औरंगाबादचे उद्योजक सुनिल शिसोदिया यांची वाटचाल मला खूप आश्वासक वाटली. साधा मेकॅनिकल ड्राफ्ट्समन असणारा हा माणूस आज स्वत:चे अनेक उद्योग उभे करत निघाला आहे. ’साप्ताहिक सकाळ’ने अशा व्यक्तिंची ओळख जगाला करून देण्यासाठी अंकात खास जागा राखून ठेवली आहे. या उपक्रमात श्री. शिसोदिया यांच्या वाटचालीचा २५ जुन २०११ च्या अंकात मी करून दिलेला परिचय...
.............................................................................
औरंगाबादच्या ‘क्लिक ऍँड टेक’ या छोट्याशा युनिटमध्ये ‘स्पेशल पर्पज मशिन्स’ तयार करणारे सुनील शिसोदिया काही विशिष्ट ‘पर्पज’साठी जन्माला आले असावेत असे वाटते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी ‘वन स्टेप अप’चे स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण करण्यासाठी आपले सर्वस्व त्यांनी पणाला लावले...
कामे मिळविण्यासाठी लाच द्यायची नाही, हे सुनील शिसोदिया यांचे तत्व आहे. मागील 12-13 वर्षांत एखाद्याच वेळी अशी स्थिती आली, की काम नसल्यामुळे कामगार बसून राहिले. मात्र या तत्वाशी त्यांनी कधी तडजोड केली नाही. नव्या पिढीने नोकर्यांच्या मागे न लागता, नोकरीसाठी द्यावा लागणारा पैसा गुंतवून छोट्यामोठ्या व्यवसायास सुरवात करावी, असा आग्रह ते धरतात...
......................................................
पुण्यालगतच्या भोसरी येथील औद्योगिक वसाहतीतून रात्री दोनच्या सुमारास बाहेर पडलेला औरंगाबादचा तो तरुण शिवाजीनगरमधील आपल्या लॉजवर जाण्यासाठी रिक्षा शोधत होता. एक रिक्षा त्याच्या शेजारी येऊन थांबला त्यात आधीपासूनच दोघे जण बसलेले होते. रिक्षा थोडा पुढे जाताच एका अंधार्या गल्लीत शिरला. त्या तरुणाच्या खिशातील पैसे, हातातील घड्याळ, अंगावरूल शर्ट काढून, चार तडाखे देऊन रिक्षातील तिघांनी पोबारा केला... कसाबसा हा तरुण आपल्या लॉजपर्यंत पोहोचला. दुसर्या दिवशी परत भोसरीत जाऊन त्याने आपले राहिलेले काम पूर्ण केले आणि दुसर्या दिवशी औरंगाबादला पोहोचला, तो राजीनामा देण्याचा निर्णय घेऊनच. रात्रंदिवस राबून मर-मर काम करायचे, मेहनत करायची आणि वर असे तडाखे खाण्याचे प्रसंग? हेच होणार असेल, तर ते मालकासाठी का म्हणून? स्वतःसाठी काम करण्याच्या निर्धाराने त्यांनी राजीनामा दिला. कंपनीने आरंभी तो नाकारला, पण पुढच्या सहा महिन्यांतच हा तरुण कंपनीने दिलेली सारी प्रलोभने दूर सारून पुन्हा एकदा बाहेर पडला... सध्या त्यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादेत चार युनिट कार्यरत आहेत. एका मोठ्या लक्ष्याकडे झेपावण्यासाठी ते आपल्या पंखातील बळ वाढवीत आहेत. सुनील सुपडसिंग शिसोदिया हे त्यांचे नाव. वय वर्षे 40...!
