Wednesday, January 11, 2012

'तू गेल्यावर' आणि 'तू असतिस तर'... एक भावस्पर्शी प्रवास

हा लेख लिहून खूप दिवस झाले... एका दैनिकासाठी लिहिला होता, तो तसाच राहून गेला. आज कॉम्पुटरवर जुन्या फाईल्स चाळताना सापडला... वाटले, आपणाशी शेयर करावा... पहा, कसा वाटतो...
 ...................................................................................
संदीप खरे आणि सलिल कुलकर्णी या कवी-गायक अशा कलावंत जोडीचे एक गाणे मध्यंतरी बरेच गाजले. नसतेस घरी तू जेव्हा, जिव तुटका तुटका होतो, हृदयाचे विरती धागे, संसार फाटका होतो...असे काहिसे ते शब्द होते. अशी काही गाणी रसिकांच्या हृदयाला हात घालणारी असतात. दैनंदिन जीवनातील बोथटलेल्या भावभावनांना हलकासा स्पर्श करणार्‍या या शब्दांतून मना-मनांना कुरवाळण्याचा हेतू सफल होऊन जातो. त्यातही, जेव्हा शब्दांना सुरांची जोड मिळते आणि रंगमंचाचा स्पर्श होतो तेव्हा रसिकांपर्यंत पोहोचण्याच्या वाटा अनेक पटींनी खुल्या होतात. कवीला गायकाची (किंवा गायकाला कवीची) अशी जोड क्वचितच मिळते. त्यातून रसिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्याचा मार्ग खुला होतो.
अनेकदा असेही होते, की ज्येष्ठांची अनेक काव्ये काहिशी दुर्लक्षित राहतात. ओथंबलेल्या भावनांची कसोटी लावा की काव्यप्रतिभेची, प्रत्येक कसोटीवर अशी काव्ये सरस असतात तरीही दुर्लक्षित राहतात. मराठी काव्यविश्र्वात अशा भावना आजवर अनेकदा मांडल्या गेल्या. नसतेस घरी तू जेव्हाहे गाणं मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा एकेकाळी डोळ्यांखालून गेलेली बा. भ. बोरकरांची तू गेल्यावरही कविता मनात रुंजी घालून गेली. कवितेच्या पहिल्या दोनच ओळी तेव्हा आठवत होत्या -

तू गेल्यावर फिके चांदणे
घर परसूही सुने - सुके
मुले मांजरापरी मुकी अन्‌ 
दर दोघांच्या मध्ये धुके...
परवा कॉम्प्यूटरवरील जुन्या पेजमेकर फाईल्स उघडून पाहत होतो, तेव्हा ही कविता पुन्हा एकदा समोर आली. (मराठीतील विविध कवींच्या निवडक कविता एकत्र करून काव्यवाचनाचा अनौपचारिक कार्यक्रम करण्याचे मी आणि माझ्या पत्नीने पाच-सहा वर्षांपुर्वी ठरविले होते. तेव्हा सुमारे 500 कविता आम्ही संकलित केल्या होत्या. भाकरीचा चंद्र शोधण्याच्या नादात हा कार्यक्रम राहून गेला!)
या कवितेची एकेक ओळ पुढे जात होती आणि मनातील त्या प्रतिमा उलगडत होत्या. तीघरात नसेल, तर त्याची होणारी केविलवाणी अवस्था, त्याच्या आयुष्यातील अपरिहार्यताच दाखविणारी...!
तू गेल्यावर घरांतदेखिल 
पाउल माझे अडखळते
आणि आटुनी हवा भवतिची 
श्वासास्तव मन तडफडते

तू गेल्यावर या वाटेने 
चिमणी देखिल नच फिरके
कसे अचानक झाले नकळे 
सगळे जग परके परके
बाकिबावअर्थात बोरकर हे मराठी कवितेतील एक सुंदर स्वप्नच ठरले. मराठी आणि कोकणीतून उत्तमोत्तम कविता देताना श्रृंगार आणि तत्वज्ञान यांचा सुरेख संगम त्यांनी अनेकवेळा घडवून आणला. भावनांना हात घालणार्‍या याच कवितेच्या शेवटच्या दोन ओळी मात्र सारे वातावरण कशा पूर्णपणे बदलून टाकतात ते पाहा -
तू गेल्यावर दो दिवसांस्तव
जर ही माझी अशी स्थिती...
खरीच माझ्या आधी गेलिस 
तर मग माझी कशी गती?

विरहाग्नीत होरपळणार्‍या पतीची ही व्यथा वाचून भावनावश होतानाच माझे कवि मित्र दासू वैद्य यांची एक वेगळीच कविता डोळ्यांसमोर आली -आई गेल्यानंतरचे वडिल’.पत्नीच्या नजरेतून पती’ - ‘पतीच्या नजरेतून पत्नीया रुढ नात्यांच्या पलिकडे जात मुलाच्या नजरेतून टिपले गेलेले आई गेल्यानंतरचे वडिलवाचकांना वेगळ्याच भावविश्र्वात नेतात... 
आई गेल्यानंतरचे वडिल
अबोल झाले.
पूर्वीसारखेच स्वयंपाकघरातल्या कोपर्‍यात
देवांना न्हाऊ-जेऊ घालतात
पण आरती करताना
त्यांचा हात थरथरतो
आईने लावलेल्या बदामाच्या झाडाभोवती
कचरा साफ करण्याच्या निमित्ताने रेंगाळतात...

आणि ही खिन्नपणाची भावना दूर करायची, तर पाडगावकरांना पर्याय नाही! मंगेश पाडगावकरांनी प्रेमगाणी जितकी भरभरून लिहिली, तितकी कदाचित कोणी लिहिली नसावीत. त्यात भावना आहेत, उत्कटता आहे, बिनधास्तपणा आहे आणि थोडा इब्लिसपणाही मिसळलेला आहे. मात्र जोडीदाराच्या अस्तित्वाचे स्वप्नरंजन करताना पाडगावकर वेगळेच भासतात. तू नसलीस तरच्या निराशेतून बाहेर काढताना... तू असतीस तरया कवितेत ते म्हणतात -
तू असतिस तर झाले असते
गडे उन्हाचे गोड चांदणे
मोहरले असते मौनातुन
एक दिवाणे नवथर गाणे!
मौनातील हे गाणे गायचे तर ती कातरवेळच असायला हवी ना! आणि त्या कातरवेळेनंतर चमचमणारा शुक्रतारा आणि त्या अंधारातून जन्मणारी नवी स्वप्ने पाडगावकर हळूवारपणे व्यक्त करतात -
पसरियली असती छायांनी
चरणतळी मृदु शामल मखमल
अन्‌ शुक्राने केले असते
स्वागत अपुले हसून मिश्किल

तू असतिस तर झाले असते
आहे त्याहुन जग हे सुंदर
चांदण्यात विरघळले असते
गगन धरेतिल धूसर अंतर
जर तरच्या या भावनांना वास्तव जगात स्थान नसते. रुक्ष वास्तव जगताना त्यामुळेच या सार्‍या कवींचा मोठा आधार मिळतो. दुःख इतकेच असते, की काळाच्या कसोटीवर टिकणारे साहित्यिक आता फारसे निपजत नाहीत.

- दत्ता जोशी