Tuesday, July 1, 2014

सव्यसाचि प्राचार्य - रामदास डांगे

प्राचार्य रामदास डांगे हे परभणीच्या शैक्षणिक आणि आध्यात्मिक इतिहासातील अपरिहार्य नाव. शिवाजी महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची जबाबदारी सांभाळणे असो की साहित्य संस्कृती मंडळाचे मराठी शब्दकोश प्रकल्पाचे प्रमुखपद असो... प्रत्येक जबाबदारी त्यांनी निष्ठेने सांभाळली. श्री ज्ञानेश्वरी मूलपाठ दीपिकेचे त्यांनी केलेले काम सुद्धा अलौकिक म्हणावे लागेल. प्रत्येक जबाबदारी निष्ठेने पार पाडणार्‍या प्राचार्य डांगे यांच्या सव्यसाचित्त्वाबद्दलच्या या आठवणी... आज १ जुलै रोजी पहाटे ते कालवश झाले...
 -------------------------------------------------------
तेया सर्वात्मका ईश्वरा। स्वकर्म कुसुमांची वीरा ।
पूजा केली होये अपारा । तोषालागि॥
‘‘तुम्ही करत असलेले काम हे ईश्वराचे काम आहे, भगवंताचे काम आहे... त्याची पूजा करायची तर ती स्वकर्माने करा... भगवंताला इतर कोणत्याही अवडंबराची गरज नाही...’’, ज्ञानेश्वरीचा दाखला देत डांगे सर सांगत असत.
समोर येईल ते प्रामाणिकपणे, सातत्याने, निष्ठापूर्वक करत जावे...’ , असे सांगताना ते आपले स्वतःचे आयुष्यच त्याच्या उदाहरणादाखल सादर करत..! प्राचार्य रामदास खुशालराव डांगे हे नाव म्हणजे परभणीच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आध्यात्मिक इतिहासातील एक अविभाज्य घटक. एक व्यक्ती किती प्रकारे, किती क्षेत्रांत आपले योगदान देऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे डांगे सर.
डांगे सर सन २००७ पासून पुणे मुक्कामी असत. मराठी शब्दकोश निर्मितीचे अनेक वर्षांपासून रेंगाळलेले काम त्यांनी सन 2007 ते २०१४ या काळात पूर्ण केले.  निवृत्तीनंतर केवळ उपजीविकेपुरते मानधन घेऊन पूर्ण समर्पित भावनेने या कामासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे. सन 1970 मध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेले काम रेंगाळले. मागची 20 वर्षे हे काम सांभाळण्यासाठी कोणीही तयार नव्हते. मधु मंगेश कर्णिक यांनी पाठपुरावा केला आणि सन 2007 मध्ये डांगे सरांनी हे काम हाती घेतले. मराठी सारस्वताच्या प्रांगणातील एक महत्त्वाचे योगदान या निमित्ताने डांगे सरांनी दिले. त्यांच्या आजवरच्या वाटचालीत अशा अनेक नोंदी आहेत. त्यामुळेच त्यांच्याबद्दल सर्वांच्या मनात अपार आदरभाव आहे.
डांगे सर ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व. ऋषीचं कूळ विचारू नये, असे म्हणतात. पण सरांसारख्या ऋषीचं कूळ-मूळ ठाऊक असण्याने त्यांच्या तपश्‍चर्येचे महत्त्व अधोरेखित होते. सरांचे सारे आयुष्य परभणीत गेलेले असले, तरी ते मूळचे परभणीचे नाहीत. विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील भालसी हे त्यांचे जन्मगाव. 12 जून 1936 हा त्यांचा कागदोपत्री जन्मदिनांक. खुशालराव आणि बिंदूबाई यांच्या परिवारातील 10 अपत्यांपैकी सर सर्वात धाकटे. त्यांचे वडील वारकरी. त्यामुळे घरात आध्यात्मिक परंपरा जुनीच. घरची परिस्थिती शिक्षणासाठी अतिशय प्रतिकूल. अशा परिस्थितीत त्यांच्यातील हुशारी जोखून मॅट्रिकपर्यंत नेणारे अमरावतीचे लेले मास्तर त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती ठरले. लेले मास्तरांनी सरांना शिकविले, अन्न-वस्त्राची सोय केली आणि फी सुद्धा भरली...! डांगे सर सांगतात, ‘लेले मास्तरांमुळे माझ्या आयुष्याचे सोने झाले.
