Monday, September 16, 2013

दोस्ताची सुहागरात आणि ‘आलार्म क्लॉक’

मी आत्मवृत्त लिहिणार आहे... लिहायलाच हवे... 
एका सामान्य माणसाच्या आयुष्यातसुद्धा असंख्य वेगळ्या घटना घडत असतात...
माझ्या षष्ट्यब्दीपुर्तीदिनी, १५ जुलै २०३१ रोजी याचे प्रकाशन होईल... 
पुस्तकाचे नाव अजून ठरायचे आहे...

त्यासाठीचे लेखन आतापासूनच टप्प्याने टप्प्याने सुरु केले आहे. कारण, वयाच्या तिशीच्या आतील घटना पुढे विस्मरणात जाण्याची शक्यता... 

या आगामी पुस्तकातील `इब्लिसपणा` या सर्वात छोट्या विभागातील 
हा एक लेखांक... 
अशी काही निवडक प्रकरणे मी इथे अधून मधून शेयर करीन.....
........
  
दोस्ताची सुहागरात आणि ‘आलार्म क्लॉक’

दोस्ताचे लग्न झाल्यावर त्याच्या ‘सुहागरात’च्या तयारीची जिम्मेदारी आपल्यावरच येते ना? 
मी स्वतःहून अशाच एका ‘सुहागरात’च्या तयारीची जिम्मेदारी घेतली आणि त्याची पहिली रात्र आयुष्यभरासाठी संस्मरणीय करून टाकली...! 
कशी? 
तेच तर वाचा...! 

साहित्य? गुलाबाची 500 फुले, समई-तेल-वात-काडेपेटी, अलार्मची पाच घड्याळे, एक स्टूल. साहित्य वाचून गंमत वाटतेय? मग हे सारे करताना आम्हाला किती गंमत वाटली असेल...? ही घटना आहे साधारण 1997-98 ची...!

आमच्या दोस्ताचा विवाहसोहळा मोठ्या उत्साहात, थाटमाटात साजरा झाला. लग्न लावून वर्‍हाड रात्री घरी परतले. सगळीकडे निजानीज झाली. दुसर्‍या दिवशी सर्वांची विश्रांती झाली. लग्नाची तिसरी रात्र ‘सुहागरात’साठी घरच्यांनी मुक्रर केली. एकदा हा ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला, की पुढच्या वाटा ज्याला-त्याला ठावूक असतात. आमचे रस्ते आम्हाला माहिती होते. दोस्ताच्या आयुष्यातील ही संस्मरणीय रात्र ‘अधिक संस्मरणीय’ करण्याचे मी ठरविले आणि दुसर्‍या एका दोस्ताला मदतीला घेऊन तयारीला लागलो. माझ्याप्रमाणेच हा दोस्तही ‘अनुभवी’ होता. 

आधी एका नर्सरीवाल्याला गाठून 500 गुलाबांची ऑर्डर दिली. फुले संध्याकाळी ताजी ताजी दे, असे त्याला सांगून टाकले. दोस्ताच्या आईकडून एक मोठी समई ताब्यात घेतली. तेल-वात-काडीपेटी घेऊन ठेवली. मग सजवायची रुम ताब्यात घेतली. कॉट वगैरे व्यवस्थित, मजबुत आहे की नाही ते चेक केले. गादी तपासून घेतली. नवे बेडशीट-पिलो कव्हर घालून सारी सज्जता तर झाली. कामवालीकडून आधी रूम स्वच्छ करून घेतली. मग रुमला लॉक केले. बाहेर पडलो. दुसरा ‘अनुभवी’ दोस्त सोबत होताच. 

गुलाबाची फुले ताब्यात आल्यानंतर मी त्याला म्हणालो, ‘आपल्याला चार पाच घड्याळे लागतील.’
तो म्हणाला, ‘कशाला?’
मी म्हणालो - ‘तुला काय करायचे? कुठे मिळतील, ते बघ’. 

