Tuesday, June 6, 2017

रूप बदलवणारा ‘देवदूत’...’ - डॉ. नितीन ढेपे


जिद्दीला कोणतीही मर्यादा आडवी येत नसते! सातत्याने सर्वच बाजूंनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जात अणदूरसारख्या छोट्याशा गावातील एक मुलगा आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त त्वचारोगतज्ज्ञ होतो... आपल्या शिक्षकांच्या नैतिक धाकामुळे स्वतःला सातत्याने समाजाभिमुख ठेवतो आणि देशातील प्रगत त्वचारोग रुग्णालय उभारतो त्याच वेळी सिंगापूरच्या शासकीय ‘नॅशनल स्कीन सेंटर’च्या धर्तीवर पुण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे त्वचारोग केंद्र उभारण्याचे स्वप्न पाहतो... बुद्धिमत्ता आणि जिद्दीचा आविष्कार असलेल्या डॉ. नितीन ढेपे यांच्याबद्दल...

ही गोष्ट साधारण 2003 ची. सोलापुरात जेमतेम दोन वर्षे ‘त्वचारोग क्लिनिक’ची प्रॅक्टीस केलेल्या डॉ. नितीन ढेपे यांनी त्वचारोगावरील उपचारांसाठी असलेले लेझर उपकरण आणण्याचे ठरविले होते. हा खर्च साधारण 35 लाखांचा. तेव्हा त्यांचे बॅलेन्सशीटही केविलवाणेच होते. त्या आधारावर कोणतीही बँक फार तर 12-13 लाख रुपये कर्ज देऊ शकणार होती. ‘जवळच्या’ माणसांनी आधी मदतीची भरघोस आश्वासने दिली होती. वेळा आल्यावर मात्र त्या सर्वांनीच पाठ फिरविली. खूपच पिच्छा पुरविला, तेव्हा ‘त्या’ काही परिचितांनी, ‘सध्या माझ्याकडे नाहीत, माझ्या मित्राकडून उसने आणून देतो पण दोन टक्क्याने व्याज भरावे लागेल’ असे कबूल करून पैसे दिले. स्वतःची बाजारातील पत आणि मानवी स्वभाव या दोन्हींचे प्रत्यंतर त्यांना तेव्हा आले. त्यानंतर आजघडीला जेमतेम आठच वर्षांत परिस्थिती पूर्ण बदलली आहे. त्यांना हवे असलेले काही कोटींचे कर्ज बँका चढाओढीने ‘विनातारण’ मंजूर करू पाहतात. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये येऊन सर्व औपचारिकता पूर्ण करतात. डॉ. ढेपे ही सारी ‘गंमत’ शांतपणे न्याहाळत असतात. सुमारे दीड कोटींची वार्षिक उलाढाल असलेले सोलापुरातील ‘स्कीन सिटी’ हे रुग्णालय त्यांनी आता ‘जानकी ट्रस्ट’ला दान केले आहे. तेथे ते पुण्यातून दोन दिवस जाऊन विनामूल्य सेवा देतात. इतर काळ ते पुण्यातील साधू वासवानी चौकात असलेल्या ‘स्किन सिटी’त असतात. हॉस्पिटलबरोबरच त्वचारोग क्षेत्रातील पदव्यूत्तर शिक्षणाचे देशातील फक्त दोन खाजगी महाविद्यालयांपैकी एक महाविद्यालय ते चालवतात! त्यांच्या यशाची त्रिसुत्री आहे - ‘कठोर मेहनत, कठोर मेहनत आणि कठोर मेहनत.’
