Tuesday, December 19, 2017

हे अधमरक्तरञ्जिते सुजनपूजिते... श्री स्वतंत्रते...



(© दत्ता जोशी, औरंगाबाद)
सेल्यूलर जेलच्या पहिल्या पायरीला वाकून नमस्कार करीत स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या त्या तीर्थस्थळी अत्यंत विनम्रतेने प्रवेश करताना मनात असंख्य भावनांचे काहूर माजलेले होते. शालेय वयात कधीतरी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या नावाचा पहिला परिचय झाला तेव्हापासून भगूर, अंदमान आणि रत्नागिरी या तीन स्थानांची नोंद मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी ‘तीर्थस्थळ’ म्हणून झालेली होती. त्यातील अंदमान सहजसाध्य नव्हते. अनेक वर्षांपासून मनस्वी इच्छा होती. या वर्षी 18 डिसेंबर रोजी ती पूर्ण झाली.

जेलच्या पहिल्या बराकीच्या बाजूने पुढे चालताना उजवीकडे सातव्या बराकीच्या तिसर्‍या मजल्यावरची कोपर्‍यातील कोठडी दिसली आणि मनात अस्वस्थता दाटण्याला सुरुवात झाली. एक एक पाऊल पुढे टाकत होतो तसे मन भूतकाळात जात होते. सूर्यकिरणांप्रमाणे सात दिशांना पसरलेल्या मूळ सात बराकी, त्यांना मध्यभागी जोडणारा उंच टॉवर, त्या बाजूने वरती गेलेला जिना... प्रत्येक पाऊल पुढे टाकताना, एक एक पायरी चढताना शरीराला जडत्व येत होते.

तिसरा मजला चढलो, डावीकडे वळलो, बराकीचा मुख्य लोखंडी दरवाजा पार केला आणि एक एक पाऊल टाकत टोकाकडे निघालो, तशी हृदयाची धडधड वाढली... डावीकडे एक एक कोठडी... तिला असलेला भक्कम दरवाजा... भास होऊ लागला, की आत अंदमानातले ते सारे स्वातंत्र्यवीर आहेत.. ते सारे उच्चरवाने घोषणा देताहेत... ‘भारत माता की जय’... ‘वंदे मातरम्’... ‘इन्कलाब जिंदाबाद’... आणि शरीराच्या रोमरोमी रोमांच फुललेल्या अवस्थेत मी शेवटच्या कोठडीपर्यंत पोहोचतो... या कोठडीला बाहेरून आणखी एक दरवाजा... इथेच तर ब्रिटिशांचा ‘मोस्ट डेंजरस’ कैदी बंद होता ना... एवढी कडेकोट सुरक्षा इथे हवीच...!

माझी पत्नी पद्मजा माझ्या पुढेच चालत होती. तिचीही अवस्था माझ्यासारखीच झाली असावी. तिने पायातले बूट बाहेर काढून ठेवले... मीही बूट-सॉक्स काढले... अनवाणी पायाने, भरलेल्या डोळ्यांनी स्वातंत्र्याच्या त्या गाभार्‍याच्या चौकटीला आम्ही प्रणाम केला आणि आत पाऊल ठेवले... ती काळकोठडी चोहोबाजूने अंगावर धावून आली. याच कोठडीत 10 वर्षांहून अधिक काळ राहून माझ्या देशाच्या स्वातंत्र्यवीराने ब्रिटिशांना घाम फोडला होता. विलक्षण आत्मबळ असलेल्या विनायक दामोदर सावरकर नावाच्या एका बॅरिस्टराने संपन्न वैयक्तिक करिअर बाजूला ठेवून भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी त्यागाचे परमोच्च उदाहरण घालून दिलेले होते.


