नवी पिढी कर्तबगार आहे. नव्या काळाची आव्हाने पेलण्याची ताकद त्यांच्या पंखात निश्चितपणे आहे. आजच्या ‘दिशाहीन’ नव्या पिढीबद्दल सगळीकडूनच ओरडा चालू असतो. दुढ्ढाचार्यांकडून शेलकी विशेषणे वापरली जातात. नवी पिढी अकर्मण्यतेमध्ये अडकल्याचे सांगितले जाते. पण ही वस्तुस्थिती आहे का?
असे असते, तर देश कधीच रसातळाला गेला असता. देश ज्यातून उभा राहतो, त्या शेती आणि उद्योगात ही नवी पिढी पाय रोवून उभी आहे... नवे बदल करते आहे... 100 टक्के सेंद्रीय शेतीद्वारे प्रगतीच्या नव्या वाटा शोधता येतात, हे सिद्ध करते आहे. शेतीउत्पादनांवरील प्रक्रियेकडे वळते आहे. स्वतःच्या विकासासोबत परिसराचा विकास करणे, शेतीमालाच्या उत्पादनाबरोबरच प्रक्रिया उद्योगावर भर देणे, तसे उद्योग प्रत्यक्षात उतरवून शेतकर्यांचे जीवनमान सुधारणे, या गोष्टी तेथे घडत आहेत.
***
रासायनिक खत आणि कीटकनाशकांचे घातक आणि प्रदीर्घ काळचे दुष्परिणाम लक्षात आल्यानंतर मागील शेकडोे वर्षे ज्या पद्धतीची शेती पिकत होती आणि त्या सेंद्रीय पद्धतीच्या आधारावरच भारत जगात अग्रेसर होता, तो प्रवाह परत एकदा शेतीमध्ये दिसतो आहे. फक्त खतेच नव्हे, तर कीटकनाशकांमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन, आंतरपिकांच्या माध्यमातून कीडींचे व्यवस्थापन, या गोष्टींकडे तो लक्ष देतो आहे.
उद्योग उभारणे ही नव्या व्यवस्थेत सोपी गोष्ट ठरली आहे, पण तो यशस्वीपणे चालविणे ही बाब महाकठीण बनते आहे. सरकारची धोरणे आणि सरकारी अधिकार्यांची लाचखोरी या मुळे सारे उद्योग क्षेत्रच अडचणीत आलेले आहे. तरीही हे उद्योगक समन्वयाने मार्ग काढत परिस्थितीवर मात करीत आहेत. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून फिरताना मला हे आशादायक चित्र दिसले. माझ्या पुस्तकांतून ते मी रंगविले आहेच, पण इथेही ते संक्षेपाने दिले पाहिजे असे मला वाटते...
**
मुक्काम बारीपाडा, जि. धुळे ः नाव - चैतराम पवार, व्यवसाय ः शेती, पर्यावरण रक्षण आणि ग्रामविकास
मुक्काम जामनेर ः नाव - पद्माकर चिंचोले, व्यवसाय ः शंभर टक्के सेंद्रीय शेती
मुक्काम नंदुरबार ः नाव - अनिल पाटील, व्यवसाय ः शेतकर्यांना लागणार्या सर्व फळपिकांची नर्सरी
मुक्काम जवळे, ता. पारनेर ः नाव - रामदास घावटे, व्यवसाय - टिश्यूकल्चर केळीची रोपे विकसित करणे
मुक्काम जळगाव ः नाव - उमेश सोनार, व्यवसाय ः इन्डोस्कोपीची ‘इंपोर्ट सबस्टिट्यूट’ यंत्रे तयार करणे.
मुक्काम सांगली ः नाव - मकरंद काळे, व्यवसाय ः आयुर्वेदिक पद्धतीने बुलेटप्रुफ जाकिटांची निर्मिती करणे.
मुक्काम कवठे महांकाळ ः नाव - देवानंद लोंढे, व्यवसाय ः ‘इंडस्ट्रियल हँडग्लोव्हज’ जपानला निर्यात करणे.
मुक्काम जालना ः नाव - नितीन काबरा, व्यवसाय ः अद्ययावत लोखंड निर्मिती कारखाना उभा करणे
मुक्काम नगर ः नाव - दिनेश निसंग, व्यवसाय ः वैज्ञानिक पिढीच्या निर्मितीसाठी ‘संडे सायन्स स्कूल’
मुक्काम देगलूर ः नाव - भार्गवी दीक्षित, व्यवसाय ः महिलांसाठी व्यायामशाळा उभी करणे
मुक्काम सातारा ः नाव - सायली मुतालिक, व्यवसाय ः सिक्युरिटी एजन्सी व जॉब कन्सल्टन्सी
**
ही यादी शेकडो नावांची भर पडत वाढू शकते. राज्यात गावोगाव, प्रत्येक जिल्ह्यात उत्तम पद्धतीने काम करणारी माणसे आहेत. वर उल्लेख केलेल्या व्यक्तींचा वयोगट साधारणपणे 35 ते 48 आहे. तशा अर्थाने ही नवी पिढी. उद्योग आणि शेती या व्यवसायांत उल्लेखनीय काम करणार्या या सर्वांना मी भेटलो, बोललो; तेव्हा माझ्या असे लक्षात आले, की अभिनव संकल्पनांनी रसरसलेली ही मंडळी आपल्या परिसरात नवे प्रवाह जन्माला घालत आहेत. शून्यातून विश्व निर्माण करण्याची धमक त्यांच्यात आहे. आपल्यातील कौशल्याचा शंभर टक्के वापर करून त्यांनी स्वतःला घडविले. या आणि अशा काही निवडक व्यक्तींशी मला तुमची भेट घालून द्यायची आहे.
**
साधारण 1970 च्या दशकात भारतात ‘हरितक्रांती’ची बिजे पेरली गेली. एकेकाळी अमेरिकेतून सडका मिलो गहू मागविणारा भारत त्यानंतर या आघाडीवर स्वयंपूर्ण ठरला. संकरित बियाण्यांनी जशी ही क्रांती घडवून आणली, तशीच त्यामागे रासायनिक खतांची भूमिकाही अतिशय महत्वाची होती. पारंपरिक शेणखत, कंपोस्टच्या तुलनेत ही खते आणणे, वापरणे आणि भरघोस उत्पन्न मिळविणे शेतकर्यांना सोपे वाटले. पण काही दशकांतच हे चित्र पालटले. कृत्रिम उत्तेजके घेऊन आपले स्नायू बलदंड करणार्या पहेलवानाप्रमाणे शेतीची स्थिती झाली. धाडसी विधान करायचे झाले, तर रासायनिक खतांनी शेतकर्यांना आळशी बनविले आणि त्याच वेगाने शेतीला नापिक. प्रारंभीच्या काळात भरघोस उत्पादने देणारी जमीन कालांतराने अति प्रमाणात खते आणि कीटकनाशके मागू लागली. ती खारपड होत गेली. नापिकीची वेळ आली. जमिनीतील घटकद्रव्ये लयाला गेली. ही सारी निरीक्षणे विविध शास्त्रीय चाचण्यांतून मांडली गेली आणि त्यानंतर शेतीच्या पुनर्मांडणीची सुरवात झाली. जी शेती भारतात गेली अनेक शतके निर्विवादपणे टिकली, ज्या शेतीप्रधान अर्थव्यवस्थेने भारताला वैभवाच्या परमोच्च शिखरापर्यंत पोहोचविले होते, ती शेती कालबाह्य कशी ठरू शकते? या दृष्टीतून विचारमंथनास सुरवात झाली. कृतीला प्रारंभ झाला आणि सेंद्रीय शेतीचा सोनेरी काळ परत अवतरण्याची सुचिन्हे निर्माण झाली.