डॉ. नितीन ढेपे ‘शिक्षकांचे गाव’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या अणदूरचे. 25 फेब्रुवारी 1974 रोजी जन्मलेल्या नितीन यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण अणदुरात मराठी माध्यमातच झाले. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतून पूर्ण झाल्यानंतर जवाहर विद्यालयातून ते दहावी उत्तीर्ण झाले. 1989 मध्ये दहावीला ते राज्याच्या गुणवत्तायादीत 24 वे होते! पुढील शिक्षणासाठी त्यांनी लातूरच्या शाहू महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि 1991 मध्ये 12वीला 99 टक्के गुण मिळवीत ते राज्याच्या गुणवत्तायादीत सातवे आले! उत्तम गुणानुक्रमामुळे साहजिकच त्यांना पुण्याच्या ‘बी.जे. मेडिकल कॉलेज’ला ‘एमबीबीएस’साठी प्रवेश मिळाला. वयाच्या 17 व्या वर्षांपर्यंतचा हा प्रवास इथे आठ-दहा ओळींत मांडता आला, पण हा प्रवास त्यांच्यासाठी अतिशय खडतर होता. या सर्व काळात त्यांच्या लक्षात राहिल्या त्या दोनच गोष्टी. पहिली - घरचे कमालीचे दारिद्—य आणि दुसरी - वाचनाचे अफाट वेड. त्यांचे वडील विश्वनाथराव पेशाने शिक्षक. पगारावर कर्ज काढून शेती करण्याच्या हौसेपायी घर कर्जबाजारी झालेले. उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. पगाराला अनेक वाटा ! आर्थिक विपन्नावस्थेच्या झळा त्यांना बालपणापासूनच बसल्या. त्या झळा पुढे शिकत असतानाही कायम राहिल्या. दुसरी आठवण - ‘अवांतर वाचना’ची. अणदूरसारख्या ग्रामीण भागातही त्यांच्या शाळेतील ग्रंथालय मोठे समृद्ध होते आणि विशेष म्हणजे वाचू इच्छिणार्‍यांना तेथे मुक्त प्रवेश होता! वाचनवेड्या नितीन यांना जणू खजिनाच गवसला. त्यांच्या या वाचनवेडाला त्यांच्या ग्रंथपालांनीही प्रोत्साहन दिले. नितीन म्हणतात, ‘माझ्या वाचनाच्या वेडाच्या अनेक कथा तेथे प्रचलित आहेत. एकदा प्रवासात वाचतावाचता एकदा मी दोन गावे पुढे निघून गेलो. लक्षात आल्यानंतर परतीची बस पकडून अणदुरात आलो. शाळेच्या ग्रंथालयातील निम्म्याहून अधिक पुस्तके मी वाचून संपविली होती. मराठी साहित्यातील अनेक कसदार साहित्यिक मी त्या शालेय वयातच वाचले. या वाचनाचा माझ्यावर खूप खोलवर संस्कार झाला. खूप कमी वयात माझे विचार प्रगल्भ झाले.’
पुण्यात ‘बी.जे. मेडिकल कॉलेज’ला एमबीबीएसला प्रवेश मिळाला. गुण चांगले होते म्हणून होस्टेलही मिळाले आणि स्कॉलरशिपसुद्धा! यापैकी कोठेही पैसे भरावे लागणार असते, तर कदाचित ते पुढे शिकूही शकले नसते. घरच्या आर्थिक परिस्थितीच्या झळा इतक्या तीव्र होत्या. आर्थिक चटक्यांमुळे परिस्थितीचे भान खूप लवकर येते. तसे त्यांनाही आले. एम.बी.बी.एस. 1997 मध्ये पूर्ण झाले. त्यांना चांगले गुण मिळाले. आता त्या नंतरची वाटचाल बिकट होती. इथे स्कॉलरशिप मिळणार नव्हती. आर्थिक स्थिती तर खूपच वाईट. अशामध्ये एम.डी.साठीच्या प्रवेशाची लगबग सुरू झाली. गुणानुक्रमामुळे त्यांना ‘पेडियाट्रिक’ची शाखा मिळाली. ही शाखा वैद्यकीय क्षेत्रात चांगली मानली जाते. पण नितीन मोठ्या अडचणीत होते. शिक्षणाची इच्छा अपार... बुद्धिमत्ताही होतीच पण आर्थिक भार सोसणे अशक्य झाले आणि अतिशय खिन्न मनाने त्यांनी ती शाखा सोडली आणि तुलनेत कमी खर्चात शिक्षण पूर्ण करता येईल, अशी ‘डर्मिटॉलॉजी’ची शाखा नाईलाजाने निवडली. निर्णयाची ती रात्र वादळी होती. ते म्हणतात, ‘उच्चशिक्षणाची खूप चांगली संधी मी माझ्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मिळविली होती, पण आर्थिक स्थितीमुळे ती ती संधी स्विकारू शकत नव्हतो. मी नाकारलेली संधी माझ्यापेक्षा आठ-नऊ टक्के कमी असणार्‍या विद्यार्थ्याला मिळणार आणि मी मात्र त्या तुलनेत कमी महत्व असलेल्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार, हे सत्य पचवता येणे अशक्य होते. ती रात्र मी झोपू शकलो नाही. डोळ्यातून अश्रू वाहात होते. स्वतःचाच राग येत होता. पण सत्य स्वीकारावेच लागणार होते. मी ‘डर्मिटॉलॉजी’ला प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आणि त्याच वेळी आणखी एक निर्धार केला. या क्षेत्रात मी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करीन. आज ही शाखा दुर्लक्षित मानली जाते, त्या शाखेला महत्व येईल असे काम मी या क्षेत्रात करीन.’
