Tuesday, October 30, 2012

जकातीचे काय ‘करा’यचे?

‎`एलबीटी` हा विषय महाराष्ट्रभर वादाचा ठरत असताना औरंगाबाद येथील उद्योजकांनी पुढाकार घेत यातून मार्ग काढला. श्री. मानसिंग पवार यांचा यातील पुढाकार महत्वाचा होता. हा विषय कसं हाताळला गेला? या संवेदनशील विषयावर `महाराष्ट्र टाईम्स`च्या संपादकीय पानावर दि. ३० व ३१ ऑक्टोबर २०१२ रोजी प्रकाशित झालेला माझा दीर्घ लेख...
---------------------------------------------------------------------

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17012641.cms

1. जकातीचे काय ‘करा’यचे?

व्यापार-उदीमाची गती नेहमीच विनाअडथळा असावी लागते. महामार्ग , रेल्वे किंवा गरजेनुसार जलमार्गाद्वारे होणारी मालवाहतूक जेवढी विनाव्यत्यय , तेवढा अर्थव्यवस्थेचा प्रवासही सुरळीत ; असे हे समीकरण. ' जकात ' हा विषय त्यामध्ये सर्वात अडथळ्याचा होता. व्यापाराच्या दृष्टीने ही जागतिक पातळीवरील डोकेदुखी ठरलेली होती. सर्व देशांनी त्यावर उपाय शोधला आणि वाहतुकीच्या गतीमधला हा अडथळा दूर केला. जगभरात जकात शिल्लक असलेल्या दोन देशांत इथिओपिया आणि भारत यांचाच समावेश होता. मागील दोन वर्षांत इथिओपियानेही जकात रद्दबातल ठरविली. भारतातही जकात बंद करण्याचे वारे वेगाने वाहत होते. महाराष्ट्र वगळता इतर सर्व राज्यांनी त्यावर पर्याय शोधला. पण ' बुद्धिमान ' महाराष्ट्रात जकात पूर्णतः हटू शकली नाही.
वास्तविक काळाची पावले ओळखून जकात रद्द करण्याची पहिली मागणी स्वातंत्र्यानंतर लगेच , म्हणजे साधारण १९४७-४८ मध्येच झाली होती. पुढे अनेक छोट्यामोट्या आंदोलनांतूनही ती होत राहिली. १९७५-७६ च्या काळात महाराष्ट्रातच सर्वप्रथम या विषयावर मोठे आंदोलन उभे राहिले. जेआरडी टाटा , रामकृण बजाज , केशुब महिंद्रा , नानी पालखीवाला या बड्या हस्तींनी रस्त्यावर उतरून मोर्चा काढत ही मागणी तत्कालीन मुख्यमंत्र्यांसमोर ठेवली! ही बडी मंडळी मोर्चात सहभागी होण्याची ही कदाचित पहिली आणि शेवटची वेळ असावी. तेव्हापासून हा मुद्दा भिजत पडलेला आहे. वास्तविक , त्या मोर्चातील शिष्टमंडळाला उत्तर देताना तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आगामी आर्थिक वर्षात जकात हटविण्यात येईल असे आश्वासन दिले होते!
जकात म्हणजे काय ? संबंधित शहराच्या हद्दीत विक्रीसाठी येणाऱ्या किंवा संबंधित शहराच्या हद्दीतून पुढे जाणाऱ्या व्यापारी मालावर ठरलेल्या टक्केवारीनुसार करवसुली म्हणजे जकात. हा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मिळकतीतील महत्त्वाचा भाग. मात्र , त्यासाठी नाक्यावर लागणाऱ्या भल्या मोठ्या रांगा ही सर्वांसाठीच डोकेदुखी ठरली. शहर पार करून पुढील गावी जाण्यासाठी घ्यावे लागणारे परमिट मिळविण्यात कालापव्यय होत असे , पण शहरात उतरविण्याच्या मालावरील जकातीसाठी नाक्यावरच ट्रक अडवून ठेवणे हे व्यापारउदिमाच्या दृष्टीतून नुकसानकारक ठरत असे. वेळ , साधनसंपत्ती , मनुष्यबळ , ऊर्जा आणि मानसिक त्रास हे सारेच मुद्दे या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे. त्यातही , बिलांच्या वैधतेवरून होणारा संघर्ष नित्याचाच झालेला. त्यामध्ये ' तोडपाणी ' केल्याशिवाय व्यापाऱ्यांची सुटका नाही.
सर्वच आघाड्यांवर होणारे हे नुकसान पहिल्या टप्प्यात १९९५ च्या दरम्यान शिवसेना-भाजप युतीच्या काळात नगरपालिकांच्या पातळीवर थांबविण्यात आले. युतीच्या कार्यकाळात नगरपालिकांची जकात रद्द झाली आणि त्यामुळे येणारी तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध करून दिला. महानगरपालिकांचा प्रश्न मात्र कायम राहिला. विशेष बाब म्हणजे जकात रद्द करण्याबाबत विचार करण्यासाठी सरकारने १९४७-४८ मध्ये पहिली समिती नेमली होती. यानंतर समित्यांच्या स्थापनांचा क्रम कायम राहिला. सध्या राज्याच्या वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखालील कार्यरत असलेली समिती ही १८ वी समिती आहे. याआधीच्या सर्व १७ समित्यांनी एकमुखाने जकात रद्द करण्याची जोरदार शिफारस केलेली आहे. पण तरीही जकात हटत नाही!
अर्थात , जकात हटत नसल्याचेही सबळ कारण आहे- ' मुंबई '! एकट्या मुंबईचे जकातीपासूनचे उत्पन्न सुमारे सहा हजार कोटी रूपये आहे. राज्यातील जकातीचे एकंदर उत्पन्न सुमारे १२ हजार कोटी रूपयांचे आहे. मुंबईशिवाय पुणे , पिंपरी-चिंचवड , नागपूर आणि नाशिक मिळून मिळणारे उत्पन्न सुमारे पाच ते सहा हजार कोटींचे तर उरलेल्या महापालिकांचे मिळून उत्पन्न साधारण एक ते दीड हजार कोटींची आहे. मुंबईतून मिळणारी सुमारे सहा हजार कोटी रूपयांची जकात हा या निर्णयातील सर्वात मोठा अडथळा ठरलेला आहे. वास्तविक , १९५२ च्या ' बॉम्बे म्युन्सिपल अॅक्ट ' नुसार पाणीपट्टी , घरपट्टी , मालमत्ता कर आदी करांतून महापालिकेने उत्पन्न मिळवावे आणि आवश्यकता असेल तरच ; अगदी आणीबाणीच्या स्थितीतच जकात कराची वसुली करावी , असे सांगितले असताना प्रत्यक्षात मात्र दुय्यमच नव्हे तर तिय्यम स्थान देण्यात आलेला जकात कर हाच या सर्व करांमध्ये प्रमुख कर ठरला , हे विशेष.
गुजरातेत २००९ मध्ये जकात रद्द करण्यात आला. या राज्याची वार्षिक जकात वसली साधारण ६०० कोटींची हेती. राज्यातील ' व्हॅट ' मध्ये अर्धा टक्क्याची वाढ करून तेथील जकात रद्द ठरविण्यात आली. पंजाबमधील हा प्रश्न ४०० कोटी रूपयांचा होता. तो सुद्धा अशाच प्रकारे मार्गी लागला. हाच मार्ग महाराष्ट्रात अवलंबायचा , तर साधारण १२ हजार कोटी रूपयांच्या वसुलीसाठी ' व्हॅट ' सरासरी ८ ते १० टक्क्यांनी वाढवावा लागेल! ते शक्य होणार नाही. दिल्लीसारख्या राज्यात मालमत्तांच्या विक्रीच्या स्टँपड्यूटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होणारी करवसुली आणि केंद्र सरकारच्या निधीमुळे महापालिकेवर आर्थिक बोजा फारसा पडत नाही. त्यामुळे त्या राज्यात जकातीचा विषय खूप आधीच संपला. उत्तर आणि दक्षिणेतील राज्यांनीही आपापल्या पातळीवर निर्णय घेत जकात रद्द करण्याचे निर्णय तर घेतले , पण पर्यायी उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध नसल्याने या पालिकांची आर्थिक स्थिती डबघाईला आली. त्यांना राज्य सरकारांकडून मिळणाऱ्या अनुदानावर अवलंबून राहण्याची वेळ आली.
महाराष्ट्रात मुंबई वगळून इतर महापालिकांसाठी निर्णय घ्यावा , तर मुंबईला केंद्रशासीत करण्याची मागणी करणाऱ्या मंडळींना आपसुकच बळ मिळण्याची शक्यता! त्यात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे , देशात इतर कोणत्याही राज्यात नसावीत , एवढी महाराष्ट्रातील प्रगत शहरांची संख्या आहे. उत्तरेतील कोणतेही राज्य डोळ्यासमोर आले तर तेथे एक किंवा दोनच मोठ्या शहरांची नावे पुढे येतात. फार तर ही संख्या तीनपर्यंत पोहोचते. महाराष्ट्रात मात्र मुंबईपाठोपाठ पुणे , नागपूर , ठाणे , पिंपरी चिंचवड , नाशिक , कोल्हापूर , औरंगाबाद अशी जकातीचे उत्तम उत्पन्न देणारी शहरे आहेत. ही मोठी तूट भरून काढणे सरकारला अवघड आहे , या पार्श्वभूमीवर एलबीटीचा विचार व्हायला हवा
दत्ता जोशी , औरंगाबाद
(पूर्वार्ध)

