Wednesday, March 28, 2012

लातूरमध्ये प्रवेश करताना

माझे पाचवे पुस्तक ‘लातूर आयकॉन्स’ 1 एप्रिल 2012 रोजी प्रकाशित होत आहे. ‘जालना’ आणि ‘नांदेड’ पाठोपाठ आता हे पुस्तक येते आहे. जगात खूप चांगुलपणा आहे, तो शोधून समाजासमोर मांडायचा, या हेतूने मी हे काम करतो आहे. शेकडो किलोमीटरचा प्रवास, असंख्य माणसांच्या भेटी आणि लक्षपूर्वक केलेले निरीक्षण यांच्या आधारावर ही पुस्तके तयार होतात. ‘लातूर आयकॉन्स’ 288 पानांचे झाले असून त्याचे मूल्य 250 रुपये आहे. ‘पोलाद’ या कंपनीच्या सामाजिक उपक्रमांतर्गत हे पुस्तक प्रकाशित होत आहे.
....................................................................
'लातूर आयकॉन्स' हे पुस्तक आपल्या हाती ठेवताना मला मनापासून आनंद होत आहे. राज्यातील पर्जन्यछायेच्या प्रदेशात ज्या भूभागाचा समावेश होतो, त्यापैकी हा एक भाग. हा जिल्हा माझ्या हृदयाच्या सर्वात जवळचा, कारण माझा जन्म याच जिल्ह्यातील देवणी इथला. अर्थात त्या काळी हा जिल्हा उस्मानाबाद होता आणि देवणी हे साडेआठहजार लोकवस्तीचे तेव्हाचे खेडे उदगीर तालुक्यात येत असे. बदलत्या काळाप्राणे जिल्ह्याच्या - तालुक्याच्या रचना बदलल्या पण माणसांचा स्थायीभाव तोच राहिला. हा दुष्काळी भाग. मेहनतीशिवाय इथं काही पिकत नाही. त्यामुळं सातत्यानं मेहनत करीत राहणं ही या परिसरातील माणसांची सवयच बनली. ते कोणत्याही क्षेत्रात गेले तरी रक्तात मुरलेली ही सवय मात्र मोडत नाही... जातील तेथे शंभर टक्के योगदान देतील असा हा बाणा. त्यातूनच सर्वांच्या प्रगतीच्या वाटा फुलल्या. 

हे पुस्तक कोणासाठी आहे? प्रत्येक पिढी आपल्या पूर्वासुरींची परंपरा सांगते आणि आपला वारसा पुढील पिढीसाठी सोडून जाते. आजच्या पिढीने पुढील पिढीसाठी सोडलेला अनुकरणीय वारसा शोधण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न. या पुस्तकातील प्रत्येक नाव ‘मेरिट’वर निवडण्यात आले आहे. ‘आयकॉन्स’ची व्याख्या काय? जिल्ह्यातील ही माणसे शोधताना निकष कोणते लावायचे? माणसे कशी निवडायची? इथे क्षेत्राचे बंधन नव्हते. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात उत्तम रितीने कार्यरत असणारी व्यक्ती, हा आमचा पहिला निकष होता. त्या व्यक्तिचे चारित्र्य, व्यवहारातील सचोटी हा दुसरा निकष होता आणि त्याची समाजाभिमुखता हा तिसरा. आर्थिक उलाढालीच्या आकड्यांना आमच्या लेखी महत्व नव्हते. कामातील ‘इनोव्हेशन’, त्यातील क्षमता हा भाग त्या दृष्टीने सर्वात महत्वाचा ठरणारा होता. 

समाज हा चांगल्या माणसांनी समृद्ध आहे. त्यातून काही निकष लावून निवड करायची, तरी ही यादी खूप मोठी होऊ शकते. लातूर जिल्ह्याच्या शोधमोहिमेत अशी 100 हून अधिक नावे हाती आली. यातील काही माणसं आधीपासून प्रकाशझोतात आलेली होती, तर काही जणांपर्यंत पहिल्यांदाच कोणी पोहोचत होते. त्यानंतर विविध क्षेत्रांतील निवडीचे निकष लावत ही यादी 38 पर्यंत पोहोचली. या पुस्तकात आलीच पाहिजेत, अशी काही नावे समाविष्ट होऊ शकली नाहीत. यापैकी काही जणांनी स्वतःहून नकार दिला. प्रसिद्धीपराङ्‌मुख राहून कार्यरत राहण्याच्या त्यांच्या इच्छेला आम्हीही मान दिला. काही ठिकाणी परस्परांना उपलब्ध असलेया वेळांचे अथवा या पुस्तकात उपलब्ध जागेचे गणित जमले नाही.