**
उद्योजकतेची स्थिती सुद्धा अशीच आहे. भारत कधीही एक देश नव्हता, अशी वैचारिक मांडणी करणार्यांच्या निष्कर्षांमध्ये राजकीय दृष्टीतून पाहिले तर तथ्य दिसू शकते, पण या देशाची भावनात्मक एकात्मता, राष्ट्रीय दैवतांना सन्मान देण्याची वृत्ती, ग्रामीण व्यवस्थेवर आधारित स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था याकडे लक्ष देणार की नाही? जातीव्यवस्थेच्या उतरंडीकडे वेगळ्या नजरेने पाहणार की नाही?
एकेकाळी रुजलेली बारा बलुतेदारीची पद्धती ही बारा प्रकारचे उद्योग होते आणि हा उद्योगाधिष्ठित समाज हेच भारताचे बलस्थान होते, या कडे आपण का लक्ष देत नाही? गांधीजींनी ग्रामस्वराज्याची, स्वयंपूर्ण खेड्यांची संकल्पना मांडली, ‘खेड्याकडे चला’चा मंत्र दिला. त्यातून त्यांना स्वयंपूर्ण भारत अपेक्षित होता. पण चुकीच्या विकास संकल्पनांनी देश खोट्या स्वप्नांच्या मागे धावला. बरे, या धावपळीत तो स्वत्व विसरला...!
नेतृत्वाच्या कणाहीन आणि दूरदृष्टीचा अभाव असलेल्या वृत्तीमुळे त्यांनी संचालित केलेल्या यंत्रणेत भ्रष्टाचाराचा भस्मासूर वेगाने कार्यरत झाला. सारा देश गिळण्याची क्षमता असलेल्या या भस्मासुराने देशालाच वेठीला धरले. राष्ट्रीय वृत्तीचा अभाव असलेल्या नोकरशाहीने देशाच्या हितापेक्षा स्वहिताला प्राधान्य दिले. यातून त्यांचे बंगले उभे राहिले, संपन्नता आली... पर्यायाने राजकारणात सक्रीय असलेल्या व्यक्तींच्या आर्थिक स्थितीतही अनैसर्गिकपणे वाढ झाली. पण या संपन्नतेचे समाजाला काहीही वाटेनासे झाले! ‘तुला जे घ्यायचे ते घे, पण माझे काम करून दे’, एवढी वस्तुस्थिती समाजाने स्वीकारली. त्याचेच प्रतिबिंब उद्योग क्षेत्रातही उमटले.
भारतात 1991 नंतर मुक्त अर्थव्यवस्था आल्याचे ढोल जोरजोराने पिटले गेले. नव्या व्यवस्थेत उद्योग सुरू करणे सोपे झाले. जुन्या परवानापद्धती, कोटा पद्धती बंद झाल्या. ‘बजाज’ने किती स्कूटर तयार करून विकायच्या हे सरकारच्या नव्हे, तर कंपनी आणि ग्राहकांच्या क्षमतेवर ठरू लागले. हा बदल स्वागतार्ह होता. पण प्रगतीत खोडा घालण्याच्या, वैयक्तिक स्वार्थापुढे देशहित क्षुल्लक समजणार्या व्यवस्थेने येथेही हस्तक्षेप केला.
भारतात आजघडीला सर्वसाधारण उद्योग सुरू करणे सोपे आहे, पण ते चालविणे अतिशय अवघड. उद्योगाचे स्वरुप पाहून साधारणपणे 17 ते 22 खात्यांच्या अधिकार्यांना हे उद्योजक तोंड देतात. त्या खात्यातील सर्वोच्च अधिकार्यापासून चपराशापर्यंत (वास्तविक येथे ‘सेवकवर्ग’ असा शब्द वापरता आला असता, पण वृत्तीनुसार शब्दयोजना म्हणून ‘चपराशी’!)सर्वांना पाकिटे देऊन खुश ठेवल्याशिवाय हे उद्योग व्यवस्थित चालू शकत नाहीत.
अनेक उद्योजकांनी तर मोठा पगार देऊन काही अधिकारी पदरी बाळगले आहेत, ते फक्त या खात्यांच्या तुष्टीकरणासाठी. त्यांना ‘लायझनिंग ऑफिसर’ असे गोंडस नाव आहे! संदिग्ध कायदे करणे, त्या कायद्याचा कीस पाडून उद्योजकांना हैराण करणे आणि त्यातून पळवाटा काढण्यासाठी त्यांची लूट करत स्वतःच्या तुंबड्या भरणे हे रॅकेट वरपासून खालपर्यंत पसरले आहे. ‘एमआयडीसी’त मोठा प्लॉट हवा असेल, तर संबंधित मंत्र्याच्या खजिन्यात काही कोटींची भर घालावी लागते. हे चित्र विषण्ण करणारे आहे.
अशा परिस्थितीत उद्योजक आपापले व्यवसाय करीत आहेत. आपल्यापुरती साधनशुचिता वापरून ते प्रगतीच्या वाटा चोखाळत आहेत.
**
मी मागील दोन-अडिच वर्षे विविध जिल्ह्यांत फिरतो आहे. तिथल्या सर्व स्तरांत संपर्क साधतो आहे.
वेगळेपणाने काम करणार्या उद्योजक-शेतकर्यांना शोधून त्यांच्या कामांचा घेतलेला वेध माझ्या विविध जिल्ह्यांच्या ‘आयकॉन्स’ या मालिकेतील पुस्तकांतून मांडतो आहे. ही माणसे, हे खरे धन आहे. ते सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे. या लेखामागे हाच हेतू आहे.
**
धुळे जिल्ह्याच्या अगदी पश्चिमेच्या कोपर्यात गुजरातच्या सीमेलगत साक्री तालुक्यात बारीपाडा नावाचे सातआठशे लोकवस्तीचे छोटेसे गाव आहे. गाव कसले, तो एक ‘पाडा’च. या पाड्याने आज राष्ट्रीय पातळीवर कीर्ती प्रस्थापित केली आहे. शेती, पर्यावरण रक्षण, ग्राम स्वावलंबन हे सरकार दरबारी भोंगळपणे वापरले जाणारे शब्द प्रत्यक्षात किती परिणामकारकपणे अंमलात येऊ शकतात, ते या पाड्याने दाखवून दिले आहे.
सर्व प्रयोगांमागे आहे चैतराम पवार हा त्याच गावातील तरुण. बी. कॉम. पर्यंतचे शिक्षण घेतलेला हा तरुण शहरातील स्पर्धेत न अडकता आपल्या गावी परतला. आपल्या गावात सुरू असलेल्या विकास कामांत त्याने सहभागी होण्यास सुरवात केली आणि पाहता पाहता या सार्या कामांचे नेतृत्वच त्याच्या हाती एकवटले. दीड हजार हेक्टरचे घनदाट जंगल या गावाने राखले आहे.
एकेकाळी टँकरने पाच किलोमीटरवरून पाणी आणावे लागत असलेल्या या गावात पाणी अडविण्यावर इतक्या प्रामाणिकपणे काम झाले, की आज हे गाव परिसरातील चार गावांची तहान बाराही महिने भागविते. मागील 10 वर्षांत या गावाने टँकर पाहिलेला नाही! भातशेतीमध्ये ‘चार सुत्री’ पद्धतीचा अवलंब करून स्थानिक ‘इंद्रायणी’ या वाणाचे भरघोस उत्पादन हे गाव घेते.
