औरंगाबादच्या जाहिरात विश्वातील पहिल्या पिढीचे उद्यमी आणि ‘गरूड अॅड्स’चे संस्थापक (कै.) गोविंद देशपांडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रदान करण्यात येणारा ‘गोविंद सन्मान’ औरंगाबादच्या पहिल्या पिढीतील ज्येष्ठ पत्रकार नागनाथराव फटाले यांना आज (28 मार्च) प्रदान होत आहे. व्यावसायिक सचोटीच्या निकषावर 100 टक्के निष्कलंक म्हणावीत, अशा या दोन्ही व्यक्तिमत्त्वांचा हा आगळा संयोग. पुरस्कार प्रदानाच्या निमित्ताने दोघांच्याही व्यक्तिमत्त्वांचा हा धावता आढावा -
- दत्ता जोशी, औरंगाबाद
------------------------------ --------------------------
काही व्यक्तिमत्त्वांच्या पहिल्या भेटीत सुद्धा काही वेगळे घडत असते. अशी माणसे मनाला स्पर्शून जातात. त्यांचे-आपले काहीतरी अंतरंग नाते आहे, असे जाणवू लागते. गोविंद देशपांडे आणि नागनाथ फटाले या दोघांच्याही बाबतीत असेच आहे. निष्कलंक वैयक्तिक आणि व्यावहारिक चारित्र्य, सर्वोच्च व्यावसायिक सचोटी आणि पराकोटीची सामाजिक बांधिलकी जपणारी ही दोन माणसे. आज एकाच्या नावाचा सन्मान दुसर्या व्यक्तीला प्रदान होताना हा योग नक्कीच लक्ष्यवेधी ठरतो.
गोविंदराव औरंगाबाद शहरातील जाहिरात विश्वाचेे आदरणीय नाव. औरंगाबादेत स्थापन झालेली ‘गरूड अॅड्स’ ही दुसरी जाहिरात संस्था. साधारण 1980 च्या दशकात गोविंद देशपांडे आणि विलास कुलकर्णी या रा. स्व. संघाच्या संस्कारात वाढलेल्या दोन मित्रांनी ‘गरूड’ची स्थापना केली. संघाचा संस्कार व्यवसायात जसाच्या तसा उतरवताना ‘गरूड’ने सचोटीचे मानदंड निर्माण केले. ग्राहकांप्रती असलेली पारदर्शी व्यवहारांची बाब असो की दैनिकांप्रती असलेला चोख व्यवहार, प्रत्येक आघाडीवर ‘गरूड’ने आपली प्रतिमा उजळवून ठेवली. दुर्दैवाने हे दोघेही भागीदार अल्पायुषी ठरले. पण त्यांच्या सचोटीच्या उदाहरणांना आता आदर्श वस्तुपाठांचे मोल प्राप्त झालेले आहे.
हेच मोल नागनाथराव फटाले यांच्या पत्रकारितेला सुद्धा प्राप्त आहे. पत्रकारितेच्या बदलत्या स्वरुपात सुद्धा आपली प्रतिमा राखण्यात त्यांना यश आले. आज वयाच्या 80 व्या वर्षीही (जन्म 23 जून 1937) सक्रीय असलेले नागनाथराव मराठवाड्यातील पत्रकारितेच्या पहिल्या पिढीशी आजच्या पिढीचा उपलब्ध असलेला बहुधा एकमेव दुवा आहेत. त्यांच्या आयुष्याचे सिंहावलोकन हा जणू मराठवाड्याच्या पत्रकारितेचा इतिहास मानता यावा!
श्री. फटाले यांचे मूळ गाव पूर्वीच्या निझाम संस्थानातील मुधोळी (जिल्हा गुलबर्गा) पण रझाकारांच्या छळामुळे त्यांचे कुटुंब सोलापुरात स्थलांतरीत झाले. तेथेच नागनाथराव जन्मले. पुणे विद्यापीठाच्या इंटर कॉमर्स परीक्षेत अर्थशास्त्राचे ते 1959 चे सुवर्णपदकाचे मानकरी. 1962 ते 64 दरम्यान त्यांनी सोलापूरच्या संचारसाठी बातमीदारी केली. सन 1967 मध्ये ‘भूज’ पाकिस्तानला देऊ नये म्हणून दीर्घकालीन सत्याग्रह सीमेनजकीच्या खावडा येथे झाला. त्या काळात सत्याग्रहींची व्यवस्था करणे, तेथील बातम्या पाठविणे ही कामे केली. शेवटच्या तुकडीत ते सामील झाले. त्याचा परिणाम म्हणून त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. भूज तुरुंगातून सुटल्यानंतर ते 1968 साली औरंगाबादला आले आणि त्यांनी ‘मराठवाडा’ दैनिकात पूर्ण वेळ बातमीदार म्हणून कामाला सुरूवात केली. 1978 ते 1987 पर्यंत ते ‘टाईम्स ऑफ इंडिया (मुंबई) या इंग्रजी दैनिकाचे तसेच पुण्याहून प्रकाशित होणार्या ‘दै. सकाळ’चे अर्धवेळ बातमीदार म्हणून कार्य केले. 1987 पासून ‘दैनिक सकाळ’ चे पूर्णवेळ बातमीदार म्हणून काम पाहू लागले. जून 2004 पर्यंत ते ‘सकाळ’समवेत कार्यरत होते. सन 1978 पासून विद्यापीठ पत्रकारितेच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मानद प्राध्यापक म्हणून त्यांनी वृत्तलेखन आणि विकास पत्रकारिता या विषयाचे अध्यापनही उत्कृष्टपणे केले.
