरांना लेखासाठी 10 रुपये आणि कवितेसाठी पाच रुपये मानधन ठरलेले असताना या मुलाला त्याच्या दुप्पट मानधन देण्याचा आदेशच तेव्हा परुळेकरांनी देऊन ठेवलेला होता!

एकीकडे मराठीवर प्रभुत्त्व मिळविलेले असतानाच त्यांचा तेलुगूचा अभ्यासही एव्हाना सुरू झाला होता. घरातील संवादामुळे ते तेलुगू भाषा बोलू शकत पण ती अक्षरे त्यांनी कधी गिरविलेली नव्हती. एक एक अक्षर जुळवून वाचत त्यांनी साधारण 1980 च्या सुमारास तेलुगू लिहिण्या-वाचण्यास प्रारंभ केला. वृत्तपत्रांपासून पुस्तकांपर्यंत सारेच काही ते वाचत गेले. एव्हाना त्यांचा पहिला काव्यसंग्रह ‘मैफल’ तयार झाला होता. मराठीतील ज्येष्ठ कवी बा. भ. बोरकरांची प्रस्तावना त्याला लाभली होती. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन त्यांच्याच प्रमुख उपस्थितीत थाटात साजरे झाले.

हा काव्यसंग्रह पु. ल. देशपांडे यांना त्यांनी दिला. त्यावर पु.लं.नी प्रतिक्रिया दिली, “तू कविता लिहितो आहेस, पण अशाच कविता अनेक जण लिहितात. तुझे वेगळेपण काय? तू तेलुगू परंपरेतून आलेला आहेस. तुला दोन्ही भाषा येतात. मराठी आणि तेलुगूतील उत्तम साहित्य तू वाचून काढ. तिकडचे इकडे आण, इकडचे तिकडे ने. झाड तुझ्याकडे आहे, सावली सगळ्यांना दे.” पुलंच्या या सांगण्यातून त्यांच्या आयुष्याची दिशा ठरली. त्यांनी तेलुगू वाचनावर लक्ष केंद्रित केले आणि त्यातून ‘पालबुर्की सोमनाथ’ त्यांच्या हाती लागले.

सन 1130 च्या दरम्यान होऊन गेलेल्या पालकुर्की सोमनाथ या तेलुगू कवीने रचलेला ‘पंडिताराध्य चरित्र’ हा काव्यग्रंथ बोल्ली यांनी वाचला. त्यातील पर्वत प्रकरणात 220 व्या पानावर असलेली 22 ओळींची रचना सर्व तेलुगू अभ्यासकांसाठी गूढ ठरलेली होती. ती वाचल्यानंतर बोल्ली यांच्या ध्यानात आले, की ही तेलुगू लिपित शब्दबद्ध केलेली मराठी काव्यरचना आहे. त्या काळी संत हे समाज जोडण्याचे साधन होते. ते विविध क्षेत्रांतून प्रवास करीत आणि आध्यात्मिक पायावर आधारित भाषिक संवाद कौशल्यांतून समाज जोडत. जशा संत नामदेवांनी पंजाबमध्ये जाऊन पंजाबी रचना केल्या आणि त्यांचा अंतर्भाव पवित्र ‘गुरुग्रंथ साहीब’मध्ये करण्यात आला, तशाच पद्धतीने पालबुर्की सोमनाथांनी तेलुगू-मराठीतील दुवा सांधला होता.

बोल्ली यांनी पुलंशी संपर्क साधून हा विषय कळविला. योगायोगाने त्या वर्षी, म्हणजे 1988 मध्ये ठाणे येथे षण्मुखानंद सभागृहात जागतिक मराठी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील एका सत्रात पुलंनी बोल्ली यांची मुलाखत घेतली आणि दोन भाषाभगिनींतील हा दुवा समाजासमोर आला. तेथून त्यांच्या मराठी-तेलुगू संदर्भातील लेखनाला वेग आला. दोन्ही भाषांतील तुलनात्मक अभ्यास सुरू झाला. हे प्रमाण पुढे वाढत गेले. गोदावरीला आंध्रप्रदेशात ‘तल्ली गोदावरी’ म्हटले जाते.... म्हणजे ‘आई गोदावरी’. महाराष्ट्रात जन्मलेल्या कृष्णा-गोदावरीने आंध्रप्रदेशला सुजलाम सुफलाम केले. हा संदर्भ तेलुगू साहित्यातही प्रतिबिंबित झाला आहे. भाषा, साहित्य, संस्कृती, सण, व्रतवैकल्ये, लोकगीते, कला, संतसाहित्य अशा विविध पैलूंतून हा ठेवा शोधून उजेडात आणण्याचे कार्य पुलंच्या प्रेरणेतून बोल्ली यांनी केले.