सुनील तसे मूळचे जळगाव जिल्ह्यातील पिंपळगाव गोलाईचे. पण उदरनिर्वाहासाठी त्यांचे आईवडील औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात असलेल्या नायगाव येथे आले आणि त्यांच्या मामांच्या सहकार्याने ते तेथेच स्थायिक झाले. सुनील यांचा जन्म 8 फेब्रुवारी 1971चा. त्यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण नायगावात झाले. पाचवीपासून पुढे गावाजवळच असलेल्या आळंद येथील न्यू हायस्कूलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले आणि 1987 मध्ये ते मॅट्रिक झाले. बालपणीची ही 15-16 वर्षे तशी हालाखीची होती. वडील छोटेसे किराणा दुकान चालवीत. आई शिवणकाम करीत आपल्या भावांच्या शेतीत मदत करीत असे. सुनील यांनाही आपली शाळा आणि अभ्यास सांभाळून शेतीत राबावे लागायचे. नांगरणी, ओखरणी, पेरणी, कोळपणी या बरोबरच एकाच वेळी दोन मोटा हाकत विहिरीतील पाणी खेचण्यासारखी दमणुकीची कामे ते करीत. गावात वीज नव्हती. त्यामुळे रात्रीचा अभ्यास चिमणीच्या उजेडात. चिमणीत रॉकेल नसेल, तर अभ्यासाला सुटी. अनेकदा घरात स्वयंपाक नसायचा. तेव्हा शाळेतील त्यांचे शिक्षक - कापरे गुरुजी - आपल्या डब्यातील अन्न त्यांना द्यायचे. अनेकदा तर त्यांची आई गावातील तलावाच्या कामावर जाऊन तेथे मिळणारी ‘सुखडी’ आणत असे. तेच त्यांचे दुपारचे भोजन ! अशा हलाखीत मनातील जिद्दीने आकार घेतला. त्यात एका वर्गमित्राविषयी शिक्षकांच्या विशेष ममत्वाची भर पडली आणि त्या जिद्दीतून दहावीच्या परीक्षेत 71.85 टक्के गुण मिळवीत ते आपल्या शाळेतून प्रथम आले. त्यांच्या जिद्दी स्वभावाची ही पहिली चुणुक होती.
त्या काळात त्यांना सरकारी नोकरीचे खूप आकर्षण होते आणि गावातील सर्वात मोठा सरकारी नोकर म्हणजे तलाठी! गावात त्यांचा काय मान? तेव्हा तलाठी होण्याच्या जिद्दीने ते औरंगाबादेत दाखल झाले. शेतकी शाळेत जाऊन त्यांनी फॉर्मही भरला. पण इथे भेटलेल्या काही मित्रांमुळे त्यांना वस्तुस्थितीचे भान आले... मग त्यांनी औरंगाबादच्या ‘शासकीय तंत्रनिकेतन’ आणि ‘आयटीआय’मध्ये जाऊन तेथील फॉर्मही भरले. तंत्रनिकेतनला काही त्यांचा नंबर लागला नाही, मात्र ‘आयटीआय’मधील त्यांचा प्रवेश निश्चित झाला. इथे त्यांच्या मनातील जिद्दीचे दुसरे दर्शन घडले. कोणत्याही स्थितीत टर्नर-फीटरसारख्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा नाही, हे त्यांनी ठरविले. आयुष्यभर कामगार म्हणून जगायचे नाही, यावर ते ठाम होते. ‘सिव्हील’ की ‘मेकॅनिकल ड्राफ्ट्स्मन’ यामध्ये सहज नोकर्या मिळत नसल्यामुळे ‘सिव्हील’चा पर्याय त्यांनी रद्द केला आणि 1989 मध्ये ते ‘मेकॅनिकल ड्राफ्टस्मन’ म्हणून बाहेर पडले. परीक्षेनंतर गावी जाण्याऐवजी ते औरंगाबादच्या चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत नोकरी शोधण्यासाठी फिरू लागले आणि ‘मेमन फर्नेस’ नावाच्या कंपनीत महिना 275 रुपये पगारावर ते रुजूही झाले. निकाल तर लागायचा होता. तो लागला आणि आणखी काही महिन्यांतच त्यांनी नोकरी बदलली. आता ते वाळूज औद्योगिक वसाहतीत असलेल्या ‘टर्बोब्लास्ट’ नावाच्या कंपनीत 1150 रुपये पगारावर रुजू झाले. मात्र आयुष्यभर ‘मेकॅनिकल ड्राफ्टस्मन’ म्हणून राहण्याची त्यांची तयारी नव्हती. मधल्या काळात त्यांनी आपल्या ‘आयटीआय’च्या जोरावर ‘मेकॅनिकल इंजिनइरिंग’च्या डिप्लोमाला प्रवेश घेतला आणि 1991 मध्ये ते ‘डिप्लोमा इंजिनइर’ झाले. ही दोन वर्षे अतिषय कठीण होती. दिवसभर नोकरी करायची. संध्याकाळी रुमवर येऊन रात्रीच्या कॉलेजला पळायचे, असा त्यांचा क्रम असे. याच काळात त्यांनी आणखी एक नोकरी बदलली. परत एकदा ते चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील ‘ऑटोमोगल’ नावाच्या कंपनीत रुजू झाले. आता त्यांचा पगार झाला होता 3500! सतत नवी नोकरी मिळविण्याचे आणि वेगाने पगार वाढविण्याचे त्यांचे गुपित होते त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीत. ते दिवसाचे 10-12 तास कष्ट उपसत. कोणत्याही कामाला नकार देत नसत. या मेहनतीचा परिणाम त्यांचे कौशल्य वाढण्यात होई आणि अशा कुशल व्यक्तीला पगार देण्यास कंपन्यांची ना नसे.
