Friday, March 1, 2013

रिक्षाचालकाच्या मुलीचे ‘सीए’तील यश आणि माझ्या मुलाखत कौशल्याची कसोटी...!


सी.ए. परीक्षेत देशात सर्व-प्रथम आलेल्या प्रेमा जयकुमार या मुंबई येथील विद्यार्थिनीशी जाहीर संवाद साधण्याची संधी मला जालना येथे रविवारी (दि. २४ फेब्रुवारी २०१३) आयोजित कार्यक्रमात मिळाली. हा संवाद साधण्यासाठी मला निमंत्रित करण्यात आले होते. मूळ तमिळ असलेल्या या युवतीचे सर्व शिक्षण मुंबईमध्ये झाले. २१ जानेवारी रोजी जाहीर झालेल्या सी.ए. अंतिम वर्षाच्या निकालात ती देशात प्रथम आली. तिच्याशी तिच्या यशाबद्दल गप्पा मारणे, तिला बोलते करणे, हा माझ्यासाठी आनंददायी अनुभव होता. अर्थात त्यासाठी मला बरीच मेहनत करावी लागली. सी.ए. अभ्यासक्रमाबद्दल बरीच माहिती मिळविली, त्यासाठी माझे सी.ए. श्री. वैभव दंडे यांच्याशी चर्चा केली. प्रेमा जयकुमार हिच्याबद्दल नेट वर  उपलब्ध फिल्म पहिल्या, बातम्या वाचल्या... बरीच पूर्वतयारी केली, तेव्हा या संवादास आकार आला. त्याबद्दल विस्ताराने...

प्रेमा जयकुमार पेरुमल... 22 जानेवारी 2013 रोजी सकाळपर्यंत हे नाव जगाच्या खिजगणतीत सुद्धा नव्हते. 21 जानेवारी रोजी ‘सी.ए. फायनल’चा जाहिर झालेला निकाल 22 रोजी दैनिकांतून प्रकाशित झाला आणि सार्‍या जगाचे लक्ष मुंबईच्या मालाड भागातील एका चाळीत राहणार्‍या प्रेमा जयकुमार हिच्याकडे वेधले गेले. एका सामान्य तमिळ रिक्षाचालकाची मुलगी असलेल्या प्रेमा जयकुमार हिने आपल्या कठोर आणि शिस्तबद्ध मेहनतीतून ‘सी.ए.’ फायनलच्या अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणार्‍या परीक्षेत 800 पैकी 607 गुण मिळवित प्रथम येण्याचा मान पटकावला. योगायोग हा, की याच परीक्षेत तिचा धाकटा भाऊ धनराज सुद्धा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाला. या कुटुंबात एकाच दिवशी आनंदाची दोन कारंजी उसळली...!

प्रेमाचे वडील जयकुमार पेरुमल मूळचे तमिळनाडूतील वेलुपुरम जिल्ह्याच्या संकरापुरम या गावचे. 1990 च्या सुमारास पोट भरण्यासाठी ते आपल्या कुटुंबासह मुंबईत आले. पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा हा परिवार. प्रारंभी दोन-तीन वर्षे त्यांनी एका मिलमध्ये कामगार म्हणून नोकरी केली आणि त्यानंतर साधारण 1994 च्या सुमारास त्यांनी ‘एमएच 02 पी 6154’ या क्रमांकाचा रिक्षा खरेदी केला. त्या रिक्षाच्या आधारावरच त्यांनी आपल्या कुटुंबाचे भरणपोषण केले. या रिक्षाच्या आठवणीने प्रेमा भावविवश होते...! 280 चौरसफुटांच्या एकाच खोलीत राहून अत्यंत सामान्य आयुष्य जगणार्‍या या कुटुंबात असे काय घडले, की या कुटुंबातील एक मुलगी ‘सी.ए.’ परीक्षेत देशात प्रथम आली? तिने हे यश कसे मिळविले? मला सुद्धा ही उत्सुकता होतीच. योगायोगाने तिच्याशी थेट संवाद साधूनच ही उत्सुकता मला पूर्ण करता आली आणि याला साक्षीदार राहिली जालना शहरातील सुमारे 1000 तरुण मुले-मुली. जालन्यातील मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात 24 फेब्रुवारी 2013 रोजी रोटरी परिवारातर्फे आयोजित या खास कार्यक्रमात मी प्रेमाशी संवाद साधला. आयोजकांनी या मुलाखतीसाठी मला निमंत्रित केले होते. विशेष म्हणजे, ही मुलाखत मी मराठीऐवजी हिंदीतून घेणे अपेक्षित होते! उपस्थितांपैकी अनेक जण हिंदी भाषक, हे एक कारण आणि प्रेमा हिला तमिळ आणि इंग्रजीव्यतिरिक्त फक्त हिंदीच बोलता येते, हे दुसरे...! 