सर्व प्रतिकूलतेतून मार्ग काढत ते इंटरपर्यंत पोहोचले. तेव्हा त्यांचा अभ्यासविषय गणित होता. त्यानंतर त्यांनी विषय बदलला. अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयातून ते 1958 मध्ये बी.ए. आणि 1960 मध्ये एम.ए. झाले. मराठी घेऊन पूर्ण केलेल्या या दोन्ही अभ्यासक्रमांत त्यांनी विद्यापीठात प्रथम येत सुवर्णपदके पटकावली. त्या वेळच्या रुढींप्रमाणे बी.ए. करतानाच 1957 मध्ये ते विजयाबाईंशी विवाहबद्ध झाले. त्यांचे लग्न जलीलभाई नावाच्या एका मुस्लिम गृहस्थाने जुळविले. विजयाबाई मूळच्या अकोल्याजवळील टाकळीच्या.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उपजीविकेसाठी नोकरीची गरज होती. अमरावतीच्या शिवाजी महाविद्यालयात त्यांना शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांनी प्राध्यापकाची नोकरी दिली. 1960 ते 1961 या शैक्षणिक वर्षांदरम्यान ते या महाविद्यालयात कार्यरत होते. जून 1961 मध्ये त्यांच्यासमोर वेगळा पर्याय आला. शिशुपालवधया विषयावरील पहिले जुने हस्तलिखित मिळवून त्यावर डॉ. मा. गो. देशमुख अमरावतीत काम करीत होते. त्यांची बदली औरंगाबादला झाली. त्यांच्या भेटीसाठी डांगे सर औरंगाबादेत आले. ज्येष्ठ साहित्यिक ग.त्र्यं. माडखोलकर यांचे चिरंजीव तेव्हा औरंगाबादेत नोकरीत असल्याने ते सुद्धा तेथे आलेले होते. तेव्हा देवगिरी महाविद्यालयाच्या संस्थेचे अध्यक्षपद विनायकराव पाटील यांच्याकडे होते. ते माडखोलकरांचे स्नेही. त्यातून डांगे सरांसमोर औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू होण्याचा प्रस्ताव आला. तो त्यांनी स्वीकारला आणि 15 जून 61 रोजी ते देवगिरीत रुजू झाले. दोन वर्षे देवगिरी महाविद्यालयात काम केल्यानंतर 15 जून 1963 रोजी त्यांना प्रोफेसरपदी बढतीही मिळाली. पण 15 दिवसांतच त्यांच्यासमोर परभणीत शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून रुजू होण्याची ऑफर ठेवण्यात आली. त्या काळातही औरंगाबाद सोडून परभणीत येण्याचा विचार धाडसीच होता. पण ते धाडस डांगे सरांनी केले आणि ते 1 जुलै 1963 रोजी शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून परभणीत दाखल झाले. तेथे ते 12 वर्षे प्राचार्य होते. जनाबाई महाविद्यालयाचे 11 वर्षे आणि महिला महाविद्यालयाचे 10 वर्षे अशी तब्बल 33 वर्षे त्यांनी प्राचार्यपदांची जबाबदारी सांभाळली...! या काळात अनेक पिढ्या त्यांच्या हाताखाली घडल्या.
