Tuesday, June 26, 2012

सेंद्रीय शेतीचा आणखी एक पुरावा...

सेंद्रीय शेतीचे हे आणखी एक उदाहरण...
अभिनेता अमीर खान यांच्या ‘सत्यमेव जयते’च्या 24 जून 2012 च्या भागात सेंद्रीय शेतीविषयी प्रभावी जनजागृती करण्यात आली. हा खरोखरच अतिशय जिव्हाळ्याचा विषय. यावर ठिकठिकाणी उत्तम प्रयोग सुरू आहेत. दुर्दैवाने या प्रयोगांना अद्यापही राजमान्यता मिळत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचेही त्याकडे दुर्लक्ष होते.
माझ्या ‘आयकॉन्स’ सिरीजमध्ये अशी माणसे शोधण्याचा माझा प्रयत्न आहे. 11 मार्च  2012 रोजी प्रकाशित झालेल्या ‘नांदेड आयकॉन्स’मध्ये सेंद्रीय शेतीचे प्रचारक दिलीपराव देशमुख बारडकर यांच्या प्रयोगांचा वेध मी घेतला. हा लेख आपणा सर्वांसाठी...
-----------------------------------

रासायनिक खतांचे दुष्परिणाम त्यांनी स्वतः भोगले आहेत. त्यांच्या पायांवर आलेली सूज इतकी जास्त असायची की अनेकजण तो हत्तीरोग तर नाही ना, याची खातरजमा करण्यास सांगायचे. आयुष्यातील एका वळणावर ते सेंद्रीय शेतीच्या संपर्कात आले आणि त्यापासून मिळणारे लाभ पाहून त्यांनी स्वतःला या शेतीच्या प्रसारासाठी वाहून घेण्याचे ठरविले. सध्या पुण्यात वास्तव्यास असलेल्या दिलीप देशमुख बारडकर यांची ही कहाणी...
-----------------------------------
नांदेडच्या कोंडेराव देशमुख यांच्या मुलाला - दिलीप देशमुख यांना शेतीची आणि त्या संबंधीच्या संशोधनांची भारी आवड. याच आवडीतून एम.एस्सी. ऍग्रीकल्चर झाल्यानंतर ते एका कीडनाशक कंपनीत संशोधक म्हणून रुजू झाले. ‘फील्ड रिसर्च’ हा त्यांच्या संशोधनाचा भाग होता. 1971 ते 1980 अशी साधारण 10 वर्षे त्यांनी कीडनाशक कंपनीत काम केले. या संशोधनकार्यात ते सहा राज्यांत विविध ठिकाणी कार्यरत होते. प्रत्यक्ष शेतीत कीडनाशकांची फवारणी करणे आणि त्यावर आधारित थेट संशोधन हे त्यांच्या नोकरीचे स्वरुप होते. पण 1980च्या दरम्यान या रसायनांचे दुष्परिणाम त्यांना जाणवू लागले. विशेषतः पायांवर येत असलेल्या सूजेमुळे त्यांना काम करणेही अशक्य झाले. अखेर त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते 1980च्या सुमारास आपल्या गावी बारड येथे परतले. त्यानंतर 1998 पर्यंत त्यांनी रासायनिक खते वापरूनच शेती केली पण 1998 मध्ये झालेल्या एका प्रात्यक्षिकाने त्यांच्यात परिवर्तन घडून आले आणि तेव्हापासून आजतागायत ते सेंद्रीय शेतीचे कट्टर पुरस्करर्ते, प्रचारक आणि मार्गदर्शक बनले आहेत. कसे घडले हे परिवर्तन? योग्य वेळी डोळे उघडले की चांगला मार्ग दिसतो, याचेच हे प्रत्यंतर.


कोंडेराव देशमुख हे बारडचे प्रतिथयश शेतकरी. मोठी शेतजमीन. शेती बाळगून असतानाच ते वकिलीचा व्यवसायही करीत. या व्यवसायातही त्यांनी चांगली प्रतिष्ठा मिळविली होती. त्यांच्या पत्नी - सुशीलाबाई देशमुख समाजकार्य करीत. त्या काळात त्यांना अहिल्याबाई होळकर पुरस्काराने राज्य सरकारने सन्मानित केले होते. अशा कुटुंबात दिलीप देशमुख यांचा जन्म 16 डिसेंबर 1949 रोजी झाला. वडिलांची वकिली आणि घरची संपन्न शेती या पार्श्वभूमीवर संपन्न परिस्थितीत त्यांचे शिक्षण झाले. शेती बारडला असली तरी या कुटुंबाचे वास्तव्य नांदेडमध्येच असे. नांदेडच्या पीपल्स हायस्कूलमधून 1965 मध्ये ‘मॅट्रिक’ झाल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी शेतकी शिक्षणाचीच दिशा निवडली आणि 1969 मध्ये परभणीच्या कृषि विद्यापीठातून त्यांनी बी.एस्सी. ऍग्रिकल्चरची पदवी मिळविली. त्यानंतर नागपूरच्या कृषि महाविद्यालयातून कीटकशास्त्रात त्यांनी एम.एस्सी.ची पदवी प्राप्त केली आणि 1971 मध्ये ते ‘सिबा’ या बहुराष्ट्रीय कंपनीत संशोधक म्हणून रुजू झाले.