एकेकाळी टँकरने पाच किलोमीटरवरून पाणी आणावे लागत असलेल्या या गावात पाणी अडविण्यावर इतक्या प्रामाणिकपणे काम झाले, की आज हे गाव परिसरातील चार गावांची तहान बाराही महिने भागविते. मागील 10 वर्षांत या गावाने टँकर पाहिलेला नाही! भातशेतीमध्ये ‘चार सुत्री’ पद्धतीचा अवलंब करून स्थानिक ‘इंद्रायणी’ या वाणाचे भरघोस उत्पादन हे गाव घेते.
सरकारी योजना म्हणजे ‘अर्धे तुम्ही, अर्धे आम्ही.’ मात्र या वृत्तीला या गावाने पूर्णतः फाटा दिला. प्रत्येक योजना त्यातील अपेक्षित हेतूशी प्रामाणिक राहून अंमलात आणली. कुर्हाडबंदी असो की शिक्षणसुविधा... प्रत्येक पैलूवर बारकाईने लक्ष दिले गेले. त्यातून या गावातील स्थलांतर शंभर टक्के थांबले. कामे शोधण्यासाठी गावाबाहेर जाणारी नवी पिढी आपल्या गावी परतली.
**
जळगाव जिल्ह्याच्या जामनेर या तालुक्याच्या ठिकाणी पद्माकर चिंचोले नावाचे गृहस्थ राहतात. यांचा मुख्य व्यवसाय शेती. शंभर टक्के सेंद्रीय शेती, हे त्यांचे वैशिष्ट्य. एकेकाळी हे गृहस्थ सुद्धा रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या प्रवाहात सहभागी झालेले. पण साधारण 1995 च्या मुमारास ते भानावर आले.
समाधानकारक उत्पादन मिळून सुद्धा आपली शेती तोट्यात का जाते आहे, हे त्यांना कळत नव्हते. हिशेब
घालून पाहण्यास सुरवात केली, तसे कोडे उलगडले. रासायनिक खते आणि कीटकनाशके यांची भूक दरवर्षी चढत्या क्रमाने वाढत होती. जमिनीला द्याव्या लागणार्या खतांची मात्रा आधीच्या तुलनेत तिपटीपेक्षा जास्त झाली होती. जमिनीतील घटकद्रव्ये आणि पोषणमूल्यांनी न्यूनतम पातळी गाठलेली होती. माती कडक झालेली होती. तिची जलधारणक्षमता क्षीण झाली होती. कीटकनाशकेही अधिक क्षमतेची लागत होती. जुन्या कीटकनाशकांनी कीड मरेनाशी झाली होती.
डोळे उघडले आणि त्यांना भविष्याचे भयंकर चित्र दिसू लागले. पद्माकर चिंचोले यांनी राज्यभर प्रवास केला. सेंद्रीय शेतीची उदाहरणे पाहिली. त्या विषयावरील वाचन केले आणि त्यांच्या असे लक्षात आले, की हरितक्रांतीच्या निमित्ताने भारतात घुसलेला हा ‘ट्रोजन हॉर्स’ आहे. रासायनिक खतांच्या माध्यमातून देशाला खिळखिळे करणारे, अनुत्पादकतेकडे नेणारे धोरण अंमलात येते आहे. एक सामान्य शेतकरी म्हणून ते फक्त स्वतःच्या शेतात उत्तम प्रयोग करून सर्वांसमोर ठेवू शकत होते.
घरच्या जनावरांच्या आधाराने त्यांनी शेणखत, गांडुळखताची सुरवात केली. शेताची रासायनिक खते पूर्णपणे बंद केली. आजकाल ‘शेततळी’ हा सरकारी तिजोरीवर राजरोस डाका धालून पैसा कमावण्याचा राजमार्ग बनला आहे. कधी तळी खणून तर कधी न खणताच पैसा लाटला जातो. बरे, या शेततळ्यांचा मुख्य हेतू जमिनीतून वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीच्या कुशीत मुरविणे आणि भूजलपातळी वाढवून परिसर संपन्न करणे हा आहे. प्रत्यक्षात घडते असे आहे, की जमिनीचा उतार लक्षात घेऊन सर्वात वरच्या टोकाला शेततळे खणले जाते. जमिनीतील पाणी उपसून ते शेततळ्यात भरले जाते. तेथून ते पाईपद्वारे वीजपंपाशिवाय शेतभर फिरविले जाते. यातून जमिनीतील पाणीपातळी तर खाली जाते आहेच, पण वाया जाणारे पाणी अडवून जिरविण्याच्य मुख्य हेतूलाच तडा जातो आहे. आर्थिक लाभासाठी अधिकारी कानाडोळा करतो आणि चुकीच्या धारणांनी शेतकरी स्वार्थ साधतो.
पद्माकर चिंचोले यांच्या शेतात मात्र शेततळ्याचा आदर्श पाहावयास मिळतो. डोंगरउतारावरून वाहणारे पावसाचे पाणी आपोआप या तळ्यात साचते आणि जमिनीत मुरते. आपल्या खडकाळ माळरान असलेल्या जमिनीत त्यांनी शेजारच्या तळ्यातील गाळ टाकून आपली शेती जिवंत केली आहे. पाट-पाण्याचा विषय तर सोडाच, त्यांनी ठिबकवरही शेती केलेली नाही. त्यांच्याकडे स्प्रिंकलरचा उत्तम उपयोग करून शेती केली जाते. साधारण 10 वर्षांच्या मेहनतीत त्यांनी 100 टक्के सेंद्रीय शेती यशस्वी करण्यात यश मिळविले आहे.
**
नांदेड जिल्ह्याचा मुदखेड तालुका आता राज्याच्या ‘फ्लोरीकल्चर’च्या नकाशावर ठळकपणे पुढे येतो आहे. एकेकाळी सरकारी नोकरी करणारे प्रसाद देव आता या व्यवसायात रममाण झाले आहेत, इतकेच नव्हे तर त्यांनी आपल्यासह परिसरातील शेतकर्यांचेही हित जोपासण्यासाठी शेतकरी गट बनविले, सरकारी योजनांचा लाभ घेतला आणि शेडनेट, पॉलिहाऊस यांच्या माध्यमातून प्रगतीच्या दिशा शोधण्याचा प्रयत्न केला. कोकोपीटचा वापर करून फुले फुलविण्यातही त्यांनी चांगलेच यश मिळविले.
साधारण चार पाच वर्षांच्या मेहनतीतून त्यांच्याकडे जरबेरा या परदेशी फुलाबरोबरच आता अनेक देशी फुलेही फुलतात. या फुलांचे मार्केट त्यांनी देशभर शोधले आहे. मार्केमधून ऍडव्हान्स पैसा घेऊन त्यांना फुले पुरविताना आता त्यांना कसलाच त्रास होत नाही. कारखान्यावर ऊस घालून सरकारच्या दयेवर जगणे आणि हप्त्याहप्त्याने पैसे घेणे, या त्रासातून या शेतकर्यांची मुक्तता झाली आहे.
**
नंदुरबार येथे एका तरुणाने एक नर्सरी चालविली आहे. ‘नर्सरी’ म्हटल्यानंतर सर्वसाधारणपणे आपल्या डोळ्यासमोर शोभेची फुले, लॉन, बोन्साय केलेली झाडे, असे प्रकार येतात. अनिल पाटील यांच्या नर्सरीची गोष्ट वेगळी आहे. इथे ढोबळी मिरची, वांगी, टोमटो, मिरची... अशा प्रकारच्या विविध फळझाडांची रोपे मिळतात! शेतीला दिलेली ही पूरक उद्योगाची जोड...!
