Wednesday, April 3, 2013

उदयगिरी... माझे ‘गुरुकुल’ !


मी उदगीरच्या उदयगिरी महाविद्यालयातून पदवी मिळविली. या महाविद्यालयाने मला खूप काही दिले. या महाविद्यालयाने सध्या एक स्मरणिका प्रकाशित करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी माझ्याकडे एक लेख मागितला गेला. मी तो आनंदाने लिहिला. या निमित्ताने जुन्या आठवणीना उजाळा देता आला. हा लेख आपणासमोर मांडत आहे...

---------------------------------------------------------------------------------------------
‘कर्माचे डोळे ज्ञान, ते निर्दोष होआवे’... महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या मोठ्या कमानीवरील ‘उदयगिरी’चा मोनोग्राम आणि त्यात असलेले हे ब्रिदवाक्य मी पहिल्यांदा वाचले साधारण 1984-85 मध्ये. शहरातील लाल बहादूर शास्त्री विद्यालयात मी तेव्हा बहुदा आठव्या-नवव्या वर्गात शिकत असेन. ‘उदयगिरी’त तेव्हा ‘कॉम्प्यूटर विभाग’ सुरू झाला होता. उदगीरमधील हा बहुधा पहिलाच विभाग. हा कॉम्प्यूटर पाहण्यासाठी इथे आलो. सायकली गेटमधून आत वळविल्या, स्टँडवर लावल्या आणि कॉम्प्यूटर पाहण्याच्या बहाण्याने सगळेच जण उगाच कॉलेजातून भटकून आलो. संध्याकाळची वेळ होती. त्यामुळे कुणी अडविलेही नाही. तेव्हा कॉलेजचे कॅरिडॉर पूर्ण मोकळे होते. एखाद्या धिप्पाड माणसाने बाहू पसरून ‘या’ म्हणत कवेत घेण्यासाठी हाक द्यावी, असा या कॉलेजचा दर्शनी भाग... कॉलेज कॅरिडॉरच्या चारही कोपर्‍यांत असलेले पूर्ण उंचीचे चार आरसे आमच्यासाठी आश्‍चर्याची गोष्ट ठरले होते. ‘इथे कुणीतरी डोळे सर असतात. ते खूप कडक आहेत,’ अशी ऐकीव माहिती कानावर असे. आयुष्यात कधी या कॉलेजात यायचे आहे आणि इथली दोन वर्षे आयुष्यातील महत्वाची संचित ठरणार आहेत, हे त्या काळी ध्यानीमनीही नव्हते...! या कॉलेजमधील 1989-90 आणि 1990-91 ही दोन वर्षे माझ्या आयुष्याला वेगळा आकार देणारी ठरली... काळजावर कोरून राहिली. हे ऋण या जन्मी फिटणारे नाही.000