बोल्ली यांची साहित्यसाधना सुरू होती. तेलुगू-मराठी संवाद शोधताना हाती लागलेल्या साहित्याचा आढावा घेणारे ‘तेलुगू फुलांचा मराठी सुगंध’ हे त्यांचे पुस्तक पुलंच्या प्रस्तावनेसह प्रकाशित झाले. याची अर्पणपत्रिका बोल्ली यांनी काव्यस्वरुपातच लिहिली आहे -

तेलुगूच्या वेली। मराठी फुलली।
ओंजळ भरली। कवितांनी॥
कवितांचा लळा। लागला आगळा।
म्हणोनिया केला। हा प्रयत्न॥
प्रयत्नांचा भाव। प्रज्ञेचा अभाव।
यत्नाचा स्वभाव। दावियला॥
दाविता कविता। चुका ज्या होता।
पोटी त्या घेता। सांभाळिजे॥

मराठी-तेलुगू या भाषांतील सांस्कृतिक दुवा ठरलेल्या लक्ष्मीनारायण बोल्ली यांचा याच कार्यासाठी पोट्टीश्रीरामलु विद्यापीठातर्फे ‘डी. लिट.’ देऊन गौरव करण्यात आला. ते सांगतात, ‘दहावी पास झालेला माझ्यासारखा माणूस या अभ्यासामुळे ‘डॉक्टर’ म्हणून ओळखला जाऊ लागला...!

ते सांगतात, “मी ज्ञानदेवांचा भक्त आहे. मी हे विनम्रपणे सांगतो. बोरकर सांगत, ‘माझा एक मुलगा सोलापुरात राहतो.’ त्यांनी मला मानसपुत्र मानले होते. ते मृत्यूशय्येवर असताना मला म्हणाले, ‘ज्ञानेश्वरी सतत तुझ्याजवळ ठेव, त्यातून मी बोलेन, तू ऐकत जा.”

त्यांच्या लेखनाची अनेक ठिकाणांहून मागणी होते. त्यांनी साहित्य अकादमीसाठी चार पुस्तके अनुवादित केली आहेत. त्यापैकी तीन पुस्तके ही अकादमी पुरस्कार प्राप्त मूळ तेलुगू पुस्तकांचा मराठी अनुवाद आहेत तर एक अकादमी पुरस्कार प्राप्त मराठी पुस्तकाचा तेलुगूत केलेला अनुवाद आहे. अशा पद्धतीने त्यांच्या नावावर तेलुगूतीलही एक पुस्तक नोंदविले गेले. आजवर त्यांची एकंदर 21 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते साहित्य अकादमीच्या पुरस्कार समितीचे सदस्यही आहेत.

‘एका साळियाने’ या त्यांच्या आत्मचरित्राला महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा न. चिं. केळकर पुरस्कार, स्मिता पाटील पुरस्कार आणि हिंगोली येथील साहित्य संस्थेचा वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे. ज्याला वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत धड मराठी बोलता येत नव्हते, त्याला हे पुरस्कार मिळणे हा चमत्कारच आहे, असे ते सांगतात. एका तेलुगू भाषकाने मराठीतून केलेली साहित्यसेवा अनेकांना आश्चर्यचकित करते. त्यालाही त्यांचा आक्षेप नसतो. ते सांगतात, “एकेकाळी ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वदविले होते. सातशे वर्षांनी तोच चमत्कार करण्याचे त्यांनी ठरविले आणि रेड्याऐवजी माझ्यासारख्या ‘वेड्या’ची निवड केली. माझ्या लेखनाबद्दल माझा एवढाच विनम्रभाव आहे.”