इथे त्यांच्या घरातील माहितीही जाणून घेणे उद्बोेधक ठरेल! त्यांच्या घरात चार मुले आणि एक मुलगी. या चारपैकी एका मुलाने डॉक्टर व्हावे, एकाने इंजिनइर व्हावे, एकाने शेती पाहावी आणि एकाने नोकरी करावी अशी त्यांच्या वडिलांची तीव्र इच्छा. ही इच्छा त्यांनी मुलांवर लादली नाही पण त्या दृष्टीने त्यांना प्रवृत्त केले. त्यानुसार इतर भावांचे शिक्षण पार पडले आणि वडिलांच्या इच्छेनुसार आणि त्याच बरोबर स्वतःच्या कलानुसार दिलीपराव शेतीच्या क्षेत्रात उतरले. घरची भरपूर शेती. या शेतीतही आपल्या शिक्षणाचा उपयोग होईल असा त्यांचा होरा होता. या सार्‍या शिक्षणप्रवासात एक उल्लेखनीय बाब म्हणजे दिलीपरावांनी कधीही ट्यूशन लावली नाही. शाळा-कॉलेजातील शिक्षण आणि स्वतःहून घरी केलेला अभ्यास यांच्याच बळावर ते चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होत गेले. एम.एस्सी. सुद्धा त्यांनी ‘डिस्टिंक्शन’मध्ये पूर्ण केले.

कृषी क्षेत्रातील संशोधनाच्या आवडीतून दिलीपरावांनी ‘सिबा’ जॉईन केली. चांगला पैसा देणार्‍या सेल्स किंवा मार्केटिंगपेक्षाही बुद्धीचा कस लागणार्‍या ‘रिसर्च’चे क्षेत्र निवडण्यामागे त्यांचा हेतू शेतीच्या क्षेत्रात भरीव कार्य करण्याचाच होता. ही कंपनी विविध प्रकारची कीडनाशके, रोगनाशके आणि तणनाशके बनवीत असे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गोवा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू आदी राज्यांतून ते या कंपनीसीठी फिल्ड रिसर्च करीत असत. या सर्व ठिकाणी 1971 पासून पुढे दहा वर्षांत त्यांनी काम केले. भाजीपाला, चहा, कॉफी यासह सर्व प्रकारच्या पिकांवरील रासायनिक प्रयोग ते करीत. या प्रयोगांचे काही दुष्परिणाम त्यांच्या शरीरावर झाले. दुष्परिणाम कसले? ते तर ‘स्लो पॉयझनिंग’ होते. त्यांच्या पायांवर सूज येत असे. पाय इतके सुजत की अनेक जण चक्क हत्तीरोगाची तपासणी करण्याचा सल्ला देत. याचा त्रास 1980 मध्ये खूपच वाढला. काही प्रमाणात किडनीवरही दुष्परिणाम जाणवू लागले. मग मात्र त्यांनी थांबायचे ठरविले. नोकरी सोडली आणि ते नांदेडला परतले. विचारपूर्वक पुढील दिशा ठरवीत त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला आणि अल्पावधीतच ते पत्नी विजया देशमुख यांच्यासह सहकुटुंब बारडमध्ये येऊन दाखल झाले. तेथील निसर्गसंपन्न वातावरणात आपल्यावरील रासायनिक दुष्परिणाम नक्कीच कमी होतील, याबद्दल त्यांना विश्वास वाटत होता. नांदेडचे डॉ. व्ही. एस. कुलकर्णी यांनी त्यांना नॅचरोपथीची ट्रीटमेंट सुरू केली. आवडीचेच क्षेत्र असल्याने दिलीपराव शेतात चांगलेच रमले. शेतीत त्यांनी अनेक प्रयोग केले. आधुनिक शेतीच्या स्वरुपात हे प्रयोग होते. इथेही ते रासायनिक कीडनाशकेच वापरत. पण या वेळी ते स्वतः दूर राहून मजुरांकडून ही कामे करून घेत. याच काळात त्यांनी डेअरी सुरू केली. दररोज 100 लिटरपर्यंत दुधाचे उत्पादन त्यांनी सुरू केले. तुती पालनाचा व्यवसाय सुरू केला. दूध काढण्याचे जिल्ह्यातील पहिले स्वयंचलित मशीन त्यांच्या डेअरीत सर्वप्रथम सुरू झाले. शेतीत ठिबक सिंचन, तुषार सिंचनाची यशस्वी अंमलबजावणीही त्यांनी केली. हा क्रम 1980 ते 1998 या दरम्यान सुरू होता.  याच काळात 1997 मध्ये एक वेगळा विषय त्यांच्यासमोर आला. हा विषय सेंद्रीय शेतीचा होता. नागपूरचे ऍड. मनोहर परचुरे यांच्या संपर्कातून सेंद्रीय शेतीचा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचला आणि 1998 मध्ये नांदेडला कृषि विज्ञान मंडळाची स्थापनाही झाली. दिलीपराव या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बनले. ऍड. परचुरे यांचा संपर्क या काळात वाढला होता. 1998 मध्ये मुंबईत ‘ऍग्रो ऍडव्हान्टेज’ हे प्रदर्शन भरणार होते. या प्रदर्शनाला जाण्याचे दिलीपरावांनी निश्चित केले होते. पण ऍड. परचुरे यांनी त्यांना त्या ऐवजी विदर्भात सहकुटुंब येऊन सेंद्रीय शेतीची प्रात्यक्षिके पाहण्याचा आग्रह केला. तो मानून दिलीपरावांसह 8 ते 10 जणांनी आपल्या कुटुंबासह 10 दिवसांची विदर्भ सहल आयोजित केली. यवतमाळ, वर्धा, अकोला, नागपूर या परिसरातील अनेक शेतांना त्यांनी भेटी दिल्या आणि तेथील सेंद्रीय शेतीच्या प्रयोगांनी ते प्रभावित झाले. त्या आधी ते स्वतः सेंद्रीय शेतीकडे फारसे आस्थेने पाहत नसत. औषध न फवारता शेती होऊच शकत नाही, यावर त्यांचा ठाम विश्र्वास होता. ते स्वतः कृषि क्षेत्रातील उच्चशिक्षित होते आणि एका बहुराष्ट्रीय कंपनीत कामाचा अनुभव त्यांच्या गाठीला होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी करून घेतलेला हा समज तसा योग्यच होता! पण विदर्भातील ही प्रात्यक्षिके त्यांनी पाहिली आणि त्यांचा दृष्टीकोन बदलू लागला.