मग आम्ही चार - पाच मित्रांकडे फिरलो. खणखणीत पण वेगवेगळ्या ट्यून्सचा अलार्म असलेली पाच घड्याळे जमविली. पिशवीत टाकून घरी आणली. मग रुम सजवायला सुरवात केली. फुलांच्या पाकळ्या मोकळ्या केल्या. बेडवर अंथरल्या. इतक्या दाट, की बेडशीट दिसू नये! खोलीभर पाकळ्याच पाकळ्या! गुलाबाच्या ओरिजनल सुगंधाचा घमघमाट सुटलेला! एक स्टूल घेतला. त्यावर कव्हर टाकून समई ठेवली. तेल-वात टाकून ठेवली. रुम तर सज्ज झाली. खूप सुंदर दिसत होती. मग आली अलार्म क्लॉकची पाळी. ही घड्याळे ‘सेट’ केली.

साधारणपणे रात्री 9 च्या सुमाराला समई पेटवली, खोलीतील लाईट घालविले, बाहेर आलो आणि दरवाजा बंद करून मी आणि माझा दुसरा दोस्त दरवाजातच बसून राहिलो. इकडे ‘सुहागरात’वाल्या दोस्ताची (आणि त्याच्या बायकोचीही) बेचैनी वाढत होती. आम्ही खोलीचा ताबा त्यांना देण्यास तयार होतो, पण त्या आधी आमचा ‘मेहनताना’ म्हणून त्यांनी प्रत्येकी हजार हजार रुपये दिले पाहिजेत, असा आमचा आग्रह होता. थोड्या कमी रकमेवर तडजोड झाली. (अर्थात ‘मेहनतान्या’चा आग्रह पैसे मिळविण्यापेक्षाही त्यांची बेचैनी वाढविण्यासाठीच होता, हे सूज्ञ वाचकांनी ओळखलेच असेल! दुसऱ्या दिवशी याच ‘मेहनतान्या’तून त्याला `कोनिका`चे ३ रोल खरेदी करून दिले आणि बाकी पैसेही परत केले, ही गोष्ट निराळी.) अखेर ‘नवपरिणित दाम्पत्या’ने शयनकक्षात प्रवेश केला. त्यांना एकांत देऊन आम्ही तेथून निघून आपापल्या घरी परतलो. 

आता मला उत्सुकता लागली होती - अलार्म घड्याळांनी बजावलेल्या कामगिरीची!
मात्र, दुसर्‍या दिवशी सकाळी दोस्ताकडे जायची हिम्मत होत नव्हती! 

तो काय करील, याची शाश्‍वती नव्हती. कदाचित त्यातील एखादे घड्याळ तो माझ्या डोक्यात फेकून मारण्याचीही शक्यता होती!

मी दुसर्‍या दोस्ताला भरीला पाडले. सकाळी 10 च्या सुमारास घरी फोन करून अंदाज घेण्यास सांगितले. तेव्हा मोबाईल नव्हते. लँडलाईनवर फोन करून त्याने अंदाज घेतला आणि मला ग्रीन सिग्नल दिला.

ग्रीन सिग्नल मिळूनही, मी दबकत दबकतच 12 च्या सुमारास सुहागरातवाल्या दोस्ताच्या घरी पोहोचलो. मी दारापर्यंत पोहोचतो, न पोहोचतो तेव्हाच दोस्त अंगावर धावून आला. घरातच असल्याने बिचार्‍याच्या तोंडी त्यातल्या त्यात सौम्य शिव्या होत्या.
त्याची रात्र ‘संस्मरणीय’ ठरल्याची माझी खात्री झाली.

मी घरात पहिले, आम्ही मोठ्या मिनतवारीने जमविलेली सगळी घड्याळे ‘विकलांग’ झाली होती. एकाची काच फुटली होती. बाकीच्या घड्याळांचे सेल विखुरले होते... मी ते सगळे एकत्र केले!

घरी पोहोचताक्षणी सुरू झालेला दोस्ताच्या शिव्यांचा उमाळा काही मिनिटांनी थोडा थंडावला आणि मग मी आस्थेवाईकपणे चौकशी सुरू केली, तेव्हा दोस्ताने एक एक गोष्ट कबुल करायला सुरवात केली. तो म्हणाला, ‘‘सगळे लाईट बंद करून फक्त समई चालू ठेवायची तुझी आयडिया जबरदस्त होती.’’ म्हटले, ‘ओके.’

