Monday, July 18, 2011

पाण्याच्या टाक्यांतून साधली प्रगती

जालना येथील आघाडीचे उद्योजक श्री. सुनील रायठठ्ठा यांच्याकडून नव्या पिढीने शिकण्यासारखे खूप काही आहे. किती अपयश पचविल्यानंतर यशाची चव चाखता येते, याचे जिते-जागते उदाहरण म्हणजे श्री. सुनील रायठठ्ठा. साप्ताहिक सकाळ च्या २३ जुलै २०११ च्या अंकात त्यांचा मी करून दिलेला परिचय...
......................................................................................
व्यवसाय उभारायचा, शेकडो जणांना काम देत ते संसार उभे करायचे आणि आपल्या कंपनीचा विस्तार जगभरात करायचा, हे काम करणे तसे अवघड. जालना शहरासारख्या आडवळणाच्या ठिकाणी राहन असा उद्योग उभारणे अधिकच आव्हानात्मक. व्यवसायात अनेक टक्केटोणपे खाऊन यशस्वी झालेल्या सुनील रायठठ्ठा यांचे व्यवसायाचे तत्त्वज्ञान खूप वेगळे आहे. जागतिक बाजारपेठेत उतरणे, टिकणे आणि वाढणे खूप सोपे असल्याचे सांगतानाच आपल्याकडील मनुष्यबळ कसे टिकवायचे आणि जोपासायचे, याच्या टिप्स ते देतात...
....................................................................................................
‘निर्यातीची भीती कशासाठी बाळगायची? जगात 196 देश आहेत. त्यात भारताचा क्रमांक साधारण 25 ते 30 च्या दरम्यान आहे. याचाच अर्थ त्यानंतरचे देश आपल्यापेक्षा मागासलेले आहेत. त्या देशांसाठी तर आपण निश्चितपणे पुढारलेले आहोत. या देशाची बाजारपेठ तर आपल्याकडे आशेने पाहते आहे. मग निर्यातीची चिंता कशासाठी करायची? आणि एकदा आपल्या उत्पादनांची गुणवत्ता लक्षात आली, की हे पुढारलेले देशही आपल्याकडे येतीलच ना ! आम्ही फिजीपासून निर्यातीला सुरवात केली आणि नुकतीच एक ऑर्डर आम्हाला ऑस्ट्रेलियासारख्या देशातून मिळाली. हे सारे आपोआप किंवा सहजपणे होत नसते. सतत प्रयत्न करणे आणि गुणवत्ता वाढविणे, हाच यासाठीचा मार्ग आहे...’ जालना येथील ‘विनोदराय इंजिनइर्स प्रा. लि.’चे श्री. सुनील रायठठ्ठा सांगत होते.

श्री. रायठठ्ठा यांच्या यशाची कमान वाढते आहे. नवनव्या देशांतून ऑर्डर्स मिळत आहेत. त्यांच्याकडे काम करणारी सारी मंडळीही खुशीत आहे. चांगला पगार आणि कामाची पूर्ण मोकळीक यामुळे प्रत्येकाला आपल्यातील कौशल्य दाखविणे सोपे जाते. मात्र आठ वर्षांपूवीची स्थिती अशी नव्हती. त्यापूर्वीच्या दहा वर्षांची स्थितीही याहून वेगळी नव्हती ! श्री. रायठठ्ठा यांच्या घोडदौडीची कहाणी खूपच वेगळी आहे. ही कहाणी आहे एका जिद्दीची, शून्यातून विश्व निर्माण करणार्‍या फिनिक्स पक्ष्याची. एकेकाळी, करइरच्या पहिल्या दशकात नोकरी आणि उद्योगांतील विविध अपयशांचे शिक्के माथ्यावर असणारे
श्री. रायठठ्ठा आज मात्र एक अत्यंत यशस्वी उद्योजक ठरले आहेत. ते तयार करीत असलेली यंत्रे सध्या 40 हून अधिक देशांत निर्यात होत आहेत. त्यात आता ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, रशिया यासारख्या देशांचाही समावेश झाला आहे.

