Wednesday, February 8, 2017

पाने पळसाची... आणि काळाचीही !

परवा प्रवासात डोंगरकाठी फुललेला पळस दिसला. गाडी थांबवली. बांधावर गेलो. पोपटी-हिरव्या पर्णसंभारावरून हलकेच हात फिरवला. पानांच्या खल-वरची चंदेरी लव तळहाताला गुदगुल्या करून गेली. एका देठावर तीन पानांचा नियतीचा, निसर्गाचा नियम निमुटपणे पाळत पळस फुललेला होता... हारीने हिरवी झालेली झाडे वाऱ्यावर डौलाने मिरवत होती... पळसाच्या पानांची संवेदना हातावर उमटत होती आणि काळाची पाने मनात उलगडत होती... टाईम मशीन प्रमाणे मी भूतकाळात पोहचलो होतो...
साधारण १९७९-८० चा काळ असावा... तिथे माझी पळसाची पहिली भेट – ओळख झाली. तिसरी-चौथीत असेन. देवणीच्या झेडपीच्या शाळेत शिकत होतो. आई-वडील देवणीतच नोकरीला. जेमतेम ४-५ हजार लोकवस्तीचे गाव. कुठल्याही दिशेने १०-१२ मिनिटे चालले की आलोच गावाबाहेर.
गावाच्या पूर्वेला नदीचा उतार. तिकडेच थोडी खडकाळ जमीन. एक-दोन किलोमीटरवर हंचनाळ नावाचे आणखी छोटेसे गाव. देवणी आणि हंचनाळच्या मधून गेलेला डांबरी रस्ता नदी ओलांडून यायचा. या रस्त्याच्या बाजूने, खडकाळ जमिनीत पळस फुलायचा. कधी नदीकाठाने चालत तर कधी पांदीच्या रस्त्याने सायकलवर तिकडे जाणे व्हायचे.
त्या काळात अनेक वर्षे आमच्याकडे एक नेम असे. दादा, माझे वडील दररोज त्या भागात जात आणि पळसाच्या पानांचा भला मोठा गठ्ठा सायकलच्या कॅरिअरला बांधून आणत. अनेक वेळा मीही त्यांच्यासोबत जात असे. पाने तोडताना ते काही नियम पाळत. मी अख्खी फांदी तोडू लागलो, की ते आडवत. फांदी नव्हे, पाने तोडायची हे समजावून सांगत. पाने तोडताना देठ कसा अलगद तोडायचा, पान कसे फाटू द्यायचे नाही, हे मी शिकत गेलो. ही तोडलेली पाने घरात आली की रात्री ओल्या कापडाने ती स्वच्छ केली जात आणि मग पत्रावळी, द्रोण लावायला सुरवात होई. त्या काळात रेडीओशिवाय कुठली करमणूक नसे. अशी कामे हीच करमणूक.
पत्रावळी आणि द्रोण लावणे ही पण एक कला असते. पत्रावळ लावायची तर आधी एक मोठे पान निवडायचे. ते मध्यभागी ठेवून त्या भोवती एकमेकांवर चढवत क्रमाने गोलाकार पाने रचायची. ज्या काड्या तोडून पत्रावळ जोडायची त्याला आम्ही चुईट्या म्हणत असू. शेजारच्या घरी ज्वारीच्या धाटांचा कडबा पडलेला असे. त्यातील जाडसर १-२ धाटे निवडून आणायची, त्यावरील पानांचा पातळ पापुद्र काढून टाकायचा. जसे आपण उसाचे कांडे सोलताना वरच्या चुईट्या काढतो तशाच या सुद्धा काढायच्या. दादा त्यासाठी बतई वापरत. बतई म्हणजे पातळ पाते असलेली सुरी. चुईट्या काढायच्या, त्याला आतल्या बाजूने लागून आलेला आतील कांड्याचा थर दूर करायचा. मग या पातळ काड्या बारीक आकारात उभ्या कापायच्या.
ते अशा ४०-५० काड्यांचा एक जुडगा करायचे. असे अनेक जुडगे दुपारच्या वेळेत तयार केले जात. पत्रावळ लावायची तेव्हा ही काडी नेमकी किती लांबीची तोडायची याचाही नियम असे. पाट घट्ट बसायला हवे पण पत्रावळीवर जेवण करताना भात कालवून खाताना काड्या निघायला नकोत...! हे नजाकतीचे काम.
द्रोण लावताना आणखीच जास्त काळजी घ्यायला लागायची. दादा खूप छान ड्रोन लावत. दोन पाने परस्पर विरुद्ध दिशेला देठ करून जोडायची, दोन्ही बाजूला अशी घडी करायची की तळाला सपाट आकार यायला हवा. तळ निमुळता झाला तर द्रोणात वरण, भाजी घेताना कडेने भाताचा आधार द्यावा लागतो. तसा आधार न देता वरणासह उभा राहणारा द्रोण सर्वोत्तम!
आमचे दररोजचे टार्गेट असे. असे द्रोण, पत्रावळीचे गठ्ठे बांधून मधल्या खोलीत रचून ठेवले जात. पत्रावळी वाळताना पाने वाकडी होत असत. ती तशी होऊ नयेत म्हणून त्यावर पाट ठेवला जात असे आणि त्यावर धान्याचा एखादा डबा.
मोठ्या संख्येने अशा पत्रावळी-द्रोण पुढे बराच काळ घरात जेवणासाठी वापरले जात. आईचा भांडी धुण्याचा वेळ आणि कष्ट तेवढेच वाचत. शाळेत जाण्याआधी स्वयंपाक आणि रात्रीच्या जेवानंतर भांडी घासण्यात तिचा बराच वेळ जायचा. तिला एवढा काळ थोडी उसंत...!
मीही दादांकडून पत्रावळी लावायला शिकलो. चांगल्या लावत असे. कदाचित आजही तशाच लावत असे. पुढे देवणीतून उदगीरला शिकायला जाऊ लागलो. हा संबंध कमी होत गेला. पुढे माझेही `नागरीकरण` झाले. आता मुलाच्या `बड्डे`ला किंवा बायकोच्या भिशी पार्टीला `डिस्पोजेबल प्लेट` आणल्या जातात, तेव्हा मला हटकून माझे लहानपण आठवते...!
या पळसपानांनी त्या सुंदर दिवसांची आठवण मनात ताजी केली...