मग म्हणाला, ‘अलार्म क्लॉक’ची आयडिया कुणाची?’
म्हणालो- माझी.

दोस्त मोकळ्या मनाने म्हणाला, ‘टायमिंग जबरदस्त जमले होते!’

जमायलाच हवे होते ना. नसते जमले तर आमचा अनुभव काय कामाचा? 

मग त्याने एकेका घड्याळाची संक्षिप्त स्टोरी सांगितली.
त्याने सांगितलेली आणि त्यानुसार `बिटवीन द लाईन्स` आम्ही कल्पिलेली ही ‘उभयपक्षी’ कहाणी येणेप्रकारे -

पहिला अलार्म रात्री 10.30 चा ठेवला होता. ते घड्याळ समईखाली होते. सहज सापडण्यासारखे. त्यांना थोडा डिस्टर्ब झाला, पण घड्याळ लगेचच सापडले. अलार्म डिसेबल केला. सुहागरात पुढे सुरू.

दुसरा अलार्म रात्री 11चा होता. हे घड्याळ भिंतीमध्ये असलेल्या कपाटातील पुस्तकांमागे होते. रंगाचा थोडा भंग झाला पण थोड्या मेहनतीने घड्याळ सापडले. अलार्म बंद केला. माझ्या नावाने चार शिव्या देत त्याने पुढील काम सुरू केले.

तिसरा अलार्म रात्री 12 चा होता. या वेळची ‘वेळ’ जास्तच अडचणीची ठरली. घड्याळ सापडेना, अलार्म चालूच... कारण घड्याळ बुटांच्या कप्प्यात, बुटांत लपविले होते. कसेबसे सापडले... दोस्ताने अलार्म बंद केला आणि घड्याळ जोराने आपटले...

चौथा अलार्म रात्री पाऊण चा होता. या वेळी मात्र स्थिती खूपच बिकट आणि हातघाईची होती! एकीकडे अलार्म घणाणत होता आणि घड्याळ तर सापडतच नव्हते... त्यात चार-पाच मिनिटे गेली... अखेर लक्षात आले, घड्याळ सिलिंग फॅनच्या वर असलेल्या उलट्या वाटीत आहे... त्याने आधी फॅन ऑफ केला. तो लवकर थांबतच नव्हता. चक्क हाताने थांबविला आणि स्टूलवर चढून घड्याळ काढले, अलार्म ऑफ केला आणि फेकून दिले. काच फुटली.

पाचवी वेळ मात्र आणीबाणीची ठरली...! रात्रीचे दोन वाजलेले... सारे काही ‘सुरळीत’ चाललेले... अचानक अलार्म वाजू लागला... दाम्पत्य बेचैन... घड्याळ काही सापडेना. बुटाचा कप्पा, समई ठेवलेला स्टूल, पुस्तकाचा कप्पा... सगळे काही तपासून झाले. आवाज तर चालू होता. खोलीच्या मध्यभागातून येत होता. अखेरचा उपाय म्हणून त्याने कॉटच्या खाली डोकावून पाहिले. घड्याळ कॉटला खालून बांधलेले होते. एखाद्या जीपच्या खाली बॉम्ब बांधतात ना, तसे...! (मग... आमचे डोके आहे बॉस!) हे घड्याळ आम्ही बांधले एवढे मजबुत होते, की त्याला सोडवता येईना. पठ्ठ्याने सारे बळ एकवटून खेचून काढलेे. पण आवाज बंद करण्याचे बटन सापडेना... मग त्याने ते घड्याळ चक्क भिंतीवर जोराने आपटले... घड्याळ फुटले, सेल बाहेर पडले आणि आवाज एकदाचा बंद झाला...! 

त्यानंतरचा आलार्म मी लावलेला नव्हता... पण त्यांच्या मनात धास्ती बसलेलीच होती...!

मी सगळी घड्याळे गोळा केली. नव्याने चालू केली. फुटलेल्या काचा बदलण्यासाठी दुसर्‍या दोस्ताला बाजारात पाठविले... 

अलार्मच्या घड्याळाचा ‘वेगळा’ उपयोग आम्ही प्रयोगात आणून पाहिला होता...!