Friday, April 13, 2018

कथुआ... घृणास्पद गुन्हे आणि राष्ट्रविघातक वस्तुस्थितीचे तीन पैलू...


(दत्ता जोशी, औरंगाबाद)
----------------
हे लेखन जम्मूतील जबाबदार, माहितगार व्यक्तींकडून माहिती घेऊन केलेले आहे.
------------------
जम्मू-काश्मीरमधील कथुआ येथील एका अबोध बालिकेवर झालेल्या अत्याचारामुळे देश ढवळून निघाला. या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजेच. कथुआ, उन्नाव ही ओठांवर असलेली नावे. पण एनएच 12 वर चार नराधमांनी एका बालिकेवर केलेला अत्याचार असो, उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये 28 मार्चला 13 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिचे प्रेत कालव्यात फेकणारे गुन्हेगार असोत, आसामातील पाचव्या वर्गात शिकणार्‍या मुलीवर पाच नराधमांनी केलेला पाशवी अत्याचार असो, बिहारच्या सासराममध्ये झालेला अल्पवयीन मुलीवरील बलात्कार असो की औरंगाबादेत एका मदरशाच्या मुख्याध्यापकाने आपल्याच विद्यार्थीनीवर केलेला बलात्कार... या आधी झालेले अन्य बलात्कार असोत की या पुढे दुर्दैवाने होणारे बलात्कार... बलात्काराच्या गुन्हेगाराला क्रूरपणे ठेचून मारण्याचीच शिक्षा झाली पाहिजे. यात कसलाही संशय नाही.

इथे वैयक्तिक सांगायचे तर ही भूमिका मी मागील 20 वर्षांपासून मांडतो आहे. या गुन्ह्यात मानवाधिकाराला, गुन्हेगाराची मानसिकता समजून घेऊन त्याच्या सुधारणेला जागा ठेवण्यात येऊ नये. त्याला ठारच केले पाहिजे. त्यामुळे मेणबत्तीछाप आंदोलकांच्या भूमिकेला मी सातत्याने विरोधच केला आहे. या गुन्हेगारांना ठेचूनच ठार केले पाहिजे. ते कुणीही असोत, कुठल्याही जातीधर्मपंथाचे असोत, कुठल्याही राजकीय पक्षांचे, संघटनांचे असोत... त्यांना कुठलीही दयामाया दाखवता कामा नये. यासाठी कायद्यात जे काही बदल करावे लागतील, ते केले पाहिजेत. ऐनवेळी काहींना मानवतावादी पुळका येतो. कायद्यातील अशा बदलांना जे विरोध करतील त्यांनी यापुढे अशा प्रकरणांची जबाबदारी घेतली पाहिजे. त्यांना या गुन्ह्यात सहगुन्हेगार म्हणून ट्रीट केले पाहिजे.
000

एकीकडे अशा गुन्ह्याला कठोर शिक्षेची मागणी करत असतानाच या प्रकरणी आवाज उठविण्यामागील भूमिकेवरही थोडे लक्ष दिले पाहिजे असे मला वाटते. दुर्दैवाने भारतात अशा कुठल्याही सामाजिक विषयात आपल्या पोळीवर तूप ओढून घेण्याची आणि कारण असो वा नसो इतरांना होरपळविण्याची अहमहमिका लागलेली असते. कुठलाही राजकीय पक्ष याला अपवाद नाही. मानवतावादी चेहरा पांघरलेल्या काही संघटना अनेकदा अशा संधींचा शोध घेत असतात आणि अशा जिव्हाळ्याच्या विषयावर समाजात तणाव आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. समाजाने यातील धोका ओळखला पाहिजे आणि असा रंग देणार्‍या कुणालाही दूर ठेवले पाहिजे.