मी सध्या ‘आयकॉन्स’ या शीर्षकाने जी पुस्तकमालिका लिहितो आहे, ती मुलाखतींवरच आधारित आहे. पण त्या मुलाखती वेगळ्या असतात. तो मंचावरील जाहिर कार्यक्रम नसतो. पण जेव्हा चार-चौघांत एखाद्या व्यक्तीला बोलते करायचे असते, तेव्हा त्या व्यक्तीचा आणि विषयाचा पुरेपूर अभ्यास आधीच होणे अपेक्षित आणि आवश्यक असते. माझ्या ‘जालना आयकॉन्स’ आणि इतर पुस्तकांच्या लेखनामुळे आयोजकांनी या मुलाखतीची जबाबदारी माझ्यावर टाकली. हा माझ्यासाठी जसा आनंदाचा भाग होता, तसाच जबाबदारीची जाणीव करून देणाराही...!

अर्थकारण - विशेषतः ‘कॉमर्स’ हा विषय माझ्यासाठी ‘दुरून डोंगर साजरे’ असा! आर्थिक व्यवहार, हिशेब वगैरे मला फारसा कळत नाही. माझ्या घरचा सारा व्यवहार माझी पत्नीच सांभाळते. ‘सी.ए.’ वगैरेचा माझा संबंध फक्त वर्षातून एकदा ‘आयटी रिटर्न’ भरण्यापुरताच...! त्यामुळे प्रेमा जयकुमारची मुलाखत घ्यायची जबाबदारी माझ्यावर आल्यानंतर खरे सांगायचे, तर मी चिंतित होतो. प्रेमा जयकुमार या व्यक्तीला तिच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलते करणे सोपे... पुस्तकासाठी मुलाखत घ्यायची, तर तिच्याकडूनच माहिती विचारून घेऊन नंतर ती व्यवस्थित लिहून काढणेही प्रसंगी शक्य, पण मंचावर जाहिर कार्यक्रमात वैयक्तिक आणि तांत्रिक अंगाने नेमके प्रश्‍न विचारून तिला बोलते करणे आणि समोर उपस्थित प्रामुख्याने विद्यार्थीवर्गाला उपयोगाचे ठरेल अशी माहिती तिच्याकडून वदवून घेणे, ही कौशल्याची बाब होती. त्यासाठी मला ‘सी.ए.’बद्दल पुरेसा अभ्यास करणे आवश्यक होते. आधी मी इंटरनेटवरून हा सारा अभ्यासक्रम डाऊनलोड केला. प्रेमा जयकुमार बद्दल नेटवर आलेल्या बातम्या वाचून घेतल्या. तिचे व्हिडिओ पाहिले. त्यातील मुद्दे काढले. या परीक्षेची आकडेवारी मिळविली. टक्केवारी काढली. परीक्षेत दुसर्‍या-तिसर्‍या आलेल्या विद्यार्थ्यांचे मार्क मिळविले. त्यानंतर माझे सी.ए. श्री. वैभव दंडे यांच्याशी मी विस्ताराने चर्चा केली.

‘सीए’ हा अभ्यासक्रम कसा असतो, त्यातील महत्वाचे विषय कोणते असतात, त्यात थिअरी आणि प्रॅक्टिकलला किती महत्व असते, हे आणि असे अनेक मुद्दे श्री. दंडे यांनी मला व्यवस्थित समजावून दिले. त्यामुळे या मुलाखतीची दिशा निश्‍चित झाली. मी एक कच्ची प्रश्‍नपत्रिका तयार केली. प्रेमा हिच्या मुलाखतीचा साधारण 20 टक्के भाग वैयक्तिक माहिती-तपशीलाबाबत आणि उरलेला 80 टक्के भाग तांत्रिक पद्धतीने अभ्यासक्रमाबाबत, असे प्रमाण ठरविलेले होते. त्यानुसार हा आराखडा तयार केला. मुलाखतीआधी तिच्याशी प्राथमिक चर्चा केली. मी विचारणार असलेल्या तपशीलाविषयी माहिती दिली... त्यावर मात्र ती आश्‍चर्यचकित झालेली दिसली. मागील महिनाभरात अनेकजण तिला भेटले, काही पत्रकार आणि वृत्तवाहिन्यांनी तिच्या मुलाखती घेतल्या, पण इतक्या खोलवर जाऊन कोणी तयारी केलेली नव्हती, अशी तिची प्रतिक्रिया! अर्थात याचे श्रेय माझे सी.ए. श्री. दंडे यांचे!