‘विनोदराय इंजिनइर्स’मध्ये पाण्याच्या टाक्यांच्या उत्पादकांना लागणारी यंत्रे तयार होतात. बाजारपेठेत शे-दोनशे लिटर्सपासून हजारो लिटर्सपर्यंत उपलब्ध असलेल्या विविध कंपन्यांनी तयार केलेल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या टाक्या उपलब्ध आहेत. या टाक्या बनविण्याचे तंत्रज्ञान आणि त्यासाठी लागणारी मोल्डिंगची यंत्रे श्री. रायठठ्ठा तयार करतात. या व्यवसायाला त्यांनी साधारणपणे सन 1991 मध्ये सुरवात केली. खरे तर ‘रोटेशनल मोल्डिंग मशीन’चे पहिले उत्पादन त्यांनी 1986 मध्येच केले होते, पण ते प्रायोगिक तत्त्वावर होते. जालन्यातील मित्रपरिवाराला दाखविण्यासाठी आणि वापरण्यासाठी त्यांनी ते तयार करून दिले होते. त्याआधीही 1981 ते 1991 या दरम्यान त्यांनी अनेक उद्योगधंद्यांचा प्रयत्न केला.

काही व्यवसाय भागीदारीतही केले पण यश आले नाही. त्या काळात, एल अँड टी, मुंबईत नोकरी करीत असताना 1977 मध्ये ‘टाइम्स’मध्ये आलेली एक जाहिरात त्यांना पुन्हा पुन्हा आठवत होती. ही जाहिरात टाक्यांचे साचे तयार करण्याच्या संदर्भातील होती. हीच कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पण अडचण ही होती, की ती जाहिरात तर आता डोळ्यासमोर नव्हती आणि पत्ताही आठवत नव्हता. मात्र, एल अँड टी मध्ये नोकरी करीत असतानाच त्यांनी परदेशातील अनेक उद्योगांची माहिती मिळवून ठेवली होती. त्या पत्त्यांवर त्यांनी पत्रव्यवहार सुरू केला. त्यांचे कॅटलॉग्ज मागविले. इंटरनेटची सुविधा तर तेव्हा त्यांना उपलब्ध नव्हती. बराच काळच्या मेहनतीनंतर हा डेटाबेस उपलब्ध झाला आणि त्यांचा पुढचा मार्ग खुला झाला. आपल्या हाती असलेला छोटासा आणि अर्धप्रशिक्षित स्टाफ आणि स्वतःकडील तंत्रज्ञानाच्या संकल्पना यांच्या बळावर त्यांनी पहिली यंत्रणा 1991 मध्ये उभी केली. पण पाण्याच्या टाक्या तयार करण्याच्या व्यवसायाला त्या वेळी फार मोठे मार्केट नव्हते. हा व्यवसाय कसा करायचा, याचीच माहिती त्या वेळी जालन्यातील व्यावसायिक क्षेत्रात नव्हती. त्यामुळे हे यंत्र खरेदी करण्यास कोणी तयार नव्हते. अखेर, स्वतःच्या जबाबदारीवरच त्यांनी एका व्यक्तीला ही यंत्रणा दिली आणि त्याची भरभराट पाहून मग इतरांकडून चौकशी सुरू झाली. अशी यंत्रे तयार करण्याच्या ऑर्डर येऊ लागल्या पण तरीही व्यवसायाला पुरेसा वेग येत नव्हता. नऊ वर्षे अशीच गेली. सन 2000 मध्ये दिल्लीत ‘प्लास्ट इंडिया’ नावाच्या औद्योगिक प्रदर्शनात त्यांनी भाग घेतला आणि तेथून सारे चित्र पालटले. त्याच प्रदर्शनातून त्यांना निर्यातीची पहिली ऑर्डर मिळाली. श्री. रायठठ्ठा सांगतात, ‘‘या प्रदर्शनात आम्ही सर्वात लहान स्टॉल बुक केला होता. स्टॉलचे पैसेही हप्त्याहप्त्याने भरले. यंत्रे घेऊन जाण्याइतका पैसा नव्हता, म्हणून त्याचे फोटो आणि माहितीचे तक्ते आम्ही सोबत नेले होते. मशिन्सची डायमेन्शन्स काय, याचे उत्तर देण्याइतकीही आमची तयारी नव्हती. तेथे आम्ही जागतिक बाजारपेठेचे चित्र पाहिले. आमच्यातील त्रुटी आमच्या लक्षात आल्या. तेथूनच आमच्या प्रगतीला वेग आला.’’