कथुआच्या प्रकरणात जे घडते आहे ते अगदी सरळ साधे नाही. ज्या निष्पाप, निरागस मुलीवर बलात्कार झाला आहे ते सारेच्या सारे नराधम ठेचलेच गेले पाहिजेत. त्यांना एक क्षणही जिवंत राहण्याचा हक्क नाही. हे असे झाले तरच त्या मुलीला न्याय मिळेल. पण या गोष्टीच्या आडून जे भयानक राजकारण खेळले जात आहे ते देशासाठी घातक आहे. यातील एकही वाक्य मी भावनेच्या भरात लिहीत नाही. या विषयाचा अभ्यास करून, जम्मूतील जबाबदार माहितगार व्यक्तींकडून माहिती घेऊनच मी हे लेखन करीत आहे. याला कुठलाही संकुचित रंग नाही, याची खात्री बाळगावी.
000

कथुआत गुन्हा काय घडला, कसा घडला, त्याचे गुन्हेगार कोण यात मला जायचे नाही. ते सगळ्यांना ठावूक आहे. पण घडलेल्या या घृणास्पद गुन्ह्यानंतर त्याचा आधार घेऊन जे राजकारण पेटविले जात आहे ते त्याहून अधिक घृणास्पद आहे. त्याला जातीय, धार्मिक आणि आंतरराष्ट्रीय पैलू आहेत. त्यातील एक एक मुद्दा विचारात घेऊ.
000

1)
हे प्रकरण मुस्लिम मुलीवर हिंदूंनी केलेले अत्याचार आणि त्याला सार्‍या हिंदू समाजाचा पाठिंबा असे रंगविले जात आहे. वस्तुस्थिती अजिबात तशी नाही. यातील मूळ वृत्त - ‘मुलगी मुस्लिम समाजातील आहे व गुन्हेगार हिंदू समाजातील आहेत’, हे सत्य आहे. पण त्यानंतरचे रंगवले जाणारे चित्र कपोलकल्पित आणि वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे आहे.

या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी जे प्रत्यक्ष लढताहेत त्यांचा परिचय आपण आधी करून घेऊ. त्यातील पहिल्या आहेत अ‍ॅड. दीपिका सिंग राजावत. त्या अत्याचारित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी कंबर कसून मैदानात उतरल्या आहेत. समाजकंटकांकडून मिळणार्‍या धमक्यांना न जुमनता त्यांनी या प्रकरणात आपले अस्तित्त्व कायम ठेवले आहे.

जम्मू काश्मिर पोलिसच्या क्राईम ब्रांचचे एसएसपी रमेशकुमार जाला हे अत्यंत स्वच्छ व कर्तबगार इतिहास असलेले वरिष्ठ पोलिस अधिकारी या प्रकरणाचा तपास करीत आहेत आणि अतिशय विक्रमी वेळेत परिणामकारकपणे कामगिरी बजावत त्यानी दोषींना गजाआड केले आहे. हे प्रकरण मजबुतपणे उभे राहिल आणि गुन्हेगारांना शिक्षा होईल या साठी ते प्रयत्नशील आहेत. जम्मू काश्मिर पोलिस दलाचे एसपी श्री. वेद यांनी अत्यंत समतोल भूमिका घेत या प्रकरणी प्रारंभापासून लक्ष घातलेले आहे. गुन्हेगार कोणीही असोत, ते मोकाट सुटता कामा नयेत असे स्पष्ट आदेश त्यांनी दिलेले आहेत. जम्मू चेंबर ऑफ कॉमर्सने या सर्व प्रकरणात अत्याचारित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. त्यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन या मुद्द्याला दुजोरा दिला आणि काही जणांनी जातीय भूमिकेतून पुकारलेल्या जम्मू बंदला विरोधही केला. राहूल पंडित नावाच्या लेखक व पत्रकाराने पहिल्या दिवसापासून या विषयी जनजागृती केली, आपली भूमिका लावून धरली. योगायोग असा की वर उल्लेख केलेले सगळेच जण हिंदू आहेत. ते एका ‘मुस्लिम’ मुलीवरील अत्याचार्‍यांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. हा विषय हिंदू - मुस्लिम नाही, अबोध बालिका आणि नरपशू असाच आहे. सगळ्यांनीच कुठलाही अभिनिवेष न आणता हा मुद्दा महत्त्वाचा मानला पाहिजे.
000