सेंद्रीय शेतीत कार्यरत असलेल्या पुणे येथील विक्रम बोके, पी. बी. शितोळे, परचुरे आदींशी 1999 मध्ये त्यांचा संपर्क आला. तेव्हापासून दिलीपरावांच्या सेंद्रीय शेतीतील प्रयोग आणि प्रसाराला वेग आला. याच काळात त्यांच्या कृषि विज्ञान मंडळाला राज्यस्तरीय सेंद्रीय मेळाव्यात पुरस्कारही प्रदान करण्यात आला. 2000 पासून त्यांनी ‘महाराष्ट्र ऑरगॅॅनिक फार्मिंग फेडरेशन’च्या (मॉफ) उपाध्यक्षपदाची जबाबदारीही स्वीकारली. 2005 पासून ते बारडहून पुण्यात दाखल झाले आणि ‘मॉफ’च्या मुख्यालयातून त्यांनी कामकाजाला प्रारंभ केला. त्यांच्या येण्याने ‘मॉफ’च्या परिवारात एका चांगल्या माणसाची भर पडली.

शेतीतील आवड आणि अनुभव असणारी व्यक्ती ‘मॉफ’च्या सेंद्रीय शेतीसाठी आग्रही असणार्‍या परिवारात आली हे या चळवळीच्या दृष्टीने खूप महत्वाचे होते. एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करताना झालेल्या रासायनिक कीडनाशकांच्या दुष्परिणामांचा अनुभव त्यांनी स्वतः घेतलेला होता. या पार्श्वभूमीवर सेंद्रीय शेतीतील प्रयोगांचे फायदे त्यांना अधिक लवकर लक्षात आले आणि रासायनिक शेतीमध्ये काम केलेल्या माणसाने सेंद्रीय शेतीची भलावण करण्यामुळे शेतकर्‍यांना तो मुद्दा अधिक प्रभावीपणे पटणे सोपे झाले. मात्र, शेतकर्‍यांना या गोष्टी तत्वतः समजावून सांगणे सोपे असले तरी व्यवहारातील जोड देणे अतिशय आवश्यक होते. दिलीपराव म्हणतात, लोक सेंद्रीय शेती करण्यासाठी तयार होतात पण पहिल्याच वर्षी त्यांचे उत्पन्न घटते. मग ते पर्याय शोधू लागतात आणि त्यातून जमिनीचा अधिकच र्‍हास होऊ लागतो. यासाठी ते आता काही विशिष्ट पद्धती विकसीत करीत आहेत. रासायनिक खते पूर्णतः बंद करायची हे त्यांचे पहिले तत्व आहे. अगदी प्रारंभी गांडुळ खत टाकायचे आणि नंतर दुर्लक्ष करायचे हे हे उपयोगाचे नाही, हे त्यांच्या लक्षात आले. पिकांच्या वाढीच्या काळातही त्यांना ‘ऑरगॅनिक इनपुट्‌स’ देणे आवश्यक ठरते. पेरणीतील अंतर, पिकांची जात, पेरणी पूर्व पश्चिम की दक्षिणोत्तर, आंतरपिके कोणती घेतली जातात, घेतली जातात की नाही हे प्रत्येक मुद्दे या दृष्टीने महत्वाचे ठरतात, असे ते सांगतात.

