Saturday, April 21, 2012

‘निर्लेप’ यशकथा...


मराठवाड्यातील पहिला उद्योग ‘उमासन्स’... ही आजच्या ‘निर्लेप’ची मूळ संस्था. नानासाहेब भोगले यांनी रोवलेली मराठवाड्यातील उद्योगाची मुहुर्तमेढ आता ‘पन्नाशी’त पोहोचली आहे. या पहिल्या पावलाविषयी विस्ताराने... हा लेख दैनिक दिव्य मराठी ने दि. २१ एप्रिल २०१२ रोजी त्यांच्या 'उद्योग भरारी' या पुरवणीच्या मुख्य पृष्ठावर प्रकाशित केला...
माझ्या २००६ मध्ये प्रकाशित  'झेप' या पहिल्या पिढीतील उद्योजकांचा परिचय करून देणाऱ्या  उद्योजकीय पुस्तकात हा लेख प्रथम प्रकाशित झाला होता.
...........................................................................................

मुंबईत 1955 च्या दरम्यान एका व्यवसायाने चांगलेच मूळ धरले होते. हा व्यवसाय होता वैद्यकीय व्यवसायाला लागणार्‍या विविध उपकरणे व वस्तूंच्या पुरवठ्याचा. ही सारी उपकरणे तोवर आयात करावी लागत. आयातीऐवजी ही उपकरणे भारतातच बनविली तर चांगला फायदा होऊ शकेल, असे त्यांच्या लक्षात आले. त्या दृष्टीने चाचपणी सुरू झाली आणि ‘एक्स रे फिल्म प्रोसेसिंग’ व ‘स्टर्लायझर’ हे तोडगे त्यावर निघाले. मुंबईत रे रोडवर सुरू झालेल्या या कामाचा विस्तार वेगाने झाला. मागणी-पुरवठ्याचे गणित सांभाळण्यासाठी कामाचा विस्तार करणे आवश्यक होते आणि हा विस्तार सामावून घेण्यासाठी लागणारी जागा मुंबईत मिळणे खूप कठीण जाऊ लागले, तसा या उद्योगाच्या प्रमुखांनी मुंबईबाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि ते थेट औरंगाबादेत पोचले. औरंगाबादच्या औरंगपुरा परिसरात 35 बाय 25 फुटांच्या शेडमध्ये त्यांनी आपले युनिट थाटले. 12 जानेवारी 1962 रोजी ‘उमासन्स इक्विपमेंट्‌स अँड ऍक्सेसरीज्‌’ या उद्योगाचा शुभारंभ झाला आणि हा उद्योग आणणारी व्यक्ती होती नीलकंठ गोपाळ भोगले ऊर्फ नानासाहेब भोगले. औरंगाबाद शहराच्या आणि पर्यायाने मराठवाडा विभागाच्या औद्योगिकीकरणाच्या वाटचालीतील हे पहिले पाऊल ठरले. हीच ‘निर्लेप’ उद्योगसमूहाची सुरवात होती आणि मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाचीही !

नानासाहेब मुंबईतून औरंगाबादेत आले असले, तरी त्यांना मराठवाड्याची पार्श्वभूमी होतीच. त्यांचे आजोबा रामराव भोगले त्या काळात अंबड, जालना, वैजापूर आदी ठिकाणी पेशकार म्हणून कार्यरत होते. नानासाहेबांचे वडील गोपाळराव यांनी पुण्यातून ओव्हरसइरचा डिप्लोमा घेतला आणि ते वर्‍हाडात स्थायीक झाले. त्यांची चार मुले नोकरी-उद्योगानिमित्त मुंबईत स्थिरावली होती. पुढे झालेल्या व्यवसायविस्तारानंतर त्यातील दोघे औरंगाबादेत आले.

