Friday, September 16, 2011

गणपतीबाप्पा, पुढच्या वर्षी थोडा उशीरा ये रे बाबा...

हे गणनायका, दुःखहारका, तू दरवर्षीप्रमाणे या वर्षी ठरल्या वेळी आलास आणि ठरल्याप्रमाणे दीड दिवस, सात दिवस, नऊ दिवस, अकरा दिवस असा वेळ घेत परत गेलासही. पण आता तू येताना आमच्या काळजाचा ठोका चुकू लागतो. तू विघ्नविनाशक, पण तुझ्या येण्याने जेवढी विघ्ने येतात ती पाहता आता हळूहळू तू जरासा उशीरानेच येण्याचे पाहा... कालांतराने येणे बंद केलेस तरी चालेल...
.............................................................................
 पाक्षिक `शेतकरी संघटक`च्या २२ सप्टेंबर २०११ च्या अंकात प्रकाशित झालेला लेख
.............................................................................. 


आदरणीय गणेशदेवा,
आपणास साष्टांग प्रणिपात. आपण ठरल्याप्रमाणे चतुर्थीला आलात आणि चतुर्दशीला मार्गस्थ झालात. तुमचं रुपलावण्य किती नेत्रसुखद. आम्हाला जेव्हापासून कळायला लागलं, त्या वयापासून आम्ही सारे तुमच्या प्रेमात पडलेलो आहोत. खरं सांगायचं, तर देवा हे तुमचं भाग्य! तुम्ही सर्वज्ञ ना? मग तुम्हीच सांगा किती जणांनी आपल्या बालपणी मातीचे - शाडूचे गणपती बनविले? किती मुलांनी आपल्या चित्रकलेच्या तयारीत कागदावर आपली छबी चितारण्याचा प्रयत्न केला. एवढे प्रमाण ब्रह्मा-विष्णुपासून पार अलिकडे संतोषीमातेपर्यंत कोणत्या देवतामध्ये आढळते?

आम्हाला आठवते, ‘गणपती येत आहेत’ याची चाहूल आम्हाला लागायची ती श्रावणातील शिडकाव्यानंतर घराशेजारच्या उंचवट्यावर आघाडा-दुर्वा उगवू लागल्यावर...! मग नदीकाठच्या ओल्या चिकणमातीचे छोटेछोटे गोळे आमच्या घरासमोरील अंगणात आणत असू. कधी मिळालाच तर शाडूही आणता येई आणि मग गणराया, तुला  साकारण्यासाछी आमची इवली बोटे झटू लागत. तुझं रुपडं साकारताना आमचं रुपडं मात्र पार काळवंडून जात असे. मग आमची झटापट सुरू होई रंग आणि ब्रशशी. अशा प्रकारे दोन-तीन दिवसांच्या मेहनतीनंतर तुझी मूर्ती साकारत असे. मूर्ती विकत आणावी लागणार नाही, या आनंदात घरातील मोठ्या माणसांचा आमच्या मूर्तीला पाठिंबा मिळे. विसर्जनापर्यंत दररोज सकाळ संध्याकाळची आरती मात्र अनेकदा आम्ही विसरत असू. मग घरात कोणाला तरी आठवण येई आणि आरती म्हटली जाई.

विसर्जनाच्या वेळी मूर्ती पाटावर ठेवून हा पाट डोक्यावर घेऊन तोल सांभाळत नदीपर्यंत जाऊन नदीत तुझे विसर्जन करताना आपल्या आयुष्यातील एक महान कलाकृती आपल्याकडून हिरावली जात असल्याचे दुःख मात्र अंतःकरणात सलत असे. या विसर्जनानंतर गावातील मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीत आम्ही सहभागी होत असू. तुझ्यापुढे नाचताना वय, जात, धर्म विसरला जात असे. बैलगाडीच्या कठड्यांवर फळ्या आडव्या टाकून तयार केलेल्या प्लॅटफॉर्मवर तुझी विशालकाय मूर्ती ठेवलेली असे. नारळाच्या झावळ्या किंवा केळीचे खुंट यांच्या हिरव्यागार कमानींमध्ये तुझी गोजिरी मूर्ती शोभत असे. समोर गावातील ब्रॉसबँड वाजत असे. क्वचित एखाद्या मंडळाला कर्णे लावून गाणी वाजविण्याचा मोह आवरत नसे. पण सारे वातावरण चैतन्याने मुसमुसलेले... प्रसन्नतेचा अर्थ तेव्हा आकळत असे...

