Friday, July 1, 2011

विद्यमान महोत्सव समितीच्या बरखास्तीचीच गरज

 `दैनिक लोकमत` च्या `हेलो औरंगाबाद` मध्ये दर शुक्रवारी प्रकाशित होत असलेल्या 'संस्कृती, साहित्य वगैरे' या स्तंभात १ जुलै २०११ रोजी प्रकाशित झालेला हा लेख. 
.......................................
कोणताही महोत्सव त्या त्या शहराचा सांस्कृतिक चेहरा असतो. मागची तीन वर्षे हा चेहराच हरवला आहे. सन 1986 ते 2007 असा 21 वर्षांचा वारसा असताना आणि त्यातील 6 वर्षे या महोत्सवाचा चेहरामोहरा बदलत त्याला ‘लोकोत्सवा’चे स्वरूप येत असताना सलग तीन वर्षे महोत्सवच न होणे आणि चौथ्या वर्षीही अद्याप हालचालही नसणे हा वेरूळ-अजिंठा महोत्सव समितीच्या अकर्मण्यतेचा कळस आहे. प्रशासकीय अधिकारी, उद्योजक आणि इतर व्यावसायिक यांचा समावेश असलेली ही समिती नेमके काय करते, याचा थांग लागत नाही. मागील तीन - चार वर्षांत औरंगाबादच्या तुलनेत छोट्या छोट्या शहरांत महोत्सवांचे आयोजन सुरू झाले आहे. कोल्हापूर, सिंधुदुर्ग, चंद्रपूर एवढेच नव्हे तर लातूरमध्येही असा महोत्सव साजरा झाला. ही छोटी शहरे अशी आयोजने सहजपणे करू शकत असतील, तर इथे ते अशक्य का व्हावे?

पर्यटनाला चालना देण्याच्या उदात्त हेतूने ‘एमटीडीसी’च्या माध्यमातून 1986 मध्ये वेरूळच्या कैलास लेण्यांच्या पायथ्याशी सर्वप्रथम वेरूळ महोत्सवाचे आयोजन झाले. मात्र प्रत्यक्षात पर्यटनाला चालना मिळण्याऐवजी तेथे फुकटेगिरीलाच चालना मिळाली आणि अल्पावधीतच ‘फुकट्यां’चा महोत्सव म्हणून हे आयोजन नावारूपास आले. विविध खात्यांतील व विभागातील बडे अधिकारी, अधिकार्‍यांच्या मर्जीतील ‘सरकारमान्य’ रसिक आणि काही प्रमाणात तिकिटे काढणारा वर्ग यांच्या साक्षीने हा महोत्सव रंगत असे. अनेक बडे कलाकार महोत्सवात आपली कला सादर करीत पण सामान्य रसिकजन तेथे पोहोचू शकत नसे.
हा महोत्सव ‘लोकोत्सव’ व्हावा, या दृष्टीने तो औरंगाबादेत हलविण्याचा निर्णय झाला. सन 2002 मध्ये पहिल्यांदा ‘सोनेरी महल’च्या ऐतिहासिक वास्तुमध्ये ‘वेरूळ अजिंठा महोत्व औरंगाबाद’ या नव्या नावाने हा महोत्सव साजरा झाला. तत्कालीन विभागीय आयुक्त श्री. व्ही. रमणी, जिल्हाधिकारी व्ही. राधा आणि विविध स्थानिक मान्यवरांच्या प्रयत्नांनी हे स्थलांतर यशस्वीपणे पेलले गेले. त्यानंतर श्री. कृष्णा भोगे, श्री. संजयकुमार यांनीही महोत्सव यशस्विरित्या चालू ठेवला. सन 2008 मध्ये महोत्सव सुरू होण्याच्या आधीच्या रात्री मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा महोत्सव प्रारंभी स्थगित आणि नंतर रद्द करण्यात आला. त्यानंतर आजतागायत महोत्सवाचे आयोजन झालेले नाही. 

हा महोत्सव रद्द झाला, तेव्हा  विभागीय आयुक्तपदी (आणि समितीच्या अध्यक्षपदी) श्री. दिलीप बंड होते तर जिल्हाधिकारी व आयोजन उपसमितीचे अध्यक्ष असलेले श्री. संजीव जयस्वाल यांनी त्या आयोजनात पुढाकार घेतला होता. 2009 मध्ये ‘स्वाईन फ्लू’चे कारण देण्यात आले. त्या वेळी जिल्हाधिकारीपदी श्री. जयस्वाल हेच होते तर आयुक्तपदी श्री. भास्कर मुंढे रुजू झालेले होते.  2010 मध्ये श्री. भास्कर मुंढे कायम राहिले आणि जिल्हाधिकारीपदी श्री. कुणाल कुमार बदलून आले. त्यांनी आल्या आल्या बैठका घेऊन महोत्सव आयोजण्याच्या हालचाली सुरू केल्या पण पुढे काहीच झाले नाही.

