Sunday, September 9, 2018

पाेळा म्हटले, की मला हे सगळे आठवते...

(दत्ता जाेशी, आैरंगाबाद)

माणसांसाठी कष्टणार्‍या प्राणीमात्राविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा सण... पोळा. लहानपणी शाळेत कवी यशवंतांची कविता अभ्यासाला होती. ती आठवते... आठवत राहते...

पोळ्याच्या दिवशी आठवतेच आणि एरव्हीही सजून धजून चाललेले बैल दिसले की आवर्जून आठवते...


शिंगे रंगविली, बाशिंगे बांधली
चढविल्या झुली, ऐनेदार ॥

राजा परधान्या,  रतन दिवाण
वजीर पठाण, तुस्त मस्त ॥

वाजंत्री वाजती, लेझिम खेळती
मिरवीत नेती, बैलाला गे ॥

डुल-डुलतात, कुणाची वशींडे
काही बांड खोंडे, अवखळ ॥

कुणाच्या शिंगाना, बांधियले गोंडे
पिवळे तांबडे, शोभिवंत ॥

वाजती गळ्यात, घुंगरांच्या माळा
सण बैल पोळा, ऐसा चाले ॥

जरी मिरवीती, परि धन्या हाती
वेसणी असती, घट्ट पट्टा ॥

झुलीच्या खालती, काय नसतील
आसूडांचे वळ, उठलेले ॥

आणि फुटतील, उद्याही कडाड
ऐसेच आसूड, पाठीवर ॥

सण एक दिन, बाकी वर्षभर
ओझे मर मर, ओढायाचे ॥

का, कोण जाणे पण शेवची तीन-चार कडवी तेव्हा आवडायची नाहीत. छान चित्रावर कुणीतरी शिंतोडे उडवल्यासारखे वाटायचे... जगातले वास्तव कळण्याचे ते वय नव्हते. जे दिसायचे त्यावरच विश्वास टाकायचा... अन् आजूबाजूला दिसायचे ते छान, सुंदरच असायचे.

आमच्या देवणीत असे सगळे सण-उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे होत. घरोघरी बैल-गायी... त्यांचे गोठे. पोळ्याला सारा गाव आपापल्या पशुधनासह नटून थटून घराबाहेर पडायचा.

पोळ्याची खरी सुरुवात असायची त्याच्या आदल्या दिवशी. त्याला आमच्याकडे खळमळणी म्हणायचे. (नागर भाषेत खांदेमळणी असाही एक शब्द आहे.) पोळ्याच्या या आदल्या दिवशी सकाळपासूनच बैलांचे लाड होत असत. एरव्ही गायींवर उगारलेला चाबूक मी कधी फारसा पाहिला नाही, पण बैलांच्या वाट्याला तो सतत यायचा. देवणीत आम्ही बापूराव कारभार्‍यांच्या घरात दीर्घकाळ भाड्याने राहिलो. त्यामुळे आमच्यात वेगळेच नाते तयार झाले. त्यामुळे विशेषतः शेतातले सगळे सणवार आम्ही त्यांच्याकडेच जात असू. ‘येळवशी’ (वेळा अमावस्या) असो की खळं पडल्यानंतर होणारं ‘ढवारं’... म्हणजे रात्रीच्या चांदण्यातलं वनभोजन, आम्ही त्यांच्याच शेतात.

खूप लहान होतो तेव्हा दोन्ही घरांतील बायकांसोबत आम्ही सगळे बैलगाडीत बसून जात असू. मग त्यातही अगदी समोर बसून कासरा धरायचा माझा अट्टाहास. पण गाडी रेणूची, म्हणजे रेणुकादासची... शेतमालकाची. तो कसा मला बसू देईल? मग जानकामावशींच्या, रेणूच्या आईच्या मागे लागून, थोडा वेळ रेणूला बाजूला बसवून मी कासरा हाती घेत असे. कासरा हातात आला, की तो ओढून पाहायचा मोह... ओढला की बैलाच्या नाकातील वेसण ओढली जायची आणि ते त्रासायचे. ते लक्षात आले की तुकाराम मामा, म्हणजे कारभार्‍यांचे सालगडी आमच्यावर ओरडायचे. बैलाला हात लावलेला, त्रास दिलेला त्यांना खपायचा नाही. या मुक्या जनावरांवर त्यांची खूप माया...

