Tuesday, January 1, 2013

वजन कमी करण्याची माझी गोष्ट...

हा लेख माझ्या वैयक्तिक अनुभवावर आधारित आहे. हा सल्ला अथवा मार्गदर्शन नाही. ज्यांना अशा प्रकारचे प्रयोग करायचे आहेत त्यांनी तज्ञांचा सल्ला घ्यावा अथवा स्वतःच्या जबाबदारीवर प्रयोग करावेत. 

हा माझ्या पट्ट्याचा फोटो. हळूहळू एक एक छिद्र आत  येत आहे...!

------------------------------------------------------------------------------------------------------

साधारणपणे 2012 च्या मे महिन्याचा शेवट. पोटातील अनेक व्याधी घेऊन डॉक्टरांकडे गेलो होतो. सततचे प्रवास सुरू होतेच. सतरा ठिकाणचे खाणे आणि पाणी पोटात जात होते... ते पचविण्याची माझ्या पोटाची ताकद उरली नव्हती. ऍन्टीबायोटिक्स पचणेही अशक्य झाले होते. अशा वेळी होमिओपथीचे उपचार सुरू केले. डॉक्टरांकडे वजन मोजले. ते 82.5 किलो भरले! अनियमित-अवेळी खाणे, कुपथ्यकारक आहार यामुळे मागची अनेक वर्षे वजनकाटा चढत्या क्रमानेच वजन दाखवीत होता. वाढते वय आणि वाढते वजन या दोन्हींचे एकत्रित परिणाम म्हणून पाठदुखी, गुडघेदुखी वाढली होती, हा प्रकार वेगळाच!

डॉक्टरांनी औषधे दिली. खाल्लेले काहीही पचत नव्हते आणि सतत महिनाभर जुलाबांचा त्रास सुरू होता, त्यामुळे अशक्तपणा जाणवत होताच. आहार नियंत्रित करणे, खाण्याच्या वेळा आणि पथ्ये पाळणे, वजन कमी करणे ही त्रिसुत्री डॉक्टरांनी सांगितली होती. त्यातील पहिल्या दोन्हींची अंमलबजावणी तातडीने सुरू केली. साधारणपणे सलग दीड ते दोन महिने मी केवळ साधे वरण आणि भाकरी, गरजेप्रमाणे भात या आहारावर होतो. पचवायला जड जाईल असे काहीही न खाण्याकडे कटाक्ष होता. तब्येत बरी वाटल्यानंतर पुन्हा प्रवासाला बाहेर पडलो आणि साधारण 20 दिवस बाहेरच राहिलो. या काळात सुद्धा योगायोगाने ‘साधे वरण - भाकरी’ देणारे हॉटेल सापडले. त्या शहरात असताना तो आहार आणि प्रवासात बाहेर पडलो की गाडीत सफरचंद, केळी, मोसंबी अशी फळे आणि राजगिर्‍याचे लाडू वगैरे खाद्यपदार्थ भरलेले. साखरेचा चहा बंद केला. परिणामी पोटाचा त्रास कमी झाला, सुमारे दीड महिना चाललेले जुलाब नियंत्रणात आले.

ही सारी कामे आटोपून 16 ऑगस्ट रोजी औरंगाबादेत परत आलो. डॉक्टरांच्याकडे भेट दिली. वजन मोजले. ते 80 पर्यंत उतरले होते. माझे वजन कमी होऊ शकते, हे मी पहिल्यांदाच पाहात होतो! त्या आधी अनेक वर्षांपासून मी अनेकदा प्रयत्न केले होते, पण वजन कमी झालेले नव्हते. हे वजन उतरलेले पाहून माझा मलाच विश्र्वास आला आणि पुन्हा एकदा वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे मी ठरविले. मी पद्मजासोबत - माझ्या पत्नीसोबत - चर्चा केली आणि 17 ऑगस्टच्या सकाळपासून फिरायला जाण्याचे ठरविले. 

सकाळी लवकर उठणे ही माझ्या दृष्टीने सर्वात मोठी शिक्षा होती. लहानपणापासून कधीही मला पहाटे उठून अभ्यास करणे शक्य झाले नव्हते. फिरणे तर नाहीच. ज्या व्यवसायात 16-16 वर्षे काम केले, त्या पत्रकारितेत रात्रीची जेवण्याची वेळ अनिश्चित आणि झोपेची वेळ पहाटे तीनच्या आसपास. त्यामुळे सकाळी लवकर उठणे अवघडच...! मधल्या काही वर्षांत रात्रीची झोपेची वेळ 10-11 पर्यंत नियंत्रणात आली होती आणि सकाळी 7 च्या सुमारास उठणे सुरू होते. ही जाग आणखी अलिकडे आणणे गरजेचे होते. सकाळी 6 वाजता उठण्याचा प्रयत्न सुरू केला आणि तो साध्यही झाला.