नावे निवडताना ‘उद्योग’ हे क्षेत्र प्रामुख्याने डोळ्यासमोर ठेवले होते. एक उद्योग उभा राहिला तर अनेक कुटुंबं उभी राहतात आणि त्यातूनच परिसराच्या विकासाला चालना मिळते. त्यामुळे या विषयाकडे अधिक प्राधान्याने लक्ष! त्याच बरोबर शेती, सामाजिक, प्रशासन, व्यापार, सांस्कृतिक आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सैन्यदले. अशा सर्वच क्षेत्रांचा धांडोळा घेऊन नावांची निवड करण्यात आली. या पुस्तकात समाविष्ट करावयासाठीची नावे शोधताना अनेकांशी भेटून चर्चा केली. यामध्ये पत्रकारिता, सामाजिक कार्य, उद्योग अशा विविध क्षेत्रांचा समावेश होता. जिल्हा उद्योग केंद्रासारख्या संस्थांतूनही अनेक उद्योजकांची नावे मिळाली. उद्योग केंद्रातील अधिकार्‍यांनी त्यात मोठी मदत केली. अशा विविध भेटींतून समोर आलेल्या नावांतून ही 38 नावे निवडण्यात आली. 

या पुस्तकाच्या दृष्टीने ‘आयकॉन्स’ची शोधमोहीम जुलै 2011 मध्येच सुरू झाली. अशी माणसे शोधणे हे काम म्हटले तर सोपे आणि म्हटले तर कठिण असते. ही माणसे शोधण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागली. मराठवाड्यातील पहिल्या पिढीतील उद्योजकांवर आधारित ‘झेप’ हे पुस्तक मी 2 ऑक्टोबर 2006 रोजी प्रकाशित केले होते. त्याच धर्तीवर पण फक्त औद्योगिक विश्वापुरतेच मर्यादित न राहता सर्व क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तींचा परिचय नव्या पिढीला करून देणारे ‘जालना आयकॉन्स’ हे पुस्तक ऑक्टोबर 2011 मध्ये प्रकाशित झाले. त्याच धर्तीवर नांदेड जिल्ह्यातील लक्षणीय कामगिरी बजावणार्‍या व्यक्तींवरील पुस्तक 11 मार्च 2012 रोजी नांदेड येथे प्रकाशित झाले. ‘पोलाद’ या ब्रँडनेमने बाजारपेठेत उपलब्ध सळईचे निर्माते; जालना येथील ‘भाग्यलक्ष्मी स्टील’चे संचालक सुनील गोयल यांनी या कामी पुढाकार घेतला. असाच प्रयोग
आता लातूर जिल्ह्यात होतो आहे. या पुस्तकाची भाषा हा एक वेगळा विषय आहे. अनेक ठिकाणी रूढ व्यवहारात वापरले जाणारे शब्द आपण वाचाल. शुद्ध मराठीचा अतिरेकी आग्रह धरीत जडजंबाल मराठी शब्द वापरण्याऐवजी रूढ व्यवहारातील इतरभाषक शब्द या पुस्तकात जसेच्या तसे वापरले आहेत. काळाबरोबर जात भाषेचा नवा प्रवाह स्वीकारण्याचा हा प्रयत्न !