मुलाखतीत प्रारंभी वैयक्तिक माहिती विचारली. घरची स्थिती, भावाचा अभ्यास, वडिलांचा एमएच 02 पी 6154 या क्रमांकाचा रिक्षा, तिचे चाळीतील घर, तिचा बी.कॉम.चा अभ्यास, बी.कॉम. मध्ये मुंबई विद्यापीठात सर्वद्वितीय येण्याचा तिने मिळविलेला मान आणि त्यानंतर ‘सीए’ करण्याचा तिने घेतलेला निर्णय, हा प्रवास थोडक्यात उलगडल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष विषयाकडे वळलो.

‘सी.ए.’ अर्थात ‘चार्टर्ड अकाउंटंट’ हा सेल्फ लर्निंग कोसर्र् मानला जातो. ‘द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’ ही स्वायत्त संस्था हा विषय हाताळते. हीच संस्था अभ्यासक्रम निश्‍चित करते आणि परीक्षा घेते. प्रत्येक वर्षी परीक्षेआधी इन्स्टिट्यूटच्या वतीने रिव्हिजनल टेस्ट पेपर्स प्रकाशित होत असतात. आधीच्या वर्षीच्या प्रश्‍नपत्रिका आणि त्याची ‘सजेस्टेड ऍन्सर्स’ त्यात दिलेले असतात. ते अभ्यासून विद्यार्थ्यांनी तयारी करावी असे अपेक्षित असते. परीक्षांची सुरवात होते ती ‘सीपीटी’ अर्थात ‘कॉमन प्रोफेशिएन्सी टेस्ट’पासून. ही परीक्षा 1) फंडामेंटल्स ऑफ अकाउंटिंग, 2) मर्कंटाईल लॉ, 3) जनरल इकॉनॉमिक्स आणि 4) क्वांन्टिटेटीव्ह ऍप्टिट्यूड या चार विषयांची असते. इथे उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील वर्षासाठी प्रवेश मिळतो. अकाउंटिंग हा प्रेमा हिचा ‘हँड सब्जेक्ट’.  ती म्हणाली, ‘उरलेल्या विषयांचा अभ्यासही मनापासून केला आणि त्यात मला यश मिळाले’. विशेष म्हणजे या परीक्षेसाठी तिने कोणताही ‘क्लास’ लावलेला नव्हता!

‘सीपीटी’नंतर ‘आयपीसीसी’ची पायरी असते. याचा लॉंगफॉर्म आहे - ‘इंटिग्रेटेड प्रोफेशनल कॉम्पिटन्स कोर्स’. आधी हा टप्पा ‘सीए इंटरमिजिएट’ नावाने ओळखला जात असे. या परीक्षेसाठी दोन ग्रुप असतात. ‘ग्रुप 1’ मध्ये 1) अकाउंटिंग, 2) बिझनेस लॉ-इथिक्स अँड कम्युनिकेशन्स, 3) कॉस्ट अकाउंटिंग अँड फिनान्शियल मॅनेजमेंट आणि 4) टॅक्सेशन हे 4 पेपर असतात तर ‘ग्रुप 2’मध्ये 1) ऍडव्हान्स अकाउंटिंग, 2) ऍडिटिंग अँड ऍश्युअरन्स और 3) इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट हे 3 पेपर असतात. या टप्प्याची एक खासियत आहे. हे दोन्ही ग्रुप स्वतंत्रपणे ‘ऍपिअर’ करता येतात किंवा आधी पहिला ग्रुप ऍपिअर करून, त्यात उत्तीर्ण होऊन मग दुसरा ग्रुप ऍपिअर करता येतो. पण असे वेगवेगळे ऍपिअर झाले, तर ते मेरिट लिस्टमध्ये गृहित धरले जात नाहीत! ही आकडेवारीही लक्षणीय असते. गतवर्षीची ही आकडेवारी शोधली, तेव्हा असे लक्षात आले, की ग्रुप 1 मध्ये 48 हजार 320 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील 13 जार 193 (27.30%) उत्तीर्ण झाले. ग्रुप 2 मध्ये 51 हजार 906 जणांनी परीक्षा दिली. यापैकी 11 हजार 341 (21.85%) उत्तीर्ण झाले, तर दोन्ही ग्रुप एकत्रित देणार्‍यांची संख्या 29 हजार 339 होती. त्यापैकी 3 हजार 804 जण उत्तीर्ण झाले. हे प्रमाण फक्त 12.97 टक्के आहे! अशा या चुरशीत प्रेमा हिचा गुणवत्तायादीतील त्या वेळचा क्रमांक होता 20वा!

ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर (किंवा त्यातील कोणताही एक ग्रुप उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याला साधारण साडेतीन वर्षांची ‘आर्टिकलशिप’ करावयाची असते. ही एक प्रकारची एन्टर्नशिपच असते. एक यशस्वी ‘सीए’ होण्यासाठीची पायाभरणी या साडेतीन वर्षांत होत असते. एखाद्या ज्येष्ठ सी.ए.च्या हाताखाली संबंधित विद्यार्थ्याने या काळात काम करावयाचे असते. अभ्यासक्रमाचे ‘ऍप्लिकेशन्स’ या काळात शिकून घेतल्यानंतर ‘सीए फायनल’च्या लेखी परीक्षेत त्याचे ‘थेरॉटिकल नॉलेज’ लिहावयाचे असते! आधी प्रॅक्टिकल मग थिअरी, असा हा प्रकार असतो. 

सी.ए. फायनल हा तसा अवघड प्रकार. साडेतीन वर्षांच्या कठोर मेहनतीनंतर या परीक्षेतील यशापयशावर विद्यार्थ्याचे भवितव्य अवलंबून असते. इथेही दोन ग्रुप असतात. या वेळी पेपर मात्र 8 असतात. पहिल्या ग्रुप मध्ये 1) फिनान्शियल रिपोर्टिंग, 2) स्ट्रॅटेजिक फिनान्शियल मॅनेजमेंट, 3) ऍडव्हान्स्ड् ऑडिटिंग अँड प्रोफेशनल इथिक्स आणि 4) कार्पोरेट अँड अलाईड लॉज. तर दुसर्‍या ग्रुप मध्ये 1) ऍडव्हान्स मॅनेजमेंट अकाउंटिंग, 2) इन्फर्मेशन सिस्टिमस् कंट्रोल अँड ऑडिट, 3) डायरेक्ट टॅक्स लॉ और 4) इनडायरेक्ट टॅक्स लॉ... हा अभ्यासक्रम ‘हेवी’ असतो. त्याच्या परीक्षेसाठी साधारणपणे ‘सीए’कडून काही महिन्यांची रजा घेण्याचीही परवानगी असते. प्रेमा हिने परीक्षेआधी पाच महिने ही रजा मिळविली आणि हे अखेरचे पाच महिने तिच्यासाठी अतिशय महत्वाचे ठरले. ती म्हणते, ‘‘परीक्षेआधीचा हा काळ खूप महत्वाचा होता. मी आणि माझ्या भावाने मिळून प्रारंभी दररोज 8 ते 10 तास अभ्यास केला आणि अखेरचे दोन-अडिच महिने अक्षरशः 16-16 तासांचा अभ्यास केला. ‘आर्टिकलशिप’मध्ये पेपर लिहिण्याचा सराव मोडलेला असतो. परीक्षा डोळ्यासमोर ठेवून आम्ही ‘रट्टा’ मारण्यास सुरवात केली. त्यामुळे लिहिण्याची सवय पुन्हा एकदा जोडली गेली. तीन वर्षांचा अनुभव, चार-पाच महिन्यांचा अभ्यास यानंतर शेवटच्या क्षणी करावी लागणारी ‘रिव्हिजन’सुद्धा खूप महत्वाची होती. हे सारे ‘स्पेसिफाईड’ हवे असते. यात पाठांतर खूप महत्वाचे असते. ते आम्ही करून दाखविले.’’

प्रेमा आणि तिच्या भावाने ‘आयपीसीसी’पासून क्लास लावला. विशेष म्हणजे, बी.कॉम.मधील तिच्या यशामुळे तिला क्लासने फीमध्ये 100 टक्के सवलत दिली, एवढेच नव्हे, तर बी.कॉम.मध्ये विद्यापीठात द्वितीय आल्यामुळे तिला एकंदर 50 हजाराची पारितोषिके आणि काही स्कॉलरशिप मिळाल्या. त्या आर्थिक आधारावरच आपण ‘सीए’ होऊ शकलो, असे प्रेमा आवर्जुन सांगते!