आपल्या परिसरातील शेतकर्यांना उत्तम उत्पादन घेण्यात मदत व्हावी, या हेतूने या तरुणाने अशा प्रकारच्या नर्सरीला प्रारंभ केला. एखाद्या छोट्या शेतकर्याला चांगल्या दर्जाच्या बियाण्याचे अख्खे पाकीट गरजेचे नसते आणि परवडणारेही नसते. त्याच्यासाठी रोपेच तयार करून दिली, तर त्याचा फायदा होईल आणि आपल्यालाही चार पैसे मिळतील, या प्रेरणेतून या तरुणाने नर्सरीला प्रारंभ केला. तयार रोपे नेल्याने शेतकर्यांना जवळजवळ 100 टक्के उगवणक्षमता मिळते आणि उत्तम दर्जाची रोपे माफक किमतीत मिळाल्याने त्यांचे प्रारंभिक भांडवल वाचते. शिवाय, शेतीत पहिला महिनाभर घ्यावयाची रोपांची काळजीही मिटते. शेतातील रोपे थेट पहिल्या महिन्यानंतरच्या टप्प्यावरच उमलू लागतात. उत्तम फळधारणा होत असल्याने मालाला चांगला भाव मिळतो...!
स्वतःपलिकडे जाऊन समाजाचा व्यापक विचार करण्याच्या वृत्तीतून अशा प्रकारचा व्यवसाय जन्मतो आणि त्यातून सर्वांचेच भले होऊ शकते.
**
नगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातील जवळा या छोट्याशा गावात रामदास घावटे या तरुणाने टिश्यूकल्चर तंत्राने केळीची रोपे तयार करण्याचा उद्योग सुरू केला आहे. स्वतः एम.एस्सी.पर्यंत शिकलेल्या या तरुणाने आपल्या परिसरातील शेतीची अडचण आणि मर्यादा ओळखून हा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. भारतात ‘जैन ग्रुप’ने टिश्यूकल्चर केळीचा प्रारंभ केला. ती परंपरा आता हळू हळू सर्वत्र पसरते आहे.
शेतकर्यांना चांगले उत्पादन मिळवून देणारी टिश्यूकल्चरची केळीची जात रामदास यांच्या अद्ययावत प्रयोगशाळेत तयार होते. ग्रामीण भागात एखादा कृषिसेवा आधारित उद्योग सुरू करताना एखाद्या तरुणाला जो त्रास होतो, तोच रामदास यांनाही झाला. जागेपासून विजेपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी झगडावे लागले. पण तीन-चार वर्षे नेटाने प्रयोग लावून धरले आणि त्यांनी त्यात यश मिळविले.
**
सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या मोलगी या अतिशय छोट्याशा गावात रामसिंग व रुषा वळवी राहतात. खेड्यातील आपल्या शेतात जे पिकेल, ते शहरात आणून विकायचे आणि त्यातून मिळणार्या चार पैशांतून आपली वर्षभराची दरिद्री उपजीविका चालवायची, हा या परिसरातील वनवासी बांधवांचा आयुष्यक्रम. त्यात हे दाम्पत्य वेगळा विचार घेऊन उतरले.
आपल्या परिसरातील समाजबांधवांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्याशिवाय त्यांच्या जीवनमानात
सुधारणा शक्य नाही, असे लक्षात घेऊन त्यांनी प्रारंभी स्वखर्चाने शेतीमालावर प्रक्रियेचे काही प्रयोग करून पाहिली. त्यांच्यातील उत्कर्षाची धडपड लक्षात आल्यानंतर नंदुरबारच्या कृषिविज्ञान केंद्राने त्यांना सहकार्य करण्याचे ठरविले.
एक एक करून यंत्रांची खरेदी करीत त्यांनी आपला कुटिरोद्योग सुरू केला. हा खरोखरीचाच ‘कुटिरोद्योग’ आहे! एका झोपडीत हा उद्योग चालतो. परिसरातील शेतकर्यांची डाळ, तांदुळ यावर येथे प्रक्रिया होते. त्यातून त्या शेतकर्यांना बाजारपेठेत चांगला भाव मिळतो. या दाम्पत्यालाही चार पैसे मिळतात.
परिसरातील शेतकर्यांना एकत्र करून त्यांनी विविध उत्पादनांचे सरबत करून विकण्याचाही व्यवसाय सुरू केला आहे. ही सरबते घेऊन ते राष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनांतही सहभागी होतात..! ग्रामीण भागात उद्योजकता रुजवून तेथील समाजात परिवर्तन घडवून आणण्याचा यशस्वी प्रयत्न नंदूरबार येथे कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून प्रभावीपणे होतो आहे.
**
याच जिल्ह्यात हिरालाल ओंकार पाटील हे नाव प्रसिद्ध आहे. धर्मेंद्र हा त्यांचा मुलगा. हे पिता-पुत्र सतखेडा, ता. शहादा येथे शेती करतात. सेंद्रीय शेतीवर त्यांचा भर आहेच, पण ग्रामीण पर्यटन हा त्यांच्या आवडीचा विषय. आवडीतून उत्पन्नाचे चांगले साधन कसे विकसित होऊ शकते, याचे उदाहरण म्हणजे या परिवाराचे जय श्रीकृष्ण कृषिपर्यटन केंद्र.
आडवाटेवरी एका छोट्या खेड्यात कृषिपयर्यटन केंद्र विकसित करणे हीच मुळी आश्चर्याची बाब. पण या परिवाराने ते प्रत्यक्षात उतरविले. पण हे पारंपरिक पद्धतीचे कृषिपर्यटन केंद्र नाही. इथे शेतीशी निगडित असंख्य प्रात्यक्षिके पाहावयास मिळतात. औषधी वनस्पतींचे असंख्य प्रकार, औधषी उपयोग असलेली झाडे, केक्टसचे 200 हून अधिक प्रकार, गुलाबाचे असंख्य प्रकार... इथल्या विविधतेबद्दल किती सांगावे?
एखाद्या हाडाच्या शेतकर्याने विकसित केलेले हे केंद्र शेतीशी संबंध नसलेल्या माणसाच्या माहितीत भर घालणारे आणि शेतीत कष्टणार्यांसाठी मार्गदर्शक ठरणारे आहे.
**
सांगली जिल्ह्याती विटा येथे अभय भंडारी यांची भेट झाली. हे गृहस्थ व्यवसायाने बांधकाम व्यवसायिक. पण विविध चळवळींत त्यांचा सहभाग इतका, की लोक त्यांना बांधकाम व्यावसायिकापेक्षा कार्यकर्ता म्हणूनच जास्त ओळखतात. असेच कार्यकर्तेपण जगताना ते लिंबाच्या झाडांविषयी जागृती करीत. लिंबाचे असंख्य गुणधर्म आहेत. ते समजावून सांगताना एका ठिकाणी त्यांच्यावर आक्षेप घेण्यात आला - ‘सांगणे सोपे आहे, करणे अवघड. तुम्ही करून दाखवा आणि मग शिकवा.’
त्यातून प्रयोगशीलतेला बळ मिळाले आणि त्यांनी चक्क ओसाड माळरानावर साडेतीन एकरांत नंदनवन फुलविले. हे माळरान म्हणजे एक टेकडीच आहे. गाव ज्या पातळीवर वसले आहे, त्यापेक्षा साधारण 150 फूट उंचीवर या टेकडीचा माथा आहे. तेथे त्यांनी साधारण 4500 हजार झाडे लावली आहेत. त्यात सुमारे 300 प्रकारची झाडे आहेत. विशेष म्हणजे, या परिसरात त्यांनी पाणी अडवून जिरविण्याचा यशस्वी प्रयोगही केला आहे. म्हणून उन्हाळ्यात गावातील लोक पाण्यासाठी वणवण हिंडतात, तेथील बोअर कोरडे पडतात, पण तेथून 150 फुट उंचीवर असलेल्या भंडारी यांच्या बोअरला चांगले पाणी असते...! विशेष म्हणजे, आजकाल सगळीकडे बोअरला खारे पाणी येत असताना या बोअरचे पाणी मात्र गोड आहे!