सेंद्रीय शेती ‘मोनोक्रॉपिंग’ म्हणजे एका वेळी एकच पिक घेणे मान्य करीत नाही. उदाहरणार्थ सोयाबीन काढायचे तर त्यात मूग, मका, चवळी ही पिके घेतलीच पाहिजेत. यामुळे जमिनीचा कस टिकतो आणि जमीन सशक्त होते. हिरवळीची खते हा आणखी एक प्रकार ते सांगतात. 60 टक्के द्विदल बी, 30 टक्के एकदल बी आणि 10 टक्के तेलबिया एकत्र करून दर एकरी 20 किलो बियाण्यांचा पेरा करायचा आणि साधारण 40 दिवसांत वाढलेली पिके कापून जमिनीत अंथरायची आणि सुकू द्यायची, या मुळे जमीन सशक्त होते. यानंतर नियमीत पेरणीसाठी जमीन कसण्यास सुरवात करायची. अशा प्रकारे मॉन्सुनच्या आधी किमान 40 दिवस पूर्वतयारी केल्यास पिके चांगली येतात, असा अनुभव ते सांगतात. शेती मूलद्रव्यांची नसून जिवाणूंची असते हे सर्वांनी लक्षात घ्यावे, असे ते आवर्जुन सांगतात. जमिनीत जिवाणू वाढले तरच पिकांची वाढ चांगली होते कारण पिकांना हवी असलेली जीवनसत्वे जिवाणूच पुरवीत असतात असे सांगताना ते ‘थइरी ऑफ ट्रान्सम्युटेशन’चा आधार घेतात. 1888 मध्ये बॅरन हॅरझेले या शास्त्रज्ञाने मांडलेला हा सिद्धांत अनेक कृषि विद्यापीठांच्या कुलगुरुंनाही माहिती नाही, असे सांगताना ते म्हणतात, ‘या थइरीनुसार जमिनीत सर्व प्रकारचे जिवाणू असतात. पिकांनुसार ते आपोआपच कमी अधिक होत असतात. पिके आपल्याला पोषक जिवाणूंना स्वतःहून बळ देतात आणि ते जिवाणू पिकांना घातक असलेल्या जिवाणूंचा आपोआपच नायनाट करतात. यातून निसर्गाचा समतोल राखत पिकांना आवश्यक ती जीवनसत्वे मिळतात. जे कमी आहे ते आपोआप तयार होते, नको आहे ते आपोआप कमी होते’. हवेत, झाडांवर, जमिनींत उपयुक्त आणि उपद्रवी असे दोन्ही प्रकारचे किडे - जिवाणू असतात. रासायनिक फवारणीने सरसकट सर्वच जिवाणूंचा नाश होतो आणि पिके निःसत्व बनतात. त्यामुळे आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली जाईपर्यंत पिकांवरील किडींकडे दुर्लक्ष करणेच योग्य असते, असे ते आवर्जुन सांगतात.

मिजोराम, कर्नाटक, केरळ, बिहार आदी राज्यांत रासायनिक शेती - जेनेटिकली मॉडिफाईड बियाणे यांवर अनेक प्रतिबंध आणण्यात आले आहेत, मात्र महाराष्ट्रासारख्या प्रगत म्हणवल्या जाणार्‍या राज्यात राज्यकर्त्यांनी बड्या कंपन्यांच्या दबावाखाली झुकून या कडे दुर्लक्ष केले आहे, अशी खंतही ते व्यक्त करतात. राज्याने सेंद्रीय शेतीविषयक धोरण ठरविले पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे. स्वतःच्या कारकीर्दीची सुरवात रासायनिक कीडनाशकांपासून झालेले दिलीपराव आता संपूर्णतः सेंद्रीय शेतीचे पुरस्कर्ते झाले आहेत. हे परिवर्तन घडवून आणताना न्याय्य हक्कांसाठी न्यायालयीन लढा देण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. 1997 मध्ये इंडोजर्मन कंपनीकडून त्यांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी टरबुजाचे बियाणे खरेदी केले होते. आपापल्या शेतीत पेरलेले हे बियाणे उगवलेच नव्हते. या कंपनीवर कारवाई करण्यासाठी त्यांना तेव्हापासून लढा उभारला होता. या लढ्याला शासनाने अजिबात पाठबळ दिले नाही. या कंपनीचे मुख्यालय बंगलोर येथे आहे. दिलीपरावांनी आपल्या सहकारी शेतकर्‍यांसह या कंपनीला पुण्याच्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात खेचले. मंचाने प्रत्येकी एकरी 40 हजाराची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. त्या विरुद्ध त्या कंपनीने मुंबईत राज्य ग्राहक तक्रार निवारण मंचात दाद मागितली. तेथेही शेतकर्‍यांची बाजू खरी ठरली आणि आता सन 2011 मध्ये त्या न्यायालयाने शेतकर्‍यांच्या बाजूने निकाल दिला आहे. या निकालानुसार या सर्वांना प्रत्येकी सरासरी 3 ते 4 लाख रुपये आणि त्यावरील 18 टक्क्यांप्रमाणे व्याज मिळणार आहे. त्यांच्यातील संघर्षशील वृत्तीचाच हा पुरावा!