‘दहावीनंतर पुढे काय’, या प्रश्‍नाला माझ्यासमोर दोन उत्तरे होती. ‘उदयगिरी’तर ‘होम सायन्स’ किंवा ‘लाल बहादूर ज्युनिअर कॉलेज’मध्ये ‘इलेक्ट्रॉनिक्स’. तेव्हा ‘इलेक्ट्रॉनिक्स’चा निर्णय घेतला आणि ‘उदयगिरी’चे नाते लांबणीवर पडले. बारावीनंतर ‘शिवाजी’त ‘बी.एस्सी.’ला प्रवेश घेतला आणि त्याच वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामात सहभागी झालो. पुढे पत्रकार व्हायचे, हा निश्‍चय तोवर झाला होता. त्या दृष्टीने वाचन, मनन सुरू झाले होते. त्या कामाला वेळ मिळावा, म्हणून सायन्स सोडून ‘बी.ए.’ घेतले. त्याच काळात पुन्हा एकदा ‘उदयगिरी’चे नाव माझ्या समोर आले. मध्यंतरीच्या काळात तेथील संपन्न ग्रंथालय पाहिले होते. या ग्रंथालयात आतपर्यंत जाऊन पुस्तके हाताळण्याची परवानगी होती. माझ्यासारख्याला ही पर्वणीच वाटली. ‘उदयगिरी’मधील इतर अनेक उपक्रमही मला आकर्षित करू लागले. सर्वात महत्वाची होती डोळे सरांची मोहिनी. मी स्वतः हिंदुत्ववादी विचारांचा अनुयायी असलो, तरी डॉ. ना. य. डोळे सरांबद्दल मनोमन आदर होता. ‘समाजवादी विचारवंत’ ही त्यांची ओळख. पण ‘विचारवंता’च्या परीघाबाहेर पडून त्यांनी अंमलात आणलेला ‘कृतीशील समाजवाद’ आकर्षणाचे केंद्र होता. त्यांच्या व्यक्तिमत्वाची त्या वेळी असलेली ही ढोबळ ओळख पुढे त्यांच्या ‘प्राचार्य’ या आत्मकथनातून घनिष्टतेत बदलली. (पुढे, माझ्या लग्नात सरांनी मला याच पुस्तकाची प्रत भेट म्हणून दिली. ती मी आजही जपून ठेवली आहे.) डोळे सरांबरोबरच इतरही काही नावे माझ्या डोळ्यासमोर होती. माझ्या आवडीच्या असलेल्या ‘मराठी’ विषयात प्रभुणे सर, साधू सरांचे नाव ऐकून होतो. ‘पॉलिटिक्स’साठी प्रा. पी. के. कुलकर्णी आणि प्रा. शेख, सोशियॉलॉजीसाठी प्रा. माकणीकर यांची नावे कामावर येत. ‘बी.ए.एफ.वाय.’ कसेबसे ‘शिवाजी’तून पूर्ण केले आणि 1989 मध्ये ‘सेकंड इअर’साठी ‘उदयगिरी’त प्रवेश घेतला. इथून माझ्यातील परिवर्तनाला प्रारंभ झाला.000

