Monday, September 10, 2012

मोनेर मानुष : माणूस होण्याच्या प्रयत्नाची गाथा...


जनशक्ती वाचक चळवळीने प्रकाशित केलेली `मोनेर मानुष` ही कादंबरी नुकतीच वाचली. मला ती आवडली. त्याबद्दल थोडेसे...
-----------------------------------------

संवेदनांच्या पलिकडे जाणे म्हणजे संवेदनहीन होणे नव्हे. तीक्ष्ण कंगोरे बोथटले की चाकोरीचे व्रणही पुसट होत जातात. अशीच, हलकासा धक्का देणारी एक छोटीशी कादंबरी - ‘मोनेर मानुष’. बंगाली महाकादंबरी ‘प्रथम आरव’चे लेखक असलेल्या सुनील गंगोपाध्याय यांची ही लघुकादंबरी आशयविस्ताराच्या दृष्टीतून एखाद्या महाकादंबरीचा प्रत्यय देते. ही मूळ बंगाली कादंबरी. त्याचा हिंदी अनुवाद साहित्य अकादमीने प्रकाशित केला. अनंत उमरीकर यांनी तो मराठीत उतरविला. ‘जनशक्ती वाचक चळवळी’ने तो प्रकाशित केला आहे. 

ही जेमतेम 143 पानांची कादंबरी. कादंबरी असली तरी पूर्णतः काल्पनिक नाही. त्याला बंगाली परंपरेतील ‘बाऊल’ची पार्श्वभूमी आहे. ‘लालन फकीर’  किंवा ‘लालन संत’ अशा नावांनी ओळखल्या जाणार्‍या बंगाली संताच्या जीवनाच्या आणि तत्वज्ञानाच्या पार्श्वभूमीवर हे कथानक फुलते. यात हाताळलेला विषय रुढ अर्थाने संवेदनशील आहे. पण वर उल्लेख केल्याप्रमाणे या संवेदनांचे कंगोरे जाणीवपूर्वक घासून बोथट केल्याने त्यांचा काही वेगळाच परिणाम उमटतो. तशा अर्थाने लालन फकीर यांच्या साहित्याच्या किंवा जीवनाच्या तपशीलाचा कसल्याही प्रकारचा ठोस आधार नसताना गंगोपाध्याय यांनी ज्या पद्धतीने हे लेखन फुलविले त्याला तोड नाही. हेच त्यांचे बलस्थानही आहे.

समाजातील घट्ट विणीला सैलावणार्‍या व्यक्तींना त्या त्या काळात तीव्र विरोधांना सामोरे जावे लागले. लालन फकीर हे त्यातील एक. रुढ अर्थाने कनिष्ठ कुळात जन्मलेल्या ‘लालू’चा ‘लालन फकीर’ कसा होतो, याची ही कहाणी. हिंदू समाजात पूर्वापार चालत आलेल्या जातीप्रथांच्या बंधनांमुळे लालूसारखा एक विलक्षण तरुण दुर्लक्षित राहतो, गंगामाईच्या यात्रेत असतानाच देवीच्या रोगाने तो मेला असल्याचे समजून त्याचे प्रेत नदीत सोडून दिले जाते. पुढे एका वळणावर एक मुस्लिम स्त्री त्याला वाचविते. काही काळाने त्याच्या गावातील काही लोक त्याला नव्या ठिकाणी ओळखतात आणि आपल्या गावी परत नेतात. पण मुस्लिमाच्या हातचे अन्न खाल्ल्याने तो धर्मभ्रष्ट झाल्याचे सांगत त्याची आईही त्याला वाळीत टाकते. त्यानंतर तो घर सोडतो. जंगलात जातो. तेथेच वस्ती करतो. या वस्तीवर हळूहळू सर्वच धर्मातील समदुःखी येत जातात. स्वतःच्या अलौकीक गीतप्रतिभेतून रचना मांडताना ‘लालू’चा ‘लालन फकीर’ किंवा ‘लालन संत’ होतो. त्याला ‘लालनसाई’ म्हणूनही ओळखले जाऊ लागते...

हे कथानक साधारण सन 1780 ते 1880 या काळातले. ते फुलताना त्या काळातील अपरिहार्य संदर्भ समोर येत जातात. हिंदू समाजातील भ्रामक समजुती, मानवतेला काळिमा फासणार्‍या रुढी, मुस्लिम समाजातील कुप्रथा, भेदाभेद मानत नसले तरीही त्या समाजात असलेले जातीभेद... कारण ते सारे मूळचे हिंदूच. बाटून मुसलमान झाले तरी मूळ पीळ कसा जाणार? या पार्श्वभूमीवर लालनसाईंनी उभारलेली मिश्रवस्ती वेगळेच संदर्भ देऊन जाते. सर्व समाजातील पीडित, दुःखी स्त्री-पुरुष तेथे एकत्र येतात. तिथे जातीप्रथा नसते की धर्माची बंधने... कोणी कुणाचा ताबेदार नसतो की कोणी कोणाचा नोकर... ‘जमीन परमेश्र्वराची... त्याने दिलेल्या एका छोट्या तुकड्यावर आम्ही आमचे संसार उभारतो आहोत’ या भावनेने जगणारी ही सारी कुटुंबे अप्रत्यक्षपणे वेगळाच संदेश देतात. लौकीकअर्थाने अशिक्षित असलेले ‘लालनसाई’ सामान्य माणसापासून जमीनदारापर्यंत प्रत्येकालाच हवेहवेसे वाटतात, हे त्यांचे मोठेपण आणि त्यांचे विशुद्ध, तार्किक, व्यापक विचार हे त्या मागचे प्रमुख कारण. 

ऐतिहासिक लेखनात काही ठळक टप्पे हाती लागतात. त्यातील अदृष्य साखळ्या जोडण्याचे काम खूप महत्वाचे असते. लेखकाच्या कौशल्याचा, संवेदनशीलतेचा हा भाग असतो. गंगोपाध्याय यांच्यासारखा सिद्धहस्त लेखक ज्या पद्धतीने हे चित्रित करतो ते वाचताना डोळ्यासमोर ‘चित्रपट’च सरकत असतो. अनंत उमरीकर यांनी बंगाली पार्श्वभूमीचे हे लेखन हिंदीच्या मार्गाने मराठीत आणताना त्याचा आत्मा हरवू दिला नाही, हे पुनःपुन्हा जाणवते...

राम की रोहिम से कोन जॅन
क्षिती जॅल कि बायू हुताशॅन
शुधाईल तार ऍन्बेषॅन
मुर्खो देखे केड बॉले ना ।
(तो राम आहे की रहिम, तो माती-पाणी आहे की वायू-अग्नि, तो जो काय आहे त्याचा शोध घेण्याचा रस्ता तर कुणे दाखवावा; पण आम्हा मुर्खांना पाहून कुणीच मार्ग दाखवीत नाही...)

मनातला अंधःकार दूर करून सत्यप्रकाश शोधण्याच्या मार्गातील ‘लालनसाई’च्या जीवनकथेतून राम आणि रहिम यांच्या उत्तरप्रवाहातील आग्रही वैय्यर्थता अधोरेखित होत जाते. 
त्यांचा व्यापक विचार अल्पांशानेही पाझरला, तर अनेक प्रश्न मार्गी लागतील!

- दत्ता जोशी

मोनेर मानुष
मूळ बंगाली लेखक - सुनील गंगोपाध्याय
मराठी अनुवाद - अनंत उमरीकर
जनशक्ती वाचक चळवळ
पाने 144, मूल्य 100 रु.
संपर्क : जनशक्ती - 0240-2341004