2. जकातीला दिला समर्थ पर्याय

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17027178.cms
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी औरंगाबादची जकात रद्द करण्याचा निर्णय ३० जून २०११च्या सायंकाळी जाहीर केला , तेव्हा औरंगाबादच्या व्यापारी पेठांत आनंदाची लाट पसरली. या आनंदाचे आणखी एक कारण जकातवसुली करणाऱ्या कंत्राटदारांकडून होणारा छळ , हेसुद्धा होते! पण औरंगाबादचा हा निर्णय सहजासहजी झाला नव्हता. औरंगाबाद महापालिकेत सत्तेवर असलेली शिवसेना-भारतीय जनता पक्ष युती आणि राजेंद्र दर्डा वगळून सर्व लोकप्रतिनिधी जकात रद्द करण्याच्या विरोधात होते. जकात कायम राहिली पाहिजे आणि ती एका विशिष्ट जकात कंत्राटदारांकडूनच वसूल होत राहिली पाहिजे , यासाठी हे सर्वजण आग्रही होते. ३० जून २०११ ही या विषयीचा निर्णय घेण्याची अंतिम मुदत होती. त्याच्या आधी या सर्व लोकप्रतिनिधींनी मिळून मुख्यमंत्र्यांची भेट घेत जकात कायम ठेवण्याची आग्रही विनंती केली. या भेटीनंतर काही मिनिटांतच ' औरंगाबाद व्यापारी महासंघा ' च्या वतीने मानसिंग पवार यांनी एकट्यानेच मुख्यमंत्र्यांची भेट घेत जकात उठविण्याची आग्रही मागणी केली व ' एलबीटी ' च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ' व्यापार महासंघ ' पुढाकार घेईल , असे वचनही दिले.

जकात गेली ; पण ' एलबीटी ' नेमके काय , हेच कुणाला माहिती नव्हते! त्यामुळे ' एलबीटी ' ची अंमलबजावणी कशी करावी , यावर चर्चा सुरू झाली. सर्वात महत्त्वाचा भाग होता व्यापाऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचा आणि त्याच वेळी एलबीटीसाठीच्या नोंदणीचा. व्यापारी महासंघातर्फे काही पदाधिकाऱ्यांना ही योजना समजावून सांगण्यासाठी तयार करण्यात आले. सोबतीला महापालिकेचे अधिकारी होते. शहरात अस्तित्वात असलेल्या एकंदर ७२ संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना तेथे एकत्र आणून त्यांच्याशी एक-एक करून संवाद साधण्यास प्रारंभ झाला. दुसरीकडे व्यापारीवर्गाकडून एलबीटी नोंदणी फॉर्म भरून घेण्यास प्रारंभ झालेला होता. सर्वांच्या चर्चेतून आलेल्या मुद्यांतून एलबीटीचे स्वरूप निश्चित होत गेले. १० लाखांच्या आत उलढाल असलेल्या व्यापारी संस्थांना सरसकट दोन टक्के टॅक्स मूळ कायद्यातच नमूद होता. त्यांनी आपले वार्षिक विवरणपत्र दाखवायचे आणि त्याच्या दोन टक्के ' एलबीटी ' भरायचा , की झाले. या एका निर्णयातून साधारण २५ टक्के व्यापाऱ्यांचा पाठिंबा मिळाला. जीवनावश्यक वस्तूंवर पूर्वी जकातीचे जे दर होते , त्याचे समकक्ष दर नव्या व्यवस्थेत लागू होतील , असा निर्णय घेण्यात आला. (वास्तविक , आता नव्या तरतुदीप्रमाणे सर्वत्र हे दर नगण्य असणार आहेत.) यामुळे अन्नधान्य , औषधं वगैरेंचे विक्रेते पाठीशी आले. अशा प्रकारे एक-एक करून संघटनांशी चर्चेतून त्यांच्या वस्तूंसाठीचे करनिर्धारण ठरविण्यात आले. हे निर्धारण जकातीच्या निर्धारणाच्या आधारावर होते ; पण यातून व्यापाऱ्यांना होणारा त्रास टळणार होता. विशेष म्हणजे हा सारा उपक्रम केवळ तीन दिवसांत पार पडला.
शहरातून बाहेर जाणाऱ्या मालाचा यात प्रश्नच उद्भवणार नव्हता. पण विक्रीसाठी शहरात आणलेला , पण शहराबाहेर विकल्या गेलेल्या मालाचा एलबीटी का भरायचा ? तशा स्थितीत ' रिफंड ' ची सुविधा (सेट ऑफ) देण्यात आली. हा रिफंड मिळविण्यासाठी व्यापाऱ्यांनी आपला पुढचा कर भरताना रिफंडची रक्कम त्यातून वजा करायची आणि त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे सादर करायची! महापालिकेत हा कर भरण्यासाठी होणारी संभाव्य गर्दी टळावी म्हणून शहरातील १५ बँकांत महापालिकेच्या नावे खाते उघडण्यात आले. आपापल्या भागातील बँकेत पैसे भरणे व्यापाऱ्यांना सोपे जाणार होते!
एलबीटीमधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे कोणाही अधिकाऱ्याला कोणाही व्यापाऱ्याकडे जाऊन त्यांचा व्यवहार तपासण्याचा त्यांनी गृहीत धरलेला मुक्त अधिकार काढून घेण्यात आला. त्यासाठी त्याला महापालिकेच्या आयुक्ताची लेखी परवानगी आवश्यक ठरविण्यात आली. आयुक्तांच्या अनुपस्थितीत उपायुक्तांची स्वाक्षरी यासाठी चालणार नाही , हेही यात स्पष्ट करण्यात आले. या तरतुदीमुळे ' दारोदारी उभे राहणारे जकात नाके नको ' ही मागणी पूर्ण झाली.
दुसऱ्या बाजूने ' व्यापारी महासंघा ' ने महापालिकेचाही तोटा होणार नाही यासाठी काळजी घेतली. व्यापाऱ्यांनी पारदर्शीपणे कर भरला पाहिजे , यासाठी त्यांनी मनोभूमिका तयार करण्याचे काम केले. प्राप्तिकर व ' व्हॅट ' यातील आकडेवारी जुळली नाही तर भविष्यात त्रास होऊ शकतो , हे जाणवून दिले. त्यामुळे लपवाछपवी बंद झाली. महापालिका आपली आहे आणि शहरही आपलेच आहे. त्यामुळे ही संस्था ' बुडणार ' नाही याची काळजी करदात्यांनी घेतली पाहिजे , हे व्यापारी वर्गाला समजावून सांगण्यात आले.

पुढची कसोटी होती ती वसुलीच्या आकड्यांमध्ये. ही वसुली किमान जकातीच्या रकमेएवढी तरी नक्कीच होईल , अशी हमी महासंघाने दिली होती. पहिल्या महिन्यानंतर वसुलीचा पाहिला आकडा समोर आला , तसे सारेचजण आश्चर्यचकित झाले. हा आकडा सुमारे १४ ते १५ कोटींचा होता. कंत्राटदारामार्फत जकातवसुली करताना महापालिकेला दरमहा साधारण १० कोटींचे उत्पन्न मिळत होते. हा आकडा सुमारे ४० टक्क्यांनी वाढला. हे कसे घडले , याचा शोध घेतला तेव्हा लक्षात आले की , एवढे उत्पन्न देण्याची या शहराची क्षमता आहे ; फक्त त्याची वसुली व्यवस्थितपणे होत नव्हती. महापालिकेच्या अकार्यक्षम वसुलीपद्धतीने पूर्वी वार्षिक जकातवसुली ६० ते ८० कोटींपर्यंत असायची. कंत्राटदाराने साधारण १२० कोटींचे कंत्राट मिळविले होते. त्याच्या वसुलीची पद्धती पाहता हा आकडा नक्कीच २०० कोटींना टेकणारा असावा , असे मानण्यास वाव होता. या पार्श्वभूमीवर महापालिकेने एलबीटीतून वाढीव उत्पन्न तर मिळविलेच पण एलबीटीच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे मुख्यमंत्र्यांनी ' एलबीटी प्रोत्साहन योजने ' नुसार महापालिकेला सुमारे २० कोटींचा निधीही दिला!
व्यापारी महासंघाच्या नेतृत्वाने मिळविलेला विश्वास , प्रशासनाने घेतलेली समन्वयाची भूमिका आणि अखेरीस लोकप्रतिनिधींनीही स्वीकारलेली तडजोड या आधारावर औरंगाबाद शहराने ' एलबीटी ' चे मॉडेल यशस्वी करून दाखविले. अन्य शहरांनीही हा प्रयोग का करू नये ?
(उत्तरार्ध)
- दत्ता जोशी , औरंगाबाद

Monday, September 10, 2012

मोनेर मानुष : माणूस होण्याच्या प्रयत्नाची गाथा...