‘पत्रकार व्हायचे’ हा माझा ध्यास होता. त्या साठी मिळेल त्या मार्गाने ज्ञानकण मिळविण्याचा माझा प्रयत्न असे. उत्तम पत्रकारितेसाठी दोन गोष्टी सर्वात महत्वाच्या... वाचन आणि लेखन. वाचनाचा प्रारंभ तसा पाचव्या वर्गात असतानाच झाला होता. पण त्याला निश्‍चित अशी दिशा नव्हती. डोळे सर, प्रभुणे सरांच्या संपर्कात आल्यावर ही दिशा मिळण्यास प्रारंभ झाला. त्यांची पहिली भेट हा सुद्धा संस्मरणीय प्रकार होता. ‘हेच ते प्रभुणे सर, ते मराठी शिकवतात आणि भित्तीपत्रक काढण्यातही त्यांचा पुढाकार असतो,’ असे मला कुणीतरी सांगितले. हे भित्तीपत्रक आपण काढले पाहिजे, हे माझ्या मनाने घेतले आणि एके दिवशी त्यांना पार्किंग स्टँडवरच गाठले. त्यांची जुन्या जमान्यातील लांब ‘लँब्रेटा’ लावून, हातात छोटीशी ब्रिफकेस घेऊन ते स्टाफरुमकडे निघाले, तेवढ्यात मी त्यांना गाठले. ते थोडेसे थबकतील, असे मला वाटले. पण चालता चालताच त्यांनी मला सांगितले, ‘चला, आपण स्टाफरुममध्ये जाता जाता बोलू. माझ्याकडे वेळ नाही.’ मी त्यांच्या मागोमाग निघालो. संवाद साधण्याचा हा असा प्रकार मी प्रथमच अनुभवत होतो! जाता जाताच ‘यंदा मला भित्तिपत्रक चालवू द्याल का?’ अशी विचारणा केली. त्यांनी नकार दिला. ‘मुले आधी उत्सुकता दाखवतात, पुढाकार घेतात आणि नंतर विसरून जातात,’ असा त्यांचा आक्षेप. तरीही मी चिकाटी सोडली नाही. ‘आधी काहीतरी लिहून आणून दाखवा’, या त्यांच्या ‘चाचणी’वर मी कुठला तरी विषय पानभर लिहून त्यांना दाखविला. त्यांनी त्यात ढिगाने चुका काढल्या. पण समाधानाची गोष्ट ही, की ‘तुम्ही सिरियसली करणार असाल, तर भित्तिपत्रक सुरू करू’, असे त्यांनी सांगितले. त्या आधीच्या वर्षी कुणीच पुढाकार घेतला नसल्याने भित्तिपत्रक बंद पडलेले होते. ती जबाबदारी 1989 मध्ये मी स्विकारली आणि ‘अक्षरे’ पुन्हा एकदा नोटीस बोर्डवर झळकले. पहिला अंक संत ज्ञानेश्वरांवर काढल्याचे मला आठवते.000‘अक्षरे’ काढणे हा एक सोहळा असायचा. आधी सरांशी बोलून विषय ठरवावा लागे. ‘हाच विषय का’, याचे समाधान करावे लागे. त्यांनी संमती दिल्यानंतर लायब्ररीत बसून संदर्भ काढायचे. मुद्दे लिहून काढायचे. मुख्य विषयाबरोबरच आणखी काही छोटे छोटे विषय मी त्यात हाताळत असे. हे सारे फुलस्केप कागदावर, कागदाच्या एकाच बाजूने लिहून काढायचे. सकाळी लवकर सरांच्या घरी जायचे. सर ते बारकाईने वाचून पाहात. माझी वाक्यरचना ठीक असे, पण शुद्धलेखनातील चुका हमखास असत. मग ते रागवायचे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार ते सारे दुरुस्त करून घ्यायचे. मग प्रत्यक्ष भित्तीपत्रकाची तयारी सुरू होत असे. बाजारातून ‘ए 1’ आकाराचे कार्डशीट खरेदी करायचे. सोबत स्केचपेन असायचे. त्या कागदावर पट्टीच्या साह्याने पेन्सिलीने रेघा मारून घ्यायच्या. सुवाच्य अक्षरांत (माझे अक्षर तेव्हा सुवाच्य होते!) तो लेख त्या शीटवर लिहून काढायचा. हे लिहितानाच जागेचा अंदाज घेत चित्रांसाठी जागा सोडायची आणि संबंधित विषयाची चित्रे मिळवून तेथे चिकटवायची. हा अंक तयार झाल्यावर पुन्हा एकदा तो अंक, पेन्सिल, खोडरबर, स्केचपेन आणि ब्लेड घेऊन आमची स्वारी सरांच्या घरी दाखल व्हायची. मग सर पुन्हा एकदा तो लेख तपासत. त्यात र्‍हस्व-दीर्घाच्या चुका शोधत. ती अक्षरे ब्लेडने मिटवून तेथे नव्याने ते शब्द लिहिले जात. संपूर्ण अंक अशा प्रकारे ‘शुद्ध’ झाल्यानंतर पेन्सिलने मारलेल्या रेघा खोडरबराने खोडून टाकल्या जात. त्यानंतर हा अंक डोळे सरांच्या सहीसाठी मी घेऊन जात असे. सर तो बारकाईने पाहात. कोपर्‍यात त्यांची सही करीत. बेल वाजवून शिपायाला बोलावत आणि ‘नोटीस बोर्ड’वर तो अंक लावण्यास सांगत... मी त्याच्या पाठोपाठ बोर्डाकडे येई. तो अंक लागल्यावर डोळे भरून पाहून घेई. मला आत्मिक समाधान वाटत असे.000