सेंद्रीय शेतीबरोबरच शेतकर्‍यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत ते आग्रही आहेत. सेंद्रीय शेतीचा अवलंब करणार्‍या शेतकर्‍यांना पहिल्याच वर्षीपासून आधीच्या वर्षाइतके उत्पन्न सुरू झाले पाहिजे आणि नंतर ते हळूहळू वाढत गेले पाहिजे या साठी ते प्रयत्नशील आहेत. शेतकर्‍यांनी आपला शेतीमाल प्रक्रिया केल्याशिवाय विकू नये आणि त्यातही दलालांना फाटा देऊन थेट ग्राहकांपर्यंत शेतीमाल कसा पोहोचवता येईल, या साठी त्यांनी आपल्या संस्थेच्या वतीने प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी ठिकठिकाणी कंपनी कायद्यानुसार शेतकर्‍यांच्या संस्था उभारल्या जात आहेत. याचे एक उत्तम उदाहरण वाशीम येथे उभे आहे. तेथील शेतकर्‍यांनी एकत्र येऊन उभारलेल्या संस्थेमुळे शेतकर्‍यांचा मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहेत. ‘मॉफ’तर्फे ते शेतकर्‍यांसाठी 3 दिवसांचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करतात. शेती आणि शेतकर्‍यांच्या संपन्नतेसाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.

शेतीबरोबरच वैयक्तिक पातळीवरही दिलीपराव नवमतवादी आहेत. त्यांच्या पत्नी विजया यांचीही त्यांना साथ आहे. याच दृष्टीतून त्यांनी 1976 मध्ये एकाच मुलीच्या जन्मानंतर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करवून घेतली. मुलगा -मुलगी असा भेद मानत नसतानाच फक्त एकाच मुलीवर थांबण्याचा 1976 च्या काळात त्यांनी घेतलेला हा निर्णय खरोखरच क्रांतीकारी होता. या क्रांतीमध्ये त्यांच्या पत्नीचीही त्यांना साथ मिळाली. ही साथ एवढ्यापुरतीच मर्यादित नव्हती. विजयाताईंनी सेंद्रीय शेतीतही लक्ष घातले आहे. त्यांच्या माहेरीही चांगली शेती होती. त्यामुळे त्या ही शेतीच्या वातावरणात रमल्या. बारडच्या शेतीतील प्रयोगात त्यांचे लक्ष असे. सेंद्रीय शेतीतही त्यांनी लक्ष घातले आणि आता तर त्या सेंद्रीय शेतीची प्रशिक्षण शिबिरे घेतात! आपले शेतीतील अनुभव आणि घेतलेले प्रशिक्षण यांच्या बळावर त्या सेंद्रीय शेतीच्या ‘प्रचारक’ बनल्या आहेत. शेतकर्‍यांच्या हितासाठी त्यांनी आता हा ‘सपत्निक वसा’ घेतलेला आहे. त्यांनी ‘समृद्धीसाठी सेंद्रीय शेती’ हे पुस्तक लिहिले असून त्यांचे दुसरे पुस्तक ‘ऑरगॅनिक फार्मिंग सिस्टिम्स फॉर सस्टेनेबल ऍग्रीकल्चर’ लवकरच प्रकाशित होत आहे. केवळ ‘थइरी’ऐवजी ‘प्रॅक्टिकल’वर भर देण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे सेंद्रीय शेतीची ही विचारधारा झपाट्याने सर्वत्र विस्तारते आहे.
ंं
दिलीप देशमुख बारडकर
उपाध्यक्ष ‘मॉफ’, 1038/11, बालाजी निवास, फ्लॅट क्र. 5, कॉसमॉस बँक लेन,
दीप बंगला चौक, मॉडेल कॉलनी, पुणे - 16

Monday, June 25, 2012

सेंद्रीय शेतीकडे चला...


अभिनेता अमीर खान यांच्या ‘सत्यमेव जयते’च्या 24 जून 2012 च्या भागात सेंद्रीय शेतीविषयी प्रभावी जनजागृती करण्यात आली. हा खरोखरच अतिशय जिव्हाळ्याचा विषय. यावर ठिकठिकाणी उत्तम प्रयोग सुरू आहेत. दुर्दैवाने या प्रयोगांना अद्यापही राजमान्यता मिळत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचेही त्याकडे दुर्लक्ष होते.
माझ्या ‘आयकॉन्स’ सिरीजमध्ये अशी माणसे शोधण्याचा माझा प्रयत्न आहे. 1 एप्रिल 2012 रोजी प्रकाशित झालेल्या ‘लातूर आयकॉन्स’मध्ये निष्ठावंत शेतकरी संदीपान बडगिरे यांच्या प्रयोगांचा वेध मी घेतला. हा लेख आपणा सर्वांसाठी...