2)
या गुन्ह्यात ज्या निरागस मुलीवर अत्याचार झाले, ती मुस्लिम समाजातील होती. पण त्यातही थोडे खोलवर पाहायचे तर ती गुज्जर मुसलमान होती. जम्मू काश्मिरातील मागील काही दशकांच्या दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर, मुस्लिम समाजातील जे मोजके समुदाय भारताशी एकनिष्ठ राहिले, त्यातील गुज्जर समाज हा महत्त्वाचा. कथुआ जिल्ह्यात या समाजाची संख्या लक्षणीय आहे. राजस्थानातून काही शतकांपूर्वी स्थलांतरीत झालेला हा मूळचा हिंदू गुज्जर, कालौघात अपरिहार्यतेत त्यांनी तलवारीच्या धाकाने इस्लाम स्वीकारला पण त्यांच्या घरांतून आजही पांरपरिक देवतांची पूजा होत असते. त्यामुळेच जम्मू काश्मिर व भारताशी या समाजाची बांधिलकी अविचल आहे. या राज्यात डोगरा आणि पंडित हे दोन समाज प्रबळ समजले जातात. गुज्जरांचे या समाजांशी चांगले नाते आहे. जम्मू काश्मिरातील दहशतवादाचे उच्चाटन करून तेथील विस्कळीत जनजीवन सांभाळण्याचे प्रयत्न करण्यात मुस्लिमांतील जे गट भारताला मदत करतात त्यात तेथील शिया समाज आणि गुज्जर समाज यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. सौहार्दाची ही वीण उसवण्याचा आणि त्या द्वारे आजवर शांत राहिलेल्या जम्मू भागातही असंतोष पसरवून हा भागही काश्मिर खोर्‍याप्रमाणेच भारतापासून तोडण्याचा प्रयत्न या घटनेद्वारे केला जात आहे.
000

3)
या प्रकरणाला एक पदर रोहिंग्या मुसलमानांचाही आहे. म्यानमारमधून पळ काढलेले क्रूर आणि रानटी रोहिंगे आधी बांगलादेशच्या आणि नंतर भारताच्या भूमीत आले. म्यानमार आणि भारत यांची सीमा पूर्वांचलात आहे. तेथून जम्मू काश्मिरचे अंतर सुमारे 3 हजार किलोमीटर आहे. हे अंतर पार करून काही हजार रोहिंगे मुसलमान 2013-14 पासून जम्मूजवळ पोहोचले. हे कसे आले, त्यांना कोणी आणले, त्यांना कोणी वसवले याची उत्तरे तर्काने शोधता येऊ शकतात.

गंभीर बाब ही आहे की क्रूर रोहिंग्या मुसलमानांची ही वस्ती जम्मूलगत, जम्मू-श्रीनगर महामार्गालगत छन्नी परिसरात आहे. गंभीर बाब ही आहे, की या भागात भारतीय लष्कराचा जम्मूतील सर्वात मोठा तळ आहे आणि त्या तळाच्या कुंपणाला लागूनच ही वस्ती उभारण्यात आलेली आहे. हे रोहिंगे मुसलमान भारतात शांतीदूत म्हणून तर आलेले नाहीत. म्यानमारमधील शांतताप्रिय, अहिंसक बौद्धांनाही यांच्या क्रौर्यामुळे हाती शस्त्र घेण्याची वेळ आली त्यामुळे हे तेथून बाहेर पळाले. जेथे जातील तेथे दहशत माजवणे आणि इस्लामचा प्रसार करणे हा त्यांचा उद्देश आहे. त्याच उद्देशाने त्यांना जम्मूत वसवण्यात आले आहे. तेही लष्करी तळाजवळ.

त्याचे परिणाम समोर आले आहेत. नुकताच झालेला लष्करी तळावरील हल्ला आठवत असेलच. हा हल्ला करणारे पाकिस्तानी दहशतवाद्यांना याच वस्तीत आठवडाभर आश्रय देण्यात आला होता आणि त्याच भागातून त्यांनी लष्करी तळावर हल्ला चढविला. इतकेच नाही तर नुकतीच जम्मू भागात लष्करी जवानांवर दगडफेकीची पहिली घटना घडली ती ही याच भागात. आजवर काश्मिर खोर्‍यात होत असलेला हा घाणेरडा प्रकार आता जम्मूत सुरू झाला आहे. तो रोहिंग्या मुसलमानांच्या तळावरून. त्यातही महत्त्वाची बाब ही आहे की काश्मीर खोर्‍यातून विस्थापित झालेल्या पंडितांची छावणी याच परिसरात असून तेथे हजारो काश्मिरी पंडित परिवार वास्तव्याला आहेत. त्यांच्या मनात दहशत माजविण्याचे काम हे रोहिंगे मुसलमान करीत आहेत. या घुसखोरांविरूद्ध जम्मूत जनआक्रोश आहे. तो वेगवेगळ्या पद्धतीने बाहेर पडतो आहे. जम्मूतील वकिलांच्या आंदोलनाला हाही एक पदर आहे.
000

