Wednesday, August 24, 2011

माणसे 3, उद्योग 6, उलाढाल 125 कोटी!

प्रसाद कोकीळ, सुधीर शिरडकर आणि सुनील पाठक या तिघांनी मिळून औरंगाबाद, पुणे आणि पंतनगर यां तीन ठिकाणी मिळून एकूण ६ उद्योग उभारले आहेत. त्यांची ही कथा मराठी तरुणांनी अवश्य जाणून घ्यावी. साप्ताहिक सकाळ च्या २० ऑगस्ट २०११ च्या अंकात त्यांचा करून दिलेला परिचय...
................................................
मध्यमवर्गीय घरात जन्मून उद्योगाची स्वप्ने पाहणे अवघड आणि मराठी माणसांनी एकत्र येऊन काही उद्योग उभारणे त्याहून अवघड! अशा वातावरणात तिघांच्या एकत्र येण्यातून मागील 13 वर्षांत औरंगाबाद, रांजणगाव आणि पंतनगर येथे मिळून एकंदर सहा उद्योगांची उभारणी झाली. प्लॅस्टिक मोल्डिंग हा त्यांच्या कामांचा मुख्य स्रोत असला, तरी इतरही अनेक क्षेत्रांत ते विलक्षण कामे करतात. सामाजिक जाणीव जागी ठेवून ते करीत असलेल्या विविध प्रयोगांबाबत. 
................................................
आपल्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीतील कामगारांचा पगार करण्यासाठी, स्वतः इतरत्र करीत असलेल्या नोकरीतील आपल्या पगाराच्या तारखेची वाट पाहावी लागत असेल तर...? पण ते दिवसच तसे होते. वाळूज भागातील "संजय प्लॅस्टिक'चे दोघे भागीदार पहिले काही महिने आपल्या कामगारांचा पगार स्वतः बाहेर नोकरी करून त्या पगारातून उभा करीत आणि कामांचा मिळणारा पैसा आपल्या उद्योगात परत गुंतवत! प्रसाद कोकीळ आणि सुधीर शिरडकर हे ते दोन जण. कोकीळ हे इलेक्‍ट्रिकल इंजिनिअर; तर शिरडकर मेकॅनिकल इंजिनिअर. ही युती 1998 पासूनची. त्यांच्यात 2008 मध्ये आणखी एका मेकॅनिकल इंजिनिअरची सुनील पाठक यांची भर पडली. या तिघांनीही करिअरची सुरवात नोकऱ्यांनी केली. तिघांनीही नोकऱ्यांदरम्यान अधिकारपदे सांभाळली, स्वतःच्या कामाची छाप पाडली आणि शेवटी स्वतःचा एक उत्तम ग्रुप सुरू करून तेथेही आपले आगळे अस्तित्व सिद्ध केले.

