Wednesday, May 9, 2018

काश्मिरचे पर्यटन किमान 10 वर्षे विसरायला हवे...
(© दत्ता जोशी, औरंगाबाद)
भारतद्वेष या एकाच मुद्द्यावर सतत हैदोस घालणार्‍या काश्मिरातील धर्मांधांनी परवा एका निरपराध पर्यटकाला ठेचून मारले. श्रीनगरहून गुलमर्गकडे जाणार्‍या मार्गात श्रीनगरलगतच असलेल्या नारबल येथे या पर्यटकांच्या वाहनावर तुफान दगडफेक झाली. काश्मिरात सुरक्षादलांनी नुकत्याच केलेल्या कारवायांत अनेक पाकिस्तानी दहशतवादी ठार करण्यात आले. त्याचा विरोध म्हणून ही दगडफेक होती.
पोलिसांवर दगडफेक चालू होती, या गाडीवर चुकून दगड पडले, अशी भूमिका आता देशद्रोह्यांचा पुळका असलेले काही जण घेत आहेत. पण पर्यटकांची गाडी आहे, हे लक्षात येऊनही त्यावर तुफान दगडफेक झाली आणि त्यातील एक दगड लागून गंभीर जखमी झालेल्या आर. थिरुमणी सेल्वन या चेन्नईच्या युवकाला प्राण गमवावे लागले, हे सत्य दडवता येणार नाही.
‘पर्यटक आम्हाला प्राणापलिकडे प्रिय आहेत’, ‘आम्ही त्यांच्या स्वागतासाठी सदैव तयार असतो’, ‘आम्हाला दहशतवाद मान्य नाही’, ‘भारतच आम्हाला प्रिय आहे’ असे अनेक सुविचार चार वर्षांपूर्वी माझ्या काश्मिरच्या सहलीत मी अनेकदा अनेकांकडून ऐकले होते. सगळ्या पर्यटनस्थळी काश्मिरी समाज चांगले आगत स्वागत करायचा, हेही खरे. पण हे ही तितकेच खरे, की मी माझ्या हाऊसबोटवाल्याच्या मागे लागून श्रीनगरच्या नागरी वस्तीत गेलो, तेव्हा त्याने मला माझा कॅमेरा बाहेर काढू दिला नाही की खाली उतरू दिले नाही. श्रीनगरच्या किल्ल्यावर लिहिलेल्या देशद्रोही घोषणा शहराच्या सर्व भागातून स्पष्ट दिसत होत्या. पर्यटकांच्या आर्थिक आधारावर तिथली अर्थव्यवस्था चालते, हे सगळ्यांनाच ठावूक आहे. या स्थितीत कदाचित स्थानिक पातळीवर अतिरेक्यांशी ‘सामंजस्याचे’ बोलणेही झालेले असू शकते. पण आता हे सामंजस्यही संपुष्टात आल्याचे दिसत आहे.
मला थेट 1988-89 ची आठवण येते. एखाद-दुसर्‍या काश्मिरी पंडिताचा बळी घेण्यापासूनच त्या काळ्याकुट्ट अध्यायाला प्रारंभ झाला होता. त्या वेळीही मानवतावादी, समाजवादी, साम्यवादी यांनी ‘तसे काही नाही’चाच सूर आळवलेला होता. त्यानंतर दोनच वर्षांत काश्मिर खोर्‍यातून साडेपाच लाखावर काश्मिरी पंडितांना सारे काही तिथेच सोडून विस्थापितांचे जीवन जगण्यासाठी पळ काढावा लागला होता. हजारोंचे बळी गेले होते. शेकडो बलात्कार झाले होते. या पार्श्वभूमीवर एका पर्यटकाच्या हत्येकडे वरवरच्या नजरेने पाहणे योग्य ठरणार नाही. काश्मिरच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनेचा निषेध केला आहे, पण त्यांच्याच आदेशाने दगडफेक करणार्‍या हजारो जणांवरील खटले काढून घेण्यात आलेले होते. हा राजाश्रय गंभीर आहे.
इथे माझे उदारमतवादी मित्र लगेच ‘भाजप सत्तेत भागीदार असल्या’ची आठवण करून देणारी घाणेरड्या भाषेतील वाक्ये लिहितील. पण सत्तेत सहभागी असणे आणि मुख्यमंत्री असणे यात फरक असतो. भाजपा सत्तेत आहे म्हणूनच काश्मिरातील देशद्रोह्यांची अंडिपिल्ली बाहेर निघताहेत. फुटीरतावाद्यांचे आर्थिक हितसंबंध पुराव्यांनिशी हाती येताहेत. शेकडो अतिरेक्यांना जन्नतची सैर घडविली जात आहे. हे विसरता कामा नये.