या प्रकारच्या प्रदर्शनात सहभागी होण्यातील फायदे-तोटे सांगताना ते म्हणतात, आपण अशा प्रदर्शनांतून उतरताना खर्चाच्या दृष्टिकोनातून पाहिले, तर ते उपयोगाचे ठरणार नाही. याउलट विचार करून, ही एक गुंतवणूक आहे असे गृहित धरले, तर अशा प्रदर्शनांचा फायदा मोठा होतो, असे ते सांगतातच आणि आपल्या प्रगतीचा राजमार्ग अशा प्रदर्शनातूनच उघडला, हेही नमूद करतात. पहिल्या प्रदर्शनात उतरल्यानंतर त्यांच्या भरभराटीला प्रारंभ झाला, हे तर वर सांगितले आहेच. मागील वर्षी त्यांनी चीनमधील प्रदर्शनात भाग घेतला. या विषयात त्यांचा विचार खूप वेगळा आहे. ते म्हणतात, ‘चीनमध्ये आमची यंत्रे
विकली जावीत या इच्छेने आम्ही त्या प्रदर्शनात गेलो नव्हतो. चीनमधील प्रदर्शनात सार्‍या जगातील उद्योजकांचा सहभाग असतो, याची आम्हाला कल्पना होती. हे मार्केट मिळविण्यासाठी आम्ही तेथे गेलो. त्याचा फायदाही झाला. जिथे ग्राहक असेल तिथे आपण पोहोचले पाहिजे.’’

जालना येथून ते जागतिक बाजारपेठेत आपली उत्पादने पोचवतात. याच संदर्भात बोलताना व्यवसायात उतरू इच्छिणार्‍या तरुणांसाठी ते चार कटू सत्ये सांगू इच्छितात. त्यांच्य मते आपण कोठे कार्यरत आहोत, हे महत्त्वाचे नसते. आपण काय बनवतो आहोत आणि आपण आपला ग्राहक कसा शोधतो, याला महत्त्व आहे. घरबसल्या आपले प्रॉडक्ट कोणीही विकत घेणार नाही. त्यासाठी आपल्याला नियोजनबद्ध मार्केटिंग करणे आवश्यक आहे. कँपेनिंग करणे आवश्यक आहे. विशेषतः परदेशात आपल्या उत्पादनांना स्कोप कसा मिळेल, यासाठी सर्वांनी चाचपणी केलीच पाहिजे, असे त्यांचे आग्रही सांगणे असते. परदेशातील बाजारपेठेत उभे राहण्यासाठी त्यांनी कठोर मेहनत घेतली. पहिली ऑर्डर पाठवताना आलेले अडथळे त्यांना अजूनही व्यवस्थित आठवतात, आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी ‘निर्लेप’चे श्री. राम भोगले, औरंगाबादची देवगिरी नागरी सहकारी बँक आणि या बँकेचे तत्कालीन सरव्यवस्थापक श्री. महेश कवठेकर यांनी केलेली मदतही त्यांच्या चांगलीच स्मरणात आहे. सध्या ते रशिया, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया या बड्या देशांबरोबरच सौदी अरेबिया, कुवेत, टांझानिया, मलेशिया, हैती, नायजेरिया, फिजी, लिबिया, येमेन, मलेशिया, ट्युनिशिया, सुदान, मादागास्कर, झांबिया, कतार, संयुक्त
अरब अमिरात, अर्जेंटिना, थायलंड, इंडोनेशिया, व्हिएटनाम आदी देशांना निर्यात करतात. पूर्वी त्यांची यंत्रे ‘मॅन्युअल ऑपरेटेड’ असायची. हळू हळू ही स्थितीही बदलत गेली आणि ग्राहकांच्या मागणीनुसार सेमी ऑटोमॅटिक आणि पूर्णतः ऑटोमॅटिक प्रकारची यंत्रेही बनविण्यास त्यांनी प्रारंभ केला. आता टच स्क्रिन कंट्रोलसह असलेली यंत्रे ते तयार करतात.