जनशक्ती वाचक चळवळीने प्रकाशित केलेली `मोनेर मानुष` ही कादंबरी नुकतीच वाचली. मला ती आवडली. त्याबद्दल थोडेसे...
-----------------------------------------

संवेदनांच्या पलिकडे जाणे म्हणजे संवेदनहीन होणे नव्हे. तीक्ष्ण कंगोरे बोथटले की चाकोरीचे व्रणही पुसट होत जातात. अशीच, हलकासा धक्का देणारी एक छोटीशी कादंबरी - ‘मोनेर मानुष’. बंगाली महाकादंबरी ‘प्रथम आरव’चे लेखक असलेल्या सुनील गंगोपाध्याय यांची ही लघुकादंबरी आशयविस्ताराच्या दृष्टीतून एखाद्या महाकादंबरीचा प्रत्यय देते. ही मूळ बंगाली कादंबरी. त्याचा हिंदी अनुवाद साहित्य अकादमीने प्रकाशित केला. अनंत उमरीकर यांनी तो मराठीत उतरविला. ‘जनशक्ती वाचक चळवळी’ने तो प्रकाशित केला आहे. 

ही जेमतेम 143 पानांची कादंबरी. कादंबरी असली तरी पूर्णतः काल्पनिक नाही. त्याला बंगाली परंपरेतील ‘बाऊल’ची पार्श्वभूमी आहे. ‘लालन फकीर’  किंवा ‘लालन संत’ अशा नावांनी ओळखल्या जाणार्‍या बंगाली संताच्या जीवनाच्या आणि तत्वज्ञानाच्या पार्श्वभूमीवर हे कथानक फुलते. यात हाताळलेला विषय रुढ अर्थाने संवेदनशील आहे. पण वर उल्लेख केल्याप्रमाणे या संवेदनांचे कंगोरे जाणीवपूर्वक घासून बोथट केल्याने त्यांचा काही वेगळाच परिणाम उमटतो. तशा अर्थाने लालन फकीर यांच्या साहित्याच्या किंवा जीवनाच्या तपशीलाचा कसल्याही प्रकारचा ठोस आधार नसताना गंगोपाध्याय यांनी ज्या पद्धतीने हे लेखन फुलविले त्याला तोड नाही. हेच त्यांचे बलस्थानही आहे.

समाजातील घट्ट विणीला सैलावणार्‍या व्यक्तींना त्या त्या काळात तीव्र विरोधांना सामोरे जावे लागले. लालन फकीर हे त्यातील एक. रुढ अर्थाने कनिष्ठ कुळात जन्मलेल्या ‘लालू’चा ‘लालन फकीर’ कसा होतो, याची ही कहाणी. हिंदू समाजात पूर्वापार चालत आलेल्या जातीप्रथांच्या बंधनांमुळे लालूसारखा एक विलक्षण तरुण दुर्लक्षित राहतो, गंगामाईच्या यात्रेत असतानाच देवीच्या रोगाने तो मेला असल्याचे समजून त्याचे प्रेत नदीत सोडून दिले जाते. पुढे एका वळणावर एक मुस्लिम स्त्री त्याला वाचविते. काही काळाने त्याच्या गावातील काही लोक त्याला नव्या ठिकाणी ओळखतात आणि आपल्या गावी परत नेतात. पण मुस्लिमाच्या हातचे अन्न खाल्ल्याने तो धर्मभ्रष्ट झाल्याचे सांगत त्याची आईही त्याला वाळीत टाकते. त्यानंतर तो घर सोडतो. जंगलात जातो. तेथेच वस्ती करतो. या वस्तीवर हळूहळू सर्वच धर्मातील समदुःखी येत जातात. स्वतःच्या अलौकीक गीतप्रतिभेतून रचना मांडताना ‘लालू’चा ‘लालन फकीर’ किंवा ‘लालन संत’ होतो. त्याला ‘लालनसाई’ म्हणूनही ओळखले जाऊ लागते...

हे कथानक साधारण सन 1780 ते 1880 या काळातले. ते फुलताना त्या काळातील अपरिहार्य संदर्भ समोर येत जातात. हिंदू समाजातील भ्रामक समजुती, मानवतेला काळिमा फासणार्‍या रुढी, मुस्लिम समाजातील कुप्रथा, भेदाभेद मानत नसले तरीही त्या समाजात असलेले जातीभेद... कारण ते सारे मूळचे हिंदूच. बाटून मुसलमान झाले तरी मूळ पीळ कसा जाणार? या पार्श्वभूमीवर लालनसाईंनी उभारलेली मिश्रवस्ती वेगळेच संदर्भ देऊन जाते. सर्व समाजातील पीडित, दुःखी स्त्री-पुरुष तेथे एकत्र येतात. तिथे जातीप्रथा नसते की धर्माची बंधने... कोणी कुणाचा ताबेदार नसतो की कोणी कोणाचा नोकर... ‘जमीन परमेश्र्वराची... त्याने दिलेल्या एका छोट्या तुकड्यावर आम्ही आमचे संसार उभारतो आहोत’ या भावनेने जगणारी ही सारी कुटुंबे अप्रत्यक्षपणे वेगळाच संदेश देतात. लौकीकअर्थाने अशिक्षित असलेले ‘लालनसाई’ सामान्य माणसापासून जमीनदारापर्यंत प्रत्येकालाच हवेहवेसे वाटतात, हे त्यांचे मोठेपण आणि त्यांचे विशुद्ध, तार्किक, व्यापक विचार हे त्या मागचे प्रमुख कारण. 

ऐतिहासिक लेखनात काही ठळक टप्पे हाती लागतात. त्यातील अदृष्य साखळ्या जोडण्याचे काम खूप महत्वाचे असते. लेखकाच्या कौशल्याचा, संवेदनशीलतेचा हा भाग असतो. गंगोपाध्याय यांच्यासारखा सिद्धहस्त लेखक ज्या पद्धतीने हे चित्रित करतो ते वाचताना डोळ्यासमोर ‘चित्रपट’च सरकत असतो. अनंत उमरीकर यांनी बंगाली पार्श्वभूमीचे हे लेखन हिंदीच्या मार्गाने मराठीत आणताना त्याचा आत्मा हरवू दिला नाही, हे पुनःपुन्हा जाणवते...

राम की रोहिम से कोन जॅन
क्षिती जॅल कि बायू हुताशॅन
शुधाईल तार ऍन्बेषॅन
मुर्खो देखे केड बॉले ना ।
(तो राम आहे की रहिम, तो माती-पाणी आहे की वायू-अग्नि, तो जो काय आहे त्याचा शोध घेण्याचा रस्ता तर कुणे दाखवावा; पण आम्हा मुर्खांना पाहून कुणीच मार्ग दाखवीत नाही...)

मनातला अंधःकार दूर करून सत्यप्रकाश शोधण्याच्या मार्गातील ‘लालनसाई’च्या जीवनकथेतून राम आणि रहिम यांच्या उत्तरप्रवाहातील आग्रही वैय्यर्थता अधोरेखित होत जाते. 
त्यांचा व्यापक विचार अल्पांशानेही पाझरला, तर अनेक प्रश्न मार्गी लागतील!

- दत्ता जोशी

मोनेर मानुष
मूळ बंगाली लेखक - सुनील गंगोपाध्याय
मराठी अनुवाद - अनंत उमरीकर
जनशक्ती वाचक चळवळ
पाने 144, मूल्य 100 रु.
संपर्क : जनशक्ती - 0240-2341004

Friday, August 24, 2012

या कलाकारासाठी आपण काही करणार?


मी आज सकाळी पुष्पा पागधरे यांच्याशी फोनवर बोललो. मराठीतील ज्येष्ठ गायिका पुष्पा पागधरे सध्या मुंबईतील माहीम भागात रहेजा हॉस्पिटल जवळ मच्छीमार वस्तीत राहत आहेत. `इतनी शक्ती हमे देना दाता...` या सारखे `अंकुश` चित्रपटातील हिंदी गीत आणि मो. रफी यांच्यासमवेत गायलेले `अगो पोरी संभाल दरीयाला तुफान आयलंय भारी...` हे मराठी गाणे... या शिवाय `आला पाउस मातीच्या वासात गं...`, `हात मेहंदीचा रंग माझा गोरा...`, `नाच गं घुमा... कशी मी नाचू?`  सारखी मराठी गीते गाणाऱ्या पुष्पाताई `आयत्या बिळात नागोबा` आणि `ज्योतिबाचा नवस` या दोन चित्रपटांसाठी `उत्तम पार्श्वगायिका` या `चित्रपट महामंडळा`च्या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. त्यांना १४०० रुपये दरमहा मानधन मिळते !  