मधली काही वर्षे अशीच गेली. आमच्या वडिलांची जागा आम्ही घेतली आणि आमची जागा आमच्या मुलाने... पण त्याने कधी मातीत हात मळविलेले आम्ही पाहिले नाही. शिस्तशीरपणे बाजारातून तुझी मूर्ती मखरासह घरात येई. या वर्षी पर्यावरणाच्या रक्षणासाठी शाडूची मूर्ती आणायचे मुलाने ठरविले तेव्हा मला आनंद वाटला. माझं वर्तुळ थोडे तुटकपणे का होईना जुळत होतं... पण शाडूची मध्यम आकाराची मूर्ती आणण्यासाठी त्याने तब्बल पाचशे रुपये खर्ची घातल्याचे कळले, तेव्हा, देवा खरं सांगतो, वाईट वाटलं...

असे वाईट वाटण्याचे दिवस आजकाल बरेच येत आहेत. बाप्पा, तुम्ही विघ्नहर्ता ना? मग हे असं का होतं? की आमच्या प्रार्थनेतील आर्तता कमी झालीय... की तुमचा प्रभाव कमी होतोय? लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य आंदोलनातील जनजागरणाचे साधन म्हणून आपल्याला विराट स्वरुपात सादर केले. आम्ही लोकमान्यांना पाहिले नाही आणि स्वातंत्र्यलढाही अनुभवला नाही. आम्ही एका वेगळ्याच लढ्यात अडकलो आहोत. हा लढा आमच्याच अस्तित्वाचा आहे. नाक्यानाक्यांवरील ‘लोकमान्य’ खंडणीला वर्गणी समजतात. रस्ते अडवणे, कर्णकर्कश्श संगीत वाजविणे हा त्यांचा हक्क आणि समाजाची अडवणूक हे कर्तव्य! आम्ही या चक्रव्यूहात अडकलो आहोत.

हा भाग तर खूपच छोटा. आता तू खराखुरा ‘व्हीआयपी’ झाला आहेस. तुझ्या रक्षणासाठी पोलिसांच्या फौजा तैनात असतात! तू खरा विघ्नहर्ता, पण आम्ही तुझी क्षमताही निष्प्रभ बनविली! परवाचीच गोष्ट... दिल्लीत साक्षात हायकोर्टासमोर स्फोट झाला. अजूनही त्याचे धागेदोरे शोधले जात आहेत. पंतप्रधानांनी हा भ्याड हल्ला असल्याचे म्हटले आहे. गृहमंत्री नेहेमीप्रमाणेच या स्फोटात कोणकोणत्या स्फोटकांचा वापर झाला असावा, या विषयी अंदाज वर्तवित आहेत. या हल्ल्याची पूर्वसूचना गुप्तचर खात्याने दिली होती, असा दावाही त्यांनी केला. दरवेळी परदेशातील अतिरेक्यांनाच अशा हल्ल्यांना जबाबदार धरून चालणार नाही, या हल्ल्यामागे देशातच प्रशिक्षित झालेले दहशतवादी असू शकतात, असेही त्यांनी सुचविले आहे. त्यांचे ‘बिटवीन द लाईन्स’ कळण्याएवढे आता लोक जागृत झाले असावेत. जखमींना भेटायला गेलेल्या राहूल गांधींची हुर्‍यो उडवीत लोकांनी त्यांना रुग्णालयापासून परत पाठविले. प्रणव मुखर्जी, कपिल सिब्बल आणि --- यांनी या वेळी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. ही बुद्धी त्यांना आपणच दिली बाप्पा?

या हल्ल्यापाठोपाठ देशात इतरत्र हल्ले चढवण्याचे ई मेल आले आणि संसदेवरील हल्ल्याचा गुन्हेगार अफजल गुरूला सोडण्याची मागणीही अतिरेकी गटांनी केली. आता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हायकोर्टासमोर वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे. गजानना, तू बुद्धीची देवता ना? मग राज्यकर्त्यांना तू बुद्धी का देत नाहीस? निर्बुद्धपणाचे सारे विक्रम तोडण्याच्या जिद्दीने यांचा राज्यकारभार सध्या चालू आहे. यांचा गृहमंत्री स्फोट घडून गेल्यानंतर त्यात कोणती स्फोटके वापरली असावीत, याचे विश्र्लेषण करतो. यांचा परराष्ट्रमंत्री युनोत जाऊन भलत्याच देशाच्या मंत्र्याचे भाषण वाचू लागतो आणि चूक लक्षात आल्यानंतर त्याचे निर्लज्ज समर्थनही करतो. यांचा भावी पंतप्रधान दहशतवाद आटोक्यात आणणे अशक्य असल्याचे जाहीर विधान करतो. अशा स्थितीत गणराया आम्हाला तुझ्याशिवाय कोण बरे आधार आहे?