------------------------------------------------------------------------------
‘‘गोमुत्र ही शेतकर्‍यांसाठी आणि समाजासाठीही खूप तारक गोष्ट आहे. माणसाची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आम्ही ‘गोशक्ती’ बनवितो आणि पिकांतील रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी आणि कीटकांचा नाश करण्यासाठी ‘गोबाण’. यासाठी आम्ही गोमुत्र जमिनीवर पडण्याआधीच संकलित करतो. त्यावर विविध प्रक्रिया करतो. यासाठी फक्त सेंद्रीय पदार्थांचाच वापर होतो. साधारण 21 दिवसांच्या मेहनतीनंतर ‘गोबाण’ तयार होतो. हा पिकांसाठी रामबाण उपाय आहे, असे मी स्वानुभवाने सांगतो. आम्ही हे प्रॉडक्ट विक्रीसाठी बाजारात आणले. पण शेतकर्‍यांना फवारणी केल्याबरोबर अळी मरायला हवी असते. सेंद्रीय पद्धतीत ते अपेक्षित नसते. सेंद्रीय खतांतून आणि कीटकनाशकांमधून पिकांना हवी ती जीवनमूल्येही मिळतात आणि कीटक - अळ्यांना हे पदार्थ वेगळ्या प्रक्रियेने नष्ट करतात. आधी किटकांना भोवळ येते. त्यांच्यातील प्रजननक्षमता नष्ट होते. त्यानंतर त्यांची अन्नावरील वासना उडते आणि ते पिकांतील द्रव्ये खाणे बंद करतात. साधारण तीन ते चार दिवसांत ते मरून पडतात. इतकी वाट पाहण्याची अनेकांची इच्छा नसते. मग ते रासायनिक कीटकनाशकांच्या मागे लागतात. दहा वर्षांपुर्वी वापरली जाणारी कीटकनाशके आता चालत नाहीत. कारण ते पचविण्याची कीटकांची क्षमता वाढली आहे. त्याच्या अनेक पटीने क्षमता असलेली कीटकनाशके वापरावी लागतात. त्यामुळे जमिनीतील ‘मायक्रोऑरगॅनिझम’ नष्ट होतो आहे. माणसांवरही त्याचे दुष्परिणाम होत आहेत. पण हे लोकांना कळत नाही आणि सरकारला त्या बाबतीत काहीच करायचे नाही. त्यांना शेतकर्‍यांना अज्ञानातच ठेवायचे आहे... ही सारी देशाचा विनाश घडविणारी चिन्हे आहेत...’’ संदिपान बडगिरे मनस्वीपणे बोलत होते. त्यांच्या शब्दाशब्दांतून तळमळ व्यक्त होती. एकेकाळी ‘युक्रांद’च्या झेंड्याखाली झुंज देत आणीबाणीतील तुरुंगवास हसतहसत भोगणार्‍या बडगिरे यांनी आता स्वबळावर सेंद्रीय शेतीचे प्रयोग हाती घेतले आहेत. 1993 पासून ते या मध्ये मग्न आहेत. आपले अनुभव सर्वांना वाटण्यासाठी ते सदैव तत्पर असतात.

लातूरहून बाभळगावकडे निघालो की बाभळगाव गावात शिरण्याआधीच डाव्या हाताला सोनवतीला जाणारा रस्ता लागतो. सोनवती गावातून डावीकडे वळले की साधारण एक किलोमीटर अंतरावर बडगिरे यांचा अकुजा सेंद्रीय फार्म लागतो. वयाची साठी ओलांडलेले पण पन्नाशीचे दिसणारे संदिपान बडगिरे तेथे असतात. त्यांच्या शब्दांब्दांतून त्यांचे कार्यकर्तेपण डोकावत असते. फक्त फरक एवढाच असतो, की या ‘कार्यकर्ते’पणाला ‘कार्या’ची जोड मिळालेली असते. हवेतील गप्पागोष्टी बडगिरेंना मान्यच नाहीत!

संदिपान निवृत्ती बडगिरे मूळचे सोनवतीचेच. 3 मे 1952 ही त्यांची जन्मतारीख. चौथीपर्यंतचे शिक्षण याच गावात झाल्यानंतर पाचवीपासून पुढे शिकण्यासाठी ते लातूरमध्ये दाखल झाले. त्या वेळच्या ‘पीयूसी’नंतर त्यांनी जून 1975 मध्ये बी. ए.च्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला. जुलै 1975 मध्ये आणीबाणी लागू झाली आणि त्यांची रवानगी तुरुंगात! 1977च्या जानेवारीत ते तुरुंगातून सुटले आणि शिक्षणाला रामराम ठोकून ते ‘युवक क्रांती दला’चे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून बाहेर पडले. 1986 पर्यंत त्यांनी स्वतःला याच कार्यात झोकून दिले. पुढे आयुष्याच्या एका वळणावर ते आपल्या गावी परतले आणि शेती करण्यास सुरवात केली. पहिली पाच-सहा वर्षे रासायनिक शेतीचे मार्ग चाचपडल्यानंतर 1993 पासून त्यांनी सेंद्रीय शेतीच्या प्रयोगांना सुरवात केली. त्यांच्या आजोबांची शंभर एकर जमीन होती. पुढील दोन पिढ्यांमध्ये विभागणी होत आता संदिपानजींच्या वाट्याला 12 एकरांची जमीन आली आहे. 1993 पासून ही जमीन ते स्वतः कसतात. त्यांच्या शेतीत 100 टक्के सेंद्रीय खत व कीटकनाशकांचाच उपयोग होतो. कोणतेही रासायनिक घटक येथे वापरले जात नाहीत.