याच स्थितीत त्यांच्या आयुष्यात एक महत्वाची घटना घडली. आई वडिलांच्या आग्रहामुळे त्यांना बारावीपर्यंत शिकलेल्या ‘सारिका’ यांच्याशी विवाह करावा लागला. एका खोलीत दोघांचा संसार सुरू झाला. एव्हाना ‘ऑटोमोगल’मध्ये ते पर्मनंटही झाले होते. त्यांनी लुना घेतली होती. खर्च वाढत होते तशा अपेक्षाही वाढत होत्या. यात काळात म्हणजे 1992-93 मध्ये त्यांनी दरमहा 6500 रुपये पगारावर ‘व्हिडिओकॉन’ जॉईन केले. हा त्यांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा ठरला. येथूनच त्यांच्या उद्योजकतेची पायाभरणी झाली. चितेगाव परिसरातील रेफ्रिजरेटर प्लांटला रुजू होताना ते ‘मेकॅनिकल ड्राफ्ट्स्मन’ होते. 1998 मध्ये बाहेर पडताना ते ‘डिझाईन इंजिनइर’ झाले होते!
इथे ते रुजू झाले ‘मशीन बिल्डिंग डिपार्टमेेंट’मध्ये. कंपनीला लागणार्या स्पेशप पर्पज मशीन येथे बनविल्या जात. येथे त्यांचे ‘बॉस’ होते चैतन्य अग्निहोत्री. समोरच्यावर विश्वास टाकून, त्याला संपूर्ण स्वातंत्र्य देऊन उत्तम काम करून घेण्याची त्यांची हातोटी होती. ‘कन्सेप्ट’ - ‘डिझाईन’ आणि ‘एक्झिक्युशन’ या तीनही पातळ्यांवर कसे काम करायचे, हे त्यांनी समजावून सांगितले आणि सुनील यांच्यातील उद्योजक घडत गेला. स्वतःच मशीन्स तयार करताना, रात्रंदिवस जागून काम करताना कामाचा नेमका अंदाज आला. आणि याच काळात पुण्यातील ती कटू घटना घडली. स्वतःच उद्योजक बनण्याचा त्यांचा विचार जिद्दीत उतरला. कंपनीचे तेव्हाचे उपाध्यक्ष श्री. डाबर यांनीही त्यांना प्रोत्साहन दिले. व्यवसायात अडचण आली तर कंपनीचे दरवाजे परतण्यासाठी उघडे आहेत, असा दिलासाही दिला. सर्वांच्या सदिच्छांसह नारेगाव परिसरात 100 चौरस फुटांची एक जागा दरमहा 700 रुपये भाड्याने आणि 50 हजार रुपयांचे एक ‘मिलिंग’ मशीन घेऊन त्यांनी ‘क्लिक अँड टेक’ या आपल्या उद्योगाचा शुभारंभ केला.