हे तिघेही बालपणापासूनचे मित्र. शिरडकर बाकीच्या दोघांपेक्षा तीनएक वर्षांनी मोठे. बालपण एकाच गल्लीत गेलेले. प्रसाद कोकीळ आणि सुनील पाठक तर न कळत्या वयापासून एकत्र. सुधीर व प्रसाद या दोघांचीही शैक्षणिक कारकीर्द भव्यदिव्य म्हणावी अशी नव्हती. प्रसाद आणि सुनील यांनी 1987 मध्ये अनुक्रमे इलेक्‍ट्रिकल व मेकॅनिकल इंजिनिअरिंग केले; तर सुधीर यांनी त्याआधी दोन वर्षे मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळविली. त्या वेळच्या ट्रेंडनुसार तिघेही त्या त्या वर्षी औरंगाबादेतील वाळूज व चिकलठाणा येथे एका उद्योगात रुजू झाले. इंजिनिअर झाल्यानंतर शिरडकरांनी एक-दोन वर्षे स्थानिक कॉलेजात अध्यापन केले; पण मूळ स्वभाव सर्जनशीलतेचा. त्यातून जानेवारी 1987 मध्ये त्यांनी "बजाज'ची एक व्हेंडर कंपनी जॉईन केली. ही मुंबईतली फर्म. त्यांचा औरंगाबादेतील उद्योग उभारण्यात सुधीर यांची महत्त्वाची भूमिका राहिली. यादरम्यान प्रसाद यांची वाटचालही याच मार्गावरून सुरू होती. 1989 मध्ये त्यांनी क्रियाशीलतेला फारसा वाव नसलेली पहिली कंपनी सोडली आणि दुसऱ्या एका कंपनीत ते प्रोजेक्‍ट प्लॅनिंग ऑफिसर म्हणून रुजू झाले. खांडवा आणि नांदगाव ही त्यांची कार्यक्षेत्रे. तिथला अनुभव घेऊन 1992 मध्ये ते औरंगाबादेत एका बियाणे कंपनीत "प्रोजेक्‍ट प्लॅनिंग मॅनेजर' म्हणून रुजू झाले. या काळात त्यांनी मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्‍ट्रिकल, रेफ्रिजरेशन, बायोटेक या साऱ्या आघाड्यांवर काम केले. यादरम्यान या दोघांच्याही मनात स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय करण्याचा विचार पक्का झाला होता. त्यासाठी त्यांनी वाळूज औद्योगिक वसाहतीत पैसे भरून नोंदणीही केली. योगायोगाची गोष्ट अशी, की निघालेल्या ड्रॉमध्ये दोघांनाही 31-32 क्रमांकाचे शेजारचे प्लॉट मिळाले. हा शुभ संकेत मानत दोघांनी निर्णय घेतला ः "जे करायचे ते मिळूनच.' यादरम्यान सुनील पाठक यांनी वेगळा मार्ग स्वीकारला होता. त्यांना मुळात संशोधनाची आवड. भाभा ऍटॉमिक रिसर्च सेंटरची परीक्षा उत्तीर्ण होऊन ते तेथे दाखल झाले. विख्यात शास्त्रज्ञ अनिल काकोडकर हे त्यांचे "बॉस.' पाच वर्षे तेथे काम केल्यानंतर ते फोर्ड मोटर्सची सहयोगी कंपनी असलेल्या "ऍमट्रेक्‍स'मध्ये अहमदाबाद येथे गेले. त्यांचे स्पेशलायझेशन होते "हीट ट्रान्स्फर.' तेथील कामगिरीनंतर "डेल्फाय' या "जनरल मोटर्स'च्या सहयोगी असलेल्या दिल्लीच्या बहुराष्ट्रीय कंपनीत त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आणि 19 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवानंतर 2008 मध्ये तेही या दोघा मित्रांना जॉइन झाले.