लातूर शहर आणि जिल्ह्यातील विविध गावांमध्ये - शहरांमध्ये या निमित्ताने एकंदर एक - दीड हजार किलोमीटर प्रवास केला. हे ‘आयकॉन्स’ कार्यरत असलेल्या भागाला प्रत्यक्ष भेटी दिल्या. लातूर जिल्ह्याच्या विविध भागांत फिरतानाच पुणे - मुंबई - औरंगाबादेतील व्यक्तींनाही भेटून त्यांच्या प्रवासकथा ऐकल्या आणि त्यांनी गाठलेली यशाची शिखरे शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला. या सर्व कथा आपण या पुढील पानांतून वाचालच. पण काही कथा मला यामध्ये अपरिहार्य कारणांमुळे समाविष्ट करता आल्या नाहीत. त्यापैकी एक नाव आहे कमांडर कैलास गिरवलकर. एकेकाळी भारतीय नौदलात ‘कमांडर’ पदापर्यंत पोहोचलेल्या श्री. गिरवलकर यांनी 1971च्या भारत-पाक युद्धात महत्वाची कामगिरी बजावली. याबद्दल त्यांना ‘नौसेना पदका’ने सन्मानित करण्यात आले. निवृत्तीनंतर आपल्या गावी परतून विविध सामाजिक कार्यांना प्रारंभ केला. आपल्या स्वतःच्या इमारतीचा बराचसा भाग त्यांनी ‘नॅब’ या अंधांसाठी कार्यरत संस्थेला विनामूल्य वापरण्यास दिला आहे. स्वतःच्या परिवाराच्या नावाने
24 डिसेंबर 2007 रोजी ‘मिरागि प्रतिष्ठान’ (मित्रविंदा रामलिंगप्पा गिरवलकर) हा ट्रस्ट स्थापन करून त्यांनी विविध सामाजिक कामांतील व्यक्तींना त्यातून आधार देण्याची महत्वाची कामगिरी बजावली आहे. या सर्वांपेक्षा अधिक महत्वाचे काम त्यांनी विकसीत केले आहे लातूरपासून जेमतेम 10-12 किलोमीटरवर असलेल्या गंगापूर या गावी. समाजातील दुर्लक्षित घटक असणार्‍या, वेश्याव्यवसाय करणार्‍या महिलांच्या मुला-मुलींसाठी त्यांनी अरुणोदय बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अंकुर बालसदन विकसित केले आहे. वास्तविक हे काम आधीपासून सुरू होते. तेथील व्यवस्थापन 2004 पासून कमांडर गिरवलकर यांच्याकडे आले. काही परदेशी संस्थांकडून देणगी मिळवून आणि उरलेली रक्कम स्वतःच्या ट्रस्टमधून घालून, अक्षरशः खडकाळ मारानावर उभ्या असलेल्या या संस्थेत त्यांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी अक्षरशः नंदनवन फुलविले आहे. सध्या संस्थेत 47 मुले - मुली असून त्यातील अनेक जणांनी आपल्या बुद्धीमत्तेची चमक दाखवीत उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतले आहेत. वयाच्या 18 वर्षांपर्यंतच्या मुलांचा सांभाळ येथे होतो. हे एक आगळेवेगळे कार्य. देहविक्रयाच्या बाजारात अनिच्छेने जगताना पोटी जन्मलेल्या मुलांना चांगले दिवस दाखविण्याची या मातांची इच्छा अशा संस्थांच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरते. इथे लातूर परिसरापासून मुंबईपर्यंत विविध भागांतून मुले - मुली वास्तव्यास आहेत. त्यांना शाळेत प्रवेश मिळविताना प्रारंभीच्या काळात कमांडर गिरवलकर यांना बराच संघर्ष करावा लागला. पण आता वातावरण निवळले आहे. ही मुले शाळेत रुळली आहेत. अनेक जण वर्गात पहिले असतात. दुर्दैवाच्या फेर्‍यात अडकलेल्या आईंची ही मुले आता उज्ज्वल भवितव्याची स्वप्ने पाहू शकतात.