सप्टेंबर 2017 मध्ये ‘जम्मू काश्मिर स्टडी सर्कल’च्या राष्ट्रीय परिषदेसाठी 3 दिवस जम्मूत होतो. जम्मूत असूनही कडेकोट बंदोबस्तात ही परिषद पार पडली. त्यात अनेक गोष्टींचा उहापोह झाला. सगळ्याच गोष्टी इथे मांडणार नाही. पण एक गोष्ट आवर्जून सांगावी लागेल. ती आहे जम्मू विभागाच्या वेगाने सुरू झालेल्या इस्लामीकरणाची. जम्मू-काश्मिर पुण्यभूमी मानली जाते. प्राचीन भारतीय परंपरेचा आरंभ इथूनच झाला. शेकडो-हजारो वर्षांची परंपरा सांगणारी असंख्य मंदिरे इथे उभी आहेत. अशा या राज्याचे तीन भाग पडतात. जम्मू, काश्मीर आणि लडाख. यातील लडाख बौद्धबहुल, काश्मिर मुस्लिम बहुल आणि जम्मू हिंदूबहुल असल्याचे सांगितले जाते.
काश्मिरचा जेमतेम चतकोर भाग भारतात शिल्लक आहे आणि पंडितांच्या विस्थापनानंतर तो पूर्णतः मुस्लिमव्याप्त झाला आहे. लडाखमध्ये बौद्ध आणि मुस्लिमांमधील विवाहसंबंध वेगाने वाढत आहेत आणि तेथे मुस्लिम लोकसंख्या 50 टक्क्यांवर पोहोचली आहे. जम्मू भागातही इस्लामीकरणाला वेग आला आहे. एकीकडे रोहिंग्या मुसलमानांची वस्ती वसवून जम्मूतील दहशतकेंद्राची जणू स्थापनाच तेथे झाली आहे. दुसरीकडे माहिती अशी येत आहे की जम्मू भागातील डोंगर-दर्‍यांमध्ये जिथे कुठे प्राचीन मंदिरे आहेत त्याला लागून जागोजागी नव्या मशिदी उभ्या राहात आहेत. काही ठिकाणी वापरात नसलेल्या मंदिरांचे रूपांतरही मशिदींत झालेले आहे. हा प्रकार गंभीर आहे.
आणखी एक निरीक्षण असे सांगते की ‘पोट भरण्यासाठी’ काश्मिरातील मुसलमान आता जम्मूमध्ये येतो आहे. जम्मू शहराचे विभाजन करणार्‍या तवी नदीच्या दुसर्‍या टोकाला, जिथे नवे जम्मू वसलेले आहे त्या भागात मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. भारतातील अन्य प्रांतातून तेथे जाऊन वास्तव्य करणार्‍या नागरिकांना कायद्याने मनाई आहे पण बांगलादेशी मुसलमान तेथे सुखेनैव राहतो आहे. त्यांना नागरी सुविधा मिळत आहेत. त्यांच्या हक्कांसाठी सर्वोच्च न्यायालयात कायदेपंडीत कायद्याचा कीस पाडत आहेत. त्याच वेळी काश्मिर खोर्‍यातून जम्मूत मुस्लिमांना आणून त्यांच्या वस्त्या उभविल्या जात आहेत. (अर्थात येथेही मानवतावादी - यामुळे काय होणार? हा तर नागरिकांचा हक्क आहे. असे तारे तोडू शकतात. पण त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की हे सारे जाणीवपूर्वक घडवून आणले जात आहे.)
या सार्‍या पार्श्वभूमीवर काश्मिरमधील या नव्या घटनेकडे पाहावे लागेल. भारतभरातून आणि जगभरातून काश्मिरात जाणार्‍या पर्यटकांवर तेथील अर्थव्यवस्था अवलंबून आहे. त्याच बरोबर केंद्रातून जाणार्‍या प्रचंड निधीवरही त्यांचे अस्तित्त्व अवलंबून आहे. पर्यटनातून अमाप पैसा कमावणार्‍यांकडून राज्याच्या महसुलात फारशी भर पडत नाही. कारण वीज नाममात्र किमतीत मिळते. पाण्याचेही तसेच. कुठल्याही रस्त्यावर टोल नाही. सारा पैसा केंद्र देते आणि स्थानिक नागरिक तो आपला हक्क समजतात.
हे सारे लाटूनही भारताशी एकनिष्ठ राहण्याची त्यांची नियत नाही. तीन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत ज्या सुरक्षा दलांनी त्यांना वाचविले त्यांच्यावरच दगडफेक करण्यात त्यांना शरम वाटत नाही. याचे कारण त्यांच्या धर्मांधतेत व फुटीर वृत्तीत दडले आहे. वाजपेयी सरकारने आणि आता मोदी सरकारनेही पूर्वांचलातील राज्ये आणि जम्मू-काश्मिरसाठी सढळ हाताने मदत केलेली आहे. दिल्लीत येऊन गेलेल्या अन्य सरकारांच्याा तुलनेत ही मदत अनेक पटींत आहे. याची कबुली स्थानिक नागरिकही देतात. पण तरीही ते भारताविरोधात, काश्मिरी पंडितांविरोधात आणि आता भारतीय पर्यटकांविरोधात हाती दगड घेतात. याच दगडांचे रूपांतर उद्या शस्त्रांत होऊ शकते.