त्यांनी प्रारंभ केला प्लॅस्टिक मोल्डिंगच्या व्यवसायाने. "बजाज'ला लागणाऱ्या प्लॅस्टिक पार्टची निर्मिती ते त्यांच्या व्हेंडर्ससाठी करून देत. मार्च 1998 मध्ये शिरडकर आणि जुलै 1998 मध्ये कोकीळ यांनी आपापल्या नोकऱ्या सोडून पूर्णतः "संजय प्लॅस्टिक'मध्ये लक्ष घालण्यास सुरवात केली. पहिल्या महिन्याचा बिझनेस फक्त 56 हजारांचा झाला, तसे दोघेही हादरले. तेथेच टार्गेट सेट करण्यास सुरवात झाली. टार्गेट सेट करणे, मार्केटिंग, पर्चेसिंग, क्वालिटी कंट्रोल हा भाग कोकीळ यांनी पाहण्याचे ठरले आणि प्रॉडक्‍ट डेव्हलपमेंट, कॉस्टिंग ही कामे शिरडकरांनी स्वीकारली. एक-एक ऑर्डर मिळविण्यासाठी झगडावे लागले. त्यावेळी "मारुती'ला काही विशिष्ट स्पेअर पार्ट भारतात तयार करून हवे होते. मारुतीच्या क्‍लच असेंब्लीमध्ये वापरल्या जाणाऱ्या उच्च दर्जाच्या प्लॅस्टिकपासून बनवलेले फ्रिक्‍शन "वॉशर्स-बुश' हे ते पार्ट; पण हे प्लॅस्टिक नेमके कोणते हवे, याचा तपशील "संजय'कडे नव्हता. तर्काने शोधून त्यांनी हव्या त्या दर्जाचे वॉशर्स बनविले. आठ कसोट्यांतून पार पडून प्रॉडक्‍ट "ऍप्रूव्ह' केले. कुठून तरी चक्रे फिरली आणि प्रत्यक्ष ऑर्डर वेगळ्याच कंपनीला मिळाली. मेहनत यांनी घेतली आणि यांच्या तपशील व प्रोजेक्‍ट रिपोर्टवर संबंधित कंपनीने त्यांच्या स्वतःच्या मित्राला ती ऑर्डर दिली! त्यानंतर आपण या प्रॉडक्‍टवर घेतलेल्या मेहनतीची माहिती देत त्या ऑर्डरमधील काही भाग यांनी परत मिळविला. असाच प्रयोग त्यांनी मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये वापरल्या जाणाऱ्या; उच्च तापमानालाही न वितळणाऱ्या "पॉलीइथर सल्फेन' प्रकारच्या प्लॅस्टिकपासून बनविल्या जाणाऱ्या रिंगचा केला. उच्च तापमानालाही न वितळणाऱ्या "पॉलीइथर सल्फेन' या दर्जाच्या प्लॅस्टिकवर काम करताना तापमानात किंचितही फरक पडला, तर हे प्लॅस्टिक मोल्डमध्येच अडकते आणि मोल्ड निकामी होऊन तीन-चार हजारांचा फटका बसतो. हे आव्हान त्यांनी स्वीकारले. पुढे हे काम त्यांच्या कौशल्याचा मानबिंदू ठरला. "पॉलीइथर सल्फेन'वर काम करतो हे कळले, की समोरच्यांचे सर्व प्रश्‍न संपत. अशीच गोष्ट रिक्षांच्या साइड ग्लासची. बजाज रिक्षाच्या दर्शनी भागातील ऍक्रेलिकच्या वक्राकार साइड विंडो ते ऍक्रिलिकमध्ये बनवतात. "बजाज'ने हे साइड ग्लास तीनऐवजी एकाच ठिकाणाहून मागवायचे ठरवले. "व्हेरॉक'ने ही संधी संजय प्लॅस्टिकला देऊ केली. ती संधी घ्यायचे या दोघांनी ठरवले; पण ऍक्रिलिक वक्राकारात मोल्ड करण्याचे तंत्रज्ञान मिळेना. अखेर स्वतःच विकसित केलेल्या तंत्राने त्यांनी हे साइड ग्लास बनवण्यात महिनाभराच्या मेहनतीने यश मिळविले. हे तंत्र त्यांचे "ट्रेड सिक्रेट' आहे. उत्कृष्ट फिनिशिंग आणि आत पूर्वी येणारे बुडबुडे न येणे यांच्या जोरावर त्यांनी यात "झीरो रिजेक्‍शन'चा मान मिळविला. ते सध्या दरमहा 45 हजार जोड्या पुरवतात! पॉली अमाईड प्लॅस्टिकपासून तयार करण्यात येणारे अर्धा सेंटिमीटर व्यासाचे अगदी छोटे प्लॅस्टिक पार्ट हेही त्यांचे एक ठळक उत्पादन! अशी ही सारी वेगवेगळी चॅलेंजेस घेऊन निर्मिलेली "हाय रिस्क' उत्पादने. अशा रिस्कमधूनच त्यांनी सातत्याने नवनवी आव्हाने स्वीकारली आणि उद्योगांचा विस्तार केला.

