`दैनिक लोकमत` च्या `हेलो औरंगाबाद` मध्ये दर शुक्रवारी प्रकाशित होत असलेल्या 'संस्कृती, साहित्य वगैरे' या स्तंभात 5-8-2011 रोजी प्रकाशित झालेला हा लेख.
...................................................................................
...................................................................................
मागील काही वर्षे, दर फेब्रुवारीमध्ये औरंगाबादेत 'पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव' साजरा होत असे. यावर्षी हा महोत्सव होऊ शकला नाही. आजवर आयोजित केलेल्या महोत्सवातील कार्यक्रम संगीत रसिकांसाठी नि:शुल्क होते. या महोत्सवात राष्ट्रीय पातळीवरील कलावंतांनी आपली सेवा रुजू केली होती. एका विख्यात कलावंताच्या नावावर होत असलेल्या या महोत्सवाचा अकालीच अपमृत्यू झाला. अशाच प्रकारचे काही वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम औरंगाबादेत झाले. ते तोट्यात गेले.
अभिषेकी महोत्सव करणारे सचिन नेवपूरकर आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम आयोजिणारे विश्वनाथ दाशरथे यांच्याशी परवा गप्पा झाल्या आणि तेव्हा साहजिकच हा विषय निघाला. संपूर्णत: शास्त्रीय संगीताला वाहिलेला अभिषेकी महोत्सव रसिकांसाठी नि:शुल्क ठेवायचा, याबद्दल नेवपूरकर आग्रही होते. त्याला दोन कारणे होती. त्यातील पहिले कारण म्हणजे तिकीट काढून शास्त्रीय संगीत ऐकायला येणारे रसिक औरंगाबादेत किती? आणि दुसरे म्हणजे, चांगल्या कलाकारांची कला येथील सामान्य रसिकांनाही मनसोक्तपणे कोणताही आर्थिक बोजा न बाळगता आस्वादता यावी. यामुळे आर्थिक उत्पन्नाचा एक मार्ग बंद होतो आणि येणार्या कलाकारांचे किमान मानधन तरी देणे आवश्यकच असते. अशा 'नॉन कर्मशियल' महोत्सवात येताना हे मान्यवर कलावंत नक्कीच आपले मानधन कमी करतात. त्यातही एक कलावंत स्वत: पुढाकार घेऊन असे आयोजन करीत असेल, तर बिदागीची रक्कम खूप कमी होते. असे असूनही उरलेला खर्चही यावर्षी उभा राहू शकला नाही आणि रसिकही या महोत्सवाच्या आठवणीने व्याकूळ झाले आहेत, असे आयोजकांना दिसले नाही. मग हे आयोजन करायचे तरी कशासाठी? यातून आणखी एका सांस्कृतिक चळवळीचा अपमृत्यू झाला. दाशरथे यांनी अभिनव कार्यक्रम आयोजले, उत्तम तयारी झाली; पण प्रायोजकत्व मिळाले नाही आणि तिकिटे काढून कार्यक्रमांचा आनंद घेतला पाहिजे, असा येथील रसिकांचा स्वभाव नाही. अशा गोष्टींचा आर्थिक फटका बसला. परिणामी उसनवारी करून खर्च भागवावे लागले, असेच थोड्याफार फरकाने अनुभव शहरातील अनेक आयोजकांना आले आहेत. (यात अस्मादिकांचाही अनुभव अत्यंत दारुण आहे!)
सांस्कृतिक संपन्नतेच्या बाबतीत औरंगाबाद 'दारिद्रय़रेषेच्या खाली' आहे. प्रगतीचा अर्थ फक्त आर्थिक आणि भौतिक प्रगतीपुरताच घेतला गेल्यामुळे या शहराची सांस्कृतिक जडणघडणच झाली नाही. मोठे उद्योग - मोठय़ा उलाढालींच्या दृष्टीने हालचाली होत असताना सांस्कृतिक संपन्नतेसाठी कोणीच आग्रही पुढाकार घेतला नाही, ही वस्तुस्थिती आहे. संगीताच्या विविध शाखांची, विद्यालयांची स्थापना म्हणजे सांस्कृतिक जडणघडण नव्हे. कलांचा आविष्कार आणि त्याला समाजाची मिळणारी दाद, हा समन्वय जेथे होतो तेथे सांस्कृतिक जडणघडणीला प्रारंभ होतो. हा समसमा संयोगाचा भाग आहे. कलाकारांची उत्कटता आणि रसिकांची तल्लीनता या संयोगातून अशा सांस्कृतिक चळवळी फुलत असतात. याचा पूर्णत: अभाव या शहरात जाणवतो. एखादी सांस्कृतिक चळवळ उभी राहते आणि काही वर्षांतच ती मरण पावते. विशेष म्हणजे, त्यांची कुणालाच खंत वाटत नाही.
हे असे का व्हावे? कलेला प्रोत्साहन देण्यासाठी सामान्य रसिक पुढे का येत नसावा? शंभर - दोनशे रुपये खर्च करून तिकीट काढण्याऐवजी 'फुकट पासेस' मागण्यात आणि असे पासेस न मिळाल्यास कार्यक्रमांनाच न जाण्यात अनेकांना कोणते समाधान मिळते? सिनेमे पाहण्यात, हॉटेलिंग करण्यात शेकडो रुपये उडविणार्या सधन कुटुंबांना तिकिटाची ही रक्कम असह्य का व्हावी? की सांस्कृतिक भूक फुकटातच भागविली पाहिजे, अन्यथा ती भागणार नाही, असे काही धोरण आहे?
खरे तर शहराचा सांस्कृतिक चेहरा अशा प्रकारच्या आयोजनातूनच विकसित होत असतो. सध्या बंद पडलेला वेरूळ महोत्सवसुद्धा एकेकाळी फुकट्यांचा महोत्सव म्हणूनच ओळखला जायचा. शेवटच्या काही वर्षांत हे स्वरूप बरेचसे बदलण्यात आयोजकांना यश आले होते! काळ कोणताही असो, कलेला राजार्शयाचा आधार मिळाला, तरच ती वेगाने फोफावते. इथे या बाबतीतही उदासीनताच आहे. राजार्शय म्हणजे केवळ सरकारी आर्शय नाही. आर्थिकदृष्ट्या समृद्ध असलेले उद्योग, व्यक्ती यांच्या पुढाकारातून अशी आयोजने झाली तर सांस्कृतिक चेहरा विकसित होण्यास मदत होऊ शकते. ही मदत प्रायोजकत्वाच्या माध्यमातून होऊ शकते, तशीच थेट आर्थिक मदतीद्वारेही. शहरातील काही मोजके उद्योग- संस्था आणि व्यक्ती वगळले तर इतरांना याविषयाशी काहीच देणे-घेणे नाही. ही परिस्थिती खूपच गंभीर आहे.
असे उपक्रम म्हणजे फक्त कार्यक्रमच नव्हे. उपक्रमांबरोबरच नाट्य स्पर्धा, संगीत स्पर्धा, अभिनय स्पर्धा, अशा आयोजनांनी पुणे-मुंबई-नाशिक त्रिकोण सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न झाला. औरंगाबाद त्यादृष्टीने अत्यंत मागास आहे. हे मागासलेपण औरंगाबादने स्वत:हून ओढवून घेतलेले आहे.
click image to enlarge and read.