बाप्पा तू युद्धकलेतही पारंगत. सार्‍या गुणांचा तुझ्यात समुच्चय. तू राज्यकर्त्यांना बुद्धी देऊ शकत नसशील तर किमान युद्धकला तरी शिकव. पाकिस्तान हा भारताचा शत्रू आहे, हे सत्य त्यांना उमगू दे. पाकिस्तानच नव्हे तर चीन हा भारताचा सर्वात मोठा शत्रू आहे, याचे भान त्यांना येऊ दे. हे भान सरकारपेक्षाही कम्युनिस्ट पक्षाला लवकर येऊ दे. वाजपेयी सरकारच्या काळात तत्कालीन परराष्ट्रमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी चीन हा भारतासाठी सर्वात धोकादायक शेजारी असल्याचे विधान केले होते तेव्हा हेच पक्ष त्यांच्यावर चवताळून उठले होते. आता चीनने काश्मीरचे डोके गिळंकृत केले आहे. तिबेट बळकावला आहे. अरुणाचलात तो आत शिरला आहे. तो ब्रह्मपुत्रेचे पाणी रोखतो आहे. सीमेवर शस्त्रास्त्रांची जमवाजमव करतो आहे. भारताच्या हद्दीत घुसतो आहे. तरीही येथील कम्युनिस्टांना तो भारताचा मित्रच वाटतो आहे. देवा, काय करशील?

गणराया, 11 सप्टेंबर 2001 नंतर अमेरिकेवर एकही हल्ला झाला नाही. त्यांनी आपली सुरक्षाव्यवस्था सीमेवरच आवळली. ‘पंछी भी पर नही मार सकता’ हे एकेकाळी मुलायमसिंह यादव यांनी कॉपीराईट करून ठेवलेले विधान आता अमेरिकेने पळविले आहे. व्हायरसेस शरीरात शिरण्याआधीच रोखले तर अँटीबायोटीक्सचे दुष्परिणाम होण्याची शक्यताच मावळते, हे सांगायला कोणाची गरज पडावी? इथे समुद्र किनार्‍यावर महिनाभरात दोन महाकाय जहाजे वाहत येतात आणि कोणत्याही यंत्रणेला त्याचा थांगपत्ता नसतो. उलट, ही जबाबदारी आपली नसल्याचे खुलासे या यंत्रणा करतात. या विषयावर संसदेत चर्चाही होत नाही. गुजरातेत लोकपाल नेमल्याच्या मुद्‌द्यावरून विरोधी पक्ष संसदेचे कामकाज रोखतात पण जहाजांशी कोणाचे देणेघेणे नसते. देशावरील अलिकडचा सर्वात मोठा हल्ला याच मार्गाने घुसखोरी करून झाला, हा इतिहास ताजा असताना सुद्धा हा निष्काळजीपणा हा देश करू शकतो. इतिहासातील चुकांपासून धडा घेत नाही त्या देशाला भविष्यकाळ नसतो, असे एक विधान आम्ही वाचले होते. या देशापुरते तरी हे विधान खोटे ठरो, अशी विनंती आम्ही आपल्याजवळ करतो.

पण देवा, हे सारे काय चालले आहे? नागरिक असुरक्षित आणि अतिरेकी मुक्त आहेत. रामदेवबाबांवर दिल्लीत प्रवेशाची बंदी लादली जाते आणि अतिरेकी बिनधास्त येऊन स्फोट घडवून जातात. अण्णा हजारे यांना गोळ्या घालण्याची खास सरकारी भाषेतील धमकी दिली जाते. ज्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत असे समाजकंटक सरकारच्या नजरेत येत नाहीत. असे का होते देवा? केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकताच आपल्या संपत्तीचा तपशील जाहिर केला. देवा, खूप आश्चर्य वाटले. दरमहा 50 हजार - एक लाखाचे वेतन आणि भत्ते घेणार्‍या नेत्यांच्या मालमत्ता कोट्यवधींच्या आहेत, तरीही अनेकांच्या नावावर घर नाही, वाहन नाही... काय हा लोकशाहीचा चमत्कार! तिकडे आंध्रात जगनमोहन रेड्डींची मालमत्ता वर्षभरात दुप्पट होते. ते गोडीत होते तोपर्यंत सारे काही आलबेल होते. ते विरोधात जाताच त्यांची संपत्ती आक्षेपार्ह ठरली. तिकडे कर्नाटकात दुसरे रेड्डी डबल रोलमध्ये कार्यरत होते. इकडे भाजपाला मदत आणि तिकडे राजशेखर रेड्डी आणि जगनमोहन रेड्डी यांच्या रुपाने कॉंग्रेसला मदत. ही रसद चालू होती तोवर सारे आलबेल पण रसद तोडताच ते खलनायक? हे काय चालले आहे गणपतीबाप्पा?