‘एसपीएम’ अर्थात ‘स्पेशल पर्पज मशीन’ बनविणे, हा त्यांचा उद्योग आहे. ‘जनरल’ आणि ‘स्पेशल’ असे मशीन्सचे दोन प्रकार असतात. ‘जनरल पर्पज मशीन’वर विविध प्रकारची कामे करता येतात, तर ‘एसपीएम’ एकाच प्रकारच्या कौशल्यपूर्ण उत्पादनांसाठी वापरले जाते. आपला अनुभव आणि जिद्द यांच्या जोरावर दोन सहकार्यांसह त्यांनी सुरू केलेल्या या कंपनीला पहिली ऑर्डर मिळाली श्री. अनिल मिराशी यांच्याकडून. त्यांना ‘व्हर्लपुल’साठी ‘डोअर हँडल रिलायबिलिटी टेस्टिंग मशीन’ बनवून हवे होते. हे मशीन त्यांनी अचूकपणे बनविले आणि त्यानंतर आजवर कधीही काम नाही, असे झाले नाही. एकातून दुसरे - दुसर्यातून तिसरे अशी कामे येत गेली.
सगळे व्यवस्थित चालू असताना, 1998 मध्ये मात्र त्यांना एक फटका बसला. त्यांनी ‘कमिट’ केलेल्या प्रमाणात उत्पादन निघत नसल्याने (म्हणजे प्रतिदिन 500 ऐवजी 450 नग निघत असल्याने) नागपूरच्या एका कंपनीने एक मशीन परत पाठवले. हा फटका काही लाखांचा होता. पण यामुळे खचून न जाता त्यांनी आपल्या कार्यशैलीत काही सुधारणा केल्या. कामगारांना विश्वासात घेतले. नव्या ऑर्डर स्वीकारताना त्यांनी आपल्या कामकाजात काही सुधारणा केल्या. ग्राहकांची नेमकी ‘रिक्वारमेंट’ समजावून घेऊन त्यानुसार ‘कोटेशन’ देताना त्यांना ‘फॅक्टर ऑफ सेफ्टी’चा विचार सुरू केला. मशीनबाबत कमिटमेंट देताना मशीनच्या अत्युच्च कामगिरीपेक्षा थोडी कमीच कामगिरी ते ‘कमिट’ करू लागले. स्थापनेनंतर साधारण सहा महिन्यांनंतर त्यांच्या ‘एक्स्पांन्शन’ला सुरवात झाली. वर्षभरातच त्यांनी स्वतःची जागा घेऊन स्वतंत्र इमारतीत आपले काम स्थलांतरीत केले. आज ते आपल्या 65 सहकार्यांसह आपल्या ग्राहकांना सेवा देतात. ग्राहकांचा विश्वास त्यांना नवी कामे मिळवून देतो. औरंगाबादची व्हिडिओकॉन, पुण्यातील व्हर्लपुल, हेअर, औरंगाबादच्याच एन्ड्युरन्स, ग्रीव्हज लोंबार्डिनी, नागपूरची पिक्स ट्रएान्समिशन, पैठणची ‘फोर एस’, औरंगाबादची प्रिमियम एनर्जी आदी कंपन्यांसाठी ते काम करतात. 50 हजारांच्या गुंतवणुकीवर सुरू झालेला त्यांचा हा उद्योग आता तीन कोटींच्या उलाढालीवर पोहोचला आहे. याच उद्योगाला जोडून त्यांनी विस्ताराला सुरवातही केली आहे. आपल्या सध्याच्या युनिटजवळच त्यांनी ‘सुमन इंडस्ट्रीज’ नावाने ‘पावडर कोटिंग’चे युनिट सुरू केले. शेंद्रा औद्योगिक वसाहतीत ‘गीता इंडस्ट्रीज’ या नावाने ते हायड्रोलिक सिंलेंडर तयार करतात. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कस् येथे त्यांना ‘गायत्री ऑटो काम्पोनंट्स’ नावाने ‘टुलरुम’ची कामे सुरू केली आहेत तर ‘क्लिक अँड टेक इंडस्ट्रियल ट्रेनिंग सेंटर’ या नावाने ‘ऍटो कॅड’, ‘प्रो इंजिनइर’, ‘युनिग्राफिक्स’ आदि कौशल्ये शिकविणार्या केेंद्राची स्थापना केली आहे. औपचारिक शिक्षण संपवून बाहेर पडणार्या तरुणांना ‘प्रॅक्टिकल’ ज्ञान देण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. हा सारा विस्तार मागील दोन ते अडिच वर्षांतील आहे. आता पुढील दोन ते तीन वर्षांत शेंद्रा औद्योगिक वसाहतीत तीन-साडेतीन एकरांचा भूखंड मिळवून एकाच छताखाली या सर्व सुविधा उपलब्ध करण्याचा त्यांचा मानस आहे. त्या दृष्टीने त्यांची तयारी सुरूही झालेली आहे. याच वाटचालीत दखल घेण्याजोगी आणखी एक घटना घडली. 1992 मध्ये त्यांच्या मुलीचा, गायत्रीचा जन्म झाला. मुलगा होवो अथवा मुलगी, एकच अपत्य पुरे, यावर हे दाम्पत्य ठाम होते. गायत्रीनेही आता डिप्लोमा इंजिनइरिंग पूर्ण केले आहे आणि लवकरच ती या उद्योगातही लक्ष घालण्यास सुरवात करील...! ‘बॅकवर्ड’ आणि ‘फॉरवर्ड इंटिग्रेशन’सह भविष्यातील एक मोठा उद्योगसमूह उभारण्याचीच ही पायाभरणी ठरावी !
या प्रवासात त्यांनी काही पथ्ये पाळली. कामे मिळविण्यासाठी त्यांनी कधीही कोणालाही लाच अथवा बक्षिसी दिली नाही. काही वेळा तर अशा आल्या, की कामगारांना नुसतेच बसवून ठेवावे लागले. पण त्यांनी ही तडजोड केली नाही. या रिकाम्या वेळेचा उद्योग त्यांनी कामगारांची कौशल्ये वाढविण्यासाठी व आपल्या युनिटच्या स्वच्छतेसाठी करून घेतला!
आपल्या या प्रवासात ‘व्हिडिओकॉन’मधील वर उल्लेख आलेल्या दोन वरिष्ठांबरोबरच एस. रामलिंगम आणि अरुण रे या दोघांच्या सहकार्याचा उल्लेख सुनील आवर्जुन करतात. देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या आर्थिक मदतीबद्दल ते कृतज्ञता व्यक्त करतात, आपल्या प्रतिकूल स्थितीत, हलाखीच्या काळातही हसतमुखाने संसार सावरणार्या त्यांच्या पत्नी सौ. गीता यांच्याबद्दल त्यांच्या मनात अतिशय जिव्हाळ्याचे स्थान आहे. आपल्या आई-वडिलांचे उपकार मात्र ते सदैव स्मरतात. त्यांच्या मेहनतीमुळेच आपण इथवर येऊ शकलो, अशी त्यांची भावना आहे.
व्यावसायिक यशापयशाला समोरे जात असतानाच ते आपली सामाजिक कर्तव्ये विसरत नाहीत. औद्योगिक क्षेत्रातील सहकार्यांसाठी त्यांनी लघुत्तम उद्योग नागरी सहकारी पतसंस्था 1999 मध्ये सुरू केली. विविध सामाजिक उपक्रमांना त्यांची मदत असते. सेवाभावी वृत्तीतून चालविल्या जाणार्या ‘दत्ताजी भाले रक्तपेढी’साठी त्यांनी शेकडो पिशव्या रक्त मिळवून देणारी शिबिरे आयोजित केली आहेत, काही कॅन्सर रुग्णांना मदत केली आहे आणि आपण ज्या स्थितीतून आलो, त्या स्थितीची जाणीव ठेवत आर्थिक अडचणीत असलेल्या 40 हून अधिक कुटुंबांतील मुलींच्या लग्नाचे सर्व खर्च आजवर त्यांनी केले आहेत...! 1998 ते 2011 या 13 वर्षांच्या वाटचालीचा हा आलेख त्यांच्या व्यावसायिक कौशल्यांबरोबरच या सामाजिक जबाबदारीमुळे पुढील काळात नक्कीच खूप वर जाणारा असेल...!
- दत्ता जोशी
9225 30 90 10