नानासाहेब भोगले यांचे व्यक्तिमत्त्व उद्योगानुकूल होते. त्यातूनच नोकरीच्या मळवाटेऐवजी त्यांनी वैद्यकीय व्यवसायाला लागणार्‍या केमिकल्सच्या मार्केटिंगचा मार्ग सर्वप्रथम अनुसरला. याच दरम्यान एका डॉक्टरकडे ‘एक्स रे फिल्म प्रोसेसिंग’साठी लागणारे उपकरण पडून असलेले त्यांना दिसले. ते इंपोर्टेड होते आणि त्याची दुरुस्ती होत नव्हती. नानासाहेबांनी ते दुरुस्त केले. काही दिवसांनंतर मूळ जर्मन कंपनीच्या माणसाने नानासाहेबांची ही कामगिरी पाहिली आणि या मशिन्स भारतातच बनविण्याविषयी सुचविले. हे आव्हान त्यांनी स्वीकारले. अशा पद्धतीने ‘इंपोर्ट सब्स्टिट्यूट’ यंत्र भारतात प्रथमच बनविण्याचा मानही त्यांच्याकडे चालत आला. उत्तम गुणवत्तेमुळे ‘सीमेन्स’ आणि ‘अग्फा गेव्हर्ट’ या दोन जर्मन कंपन्यांनी त्याचे मार्केटिंग करण्यास सुरवात केली. हा व्यवसाय चांगला चालू होता. भोगले कुटुंबाने उचललेले हे धाडसी पाऊल यशस्वी ठरले होते. कुटुंबाने म्हणण्याचे कारण म्हणजे आरंभीचा उल्लेख नानासाहेब भोगले यांच्या नावाचा असला तरी त्यांना प्रेरणा होती त्यांचे ज्येष्ठ बंधू विष्णू भोगले यांची आणि त्यांचे छोटे भाऊ श्रीकांत त्यांच्या मदतीला होते. यामध्ये त्यांच्या बहिणीही मागे नव्हत्या. या भावंडांच्या आईंचे नाव ‘उमा’. म्हणून उद्योगाचे नाव ‘उमासन्स’.

‘उमासन्स’ची वाटचाल चांगल्या पद्धतीने सुरू होती. हा व्यवसाय स्टेनलेस स्टीलवर अवलंबून होता. याच दरम्यान 1968 मध्ये स्टेनलेस स्टीलच्या आयातीवर सरकार बंदी घालणार, अशी जबरदस्त अफवा पसरली. त्याची शहानिशा करणेही अवघड जाऊ लागले. व्यवसाय पुढे सुरू ठेवायचा, तर पर्यायी व्यवस्था हवी. त्यातच एका तज्ज्ञाने उपाय सुचविला. ‘पॉलीटेट्रा फ्लोरो इथिलीन’ (फ्लुऑन) या लिक्विडचे कोटिंग स्टीलवर केले, तर तो स्टेनलेस स्टीलला पर्याय होऊ शकतो. नानासाहेबांनी तातडीने ते लिक्विड मागविले. त्यासाठीचा खर्च होता 20 हजार रुपये. ही तयारी झाली असतानाच सरकारने जाहीर केले, ‘स्टेनलेस स्टीलच्या आयातीवर बंदी घालण्याचा कोणताही विचार नाही.’ या फ्लुऑनचे काय करायचे? नानासाहेबांचे एक डॉक्टर मित्र नुकतेच इंग्लंडहून परत आले होते. ‘तिकडे फ्लुऑनचे कोटिंग असलेली भांडी वापरली जातात. विशेष म्हणजे अशी भांडी नॉनस्टिक असतात’, अशी माहिती त्यांनी दिली. हीच माहिती पक्की करून त्यांनी भारतात हा प्रयोग करण्याचे ठरविले. यासाठी परदेशातून शास्त्रीय माहिती मिळविण्याचा प्रयत्नही त्यांनी केला, मात्र अशा माहितीस परदेशातून नकार मिळाल्यांतर त्यांनी स्वतःच प्रयोग केले आणि पहिल्या प्रयोगानंतर त्यांनी अशी भांडी आपल्या परिवारातच वापरून पाहिली. गुणवत्तेची खात्री पटल्यानंतर अशा ‘नॉनस्टिक’ भांड्यांचे उत्पादन करण्याचा निर्णय झाला. ‘फ्लुऑन कोटिंग’च्या प्रयोगांतून ‘नॉनस्टिक कुकवेअर’ विकसित करण्यात त्यांना यश आले आणि ‘पहिला नॉनस्टिक पॅन’ आणि ‘निर्लेप’ ब्रँड या दोन्हींचाही जन्म झाला ! या ‘ब्रँड’चे नाव ठेवले ‘निर्लेप’. निर्लेप म्हणजे कोणतीही लिप्तता नसलेले. हे संस्कृत नाव ! असे नाव ठेवण्याचे धाडसही त्यांनी केले.