औरंगाबादेतील, तसेच औरंगाबादबाहेरील व्हेरॉक ग्रुप, व्हिडिओकॉन, सीके डायकिन, फ्रॅंके इंडिया प्रा. लि., साऊथ एशिया टायर्स, इना बेअरिंग्ज, केनस्टार, रोहित इंडस्ट्रीज असे मोठे उद्योग "संजय प्लॅस्टिक'शी जोडले जात होते. कामाचा दर्जा अत्युच्च राखण्यासाठी त्यांनी 2000 मध्येच आयएसओ मिळविले. तेही "फ्रेंडली ऑडिट' न करता! याच दरम्यान 2001 मध्ये त्यांनी व्हेरॉक ग्रुपच्या आग्रहावरून स्वतःचा अद्ययावत पेंट बूथ उभारला. एलजी कंपनीचा हा पेंट बूथ डस्ट फ्री आहे. या जिद्दी जोडगोळीने तो 40 दिवसांत उभारला आणि काम सुरू केले. 2006 मध्ये या पेंटबूथमध्ये भर पडली कन्वराइज्ड पेंट बूथची. यामुळे बजाजच्या सर्व वाहनांचे चेन कव्हर्स, प्लॅस्टिक पार्ट आदींच्या पेंटची सर्व कामे इथेच होतात! एन्ड्युरन्स ग्रुपसाठी त्यांनी प्लॅस्टिक पार्ट तर बनवलेच; पण थ्री व्हिलरसाठी ब्रेक शू असेंब्लीचा पुरवठा सुरू केला. फक्त सहा महिन्यांत त्यांनी अपेक्षित उत्पादनाचा टप्पा पार केला.

याच वाटचालीत 2003-04 मध्ये "संजय प्लॅस्टिक'चे रूपांतर "संजय टेक्‍नोप्लास्ट प्रा. लि.'मध्ये झाले. विस्तार वाढत होता. नवनव्या स्ट्रीम्स जोडल्या जात होत्या. मराठवाड्यातील पहिली सरफेस कोटिंग टेस्टिंग लॅब त्यांनी जून 2004 मध्ये उभारली. "बजाज'ने मंजुरी दिलेल्या या लॅबमुळे या भागातील उद्योजकांना या टेस्टिंगसाठी पुण्याची वाट धरण्याची गरज राहिली नाही; उलट रांजणगावहूनही काही कामे इथे येऊ लागली! 2006 पासून कामांचा विस्तार वेगाने सुरू झाला. नवनवी युनिट्‌स उभी राहू लागली. बजाजच्या आकुर्डी प्लॅंटसाठीच्या ऑर्डरमध्ये मोठी वाढ होऊ लागली आणि तेथील पुरवठ्याबरोबरच इतर विस्ताराच्या दृष्टीने त्यांनी रांजणगाव येथे नवीन युनिट उभारण्याचा निर्णय घेतला. कामाच्या सोयीसाठी त्यांनी औरंगाबादमधील तीन युनिटला "संजय टेक्‍नोप्रॉडक्‍ट्‌स' या नावाने एकत्र केले; तर पुण्यातील रांजणगावचे दोन प्लॅंट "संजय टेक्‍नोप्लॅंट' या नावाने चालतात. औरंगाबादेतून व्हेरॉक, एन्ड्युरन्स, एक्‍सीडी कॉर्पोरेशन, कुमार इंडस्ट्रीज, विप्रो या कंपन्यांना सुटे भाग बनवून दिले जातात; तर रांजणगाव येथून डेल्फाय, सुब्रोज, टाटा व्हिस्टिऑन, व्हिस्टिऑन, ड्यूरा, व्हेरॉक, एन्ड्युरन्स मॅग्नेटी मरेली, लिअर, फर्स्ट इनर्जी एवढ्या कंपन्यांना पुरवठा होतो.

रांजणगावचा प्लॅंट उभारताना अनेक आव्हाने समोर आली, त्यांतील सर्वांत मोठे आव्हान होते ते दोन शहरांतील एकंदर पाच प्लॅंटवर लक्ष कोण आणि कसे ठेवणार? औरंगाबादच्या तीन प्लॅंटवरील लक्ष कमी करणे त्यांना शक्‍य नव्हते. अशा स्थितीत ही क्षमता असलेल्या पण नोकरीत "अडकलेल्या' सुनील पाठक यांना मैदानात उतरविण्यासाठी दोघांनी कंबर कसली. बऱ्याच चर्चेअंती सुनील पाठक त्यांची नोकरी सोडून "संजय'ला औरंगाबादेत येऊन जॉईन होण्यास तयार झाले. त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या; पण त्याच वेळी रांजणगावात पूर्ण वेळ लक्ष घालण्यासाठी कोणी तरी पुण्यात मुक्कामी राहणे आवश्‍यक होते. इतर दोघांची घरे औरंगाबादेत बांधून झाली होती, त्यामुळे पाठक यांनी पुण्यात थांबायचे ठरले आणि ते दिल्लीतून थेट पुण्यात जाऊन काम सांभाळू लागले. त्यांच्या येण्याने ग्रुपची ताकद आणखी वाढली. आता "पंतनगर' येथे प्रकल्प उभारणी सुरू आहे. व्हेरॉक व एन्ड्युरन्स या दोन कंपन्यांना तेथून पुरवठा होणार आहे. जानेवारी 2012 मध्ये येथील कामकाज सुरू होईल. ही उभारणी करण्यासाठी कोकीळ लक्ष घालीत आहेत. महिन्यातील बराचसा काळ ते तेथेच असतात.