परदेशातील व्यवसायाबद्दल अनेकांच्या मनात असलेल्या अनेक शंकांचे ते समाधान करतात. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो भाषेच्या अडथळ्याचा. पण हा मुद्दा गैर आहे, असे सांगताना ते म्हणतात - आपले प्रॉडक्ट दर्जेदार असेल आणि किंमत वाजवी असेल, तर तेथे व्यवहार जुळण्यासाठी भाषेचा अडथळा अजिबात येत नाही. तिथं अर्थकारण महत्त्वाचं असतं, कारण फायद्याची भाषा प्रत्येकाला समजते ! परदेशात व्यवसाय वाढवू इच्छिणार्‍या नवउद्योजकांसाठी ते एक खूप महत्त्वाची टीप देतात. विशेषतः आखाती देशांतील निर्यातीच्या संदर्भात त्यांचे निरीक्षण असे आहे, की तेथील जवळजवळ सर्व प्रमुख उद्योगांमध्ये ‘मॅनेजरीयल केडर’ मुख्यत्वे भारतीय आणि विशेषतः दक्षिण भारतीय आहे. आपल्या व्यवसायवृद्धीत त्याचा खूप फायदा होऊ शकतो. या अधिकार्‍यांच्या मनात भारतातून आयात करण्याची तीव्र इच्छा असते. त्यांच्या मनातील देशभक्तीची भावना इथे प्रबळ असते, पण गुणवत्तेच्या हमीविषयी साशंकता आणि वेळ न पाळली जाण्याची भीतीही असते. ही साशंकता दूर करून उत्कृष्ट दर्जाविषयी त्यांची खात्री पटवून दिली, की तेथील दरवाजे आपल्याला सदासर्वदा उघडले जातात.

श्री. रायठठ्ठा यांच्या व्यवसायातील बारकाव्यांची माहिती सांगायची, तर ती खूप मोठी होईल. जाणून घ्यायचे असेल, तर त्यांची कार्यपद्धती आणि दृष्टिकोन जाणून घेणे तरुणांसाठी मार्गदर्शक ठरेल. 1977 मध्ये औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी आरंभीच्या काळात ‘एल ऍड टी’मध्ये नोकरी केली. 1981 मध्ये त्यांनी नोकरी सोडून स्वतःच्या व्यवसायास सुरवात केली. औरंगाबादेत सुरवातीच्या काळातील पार्टनरशिपचे व्यवसाय फारसे चालले नाहीत. त्यानंतर ते जालन्यात परत गेले. अनेक प्रकारच्या व्यवसायांचा प्रयत्न केला. अनेकदा असफल झाले. प्रयत्न मात्र चालूच राहिले... त्याचे फळ मिळाले आणि गेल्या साधारण आठ-नऊ वर्षांत सारे चित्र बदलले. आज त्यांनी आपल्या व्यवसायातील एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. छोट्या देशांपासून सुरवात करून आपल्या निर्यातीचे क्षेत्र त्यांनी आता फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, रशियासारख्या देशापर्यंत विस्तारले आहे.