‘नॉनस्टिक’चा भारतातील हा पहिलाच प्रयोग होता. सुरवातीला हे कोटिंग पारदर्शक होते. काही काळानंतर भारतीय स्वयंपाकघरांतील वातावरणाचा विचार करून त्याचा रंग काळा करण्यात आला. 1968 ते 1975 या काळात या पॅन्सची निर्यात युरोपातील अनेक देशांत झाली. युरोपात नॉनस्टिक कुकवेअरची तयार बाजारपेठ उपलब्ध होती पण भारतात मात्र या प्रकाराची फारशी जाणीवही कोणालाच नव्हती. त्यामुळे ‘निर्लेप’च्या बाबतीत एक आगळा विक्रम नोंदविला गेला. तयार झालेल्या उत्पादनाला आधी आपल्या परिसरातील बाजारपेठेत स्थान मिळवून देऊन त्यानंतरच्या टप्प्यात निर्यातीसाठी धडपड करण्याऐवजी थेट निर्यातीलाच सुरवात झाली. भारतीय बाजारपेठेत आणि ग्राहकांतही या विषयीची जाणीवजागृती नसल्याने तेव्हा फक्त दिल्ली, मुंबई, मद्रास, कलकत्ता, बेंगलोर यांसारख्या महानगरांपर्यंतच नॉनस्टिक पॅन्स पोचू शकले. 

1972 मध्ये भारतीय बाजारपेठ काबीज करण्याच्या दृष्टीने प्रयत्नांना सुरवात झाली. इथे काही प्रमुख अडथळे होते. उत्पादनाबद्दल भारतात जागरुकता नव्हती. त्यामुळे मागणी नव्हती. मोठ्या प्रमाणावर आपल्या ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठीचे प्रभावी माध्यमही हाताशी नव्हते. कंपनीचा टर्नओव्हर लक्षात घेता जाहिरातींच्या बजेटवर मर्यादा होत्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, 1968 मध्ये या पॅन्सचे उत्पादन सुरू झाले, तेव्हा साधा तवा बाजारात आठ रुपयांत मिळत होता, तर ‘निर्लेप’ची किंमत 30 रुपये होती. हा फरक तब्बल 22 रुपयांचा होता. या अडचणीच्या स्थितीत नानासाहेबांचे बंधू यशवंत भोगले यांनी या मोहिमेचे नेतृत्व स्वीकारले. देशभरात फिरून सुमारे चार हजार ‘लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन्स’मधून त्यांनी ‘नॉनस्टिक कुकवेअर’ ही संकल्पना प्रसृत केली. तव्यावरून अलगदपणे निघणारा डोसा पाहून सारे जण अचंबित होत. यातून ही बाजारपेठ रुजण्यास आरंभ झाला. यासाठी 1972 मध्ये ‘सिल्व्हरलाईट निर्लेपवेअर इंडस्ट्रिज प्रा. लि.’ ही स्वतंत्र कंपनी सुरू झाली. या दरम्यानच भारतात दूरचित्रवाणीचे आगमन झाले होते. 1976 मध्ये ‘निर्लेप’ची पहिली जाहिरात ‘दूरदर्शन’वर झळकली आणि तिसर्‍या जाहिरातीनंतर फरक दिसू लागला. त्यानंतर मागणीचा वेग इतका प्रचंड वाढला, की उत्पादन वाढविण्यासाठीच्या हालचालींना वेगाने सुरवात झाली. 