इथे उभा होतो तेव्हा शंभर वर्षांपूर्वीचा काळ एखाद्या चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोरून धावत होता. जुलमी जेलर विल्यम बॅरी, त्याचे तेवढेच क्रूरकर्मा साथीदार, न्यायाच्या नावाने जगभर भलावण करणारे आणि प्रत्यक्षात रक्तपिपासू असलेले ब्रिटिश राजघराणे, त्यांचे सरकार... या सर्वांना उच्चरवाने आव्हान देणारा स्वातंत्र्यवीर... आपल्या विलक्षण आत्मबळाने आपले अस्तित्त्व सार्थकी लावणारा आणि अंदमानातील इतर राजबंद्यांनाही विजिगिषु प्रेरणा देणारा नरवीर...

कोठडीत लावलेल्या प्रतिमेला नमस्कार केला. लाकडी फळीवर अंथरलेले ब्लँकेट... त्यावर असलेली प्रतिमा आणि समोर ठेवलेले दोन लोखंडी वाडगे... ऊर भरून आला. त्या फळीवर मस्तक टेकवले... दोन्ही वाडगी कवेत घेतली... यातील कणाकणांना सावरकरांचा परीसस्पर्श झालेला... तो स्पर्श मी अधाशासारखा शोषून घेत होतो... तिथून उठलो... भिंतीला अलिंगन दिले... त्यावर कानशिल टेकवताना जणू सावरकरांच्या छातीवरच टेकल्याचा भास झाला... त्यांच्या दमदार श्वासाची धीरोदात्त लय जाणवू लागली... जणू ती सांगत होती, ‘‘अरे, नुसत्या आठवणींनी केविलवाणा झालास? मी 11 वर्षे इथे काढली आहेत. जिथून माझे प्रेतच बाहेर जावे अशी ब्रिटिशांची इच्छा होती तिथून मी जिवंतपणी बाहेर पडलोच, पण त्यांना या देशाबाहेर काढण्याचा सुवर्णक्षणही अनुभवता आला. तुमची पिढी सुदैवी आहे. तुम्ही स्वतंत्र भारतात जन्मलात, आपल्या विचारांचा ब्रिटिशांइतकाच द्वेष करणारी मंडळी शेजारी आहे पण राष्ट्रीय विचारांची ताकदही नक्कीच वाढली आहे. अजून बलशाली व्हा. राष्ट्र बलशाली करा...’’

याच भिंतीवर सावरकरांनी ‘कमला’ उतरवले होते. याच कोठडीत त्यांचे स्वातंत्र्यचिंतन चालू होते. जेलर बॅरीच्या रूपाने ब्रिटिश राजसत्तेचे आघात सोसत असतानाच ते अधिकाधिक दृढनिश्चयी बनत होते.

हे अधमरक्तरञ्जिते सुजनपूजिते श्री स्वतन्त्रते
तुजसाठि मरण तें जनन... तुजवीण जनन तें मरण
तुज सकल-चराचर-शरण चराचर-शरण

अशी स्वातंत्र्यदेवतेची कठोर आळवणी करतानाच

गालावरच्या कुसुमीं किंवा कुसुमांच्या गालीं
स्वतन्त्रते भगवती तूच जी विलसतसे लाली
तु सूर्याचें तेज उदधिचे गांभीर्यहिं तूचि
स्वतन्त्रते भगवती अन्यथा ग्रहणनष्टतेची...

असे आलंकारिक वर्णनही करत स्वातंत्र्यदेवतेची उच्चरवानेे आळवणी करणारा हा स्वातंत्र्यवीर क्रांतीकारकांचा मेरूमणी ठरला.