दोन व्यक्तींबद्दल मला इथे आवर्जुन लिहिणे आवश्यक वाटते. त्यातील पहिले आहेत ‘शहीद’ कॅप्टन कृष्णकांत चंद्रकांत कुलकर्णी. कारगिलमध्ये पाकिस्तान्यांना धूळ चारताना दि. 7 जुलै 1999 रोजी त्यांनी रणांगणावर हौतात्म्य पत्करले. त्यांची वीरकथा रोमांचित करणारी आहे. सातारा सैनिकी शाळेतून प्रशिक्षित होत त्यांनी खडकवासला येथील ‘एनडीए’मध्ये प्रवेश मिळविला आणि अंगभूत गुणवत्तेला कठोर परिश्रमांची जोड देत भारतीय सैन्यदलात ते दाखल झाले. कारगिलमध्ये पाकिस्तानने केलेले आक्रमण मोडून काढण्यासाठी तैनात केलेल्या तुकड्यांमध्ये त्यांच्याही बटालियनचा समावेश होता. रणांगणावर शत्रूशी चार हात करताना ते जबर जखमी झाले. आपल्या जखमा प्राणघातक आहेत, हे त्यांना जाणवले असावे, त्यामुळे स्वतःला झालेल्या जखमांची पर्वा न करता त्यांनी युद्धभूमीवरच आपल्या सोबतच्या कमी जखमी सहकार्‍यांना वाचविण्याचा आग्रह धरला. ‘ते वाचू शकतात, तर त्यांना वाचवा... मी कदाचित वाचू शकणार नाही, माझ्याकडे लक्ष देऊ नका...’ अशा त्यांच्या आग्रहातून दिसला तो मातृभूमीसाठी सर्वोच्च समर्पण करण्याचा करारी बाणा.

कारगिलच्या युद्धभूमीवर एक जुलै 1999 पासून कॅप्टन कृष्णकांत यांच्या पथकावर शत्रूच्या तळांवर गनिमी काव्याने हल्ले चढविण्याची कामगिरी सोपविण्यात आली होती. सलग पाच दिवसांच्या या हल्ल्यांमध्ये त्यांच्या तुकडीने शत्रूला त्यांच्याच ठिकाणी रोखून धरले होते. सात जुलैला सकाळी आठच्या सुमारास झालेल्या बॉम्बहल्ल्यात बॉम्बचे ‘स्पिंटर’ छातीतून आरपार गेल्याने त्यांचा अंत झाला. मृत्यू समोर दिसत असतानाही, त्यांच्या सोबतच्या जखमी सत्तारची काळजी त्यांना अधिक होती. ‘सत्तारको ज्यादा लगा है. उसे फर्स्ट एड करो...’ असे सांगत त्यांनी सहकार्‍याचे प्राण वाचविले. छातीतून रक्त भळाभळा वाहत असतानाही ते स्वतः चालत, शत्रूचा मारा चुकवीत पुढे निघाले. शत्रूच्या मार्‍यामुळे तेथे हेलिकॉप्टर उतरविणे शक्य नव्हते. साधारण दोन किलोमीटर अंतरापर्यंत ते स्वतः धावत गेले आणि एका डोंगराआड हेलिकॉप्टर उतरवून तेथे त्यांना वर चढविण्यात आले. तेथेही त्यांनी स्वतःआधी जखमी जवान सत्तार यांना हेलिकॉप्टमध्ये चढविले! हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधी हेलिकॉप्टरमध्येच त्यांचा अंत झाला.

कृष्णकांत माझ्याच गावचे. उदगीरचे. वयाने ते माझ्याहून दोन - चार वर्षांनी लहान पण कर्तृत्वाने कैकपटीने महान. हे संपूर्ण कुटुंबच माझ्या परिचयाचे, कारण त्यांचे वडील माझे शिक्षक. आपल्या अतुलनीय शौर्याने कॅप्टन कृष्णकांत अजरामर झाले. त्यांच्या हौतात्म्याची बातमी कळताच माझ्या शरीरावर सरारून उमटलेला काटा मला अजूनही आठवतो. लक्षावधी पाणावल्या डोळ्यांनी त्यांना दिलेला अखेरचा निरोप अजून डोळ्यासमोर येतो. कृष्णकांत यांच्या हौतात्म्यानंतर त्यांच्या वडिलांनी उदगीरमध्ये काही उपक्रम सुरू केले. त्यातील काही अजून चालू आहेत. सामान्य कुटुंबातील मुलगा आपल्या कर्तृत्वाने असामान्य होत कसा अजरामर होतो, हे त्यांनी स्वतःच्या बलिदानातून दाखवून दिले. 7 जून 1997 रोजी कृष्णकांत यांना सैन्यदलात कमिशन मिळाले. 7 जून 98 रोजी ते लेफ्टनंट झाले. 7 जून 99 रोजी ते कॅप्टन बनले आणि 7 जुलै 1999 रोजी त्यांनी मातृभूमीसाठी हौतात्म्य पत्करले.