मी औरंगाबादेत सिडको एन-2 च्या परिसरात राहतो. पहिल्या दिवशी आम्ही दोघे घराबाहेर पडलो आणि साधारण दीड किलोमीटरचा फेरफटका मारत घरी परतलो. दुसर्‍या दिवशी हे अंतर थोडे वाढविले आणि कामगार चौकातून एडीसीएच्या स्टेडियमकडून घरी परतलो. तिसर्‍या दिवशी असा विचार आला की रस्त्यांवरून वाहनांपासून स्वतःला वाचवित फिरण्याऐवजी मैदानावरच गोल चकरा मारल्या तर? तिसर्‍या दिवशी मैदानाला दोन फेर्‍या मारल्या. तिसर्‍या दिवसापासून एक-एक फेरी वाढवायला सुरवात केली, सहा फेर्‍यांपर्यंत पोहोचलो. एका फेरीला साधारण 7 ते 8 मिनिटे लागत होती. हा पाऊण तासाचा दिनक्रम निश्चित झाला. 

नुसत्याच फिरण्याने मिळणार्‍या फायद्याबरोबर योगासनांचाही फायदा झाला पाहिजे असे मला वाटू लागले होते. योगायोगाने, साधारण एप्रिल-मे मध्ये मी ‘सातारा आयकॉन्स’साठी मुलाखती घेताना सातार्‍यात योग गुरू अरुण रायरीकरांची भेट झाली होती. अधूनमधून मी त्या वर्गालाही हजेरी लावत असे. तेथून निघताना तेथे दररोज केल्या जाणार्‍या आसनांच्या स्थितींचे फोटो मी मुद्दामहून काढून घेतले होते. श्री. बर्जे हे स्थानिक बांधकाम व्यावसायिक अतिशय उत्तम प्रकारे आणि लवचिकपणे योगासने करीत. त्यांचे फोटोसेशनच केले. त्याचा उपयोग करण्याची वेळ आता आली होती.

एके दिवशी फोल्डरमधील सारे फोटो क्रमवार लावून घेतले. ते रिड्यूस साईजमध्ये पेज वर घेऊन त्याचे प्रिंटआऊट काढले आणि दररोज सकाळी ते प्रिंट समोर ठेवून योगासनांना सुरवात केली. ही सर्व योगासने प्रामुख्याने चरबी जाळण्यासाठी उपयोगाची ठरणारी होती. योगासने सुरू करण्याआधी सूक्ष्म व्यायाम गरजेचे होते. सूक्ष्म व्यायाम म्हणजे हाताच्या बोटांची उघडझाप करणे, खांदे फिरवणे, पायाच्या घोट्याला व्यायाम करणे आदी. त्याशिवाय श्वासाद्वारे पोट, हृदय आणि जठराला मिळणारा व्यायामही महत्वाचा होता. या सार्‍यांचा फरक महिनाभरात दिसू लागला. वजनकाटा आणखी खाली घसरला. त्यामुळे माझा उत्साह वाढला. पहिल्या आठवडाभरात ग्राऊंडला फेरी मारताना श्वास फुलायचा. तो स्थिर झाला, तसा मी पळण्याचा प्रयत्न करू लागलो. या ग्राउंडचा परीघ साधारण 750 मीटरचा आहे. यातील150-200 मीटर पळून गेलो की धाप लागायची. पण सराव कायम ठेवला. हळूहळू एका दमात एक फेरी पूर्ण होऊ लागली. त्यांतरच्या तीन फेर्‍यांत मिळून 30 -30 टक्के ग्राऊंड पूर्ण होऊ लागले. हा प्रमाणही हळूहळू बदलू लागले आणि एका दमात दोन फेर्‍या मारण्यापर्यंत दम पुरण्याची क्षमता गाठली. पण यामध्ये एक अडचण आली. माझे गुडघे सुजू लागले. डॉक्टरांशी बोललो, तेव्हा ते म्हणाले, ‘वय पाहून पराक्रम करावेत!’ त्यांच्या म्हणण्यानुसार चाळीशीनंतर अचानक जाग येऊन पळायला सुरवात केली आणि त्या आधी गुडघ्यांची हानी झालेली असेल, तर असे पळणे घातक ठरू शकते. नाईलाजाने पळणे बंद करावे लागले, आता नियमितपणे सहा फेर्‍या चालू ठेवल्या. घरातून मैदानात पोहचण्यासाठी साधारण 800 मीटर चालावे लागते. तेथे सहा फेर्‍या पूर्ण करायच्या आणि परतीचे 800 मीटरचे अंतर काटायचे. सर्व मिळून साधारण पाच किलोमीटरचे अंतर होते. या साठी एक तास लागतो.