साडेसात गुणिले बारा फुटांच्या त्या कोठडीत आयुष्याची सुमारे 11 वर्षे विलक्षण मनोधैर्याने काढत असताना ते खच्ची करण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू होताच. त्याच कोठडीच्या बरोबर खाली कैद्यांचे फाशीघर आहे. त्या फाशीघरासमोरच फाशीच्या कैद्यांच्या अखेरच्या अंघोळीची व्यवस्था... दोन बराकींच्या मध्यभागी ब्रिटिशांची छळछावणी... जिथे अर्धपोटी राजबंद्यांकडून कोलू ओढवला जायचा, काथ्या कुटून दोर वळवून घेतले जायचे आणि रोजची मागणी पूर्ण न करणार्‍यांवर अक्षरशः अमानवी अत्याचार केले जायचे. इथून खूप कमी कैदी जिवंत परतले. जे परतले त्यांच्या शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक शक्ती अधिक भक्कम... तात्याराव आणि बाबाराव हे दोन सख्खे बंधू त्यांच्यापैकीच... त्यांनी सारे आयुष्य देशासाठी, देशहितासाठी खर्चले... ते अमर ठरले...

पण या अमरत्वाला आपल्या माकडचेष्टांनी गालबोट लावण्याचा प्रयत्न करणारी मंडळी आजही आहेत. त्या कोठडीतून बाहेर पडताना समोरच्या मैदानात पाहात होतो तेव्हा तेथे तळपणार्‍या दोन ज्योती दिसल्या. पहिली ज्योती मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी जवळ. अटलजींच्या कार्यकाळात तत्कालीन पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांच्या पुढाकारातून उभारली गेलेली. त्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ओळी कोरलेल्या.


पण एका परिवारापलिकडे ज्यांची र्‍हस्वदृष्टी गेली नाही अशा मर्कटवृत्तीच्या नेत्यांनी ती निशाणीही तिथून पुसली. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर या सरकारमधील पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दुसरी एक ज्योती उभारली. पहिल्या ज्योतीवर अन्य क्रांतीकारकांच्या ओळी कोरल्या गेल्या आणि नव्या ज्योतीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या... द्वेषाचे एक चक्र सर्वादराच्या प्रक्रियेने नव्या सरकारने पूर्ण केले...

त्या पुण्यभूमीतून बाहेर पडताना पुन्हा एकदा अनेक विचारांचे काहूर माजले. त्या स्मृतींना वंदन केले आणि माझे काम संपले का? त्यांनी मांडलेला विचार प्रत्यक्षात कुणी उतरवायचा? ज्या प्रबळ राष्ट्रनिर्मितीसाठी सावरकरांनी प्रयत्न केले ते प्रयत्न पुढे कसे जाणार? ज्या जातीभेद निर्मुलनासाठी त्यांनी रत्नागिरीतून प्रारंभ केला त्या मोहिमेचे काय?

जातीभेद विसरून एकत्वाने पुढे जाण्याचा प्रयत्न राष्ट्रीय शक्ती करताना पुन्हा पुन्हा त्यांना अपशकून करण्याचा प्रयत्न तीच जुनी मंडळी करताहेत, ज्यांनी शिवरायांना ‘वाट चुकलेला देशभक्त’ म्हटले होते... ‘मी अपघाताने हिंदू आहे’, अशी दर्पोक्ती केलेली होती. सावरकरांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणार्‍या भारतीय तरुणांना दरवाजातून हकालले होते... भगतसिंगांच्या सुटकेच्या मोहिमेला अपशकून करत ‘हिंसक विचाराच्या’ तरुणांना मुक्त करता कामा नये, अशी भूमिका मांडली होती, त्याच विचाराची मंडळी पुन्हा आपले उपद्व्याप सुरू करीत आहे... जातींचे कंगोरे पुन्हा टोकदार बनवले जात आहेत...

मी यात काय करू शकतो? आपण यात काय करू शकतो? हा विराट हिंदू समाज जातीभेदविरहित होऊन बलशालीपणे उभा राहिला तरच हा देश खंबीरपणे उभा राहू शकेल. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी काय करू शकेन? हा समाज, त्यातील द्रष्टे लोक काय करू शकतील?

मी काहीतरी करेन... माझ्या क्षमतेनुसार काही करेन, एवढा निश्चय मी, आपण केला तरी खूप काही होईल...

आज इतकेच...