प्राचार्यपदाची जबाबदारी सांभाळताना सुद्धा त्यांच्यातील सामाजिक भान असणारा माणूस गप्प बसलेला नव्हता. प्राचार्यपदावर असतानाच सामाजिक कारणांसाठी ते तीन वेळा तुरुंगात गेले. पहिला प्रसंग 1972 मध्ये परभणीत कृषिविद्यापीठ स्थापन होण्याच्या मागणीचा. त्या साठी तेव्हा पुकारलेल्या आंदोलनात त्यांना अटक करण्यात आलेली होती. त्यानंतर, 1975 च्या दरम्यान आणीबाणीच्या काळात जयप्रकाश नारायण यांनी पुकारलेल्या आंदोलनात ते सहभागी झाले होते. बराच काळ ते भूमिगत होते. 1992 मध्ये देशभर पेटलेल्या राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनात सुद्धा ते सहभागी झाले होते. त्या काळातही त्यांना काही काळ तुरुंगात टाकण्यात आले होते. त्यांची वैयक्तिक मते त्यांनी प्रत्येक वेळी स्पष्टपणे मांडली असली, तरी परभणीतील अनेक मोठ्या मोठ्या लोकांच्या व्याख्यानांच्या - कार्यक्रमांचे अध्यक्षस्थान भूषविण्याची विनंती विविध विचारधारांच्या संयोजकांनी डांगे सरांनाच केलेली होती. वैयक्तिक मते आणि सामाजिक आचरण यांचा समतोल त्यांनी नेहेमीच साधला. 
जून 1996 मध्ये सर निवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर बहुतेक जण सुखाचे आयुष्य जगण्यासाठी घर बांधतात, एखाद्या ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य होतात आणि शिळोप्याच्या गप्पा मारण्यात वेळ घालवतात, हे सार्वत्रिक चित्र. पण डांगे सरांच्या बाबतीत नेमके उलट घडले. नोकरीच्या काळात वेळेअभावी, त्या त्या कामांना पुरेसा वेळ देता येत नसल्यामुळे जी कामे शक्य झाली नाहीत, ती त्यांनी सेवानिवृत्तीच्या नंतर हाती घेतली...! त्यातील पहिले काम होते ज्ञानेश्वरीच्या मूळपाठांचे संशोधन.
संत ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी सांगितली. ती त्यांच्या सच्चिदानंदबाबा या शिष्याने लिहून काढली. त्यानंतरच्या शेकडो वर्षांच्या प्रवासात या ज्ञानेश्वरीच्या असंख्य प्रती लिहिल्या गेल्या. त्यातून लिहिणार्‍याच्या योग्यतेप्रमाणे त्यात असंख्य पाठभेद निर्माण झाले. त्यावर संशोधन करून मूळ ज्ञानेश्वरी सिद्ध करण्याचे आव्हान उचलण्याचे डांगे सरांनी निवृत्तीनंतर ठरविले आणि 1996 ते 2007 या काळात एकट्याने मेहनत करून श्री ज्ञानदेवी मूलपाठ दीपिकालिहून काढली...! हे काम सोपे नव्हते.
वास्तविक हे काम 1962 मध्येच अनौपचारिकरित्या त्यांनी सुरू केले होते. मामासाहेब दांडेकर औरंगाबादेत आले होते तेव्हा त्यांच्याशी झालेल्या चर्चेत या विषयाचे सूतोवाच झालेले होते. तेव्हापासूनच हा विषय सरांच्या मनात घोळत होता. खरे तर त्या आधीही डांगे सरांनी या विषयावर लिहिले होते. 1958 मध्ये बी.ए. करत असतानाच त्यांनी ज्ञानेश्वरीच्या तिसर्‍या अध्यायावर एक टिपण प्रसिद्ध केले. त्यावर प्रा. भाऊ मांडवकर यांनी तेव्हा यवतमाळहून प्रकाशित होणार्‍या लोकमतमध्ये परीक्षण लिहिले होते. ज्ञानेश्वरीतील पाठभेदावरील विचार तेव्हापासून मनात कायम होता. त्यातही, वारकरी संप्रदायाची घरातील परंपरा त्यांना या विषयाकडे पुनःपुन्हा ओढून नेत होती.
ते सांगतात, ‘‘नक्कल उतरवताना लेखक चुका करतो. राम-रमा-रमी... साधारण एकसारखे वाटणारे शब्द... लेखक अशा चुका करू शकतात. त्यातून पाठभेद निर्माण होतात. हे दूर करण्यासाठी काय करायचे? सर्व भागांत प्रवास करून मी 40 प्रती निवडल्या. त्यांचा अभ्यास सुरू केला.’’