याच दरम्यान, एम.बी.बी.एस.ची एन्टर्नशिप करतानाच त्यांनी आपल्या मामांच्या मुलीशीच विवाह केला होता. त्या वाणिज्य शाखेच्या पदवीधर. स्वतःसोबत पत्नीची जबाबदारी सांभाळतानाच त्यांना एम.डी. करायचे होते. एम.डी.चे शिक्षण घेतानाची आर्थिक स्थिती आणि त्या काळात त्यांना करावी लागलेली कसरत सामान्य कुवतीच्या मुलासाठी अशक्यप्राय वाटावी अशी होती. या शिक्षणासाठी त्यांनी आपल्या पत्नीचे दागिनेही मोडले! दैनंदिन महाविद्यालयीत अभ्यासक्रम पूर्ण करतानाच सायंकाळी ते क्लिनिक चालवायचे. रात्री आपल्या मित्रांचे विविध पेपर्स प्रतिपान 20 रुपये दराने टाईप करून द्यायचे. कमावलेला हा पैसाच ते शिक्षणावर खर्च करीत. जेव्हा इतर विद्यार्थ्यांकडे एखाद्या विषयाचे एकच पुस्तक असे, तेव्हा नितीन यांच्याकडे त्या विषयातील मान्यवर लेखकांची चार-पाच पुस्तके असत! याच काळात त्यांनी आणखी एक उपक्रम सुरू केला होता. तेव्हा मुंबईत नानावटी हॉस्पिटलमध्ये ‘स्कीन सर्जरी लेझर मशीन’ आलेले होते. या कामाचा अनुभव मिळविण्यासाठी ते सलग दोन महिने बिन-पगारी रजा घेऊन मुंबईत राहिले. त्यासाठी लागणारा पैसा त्यांनी त्यांची पत्नी योगिता यांचे दागिने गहाण ठेवून उभा केला. ससूनमध्ये उपलब्ध नसणारी उपकरणे त्यातून विकत घेऊन ती ससूनमधील रुग्णांवर प्रगत उपचारांसाठी वापरली! खरे तर हे प्रशिक्षण एम.डी. पूर्ण केल्यानंतरचे होते, पण एम.डी. पूर्ण केल्यानंतर तातडीने प्रॅक्टिस सुरू करून पैसे मिळविणे आणि घेतलेली कर्जे फेडणे नितीन यांच्यासाठी महत्वाचे होते. ते म्हणतात, ‘माझ्या या प्रयत्नांमुळे आणि घेतलेल्या अनुभवामुळे या दोन वर्षांत मी इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत पाच वर्षे पुढे गेलो.’ पण हे पुढे जाणे अडचणीचे ठरू शकले असते. बुद्धिवंतांना मदत करणारा एक वर्ग जसा अस्तित्वात असतो, तसाच त्यांच्या वाटचालीत अडथळे आणणारेही काही लोक असतात. एम.डी. करताना प्रॅक्टिस करणे, पुढचे प्रशिक्षण घेणे नियमाला धरून नसते. या मुद्द्यावरून तो विद्यार्थी निलंबित होऊ शकतो. काही जण आपली तक्रार विभागप्रुखांकडे करणार आहेत, हे समजताच ते स्वतःच ‘ससून’चे तत्कालीन स्कीन स्पेशालिस्ट व विभागप्रमुख डॉ. अशोक नाईक यांच्यासमोर उभे ठाकले. सारी परिस्थिती त्यांना समजावून सांगितली. ‘अशा प्रकारच्या तडजोडींवर आक्षेप घेणार असाल, तर मी वर्षभर बिनपगारी रजा घेऊन पैसे कमावेन आणि पुढील वर्षी येऊन एम.डी. पूर्ण करेन,’ असेही सांगून टाकले. त्यांच्या मेहनतीची जाणीव असलेले डॉ. नाईक यांनाही आपले तरुणपण आठवले. ते ही याच चक्रातून शिकत गेलेले होते! त्यांनी नितीन यांना हे सारे करण्याची परवानगीही दिली आणि काही अडचण आली तर मदत करण्याचे आश्वासनही! अखेर 2001 मध्ये डॉ. नितीन ढेपे पुण्याच्या ‘बी.जे. मेडिकल कॉलेज’मधून ‘एम.डी. डर्मिटॉलॉजी’ झाले.
पुण्यातून अभ्यासक्रम पूर्ण केला, मुंबईत प्रगत ज्ञानाचा अनुभव मिळविला पण प्रॅक्टिससाठी मात्र त्यांनी सोलापूर निवडले. 2001 च्या जानेवारी महिन्यात ते सोलापुरात दाखल झाले. ऑगस्टपर्यंत जागेचा शोध घेऊन ती जागा क्लिनिकसाठी तयार केली आणि माणिक चौक, नवी पेठ, सोलापूर या पत्त्यावर 350 चौरस फुटांच्या जागेत ‘स्किन सिटी’चा शुभारंभ झाला. ही शाखा त्या काळात खूपच अप्रचलित होती. विशेषत्वाने ‘पांढरे डाग’ हा सर्वसामान्यांच्या चिंतेचा विषय असे. त्यामुळे ‘त्वचेची व्याधी म्हणजे पांढरे डाग’ एवढाच विषय तेव्हा प्रचलित होता. प्रत्यक्षात हे क्षेत्र खूप मोठे आहे.