सार्वजनिक जीवनात श्री. फटाले यांचा मोठा सहभाग राहिला. मराठवाड्यातील पहिली ग्राहक चळवळ सुरू (1972-74) करण्याचा मान त्यांच्याकडे जातो. 1977 च्या आसपास फटाले यांनी कामगार क्षेत्रात प्रत्यक्ष कार्य सुरू केले. एस. टी. हमालांची त्यांनी राज्यस्तरीय संघटना बांधली. साधारण 1968 च्या नंतरचा काळ लक्षात घेता म्हणावे लागते की, त्याकाळी वृत्तपत्रात पाऊसपाणी, पिके यासंबंधी फारच कमी बातम्या येत असत. त्याही काळात शेतीसंबंधी घटना, घडामोडी याही बातमीचे विषय आहेत, हे श्री. फटाले यांनी सातत्याने दाखवून दिले. सन 1985 च्या आसपास दुष्काळाच्या संदर्भातील लेखमालिका लिहिली. त्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय विकास पत्रकारितेबद्दल प्रथम क्रमांक पुरस्कार प्रदान करण्यात आला. मराठवाड्यातील जनजीवन, प्रश्न, सांस्कृतिक- शैक्षणिक प्रगती, विशेषतः दलितांच्या आकांक्षा, मागासलेपणातून निर्माण झालेल्या भावना, गरिबांचे प्रश्न, बेकारांचे प्रश्न, कलावंत, ऐतिहासिक स्थळे, पैठणी उत्पादन यांचा परिचय श्री. फटाले यांच्या बातम्या व वार्तापत्रांतून मराठवाड्यातील वाचकांना झाला. त्यांची ही कामगिरी नोंद घेण्याजोगी होय.
श्री. नागनाथ फटाले यांचे कार्य फक्त पत्रकारिता व शिक्षण एवढ्यापुरतेच मर्यादित नव्हते तर त्यांनी सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम केले. कामगारांच्या संघटना बांधल्या, उभारल्या, ग्राहक चळवळ उभी केली. याचबरोबर ज्योतिषशास्त्र व परामानसशास्त्र अकादमी, औरंगाबाद येथे उभारली. त्याचे त्यांनी संस्थापक अध्यक्ष म्हणूनही कार्य केले. तसेच ग्रंथालय चळवळीत अनेक वर्षे काम केले. औरंगाबादेतील सिटीझन फोरमचे ते सदस्य आहेत. आरंभीच्या काळात फटाले यांनी काही शासकीय समित्यांवर काम केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेटवर ते पदवीधर मतदारसंघातून निवडून आले.
विधायक बदलाची नोंद घेण्याबरोबरच विधायक कार्य करण्याला समाजाला प्रवृत्त करण्याची क्षमता विकास पत्रकारितेमध्ये असते. सामान्य जनांना विकासाची प्रेरणा मिळावी आणि विकासकार्यात त्यांचा सहभाग वाढावा आणि त्यातून सामान्य माणसाचा जीवनस्तर उंचवावा ही पत्रकारितेकडन अपेक्षा केली जाते. मराठवाड्यातील ज्येष्ठ पत्रकार श्री. नागनथ फटाले यांनी आयुष्यभर अशा विधायक बदलांची नोंद घेतली. त्यांनी लिहिलेली विकासविषयक वार्तापत्रे याची साक्ष देतात...
त्यांच्या या कार्यप्रवासाचा गौरव आज ‘गोविंद सन्माना’ने होतो आहे यात श्री. फटाले यांचा सन्मान आहे आणि या पुरस्काराचाही तो आगळा गौरव आहे.
- दत्ता जोशी, औरंगाबाद