दुसरे नाव आहे दिवंगत फ्लाईट कॅप्टन प्रसाद रमाकांत शेंडगे. 19 एप्रिल 1994 रोजी बिदरच्या विमानतळावरून त्यांचे मिग अवकाशात झेपावले. हवाई दलाच्या प्रशिक्षणातील त्यांचे ते शेवटचे उड्डाण होते. दुर्दैवाने त्यांच्या आयुष्यातीलही ते शेवटचेचे उड्डाण ठरले. पक्ष्याच्या धडकेचे निमित्त झाले आणि हे मिग कोसळले. त्यात या उमद्या, उदयोन्मुख हवाईदल अधिकार्‍याचा धक्कादायक अंत झाला. 15 सप्टेंबर 1972 रोजी सोलापुरात जन्मलेले प्रसाद वयाच्या जेमतेम 21-22व्या वर्षी हे जग सोडून गेले. सातारा सैनिकी शाळा आणि ‘एनडीए’या दोन्ही संस्थांतील प्रशिक्षणादरम्यान त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेची आणि नैपुण्याची चमक दाखविलेली होती. विशेषतः मराठवाड्यातून बाहेर पडलेल्या तरुणांमध्ये बव्हंशी दिसणारा न्यूनगंड त्यांच्यात अजिबात नव्हता. बुद्धिमत्तेला सभाधीटपणाची मिळालेली जोड त्यांना हवाई दलाच्या सेवेपर्यंत घेऊन गेली. अमोघ वक्तृत्व, उत्तम चित्रकला, चांगली फोटोग्राफी आणि अपार देशभक्ती ही त्यांची वैशिष्ट्ये. डॉ. रमाकांत शेंडगे आणि सौ. विजया शेंडगे हे त्यांचे आईवडील शासकीय सेवेत कार्यरत होते. (दोघेही आता निवृत्त आहेत) त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी. हा एकुलता एक मुलगा हवाईदलात दाखल झाला तो कुटुंबाच्या पाठिंब्यानेच. या दोघांनीही आपल्या मुलाला सैन्यदलात जाण्यासाठी प्रोत्साहनच दिले. हा विेशास सार्थ ठरवीत अंगभूत गुणवत्तेच्या आधारावर ते हवाई दलातही ‘बॉम्बफेकी’ लढाऊ विमान चालविणार्‍या पथकात (बॉम्बर पायलट) सामील झाले. सर्वोच्च गुणवत्ता असलेल्या निवडक अधिकार्‍यांनाच ही संधी मिळते. अशी उच्च गुणवत्ता असणारा अधिकारी एका अपघातात कालवश होतो, हा दैवदुर्विलासच...

पण आपल्या पुत्राच्या निधनाने खचून न जाता या दाम्पत्याने त्यांच्या नावे ‘फ्लाईट कॅप्टन प्रसाद शेंडगे मेमोरियल ट्रस्ट’च्या माध्यमातून एक चांगला उपक्रम 1998 पासून चालू केला. प्रसाद यांच्या जन्मदिनी 15 सप्टेंबर रोजी शाहू महाविद्यालयाच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू झाला. दरवर्षी तीन दिवसांची व्याख्यानमाला या उपक्रमांतर्गत आयोजित केली जाते. 15 सप्टेंबर रोजी सैन्यदलातील करइरबद्दल मार्गदर्शन मिळते, 16 रोजी स्पर्धापरीक्षांबद्दल मार्गदर्शन केले जाते तर 17 रोजी सर्वसाधारण करइरविषयक प्रेरक व्याख्यानाचे आयोजन करण्यात येत असते. सैनिकी अधिकारी ‘सिव्हिलियन्स’च्या कार्यक्रमांना उपस्थित राहात नाहीत, असा संकेत आहे. पण प्रसाद यांच्या नावाने सुरू झालेल्या या उपक्रमात एअर मार्शल के. एन. नायर उपस्थित राहिले. हा उपक्रम अद्यापही सुरू आहे आणि दरवर्षी त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो. प्रसाद यांची स्मृती हैदराबादच्या वायूसेना अकादमीतही जपली आहे. तेथे त्यांच्या समृतिप्रित्यर्थ स्मृतिस्तंभ उभारण्यात आला आहे तर त्यांच्या नावाची एक ‘ट्रॉफी’ दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्याला दिली जाते.