या प्रवासात अनेक टप्पे आले. कधी धक्के बसले. काही पारिवारिक होते. त्यातील एक त्यांच्या वडिलांनीच दिला! महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट लेखन पुरस्काराच्या निवड समितीत गंगाधरपंत कुचन यांच्या शिफारसीवरून बोल्ली यांची निवड करण्यात आली होती. या पुरस्कारासाठी पुस्तके वाचून अभिप्राय द्यायचा असतो. असाच एकदा पुस्तकाचा एक भलामोठा गठ्ठा घरी येऊन पडला. त्यांच्या वडिलांनी चौकशी केली ‘हे काय आहे?’ बोल्ली यांनी सारे काही सांगितले. वडिलांचा प्रश्न होता, ‘या कामाचे पैसे किती मिळणार?’ तेव्हा एका पुस्तकाच्या वाचन-अभिप्रायासाठी शासन 17 रुपये मानधन देत असे. तो आकडा त्यांनी सांगताच वडील खवळले. ‘आपल्याकडे लेबरला किती पगार आहे हे माहिती आहे का?’ असा प्रश्न त्यांनी विचारला. बोल्ली यांच्यावर त्यांच्या रागाचा परिणाम होत नाही, हे दिसताच त्यांनी चक्क घर सोडण्यास सांगितले...! लक्ष्मीनारायण बोल्ली अनेक वर्षे घर सोडून राहात होते. पुढे, काळाच्या ओघात वडिलांनी मुलाला घरी परत बोलावले...!

नाट्य आणि साहित्य क्षेत्रातच कार्यरत असलेल्या शोभा यांच्याशी ते विवाहबद्ध झाले. सौ. शोभा बोल्ली यांचेही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांविषयीचे पुस्तक प्रसिद्ध आहे. या जोडप्याचे गुण रक्तातच घेऊन आलेल्या ममता हिनेही नाट्यक्षेत्रातच करिअरला प्रारंभ केला आहे. तिनेही अनेक पुरस्कार जिंकले आहेत.

मॅट्रिकनंतर बँकेत हरकाम्याची नोकरी पत्करलेल्या लक्ष्मीनाराण बोल्ली यांनी पुढे आपल्या कर्तृत्त्वाने व्यवस्थापक पदापर्यंत मजल मारली. आपल्या वडिलांच्या व्यवसायात ते प्रारंभीच्या काळात सहभागी झाले नाहीत. नंतर ते नोकरी सोडून व्यवसायात उतरले व वडिलांचा व्यवसाय सांभाळू लागले.

त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काही चढउतार आले. त्यांचा विवाह वयाच्या 16 व्या वर्षी 12 वर्षीय भूलक्ष्मी यांच्याशी झाला होता. ते सांगतात, “सुरवातीची काही वर्षे ठीक गेली, पण त्यानंतर काही पेच सुरू झाले. रात्री-अपरात्री घरकामे करणे, विक्षिप्तपणे वागणे वाढत गेल्याने आम्ही मीरज, हैदराबाद येथील हॉस्पिटलमध्ये उपचारही केले. पण उपयोग झाला नाही. माझी दहा वर्षे अशा अवस्थेत गेली. त्यानंतर 1988 च्या दरम्यान काही काळ मी एकटाच मद्रासमध्ये वास्तव्यास होतो. तो काळ शांततेचा गेला. मात्र या काळात माझ्या आणि शोभा कल्याणी यांच्या संबंधांबाबत सोलापुरात चर्चा होती. नाट्यक्षेत्रातील माझी सहकारी असलेल्या शोभा हिच्याशी माझे सूर जुळत होते. पुढे एका क्षणी मी मागील आयुष्य बाजूला ठेवून शोभाशी विवाहबद्ध झालो. त्यासाठी वडिलांचे घर आणि मालमत्ता सोडली. मेघदूत इलेक्ट्रॉनिक्स हे दुकान चालविले. त्यातून संसार उभा केला. पुढे, माझ्या वडिलांच्याच आग्रहावरून मी मिलचे काम सांभाळण्यास सुरवात केली. मी पहिल्या कुटुंबाची जबाबदारी विसरलोे नाही. काही मिळवायचे तर काही गमवावे लागते, हेच खरे.”