प्रती मिळविण्याचे हे काम खूप महत्त्वाचे होते, तसेच जबाबदारीचेही. अभ्यासासाठी नेमकी कोणती प्रत मिळवायची, याचे आडाखे महत्त्वाचे होते. त्या दृष्टीने विचार करून तशी पार्श्‍वभूमी असलेली हस्तलिखिते त्यांनी मिळविली. त्यांचा अभ्यास सुरू केला. 1996 मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी या विषयात पूर्णांशाने लक्ष घातले. ते सांगतात, ‘‘ज्ञानेश्वरी हा श्रेष्ठ ग्रंथ आहे. तो शुद्ध असलाच पाहिजे. या आधीही यामध्ये शुद्धीचे प्रयोग झाले, पण मूळ प्रतीच निवडताना त्या सदोष निवडल्या गेल्या. त्यामुळे प्रमाण प्रत समोर आली नाही. 1907 मध्ये मुंबईत माडगावकरांनी प्रसिद्ध केलेली प्रत महत्त्वाची होती. प्रा. हर्षे, प्रा. बनहट्टी यांनी केलेले काम अपूर्ण राहिले. पण ते चांगले काम होते. मीही काही हस्तलिखिते मिळविली. या पोथ्यांसाठी मी दोन वर्षे भारतभर प्रवास केला. एक प्रत तर मला अंदमानातून मिळाली!’’
हे काम सुरू केले, त्या आधी त्यांची पांडुरंगशास्त्री आठवले यांच्याशी भेट झाली. पांडुरंगशास्त्री म्हणाले, ‘‘या कामासाठी कुणाचे अनुदान घेऊ नकोस. ही माउलींची सेवा आहे.’’ आणि ते खरेच होते. डांगे सरांच्या मनातही हाच भाव होता. कारण, या कामी सरकारी अनुदानासाठी प्रयत्न केला असता, तर कदाचित 8-10 लाखाचे अनुदान पदरात पडले असते. एखादा सहाय्यकही मिळाला असता. पण डांगे सर त्या मोहात पडले नाहीत. चार माणसांचे हे काम त्यांनी एकट्यांनीच पुढे रेटले. कसे असते हे नेमके काम? चार जणांनी एकत्र बसून आपापल्याकडील मूळ प्रतींचे वाचन करायचे. त्यातील शब्दांची रचना शोधायची. त्यातून योग्य पाठ निवडायचा...! ज्ञानेश्वरीतील प्रत्येक अक्षर अशा पद्धतीने वाचायचे...!
डांगे सरांनी हे काम एकट्याने केले. ज्ञानेश्वरीत 9 हजार ओव्या आहेत. प्रत्येक ओवीत 10 शब्द. असे 90 हजार शब्द, त्यांची अक्षरे... अशी साडेतीन लाख अक्षरे... ती सुद्धा 40 पोथ्यांतून तुलना करून घ्यायची... हे काम खूप मोठे आणि कठीण होते. या कृतीला टेक्सच्युअल क्रिटिसिझमम्हणतात. मराठीत त्याला पाठचिकित्साम्हणता येते. पाठचिकित्सेमध्ये संहितानिश्‍चितीकिंवा संहितेचे मूलस्थापनअभिप्रेत असते. उपलब्ध प्रतींच्या आधाराने ग्रंथाच्या मूलरूपाचा शोध घेणे, संहितेची यथामूल पुनःस्थापना करणे हे अशा अभ्यासाचे उद्दिष्ट होय.’ 
प्रतिशुद्ध प्रतीचा इतिहास संत एकनाथांपासून सुरू होतो, असे सांगताना डांगे सर नाथांच्याच काही ओळी समोर ठेवतात -
श्रीशके पंधाराशे साहोत्तरी। तारण नाम संहोत्सरी। 
एका जनार्दनें अत्यादरी। गीताज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली॥
ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध। परि पाठांतरि शुद्धाबद्ध।
तो शोधुनियां एवंविध। प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी॥
या परंपरेत अनेक मान्यवरांनी हे काम केलेले आहे. डांगे सरांनी अलिकडच्या काळात केलेले हे काम त्यामुळेच महत्त्वाचे ठरते. आपली इतर सर्व कामे बंद ठेवून सरांनी 1996 ते 2003 या काळात हे काम पूर्ण केले. या द्विखंडात्मक ग्रंथाचा पहिला खंड पुण्याच्या श्री वामनराज प्रकाशनाने 23 मार्च 2003 रोजी प्रकाशित केला. दुसरा खंड प्रकाशित होण्यास मात्र बराच वेळ गेला. त्याचा अभ्यास 2007 मध्येच पूर्ण झाला, पण अशा ग्रंथांना आर्थिक दृष्टीने मांडलेली गणिते सोडविणे जमत नसते... अखेर डायमंड पब्लिकेशन्स यांनी 16 मार्च 2010 रोजी दुसरा खंड प्रकाशित केला. या दोन खंडांतून डांगे सरांनी आपल्या अभ्यासकौशल्याला पणाला लावून केलेले एकहाती काम अभ्यासकांसमोर आले.