ही ‘प्रॅक्टीस’ करतानाच या क्षेत्रातील अद्ययावत उपचारप्रणाली आपल्याकडे असली पाहिजे, या हेतूने त्यांनी ‘लाईट शेअर लेसर डायोड’ हे उपकरण आपल्याकडे आणण्याचे ठरविले. हे उपकरण तेव्हा महाराष्ट्रात फक्त मुंबईत नानावटी हॉस्पिटलसह काही मोजक्याच ठिकाणी उपलब्ध होते. त्याच्या किमतीसह पूर्ण सेटअप सुमारे 35 लाखांपर्यंत जात होता! हा निर्णय फार मोठा आणि महत्वाचा होता. त्यांनी या 35 लाखांच्या जमवाजमवीला सुरवात केली आणि त्यांना माणसे ‘कळू’ लागली. आधी भरघोस मदतीची आश्वासने देणार्‍यांनी विविध कारणे शोधली. कोणी ‘माझा एक मित्र व्याजाने पैसे देतो. इतरांसाठी तो पाच टक्के व्याज घेतो. मी आहे म्हणून दोन टक्क्याने घेईल’ असे सांगत व्याज आकारून पैसे देई. त्यांच्या ‘बॅलेन्सशीट’च्या आधारावर बँकेतून फार तर 12-13 लाखांचे कर्ज मिळणार होते. अशा दोन्ही कर्जांची सांगड घालत त्यांनी पैसे उभे केले आणि डिसेंबर 2003 मध्ये हे उपकरण ‘स्किन सिटी’त दाखल झाले. याच टप्प्यावर त्यांच्या लक्षात एकच बाब आली... आपल्याला कोणत्याही संकटातून वाचविणारी एकच गोष्ट आहे - ती म्हणजे आपले बॅलेन्सशीट. अधिकाधिक उत्पन्न मिळवित जाणे आणि त्यावर अधिकाधिक कर भरणे, यातूनच आपले बॅलेन्सशीट मजबूत होत जाईल, आणि साहजिकच आणीबाणीच्या प्रसंगी बँका मदत करतील, हे सत्य त्यांना उमगले. ‘खाजगी सावकारांच्या घशात दोन-तीन टक्क्यांनी पैसे ओतून वरती त्यांचे उपकार घेण्यापेक्षा सरकारला टॅक्स देणे आणि प्रतिष्ठितपणे बँकांकडून कर्ज घेणे मला योग्य वाटले...’ हे सत्य ते जाता जाता सांगून जातात!
पैसे गुंतवले, उपकरण आले पण पेशंट कसे येणार? त्यांना या उपकरणाची माहिती तरी कळली पाहिजे. मुंबईबाहेर राज्यातील इतर कोणत्याही शहरात नसलेले उपकरण सोलापुरात आल्याचे सर्वांना कळवून या पेशंटना सोलापुरात आणण्याऐवजी स्वतःच पेशंटकडे जाण्याचा अतिशय महत्वाकांक्षी आणि दूरदर्शी निर्णय त्यांनी घेतला आणि मग पुढे सुरू झाली सतत साडेतीन वर्षांची भ्रमंती. लगतच्या उस्मानाबाद-लातूर शहरांबरोबरच औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी, नगर, नाशिक, संगमनेर, पुणे, सातारा, पंढरपूर, बारामती, विजापूर, गुलबर्गा, बागलकोट आदि 20 शहरांतून त्यांनी ‘मोबाईल लेझर क्लिनिक’ची सेवा देण्यास सुरवात केली. दररोज सकाळच्या सत्रात एक शहर आणि सायंकाळच्या सत्रात दुसरे अशा प्रकारे साधारण 10 दिवसांत ते 20 शहरांत सेवा देत. या काळात त्यांनी एक ‘क्वालिस जीप’ विकत घेतली होती. या जीपमध्ये यंत्र घेऊन ते या शहरांतून जात. त्यांची एकंदर 16 जणांची टीम होती. काही जण जीपसोबत असत तर काही जण पुढच्या शहरांत जाऊन तयारी करीत. या काळात हॉटेलचा खर्चही वाचविण्याचा त्यांचा प्रयत्न असे. त्यांची पत्नी योगिता भल्या पहाटे उठून पोळी-भाजी तयार करून घेत असे आणि तोच दिवसभरातील त्यांचा आहार असे! दर आठवड्याला सुमारे दोन हजार किलोमीटरला प्रवास ते करीत. साडेतीन वर्षांतील त्यांचे एकंदर ‘रनिंग’ झाले सुमारे चार लाख किलोमीटर! दिवसभर पेशंट पाहायचे, प्रवासात एखाद्या झाडाखाली पोळीभाजी खाऊन घ्यायची आणि दिवसभर पेशंट पाहात रात्रीच्या प्रवासात झोप घ्यायची, असा हा क्रम. 2003 ते 2007 दरम्यान ही भ्रमंती चालू होती. ‘लेझर’साठी केलेली गुंतवणूक मोठी होती. ती परत मिळविणे आवश्यकच होते पण एकाच पेशंटकडून जास्त घेण्यापेक्षा खूप पेशंटकडून थोडे-थोडे मिळविण्यावर त्यांचा विश्वास होता.