याशिवाय; पती-पत्नी अशा दोघांनीही सैन्यदलात रुजू होण्याचा आगळा विक्रमही लातुरात पाहण्यास मिळाला. अभिजित भास्कर पाटील आणि सौम्यता अभिजित पाटील हे दाम्पत्य सध्या अनुक्रमे भूदल आणि हवाईदलात कार्यरत आहे. सन 2006 मध्ये अभिजित ‘एनडीए’च्या माध्यमातून सैन्यदलात रुजू झाले. सौम्यता सन 2010 मध्ये हवाईदलात रुजू झाल्या. सौम्यता मूळच्या उत्तर भारतीय. त्यांच्या कुटुंबातही सैन्यदलातील अधिकारपदाची परंपरा. त्यांचे वडील आणि काका सैन्यात ब्रिगेडियर आहेत! अभिजित यांच्या घरी जाऊन त्यांच्या माता-पित्यांना भेटण्याचा योग आला. अभिजित यांचा पत्रव्यवहार वाचता आला. एका पत्रात ते लिहितात, "In the Army, I have learnt to appreciate the beauty of life, the immense pleasure of sleep, the taste of water which is irreplaceble, the matchless value of willpower & all the wonderful things a man can do if he only wants to do...` आणखी एका पत्रात त्यांचा दृष्टीकोन अधिक स्पष्ट होतो - ‘आपण मध्यमवर्गीय आहोत हे आपलं नशीबच म्हणावं लागेल. जगात जे चांगलं आहे त्यावर आपला विश्र्वास आहे कारण आपण मध्यमवर्गीय आहोत. माणसाला पैशाची गरज असावी पण चटक असू नये...’ सैन्यदलातील ही सर्व उदाहरणे आपणासाठी नक्कीच प्रेरक ठरतील.

या पुस्तकातील सर्व 38 जण अशाच प्रकारे आपापल्या क्षेत्रात उत्तम रितीने कार्यरत आहेत. वेगळ्या वाटा चोखाळत त्यांची वाटचाल सुरू आहे. या38 जणांत सैन्यदलातील दोन व्यक्तिमत्वांचा आम्ही आवर्जुन समावेश केला आहे. सैन्यदल हा ‘करइर’चा एक उत्तम मार्ग आहे. भ्रष्टाचाराने बजबजलेल्या या वातावरणात आजही या एका क्षेत्राबाबत सामान्य माणूस आशावादी आहे. त्यांच्याकडे सर्व जण अजूनही आदराने पाहतात. मग या क्षेत्रात जाण्यासाठी प्रेरणा का मिळू नये? ‘आयकॉन्स’वर लिहिल्या जाणार्‍या विविध जिल्ह्यांतील पुस्तकांत किमान एक तरी ‘आयकॉन’ सैन्यदलातील हवा, हा आमचा आग्रह आहे. त्या दृष्टीने जाणीवपूर्वक हे ‘वीर’ शोधले जातात.

एक बाब येथे आवर्जून स्पष्ट करावीशी वाटते, की या पुस्तकात मांडलेले 38 जण म्हणजे लातूर जिल्ह्याचा परिपूर्ण परिचय नव्हे. ही नावे केवळ प्रातिनिधिक अशी आहेत. जिल्ह्यातील अनेक नावे अत्यंत जड अंतःकरणाने आम्हाला बाजूला ठेवावी लागली. ही बरीच मोठी यादी होऊ शकेल. कदाचित, या पुस्तकाचा दुसरा भाग भविष्यात प्रकाशित करावयाचे ठरल्यास ही नावेही त्यात समाविष्ट करणे शक्य होईल.

या निर्मितीसाठी लाभलेल्या ‘पोलाद’च्या निरपेक्ष सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार.

लातूरच्या प्रेरणादायी विश्वात आपणा सर्वांचे स्वागत!

- दत्ता जोशी