साधारण 1970 च्या दशकातच भोगले परिवाराने केलेल्या अथक प्रयत्नांना यश मिळाले. उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळत असतानाच अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. उपराष्ट्रपती बी. डी. जत्ती यांच्या हस्ते नवी दिल्लीत नानासाहेबांना ‘स्वयंसिद्ध उद्योगपती’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुण्याच्या मराठा चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे नवउद्योजकांना दिला जाणारा ‘पारखे पुरस्कार’ही त्यांना प्रदान करण्यात आला. याच काळात ‘आयएसआय’ आणि ‘आयसीआय’ ही मानांकनचिन्हे वापरण्याची परवानगी मिळाल्याने त्यांच्या उत्पादनांची विश्वासार्हताही वाढली.

‘उमासन्स’ने 1970 च्याच दशकात डेअरी उद्योगासाठी लागणार्‍या उपकरणांचीही निर्मिती सुरू केली. या कामात श्रीकांत भोगले यांनी स्वतःला झोकून दिले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली हा व्यवसाय चांगल्या प्रकारे उभा राहिला. 1979 मध्ये राज्य सरकारने जालना येथील औद्योगिक वसाहतीची स्थापना केली आणि ‘निर्लेप’ने 1980 मध्ये या ‘एमआयडीसी’त जागा घेऊन ‘निर्लेप’चा दुसरा प्लांट तेथे सुरू केला. ‘नॉनस्टिक कुकवेअर’ला मिळणार्‍या मोठ्या प्रतिसादाचेच हे द्योतक होते. असाच प्रतिसाद आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढत होता. 1980 मध्ये निर्लेप तंत्रज्ञानावर आधारित ‘ड्युरावेअर’ (केनिया)ची सुरवात नैरोबी येथे करण्यात आली.

मेडिकल इक्विपमेंटस्‌ आणि नॉनस्टिक कुकवेअर यांच्या पाठोपाठ एका नव्या प्रवाहात या ग्रुपने 1987 मध्ये प्रवेश केला. हे होते ‘ऑटोमॅटिक कोटिंग लाईन’चे काम. कोटिंगमध्ये ऑटोमॅटिक मशीनचा प्रयोगही याच ग्रुपने देशात सर्वप्रथम केला. कुकवेअरमध्येही ऑटोमॅटिक मशिन्सचा प्रयोग पहिल्यांदाच करीत ‘निर्लेप’ने 1987 मध्येच दुबईतील ‘जाबेल अली फ्री ट्रेड सेंटर’मध्ये ‘व्हीनस इंडस्ट्रीज लि.’ या नावाने ‘टर्न की प्रोजेक्ट’ उभारून दिला. 

हा सारा प्रवास वेगवान होता. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी लढत या उद्योगसमूहाने चांगले यश मिळविले. नानासाहेब आणि त्यांचे सर्व बंधू या भरारीत आघाडीवर होते. या दरम्यान सुमारे तीस वर्षे उलटली. याच दरम्यान 1982 मध्ये नानासाहेबांचे निधन झाले. भोगले कुटुंबावर झालेला हा मोठा आघात होता. हा आघात पचवून नव्या जोमाने उभे राहणे हे मोठे आव्हान होते. पुढे 1990-91 दरम्यान नव्या मुक्त अर्थव्यवस्थेचे पडघम वाजू लागले. या नव्या स्पर्धेत ‘फिटेस्ट विल सर्व्हाईव्ह’ अशी स्थिती राहणार होती. हाच काळ या ग्रुपसाठी कसोटीचा ठरणार होता. समूहासाठी हा टर्निंग पॉइंट ठरणार होता. या कसोटीच्या काळात भोगले कुटुंबातील पुढच्या पिढीने, राम, मुकुंद आणि नित्यानंद या बंधूंनी उद्योगाची सूत्रे आपल्या हाती घेतली. व्यावसायिक दृष्टिकोन रक्तातच भिनलेला होता, त्यामुळे व्यवसायाचा जुना आलेख ‘स्टेडी’ ठेवणे त्यांच्यासाठी सोपे होते पण जागतिकीकरणाचे आव्हान खूप मोठे होते. हे आव्हान स्वीकारण्याचे त्यांनी ठरवले आणि तिघेही झडझडून कामाला लागले.