या विषयाची सुरवात 1993 मध्ये झाली. लौकीक शिक्षण बी. ए.च्या पहिल्या वर्षात थांबले असले तरी जीवनाच्या शिक्षणात त्यांनी उच्चशिक्षण प्राप्त केले होते. त्यांच्या कार्याला चिंतनाची, वाचनाची जोड होती. यातूनच शेतीतील पारंपरिक मार्गांची ओळख त्यांना झाली. भारतीय परंपरेत गोधन हे शेतीतील महत्वाचे साधन आहे. गोमुत्र पवित्र मानले जाते खरे, पण या पावित्र्याचा झापडबंद अर्थ न घेता त्यांनी त्यातील सारतत्व शोधण्याचा प्रयत्न केला आणि डोळसपणे त्याचे पावित्र्य तपासले. त्यातील पिकांना आणि माणसांना उपयुक्त असलेले गुणधर्म लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यावर शास्त्रीय प्रयोग केले आणि त्यातून माणसांसाठी आणि पिकांसाठी उपयुक्त ठरणारे ‘गोशक्ती’ आणि ‘गोबाण’ यांची निर्मिती त्यांनी सुरू केली.

ते म्हणतात, ‘‘गावरान गायींच्या मुत्रात नायट्रोजन, सल्फर, अमोनिया, कॉपर, आयर्न, युरिक ऍसिड, फॉस्फेट, सोडियम असे विविध मौल्यवान घटक आहेत. अशा परिपूर्ण घटकांचा समावेश असलेल्या गोमुत्रावर विविध आयुर्वेदिक प्रक्रिया करून आम्ही गोशक्ती बनवितो. माणसांचे शरीर रोगमुक्त राहण्यासाठी याचा उत्तम उपयोग होतो. ‘गोबाण’मध्ये याच गोमुत्रावर काही वेगळ्या प्रक्रिया केल्या जातात. त्यात आणखी काही वनस्पतींचा अर्क मिसळला जातो. साधारण 21 दिवसांच्या प्रक्रियेनंतर ‘गोबाण’ विक्रीसाठी तयार होतो.’’
केवळ ही निर्मिती करून ते शांत बसले नाहीत. हा त्यांच्या कार्याचा एक छोटासा भाग आहे. त्यांनी हाती घेतलेले मुख्य कार्य आहे ते सेंद्रीय शेतीच्या व्यापक प्रचाराचे. या साठी त्यांनी अनेक पुस्तिका लिहिल्या आहेत. पत्रके काढली आहेत. अनेक ठिकाणी जाऊन व्याख्याने दिली आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या स्वतःच्या 12 एकर शेतात ते स्वतः याच पद्धतीने शेती कसत आहेत. समर्थ रामदासांनी सांगितलेल्या ‘मूर्ख लक्षणां’मध्ये ’स्वतः न कसे, दुसर्‍यास कसाया न देई, शेती पाडून ठेवी, तो एक मूर्ख’ असे वर्णन आहे. तो आधार घेत ते शेतकर्‍यांची आगळी चळवळ उभी करण्याच्या प्रयत्नात आहेत.

त्यांच्या मते सरकार प्रोत्साहन देत असलेली ‘व्यापारी शेती’ शेतकर्‍यांसाठी आणि देशासाठीही घातक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश पार्लमेंटमध्ये लॉर्ड मेकॉलेने 2 फेब्रुवारी 1835 रोजी केलेल्या भाषणात म्हटले होते, ‘‘भारत हा देश इतका समृद्ध आहे, तिथली नैतिक मूल्ये इतकी उच्च आहेत आणि लोक इतके सक्षम योग्यतेचे आहेत की आपण हा देश कधी जिंकू शकू असे मला वाटत नाही. या देशाची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा हा या देशाचा कणा आहे. आणि आपल्याला हा देश जिंकायचा असेल, तर तोच कणा मोडायला हवा. त्यासाठी त्यांची प्राचीन श्रमाधारित शिक्षणपद्धती आणि त्यांची संस्कृती बदलावी लागेल.’’ पुढचा इतिहास आपल्याला ठावूकच आहे. ब्रिटिशांनी शिक्षण आणि श्रमाची फारकत केली. ब्रिटिशांचे आदेश पाळणार्‍या गुलामांच्या फौजा त्यांनी निर्माण केल्या. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही यात बदल झाला नाही. आता या फौजा सरकारचे ऐकतात. सरकारला हे चित्र बदलण्याची इच्छा नाही. पण हेच चित्र कायम राहिले तर हा देश नष्ट होईल, असे संदीपानजी सांगतात. या साठी सर्वात आधी शेतकरी शहाणा झाला पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे आणि सरकार शेतकर्‍याला शहाणा होऊच देत नाही, असा त्यांचा आरोप आहे. यावर उत्तर म्हणून ते स्वतःच ‘सेंद्रीय शेती जनआंदोलन’ चालवीत आहेत. साध्या जीवनपद्धतीचा स्वीकार, श्रमसंस्कृतीची जोपासना, व्यापारी व रासायनिक शेतीपद्धतीचा त्याग आणि शेतकर्‍यांचे संघटन या चतुःसुत्रीवर त्यांचे काम चालू आहे.