आपापल्या क्षेत्रातील योगदानाबरोबरच या उद्योगात इतरही अनेक चांगले उपक्रम राबविण्यात येतात. दैनंदिन प्रार्थना, वार्षिक स्नेहसंमेलने याद्वारा आपल्याकडील कामगार-कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करतात. मनुष्यबळ विकासाच्या अनेक अभिनव प्रयोगांची अंमलबजावणी त्यांनी केलेली आहे. "माणूस येईल तसा घ्या आणि त्याला हवा तसा घडवा' हे त्यांचे सूत्र. यातूनच अनेक अर्धशिक्षित माणसे येथे आज उत्तम जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. त्यांच्यातील "हुनर' ओळखून प्रोत्साहन देण्याचे काम येथे होते. याच कंपनीने केंद्राच्या अखत्यारीतील "युनिडो' हा व्यवस्थापन विकसन कार्यक्रम अमलात आणला. यामध्येही त्यांनी राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी बजावली. त्याची दखल घेत त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांची यशोगाथा सर्वांसमोर मांडण्याची संधी मिळाली. या दोन्ही परिषदा दिल्लीत झाल्या होत्या. या तीन पार्टनरपैकी विशेषत्वाने प्रसाद कोकीळ यांचा अशा प्रकारच्या मनुष्यबळ विकासाच्या योजनांमध्ये पुढाकार असतो. ते स्वतः सर्जनशील कवी आणि कल्पक लेखक आहेत. विविध सामाजिक उपक्रमांमध्येही ते अग्रेसर असतात.

"इको कुकर' आणि "बायोमास स्टोव्ह' ही त्यांची आणखी दोन उत्पादने आहेत. इंधनटंचाईच्या आजच्या काळात ऊर्जाबचतीचे प्रयोग करणारी ही दोन साधने खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्‍नॉलॉजी (जुने यूडीसीटी) आणि लॅंड रिसर्च इन्स्टिट्यूट (एलआरआय) यांच्यासोबत मिळून त्यांनी "इको कुकर' विकसित केले असून, तीन विविध क्षमतांचे हे कुकर या वर्षीच्या दिवाळीपासून मार्केटमध्ये लॉंच होतील. दुसरे एक महत्त्वाकांक्षी उत्पादन आहे ते "बायोमास स्टोव्ह'चे. याची सुरवात 2005 मध्ये झाली आणि 2006 पासून त्याचे उत्पादनही सुरू झाले. "ब्रिटिश पेट्रोलियम'चे पेटंट असलेल्या या स्टोव्हच्या निर्मितीसाठी त्या कंपनीने "टाटा'पासून अनेक कंपन्यांचे सर्वेक्षण केले आणि अखेर "संजय टेक्‍नोप्लास्ट'च्या गळ्यात ही माळ पडली. प्रत्यक्ष कामकाजाच्या प्रक्रियेत व्यवस्थापनाचा भरीव सहभाग, हा या संधीमागील सर्वांत कळीचा मुद्दा ठरला. याला लवकरच वेग येईल.