हे करण्यासाठी त्यांनी काय केले? आश्चर्य वाटेल, पण स्वतःच्या छताखाली ते या यंत्रांचा एकही सुटा भाग बनवीत नाहीत. मात्र प्रत्येक भाग ते इतरांकडून बनवून घेतात. हे ‘इतर’ लोक जालन्यातीलच आहेत. हे सारे उच्चशिक्षित नाहीत, तर तशा अर्थाने सामान्य कामगार आहेत. मात्र त्यांना योग्य प्रशिक्षण दिले, तर आपल्याला हवे तशी गुणवत्ता ते देतात. श्री. रायठठ्ठा यांनी मागील काही वर्षांत तर एक अभिनव प्रयोगही केला आहे. समाजात दुर्लक्षित असलेल्या शिकलकरी समाजातील काही गुणवंत माणसे निवडून त्यांना प्रशिक्षित केले आणि त्यांच्याकडूनही काही कामे करून घेतली! अशी गुणवंत स्थानिक माणसं त्यांनी उभी केली. अगदी मुंबई आणि सुरत-अहमदाबादसारख्या शहरांतूनही ते सुटे भाग बनवून घेतात. असेंबल करतात आणि क्लायंटकडे पाठवून देतात! त्यांचे कौशल्य असते, ते अचूक ड्रॉइंगमध्ये.

आपल्या माणसांवर विश्वास कसा आणि किती टाकावा, हे रायठठ्ठा यांच्याकडूनच शिकावे ! परदेशातील बाजारपेठ मिळवताना आणि वाढवताना ते स्वतः जेवढ्या वेळा परदेशात गेले नसतील, त्याहून अधिक वेळा त्यांच्याकडील कामगार परदेशी जाऊन आलेला आहे ! 45 -50 लाखांचं मशीन तयार झाल्यानंतर ते वेगवेगळ्या पार्टमध्ये विभागून पॅक केलं जातं. ही डिलिव्हरी घेऊन हे कामगार परदेशी जातात. तेथे ही मशिनरी असेंबल करतात. त्याची यशस्वी चाचणी घेतात. कस्टमरचे पूर्ण समाधान करूनच ते आपल्या घरी परत येतात. या कामासाठी एक ते चार आठवडेही लागू शकतात. मात्र
परदेशी भूमीवरही ‘विनोदराय’चे हे प्रतिनिधी अत्यंत आत्मविश्वासाने वावरतात. तेथे गेल्यानंतर त्यांच्यात एक बदल होतो. जाताना ते ‘विनोदराय’चे प्रतिनिधी असतात, गेल्यानंतर मात्र ते भारताचे प्रतिनिधी होतात. आपल्यावर टाकलेली जबाबदारी हा त्यांच्यासाठी राष्ट्रीय अस्मितेचा मुद्दा होतो. ङ्गविनोदरायफच्या इतिहासात आजवर कस्टमरकडून अशा प्रकारच्या व्यक्तीबद्दल कधीही तक्रार आली नाही, उलट ते लोक या कामगारांचे मनापासून स्वागत करतात आणि भरघोस पाहुणचारही !

उद्योगाच्या क्षेत्रात ही नवी संकल्पना रुजविताना त्यांनी फक्त माणसं उभी केली, जोडली आणि सर्वांना घेऊन ते आता पुढे जात आहेत...! पुढे जाताना ते आता नव्या पिढीचा विचार करतात. विशेषतः जालना परिसरातील मागासलेपण त्यांना खटकते. येथील तरुण पिढीला योग्य दिशा आणि मार्गदर्शन देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. सन 2009 पासून त्यांनी जालन्यात ‘यंग इनोव्हेटर्स’ ही चळवळ उभारली आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या सहकार्याने ते विद्यार्थ्यांतील अभिनव कल्पनांना खतपाणी घालण्याचे व त्या फुलविण्याचे काम करतात. यंत्रमानव निर्मितीची कार्यशाळा, फोटोग्राफी कार्यशाळा यांच्यासह अनेक उपक्रम ते जालन्यात राबवितात. स्वतः दीड-दोन लाख रुपयांचा खर्च करून त्यांनी खास विद्यार्थ्यांसाठी जालन्यात एक संपन्न ग्रंथालय उभारले आहे. जालन्यातील पुढची पिढी अधिक सक्षम आणि परिपूर्ण होण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न सुरू आहे. अशाच प्रकारे जालना जिल्ह्यातील उद्योजकांची, त्यांच्या यशाच्या मार्गांची ओळख नव्या पिढीला व्हावी या साठी त्यांनी पुढाकार घेऊन ‘जालना आयकॉन्स’ या 40 यशकथांच्या संकलनाचे पुस्तकही तयार केले असून ते प्रकाशनाच्या मार्गावर आहे. ग्रामीण भागातील मुलांना चांगले तांत्रिक शिक्षण मिळावे या दृष्टीने त्यांनी महाराष्ट्र सरकारशी समन्वयाचा करार करून जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथील ‘आयटीआय’ महाविद्यालयाचे व्यवस्थापन स्वतःकडे घेतले आहे. या महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे ते अध्यक्ष आहेत.