हे अंक काढणे, हा माझ्या पत्रकारितेचा पाया ठरला. विषय निवडणे, निवडलेल्या विषयाचे समर्थन करण्यासाठीचा आधार शोधणे, विषयाची मांडणी, विस्तार, निष्कर्ष, त्याचे शास्त्रशुद्ध लेखन, व्याकरण, जागेप्रमाणे शब्दांची मर्यादा पाळणे या सार्‍या गोष्टी ‘भित्तीपत्रका’च्या पाठशाळेने माझ्याकडून अक्षरशः घोटून घेतल्या. यात जशी माझी चिकाटी होती, तशीच प्रभुणे सरांचीही. चुका शोधणे, त्या दुरुस्त करून घेणे, हे भित्तिपत्रक नियमितपणे लागणे या पैकी कोणत्याही गोष्टीमुळे त्यांच्या पगारात एका रुपयाचीही वाढ होणार नव्हती, की प्रमोशनसाठी त्याचा फायदा होणार नव्हता. तरीही त्यांनी हे केले. माझी वृत्ती हे त्याचे एक कारण असले, तरी त्यांच्यातील ‘प्रयोगशील व्यक्ती’ हे त्यामागचे महत्वाचे कारण असावे, असे मला वाटते. त्यांनी माझ्यावर सातत्याने नवनवे प्रयोग केले. मी जसे ज्ञानदेव, तुकारामांवर अंक काढले तसाच अंक हिटलरवर काढला. योगायोगाने ते हिटलरचे जन्मशताब्दी वर्ष असल्याची माहिती मी कुठेतरी वाचली. सरांच्या मागे लागून या विषयाला मी मान्यता मिळविली. ‘डोळे सरांची परवानगी घेण्याची जबाबदारी तुमची’, या अटीवर प्रभुणे सरांनी मला परवानगी दिली. मी त्या विषयावर लेखन केले. ‘हिटलर वाईट’ एवढी एकच बाजू जगाला माहिती आहे. पण तो किती चांगला होता आणि शेवटच्या टप्प्यातील युद्धात झालेल्या पराभवऐवजी तो विजयी ठरला असता तर आज जगाने त्याचेच गोडवे गायिले असते. मी हा अंक तयार केला. प्रभुणे सरांनी ‘ओके’ केला आणि सहीसाठी मी तो डोळे सरांकडे नेला. मला सरांची प्रतिक्रिया आजमावयाची होती. सरांच्या समाजवादी विचार परंपरेत हिटलर हा खलनायक होता. या पार्श्वभूमीवर मी सरांसमोर तो अंक ठेवला. त्यांनी शांतपणे तो पाहिला. विचारले, ‘प्रभुणेेंनी पाहिलाय का?’ मी होकारलो. त्यांनी तेवढ्याच शांतपणे माझ्याकडे पाहिले. ते म्हणाले, ‘इथून पुढे असे काही विषय लिहायचे असतील तर आधी माझ्याशी बोलत चला.’ तितक्याच शांतपणे त्यांनी त्यावर सही केली आणि शिपायाला बोलावण्यासाठी ‘बेल’ वाजविली. वैचारिक मतभेद कितीही असोत, संपूर्ण सत्ता तुमच्याच हातात असो, तरीही दुसरी बाजू मांडणार्‍या विचाराला जागा मिळवून द्यायचीच असते, हा संस्कार सरांनी त्या एका कृतीतून मला दिला. तो मला माझ्या 15 वर्षांच्या सक्रीय पत्रकारितेत तटस्थपणे पाहताना, लिहिताना अतिशय मोलाचा ठरला.000

अशीच आणखी एक वेगळी आठवण डॉ. नेल्सन मंडेला यांच्या बाबतची. दक्षिण अफ्रिकेतील स्वातंत्र्याचे व लोकशाहीचे शिल्पकार असलेल्या नेल्सन मंडेला यांच्या कार्याबद्दल माझ्या मनात प्रारंभीपासूनच आदर आहे. सुमारे 22 वर्षांच्या तुरुंगवासानंतर 11 फेब्रुवारी 1990 रोजी त्यांची सुटका करण्यात आली. ही बातमी मी त्या रात्री दूरदर्शनवरील 8 च्या बातमीपत्रात पाहिली. (त्या काळी फक्त दूरदर्शन ही एकच वाहिनी होती. रात्रीचे हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र त्यावर येत असे. इंटरनेट वगैरे तर विषयच नव्हता!) त्यानंतर रात्री उशीरापर्यंतच्या बातम्या, दूरदर्शनने ऐनवेळी तयार करून दाखविलेला विशेष माहितीपट मी पाहिला. विषय समजून घेण्याचा प्रयत्न केला. रात्रीतूनच कच्चा आराखडा लिहून काढला. 12 फेब्रुवारीला सकाळी लवकर उठून पेपर आणले. त्या आधारे मुद्दे काढले. दुकानातून कार्डशीट विकत आणले. सकाळी 11 वाजेपर्यंत माझा ‘अक्षरे’चा ‘नेल्सन मंडेला विशेषांक’ तयार होता! त्यावर सही घेण्यासाठी डोळे सरांकडे गेलो. सरांनी तो अंक पाहिला. वाचून काढला. त्यांच्या डोळ्यांत माझ्याबद्दल कौतुक होते. त्या दिवशी त्यांनी त्यांच्या ऑफिसात मला चहा पाजला...!
000