याच काळात सोलापुरातही काही बदल होत होते. साडेतीनशे चौरस फुटांच्या क्लिनिकमधून थोड्या प्रशस्त जागेत जाण्याचे त्यांनी ठरविले आणि त्याच रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला एक मोठी जागा भाड्याने मिळवून तेथे इंटिरियरवर बर्‍यापैकी खर्च केला. ते केंद्र सुरू करणार, त्याच काळात हा रस्ता ‘मास्टर प्लान’मध्ये समाविष्ट झाला आणि त्यांच्या दोन्ही हॉस्पिटलवर मधोमध लाल फुल्या मारल्या गेल्या. सुमारे 50 लाखांची त्यांची गुंतवणूक एका रात्रीतून अक्षरशः रस्त्यावर आली! ही गोष्ट 2003 अखेरची. इथे मात्र त्यांच्यातील महत्वाकांक्षी स्वभावाने जबरदस्त उसळी घेतली. ‘आपला सेट-अप उचलावा लागण्याची ही शेवटची वेळ, आता या पुढे कोणीही धक्का लावू शकणार नाही अशीच जागा निवडायची’ असे ठरवून त्यांनी जागा शोधण्यास सुरवात केली आणि 2004 मध्ये बांधकाम सुरू असलेल्या ‘जुना एम्प्लॉयमेंट चौक’ या मोक्याच्या जागेत चार हजार चौरस फुटांचा अख्खा फ्लोअर बुक केला. त्या वेळी त्यांची गरज होती फक्त 400 चौरस फुटांची! खरेदी झाली. एव्हाना बॅलेन्सशीट सुधारत होते. बँकांनी या वेळी मदत केली आणि ही जागा त्यांच्या ताब्यात आली. एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये असाव्यात अशा सर्व सुविधा त्यांनी या जागेत करून घेतल्या. त्या साठी ते पुण्या-मुंबईत अनेक हॉस्पिटल्समध्ये फिरले. ऑपरेशन थिएटर, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हॉलपासून लायब्ररीपर्यंत सर्व सुविधा उभारल्या. नव्या इमारतीचे उद्घाटन करण्याचे ठरले. त्या वेळी त्यांच्या शिक्षकांची शिकवण पुन्हा एकदा त्यांना आठवली... ‘फक्त नव्या इमारतीत जातो आहेस म्हणून नव्याने उद्घाटन कशासाठी? तू नवे काय केले आहेस?’ आणि या नैतिक दबावातून प्रेरणा घेत त्यांनी 2004 मध्ये 11 नवीन लेझर मशीन असलेली प्लॅटफॉर्म टेक्नॉलॉजी आणली! एका रात्रीतून रस्त्यावर आल्यानंतर जेमतेम वर्षभरात घेतलेली ही झेप होती!
याच काळात विस्ताराचा विचार सुरू झाला होता. 2004 मध्येच पुण्याच्या ‘स्टर्लिंग सेंटर’मध्ये त्यांनी एक छोटी जागा भाड्याने घेऊन आठवड्यातून एक दिवस पुण्यात येऊन बसण्यास त्यांनी सुरवात केली. उरलेला आठवडाभर त्यांचा एक डॉक्टर सहकारी क्लिनिक सांभाळे. त्याला ते पगार देत. ते म्हणतात, ‘हे क्लिनिक तोट्यात जात होते. पण केवळ नावामुळे माझ्या अनुपस्थितीतही माझे पुण्यातील स्थान हळूहळू पक्के होत होते!’ सोलापुरात कधीतरी सॅच्युरेशन येणार आणि सोलापूर सोडावे लागणार, याची त्यांना जाणीव होती. ते ओळखून त्यांनी हे पाऊल उचलले होते. पण म्हणून त्यांनी सोलापुरात दुर्लक्ष केले नाही. सोलापुरातील ‘स्किन सिटी’त सर्व अद्ययावत यंत्रणा येणे सुरूच होते. याच काळात त्यांचा एक मित्र सिंगापुरमधून एक फेलोशिप मिळवून आला. आपणही अशी एखादी फेलोशिप मिळवून आपली गुणवत्ता वाढवावी, असे नितीन यांच्या मनात आले. त्यांनी त्या मित्राकडे चौकशी केली... त्यानेही थोडीफार उत्तरे दिली आणि शेवटी हसत हसत टोला मारला, ‘एवढे हॉस्पिटल उभे करताय, तर तुम्हीच तुमची फेलोशिप सुरू करा ना...!’ त्याने गमतीत केलेली ही सूचना डॉ. नितीन यांनी भलतीच मनावर घेतली. पदव्यूत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचा शोध सुरू झाला आणि अल्पावधीतच त्यांनी ‘डी.एन.बी.’ या अभ्यासक्रमासाठी रितसर परवानगी मागितली. सन 1985 मध्ये दिल्लीमध्ये डॉ. पी. एन. बहल यांच्याकडे हा अभ्यासक्रम खाजगी स्वरुपात सुरू झालेला होता. त्यानंतर कोणत्याही हॉस्पिटलला ही परवानगी मिळालेली नव्हती. कारण या साठीचे निकष कठोर होते. काही विशिष्ट संख्या असलेले बेडचे संपूर्ण सुसज्ज हॉस्पिटल, प्रशिक्षित प्राध्यापक, दरवर्षी किमान 5000 पेशंटची ओपीडी अशा प्रकारचे हे निकष. हॉस्पिटल सेट अप आणि वार्षिक 13 हजाराची ओपीडी तेथे मुळातच सुरू होती. विशिष्ट गुणवत्ताप्राप्त एक प्राध्यापक रुजू होतेच. तपासणीसाठी आलेल्या समितीने आणखी एका प्राध्यापकाची नियुक्ती करण्याची सूचना केली आणि डॉ. नितीन यांनी मागितलेल्या 2 ऐवजी 4 जागा मंजूर केल्या! डॉ. बहल यांना सन 1985 मध्ये मान्यता मिळाली होती. त्यानंतर सन 2005 मध्ये डॉ. नितीन ढेपे यांच्या ‘स्किन क्लिनिक’ला ही मान्यता मिळाली. त्यानंतर सन 2011 च्या अखेरपर्यंत कोणत्याही खाजगी संस्थेला ही मान्यता मिळालेली नाही! डॉ. नितीन ढेपे यांच्या शिरपेचातील हा एक मानाचा तुरा ठरला!
सोलापुरातील अद्ययावत हॉस्पिटल सुरळीतपणे चालू लागल्यानंतर त्यांनी हळू हळू पुण्यात लक्ष केंद्रित करण्यास सुरवात केली. आठवड्यातून एक दिवस ते येतच होते. हळू हळू हे प्रमाण वाढवून 2-3 दिवसांवर आले आणि सन 2007 च्या अखेरीस त्यांनी पुण्यातील साधू वासवानी चौकात ‘रुणवाल रिजन्सी’ या भव्य कॉम्प्लेक्सच्या पहिल्या मजल्यावर 8 हजार चौरसफूट जागा भाड्याने घेतली आणि तेथे ‘स्किन सिटी’ची स्थापना केली. आता त्यांचे बॅलेन्सशीट मजबूत म्हणावे असे झाले होते. या सेट-अपच्या उभारणीसाठी त्यांना काहीच अडचण आली नाही. काही कोटींची उभारणी त्यांनी सहजपणे केली. साधारण दोन-तीन वर्षांत पुण्यातील कामकाज उत्तम प्रकारे सुरू झाले पण ‘स्किन सिटी पी.जी. इन्स्टिट्यूट ऑफ डर्मिटॉलॉजी’ सोलापुरातच सुरू होते. तेथे एव्हाना एम.डी. ला समांतर असलेल्या ‘डीएनबी’सोबतच ‘डीडीव्ही’ हा डिप्लोमा अभ्यासक्रम आणि सेशल्स विद्यापीठाचा ‘एम.डी. स्कीन’ हा विशेष अभ्यासक्रम सुरू झाला होता. एकंदर जागांची संख्याही आठवर गेली होती. परदेशातून विद्यार्थी येण्यास सुरवात झाली होती. या सर्वांना सोलापूरला जाऊन शिकणे अडचणीचे ठरू लागले. मग डॉ. नितीन यांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ही ‘इन्स्टिट्यूट’ पुण्यात स्थलांतरीत करून घेतली.
सन 2010 मध्ये सोलापूरचे संपूर्ण हॉस्पिटल त्यांनी आपल्या आजींच्या नावाने ट्रस्ट करून ‘जानकी ट्रस्ट’ला दान केले. हे हॉस्पिटल आता धर्मादाय पद्धतीने चालविण्यात येते. तेथे सुमारे 40 टक्के पेशंटची तपासणी मोफत होते तर उर्वरित पेशंटकडून सवलतीचा दर आकारला जातो. त्यांच्यावरील उपचारांतही मोठी सवलत देण्यात येते. वार्षिक सुमारे दीड कोटींची उलाढाल असलेल्या या हॉस्पिटलच्या दानातून डॉ. नितीन ढेपे यांना मोठे समाधान लाभले. ते आता दर सोमवार व मंगळवारी सोलापुरात येतात आणि आपली सेवा मोफत देतात. या हॉस्पिटलमधून त्यांच्या खिशात एक रुपयाही जात नाही!