त्यांनी १९८७ मध्ये कलाकाराच्या १० टक्के कोट्यातून मुंबईत घर मिळावे म्हणून अर्ज केला होता. तो २५ वर्षांपासून `विचाराधीन` आहे. या काळात किती `पात्र` कलाकारांना या कोट्यातून घर मिळाले, हा संशोधनाचा विषय ठरावा. मागील आठवड्यात मी ठाणे जिल्ह्यात पालघर येथे गेलो होतो. तेथे माझा मित्र डॉ. प्रकाश गुडसूरकर असतो. तो ज्या `फिलिया` हॉस्पिटलमध्ये कन्सल्टन्त आहे, ते हॉस्पिटल डॉ. पागधरे यांचे आहे. ते नाव वाचून मला `पुष्पा पागधरे` हे नाव आठवले. काही गाणी आठवली. योगायोगाची गोष्ट ही, की तेथून परतल्यानंतर एक-दोन दिवसांनी `लोकसत्ता`मध्ये त्यांच्या संदर्भात एक बातमी प्रकाशित झाली. त्यानंतर आज एक बातमी आली. त्यात त्यांचा मोबाईल नंबर होता. मी त्यांच्याशी संपर्क साधला. छान गप्पा झाल्या.

त्या म्हणाल्या, ``लोकसत्ता मध्ये बातमी आली. त्या नंतर मंगेशकर कुटुंबीय, राज ठाकरे यांच्यासह अनेकांनी माझ्याशी संपर्क साधला. मदतीची तयारी दाखविली. पण सुदैवाने माझी आर्थिक स्थिती अगदी वाईट नाही. मी मच्छीमारांच्या वस्तीत राहते. मला एवढेच वाटते, की सरकारकडून मिळणारे १४०० रुपये मानधन कुणालाच पुरत नाही. ते सर्वांनाच वाढवून द्यावे. मी १९८७ मध्ये १० टक्के कोट्यातून घरासाठी अर्ज केला होता, पण अजून घर मिळाले नाही. शासनाने ते मला मिळवून द्यावे आणि मी केलेल्या योगदानाचा यथोचित सन्मान व्हावा...``

किती सध्या अपेक्षा आहेत या? या पूर्ण करणे सरकारला अवघड आहे? `माहितीच्या अधिकारा`त मागणी केली तर कोणा `कलाकारा`ला कोणत्या `कले`साठी घर देण्यात आले आणि त्या साठी कोणा नेत्यांनी `प्रयत्न` केले हा इतिहास उगाळला तर खूप काही घबाड हाती लागेल...! अशा कलाकारासाठी कोण पुढाकार घेणार? आपल्यापैकी कोणाची मंत्रालयात `वट` असेल तर पुष्पा पागधरे यांची इच्छा त्यांच्या वृद्धापकाळी तरी पूर्ण होऊ शकेल?

``मी आपणास काय मदत करू शकतो?`` या माझ्या प्रश्नाला उत्तर देताना त्या जे बोलल्या, ते त्यांच्या मोठ्या मनाचे द्योतक ठरले. त्या म्हणाल्या, ‘एखाद्या कलाकाराला रसिकाकडून फक्त दाद मिळण्याची अपेक्षा असते. देवाच्या दयेने माझे आयुष्य बरे आहे... अगदीच दरिद्री स्थिती नाही. आपण मदतीचा हात पुढे केलात, त्या बद्दल धन्यवाद. अनेकांनी असा हात पुढे केला. पण मला आपणाकडून काही नको. सरकारने माझ्या कामाची दाखल घेवून मला घर मिळवून द्यावे आणि माझ्या कामाचा योग्य पुरस्काराद्वारे सन्मान करावा, एवढीच अपेक्षा आहे.``

पुष्पा पागधरे यांची गाणी ऐकायची, तर http://gaana.com/#!/artists/pushpa-pagdhare ही लिंक पहा.
त्यांची एक छान अप्रकाशित गझल ऐकायची असेल तर http://himanshuray.weebly.com/uploads/7/9/7/0/7970745/pushapa_pagdhare-tere_ansuo-air.mp3 ही लिंक क्लिक करा.
त्यांच्याशी बोलायचे तर 9869534160  या क्रमांकावर संपर्क साधा...
शक्य असेल तर मुख्यमंत्र्यांकडे पुष्पा पागधरे यांच्यासाठी विनंती करा...

Sunday, July 8, 2012

दत्ता जोशी यांचा एक आयकॉन युक्त अनुभव!!!! by - आल्हाद देशपांडे

फेसबुकवरील मैत्री कशी खुलू शकते...? `हसत खेळत` ग्रुपमधील मित्र आल्हाद देशपांडे यांनी `त्या` दिवशी उपस्थित सर्वांचा आगळा परिचय करून देण्याचे ठरविले आहे. त्यात रविवारी त्यांनी माझा `नंबर` लावला!  हे लेखन आणि त्यावरील प्रतिक्रिया इथे देत आहे... अर्थात आल्हाद यांची परवानगी गृहीत धरून...
---------------------------------------------------------

दत्ता जोशी यांचा एक आयकॉन युक्त अनुभव!!!!

मित्रानो ---------आपले गंभीर व्यक्तिमत्व लाभलेले मित्र ;;;; श्री .दत्ता जोशी हे समाजातील संघर्षातून वर आलेल्या आणि प्रतिकूल परिस्थितीत यश मिळविलेल्या उद्योजकांवर कायम लिखाण करीत असतात आणि इतरानाही ते प्रेरणादायी ठरतेच आणि ते राजकारणी लोकांना मात्र ते त्यांच्या लेखनात अजिबात थारा देत नाही हे सर्वश्रुत आहेच!-------पण एक वल्ली अशी पण निघाली ज्याने एक दिवस दत्ता भाऊ चा दरवाजा ठोठवला ---दत्ता जोशी नि दार उघडून त्या व्यक्तीला बसायला सांगितले आणि प्रथम त्यास पाण्याचा ग्लास दिला ---त्याने पाणी पीले आणि धन्यवाद म्हणून, येण्याची प्रस्तावना केली ती अशी ----दत्ता भाऊ ;;;;;मी प्रकाश अण्णा
मा. भुजंगराव जी चा P .A.---तुम्ही संघर्षातून वर आलेल्या लोकांवर पुस्तक लिहिता म्हणून कळाल ---आमच्या साहेबांवर पण एक पुस्तक तुम्ही लिहा अशी साहेबांची इच्छा आहे ----त्याचा जो काही खर्च असेल तो आम्ही देऊच !!!

दत्ता जोशी-----अण्णा ,तुम्हाला कदाचित माहित नसेल तर सांगतो---मी फक्त त्या व्यक्तीवर लेखन करतो ज्याला राजकारणाची पार्श्वभूमी नाही!

प्रकाश अण्णा ---दत्ता भाऊ ,ठीक आहे ,आमचे साहेब राजकारणात असले तरी सामाजिक उपक्रमात अधिक आहेत ,त्यामुळे तुम्ही संघर्ष वैगेरे काय ते म्हणाला न
त्यात ते एकदम फिट्ट बसतात!

दत्ता जोशी-----अण्णा ,मला कशाला बोलायला लावता ---तुमच्या साहेबांचे जुगाराचे अड्डे आहेत,मटके चालवतात ,दारू आणि अवैध धंदे करतात हे सगळ्या जगाला
माहित आहे!---आणि अशा माणसावर मी लेखन कराव म्हणता की डोक बिक फिरलं कि काय तुमच ?

प्रकाश अण्णा-----दत्ता भाऊ असे चिडू नका ,शांत व्हा !----अहो हे सगळ खर असल तरी पुस्तकात आपल्याला चांगल च लिहायचं आहे !

दत्ता जोशी----- नाही मी मान्य करतो कि आपण एकमेकांना खर सांगायला पाहिजे ,शेअर करायलाच पाहिजे पण म्हणून काहीपण लिहायचं काय?
तुमचे साहेब सिनेमा टोकिज वर तिकिटांचा काळा बाजार करायचे ,गुंडगिरी करायचे!

प्रकाश अण्णा ---- दत्ता भाऊ तुम्ही पुस्तकात लिहा न कि ते गरिबीमुळे टोकिज वर नोकरी करायचे ,ते गांधीजी चे भक्त होते ---काबाडकष्ट करून त्यांनी जिनिंग ,ओईल
कंपन्या निर्माण केल्या अनेकांना रोजगार दिला---अनेकांचं पुनर्वसन केल ---अस म्हणतो हो मी,दत्ताभाऊ !!!!