डोळे सरांनी माझ्यावर असंख्य संस्कार केले. हिंदुत्ववादी विचाराची (किंबहुना कोणत्याही विचाराचे टोक गाठलेली) मंडळी बहुतेक वेळा झापडबंद पद्धतीने विचार करतात. मी हिंदुत्ववादी होतो आणि आहे. तरीही, माझ्या डोळ्यावर झापड नाही. मी डोळसपणे सर्वत्र पाहतो. सर्व विचारांतून चांगले ते स्वीकारण्याचा प्रयत्न करतो आणि माझ्या विचारधारेतील मान्यवरांनी सांगितलेले चुकीचे ते टाळतो, शक्तीपरत्वे विरोधही करतो. सरांनी मला ‘अमृता प्रीतम’चे रसिदी तिकीट’ आवर्जुन वाचायला दिले होते. एक शिख विचारवंत महिला एका मुस्लिम व्यक्तीसोबत आयुष्यभर कशी राहिली, याचा तो वैचारिक आलेख होता. मला ती कथा भावली. विविध विचारप्रवाहांचा परिचय करून देणारी पुस्तके ते मला त्यांच्या खाजगी संग्रहातून वाचायला देत. त्यांच्या घरी हॉलमध्ये असलेले ना. ग. गोरे, एसेम जोशी, जॉर्ज फर्नांडिस यांच्यासह काढलेले त्यांचे फोटो मी नेहेमी न्याहाळत असे. घरासमोरच्या ओसरीतील त्यांच्या झोपाळ्यावर बसायला मला नेहेमीच आवडत असे. ‘कमल, दत्ता आलाय, काहीतरी दे,’ असे ते आत वळून सांगत आणि कमलताई एखाद्या प्लेटमध्ये काहीतरी खायला आणून देत. पाणी-चहा होत असे. दोन-तीन तास गप्पा रंगत. ‘कार्यकर्त्या’ विद्यार्थ्यांबद्दल त्यांना आपुलकी असे. माझा देवणीचा बालमित्र अंकुश गायकवाड, उदगीरचा दिलीप वाघमारे हे छात्रभारतीचे काम करीत. त्यांचे सरांकडे नेहेमीच येणे-जाणे असे. हे समजण्यासारखे होते. पण मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता असूनही आठवड्यातून किमान एकदा तरी त्यांच्या भेटीसाठी घरी जायचो. उदय कॉलनीतील त्या असंख्य संध्याकाळ माझ्या आयुष्यात नवनव्या विचारप्रक्रियांचे दिवे चेतविणार्‍या ठरल्या.000

मी दोन वर्षे कॉलेजात होतो. पण वर्गात नव्हतो! विद्यार्थी परिषदेच्या वेगवेगळ्या उपक्रमांसाठी मी सतत भटकत असे. कधी शहरात, कधी शहराबाहेर. 1989 मध्ये काश्मीर प्रश्‍न पेटला होता. काश्मीर खोर्‍यातून हिंदूंना हाकलून लावण्याचे षड्यंत्र ‘ऑपरेशन टोपाझ’ नावाने जनरल झियांनी रचलेले होते. तेथील अनन्वित छळाच्या बातम्या वृत्तपत्रांतून येत असत. त्याच काळात डोळे सर, जगन फडणिस, पन्नालाल सुराणा आदी समाजवादी विचारवंतांच्या एका गटाने काश्मीरमध्ये प्रवास करून ‘हे सारे खोटे आहे. तेथील हिंदूंना कसल्याही प्रकारचा त्रास नाही. हिंदू विस्थापित होत नाहीत. सारे काही आलबेल आहे,’ असा एक अहवाल दिला होता. हा अहवाल वस्तुस्थितीच्या विपरित होता. पुढे नोव्हेंबर 1989 मध्ये विद्यार्थी परिषदेने ‘चलो काश्मीर’ची हाक दिली आणि मी उदगिरातील काही कार्यकर्त्यांना घेऊन त्यात सहभागी झालो. तेथून परतल्यानंतर त्या आंदोलनाचे, काश्मिरी हिंदू विस्थापितांचे फोटो असलेला ‘अक्षरे’चा एक विशेषांक तयार केला आणि तो नोटीस बोर्डवर लावण्यासाठी डोळे सरांकडे नेला. या वेळीही त्यांनी परवानगी दिली. त्यांच्याच अहवालाच्या विरोधातील पुरावे या फोटोतून दिसत होते. भविष्यात काश्मिरचे विदारक चित्र सार्‍या जगानेच पाहिले. पुढे, साधारण तीन-चार वर्षांनी, मी पत्रकारितेस प्रारंभ केल्यानंतर माझ्याशी गप्पा मारताना त्यांनी आपल्या अहवालाची चूक मान्य केली होती. पारदर्शी विचारप्रक्रियेचा हा परिपाक होता.000