**
जिद्दीतून एखादा शेतीआधारित व्यवसाय कसा उभा राहू शकतो, हे पाहायचे असेल तर नंदूरबार जिल्ह्याच्या तळोदा येथील भिकाभाऊ चौधरी यांना भेटले पाहिजे. या माणसाने ‘टाकावूतून टिकावू’ तत्वावर उत्तम व्यवसाय उभा केला आहे. एकेकाळी सायकलवर फिरणे कठिण असलेला हा माणूस आज कारमध्ये फिरतो. कारमधून फिरण्याचे कौतुक नाही, पण ज्या स्थितीतून ही व्यक्ती पुढे आली, त्याची दखल घेणे आवश्यक वाटते.
वनखात्यातील नोकरी सांभाळून भिकाभाऊंनी प्रारंभी गांडुळखताचा प्रकल्प उभारला. पुढे त्याला शेणखत व कंपोस्टच्या मिश्रणाची जोड दिली. लिंबोळी पावडर, पेंडेचे खत यांचे उत्पादनही त्यांनी सुरू केले. एवढेच नव्हे, तर तळोदा पालिकेचे कचरा उचलण्याचे टेंडर मिळवून त्या कचर्यावर प्रक्रिया करीत त्याचा व्यावसायिक उपयोगही त्यांनी केला. गावात मरून पडलेले जनावर सुद्धा जैविक खतासाठीचे खूप महत्वाचे साधन आहे, हा डोळस विचार करून भिकाभाऊंचा व्यवसाय उभा राहातो आहे. कचरा ही टाकावू बाब आहे, त्याची विल्हेवाट लावणे अवघड असते, हे समज एका सामान्य माणसाने आपल्या कृतीतून दूर केले! एक अर्धशिक्षित सामान्य माणूस ग्रामीण भागातही अभिनव संकल्पनांच्या साह्याने स्वतःची व परिसराची प्रगती करू शकतो, हे सिद्ध करणारे त्यांचे
उदाहरण!
**
जालना शहर ओलांडून परभणीच्या दिशेने निघालात, तर जेमतेम 7-8 किलोमीटर अंतरावर सिंधी काळेगाव नावाचे गाव आहे. त्या गावाच्या आधीच डाव्या हाताला सीताबाई मोहिते यांचे फळप्रक्रिया युनिट लागते. एकेकाळी शेतमजुरी करणार्या या बाईंनी आज स्वतःचे युनिट उभारले आहेच, पण ज्या कृषिविज्ञान केंद्रात त्या सालदार म्हणून काम करीत होत्या, त्याच केंद्राच्या आज त्या एक संचालिका आहेत! स्वकर्तृत्वावर राज्य शासनाचे विविध पुरस्कार जिंकत असतानाच त्यांनी त्याच बळावर परदेश दौराही केला असून, ‘मी थँक्यू आणि सॉरी या दोनच शब्दांवर सारे जग फिरून आले’, असे त्या सांगतात!
सीतमबाई आणि त्यांचे पती रामराव मोहिते यांनी स्वकष्टातून थोडीशी शेती घेतली आणि तेथे आवळा, आंबा, लिंबू आदी फळांची लागवड केली. केवळ त्यांच्या विक्रीवर समाधान न मानता त्यांना त्या फळांवर प्रक्रिया करण्याची तयारी केली. त्या साठी स्वतःची बुद्धी वापरून सीताबाईंनी इचलकरंजीहून खास यंत्रे तयार करून घेतली. उदाहरण म्हणून सांगायचे झाले, तर आवळा प्रक्रियेसाठी वापरले जाणारे त्यांचे यंत्र काही जुजबी फेरफार केले की लिंबासाठी वापरता येते!
प्रारंभी जालना शहरातील एखाद्या कॉलनीपासून सुरू झालेली त्यांच्या विक्रीची वाटचाल आज जिल्हाभर पोहोचली आहेच, पण परगावच्या प्रदर्शनांतूनही त्या आपला स्टॉल लावतात आणि आवळा, लिंबू, चिंच, पेरू, चिकू आदी फळांवर प्रक्रिया करून तयार केलेले पदार्थ विकतात...
**
शेती आणि शेतीआधारित उद्योग उभारणार्या या व्यक्तींची तोंडओळख करून घेतल्यानंतर मी आपणास घेऊन जाऊ इच्छितो काही उद्योजकांकडे आणि उद्योजक वृत्तीच्या व्यक्तींकडे. यांनी आपली वैयक्तिक कौशल्ये उद्योगात परावर्तित केली. त्यातून नवे काम उभे राहिले. स्वतः घडताना इतरांना घडविणे आणि परिसराचा विकास करणे, हे सूत्र यात एकसमान आहे. ही सगळी माणसे शून्यातून उभी राहिलेली आहेत. त्यांच्या परिवारात कुठेही कोणी उद्योजक नव्हते. त्यांना कसल्याची प्रकारचे ‘बॅकिंग’नव्हते. तरीही ही माणसे उभी राहिली, ती स्वतकर्तृत्वावर...!
परंपरागत शेतीमध्ये मूल्यवर्धनाचे हे प्रयोग निश्चितच मार्गदर्शक ठरणारे आहेत. कष्टाला कल्पकतेची दिलेली जोड कशा प्रकारे प्रगतीच्या वाटा खुल्या करते, हेच या उदाहरणांतून दिसते. या कल्पकतेला आर्थिक सामथ्याची सुद्धा फार मोठी जोड लागत नाही. अशा प्रकारच्या कामांसाठी साह्य करणार्या सरकारच्या विविध योजनांचा लाभही यासाठी घेता येतो. कृषि विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, डीआरडीए, कृषि विद्यापीठ आदींच्या सहकार्यातून प्रगतीच्या या वाटा खुल्या होऊ शकतात. गरज आहे ती स्वतःहून पुढाकार घेऊन नवे काही उभे करण्याच्या इच्छाशक्तीची.
** **
अशीच काही उदाहरणे उद्योगाच्या संदर्भातील... उद्योग उभा करण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे उद्योजकाचा ठाम निर्धार आणि विश्वास. मी व्यवसाय उभा करणार आहे आणि मी यशस्वी होणारच आहे, या ठाम विश्वासातून उद्योग उभा राहू शकतो. अनेक उद्योजकांच्या अनुभवाचा परिपाक हा, की भांडवल, बाजारपेठ, विपणन या गोष्टी महत्वाच्या आहेत, पण त्यावाचून उद्योगाची उभारणी अडत नाही. ठाम विश्वास आणि निर्धार असेल, तर भांडवल उभे राहते आणि निश्चित दिशा ठरली तर प्रत्येक गोष्ट व्यवस्थितरित्या मार्गी लागू शकते.
** **
कवठे महांकाळजवळील हिंगणगाव या तीन-चार हजार लोकवस्तीच्या गावात तयार झालेले हँडग्लोव्हज जपानला निर्यात होतात, ते ही दरमहा एक-दोन कंटेनरच्या हिशेबात असे सांगितले तर तुमचा विश्वास बसेल? दलित समाजात जन्माला आलेल्या देवानंद लोंढे या तरुणाने ही किमया साधली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही काळ स्वयंसेवी संस्थेत काम करणार्या देवानंद यांना त्याच कामांसाठी परदेशातही जाण्याची संधी मिळाली.