मैदानावरील फेर्‍या पूर्ण झाल्यानंतर तेथेच पायर्‍यांवर बसून दीर्घश्र्वसन, अनुलोम-विलोम, भस्रिका हे श्र्वासाचे व्यायाम आणि त्या शिवाय इतर बैठी योगासने मी पूर्ण करतो. तेथून घरी परतल्यावर झोपून करावयाची आसने, सर्वांगासन, हलासन हे पूर्ण करतो. चालणे आणि योगासने करताना महत्वाचा भाग होता - परगावी गेल्यानंतर काय करायचे? ‘आयकॉन्स’च्या निमित्ताने सलग 10-15 दिवस मला बाहेर राहावे लागते. अशा वेळी मी एक काम करतो. ज्या शहरात जायचे ते शहर आधी ‘गुगल मॅप’वर पाहून घेतो. तेथे एखादे मोठे मैदान किंवा स्टेडियम आहे का ते पाहातो. असेल तर तो भाग समजून घेतो आणि एखाद्या स्थानिक मित्राकडे त्या परिसरात राहण्याची सोय पाहून घेतो. तसे नसेल तर गावाच्या बाहेरचे हॉटेल पाहातो. सकाळी 6.30 वाजता हॉटेलबाहेर पडतो. गावाबाहेरची दिशा धरून 30 मिनिटे चालत राहतो. तेधून परत फिरतो. लॉजवर येऊन आसने पूर्ण करतो.

नुसतेच चालणे आणि योगासने यांनी वजन कमी होत नसते. त्या साठी आहार नियंत्रण खूप महत्वाचे ठरते. मी मुळात ‘जोशी.’ जन्मजात खवय्या. जिभेवर नियंत्रण ठेवणे खूपच अवघड. काही चांगलंचुंगलं दिसलं, की ते जिभेवर कसे येईल, याचाच विचार. वजन वाढण्याचे हेच महत्वाचे कारण होते. खा-खा खायचे पण ते पचवायचे कसे? व्यायाम नाही, त्यामुळे घाम निघत नाही! आणि एका विशिष्ट वयानंतर प्रत्येकाची शरीरसंस्था हळूहळू बदलत जाते. आधी शरीरावर केलेले अत्याचार आता शरीर खपवून घेईनासे होते. पचनशक्ती मंदावलेली असते. त्याचे एकत्रित परिणाम शरीरावर होतात. 

त्यामुळे पचनाची स्थिती लक्षात घेऊन दिवसाचा क्रम ठरवून घेतला. हा प्रारंभिक दिनक्रम सोप्या ‘उपचारां’त बांधला. असे ठरविले, की आंघोळ केल्यानंतर 20 मिनिटांनी नाश्ता करायचा. पण अट ही, की आंघोळीआधी सारी योगासने झाली पाहिजेत. मात्र फिरून आल्याशिवाय योगासने करायची नाहीत...! परस्पर नियंत्रणातून आपोआपच शिस्त लागली. नाश्ता खूप हेवी ठेवला नाही. जेमतेम भूक भागेल, रात्रीपासूनचा उपवास तुटेल एवढेच पाहिले. मात्र एक गोष्ट आवर्जुन आहारात ठेवली, वाटीभर ताजे दही. रात्री लावलेले विरजण सकाळी वाटीत घ्यायचे... चवीला मधूर दही सकाळी खाणे प्रकृतीला पूरक ठरते. विशेषतः आतड्यांत ‘अल्सरेटीव्ह कोलायटीस’ची लक्षणे असलेल्या माझ्यासारख्या पेशंटसाठी हा महत्वाचा आहार ठरला. सकाळी साधारण 8.30 ते 9 च्या सुमारास नाश्ता झाल्यानंतर दुपारी साधारण 12.30 ते 1 दरम्यान जेवण. त्यात शक्यतो एखादी भाकरी, कमी तिखटाचे वरण, एखादी फळभाजी आणि भात. शक्यतोवर गोड पदार्थ वर्ज्य. संध्याकाळी 4 च्या सुमारास चहा आणि मारीची 2-3 बिस्किटे किंवा राजगिर्‍याचे लाडूू. हे नसतील तर एखाद-दुसरे फळ. संध्याकाळचे जेवण मात्र 7.30 च्या आत. ते अतिशय कमी. म्हणजे अर्धी भाकरी, थोडीशी भाजी. शक्यतो भात टाळतो. दिवसा शक्यतो झोपत नाही. फारच गरज असेल, तर 15-20 मिनिटे वामकुक्षी.