खळमळणीला बैल शेतावर जायचे. दिवसभर त्यांना ना नांगराला जुंपले जायचे ना त्यांच्यावर चाबूक उगारला जायचा. दुपारची भाकरी खाऊन झाली बैलांची पूजा व्हायची. मग सार्‍या शेतकर्‍यांचे बैल शेतातून गावाकडे परत निघायचे. आधी ते नदीवर जायचे. तिथे त्यांना धुवून पुसून काढले जाई. नदीला पाणी असायचे त्यामुळे बैल पोहोणीही करायचे. तिन्हीसांजेला ते आपापल्या घरी परतायचे. रात्री त्यांना गोडेतेल पाजले जायचे. झोपण्याआधी त्यांना, म्हणजे बैलांना निमंत्रण दिले जायचे - ‘पोळ्यादिवशी घरी पोळी खायला या...’
000

पोळ्याचा दिवस उजडायचा तो अतीव उत्साहात. सकाळीच बैलांना ‘डिकमल’ पाजले जायचे. जसे आपण पादेलोण असलेले पाणी पाचक म्हणून पितो, तसे ते बैलांचे पाचक. खडेमिठासह काही विशिष्ट पदार्थ, पीठ कालवून घरधणीन ते तयार करीत असे...! कालचा आणि आजचा दिवस बैलांचा. या दोन दिवसांत त्यांना कामावर जुंपले जायचे नाही की त्यांच्यावर हात उगारला जायचा नाही. न्हाऊ माखू घालणे, अंगावर रंगांचे शिक्के... शिंगांना वॉर्निश, शिंगांच्या टोकाला पितळेच्या शिंगोळ्या... गोंडे... सगळी धमाल. आम्ही छोटी पोंरं तुकाराम मामांना मदतीच्या नावाखाली आपापले हात साफ करून घेत असू. ते ओरडत, आम्ही दूर पळत असू... सगळी धमाल.

त्याच दिवशी अंबाड्याच्या सुताचे छोटे छोटे चाबूक विकायला येत असत. आम्ही ते घेत असू. ते घ्यायचे, बैलांना लावलेल्या रंगातून उरलेल्या रंगात रंगवायचे आणि ते हवेत भिरकावून ‘चट्’ असा आवाज करीत वाजवत गल्लीभर फिरायचे हा आमचा आवडता प्रकार. कधी गंमत म्हणून एखाद्या बैलाच्या अंगावर चाबूक मारायचा अगावूपणाही करण्याचा प्रयत्न आम्ही करत असू पण कुणा मोठ्या माणसाच्या लक्षात आले तर मग आमच्या पाठी मात्र रंगायच्या...! खरे तर त्या इवल्या चाबकाचा मार बसणार तरी किती आणि कसा? पण त्या दिवशी बैलांना ते सुद्धा चालणार नाही म्हणजे नाही...!

पोळ्याच्या दिवशी काही बैल शेतावर जात, काही घरीच राहात. तिन्हीसांजेला सगळे गावाबाहेर पश्चिमेला महादेवाच्या मंदिराजवळ जमत. अंगावर झूल, गळ्यात घागरमाळा (त्याला काही जण घुंगुरमाळा म्हणतात), उत्तम साज चढवून बैल आणि त्यांचे मालक - गडी सार्‍यांचा एकच गदारोळ असे. मग सुरू होई मिरवणूक... बँडबाजा लावून ही मिरवणूक निघे. गावचे पाटील आणि मानकर्‍यांचे मानाचे बैल पुढे आणि बाकी सारे त्या मागोमाग. काही अंतर चालत जात गढीच्या शेजारी, बालवाडीजवळच्या छोट्या चौकात पोहोचून ही मिरवणूक संपत असे. मानकर्‍यांचे बैल आधी आपापल्या मालकांच्या घरी निघत, पाठोपाठ सार्‍या गावाचे...