हा सारा विषय समोर येऊ लागल्यानंतर त्यांना वाचविण्यासाठी काँग्रेस आणि डावे प्रणित आघाडी सक्रीय झाली. त्यांच्या हाती कथुआ प्रकरणाने आयते कोलित मिळाले. त्या आधारावर अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने राळ उडविण्यात आली. मिडिया सक्रीय झाला. सोशल मिडियातून चक्रे फिरू लागली. हिंदू समाज मुळातच सोशीक आणि नैतिकतेची चाड बाळगणारा आहे. त्यांच्या भावनांना आवाहन करून हवी तशी प्रतिक्रिया नोंदवून घेण्यात या धुरिणांना यश आले. आरोपीला दगड़ाने ठेचुन मारा असे पवित्र कुरआन मधे म्हटले आहे. हिंदूंमध्ये परस्त्री मातेसमान आणि तिच्या शीलावर आक्रमण हे आक्षेपार्ह मानले गेले आहे. त्यामुळेच विष्णुची पूजा फारशी होत नाही. अनैतिक वर्तनामुळे प्रत्यक्ष परमेश्वरालाही वाळित टाकणार्‍या हिंदू समाजात बलात्कार्‍यांना मान मिळत नाही. हा समाज सगळे गुन्हे क्षम्य मानतो, पण परस्त्रीची विटंबना करणार्‍याला क्षमा करत नाही. ही दुखरी नस पकडून धर्माशीच खेळ मांडण्यात आला.
000

हे सारे समजावून घेतल्यानंतर आता एका घातक आंतरराष्ट्रीय कारस्थानाबद्दल समजून घेतले पाहिजे. हा सारा ‘ऑपरेशन स्मियर’चा भाग आहे.
000

भारत एकेकाळी जागतिक बाजारपेठेत अग्रणी होता. ब्रिटिशकाळात येथील प्रक्रिया उद्योग बंद पाडून कच्च्या मालाच्या निर्यातीतून इंग्रजांनी भारतीय उद्योग - व्यापाराची कंबर तोडली. जागतिक बाजारपेठ काबीज करण्याची भारताची क्षमता नक्कीच आहे. भौगोलिक स्थिती, नैसर्गिक साधनसंपत्ती, उत्तम मनुष्यबळ, अपार बुद्धिमत्ता यांनी हा देश नटलेला आहे. हे सारे देशभावनेने प्रेरित होऊन उभे राहिले तर जगात पुन्हा एकदा अग्रमानांकन मिळविणे भारताला अवघड नाही. हीच भीती असलेल्या प्रगत म्हणवणार्‍या देशांनी जेथे शक्य असेल तेथे भारताला ठेचण्याचा प्रयत्न नव्याने सुरू केला आहे. विविधतेत असलेली एकता ही भारताची खरी शक्ती आहे. त्यालाच सुरूंग लावण्याचे कारस्थान शिजलेले आहे. आज केंद्रात सत्तेवर असलेले सरकार भ्रष्टाराचापासून दूर आहे, अनेक दूरगामी योजना देशाचे चित्रच बदलण्याती ताकद असलेल्या आहेत, काही मोजके निर्णय चुकले असले तरी समाज सर्वसाधारणपणे या सरकारच्या पाठीशी आहे हे चित्र या विघातक शक्तींना अस्वस्थ करणारे आहे.
अशा स्थितीत देशात अराजक पसरविण्याचे षड्यंत्र या शक्तींनी रचले आहे. कोट्यवधी डॉलर या कामी खर्च होत आहेत. गुडघ्याला बांशिंग बांधून बसलेल्या सत्तातुरांना हाताशी धरून या सार्‍या शक्ती एकवटत आहेत. यात साम्यवादी आहेत, काँग्रेस आहे अगदी चर्चही आहे... भारतातील सहिष्णुता धोक्यात आणणे, भारत असुरक्षित आणि अस्थिर देश आहे, अशी बदनामी करणे, भारताच्या मानचिन्हांना कलंकित करणारे म्हणजे रामाऐवजी रावणाचे पूजन वगैरे उपक्रम आयोजणे, जेएनयू सारख्या ठिकाणाहून भारतविरोधी कारवाया चालवणे याला वेग येत आहे.