हे सारे सांगण्याचे कारण म्हणजे शासकीय अधिकार्‍यांच्या पुढाकाराशिवाय या महोत्सवाचे पान हलू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ही परिस्थिती योग्य आहे, की नाही हा चर्चेचा विषयच होऊ शकत नाही. सन 2007 पर्यंतच्या काळातील महोत्सवाचा एकंदर खर्च असायचा सुमारे 70 लाख. असे मोठे आयोजन फक्त तिकिट विक्रीतून यशस्वी होऊ शकत नाहीत. आजवरच्या आकडेवारीनुसार महोत्सवाची जास्तीत जास्त तिकीटविक्री जेमतेम 8 ते 10 लाख रुपयांचीच होती. उरलेला पैसा प्रायोजकत्वातून उभा करावा लागतो. मधल्या काळातील वाढलेली महागाई पाहता आता या वर्षी कदाचित हा खर्च 90 लाखांच्यावर जाऊ शकेल. आयोजन समितीत आयुक्त - जिल्हाधिकारी यांचा समावेश असल्यामुळे हा पैसा उभा करणे शक्य असते. अन्यथा इतर कोणाला हा पैसा उभारणे सहजासहजी शक्य नाही.

एलिफंटा महोत्सव, बाणगंगा महोत्सव, कालिदास महोत्सव या सारखे उपक्रम पूर्णतः स्वबळावर साजरे करणार्‍या ‘एमटीडीसी’ची वेरूळ अजिंठा महोत्सवाबद्दलची उदासीनता कोड्यात टाकणारी आहे. जवळजवळ 60 ते 70 लाखांचा खर्च असलेल्या वेरूळ-अजिंठा महोत्सवासाठी ‘एमटीडीसी’ कडून आजवर दर वेळी तब्बल पाच लाख रुपयांची ‘मदत’ करते ! ज्या शहराच्या सांस्कृतिक जीवनाचा भाग म्हणून हा महोत्सव होतो त्या औरंगाबाद महापालिकेकडून साधारणपणे दीड ते दोन लाखांची ‘प्रचंड’ मदत मिळत असते. नगरसेवक आणि कंत्राटदारांच्या घशात ओतण्यासाठी महापालिकेकडे कोट्यवधींची माया आहे, पण या सांस्कृतिक उपक्रमासाठी त्यांच्याकडे बजेटच नसते म्हणे!

सांगण्यासारखी आणखी एक बाब म्हणजे ‘महोत्सव समिती’. हे एक न उलगडणारे कोडेच आहे. ज्या क्षेत्राचा हा महोत्सव आहे, त्या संगीत, कला क्षेत्रात अधिकारी असणारी एकही व्यक्ती या समितीत नाही! काही मोजके सन्माननीय अपवाद वगळले, तर ही मंडळी गणेश मंडळांच्या कार्यकारिणीवरही नियुक्त होण्याच्या योग्यतेचे मानता येणार नाहीत. ही वाक्ये कठोर वाटतील, पण याचे प्रत्यंतर त्यांच्या मागील तीन वर्षांच्या अकर्मण्यतेतून आलेले आहे!

या परिस्थितीत विद्यमान आयोजन समिती संपूर्णतः बरखास्त करणे करून नव्या दमाच्या समितीकडे सूत्रे सोपविली तर महोत्सवाची परंपरा सुरळीत राहू शकेल. यामध्ये काही मोजक्या सदस्यांवर अन्याय होईल, पण सुक्याबरोबर ओलेही जळते! जुन्या समितीमधील त्रुटी या निमित्ताने दूर करता येतील. नाट्यसंमेलनाचे माजी अध्यक्ष दत्ता भगत, पं. नाथराव नेरलकर, आशालता करलगीकर, विश्वनाथ ओक, डॉ. शुभदा पराडकर यांच्यासारखे अनुभवी लोक शहरात आहेत. अशा चेहर्‍यांचा समितीत समावेश करून या महोत्सवात व्यापकत आणता येईल. 