घरी आले की घरची स्वामिनी बैलांच्या औक्षणासाठी समोर यायची. ‘व्हलग्या व्हलग्या - चालंग पलग्या’चा गजर करीत बैलांना पुरणपोळी प्रेमाने भरवायची. मोठ्या मानाने बैल वाड्यात घेतले जायचे, गोठ्यात जायचे. हिरवा चारा तर मिळायचाच... एरव्हीही प्रेमभराने मस्तकावरून फिरणारा आणि गळ्याखालचे पोळे खाजवणारा हात आज अधिक जिव्हाळ्याचा व्हायचा...

आज शहरात राहताना ही सगळी चित्रं नजरेसमोरून सरकताहेत... कालमानाप्रमाणे धूसर होताहेत... त्या धूसर पडद्याआडून जे काही स्मरणात राहिलं ते मांडलं...

- दत्ता जाेशी
आैरंगाबाद
(विशेष सहकार्य - रेणुकादास कुलकर्णी, देवणी)

Thursday, August 30, 2018

खरकटे मौल्यवान आहे...(दत्ता जोशी, औरंगाबाद)
काही माणसं चक्रम असतात. अशीच माणसं काहीतरी आगळं, समाजोपयोगी, आश्वासक असं घडवू शकतात. परवा अशाच एका माणसाशी परिचय झाला. गप्पा झाल्या. चक्रमपणाची खात्री पटली आणि मग त्यांच्याबद्दल लिहावेसेच वाटले. दीपक कान्हेरे हे त्यांचे नाव आणि अत्यल्प किमतीत आणि दीर्घकाळ टिकणार्‍या बायोगॅस संयंत्रांची उभारणी हे त्यांचे वैशिष्ट्य...! ते इंजिनिअर आहेत... पण वेगळ्या वाटेवरचे...!
परवा संध्याकाळी बीड बायपासच्या परिसरात कामानिमित्त गेलो असताना औरंगाबादच्या ‘एमआयटी’चे संस्थापक आणि अखंड ऊर्जेचे प्रेरणास्त्रोत असलेल्या डॉ. यज्ञवीर कवडे सरांना भेटण्याची इच्छा झाली. माझ्या उस्मानाबाद जिल्ह्यावरील पुस्तकात मी 2012 मध्ये त्यांच्याविषयी लिहिले होते. त्या वेळी त्यांच्यातील वेगळेपण लक्षात येत गेले. मग अथूनमधून भेटायला सुरुवात केली. परवा फोन केला, तर म्हणाले ‘या. पन्नालालजीही आलेले आहेत. भेट होईल.’ ‘एमआयटी’च्याच परिसरात असलेल्या त्यांच्या घरी पोहोचलो तर ज्येष्ठ समाजसेवी पन्नालालजी सुराणा तेथे होते. त्यांच्याशीही अल्पसंवाद झाला. ते गेल्यानंतर कवडे सरांशी गप्पा मारताना त्यांनी ‘एमआयटी’च्या होस्टेलमध्ये सुरू असलेल्या उपक्रमाबद्दल सांगितले. होस्टेल मेसमधील ‘फुड वेस्ट’वर चालणार्‍या बायोगॅस संयंत्राची उभारणी तेथे सुरू आहे. अर्थात ती पूर्णत्वाला गेली आहे. कार्यरत झालीय. दीपक कान्हेरे नावाचे गृहस्थ ते काम करताहेत. त्यांच्या सोबतीला चार इंजिनिअर आहेत, जे स्वतः प्रत्यक्ष अंगमेहनतीचे काम करताहेत... हे सारे ऐकल्यानंतर थांबणे शक्यच नव्हते. हे सगळे प्रत्यक्ष पाहण्यासारखे होते आणि कवडे सरांनीही प्रत्यक्ष भेट घालून देण्याची उत्सुकता दाखविली. आम्ही काही मिनिटांतच त्या साईटवर पोहोचलो आणि मग तासभर तिथेच रमलो.