ही सारी कामे करताना कॉलेजातील ‘इतर’ उपक्रमांतही मी सहभागी झालो. प्रभुणे सरांच्या आग्रहावरून 1989-90 या वर्षीच्या स्नेहसंमेलनात मी एका नाटकात ‘हीरो’ची भूमिका सुद्धा केली. ‘चोरआलेच पाहिजेत’ अशी ती एकांकिका होती. प्रीती पाटील ही या नाटकातील माझी पत्नी. सामाजिक मान्यता मिळविण्यासाठी आपल्या घरी चोरी झाली पाहिजे, असा या एकांकिकेतील नायकाचा आग्रह असतो. त्यातून फुललेला फार्स यात रंगवलेला होता. त्या आधी कधी मी तोंडाला रंग फासलेला नव्हता की नाटकात भूमिका केलेली नव्हती. त्यातही, एका मुलीसोबत काम करणे हा तर माझ्यासाठी अतिशय कसोटीचा क्षण! (आजही ती जुनी आठवण निघाल्यानंतर प्रीती माझ्यावर हसते! ती आता औरंगाबादेत वोखार्ड या बड्या कंपनीत उच्चपदावर कार्यरत आहे.) पण प्रभुणे सरांनी हे काम माझ्याकडून करून घेतले! या नाटकाच्या, त्यातील तयारीच्या असंख्य आठवणी आहेत. हा स्वतंत्र लेखाचा विषय ठरावा. 1990-91 या वर्षात गॅदरिंगमध्ये मी जिद्दीने पेटलो होतो. एका सरांसोबत माझा कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनावरून वाद झाला होता आणि ‘मी माझी योग्यता सिद्ध करून दाखवीन’ असे आव्हान मी त्यांना दिले होते. ही ‘योग्यता सिद्ध करण्या’च्या नादात मी विविध स्पर्धांतून सहभागी झालो. वादविवाद आणि वक्तृत्व या स्पर्धांत मला बक्षिसे मिळणे साहजिक होते. ती माझी ‘मास्टरी’च होती. पण त्या वर्षी मी ‘प्रेमपत्र स्पर्धा - सर्वप्रथम’, ‘पाककला स्पर्धा- सर्वप्रथम’, ‘रांगोळी स्पर्धा - सर्वप्रथम’ ही बक्षिसेही जिंकली! पाककला एकवेळ ठीक, पण प्रेमपत्र स्पर्धेत मला बक्षिस कसे काय मिळाले, हेच मला कळत नव्हते. या स्पर्धेचे परीक्षक असलेल्या संगेवार सरांच्या घरी मी दुसर्‍याच दिवशी जाऊन थडकलो आणि माझ्या बक्षिसाविषयी चर्चा करू लागलो. ‘मला बक्षिस कशामुळे मिळाले?’, अशा विषयावर मी करीत असलेली चर्चा संगेवार सरांसाठीही गमतीचीच होती. कारण या स्पर्धेत अनेक ‘प्रेमवीरां’नी भाग घेतला होता. त्यातील अनेकांनी त्यांना बक्षिस न मिळाल्याबद्दल सरांना ‘जाब’ विचारलेला होता! काही जणांनी तर ‘पुरवण्या’ जोडून प्रेमपत्र लिहिलेले होते, तरीही त्यांच्या पदरी अपयश पडले होते! या पार्श्‍वभूमीवर जेमतेम 15 वाक्यांचे माझे प्रेमपत्र ‘प्रथम पुरस्कार’ देण्याजोगे सरांनी ठरविले. त्यांनी सांगितले, ‘‘तुमच्या प्रेमपत्रातील वेगळेपणा हा बक्षिसासाठी महत्वाचा ठरला. तुमची शैली वेगळी होती, शब्दरचना आणि वातावण वेगळे होते. त्यात कल्पकता होती.’’ आणि खरेच, मी एका वेगळ्याच धुंदीच ते लिहिले होते. ग्रामीण वातावरण डोळ्यासमोर आणून शेत, शिवार, बैल, पिके यांच्या पार्श्‍वभमीवर मी माझ्या कथित ‘प्रेयसी’ला साद घातलेली होती. या वेगळेपणाने मला तेव्हा ते यश दिले. पुढे सन 2004 मध्ये; आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गुरू शिव खेरा यांच्या ‘ब्लू प्रिंट फॉर सक्सेस’ या तीन दिवसीय कार्यशाळेत ‘विनर्स डोन्ट डू डिफ्ट्रंट थिंग्ज. दे डू द थिंग्ज डिफ्रंटली’, चा विचार समोर आला आणि मला संगेवार सरांनी सांगितलेले शब्द आठवले...!000

