Sunday, July 13, 2014

'स्कीन सिटी`चा निर्माता... डॉ. नितीन ढेपे...

एखादा अभ्यासक्रम चांगला की कमी चांगला, हे त्या अभ्यासक्रमावरून ठरत नसते. तो पूर्ण करणारी व्यक्ती किती जिद्दीची आहे यावर अभ्यासक्रमाची उंची ठरते. `डरमिटोलॉजि`अर्थात त्वचारोग शास्त्र हा विषय साधारण २५ वर्षांपूर्वी नगण्य समजला जात असे. कुशाग्र बुद्धी, उत्तम मार्क असूनही आर्थिक अडचणीमुळे डॉ. नितीन ढेपे यांना पुण्यात बी. जे. मेडिकल कोलेजात MBBS नंतर 'चांगल्या' विषयात MD करण्याची संधी नाकारली गेली.
त्यांना अत्यंत नाईलाजाने `डरमेटोलॉजि`अर्थात त्वचारोग शास्त्र हा विषय घ्यावा लागला. निर्णयाची अख्खी रात्र त्यांनी तळमळत (आणि रडत) जागून काढली. त्या काळात `प्रतिष्ठा नसलेल्या या विषयाला मी प्रतिष्ठा मिळवून देईन`, असा संकल्प नितीन यांनी केला आणि ते कामाला लागले...!
त्वचा आणि सौंदर्यशास्त्राला किमान महाराष्ट्रात तरी डॉ. ढेपे यांनी नवे परिमाण दिले. सुरुवातीच्या काळात साधारण ५ वर्षे या माणसाने अक्षरशः महाराष्ट्र पिंजून काढला. त्वचेवर उपचार करणारी महागडी यंत्रे जीपमध्ये टाकून अनेक जिल्हा ठिकाणी `व्हिजिटिंग` पद्धतीने उपचार केले.
प्रारंभी सोलापुरात `स्कीन सिटी`चे सुरुवात केली. त्या पाठोपाठ पुण्यात जम बसविला. या विषयावरील खात्रीलायक आणि आद्ययावत उपचार करण्याची विश्वासार्हता त्यांनी प्रस्थापित केली. त्याच बरोबर सामाजिक बांधिलकीही जपली. सोलापुरातील चांगले चालणारे क्लिनिक चक्क स्वतंत्र ट्रस्ट स्थापून दान केले.
`डरमेटोलॉजि` विषयात भारतात सुरु झालेले दुसरे PG Institute दशकापूर्वी 'स्कीन सिटी'त सुरु झाले. राज्यातील हजारो रुग्णांनी त्यांच्या उपचाराचा लाभ घेतला आहे. त्वचारोग तज्ज्ञ म्हणजे केवळ `पांढऱ्या डागांचा डॉक्टर` नव्हे, तर सौंदर्यशास्त्रात सुद्धा त्यांचे महत्वाचे योगदान असते, हे डॉ. ढेपे यांनी सिद्ध केले. उस्मानाबाद सारख्या मागास जिल्ह्यातून बुद्धिमत्तेच्या बळावर पुढे येत आपले स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करणाऱ्या डॉ. नितीन यांच्याबद्दल म्हणूनच ममत्व वाटते...
http://www.skincityindia.com/

... आणि `हरी`चा `हरिभाऊ`झाला, त्याची संघर्षकथा...

हरी नरहर कुलकर्णी... 
एखाद्या मध्यमवर्गीय खात्या-पित्या घरचे नाव वाटावे, असे हे नाव. पण वस्तुस्थिती भयंकर होती... चार वर्षे आणि दोन वर्षे वयाची कच्ची-बच्ची घेवून तिशीतील एक विधवा साधारण चार-पाच वर्षे सांगलीच्या कृष्णेच्या काठी असलेल्या एका झाडाखाली कापडी धडूत्याचा आडोसा करून राहिली. मजुरी करणारा पती निधन पावला, धुणी-भांडी करून आयुष्य काढणाऱ्या एकट्या बाईला अपरात्री घरमालकाने नेसत्या कपड्यानिशी घराबाहेर काढले... कुठलाच आधार नाही... कृष्णेने आधार दिला.

त्यातील मोठा मुलगा म्हणजे हरी. संध्याकाळची धुणीभांडी केल्यावर घरात उरलेले अन्न घेवून येणाऱ्या आईच्या वाटेकडे दोघे भाऊ लक्ष लावून बसत. एखाद्या दिवशी काही मिळाले नाही तर उपास. पण पोट मोठे वाईट... काय करायचे? मध्यरात्री आगडोंब उसळायचा...

अशा वेळी हरी जवळच्या एका तिकटीपर्यंत जायचा. अनेकदा तेथे मंत्रून टाकलेला भाताचा गोळा असायचा. त्यावरील हळद-कुंकू दूर करून तो भात हे दोघे भाऊ खाउन टाकायचे...

असे दिवस पाहिलेल्या हरीभाउची आज दोन हॉटेले आहेत. एक भव्य मंगल कार्यालय उभारण्यासाठी त्यांनी जमीन विकत घेतलेली आहे. लवकरच कोकणात एक फार्म-हाउस ते सुरु करीत आहेत... अतिशय खडतर म्हणता येईल, असा हा प्रवास...!

याची सुरुवात झाली एका घरातील घरकामाने. दोनवेळ जेवण या पगारावर हरिभाऊनी वयाच्या १५व्या वर्षापर्यंत नोकरी केली. मग एका चहाच्या टपरीवर पोऱ्या म्हणून काम केले. त्याची मेहनत पाहून सांगलीच्या जिल्हा कोर्टातील कॅन्टीन चालविण्याची संधी बार असोसिएशनने त्यांना दिली. ते करताना बिरनाळे यांच्या कोलेजच्या मेसची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. प्रचंड मेहनतीने हे सांभाळत त्यांनी चार पैसे जोडले आणि काही काळात सांगलीच्या विश्रामबाग भागात एका उडपी व्यक्तीचे `हनुमान डोसा` नावाने प्रसिद्ध हॉटेल त्यांनी विकत घेतले. दोन वर्षांनी त्याच भागात आणखी एक हॉटेल त्यांनी मिळविले. हे दोन्ही व्यवसाय उत्तम चालविले.

सांगलीच्या जवळच त्यांनी ३ एकर जमीन विकत घेतली. तेथे त्यांना भव्य मंगल कार्यालय उभे करायचे आहे. कोकणात एक फार्म हाउस या वर्षी सुरु होईल... एकेकाळी अन्नान्न दशा असणारी ही व्यक्ती आज हॉटेल आणि मेस मिळून दररोज किमान ३ हजार जणांना जेवू घालते... कठोर मेहनत आणि शुद्ध नियत हे यांचे बलस्थान.

पहाटे ४ ला सुरु झालेला हरिभाऊ यांचा दिवस रात्री १२ ला संपतो. कृष्णेकाठी लागलेली थंड पाण्याच्या अंघोळीची सवय आजही कायम आहे. दिवाळीतही अंघोळ थंड पाण्यानेच...! आजपर्यंत या माणसाने एकही चित्रपट पाहिलेला नाही, मद्याची चवही चाखलेली नाही... काम, काम आणि फक्त काम हीच त्रिसूत्री घेवून पुढे जात असलेल्या हरिभाऊला इंग्रजीचा गंध नाहीच पण आपली सही, नाव वगळता मराठीतूनही नीटसे लिहिता येत नाही. वाचायला ते त्यांच्या मुलाबरोबर शिकले... पण त्यांना वाचण्यापेक्षा घडवणे जमले, हे महत्वाचे....