अशी कामे करताना आपल्य गावातील गरीब आणि महिलांसाठी काही केले पाहिजे, या भावनेतून त्यांनी या उद्योगाचा पाया रचला. त्यांना अनेकांनी हा उद्योग विकसित करण्यासाठी मदतही केली. पण स्वतःचा उद्योग उभा करणे आणि जपानच्या निकषात बसून त्यांना हवे ते उत्पादन त्या पद्धतीने तयार करून देणे, हे विशेष कौशल्याचे काम होते. ते त्यांनी साध्य केले. परिसरातील 200 हून अधिक महिलांना रोजगार उपलब्ध करून देतानाच त्यांनी देशाला परकीय चलनही मिळवून दिले.
या उद्योगात जम बसल्यानंतर आता ते त्या परिसरात अमाप पिकणार्या चिंचेवर प्रक्रिया करून ती उत्पादने बाजारपेठेत आणण्याच्या तयारीला लागले आहेत.
**
औरंगाबादच्या एका खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजमधून इंजिनिअर झालेल्या नितीन काबरा यांची गोष्ट अशीच. प्रारंभी नोकरी करणार्या नितीन यांनी पुढे वडिलांना मदत करण्यासाठी त्यांच्या लोखंडी सळया निर्मितीच्या कारखान्यात मदत करण्यास प्रारंभ केला. या उद्योगात काम करताना त्यांनी या उद्योगातील कौशल्ये अशा प्रकारे आत्मसात केली, की ते लोखंड निर्मिती उद्योगातील तज्ज्ञ बनले.
लोखंडी सळया निर्मितीच्या व्यवसायात जगभरात नवे प्रवाह कोणते आहेत, नवी तंत्रज्ञाने कशी विकसित होत आहेत यांचे अद्ययावत ज्ञान असलेल्या नितीन काबरा यांनी आपल्या कौशल्यातून नाशिक येथे एक स्टील प्लांट उभा करून दिला आणि तो व्यवस्थितपणे चालवूनही दाखविला. जालन्यातूनच अशा प्रकारच्या कारखान्याच्या उभारणीसाठी प्रयत्न करणार्या तीन युवकांच्या लक्षात त्यांची ही खासियत आली आणि त्या तिघांनी नितीन यांना आपल्या सोबत येण्याचा आग्रह केला.
नितीन यांच्याकडे उद्योग उभारणीत देण्यासाठी भांडवल नव्हते, पण ती जबाबदारी इतर तिघांनी उचलली आणि नितीन यांच्या केवळ बौद्धिक क्षमतेवर त्यांची समसमान भागीदारी आकाराला आली. जालना येथील लोखंड निर्मिती विश्वात ‘भाग्यलक्ष्मी स्टील्स’ हा उद्योग आज आपली वेगळी ओळख घेऊन उभा आहे. उत्तम दर्जाचे सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानाने तयार झालेले लोखंड विकत असतानाच सामाजिक बांधिलकी जपणार्या या उद्योगाने प्रदूषण नियंत्रणाची यंत्रणा अत्यंत प्रभावीपणे येथे अंमलात आणलेली आहे. आर्थिक क्षमता, बौद्धिक कौशल्य, विपणनातील कौशल्य हे गुण असलेली वेगवेगळी चार माणसे एकत्र येऊन कशा प्रकारे एखादा उद्योग उभा करून शकतात, याचे हे उदाहरण.
**
उत्तम शिक्षण घेतलेल्या चार जणांनी एकत्र येऊन उभारलेले हे उदाहरण पाहात असतानाच एकट्या
माणसाने कसलीही तांत्र-शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना ‘एन्डोस्कोपी’सारख्या अतिशय संवेदनशील क्षेत्रातील उपकरणे तयार करून आयात-पर्यायी बाजारपेठेत जम बसवावा, हे आगळेच उदाहरण. जळगावच्या उमेश सोनार यांनी ही किमया केली आहे. एन्डोस्कोपी सर्जरीसाठी लागणार्या सुमारे 20 प्रकारच्या उपकरणांची साधारण 250 प्रकारची वेगवेगळ्या आकार-कौशल्यांतील ‘व्हरायटी’ ते निर्माण करतात. विशेष म्हणजे हा उद्योग उभा करणारे उमेश हे पदवीधरही नाहीत!
बी.कॉम. शिक्षण घेत असतानाच कॉलेज सोडावे लागलेल्या उमेश यांनी वास्तविक प्रारंभी चक्क गॅरेज थाटले होते. पण यंत्रांशी खेळण्याची बालपणापासूनची सवय आयुष्यात कामाला आली आणि शहरातील एन्डोस्कोपिक सर्जन डॉ. रवींद्र महाजन यांना मदत करण्याच्या हेतूने उमेश यांनी प्रारंभी स्टेनलेस स्टीलचा ऑपरेशन टेबल दुरुस्त करून दिला. त्यातील हायड्रोलिक सिस्टीम बिघडलेली होती आणि उच्चशिक्षित तंत्रज्ञांनी तो टेबल बाद करून नवा विकत घेण्याचे डॉक्टरांना सूचित केले होते...! येथून सुरू झालेली उमेश यांनी ही सुरवात डॉक्टरांकडे असलेल्या एन्डोस्कोपी यंत्रांच्या मायक्रोवेल्डिंगपर्यंत पोहोचली आणि तेथूनच त्यांना स्वतंत्र उपकरणांच्या निर्मितीची प्रेरणा मिळाली.
या क्षेत्रात प्रामुख्याने जर्मन बनावटीची उपकरणे आदर्श मानली जातात. त्या उपकरणांना समकक्ष असलेली उपकरणे उमेश यांनी तयार केलेली आहेत. ती सध्या देशभरात पोहोचतात. परकीय बनावटीच्या उपकरणांच्या तुलनेत ती अधिक टिकाऊ आहेत, हे विशेष!
**
आयुर्वेद केवळ शरीरस्वास्थ्य टिकविण्यात काम करत नाही. आयुर्वेदाच्या आधाराने ‘बुलेटप्रुफ जाकीट’ तयार करता येते...! हे संशोधन आहे सांगलीच्या मकरंद काळे यांचे! हे गृहस्थही या क्षेत्रात शिकलेले नाहीत! हे सुद्धा वाणिज्य पदवीधर. मार्शल आर्टमध्ये उच्चशिक्षित. पण आयुर्वेदाच्या अभ्यासातून त्यांनी काही कॉम्बिनेशन्स अशी बनविली, की त्याची तयार प्लेट ‘बुलेटप्रुफ जाकीटा’चे काम करते!
डाळी, कडधान्ये, पिष्टमय पदार्थ यांच्या प्रक्रियेतून मकरंद काळे काही विशिष्ट प्रकारचा लगदा तयार करतात. त्यातून तयार झालेल्या पदार्थावर प्रक्रिया केल्यानंतर वेगवेगळ्या क्षमतांच्या प्लेटस् तयार होतात. परदेशी बनावटीच्या जाकिटांत जशी वेगवेगळ्या क्षमतेची क्रमवारी आहे, तशीच येथेही आहे. पण सर्वात महत्वाचा फरक हा, की ठरवून दिलेल्या विशिष्ट मुदतीनंतर परदेशी बनावटीची जाकिटे निकामी होतात आणि मुंबईतील हल्ल्यात जसे वरिष्ठ पोलिस अधिकारी मारले गेले, तशी अवस्था होते. मकरंद यांनी तयार केलेली जाकिटे निकामी होत नाहीत!