त्यांच्यासमोर दोन-तीन पर्याय होते. पहिला होता आंतरराष्ट्रीय पातळीवरील सहकार्य कराराचा. दुसरा-मोठ्या डायव्हर्सिफिकेशनचा. या दोन्हींवरही त्यांचे वर्किंग सुरू झाले. आंतरराष्ट्रीय पातळीवर नॉनस्टिक क्षेत्रात दबदबा असलेल्या ‘टेफाल’ या फ्रेंच मल्टिनॅशनल कंपनीचा जॉइंट व्हेंचरचा प्रस्ताव योगायोगाने याच काळात-1993 मध्ये त्यांच्यासमोर आला. ‘निर्लेप’च्या दृष्टीने हे पाऊल खूप महत्त्वाचे आणि प्रतिष्ठेचे ठरणार होते. पण या करारातील मसुदा उलगडू लागला, तशा त्यातील अनेक बाबी खटकणार्‍या आहेत, असे त्यांच्या लक्षात येऊ लागले. काही मुद्दे ‘निर्लेप’च्या दृष्टीने तर काही देशाच्या प्रतिमेच्या दृष्टीने अप्रतिष्ठेचे ठरू शकले असते. ‘जॉइंट व्हेंचर’च्या दृष्टीने असलेली ही ‘सुवणसंधी’ नाकारण्याचा कठोर निर्णय त्यांनी घेतला. या पार्श्वभूमीवर ‘निर्लेप नॉनस्टिक कुकवेअर’च्या उत्पादनांचा आणि त्यांच्या पॅकिंगचा चेहरामोहराही त्यांनी याच काळात पूर्णतः बदलून टाकला. कालांतराने यामध्येच कुकर, गॅस स्टोव्ह, गॅस लायटर, हार्ड ऍनोडाईज्ड कुकवेअर असे अनेक प्रयोग त्यांनी केले.

याच काळात विस्तारीकरणाचा प्रकल्पही हाती घेण्यात आला होता. ‘बॅकवर्ड इंटिग्रेशन’च्या रूपाने ‘ऍम्युलेट इंडस्ट्रीज’ या नावाने ऍल्युमिनियम रोलिंग मिलला त्यांनी सुरवात केली होती. काळाप्रमाणे बदलताना ऑटोमोबाईल इंडस्ट्रीतील संधी त्यांना ठळकपणे जाणवू लागल्या. उमासन्स स्टील फॅबच्या माध्यमातून काही प्रमाणात हे काम सुरू झालेच होते पण ‘मराठवाडा ऑटो कॉम्पो’ आणि ‘उमासन्स ऑटो काम्पो’ (अधिक माहितीसाठी याच पुस्तकातील ‘दो और दो पॉंच’ हा लेख पाहावा) या दोन कंपन्यांच्या माध्यमातून या क्षेत्रात त्यांनी मोठी आघाडी घेतली. ऑटोकाम्पोनंटस्‌ ही वेगळी स्ट्रीम अशा प्रकारे डेव्हलप झाली. कोटिंग आणि पेंटिंग ही क्षेत्रेही त्यांनी अशाच प्रकारे विकसित केली. ऑटो कॉम्पोनंट्‌स्‌ आणि कोटिंग या दोन्ही क्षेत्रांत मराठवाड्याच्या बाहेरून त्यांनी कामे मिळविली आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही ते पोचले. 

‘निर्लेप ग्रुप’ म्हणून ओळखता येईल अशा सात कंपन्या आज कार्यरत आहेत. ‘ड्युरावेअर प्रा. लि.’ आणि ‘सिल्व्हरलाईट प्रा. लि.’ या दोन नावांनी सुरू असलेले काम आता ‘निर्लेप अप्लायन्सेस लि.’ या नावाने सुरू आहे. याशिवाय ‘उमासन्स स्टील फॅब प्रा. लि.’, ‘मराठवाडा ऑटो कॉम्पो’, ‘उमासन्स ऑटो काम्पो’, ‘भोगले कोटिंग्ज अँड पेन्टस्‌’, ‘ऍम्युलेट इंडस्ट्रीज’ आणि ‘ऍम्युलेट कोटिंग’ या इतर कंपन्या ग्रुपमध्ये कार्यरत आहेत. किचन अप्लायन्सेस, ऑटो काम्पोनन्टस्‌, ऍल्युमिनियम रोलिंग, स्पेशालिटी पेंन्टस्‌ आणि कोटिंग्ज, केमिकल प्रोसेस इक्विपमेंटस्‌ आणि फार्मास्युटिकल मशीन्स या विविध क्षेत्रांसाठी ते काम करतात. ‘निर्लेप’च्या विशाल छताखाली होत असलेल्या या विस्तारात साधारण सन 2000 पासून श्रीकांत भोगले यांच्या कन्या स्वाती आणि त्यांचे पती रवि पाध्ये हेही सहभागी झाले. ‘उमासन्स स्टील फॅब’साठीची नवी क्षितिजे विस्तारण्यात त्यांची भूमिका महत्वाची ठरली.