या कामाबद्दलची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतात. डॉ. तुकाराम गरूड, डॉ. अरुण प्रभुणे सांगतात,  ‘‘सरांनी समीक्षित संहितापद्धतीची रूढ चाकोरी सोडून स्वतःची अशी एक व्यवहार्य रीत शोधली व वापरली. पाठभेदाचे अथवा संहिता चिकित्सेचे कार्य पारंपरिक पद्धतीत कागदावर रकाने पाडून व त्या प्रत्येक रकान्यामध्ये चरणातील एक एक अक्षर नोंदवून; ते प्रत्येक अक्षर तपासत जाणे, हे काम आजवर चालत आले आहे. डांगे सरांनी ही पद्धत स्वीकारली नाही. आधारप्रत पाहिजे, असा आग्रह न धरता त्यांनी एका मुद्रित प्रतीत पाठभेद नोंदविण्याचे काम केले. हस्तलिखितांचे दोन गट करून त्यातही पाठभेद त्या प्रतींत नोंदविले. मुद्रित प्रतींचा एक आणि हस्तलिखित प्रतींचे दोन असे तीन संच करून तर्कशुद्ध पाठसंहितभागी लिहून त्या खाली इतर प्रतीतील पाठांची नोंद केली. सरांचा हा नवा प्रयोग व्याप व पसारा कमी करणारा ठरलाच, शिवाय पूर्वीच्या पाठचिकित्सेत होणार्‍या चुका या पद्धतीत संपुष्टात आल्या. पाठचिकित्सा करण्यामागे सरांची भूमिका स्वच्छ दिसते. उगाच गरळ ओकण्यापेक्षा व कोणाची निंदानालस्ती करून संशोधनात कसा गोंधळ चालला आहे हे दाखविण्यापेक्षा विद्वानांच्या अभ्यासपूर्ण मतांचा परामर्श घेणे हा त्यांचा स्वच्छ हेतू दिसतो.’’ 
ही कामगिरी पूर्ण होत असतानाच त्यांच्यासमोर दुसरे आव्हान ठेवण्यात आले.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या प्रेरणेतून सन 1970 च्या सुमारास सुरू झालेले मराठी शब्दकोशाचे काम डांगे सरांकडे सोपविण्याचा निर्णय शासनाने घेतला. हे काम खूप मोठे आहे. साधारणपणे तीन हजार डबलडेमी पृष्ठांचे (म्हणजे या पुस्तकाच्या पृष्ठाच्या दुप्पट आकाराचे पृष्ठ), एक लाख 25 हजार शब्दांचा समावेश असलेले सहा खंडांतील हे काम खूप आधी पूर्ण होणे गरजेचे होते. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या वतीने हे काम होत असल्यामुळे त्याचा दर्जा, गुणवत्ता सर्वश्रेष्ठच असणे अपेक्षित होते. हे काम सुमारे 20 वर्षे ठप्प होते. ज्ञानेश्वरीच्या कामाच्या पूर्ततेनंतर मंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ मराठी साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या पाठपुराव्यातून शासनाने हे काम डांगे सरांकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आणि सन 2007 मध्ये सर पुण्यात डेरेदाखल झाले.