दत्ता जोशी-------- प्रकाश अण्णा ,तुम्ही निघता कि मी धक्के मारून बाहेर काढू?

प्रकाश अण्णा----- दत्ता भाऊ रागावू नका ,हे बघा तुमच्यासाठी इसार रक्कम पण आणलीय ---साहेब तर म्हणाले दत्ता भाऊ ना महिन्याभर आपल्या गावा बाहेर च्या
फार्म हाउस वर शिफ्ट करा---म्हणजे त्यांना शांतपणे पुस्तक लिखाण करता येईल!!!!

दत्ता जोशी--------- तुम्ही लोकांनी माझ्या आयकॉन ह्या शब्दाची व्याख्याच बदलून टाकलीय ----आता मला ;''गुन्हेगारी दुनिये चे आयकॉन'' अशी पुस्तके काढावी
लागतील----ज्या मध्ये तपशीलवार गुन्हे कसे करायचे ह्या बद्दल माहिती असेल ,असाच ना अण्णा ?

प्रकाश अण्णा ----- दत्ता भाऊ किती चिडता हो-----तुम्ही फक्त हो म्हणा मी तुम्हाला आमच्या साहेबांसारखे अनेक प्रकरण आणून देईल तुम्ही शांतपणे बसून त्यांच्यावर
लिहा----आपण दोघ हि कमवू !---हे बघा मी प्रकाशक पण शोधलाय आणि ४-जणांचा इसार पण आणलाय --आणखी ४-जण प्रतीक्षा यादीत
आहेत ---तुम्हाला आता गावो गाव जिल्हे फिरायचे अजिबात गरज नाही ----तुम्ही फार्म हाउस वर बसून फक्त पुस्तक लिहायची बघा !

दत्ता जोशी-------- प्रकाश अण्णा ,तुम्ही निघता कि मी धक्के मारून बाहेर काढू?

प्रकाश अण्णा ----- दत्ता भाऊ,जाऊ द्या एखादी कविताच करा आमच्या साहेबां वर ,रविवारच्या पुरवणी ला देऊ टाकून !

दत्ता जोशी--------मला कविता येत नाहीत, पण कविता करणारा एक जण आहे माझ्या परिचयाचा आणि योगायोगान तो पण जोशीच आहे---जयंत जोशी ,मी तुम्हाला
त्याचा नंबर देतो---तो तुमच काम कदाचित करेल---हा घ्या नंबर आणि निघा !

प्रकाश अण्णा ----- दत्ता भाऊ, जाऊ द्या आज तुमचा मूड ठीक नाही---मी आता तुमच्या त्या जयंत जोशी का कोण त्यांच्या कडे जाऊन कविता करून घेतो तूर्त---पुन्हा
भेटतो बर का दत्ता भाऊ ,काही चुकल असल तर माफ करा गरिबाला!---येतो!!!!
 ·  ·  · 7 hours ago

Monday, July 2, 2012

फेसबुक, नव-मैत्र आणि मी ...!


फेसबुकबद्दल माझे मत फारसे चांगले नव्हते. काही अनुभव मी स्वतः घेतले होते. काही ऐकून होतो. त्यामुळे मी स्वतःला फेसबुकवर दररोज जास्तीत जास्त २० मिनिटे लॉग इन राहण्याचे बंधन घालून घेतले होते. कोणत्याही नव्या उपक्रमाबद्दल प्रतिक्रिया देताना, त्यात सहभागी होताना मी खूप साशांकातेने सारे तपासून पाहतो. असे असले तरीही फेसबुक हे संपर्काचे, माणसे जोडण्याचे उत्तम साधन आहे, याची खात्री अनेक वेळा पटते. कधी कधी अनुभवता येते. कालच्या रविवारी, १ जुलै रोजी मी सुद्धा याचा एक साक्षीदार झालो. या आधी आयुष्यात कधीही न भेटलेली १४-१५ माणसे परस्परांशी अकृत्रिम बंधानी जोडली गेली.


औरंगाबादेतील फेसबुक सदस्यांचा एक मेळावा आयोजित करण्यात आला असल्याचा पहिला मेसेज मी दुर्लक्षित केला होता. दुसऱ्या मेसेजला मी उत्तर दिले आणि चौकशी केली. ३० तारखेला आठवणीचा मेसेज आला आणि एखाद्या तासासाठी जाऊन येऊ, या विचाराने, सकाळची पूर्वनियोजित १-२ कामे आटोपून कार्यक्रम स्थळी पोहोचलो. माझ्या कल्पनेपेक्षा तेथील वातावरण खूप वेगळे होते... त्यात फेसबुकवर एरव्ही दिसणारा उथळपणा नव्हता. हा मुड परिपक्वतेकडे जाणारा होता... मी थोडा अधिक वेळ थांबण्याचे ठरविले. हा वेळ कारणी लागला असे मला वाटते.

विशाखा रुपल आणि अंबिका टाकळकर या दोघींनी या आयोजनात पुढाकार घेतलेला होता, हे आधीच्या मेसेजवरून लक्षात आले होते. मी पोहचलो तेव्हा ६-७ जण तेथे होतेच. त्यातील आल्हाद देशपांडे यांनी मला नावाने ओळखले...! ती आमची पहिलीच भेट होती, पण फेसबुकवरील माझा फोटो त्यांच्या पक्का लक्षात होता...! एकेकाची ओळख झाली... आणखी काही जण पोहोचले आणि परिचयाचा राउंड सुरु झाला, तेव्हा लक्षात आले की तेथे पोहोचलेला प्रत्येक जण काही वेगळे रसायन आहे. आयोजनात पुढाकार घेणाऱ्या विशाखा रुपल एक उत्तम सुत्रसंचालनकार आहेत हे समोर आले. अंबिका टाकळकर या `ऑटीस्टिक` मुलांसाठी शाळा चालवतात हे फेसबुकरून आधी कळले होते पण त्या स्वतः या व्याधीने ग्रस्त मुलाच्या आई आहेत आणि अत्यंत धीराने सावरत आता त्या अशा इतर विशेष मुलांसाठी काम करतात हे पाहून मनाला खूप वेगळे समाधान वाटले आणि वेदनाही झाल्या...!

विप्रो मध्ये काम करणारे कवितांमध्ये उत्तम रुची असलेले जयंत जोशी, दूरदर्शन साठी काम करत असताना अभिनयातसुद्धा रस असणारे, काही चित्रपटांमधून भूमिका केलेले अनिल परब, प्रकाशनाच्या व्यवसायात असणारे, दिव्य मराठी मध्ये वात्रटिका लिहिणारे विलास फुटाणे, व्यवसायाने मूल्यांकनकार आणि छंदाने हस्ताक्षर तज्ज्ञ असलेले आल्हाद देशपांडे, आर के कॉन्स्ट्रो मध्ये व्यवस्थापन सांभाळणारे सुजित गायकवाड, जिद्दीने स्वतःला घडविणारे इंजिनिअर अनिल ठोंबरे, शून्यातून विराट व्याप निर्माण करणारे सुशीलदत्त शिंदे, गायक आणि संगीत क्षेत्रात उत्तम ओळख असलेले अरविंद पिंगळे, मुळचे औरंगाबादचे पण सध्या जळगावमध्ये राहणारे जितेंद्र आणि मुग्धा दाशरथी, प्रा. पद्मा सवाई, शिक्षण क्षेत्रात कार्यरत वैशाली सुतवणे, आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. अंजली दीक्षित, बीडहून आलेले विद्यार्थी ओंकार आणि विकास देशमुख... प्रत्येक जण तेथे उत्स्फुर्तपणे पोहचला होता. शेवटी प्राचार्य रा. रं. बोराडे सुद्धा आले... हा एक उत्तम स्नेहमेळा जमला होता...