इतर काही परीक्षांप्रमाणे सी.ए.मध्ये ‘टॉप’ येणे हा नशिबाचा खेळ नसतो, असे मानले जाते. इथे विद्यार्थ्याची निव्वळ मेहनतच उपयोगाला येते. प्रेमा प्रथम आली. तिला 800 पैकी 607 गुण मिळाले. दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या विद्यार्थ्याला तिच्यापेक्षा तबाबल 5 गुण कमी आहेत, तर तिसर्‍या क्रमांकावरील विद्यार्थी तिच्याहून 13 गुणांनी मागे आहे! हा निर्विवाद आघाडीचा भाग केवळ कठोर मेहनतीतूनच येऊ शकतो, असे मानले जाते. आपल्या या ‘विनिंग स्ट्रोक’बद्दल ती भरभरून बोलली. आपली अभ्यासाची पद्धती, लक्षात ठेवण्याच्या क्लृप्त्या, हे सारे तिने जालन्यातील विद्यार्थ्यांसमोर मनापासून शेअर केल्या. अशा प्रकारचा थेट संवाद ती सुद्धा प्रथमच अनुभवत होती!


तिच्याशी संवाद साधताना मला जाणवलेली एक महत्वाची बाब म्हणजे, दहावीपर्यंतचे तिचे शिक्षण तमिळ भाषेतून झाले. सातवीपासून तिने इंग्रजी भाषेची ओळख करून घेण्यास प्रारंभ केला. ती म्हणाली, तमिळपेक्षा इंग्रजीतून शिकणे मला जड जात होते. पण तरीही मी जिद्दीने ही भाषा शिकत गेले. मातृभाषेतून शिक्षणाविषयी भरपूर चर्चा चालू असताना, तमिळ या मातृभाषेतून शिकलेल्या या मुलीने आपल्या जिद्दीने सी.ए. सारख्या परीक्षेत इंग्रजीतून मिळविलेले यश मला खूप उल्लेखनीय आणि आनंददायी वाटले.

साधारण तासभर चाललेला हा संवाद खूपच रंगला. मला कौतुक वाटले ते जालन्यातील उत्साही विद्यार्थी आणि आयोजकांचे. मुंबईतील एका रिक्षाचालकाची मुलगी सीए परीक्षेत प्रथम येते, याचे जालनेकरांना कौतुक वाटण्याचे कारणच काय? पण जालन्यातील रोटरी क्लब, रोटरॅक्ट क्लब, रोटरी इनरव्हिल क्लब या संस्थांबरोबरच ‘लोटस बिझनेस स्कूल’, ‘नॉलेज प्रोफेशनल ऍकॅडमी’ या शिक्षणसंस्थांनी यात पुढाकार घेतला होता. ‘विक्रम चहा’ आणि ‘पोलाद स्टील’ या जालन्यातील दोन उद्योगांनी याचा आर्थिक भार उचलला होता! फुलंब्रीकर नाट्यगृहाची आसनक्षमता साधारण 1000 आहे. हे सभागृह खच्चून भरले होतेच, पण साधारण 400 ते 500 मुले-मुली उभी राहून या मुलाखतीचा आस्वाद घेत होती! जालन्यासारख्या शहरातील हा प्रतिसाद सुखावणारा होता! विशेष म्हणजे मुलांपेक्षा मुलींची संख्या यात जास्त होती! असा कार्यक्रम औरंगाबादेत व्हावा, असे कुणाला वाटले नाही, याचे मला वैषम्य नक्कीच वाटले.

वैषम्य आणखी एका गोष्टीचे वाटले. जालना हे औरंगाबादपासून जेमतेम 50 किलोमीटरवरील शहर. या शहरात एका ‘टॉपर’ मुलीच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरू शकणार्‍या प्रकट मुलाखतीचा -हृद्य सत्काराचा कार्यक्रम निरपेक्ष भावनेने होतो, ही मराठवाड्याच्या दृष्टीनेच अभिमानाची बाब. या विषयीच्या बातम्या विविध दैनिकांच्या जालना आवृत्तीत प्रकाशित झाल्या खर्‍या, पण औरंबादेत मात्र एकाही दैनिकाने तिच्याबद्दल एका ओळीचीही बातमी प्रकाशित केली नाही...! ही मिडियाची उदासीनता की अज्ञान?