गुजरातच्या निवडणुकीत जातीय विभाजनाचा प्रयोग झाला. एकीकडे राहूल गांधींच्या बेजबाबदार साथीदारांनी जातीय विषपेरणी केली आणि दुसरीकडे राहूल स्वतः मोदींना विकासाच्या अजेंड्याचा जाब विचारत राहिले. हा दुटप्पीपणा सर्व स्तरांवर सुरू आहे. महाराष्ट्रातील भीमा कोरेगावची घटना त्याचेच प्रतीक. त्यातूनच कर्नाटकात लिंगायत पंथाला वेगळ्या धर्माची मान्यता देण्याचा घातक खेळ करण्यात आला. हे सारे देश तोडणारे षड्यंत्र आहे. हे प्रकार वाढत जात आहेत. ‘भारत तेरे टुकडे होंगे-इन्शाअल्ला’ च्या घोषणा म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि ‘भारत माता की जय’ म्हणजे जबरदस्ती असे घातक युक्तीवाद करण्यात येऊ लागले आणि सर्वोच्च न्यायालयातील चांडाळ चौकडी म्हणता येईल असे उच्चपदस्थ अशा प्रकरणांना तात्विक मुलामा देत देशद्रोह्यांना साथ देऊ लागले. हा योगायोग नसतो. हा न्यायही नसतो. इथे पैसा बोलतो...!

बलात्काराच्या काही घटनांची यादी मी वर दिली आहे. कथुआ आणि उन्नाव वगळता इतर सर्व ठिकाणी अत्याचाराची बळी ठरलेली व्यक्ती हिंदू आहे आणि बलात्कारी मुसलमान. औरंगाबादेत तर अत्याचारित मुलगी आणि बलात्कारी मौलवी हे दोघेही मुसलमान आहेत. येथे या प्रकरणी हल्लागुल्ला होत नाही. असे का? धार्मिक स्थळातील अत्याचाराचा दाखला दिला जातो, त्या मंदिरात सतत आठ दिवस बलात्कार कसा केला जाऊ शकतो, तिथे लोक दर्शनासाठी येत नव्हते का, या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. असे कसे?

अत्याचारी कुठलाही असो, तो अत्याचारीच असतो आणि त्याची लायकी ठेचून मारण्याचीच असते. असे असताना हा ‘सलेक्टीव्ह विज्डम’ कशासाठी? त्यामुळे या भारतमातेच्या कुठल्याही लेकरावर झालेला अत्याचार हा भारतमातेवरच झालेला अत्याचार आहे असेच मानले पाहिजे आणि प्रत्येक गुन्हेगाराला ठेचूनच मारले पाहिजे. यात जातीय, धार्मिक रंग येऊ देता कामा नये.

पण आता मनाचा भडका उडविणार्‍या प्रसंगांत प्रतिक्रिया देण्याआधी आपण ‘ऑपरेशन स्मियर’चे बळी ठरत नाहीयत ना, याची खात्री प्रत्येक भारतीयाने करून घेतली पाहिजे. कोट्यवधी डॉलर्स खर्च करून अशा मोहिमा आखल्या जात आहेत. एक कर्तबगार सरकार पाडून बालिश व्यक्तीच्या हाती देशाची सूत्रे द्यावीत या साठी प्रयत्न होत आहेत. कठोर आर्थिक धोरणांमुळे दुखावलेले अनेक जण सरकारच्या विरोधात जात आहेत. पण जोवर समाज या सरकारबद्दल समाधानी आहे, तोवर त्यांना यश येणार नाही हे पक्के झाल्याने आता समाजाची दिशाभूल करण्याचा, त्यांच्यात असंतोष पेटवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे. ही सावध राहण्याची, सावध करण्याची वेळ आहे.

आज इथे इतकेच.
भारत माता की जय.