आज कॉर्पोरेट जगतात ’सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज’ हा स्वतंत्र विभाग कार्यरत असतो. या द्वारे समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी काही निधी राखून ठेवलेला असतो. अनेकदा यातून फक्त देखावे उभारले जात असल्याची टीका होत असते. मात्र, अशा प्रकारचे कसलेही बंधन नसताना श्री. रायठठ्ठा यांनी जालन्याच्या भावी पिढीसाठी उभारलेला ‘यंग इनोव्हेटर्स’चा हा महायज्ञ सर्वांसाठीच अनुकरणीय ठरावा.

करिअर ग्राफ ः
सन 1973 - जालना येथून 12 वी उत्तीर्ण
सन 1977 - औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनइरिंग पूर्ण
सन 1977 ते 1981 - मुंबईत ‘एल अँड टी’ मध्ये नोकरी
सन 1981 ते 1986 - औरंगाबादमध्ये परत येऊन मित्रांसोबत विविध व्यवसायांचे प्रयोग.
त्यात अपयश.
सन 1986 ते 1991 - जालना येथे परत येऊन विविध व्यवसायांची चाचपणी. त्यात अपयश.
सन 1991 - पहिले रोटेशनल मोल्डिंग मशीन तयार करून मित्राला वापरण्यासाठी दिले.
यशाचा पहिला किरण.
सन 1991 ते 2000 - छोट्या पातळीवर मशीन्स तयार करण्याचा प्रयत्न. अल्प यश.
सन 2000 - दिल्लीत ‘प्लास्ट इंडिया’ प्रदर्शनात सहभाग. हा उपाय यशस्वी.
तेथून उद्योगाला चांगला वेग.
सन 2001 - पहिले यंत्र निर्यात
सध्या...
सुमारे 40 देशांत निर्यात.
भारतातील निम्म्यांहून अधिक राज्यांत पुरवठा
सन 2000-01 ची उलाढाल ः 46 लाख
सन 2010-11 ची उलाढाल ः 11 कोटी 16 लाख

करिअर  टिप्स
1) जिथे ग्राहक असेल तिथे आपण पोहोचले पाहिजे.
2) आपले प्रॉडक्ट दर्जेदार असेल आणि किंमत वाजवी असेल, तर तेथे व्यवहार
जुळण्यासाठी भाषेचा अडथळा अजिबात येत नाही कारण फायद्याची भाषा प्रत्येकाला
समजते !
3) आखाती देशांतील जवळजवळ सर्व प्रमुख उद्योगांमध्ये ‘मॅनेजरीयल केडर’ मुख्यत्वे
भारतीय आणि विशेषतः दक्षिण भारतीय आहे. आपल्या व्यवसायवृद्धीत त्याचा खूप
फायदा होऊ शकतो.
4) औद्योगिक प्रदर्शनांतून उतरताना खर्चाच्या दृष्टिकोनातून पाहिले, तर ते उपयोगाचे
ठरणार नाही. याउलट विचार करून, ही एक गुंतवणूक आहे असे गृहित धरले, तर अशा
प्रदर्शनांचा फायदा मोठा होतो.

- दत्ता जोशी
9225 30 90 10

विनोदराय इंजिनइर्स प्रा. लि.
12 कि.मी. स्टोन, औरंगाबाद जालना रोड,
दावलवाडी, ता. बदनापूर, जि. जालना
संपर्क ः 02482-262000