एका मराठी कुटुंबाच्या धाडसाचा आणि जिद्दीचा सुमारे 45 वर्षांच्या औद्योगिक प्रवासात विस्तारलेला हा आलेख. त्यांनी विकसित केलेली सर्व उत्पादने भारतात प्रथमच तयार झाली ! ती सर्व ‘इम्पोर्ट सब्स्टिट्यूट’ होती. जो काळ ‘इंपोर्टेड’ वस्तू आणि तंत्रज्ञानाच्या चलतीचा होता त्या काळात भोगले कुटुंबीयांनी निर्यातीचा विक्रम नोंदविला ! गुणवत्तेच्या बळावर आपण परकीय बाजारपेठेत उभे राहू शकतो, टिकू शकतो हा विश्वास या उदाहरणाने सर्व भारतीयांनाच त्यांनी दिला. स्वाभिमानी भारतीय उद्योजकतेची ही पायाभरणी होती. ‘निर्लेप’ नावाने चालणार्‍या सर्व ऍक्टिव्हिटीज ‘इनहाऊस’ चालतात. मराठवाड्याचा औद्योगिक विकास आणि ‘निर्लेप’ची वाटचाल साधारणपणे एकाच ट्रॅकवर, एकाच गतीने होत आली आहे. उत्पादनांबरोबरच विचारांतीलही इनोव्हेशन आणि काळाप्रमाणे कात टाकण्याची भूमिका हे या ग्रुपचे वेगळेपण... 

या वाटचालीत ‘निर्लेप’ने स्वतःचे एक तत्वज्ञानही विकसित झाले. ‘कायद्याच्या, नियमांच्या चौकटीत राहूनच उद्योग व्यवसाय केला, तर तो दीर्घकाळपर्यंत सक्षमपणे चालू शकतो’, ‘प्रत्येकाशी सन्मानपूर्ण व्यवहार असेल तर ती व्यक्ती कंपनीच्या भरभराटीसाठी मनःपूर्वक प्रयत्न करते,’ आणि ‘निष्ठा आणि विश्वासार्हता यांच्याशी तडजोड न करता यश मिळविण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो,’ यावर त्यांचा विश्वास आहे आणि ही तत्त्वं ते अंमलात आणतात. या सर्वांहून महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ग्राहक हाच व्यवसायाचा केंंद्रबिंदू समजून व्यवसायाची आखणी करणं.

कामगार-कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती सर्व काळजी घेत असतानाच चांगली कार्यसंस्कृती जोपासण्याचे काम येथे होते. नव्या कल्पना, नवी माहिती, नवे प्रयोग यासाठी वरिष्ठांनी आपले दरवाजे सदैव खुले ठेवले आहेत. यातूनच त्यांच्या विस्ताराचे क्षितिज अधिक व्यापक होत गेले. क्षितिज विस्तारणार्‍या या प्रयत्नांनाही एक संपन्न परंपरा आहे. मराठवाड्याचं औद्योगिक हित जपण्यासाठी नानासाहेब सतत अग्रेसर होते. रेल्वेस्टेशन परिसरात उभ्या असलेल्या मराठवाड्यातील पहिल्याच औद्योगिक वसाहतीच्या निर्मितीचे श्रेय त्यांच्याकडे जाते. त्याच बरोबर उद्योजकांसाठी स्थापन केलेल्या आजच्या ‘चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चर’ (सीएमआयए)चेही ते एक संस्थापक व प्रमुख आधारस्तंभ होते.


- दत्ता जोशी