पुण्यातील ‘स्किन सिटी’त सध्या तीन प्रकारचे उपचार होतात. पांढर्‍या डागांवर अत्याधुनिक उपचारांबरोबरच कॉस्मेटिक लेझरद्वारे ‘लायपोसक्शन’चा उपचारही येथे होतो. भाजलेल्या व्रणांवरील उपचारही येथे केले जातात. इसब, सोयरासिससारखे जुनाट त्वचाविकारही येथे दुरूस्त केले जातात. आता त्यांनी आपल्या कामाचा रोख हळू हळू बदलत आणला आहे. पहिल्या टप्प्यातील रुग्ण तपासण्यासाठी आता राज्यात अनेक भागांत त्वचारोगतज्ज्ञ आलेले आहेत, त्यांच्याकडून या रुग्णांनी उपचार घ्यावेत आणि ज्यावर राज्यात कोठेच उपचार होत नाहीत, अशा दुसर्‍या टप्प्यातील रुग्णांनीच आपल्याकडे यावे अशी आता त्यांची अपेक्षा आहे.
भविष्यात त्यांना सिंगापूर येथील ‘नॅशनल स्कीन सेंटर’च्या धर्तीवर पुण्यात एक अद्ययावत हॉस्पिटल उभारायचे आहे. त्या साठीची तयारी त्यांनी सुरू केली असून लोहगाव परिसरात विमानतळाजवळ ‘मगरपट्टा आयटी पार्क’ भागात त्यांनी एक एकर जागाही खरेदी करून ठेवली आहे. इथे त्वचेसंबंधातील प्रत्येक विषयावरील संशोधन आणि उपचार होतील, असे त्यांचे स्वप्न आहे. त्वचेशी संबंधित ‘अथ्’ पासून ‘इति’पर्यंत सर्व प्रकारच्या तपासण्या आणि उपचार एकाच छताखाली आणण्याची त्यांची प्रेरणा आहे ती हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीच्या ‘रामोजी राव’ यांची! रामोजी राव यांनी ज्या प्रकारे वृत्तपत्रे, त्यासाठी छापखाना, टीव्ही चॅनल, ट्रान्सपॉन्डर, अनेक भाषांतील चॅनल, त्यांच्या चित्रीकरणासाठी सेट्स, त्यातून चित्रपटांसाठी फिल्मसिटी असा एकातून एक विस्तार केला आणि या विषयीच्या सर्व सेवा एकाच छताखाली आणल्या त्याच प्रकारे ‘स्कीन’ या विषयातील सर्व सेवा एकाच छताखाली आणण्याचा निर्धार डॉ. नितीन यांनी केला होता. त्यातूनच त्यांच्या ‘स्कीन’मागे ‘सिटी’ हे नाव लागले!
आपल्या वैद्यकीय पेशापलिकडे जाऊन त्यांनी अनेक आवडी जोपासलेल्या आहेत. त्यांचे बालपण वाचनाने समृद्ध झाले. अजूनही ते बरेच काही वाचत असतात. त्यांच्या आवडत्या लेखकांमध्ये जी. ए. कुलकर्णी यांचेही नाव आहे! आपल्या या लाडक्या साहित्यिकाबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी त्यांनी मागील चार वर्षांपासून पुण्यातील एका उपक्रमाचे पालकत्व स्वीकारलेले आहे. ‘आशय सांस्कृतिक’ आणि ‘जी.ए. कुटुंबीय’ यांच्या वतीने मागील चार वर्षांपासून दोन दिवसीय ‘प्रिय जी.ए. महोत्सवा’चे आयोजन करण्यात येत असते. या महोत्सवात ‘प्रिय जी. ए. सन्मान’ व इतर काही पुरस्कार प्रदान केले जातात. वरील दोन संस्थांसोबतच आयोजक म्हणून या कार्यक्रमात ‘स्कीन सिटी’ सहभागी असते. सन 2011 चा कार्यक्रम 12 व 13 डिसेंबर रोजी साजरा झाला आणि या कार्यक्रमात ज्येष्ठ संशोधक रा. चिं. ढेरे यांना ‘प्रिय जी. ए. सन्मान’ प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात व्यासपीठावर बसलेले असताना डॉ. नितीन यांनी रा. चिं. ढेरे यांना आपण त्यांची पुस्तके वाचली आहेत आणि विशेषतः त्यांचे ‘खंडोबा’वरील संशोधन वाचल्याचे सांगितले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला! एक डॉक्टर असून संशोधनपर लेखन वाचणारा माणूस त्यांनाही बहुधा क्वचितच भेटत असावा! सोलापुरात आयोजित ‘पुलोत्सवा’लाही त्यांनी मोठी देणगी दिली होती आणि ते ज्या कॉलेजमध्ये शिकले त्या ‘बी.जे. मेडिकल’च्या हिरकमहोत्सवातही त्यांनी मोठी देणगी दिली. त्यांच्यासारख्या ‘ज्युनिअर’ने दिलेल्या ‘आकड्या’चा वापर करून ‘बी.जे.’ने इतर अनेक ‘सिनियर्स’कडून भरीव देणग्या मिळविल्या!