आणि आता थोडे मानवतावादी, समाजवादी, साम्यवादी, पाकिस्तानवादी मंडळींबद्दलही लिहिले पाहिजे.
यांच्या ‘सलेक्टीव्ह विज्डम’ला माझा सलाम. 
मुद्दाम ‘सलाम’ करतोय, नमस्कार नाही.
मी देशाच्या अन्य भागात बळी गेलेल्या विविध निरपराधांची नावे घेणार नाही. विविध हत्यांवर या मंडळींनी केलेल्या मातमबद्दल बोलणार नाही. कारण बोलून उपयोग होणार नाही. कारण हे बुद्धीवादी म्हणवतात आणि आपल्या बुद्धीचा उपयोग विकृत युक्तिवादासाठी करतात.
त्यांचे शहाणपण केवळ निवडक विषय, व्यक्ती, प्रसंग आणि समाजांपुरतेच मर्यादित असते. त्यामुळेच ‘मुस्लिम दहशतवादी’ वृत्तींनी ‘काश्मिरा’त एका ‘हिंदू’च्या दगडाने ठेचून केलेल्या हत्येबद्दल बोलण्यात ते त्यांचा वेळ वाया घालणार नाहीत. टीव्हीवर चर्चा झडणार नाहीत. पेपरांत बातम्या येणार नाहीत. फेसबुकवर फोटो काळा होणार नाही. निषेधाच्या कॉमेंट येणार नाहीत. मेणबत्ती संप्रदाय अज्ञातवासात गेलेला असेल.
त्यांना बाजूला ठेवू. या देशाचे सामान्य नागरिक म्हणून एक काम करू... पुढची किमान 10 वर्षे काश्मिरच्या पर्यटनाचा विचार मनातून दूर ठेवू. मी हे लेखन करण्याआधी काही टूर ऑपरेटरांशी अनौपचारिक चर्चा केली. माहिती मिळविली. काही बड्या टूर कंपन्यांकडे पर्यटकांनी केलेल्या बुकिंगपैकी 75 टक्के बुकिंग मागील 2-3 दिवसांत रद्द झाले आहेत. बर्‍याच छोट्या टूर ऑपरेटरकडील निम्म्याहून अधिक ग्रुप अन्यत्र डायव्हर्ट होताहेत. त्यांनी हिमाचल, सिक्कीम-दार्जिलिंग, केरळ आदी पर्याय स्वीकारले आहेत. हे प्रमाण वाढते आहे. 1988-90दरम्यानच्या दहशतवादी उद्रेकानंतर तेथील पर्यटनाचा व्यवसाय थंडावला होता. पुढे सारे हिंदू खोर्‍याबाहेर गेल्याची खातरजमा झाल्यावर तेथील पर्यटनाला चालना देण्यासाठी स्थानिक लॉबीने अनेक नाटके केली आणि अखेर भारतीय पर्यटक तिकडे पुन्हा वळला. मागची काही वर्षे थोड्याफार चढउतारांसह निभावली गेली.
मागच्या वर्षी अमरनाथच्या यात्रेकरूवर गोळीबार झाला. त्यात काहीजणांना हौतात्म्य पत्करावे लागले. आता या निरपराध तरुणाचा बळी. काश्मिरच्या या धुमसत्या बर्फाला आणखी किती बळी द्यायचे? कशासाठी? मोदी सरकार पाकिस्तानातून येणार्‍या अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात तर यशस्वी ठरतेय पण सीमेआतल्या या दहशतवाद्यांशी लढायचे तर आर्थिक रसद बंद करणे गरजेचे वाटते.
जोवर कुठल्याही बंदोबस्ताशिवाय 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला श्रीनगरच्या लाल चौकात ध्वजवंदन होणार नाही, सुरक्षा दलांवर दगडफेकीची शेवटची घटना घडल्याला किमान 3 वर्षे होणार नाहीत, जोवर स्थानिक नागरिक दहशतवाद्यांना आश्रय देणे नाकारणार नाहीत तोवर काश्मिरचे सौंदर्य पाहणे टाळायला हवे. भारतीयांच्या पैशातून देशद्रोही पोसणे योग्य नव्हे. काश्मिरात जाण्यावाचून काही अडण्याचे कारण नाही. टूर आॅपरेटरनी सुद्धा या विषयात सकारात्मक भूमिका घ्यावी आणि पर्यटकांच्या जीविताची नैतिक जबाबदारी घेत तेथील टूर टाळाव्यात.
हा देश आपलाच आहे. देशाच्या सगळ्या भागात आपण गेलाेच पाहिजे. पण जिथे आपल्या जीविताची हमी नाही उलट आपल्या आर्थिक याेगदानातून उलट दहशतवादच फाेफावताेय, तिथे जाणे काही काळ तरी टाळायला हवे.
-दत्ता जोशी
औरंगाबाद