काही लाखांच्या कमाईची चांगली संधी असतानाही पतीपत्नीच्या उपजीविकेपुरते पैसेघेत डांगे सरांनी या कामाला प्रारंभ केला. दोन दशके बंद असलेले काम करताना ते पुन्हा पहिल्यापासूनच सुरू करावे लागते. काळानुरूप भाषा बदललेली असते, नव्या भाषेतील शब्द आपल्या भाषेत आलेले असतात. या सर्वांचा धांडोळा घेत हे काम पूर्ण करावे लागते. या कामासाठी सरांनी कंबर कसली. डोंगराएवढे हे काम सन 2007 ते 2014 या काळात सरांच्या नेतृत्त्वाखाली नेटाने पूर्ण करण्यात आले. ते मार्च 2014 मध्ये 6 खंडांत प्रकाशित झाले. पुरवणीचे कामही सन 2014-15 मध्ये पूर्ण होईल.
हे काम संपते न संपते तोच त्यांच्याकडे व्युत्पत्ती कोशाचे काम सोपविण्यात आले होते. मराठीतील विविध शब्दांची व्युत्पत्ती कशी झाली, याचा शोध यामध्ये घ्यावयाचा आहे. हे काम डिसेंबर 2014 मध्ये संपणे अपेक्षित होते. मराठीतील अनेक मूळ शब्द वेगवेगळ्या भाषांतून आले आणि मराठीत रूढ झाले. तमिळ, कानडी, तेलुगू, पोर्तुगिज, इंग्रजी, संस्कृत, हिंदी, उर्दू, फारसी, अरबी अशा विविध भाषांतून आलेले हे शब्द शोधून त्यांचे मूळरूप शोधून काढायचे.  अलीकडेच तिसरे एक काम प्राचार्य डांगे यांच्याकडे आले आहे. संतकवी दासोपंत विरचित गीतार्णवाच्या शब्दकोशाचे काम राज्य मराठी विकास संस्थेने त्यांच्याकडे सोपविले आहे. गीतार्णवहा मराठी भाषेतील पहिला आणि शेवटचा बृहद्ग्रंथ मानला जातो. या ग्रंथाची ओवीसंख्या आहे सव्वा लाख! संपूर्ण ग्रंथही प्रकाशित नाही. त्यामुळे हस्तलिखिताच्या आधारे हे काम करावे लागणार आहे. हस्तलिखित वाचण्याचा दांडगा अनुभव असल्याने हे काम 2-3 वर्षांत पूर्ण होईल व हे काम प्राचार्य डांगेच करू शकतील, असा संस्थेचा विश्वास होता.
 आपण सिद्ध केलेल्या प्रतिशुद्ध ज्ञानेश्वरीचा सांप्रदायिकांत प्रसार व्हावा म्हणून सौ. डॉ. मीराबाई आणि डॉ. तुकाराम गरूड या दाम्पत्याच्या सहकार्याने प्रस्तुत ज्ञानेश्वरीची पारायण प्रतडांगे सरांनी कोल्हापूरच्या अजब प्रकाशनाच्या मदतीने अवघ्या 50 रुपयांत उपलब्ध करून दिली आहे.
ज्ञानेश्वरीचा सर्वसंग्राहक शब्दकोशहा त्यांचा आणखी एक संकल्प-प्रकल्प. ज्ञानेश्वरीच्या सर्वच कोशांचे एकत्रीकरण तर केलेच आहे. शिवाय ज्ञानेश्वरीचे काही जुने हस्तलिखितकोशही डांगे सरांना उपलब्ध झाले आहेत. तंजावर कोश आणि आरे मराठीचा कोश या मुळे काही नवीन अर्थ समोर येतात. निरंजन रघुनाथांचा कोशही अपूर्ण असाच आहे. त्याचाही उपयोग या कोशात केलेला आहे. ओम् नमोजी आद्याम्हणजे श्री विठ्ठलह्या नव्या अर्थाचे दर्शन मनोहर आहे... ही मोलाची कामे डांगे सरांच्या हातून होत होती !