28 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2008 या दरम्यान होणार्‍या पण मुंबईतील हल्ल्यामुळे रद्द कराव्या लागलेल्या महोत्सवात पहिल्या दिवशी हेमामालिनी यांच्या सोबतच त्यांच्या कन्या ईशा आणि आहना देओल यांचा कार्यक्रम ठरविण्यात आला होता. पं. भीमसेन जोशी यांचे पुत्र श्री. श्रीनिवास जोशी यांचे शास्त्रीय गायन आणि विख्यात सतार वादक शुजाअत हुसेन खॉं यांचे सतारवादन ठरलेले होते. दुसर्‍या दिवशी ध्रुपद शैलीतील विख्यात गायक बंधू उमाकांत आणि रमाकांत गुंदेचा यांचे गायन, मोहनवीणेवर (गिटार) शास्त्रीय संगीत सादर करणारे पं. विश्वमोहन भट्ट आणि गझल गायक रुपकुमार आणि सोनाली राठोड यांचा कार्यक्रम ठरलेला होता. 30 नोव्हेंबर रोजी सुगतो भादुरी यांच्या मेंडोलीन वादनानंतर ‘मराठी बाणा’ हा अशोक हांडे प्रस्तुत कार्यक्रम ठरलेला होता. याशिवाय स्थानिक कलाकारांमध्ये 1 डिसेंबर रोजी लातूर येथील शास्त्रीय गायक खंडेराव कुलकर्णी, औरंगाबाद येथील ‘कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने गुरू श्रीमती मुक्ता सोमण यांच्या शिष्यवृंदाचे भरतनाट्यम आणि परभणीचे गायक यज्ञेश्वर लिंबेकर यांच्या सुगम गायनाचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी स्थानिक कलाकार वगळता प्रत्येकाला ऍडव्हान्स रक्कम पोहोचती झाली आहे. या वर्षीच्या त्यांच्या तारखा मिळवून त्यांना निमंत्रित करता येईल. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यातील आयोजनासाठीची तयारी जुलैपासून करणे आवश्यक ठरते. राष्ट्रीय पातळीवरील वरील कलाकारांच्या तारखा नव्याने मिळविण्यासाठी हा वेळ पुरेसा आहे.

हाती असलेल्या माहितीनुसार महोत्सवाची सध्याची गंगाजळी 50 ते 60 लाखांची आहे. दिलेले ऍडव्हान्सेस आणि सध्याची गंगाजळी एवढ्यात या वर्षीचे आयोजन तरी नक्कीच होईल. हवे तर पूर्वरंग, विविध स्पर्धा, कलाग्राम हे खर्च वाढविणारे उपक्रम या वर्षी रद्द करावेत. असे केल्यास या वर्षीचा महोत्सव पार पडून पुढील वर्षीसाठीही गंगाजलीतील पैसा उरू शकेल. 

सन 2006 ते 2008 या काळात पुण्याच्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या आयोजनाचा अनुभव महोत्सवाने घेतला. त्याचा किती फायदा झाला, हे पारदर्शीपणे ठरविण्याची गरज आहे. निधी संकलनात तर त्यांचा काहीही फायदा झाला नाही, हे उघड सत्य आहे. आयोजनातील सर्व सेवा औरंगाबादकरांनीच पुरविल्या होत्या. मग या संस्थेने केले तरी काय? याउलट यापुढे स्थानिक व्यक्ती-संस्थांना प्रोत्साहन देण्याचे धोरण ठेवले तर समितीचा फायदा होईल आणि शहरात नवी पिढी तयार होईल.

इथे स्वतंत्रपणे आयोजने करणारी आरती पाटणकर, विश्वनाथ दाशरथे, दिलिप खंडेराय, राजेंद्र परोपकारी, जयंत नेरळकर, सचिन नेवपूरकर, शोण पाटील, शरद दांडगे यांच्यासारखी संगीत - नाट्य क्षेत्रात कार्यरत असणारी मंडळी आहे. एखाद्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीवर पैसा उधळण्याऐवजी यांची मदत प्रत्यक्ष आयोजनात घेता येऊ शकते. यातील व्यवहाराचा भाग समोरासमोर बसून ठरवता येऊ शततो. अशा उपाययोजनांनी समितीला आणि आयोजनालाही नवा चेहरा देता येऊ शकतो. आयोजनाचा अगडबंब खर्च कमी करण्यासाठीही उपाय योजता येऊ शकतात.

या वर्षीचा महोत्सव घ्यायचाच, असे ठरविले तर हा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडणे अजिबात अवघड नाही, हे नक्की. याची जबाबदारी कोण घेणार?

- दत्ता जोशी