प्रत्येकाने करून दिलेला स्वतः परिचय हा या एकत्रीकरणाचा खूप वेगळा पैलू होता. केवळ नाव आणि व्यवसाय एवढीच माहिती न देता स्वतःचा परिवार, काम, व्यवसाय आणि इतरही माहितीमुळे सर्वांना एकमेकांना समजून घेणे खूप सोपे गेले... सर्व जण खूप कमी वेळात परस्परांच्या खूप जवळ आले... इतके की हे सर्व जण केवळ २ तास आधी परस्परांना ओळखतही नव्हते असे सांगितले असते तर कुणाला खरे वाटले नसते... बालपणीच्या निरागस मैत्रीची एक झलक मला इथे पहावयास मिळाली !
एकेकाळी अमरप्रीत हॉटेलात `बेल बॉय` असणारे सुशीलदत्त शिंदे यांनी आज मुंबईमध्ये `पेस्ट कंट्रोल` च्या व्यवसायात घेतलेली मोठी झेप मला त्यांच्या जिद्दी स्वभावाची जाणीव करून देणारी ठरली. अगदी हसत खेळत या तरुण व्यक्तीने उभे केलेले मोठे काम मला खूप आवडले. विदर्भातून औरंगाबादेत येऊन मालमत्ता मूल्यांकनात आपले नाव कमावणारे आणि हस्ताक्षर तज्ज्ञ म्हणून सुद्धा वेगळी ओळख निर्माण करणारे आल्हाद देशपांडे यांची ओळख मला आवडली. विलास फुटाणे यांचा माझा परिचय आधी पासून होता. पण त्यांनी अनिल ठोंबरे यांच्यासोबत सुरु केलेला ज्योतिषविद्येचा विषय माझ्यासाठी नवा होता. शिवाय ठोंबरे यांनी ज्या जिद्दीने स्वतःला घडविले ते ही मला खूप प्रेरक वाटले. अंबिका टाकळकर यांच्या विशेष शाळेला मी लवकरच भेट देणार आहे. हे काम खूप अवघड असते, हे मी स्वतः अनेक ठिकाणी पाहिलेले आहे. मला त्या कामाचा आदर आहे. डॉ. अंजली दीक्षित यांचा आवडीचा विषय वैद्यकीय क्षेत्रापेक्षा कलेचा आहे, हे ही वेगळे वाटले! प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी राहून काही वेगळे करण्याचा प्रयत्न करीत होता. मला प्रत्येकाचा परिचय करून देण्याचा मोह होतो आहे पण तो आवरता घ्यावा लागेल... पण तिथे आलेला प्रत्येक जण काही वेगळीच `चीज` होता...

या निमित्ताने फेसबुकवरील संवादाची पुढची पायरी गाठली गेली, हे मला महत्वाचे वाटते. नव्या तंत्रज्ञानाने जग आणि माणसे जवळ येत आहेत... त्यातून काही सकारात्मक घडावे याची ही प्रसादचिन्हे दिसतात. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी थोडा लवकर तेथून निघालो होतो. या ग्रुपचे नाव `हसत खेळत` असे ठेवल्याचे मला नंतर कळले. आता या १५ जणांचे संपर्क क्रमांक परस्परांजवळ आले आहेत. पुढे सुद्धा हे सर्व जण एकत्र येतील... आणखी काही जण यात सहभागी होतील... जे माध्यम काही अपवादात्मक प्रकारामुळे काहीसे बदनाम झाले होते, त्याच्याच आधाराने काही नवे, सकारात्मक, उत्पादक घडते आहे, याचे मला समाधान आहे. ही संकल्पना जन्मास घालणाऱ्या आणि प्रत्यक्षात उतरविणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.

Tuesday, June 26, 2012

सेंद्रीय शेतीचा आणखी एक पुरावा...

सेंद्रीय शेतीचे हे आणखी एक उदाहरण...
अभिनेता अमीर खान यांच्या ‘सत्यमेव जयते’च्या 24 जून 2012 च्या भागात सेंद्रीय शेतीविषयी प्रभावी जनजागृती करण्यात आली. हा खरोखरच अतिशय जिव्हाळ्याचा विषय. यावर ठिकठिकाणी उत्तम प्रयोग सुरू आहेत. दुर्दैवाने या प्रयोगांना अद्यापही राजमान्यता मिळत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचेही त्याकडे दुर्लक्ष होते.
माझ्या ‘आयकॉन्स’ सिरीजमध्ये अशी माणसे शोधण्याचा माझा प्रयत्न आहे. 11 मार्च  2012 रोजी प्रकाशित झालेल्या ‘नांदेड आयकॉन्स’मध्ये सेंद्रीय शेतीचे प्रचारक दिलीपराव देशमुख बारडकर यांच्या प्रयोगांचा वेध मी घेतला. हा लेख आपणा सर्वांसाठी...
-----------------------------------

रासायनिक खतांचे दुष्परिणाम त्यांनी स्वतः भोगले आहेत. त्यांच्या पायांवर आलेली सूज इतकी जास्त असायची की अनेकजण तो हत्तीरोग तर नाही ना, याची खातरजमा करण्यास सांगायचे. आयुष्यातील एका वळणावर ते सेंद्रीय शेतीच्या संपर्कात आले आणि त्यापासून मिळणारे लाभ पाहून त्यांनी स्वतःला या शेतीच्या प्रसारासाठी वाहून घेण्याचे ठरविले. सध्या पुण्यात वास्तव्यास असलेल्या दिलीप देशमुख बारडकर यांची ही कहाणी...
-----------------------------------
नांदेडच्या कोंडेराव देशमुख यांच्या मुलाला - दिलीप देशमुख यांना शेतीची आणि त्या संबंधीच्या संशोधनांची भारी आवड. याच आवडीतून एम.एस्सी. ऍग्रीकल्चर झाल्यानंतर ते एका कीडनाशक कंपनीत संशोधक म्हणून रुजू झाले. ‘फील्ड रिसर्च’ हा त्यांच्या संशोधनाचा भाग होता. 1971 ते 1980 अशी साधारण 10 वर्षे त्यांनी कीडनाशक कंपनीत काम केले. या संशोधनकार्यात ते सहा राज्यांत विविध ठिकाणी कार्यरत होते. प्रत्यक्ष शेतीत कीडनाशकांची फवारणी करणे आणि त्यावर आधारित थेट संशोधन हे त्यांच्या नोकरीचे स्वरुप होते. पण 1980च्या दरम्यान या रसायनांचे दुष्परिणाम त्यांना जाणवू लागले. विशेषतः पायांवर येत असलेल्या सूजेमुळे त्यांना काम करणेही अशक्य झाले. अखेर त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते 1980च्या सुमारास आपल्या गावी बारड येथे परतले. त्यानंतर 1998 पर्यंत त्यांनी रासायनिक खते वापरूनच शेती केली पण 1998 मध्ये झालेल्या एका प्रात्यक्षिकाने त्यांच्यात परिवर्तन घडून आले आणि तेव्हापासून आजतागायत ते सेंद्रीय शेतीचे कट्टर पुरस्करर्ते, प्रचारक आणि मार्गदर्शक बनले आहेत. कसे घडले हे परिवर्तन? योग्य वेळी डोळे उघडले की चांगला मार्ग दिसतो, याचेच हे प्रत्यंतर.


कोंडेराव देशमुख हे बारडचे प्रतिथयश शेतकरी. मोठी शेतजमीन. शेती बाळगून असतानाच ते वकिलीचा व्यवसायही करीत. या व्यवसायातही त्यांनी चांगली प्रतिष्ठा मिळविली होती. त्यांच्या पत्नी - सुशीलाबाई देशमुख समाजकार्य करीत. त्या काळात त्यांना अहिल्याबाई होळकर पुरस्काराने राज्य सरकारने सन्मानित केले होते. अशा कुटुंबात दिलीप देशमुख यांचा जन्म 16 डिसेंबर 1949 रोजी झाला. वडिलांची वकिली आणि घरची संपन्न शेती या पार्श्वभूमीवर संपन्न परिस्थितीत त्यांचे शिक्षण झाले. शेती बारडला असली तरी या कुटुंबाचे वास्तव्य नांदेडमध्येच असे. नांदेडच्या पीपल्स हायस्कूलमधून 1965 मध्ये ‘मॅट्रिक’ झाल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी शेतकी शिक्षणाचीच दिशा निवडली आणि 1969 मध्ये परभणीच्या कृषि विद्यापीठातून त्यांनी बी.एस्सी. ऍग्रिकल्चरची पदवी मिळविली. त्यानंतर नागपूरच्या कृषि महाविद्यालयातून कीटकशास्त्रात त्यांनी एम.एस्सी.ची पदवी प्राप्त केली आणि 1971 मध्ये ते ‘सिबा’ या बहुराष्ट्रीय कंपनीत संशोधक म्हणून रुजू झाले.

इथे त्यांच्या घरातील माहितीही जाणून घेणे उद्बोेधक ठरेल! त्यांच्या घरात चार मुले आणि एक मुलगी. या चारपैकी एका मुलाने डॉक्टर व्हावे, एकाने इंजिनइर व्हावे, एकाने शेती पाहावी आणि एकाने नोकरी करावी अशी त्यांच्या वडिलांची तीव्र इच्छा. ही इच्छा त्यांनी मुलांवर लादली नाही पण त्या दृष्टीने त्यांना प्रवृत्त केले. त्यानुसार इतर भावांचे शिक्षण पार पडले आणि वडिलांच्या इच्छेनुसार आणि त्याच बरोबर स्वतःच्या कलानुसार दिलीपराव शेतीच्या क्षेत्रात उतरले. घरची भरपूर शेती. या शेतीतही आपल्या शिक्षणाचा उपयोग होईल असा त्यांचा होरा होता. या सार्‍या शिक्षणप्रवासात एक उल्लेखनीय बाब म्हणजे दिलीपरावांनी कधीही ट्यूशन लावली नाही. शाळा-कॉलेजातील शिक्षण आणि स्वतःहून घरी केलेला अभ्यास यांच्याच बळावर ते चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होत गेले. एम.एस्सी. सुद्धा त्यांनी ‘डिस्टिंक्शन’मध्ये पूर्ण केले.