प्राचार्य रामदास डांगे यांचा हा सारा प्रवास पाहताना हे व्यक्तिमत्त्व अतिशय गंभीर असल्याचे दिसते, पण त्याला हजरजबाबीपणा आणि विनोदाची झालरही असते. असे अनेक प्रसंग त्यांच्या मित्रमंडळीत चर्चेत असतात. प्राचार्य रा. रं. बोराडे सांगतात, ‘‘अमरावती विद्यापीठाच्या सिनेटवर नियुक्ती झाल्याबद्दल आम्ही डांगे सरांचे अभिनंदन केले व त्यांना पेढे मागितले. त्यावर ते उत्तरले एक तारखेला देतो.’ ‘पेढे एक तारखेलाच का?’ असा प्रश्‍न विचारताच ते उत्तरले एक तारखेला पे-डेअसतो...!’’
असाच एक अनोखा प्रसंग थेट विनोबा भावे यांच्यासमोरचा...! डांगे सर विनोबांना आपला आदर्श मानतात. त्यांची ज्ञानार्जन करण्याची वृत्ती आणि साधेपणा आपल्याला भावतो, असे ते आवर्जुन सांगतात. एकदा डांगे सर आचार्य कुलाच्या बैठकीसाठी नागपूर येथे गेले असताना परतीच्या प्रवासात ते पवनार येथे विनोबांना भेटण्यासाठी गेले. डांगे सरांच्या सोबत गोविंदराव देशपांडे होते. विनोबांना तेव्हा खूप कमी ऐकू येत असल्याने गोविंदरावांनी डांगे सरांचा परिचय करून देताना पाटीवर प्राचार्य रामदास डांगेअसे लिहून दाखविले. त्यावर विनोबा मिश्किलपणे हसले आणि ते म्हणाले, ‘शंकर, रामानुज, मध्व, निंबार्क (...आणि या परंपरेतील आणखी 13-14 नावे त्यांनी घेतली) हे सारे आचार्य आणि तुम्ही प्राचार्य... तुम्हाला नमस्कार’’.
साक्षात विनोबांनीच ही फिरकी घेतल्याने डांगे सर गोंधळले, पण लगेचच सावरले. त्यांनी पाटीवर लिहिले, ‘‘प्रशासनाय आचार्यः प्राचार्यः इति मे मतिः’’ अर्थात, ‘प्रशासन सांभाळणारा आचार्य तो प्राचार्य, असे माझे मत.त्यांचा हा खुलासा विनोबांना खूप आवडला. विनोबांना अशी एखादी गोष्ट आवडणे म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या बुद्धीची कसोटीच असे... त्या कसोटीला त्या काळात डांगे सर उतरले...!
वैयक्तिक मते कोणतीही असली, तरी सामाजिक भान राखत सर्वांशी मिळून मिसळून राहणारी, निगर्वी, ‘अजातशत्रूअसलेली त्यांची प्रतिमा त्यांच्या निवृत्तीनंतरही त्यांचा सन्मान करणारी ठरली. म्हणूनच, पदावरून निवृत्ती पत्करल्यानंतर सुमारे 15 वर्षांनी; परभणीतील या माजी प्राचार्याचा भव्य नागरी सत्कार 12 जून 2010 रोजी करण्यात आला. त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्थितप्रज्ञहा गौरवग्रंथ प्रकाशित करण्यात आला. सरांच्या जीवनकार्याचा उत्तम परिचय करून देणार्‍या अनेक लेखांनी हा अंक सजला आहे. एखाद्या प्राचार्याच्या आयुष्यात असा प्रसंग महाराष्ट्रात खूप कमी वेळा येतो...!
सर सांगतात, ‘‘जे समोर येईल ते प्रामाणिकपणे, सातत्याने आणि निष्ठापूर्वक करत गेलो. एकदा एखाद्या कामाला होकार दिला, की मी ते काम करतो. मी कामालाच पूजा मानतो आणि ती मनोभावे करतो.’’ सारे आयुष्य अध्यापनात घालविलेल्या डांगे सर नव्या पिढीसाठी मात्र काहीही सांगण्याचे नाकारत. ते म्हणत, ‘‘प्रत्येक पिढीचे आकाश निराळे असते. स्वधर्मे निधनं श्रेयः, परधर्मो भयावहःएवढेच मी सांगेन आणि धर्मचा अर्थ इथे कर्मअसाच घ्यावा, असे आवर्जून सुचवेन...’’

-    दत्ता जोशी