ते म्हणतात, ‘‘निसर्गालाच एक पीक पद्धत मान्य नाही. एकाच शेतात मिश्रपद्धतीने एकदल- द्विदल प्रकारची अनेक पिके आपण घेतली तर जमिनीतील अन्नघटक आणि ओलावा घेण्याची पिकांत स्पर्धा होत नाही. ही पिके कमी-जास्त उंचीची असल्याने आणि वेगवेगळ्या काळात वाढत असल्याने त्यांना सूर्यप्रकाशही भरपूर मिळतो. जमिनीवर सेंद्रीय पदार्थही भरपूर पडतात. त्यामुळे त्यावर जगणारे जिवाणूही योग्य प्रमाणात वाढतात. जमीनीवर सेंद्रीय पदार्थांचे अच्छादन निर्माण झाल्याने पावसाच्या पाण्याची ओल उडून जात नाही आणि वाफसाही लवकर येतो. त्यामुळे पिकांबरोबरच जमिनीचा पोतही सुधारतो.’’

या संदर्भात ते एक मॉडेलही शेतकर्‍यांसमोर ठेवू इच्छितात. ‘‘तीन फणांच्या औजाराने दक्षिण-उत्तर पेरणी करणार असाल, तर उत्तरेकडे पेरत जाताना बाजूच्या दोन नळ्याने तूर पेरून मधल्या नळ्याने हिरवळीचे पीक (ताग, धेंचा, बाजरी इ. द्विदल बियाणे) 1:2 या प्रमाणात मिसळून पेरावे आणि परत दक्षिणेकडे पेरत जाताना बाजूच्या दोन नळ्यांनी मूग पेरावे आणि मधल्या नळीने पिवळी ज्वारी किंवा आपल्या परिसरातील कोणतीही गावरान ज्वारी पेरावी. या पद्धतीने शेतात आपण दर 20 फुटांवर मुगाच्या ठिकाणी बदल करून उडीद, तीळ व सोयाबीन पेरू शकतो. या पद्धतीने एका शेतात आपण सात-आठ पिके पेरू शकतो. या पद्धतीत हिरवळीच्या लाईनमधील पिकाच्या दीड महिन्यांच्या अंतराने दोन छाटण्या करून तुरीच्या ओळीच्या शेजारी टाकल्याने जमिनीला सेंद्रीय पदार्थ मिळतात व त्यावर जिवाणू वाढतात. तसेच हिरवळीच्या (द्विदल) पिकाच्या व तूर, मूग, उडीद, सोयाबीन पिकांच्या मुळ्यावरील नत्राच्या गाठींमुळे जमिनीतील सेंद्रीय नत्राचे प्रमाण वाढते. तूर व पिवळा उंच वाढण्यापुर्वी मूग, तीळ, उडीद व सोयाबीन निघून जाते. तूर वाढण्यापुर्वी पिवळी ज्वारी निघून जाते आणि तुरीच्या वाढीला जागा मोकळी होते. पिवळ्या ज्वारीच्या मुळ्या जमीनीच्या वरच्या थरात वाढत जात असल्याने त्या मूग, उडीद व तीळ यांच्याशी स्पर्धा करीत नाहीत. तुरीच्या मुळ्या या सर्वांपेक्षा खोल जात असल्याने सर्वच पिकांची जोमदार वाढ होते. ही बहुविध पीक पद्धत असल्याने कोणत्याही पिकावरील अळीला सक्रीय होऊन वाढण्यात अडथळा येतो. ही पीकपद्धत दरवर्षी वेगळ्या जमिनीत घेतल्याने अळीची अंडी मातीत सुप्त अवस्थेत जास्त दिवस राहात नाहीत. या पद्धतीत रासायनिक फवारणी अजिबात केली जात नसल्याने सर्व मित्र किडी, पक्षी सुरक्षित राहतात. त्यामुळे या पद्धतीत पीक कोणत्याही रोगाला बळी पडत नाही. अशा पद्धतीने एकदल-द्विदल पिकांच्या अनेक जोड्या लावून खरीप व रब्बी हंगामात शेतकर्‍यांना कोणतीही पिके पेरता येतील. या पद्धतीतून कोरडवाहू आणि बागायत जमिनीतून कमी पाण्यात, मातीचा पोत वाढवत हमखास उत्पन्न तर मिळेलच पण त्याच बरोबर कुटुंबाला लागेल ते सर्व प्रकारचे धान्य व भाज्या विषमुक्त, सकस, चवदार व टिकावू मिळतील तसेच जनावरांसाठी वैरणही मिळेल आणि हळूहळू उत्पादनखर्च शून्यावर येईल.’’

स्वबळावर हे सारे उपक्रम करणार्‍या संदिपानजींचा विविध चळवळींवरील विश्र्वास आता कमी झाला आहे. आपला विचार त्यांनी विविध व्यासपीठांवरून मांडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना तेथे यश मिळाले नाही. म्हणून त्यांनी आता आपला मार्ग स्वतःच बनविण्याचा निर्धार केला आहे. वयाच्या साठीमध्ये हा ‘युवक’ पुन्हा एकदा ‘क्रांती’ची हाक देत शेतकर्‍यांच्या ‘दला’च्या पुनर्स्थापनेची ललकारी घुमवीत आहे. या चळवळीत त्यांच्या पाठीशी आहे गांधीजींचे तत्वज्ञान...!
ंं
संदिपान बडगिरे
अकुजा सेंद्रीय फार्म, सोनवती, ता. जि. लातूर