अखेरीस मुद्दा येतो उलाढालीचा. सुरवातीपासून दर वर्षी त्यांनी आधीच्या वर्षीच्या दुप्पट, असे टार्गेट ठेवले आहे. त्यानुसार ही वाटचाल सुरू आहे. अशा उलाढालीसाठी आवश्‍यक असणारी नवनव्या वाटा चोखाळण्याची तयारीही त्यांनी ठेवली आहे. सध्या साधारण 75 कोटींपर्यंतची त्यांची उलाढाल लवकरच 125 कोटींची मर्यादा उल्लंघून जाईल, अशी चिन्हे आहेत. पंतनगरचा प्रोजेक्‍ट सुरू होताच पहिल्याच वर्षापासून 40 कोटींची उलाढाल त्यांना अपेक्षित असून, यादरम्यान उर्वरित प्रकल्पांमध्ये नैसर्गिक वाढीचा वेग लक्षात घेऊन साधारण दहा कोटींची किमान वाढ ते अपेक्षित धरतात.

त्यांच्या यशाचे, भरभराटीचे गुपित काय? नवनव्या तंत्रज्ञानाची मोठी भूक! नवे तंत्रज्ञान स्वीकारणे, त्यावर प्रयोग करणे, हे महत्त्वाचे. त्यातून बिझनेस वाढत असेल तर तो बायप्रॉडक्‍ट. पैसा ओघाने येतो, पैशासाठी काम करायचे नाही, हा ठाम विचार. आर्थिक व्यवहारही सरळ-स्वच्छ. चेकनेच, नियोजनात नेमकेपणा, अंमलबजावणीत कणखरपणा, या त्रिसूत्रीनुसार आधी दोघांनी मिळून आणि आता तिघेही उत्तम प्रकारे एकजुटीने कार्यरत आहेत. या वाटचीलात तिघेही आपापल्या पत्नी डॉ. स्वाती शिरडकर, सौ. मनीषा कोकीळ आणि सौ. तृप्ती पाठक यांना श्रेय देतातच, त्याचबरोबर या वाटचालीत ज्यांची प्रेरणा मिळाली असे (कै.) लक्ष्मीकांत कोकीळ, चार्टर्ड अकौंटंट व्ही. डी. देशमुख, अशोक पाटील यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतात. आता महत्त्वाकांक्षा कुठली? तिघांचे यावरही एकमत आहे. ते म्हणतात "समाजाने आम्हाला मोठे केले, शिकवले, कमावते केले. समाजातील काही घटकांना उदरनिर्वाहाचे साधन देणे आणि ही संख्या वाढवत नेणे, हा आता संकल्प.'' प्रसाद कोकीळ यांच्याच शब्दांत सांगायचे तर
यशाचे सोपान अनुभवताना पायाखालच्या जमिनीचे भान हवे
विस्तारत जावे वटवृक्षासारखे; पण सावली द्यायचे ज्ञान हवे...

आत्मविश्‍वास वाढविणारे प्रयोग 
  • मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये वापरल्या जाणाऱ्या; उच्च तापमानालाही न वितळणाऱ्या प्लॅस्टिक रिंगची निर्मिती
  • बजाज रिक्षाच्या साइड विंडो बनविण्यासाठी ऍक्रिलिक वक्राकारात मोल्ड करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले.
कामगार घडविण्याचे सूत्र 
  • माणूस येईल तसा घ्या आणि त्याला हवा तसा घडवा.
  • प्रत्येकाला काय जमेल, हे ओळखूनच कामाचे वाटप
  • कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी नियमित उपक्रम
ऊर्जा बचतीतही अग्रेसर 
  • "इको कुकर' आणि "बायोमास स्टोव्ह' ही दोन इको फ्रेंडली प्रॉडक्‍ट
बिझनेस वाढीचे तंत्र 
  • पुढच्या वर्षीची उलाढाल आधीच्या वर्षापेक्षा दुप्पट हवी, हेच टार्गेट
  • नवे तंत्र स्वीकारणे व सातत्याने प्रयोग करणे.
  • नेमके नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणी
  • सर्व व्यवहार चेकने करणे.
जोडल्या गेलेल्या कंपन्या 
बजाज
व्हेरॉक ग्रुप
विप्रो
व्हिडिओकॉन
सीके डायकिन
फ्रॅंके इंडिया प्रा.लि.
साउथ एशिया टायर्स
केनस्टार
इना बेअरिंग्ज
रोहित इंडस्ट्रीज 

- दत्ता जोशी
9225309010