इकडे अण्णा भ्रष्टाचाराविरुद्ध रणशिंग फुंकतात आणि तिकडे या तापलेल्या तव्यावर शेकण्यासाठी भाजपा आपल्या भाकरी थापून तयार राहते? निष्कलंक वैयक्तिच चारित्र्याच्या विषयावर अडवाणींबद्दल नक्कीच आदर वाटतो पण भ्रष्टाचाराने बरबटलेल्या त्यांच्या पक्षातील इतर काही नेत्यांचे काय? अण्णा हजारे यांनी ‘त्यांच्या राज्यांत आधी लोकपाल नेमून दाखवावेत’ या आव्हानाला या पक्षाने अद्यापपर्यंत कोणतेही उत्तर दिलेले नाही. पुढचे सरकार बनविण्याची मनस्वी इच्छा असलेल्या या पक्षाला अद्यापही ही सद्बुद्धी आपण का देत नाही देवा?
देवा, प्रत्येक युगाच्या अंति महाप्रलय येत असतो म्हणतात. सार्‍या व्यवस्था सडल्या, कुजल्या, निकामी झाल्या की देश एका मोठ्या अराजकाकडे वेगाने वाटचाल करू लागतो. आजची या देशाची अवस्था पाहून आम्ही सारे जण एका खूप मोठ्या अराजकाकडे निघालो आहोत, असे तुम्हाला वाटते का? हीच महाप्रलयाची सुरवात आहे का देवा?

खरे तर तुझ्या येण्याने एकेकाळी मोठा आनंद होत असे. मातीत हात घालण्याआधी तेव्हा घरची परवानगी लागत नसे. तुझी सुबक मूर्ती घडविण्याचा विचार फक्त विचारच राहायचा. प्रत्यक्षात बनलेल्या तुझ्या मूर्तीकडे तू स्वतः पाहिले असतेस, तर फक्त सोंड आहे म्हणून ती तुझीच मूर्ती आहे, एवढीच ओळखीची खूण पटली असती. तरीही तू प्रसन्न वाटायचास. आता सर्वोत्तम दर्जाच्या मूर्तीकारांनी तयार केलेली मूर्तीही मनाला प्रसन्न करत नाही. आता तुझ्या येण्याने मनावर दडपण येते. तू येणार म्हटले की आता तुझ्या आधी वर्गणीवाले गुंड येतात. मग कर्कश्श ‘डीजे’वाले गोंधळकर्ते येतात. त्या पाठोपाठ बंदोबस्ताच्या नावाखाली पोलिस येतात. मग आम्ही अतिरेकी येण्याची वाट पाहतो. ते आले नाहीत तर हुश्श म्हणतो आणि बिचार्‍या पोलिसांना सारे श्रेय देऊन मोकळे होतो.

पण आता ही सहनशक्ती कुठपर्यंत टिकवणार देवा? आणि तू ही आजकाल निष्क्रीय होतो आहेस. योग्यता नसलेले लोक राज्यकर्ते आहेत. रक्षण करणार्‍यांच्या हाती दंडुके आहेत आणि भक्षकांच्या हाती अद्ययावत शस्त्रे...! राज्यकर्ते बदलावेत, तर चांगला पर्याय कुठे आहे? असा स्थितीत आता तुझी सरबराई करणे आम्हाला जड जाते आहे बाप्पा... आपण सर्वज्ञ, आपणालाच हे कळायला हवे. आम्ही पुढच्या वर्षी लवकर येण्याच्या घोषणा तर दिल्या, पण तू जरा उशिरानेच आलास आणि लवकर गेलास तर आमची तेवढीच लवकर मुक्तता...! हळू हळू तुझे आगमन लांबवत जा आणि मुक्काम कमी करत जा. खात्रीने सांगतो, काही वर्षातच आम्ही तुला विसरून जाऊ... हे नको असेल तर मग नाही तर एकच कर, सर्वांना सद्सद्विवेकबुद्धी दे. देशाचे हित सर्वोच्च असल्याची जाणीव सर्वांच्या मनात पुन्हा एकदा जागृत कर... ही जबाबदारी आता तुझीच!

दत्ता जोशी
मो. 9225309010