साधारण 15 वर्षांची ‘सकाळ’ आणि ‘तरुण भारत’मध्ये केलेली विधायक पत्रकारिता संपवून मी सन 2005 पासून मुक्त पत्रकारितेला प्रारंभ केला. जगात जे चांगले आहे, विधायक आणि अनुकरणीय आहे ते सातत्याने समाजासमोर ठेवले पाहिजे, सज्जनपणाचा पुरस्कार केला पाहिजे या अर्थाच्या स्वामी समर्थ रामदास यांच्या ‘सज्जना परीस आळवावे। महत्व देउनी॥ या उक्तीनुसार समाजाचा शोध घेत ‘आयकॉन्स’ नावाने विविध जिल्ह्यांतील आदर्शांचा शोध घेत पुस्तकांची निर्मिती करीत आहे. या प्रत्येक पावलावर मला ‘उदयगिरी’चे संस्कार आठवतात. 1991 ते 2013 या वाटचालीत आयुष्यात बरेच फेरबदल झाले, अनेक प्रसंगांतून तावून-सुलाखून निघालो, गौरवाचे प्रसंग आले तसेच मला आयुष्यात उठविण्याचेही प्रयत्न झाले. खूप काही शिकत गेलो. मी यशस्वी आहे, की नाही हे मला ठावूक नाही, पण मी जे करतो आहे, जे जगतो आहे, त्यात समाधानी निश्‍चितच आहे. या सर्व गोष्टींचा पाया ‘उदयगिरी’तील मंतरलेल्या त्या दोन वर्षांत घातला गेला. माझ्या तारुण्यातील अनेक बर्‍यावाईट प्रसंगांची साक्षीदार ठरलेली ही वास्तू माझ्या दृष्टीने जिवंत आहे. इथला प्रत्येक दगड काहीतरी वेगळी कहाणी सांगतो आहे. अशीच वेगळी कहाणी इथल्या प्रत्येक माणसात होती, आहे.000

कॉलेजच्या गेटमधून आत पाऊल टाकताच सायकल स्टँडवर भेटणारे पांढरेमामा, उजवीकडे कँटीनमध्ये असणारा अण्णा, ऑफिसात असलेला क्लेरिकल स्टाफ, कॉलेजचे सेवक, लॅब असिस्टंट हे सारे मी पाहिलेल्या कॉलेजचे अविभाज्य अंग. मला शिकविणारे किंवा न शिकविणारे सर्व प्राध्यापक हे माझे गुरूच. अनेकांची नावे मला आज आठवत नाहीत, ही माझ्यातील त्रुटी. पण या सर्वांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संस्कार केले. अनेक चांगल्या आठवणी घेत मी कॉलेजचा निरोप घेतला. उदगीर सोडून आता दोन दशके उलटली आहेत. पण आजही उदगीर म्हटले की आधी माझ्या डोळ्यासमोर माझे (आता विकलेले) घर येते आणि त्यानंतर येते ‘महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय’... तेथील ब्रिदवाक्यासह - ‘कर्माचे डोळे ज्ञान, ते निर्दोष होआवे’...!

- दत्ता जोशी