कृषी क्षेत्रातील संशोधनाच्या आवडीतून दिलीपरावांनी ‘सिबा’ जॉईन केली. चांगला पैसा देणार्‍या सेल्स किंवा मार्केटिंगपेक्षाही बुद्धीचा कस लागणार्‍या ‘रिसर्च’चे क्षेत्र निवडण्यामागे त्यांचा हेतू शेतीच्या क्षेत्रात भरीव कार्य करण्याचाच होता. ही कंपनी विविध प्रकारची कीडनाशके, रोगनाशके आणि तणनाशके बनवीत असे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गोवा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू आदी राज्यांतून ते या कंपनीसीठी फिल्ड रिसर्च करीत असत. या सर्व ठिकाणी 1971 पासून पुढे दहा वर्षांत त्यांनी काम केले. भाजीपाला, चहा, कॉफी यासह सर्व प्रकारच्या पिकांवरील रासायनिक प्रयोग ते करीत. या प्रयोगांचे काही दुष्परिणाम त्यांच्या शरीरावर झाले. दुष्परिणाम कसले? ते तर ‘स्लो पॉयझनिंग’ होते. त्यांच्या पायांवर सूज येत असे. पाय इतके सुजत की अनेक जण चक्क हत्तीरोगाची तपासणी करण्याचा सल्ला देत. याचा त्रास 1980 मध्ये खूपच वाढला. काही प्रमाणात किडनीवरही दुष्परिणाम जाणवू लागले. मग मात्र त्यांनी थांबायचे ठरविले. नोकरी सोडली आणि ते नांदेडला परतले. विचारपूर्वक पुढील दिशा ठरवीत त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला आणि अल्पावधीतच ते पत्नी विजया देशमुख यांच्यासह सहकुटुंब बारडमध्ये येऊन दाखल झाले. तेथील निसर्गसंपन्न वातावरणात आपल्यावरील रासायनिक दुष्परिणाम नक्कीच कमी होतील, याबद्दल त्यांना विश्वास वाटत होता. नांदेडचे डॉ. व्ही. एस. कुलकर्णी यांनी त्यांना नॅचरोपथीची ट्रीटमेंट सुरू केली. आवडीचेच क्षेत्र असल्याने दिलीपराव शेतात चांगलेच रमले. शेतीत त्यांनी अनेक प्रयोग केले. आधुनिक शेतीच्या स्वरुपात हे प्रयोग होते. इथेही ते रासायनिक कीडनाशकेच वापरत. पण या वेळी ते स्वतः दूर राहून मजुरांकडून ही कामे करून घेत. याच काळात त्यांनी डेअरी सुरू केली. दररोज 100 लिटरपर्यंत दुधाचे उत्पादन त्यांनी सुरू केले. तुती पालनाचा व्यवसाय सुरू केला. दूध काढण्याचे जिल्ह्यातील पहिले स्वयंचलित मशीन त्यांच्या डेअरीत सर्वप्रथम सुरू झाले. शेतीत ठिबक सिंचन, तुषार सिंचनाची यशस्वी अंमलबजावणीही त्यांनी केली. हा क्रम 1980 ते 1998 या दरम्यान सुरू होता.  याच काळात 1997 मध्ये एक वेगळा विषय त्यांच्यासमोर आला. हा विषय सेंद्रीय शेतीचा होता. नागपूरचे ऍड. मनोहर परचुरे यांच्या संपर्कातून सेंद्रीय शेतीचा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचला आणि 1998 मध्ये नांदेडला कृषि विज्ञान मंडळाची स्थापनाही झाली. दिलीपराव या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बनले. ऍड. परचुरे यांचा संपर्क या काळात वाढला होता. 1998 मध्ये मुंबईत ‘ऍग्रो ऍडव्हान्टेज’ हे प्रदर्शन भरणार होते. या प्रदर्शनाला जाण्याचे दिलीपरावांनी निश्चित केले होते. पण ऍड. परचुरे यांनी त्यांना त्या ऐवजी विदर्भात सहकुटुंब येऊन सेंद्रीय शेतीची प्रात्यक्षिके पाहण्याचा आग्रह केला. तो मानून दिलीपरावांसह 8 ते 10 जणांनी आपल्या कुटुंबासह 10 दिवसांची विदर्भ सहल आयोजित केली. यवतमाळ, वर्धा, अकोला, नागपूर या परिसरातील अनेक शेतांना त्यांनी भेटी दिल्या आणि तेथील सेंद्रीय शेतीच्या प्रयोगांनी ते प्रभावित झाले. त्या आधी ते स्वतः सेंद्रीय शेतीकडे फारसे आस्थेने पाहत नसत. औषध न फवारता शेती होऊच शकत नाही, यावर त्यांचा ठाम विश्र्वास होता. ते स्वतः कृषि क्षेत्रातील उच्चशिक्षित होते आणि एका बहुराष्ट्रीय कंपनीत कामाचा अनुभव त्यांच्या गाठीला होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी करून घेतलेला हा समज तसा योग्यच होता! पण विदर्भातील ही प्रात्यक्षिके त्यांनी पाहिली आणि त्यांचा दृष्टीकोन बदलू लागला.

सेंद्रीय शेतीत कार्यरत असलेल्या पुणे येथील विक्रम बोके, पी. बी. शितोळे, परचुरे आदींशी 1999 मध्ये त्यांचा संपर्क आला. तेव्हापासून दिलीपरावांच्या सेंद्रीय शेतीतील प्रयोग आणि प्रसाराला वेग आला. याच काळात त्यांच्या कृषि विज्ञान मंडळाला राज्यस्तरीय सेंद्रीय मेळाव्यात पुरस्कारही प्रदान करण्यात आला. 2000 पासून त्यांनी ‘महाराष्ट्र ऑरगॅॅनिक फार्मिंग फेडरेशन’च्या (मॉफ) उपाध्यक्षपदाची जबाबदारीही स्वीकारली. 2005 पासून ते बारडहून पुण्यात दाखल झाले आणि ‘मॉफ’च्या मुख्यालयातून त्यांनी कामकाजाला प्रारंभ केला. त्यांच्या येण्याने ‘मॉफ’च्या परिवारात एका चांगल्या माणसाची भर पडली.

शेतीतील आवड आणि अनुभव असणारी व्यक्ती ‘मॉफ’च्या सेंद्रीय शेतीसाठी आग्रही असणार्‍या परिवारात आली हे या चळवळीच्या दृष्टीने खूप महत्वाचे होते. एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करताना झालेल्या रासायनिक कीडनाशकांच्या दुष्परिणामांचा अनुभव त्यांनी स्वतः घेतलेला होता. या पार्श्वभूमीवर सेंद्रीय शेतीतील प्रयोगांचे फायदे त्यांना अधिक लवकर लक्षात आले आणि रासायनिक शेतीमध्ये काम केलेल्या माणसाने सेंद्रीय शेतीची भलावण करण्यामुळे शेतकर्‍यांना तो मुद्दा अधिक प्रभावीपणे पटणे सोपे झाले. मात्र, शेतकर्‍यांना या गोष्टी तत्वतः समजावून सांगणे सोपे असले तरी व्यवहारातील जोड देणे अतिशय आवश्यक होते. दिलीपराव म्हणतात, लोक सेंद्रीय शेती करण्यासाठी तयार होतात पण पहिल्याच वर्षी त्यांचे उत्पन्न घटते. मग ते पर्याय शोधू लागतात आणि त्यातून जमिनीचा अधिकच र्‍हास होऊ लागतो. यासाठी ते आता काही विशिष्ट पद्धती विकसीत करीत आहेत. रासायनिक खते पूर्णतः बंद करायची हे त्यांचे पहिले तत्व आहे. अगदी प्रारंभी गांडुळ खत टाकायचे आणि नंतर दुर्लक्ष करायचे हे हे उपयोगाचे नाही, हे त्यांच्या लक्षात आले. पिकांच्या वाढीच्या काळातही त्यांना ‘ऑरगॅनिक इनपुट्‌स’ देणे आवश्यक ठरते. पेरणीतील अंतर, पिकांची जात, पेरणी पूर्व पश्चिम की दक्षिणोत्तर, आंतरपिके कोणती घेतली जातात, घेतली जातात की नाही हे प्रत्येक मुद्दे या दृष्टीने महत्वाचे ठरतात, असे ते सांगतात.