आहाराचे नियंत्रण करताना एक लक्षात आले, की जेमतेम भूक भागेल एवढाच आहार घेतल्याने दिवसभर हलके हलके वाटते. दिवसा झापड येत नाही. महत्वाचे म्हणजे कार्यक्षमता वाढते. उत्साह वाढतो. मला मधुमेह नाही, पण लक्षात आले की चहा किंवा गोड पदार्थांद्वारे पोटात जाणार्‍या शर्करेमुळे तयार होणार्‍या कॅलरी जाळणे अवघड जाते आहे. मग मी गोड पदार्थांवर खूप नियंत्रण आणले. ही माझ्यासाठी खूप मोठी कसोटी होती. मी गोड पदार्थांचा खूप चाहता आहे. एका वेळी मोठ्या आकाराचे 20 गुलाबजाम संपविणे हा अनेकवेळा केलेला प्रकार...! जिलेबी, पेढे, पुरणपोळी, खीर, रसगुल्ले... दररोजच्या जेवणात असे काही गोड असले की आमची जिव्हा प्रसन्न होत असे. ही सवय मोडून काढणे जड गेले. पण ‘मरता क्या नहीं करता?’ अशी माझी स्थिती. चहा सुद्धा कमी किंवा बिन साखरेचा घेऊ लागलो. बाहेर गेल्यावर चक्क ‘चहा सोडला, दूध चालत नाही आणि कॉफी घेत नाही’ असे सांगत असे. लिंबूपाणी हा त्यावरचा पर्याय. या पाण्यात साखर नाही आणि मीठही. फक्त ग्लासभर पाण्यात एक लिंबू पिळलेले...!

आहारावरील नियंत्रणाचा परिणाम म्हणून पचवता येईल एवढाच आहार घेणे सुरू झाले. पुरेसा व्यायाम झाल्याने पचन व्यवस्थित होऊ लागले. त्यामुळे साहजिकच अन्नाचे चरबीत होणारे रुपांतर टळले. शरीरावर साठलेली चरबी झडू लागली. त्याचा पहिला परिणाम गालांवर दिसू लागला. सुजल्यासारखे दिसणारे गाल उतरले. पोटाचा घेर कमी झाला आणि नितंबांचाही...! आधी कमरेला काचणार्‍या पँट घालण्यासाठी आता बेल्ट वापरावा लागतो आहे. आधी बेल्टला बाहेरच्या बाजूने दोन छिद्रे जादा पाडून घेतली होती, त्यातून तो कमरेभोवती बांधता येत होता. आता विरूद्ध दिशेने छिद्रे पाडण्याची वेळ आली आहे. जे शर्ट घालता येत नाहीत म्हणून बाजूला ठेवले होते, ते आता व्यवस्थित येत आहेत आणि नंतरच्या काळात घेतलेले शर्ट आता ‘मोठ्या भावाचे कपडे’ घातल्यासारखे ढगळ होत आहेत...!

नियमितपणे पुरेसा व्यायाम, आहार नियंत्रण आणि योगासने या त्रिसुत्रीचे पालन केले, की वजन नक्की कमी होते, हे मी अनुभवतो आहे. जिभेवर नियंत्रण सर्वात महत्वाचे. त्यानंतर आपोआपच शरीरावर नियंत्रण येऊ लागले. यात मला बर्‍यापैकी यश आले. 17 ऑगस्टपासून 1 जानेवारीपर्यंतच्या या पाच-साडेपाच महिन्यांच्या काळात 82.5 ते 70.5 इथपर्यंत मी पोहोचू शकलो. आता यापुढे वजन घटविणे जास्त कठीण आहे. आतापर्यंत घटले त्यात प्रामुख्याने चरबी होती. आता स्नायूंना पीळ बसणार आहे. तरीही दरमहा 2 किलो अशा हिशेबाने मे अखेर 60 किलोपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. बघुया.. काय होते ते...!