पण भारतात अशा प्रकारच्या ‘इनोव्हेशन्स’ला राजमान्यता मिळणे अवघड जाते. तशीच त्यांची अवस्था झाली आहे. परदेशातील अशा खरेदीतून होणारे आर्थिक (गैर)व्यवहार आपल्या कानावर येतात...! त्यामुळे अशा ‘स्वदेशी’ उपकणांना चटकन मार्केट मिळत नाही...!
**
छंदाचे रुपांतर व्यवसायात करता येते का? ते तसे झाले तर काय काय घडू शकते? त्यासाठी नगर येथील दिनेश निसंग यांना भेटायला हवे. एक सामान्य विद्यार्थी असलेल्या दिनेश यांनी शिकताशिकताच एका क्लासमध्ये व्यवस्थापनातील नोकरी पत्करली आणि तेथून त्यांना उदरनिर्वाहासाठी पुरेसे उत्पन्नही मिळू लागले. पण त्याच वेळी त्यांच्या असे लक्षात आले, की आजच्या प्रचलित शिक्षण पद्धतीत तयार होणार्या विद्यार्थ्यांच्या शास्त्रविषयातील मूलभूत संकल्पनाही स्पष्ट नाहीत.
त्यांना आकाशदर्शन, विज्ञानातील प्रयोग यांचा छंद होता. त्यातूनच त्यांच्या मनात विद्यार्थ्यांच्या मनात प्रयोगांतून विज्ञानाच्या संकल्पना रुजविण्याचा विचार आला. त्यातून शास्त्रविषयात सुसंस्कारित होणारी पिढी पाहून हळूूहळू याच छंदाचे रुपांतर त्यांनी व्यवसायात केले.
ते पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील विज्ञान विषयाची कक्षा लक्षात घेऊन, विज्ञानातील संकल्पना स्पष्ट करणारी काही खेळणी बनवितात. त्या साठी त्यांनी काही अभ्यासक्रमच तयार केले आहेत. हे पॅकेज ते विद्यार्थ्यांना देतात. हे विद्यार्थी वर्षभर उपक्रमाच्या संपर्कात राहतात. दर रविवारी त्यांचा ‘क्लास’ होतो. त्यातूनच ‘संडे सायन्स स्कूल’ची संकल्पना जन्मास आली. आजमितीला ते पुण्यातून हा व्याप सांभाळतात. महाराष्ट्रातील निम्म्याहून अधिक जिल्ह्यांत ते पोहोचले असून महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडू येथेही त्यांच्या उपक्रमाची रुजुवात झाली आहे.
हे व्यावसायिक मोड्यूल तयार करताना ते त्यातून आर्थिक उत्पन्नापेक्षाही नव्या पिढीला घडविण्याकडे जास्त लक्ष देतात. त्यामुळे, ही संकल्पना उत्तम असल्याचे पाहून त्यात ‘गुंतवणूक’ करू इच्छिणार्या काही मोठ्या ‘गुंतवणूकदारां’ना त्यांनी या पासून दूर ठेवले आहे!
**
भार्गवी दीक्षित यांची कथा आणखी वेगळी. नांदेड जिल्ह्यातील देगलूरसारख्या ग्रामीण भागात काम करताना कोणता व्यवसाय केला पाहिजे? त्यांना महिलांचे आरोग्य हा विषय महत्वाचा वाटला. त्यातून त्यांनी प्रारंभी महिलांसाठी योगासनाचे वर्ग सुरू केले आणि त्याला अधिक चांगल्या उपक्रमाची जोड देताना चक्क महिलांसाठीच्या व्यायामशाळेची, ‘जिम’ची जोड दिली.
ग्रामीण भागात जिथे महिलांनी घराबाहेर पडणेच अवघड, तेथे महिलांच्या ‘जिम’ला कसा प्रतिसाद मिळेल, या बद्दल अनेकजण साशंक होते. अगदी, त्यांना मदत करणारे जिल्हा उद्योग केंद्र सुद्धा. पण भार्गवी यांनी जिद्दीनेे हे काम उभे केले. ‘जिम’चे काम पुढे नेत असतानाच महिलांना स्वावलंबी करण्याची गरज त्यांना महत्वाची वाटू लागली. त्यातून त्यांनी महिला बचतगटाची स्थापना केली. त्यांना अवगत असलेली कौशल्ये त्यांनी परिसरातील गरजू महिलांना शिकविली. स्वतःच्या नावावर कामे मिळविण्यास सुरवात केली आणि त्यातून बचतगटाची चळवळ उभी राहिली. ज्या महिला जे कम करतात, त्याचे पूर्ण उत्पन्न त्यांनाच मिळते, हे इथले वैशिष्ट्य.
**
देगलूरमधील भार्गवी दीक्षित यांची वेगळ्या वाटेवरील ही वाटचाल अनुभवताना सातारा येथील सायली मुतालिक यांचेही नाव आठवते. प्रामुख्याने पुरुषांची ‘मक्तेदारी’ असलेल्या ‘सिक्युरिटी एजन्सी’चे काम त्यांनी सातारा येथे उभे केले. मूळच्या पुण्यातील असलेल्या सायली विवाहानंतर सातार्यात गेल्या. मुले शाळेत जाऊ लागली, तसे उरलेल्या वेळेत काय करायचे, या विचारातून त्यांनी आधी ‘पार्टनरशिप’मध्ये हे काम सुरू केले. पुढे हाच व्यवसाय त्यांनी स्वतंत्रपणे सुरू केला.
‘एका महिलेला हे काम कसे द्यायचे?’ या विचारापासून ‘एक महिलाच हे काम अधिक सक्षमपणे करू शकते, त्यामुळे एका महिलेलाच हे काम द्यायचे’, इथपर्यंतचा क्लायंटच्या विचारांचा प्रवास त्यांनी सुमारे चार-पाच वर्षांच्या वाटचालीतून कमावला. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शिक्षणसंस्था, उद्योग यांना त्या आपल्या सेवा देतात. त्यांच्या माध्यमातून सध्या साधारण 1000 जणांना रोजगार मिळतो आहे.
या सेवा देतानाच त्यांच्यासमोर ‘कॉम्प्यूटर ऑपरेटर’ सारख्या गरजा मांडल्या जाऊ लागल्या आणि त्यातून त्यांनी या क्षेत्रातील मनुष्यबळ पुरविण्यासही प्रारंभ केला. सध्या विविध ठिकाणी कामांचे खासगीकरण सुरू आहे. त्यासाठी कंत्राटी पद्धतीने तांत्रिक मनुष्यबळाची मोठी गरज लागते. ती गरज त्या पुरवितात. सातार्यात राहून त्या सध्या जवळजवळ संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात आपल्या सेवा देतात. महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या अशा प्रकारच्या कामाचे कंत्राटही त्यांनी पारंपरिक कंत्राटदारांच्या स्पर्धेत उतरून मिळविले होते, हे त्यांचे वैशिष्ट्य!
**
सौर ऊर्जा ही काळाची गरज आहे, ही चर्चा आपण नेहेमीच ऐकतो. पण या क्षेत्रात भरीव काम उभे करण्याची मोठी गरज आहे. ही गरज ओळखून धुळे येथील प्रा. डॉ. अजय चांडक यांनी सौर ऊर्जेच्या क्षेत्रातील संशोधनास प्रारंभ केला. सौर ऊर्जा देशात मुबलक उपलब्ध आहे. पण त्याचा योग्य विनियोग होत नाही, ही ओरड आपण नेहेमीच ऐकतो. या उपयोगातील मोठा अडथळा म्हणजे त्यासाठीच्या साधनांची किंमत. अद्यापही ही साधने खूप कमी प्रमाणात वापरली जात असल्यामुळे या साधनांच्या निर्मितीचा खर्च जास्त आहे.