सेंद्रीय शेती ‘मोनोक्रॉपिंग’ म्हणजे एका वेळी एकच पिक घेणे मान्य करीत नाही. उदाहरणार्थ सोयाबीन काढायचे तर त्यात मूग, मका, चवळी ही पिके घेतलीच पाहिजेत. यामुळे जमिनीचा कस टिकतो आणि जमीन सशक्त होते. हिरवळीची खते हा आणखी एक प्रकार ते सांगतात. 60 टक्के द्विदल बी, 30 टक्के एकदल बी आणि 10 टक्के तेलबिया एकत्र करून दर एकरी 20 किलो बियाण्यांचा पेरा करायचा आणि साधारण 40 दिवसांत वाढलेली पिके कापून जमिनीत अंथरायची आणि सुकू द्यायची, या मुळे जमीन सशक्त होते. यानंतर नियमीत पेरणीसाठी जमीन कसण्यास सुरवात करायची. अशा प्रकारे मॉन्सुनच्या आधी किमान 40 दिवस पूर्वतयारी केल्यास पिके चांगली येतात, असा अनुभव ते सांगतात. शेती मूलद्रव्यांची नसून जिवाणूंची असते हे सर्वांनी लक्षात घ्यावे, असे ते आवर्जुन सांगतात. जमिनीत जिवाणू वाढले तरच पिकांची वाढ चांगली होते कारण पिकांना हवी असलेली जीवनसत्वे जिवाणूच पुरवीत असतात असे सांगताना ते ‘थइरी ऑफ ट्रान्सम्युटेशन’चा आधार घेतात. 1888 मध्ये बॅरन हॅरझेले या शास्त्रज्ञाने मांडलेला हा सिद्धांत अनेक कृषि विद्यापीठांच्या कुलगुरुंनाही माहिती नाही, असे सांगताना ते म्हणतात, ‘या थइरीनुसार जमिनीत सर्व प्रकारचे जिवाणू असतात. पिकांनुसार ते आपोआपच कमी अधिक होत असतात. पिके आपल्याला पोषक जिवाणूंना स्वतःहून बळ देतात आणि ते जिवाणू पिकांना घातक असलेल्या जिवाणूंचा आपोआपच नायनाट करतात. यातून निसर्गाचा समतोल राखत पिकांना आवश्यक ती जीवनसत्वे मिळतात. जे कमी आहे ते आपोआप तयार होते, नको आहे ते आपोआप कमी होते’. हवेत, झाडांवर, जमिनींत उपयुक्त आणि उपद्रवी असे दोन्ही प्रकारचे किडे - जिवाणू असतात. रासायनिक फवारणीने सरसकट सर्वच जिवाणूंचा नाश होतो आणि पिके निःसत्व बनतात. त्यामुळे आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली जाईपर्यंत पिकांवरील किडींकडे दुर्लक्ष करणेच योग्य असते, असे ते आवर्जुन सांगतात.

मिजोराम, कर्नाटक, केरळ, बिहार आदी राज्यांत रासायनिक शेती - जेनेटिकली मॉडिफाईड बियाणे यांवर अनेक प्रतिबंध आणण्यात आले आहेत, मात्र महाराष्ट्रासारख्या प्रगत म्हणवल्या जाणार्‍या राज्यात राज्यकर्त्यांनी बड्या कंपन्यांच्या दबावाखाली झुकून या कडे दुर्लक्ष केले आहे, अशी खंतही ते व्यक्त करतात. राज्याने सेंद्रीय शेतीविषयक धोरण ठरविले पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे. स्वतःच्या कारकीर्दीची सुरवात रासायनिक कीडनाशकांपासून झालेले दिलीपराव आता संपूर्णतः सेंद्रीय शेतीचे पुरस्कर्ते झाले आहेत. हे परिवर्तन घडवून आणताना न्याय्य हक्कांसाठी न्यायालयीन लढा देण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. 1997 मध्ये इंडोजर्मन कंपनीकडून त्यांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी टरबुजाचे बियाणे खरेदी केले होते. आपापल्या शेतीत पेरलेले हे बियाणे उगवलेच नव्हते. या कंपनीवर कारवाई करण्यासाठी त्यांना तेव्हापासून लढा उभारला होता. या लढ्याला शासनाने अजिबात पाठबळ दिले नाही. या कंपनीचे मुख्यालय बंगलोर येथे आहे. दिलीपरावांनी आपल्या सहकारी शेतकर्‍यांसह या कंपनीला पुण्याच्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात खेचले. मंचाने प्रत्येकी एकरी 40 हजाराची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. त्या विरुद्ध त्या कंपनीने मुंबईत राज्य ग्राहक तक्रार निवारण मंचात दाद मागितली. तेथेही शेतकर्‍यांची बाजू खरी ठरली आणि आता सन 2011 मध्ये त्या न्यायालयाने शेतकर्‍यांच्या बाजूने निकाल दिला आहे. या निकालानुसार या सर्वांना प्रत्येकी सरासरी 3 ते 4 लाख रुपये आणि त्यावरील 18 टक्क्यांप्रमाणे व्याज मिळणार आहे. त्यांच्यातील संघर्षशील वृत्तीचाच हा पुरावा!

सेंद्रीय शेतीबरोबरच शेतकर्‍यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत ते आग्रही आहेत. सेंद्रीय शेतीचा अवलंब करणार्‍या शेतकर्‍यांना पहिल्याच वर्षीपासून आधीच्या वर्षाइतके उत्पन्न सुरू झाले पाहिजे आणि नंतर ते हळूहळू वाढत गेले पाहिजे या साठी ते प्रयत्नशील आहेत. शेतकर्‍यांनी आपला शेतीमाल प्रक्रिया केल्याशिवाय विकू नये आणि त्यातही दलालांना फाटा देऊन थेट ग्राहकांपर्यंत शेतीमाल कसा पोहोचवता येईल, या साठी त्यांनी आपल्या संस्थेच्या वतीने प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी ठिकठिकाणी कंपनी कायद्यानुसार शेतकर्‍यांच्या संस्था उभारल्या जात आहेत. याचे एक उत्तम उदाहरण वाशीम येथे उभे आहे. तेथील शेतकर्‍यांनी एकत्र येऊन उभारलेल्या संस्थेमुळे शेतकर्‍यांचा मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहेत. ‘मॉफ’तर्फे ते शेतकर्‍यांसाठी 3 दिवसांचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करतात. शेती आणि शेतकर्‍यांच्या संपन्नतेसाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.

शेतीबरोबरच वैयक्तिक पातळीवरही दिलीपराव नवमतवादी आहेत. त्यांच्या पत्नी विजया यांचीही त्यांना साथ आहे. याच दृष्टीतून त्यांनी 1976 मध्ये एकाच मुलीच्या जन्मानंतर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करवून घेतली. मुलगा -मुलगी असा भेद मानत नसतानाच फक्त एकाच मुलीवर थांबण्याचा 1976 च्या काळात त्यांनी घेतलेला हा निर्णय खरोखरच क्रांतीकारी होता. या क्रांतीमध्ये त्यांच्या पत्नीचीही त्यांना साथ मिळाली. ही साथ एवढ्यापुरतीच मर्यादित नव्हती. विजयाताईंनी सेंद्रीय शेतीतही लक्ष घातले आहे. त्यांच्या माहेरीही चांगली शेती होती. त्यामुळे त्या ही शेतीच्या वातावरणात रमल्या. बारडच्या शेतीतील प्रयोगात त्यांचे लक्ष असे. सेंद्रीय शेतीतही त्यांनी लक्ष घातले आणि आता तर त्या सेंद्रीय शेतीची प्रशिक्षण शिबिरे घेतात! आपले शेतीतील अनुभव आणि घेतलेले प्रशिक्षण यांच्या बळावर त्या सेंद्रीय शेतीच्या ‘प्रचारक’ बनल्या आहेत. शेतकर्‍यांच्या हितासाठी त्यांनी आता हा ‘सपत्निक वसा’ घेतलेला आहे. त्यांनी ‘समृद्धीसाठी सेंद्रीय शेती’ हे पुस्तक लिहिले असून त्यांचे दुसरे पुस्तक ‘ऑरगॅनिक फार्मिंग सिस्टिम्स फॉर सस्टेनेबल ऍग्रीकल्चर’ लवकरच प्रकाशित होत आहे. केवळ ‘थइरी’ऐवजी ‘प्रॅक्टिकल’वर भर देण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे सेंद्रीय शेतीची ही विचारधारा झपाट्याने सर्वत्र विस्तारते आहे.
ंं
दिलीप देशमुख बारडकर
उपाध्यक्ष ‘मॉफ’, 1038/11, बालाजी निवास, फ्लॅट क्र. 5, कॉसमॉस बँक लेन,
दीप बंगला चौक, मॉडेल कॉलनी, पुणे - 16