त्यांच्या या संपूर्ण वाटचालीत एक बाब मात्र थक्क करणारी आहे. आज कर्तृत्वाच्या शिखरावर उभे असलेले, विविध राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय परिषदा गाजविणारे डॉ. नितीन ढेपे दहावी - बारावी उत्तीर्ण होईपर्यंत धडपणाने बोलूही शकत नव्हते! त्यांना
बालपणापासूनच तोतरेपणाचा त्रास होता. बालवयातील या त्रासामुळे वर्गातील मुले त्यांना चिडवीत. त्यामुळे त्यांनी स्वतःला आपल्याच कोशात कोंडून घेतले आणि सारे लक्ष केवळ अवांतर वाचन आणि अभ्यासावर केंद्रित केले. सातवीत असताना त्यांना आपल्या या त्रासाचा उबग आला. आपले आई-वडील आपल्यावर उपचार करीत नाहीत, असा त्यांचा आरोप होता. अखेर त्यांच्या आईने थोडे-थोडे करून पैसे जमवून त्या काळी मुंबईतून सोलापुरात येणार्‍या एका चांगल्या डॉक्टरला दाखविले. त्या डॉक्टरांनी तपासणी करून ‘मुलात काहीही दोष नाही’, असे सांगितले. आता नितीन यांच्यावर दबाव आला. आपल्यात कोणताही शारीरिक दोष नसेल, तर आपल्यात सुधारणा करणे आपलीच जबाबदारी आहे, याची खुणगाठ त्यांनी बांधली. तिथून पुढे त्यांचा स्वतःशीच संघर्ष सुरू झाला. ते जात्याच हुशार होते. वर्गात शिक्षकांनी कोणताही प्रश्न विचारला की त्यांचा हात वर जात असे. उत्तर देताना तोतरेपणामुळे वाक्य पूर्ण करण्यासाठी खूप वेळ लागायचा. या वेळी मुले चेष्टा करायची. काही शिक्षक हतोत्साहित करायचे पण नाना गुरुजींसारखे काही जण प्रोत्साहनही द्यायचे. दहावी उत्तीर्ण होईपर्यंत किंचितशी प्रगती झाली. पुढे लातूरच्या शाहू महाविद्यालयात त्यांनी अकरावीला प्रवेश घेतला. डॉ. नितीन म्हणतात, “शाहू कॉलेजची एक गोष्ट मला आवडली. इथे तुमची श्रीमंती पैशात नाही तर मार्कांवर मोजली जायची. चांगल्या अभ्यासामुळे मी नेहेमीच पुढे असायचो. त्यामुळे इथे प्राध्यापकांनी मला खूप प्रोत्साहन दिले. माझा तोतरेपणा घालविण्याचा प्रयत्न त्यांच्या लक्षात येत असे आणि ते मला त्या साठी मदतही करीत. अशा प्रकारे कठोर मेहनत आणि शिक्षकांचा पाठिंबा यांच्या बळावर ही समस्या सोडविण्यात मला यश आले!”
आयुष्यातील सर्व बर्‍यावाईट प्रसंगांवर आपल्या अविचल मनोधैर्याने आणि कठोर मेहनतीच्या बळावर मात करीत डॉ. नितीन ढेपे यांनी आजवरची वाटचाल केली. बुद्धिमत्तेला त्यांनी दिलेल्या कठोर मेहनतीच्या बळावर केवळ आर्थिकच नव्हे तर सर्वांगीण संपन्नतेने ते आज समृद्ध आहेत. या सर्वांहून मौल्यवान आहे, ती त्यांच्या मनाची समृद्धी. विविध उपक्रमांत जिथे गरज आहे तिथे आवश्यक त्या स्वरुपात ते आपला वाटा उचलतात आणि नामानिराळे होतात. सतत नवे काही शिकणे, नव्या प्रवाहांना सामोरे जाणे आणि सातत्याने समाजाभिमुख राहाणे, ही वृत्ती आपल्या शिक्षकांच्या नैतिक धाकामुळेच आपल्यात जोपासली गेली असे आवर्जुन सांगत ते आपल्या प्रगतीचे सारे श्रेय आपल्या गुरुजनांच्याच चरणी अर्पण करतात...!

ंं
डॉ. नितीन ढेपे
‘स्कीन सिटी’, पहिला मजला, रुणवाल रिजन्सी, साधू वासवानी चौक, पुणे-1