हा खर्च कमी करणे, सौरऊर्जेला चालना देण्यासाठी त्याची सोपी मॉडेल्स विकसित करणे, या साठी प्रा. चांडक यांनी पुढाकार घेतला. ‘सोलार पॅनल’च्या आकारात त्यांनी अनेक बदल केले. चौकोनी आकाराचे पॅनल्स, घडी करण्याजोगी यंत्रे यांची वेगवेगळी मॉडेल्स त्यांनी तयार केली. त्यांचे एक विद्यार्थी राहूल कुलकर्णी यांच्या वर्कशॉपमध्ये त्यांनी हे तांत्रिक प्रयोग केले आणि त्यांच्याच सहकार्यातून नवे ‘बिझनेस मोड्यूल’ त्यांनी विकसित केले आहे.
स्वतः शास्त्रीय अभ्यासात झोकून देणे, नवे प्रयोग करणे यासाठी डॉ. चांडक आपला वेळ वापरतात आणि राहूल कुलकर्णी आपल्या वर्कशॉपमध्ये ही साधने विकसित करून त्यांचे मार्केटिंग करतात...! संशोधन, विकास आणि व्यवसाय यांची सांगड अशा प्रकारे घालता येऊ शकते, या साठीचे हे उत्तम उदाहरण...!
**
शास्त्रीय क्षेत्रात असे काम उभे करणार्या डॉ. चांडक आणि श्री. कुलकर्णी यांच्या तुलनेत हॉटेल चालविणार्या हरिभाऊ कुलकर्णी यांचे कुणाला फारसे कौतुक वाटणार नाही. पण हरिभाऊंची आर्थिक पार्श्वभूमी ऐकली, तर त्यांच्या या कामाबद्दल अभिमानच वाटेल. हरिभाऊ आणि त्यांचे धाकटे भाऊ यांची वये अनुक्रमे साडेतीन वर्षे आणि सहा महिने असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. ते मजुरी करत. एका मजुराची कमाई काय असणार? एक भाड्याची खोली, दोन-चार अंथरुणे-पांघरुणे आणि दोनचार भांडीकुंडी, हा त्यांचा संसार. हे कुटुंब सांगलीत वास्तव्यास होते.
त्यांच्या निधनानंतर घरमालकाने सहा महिने वाट पाहिली आणि त्यानंतर या विधवेला तिच्या मुलांसह त्याने घराबाहेर काढले. तिने गयावया करून अंथरुण-पांघरुण तेवढे मिळविले. सांगलीतील कृष्णेच्या घाटावर या स्त्रीने आपल्या कच्च्याबच्च्यांसह झाडाखाली आठ वर्षे काढली. त्यानंतर समज आलेल्या मुलांनी हातपाय हलविण्यास सुरवात केली. हरिभाऊने मजुरूपासून चहाच्या गाड्यापर्यंत सगळी कामेे केली. अखेर, एक कॅन्टीन चालविताना एका कॉलेजच्या मेसचे काम त्यांना मिळाले आणि तेथून सारे चित्र पालटले.
फिरत्या गाड्यावर खाद्यपदार्थ विकण्यापासून प्रारंभ केलेल्या साधारण दोन दशकांच्या वाटचालीत या अशिक्षित माणसाने दोन हजार मुलांची मेस आणि दोन हॉटेल असा व्याप उभा केला आहे. या पुढचे त्यांचे लक्ष्य आहे एका चांगल्या मंगल कार्यालयाचे, साधारण तीन एकरांच्या जागेत उत्तम सोयीसुविधा असलेले मंगल कार्यालय पुढील काळात उभारण्याचा त्यांचा मानस आहे...
**
शेती आणि उद्योग ही दोनच क्षेत्रे देशाला प्रगतीपथावर नेऊ शकतात. दुर्दैवाने स्वतंत्र भारतात या दोन क्षेत्रांपैकी उद्योगाला प्राधान्याचे स्थान मिळाले. स्वातंत्र्योत्तर वाटचालीत ते स्थानही डळमळीत झाले आणि ‘व्हाईट कॉलर जॉब’च्या प्रेरणा अधिक जोमाने विकसित झाल्या. नोकर्या करून देश घडणार नाही. नोकर्या देणारे निर्माण झाले, त्यातून निर्यातीला चालना मिळाली, तरच देश उभा राहील.
एकेकाळी जागतिक बाजारपेठेत भारताचा वाटा 35 टक्क्यांहून अधिक होता, वस्त्र आणि मसाले ही भारतीय उत्पादनांची जागतिक बाजारपेठेतील मक्तेदारी होती. ब्रिटिशांच्या काळात ही घडी विस्कटली आणि ब्रिटिश प्रशासनासाठी कुशल प्रशासक तयार व्हावेत अशी शिक्षणपद्धती भारतात आणण्यात आली. त्यातून मातीशी नाते तुटण्यास प्रारंभ झाला.
स्वातंत्र्याच्या 60 वर्षांनंतर आज नवयुवक शेतीत हात घालण्यास धजावत नाही. इतर सारी क्षेत्रे आर्थिक दृष्ट्या संपन्न होत गेली, पण शेतकरी नागवाच राहिला, हे सत्य त्यांना अस्वस्थ करते. पण मागील दशकभरात या क्षेत्रानेही कात टाकली आहे. नव्या पिढीच्या नव्या संकल्पना समोर येत आहेत. शेतीमालावर प्रक्रिया करून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचल्याने चांगले उत्पन्न मिळविता येते, ते त्यांच्या लक्षात येऊ लागले आहे. बाजार समित्यांच्या माध्यमातून लुटीला सामोरे जाण्याऐवजी थेट बाजारपेठ मिळवून दलालांच्या घशात जाणारा नफा आपण स्वतःच कमवू शकतो, हे नव्या पिढीच्या लक्षात येऊ लागले आहे. यातून नव्या युगाची रुजुवात होते आहे.
उद्योग सुरू करताना त्याची उलाढाल किती, हा प्रश्न काहीसा गैरलागू असतो. उलाढालींच्या आकड्यापेक्षाही त्यातील अभिनव संकल्पना, त्यातून होणारी स्वयंपूर्णता, रोजगारनिर्मिती या बाबी अधिक महत्वाच्या असतात. अशा प्रकारे झालेली छोटीशी सुरवात पुढे विराट रूप धारण करू शकते. गरज असते, ती बीज रुजण्याची...!
उद्योग आणि शेती या दोन्ही क्षेत्रांत नवे प्रयोग सुरू आहेत. भारताची भूमी, येथील वातावरण आणि भौगोलिक स्थान हे सारे उद्योगांसाठी अत्यंत अनुकुल असतानाही मध्यंतरीच्या दोन शतकांच्या काळात झालेली पिछेहाट भरून काढण्याची वेळ आलेली आहे. त्यातूनच भारत ‘महासत्ता’ बनण्याचा मार्ग प्रशस्त होणार आहे. ‘मी एकटा काय करू शकेन’, या वृत्तीपेक्षाही ‘मी पुढाकार घेईन, मी यशस्वी झाल्यानंतर माझे अनुकरण नक्कीच अनेक जण करतील’ ही वृत्ती महत्वाची आहे. या सर्वांच्या मुळाशी राष्ट्रभावना असणे महत्वाचे माझे कर्तृत्व भारतमातेच्या चरणी समर्पित करण्यातच माझा विकास आहे, या भावनेने उभी राहिलेली नवी पिढी नक्कीच या देशाचे भवितव्य घडवेल. या प्रवासात चार पावले टाकून पुढाकार घेणार्या वर उल्लेख केलेल्या व्यक्तींची करून दिलेली ओळख याच भावनेतून आहे.
- दत्ता जोशी
9422 25 25 50