मुळात कवडे सर म्हणजे नवनव्या तांत्रिक प्रयोगांत रमणारे, प्रत्येक गोष्टीतील शास्त्र शोधणारे आणि नव्या पिढीपर्यंत तांत्रिक शिक्षण पोहोचविण्यासाठी सतत आग्रही असलेले व्यक्तिमत्त्व. शिक्षणाच्या क्षेत्रात संपूर्ण आयुष्य काढल्यानंतर त्या मेहनतीला आलेले फळ म्हणजे ‘एमआयटी’. ‘शिक्षण महर्षी’ म्हटले तर आजकाल वेगळा वास येतो. पण ते खर्‍या अर्थाने शिक्षणमहर्षी. 1960 च्या दशकात रोटेगावच्या संस्थेत त्यांनी बायोगॅसचा पहिला प्रयोग मोठ्या जिद्दीने उभा केला होता. कदाचित औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामीण भागात उभारलेला तो त्या प्रकारचा पहिलाच प्रयोग असावा. तांत्रिक कारणांमुळे तो तीन-चार वर्षांत बंद पडला. पण विषय मनात ताजा होता. परवा काही महिन्यांपूर्वी दीपक कान्हेरे यांच्या भेटीनंतर त्या विचाराने पुन्हा उचल खाल्ली आणि ‘एमआयटी’ परिसरात बायोगॅसचा प्रकल्प अवतरला.
या प्रकल्पाची काही खास वैशिष्ट्ये आहेत. आधी तांत्रिक विषय समजावून घेऊ. या संयंत्राची क्षमता 36 हजार लिटरची आहे. त्यात दररोज 150 ते 180 किलो ‘फुड वेस्ट’वर प्रक्रिया होऊ शकते आणि त्याद्वारे दररोज 18 घनमीटर गॅस तयार होतो. ढोबळ विचार करायचा तर आपला घरगुती सिलिंडर सुमारे 15 किलोंचा असतो. या द्वारे दररोज निम्मा सिलिंडर गॅस उपलब्ध होतो. होस्टेलच्या मेसमध्ये कमर्शियल सिलिंडर वापरला जातो. तो 20 किलोंचा असतो. कॉलेज वर्षभरात साधारण 200 दिवस चालते. रोजचा 7 किलो गॅस उपलब्ध होतो असे मानले तर वर्षभरात साधारण 1400 किलो गॅस निर्माण होतो. अर्थात, वर्षभरात कमर्शियल सिलिंडरच्या आकारातील 70 सिलिंडर निर्माण होतात. या सिलिंडरचा दर साधारण 1350 रुपये आहे. असे साधारण 95 हजार रुपये वाचवण्यात संस्थेला यश आले. हा एक पैलू झाला.
‘कॉस्ट इफेक्टिव्हिटी’ हा या प्रकल्पाचा दुसरा पैलू. तो कसा? हे संयंत्र फेरोसिमेंट तंत्रज्ञानाने उभारले गेले आहे. 6 एमएम लोखंडी सळया, कबुतरजाळी, वाळू आणि सिमेंट वापरून डोमसह पूर्ण काम झाले. 36 हजार लिटर क्षमतेचा डोमही याच तंत्राने साकारला. शून्य लिकेजसह...! विटांचा वापर कुठेही झाला नाही. केवळ तुलना म्हणून सांगायचे झाले तर औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (सरकारी यंत्रणेद्वारे) काही दिवसांपूर्वी 4 घनमीटर क्षमतेचा बायोगॅस प्लँट उभारण्यात आला. त्याला 2 लाख 20 हजार रुपये खर्च आला. इथे त्यापेक्षा साडेचारपट मोठा म्हणजे 18 घनमीटरचा प्लँट उभा राहिला तो केवळ 3 लाख 70 हजारात. म्हणजे साधारण दीड पट मूल्यात...!
पण हे वैशिष्ट्य इथेच संपत नाही. आणखी तीन गोष्टी इथे घडतात.
दोन दिवसांत संयंत्रातील घटक कुजल्यानंतर त्यातून काळसर द्रवरूप स्लरी बाहेर येऊ लागते. ते उत्तम सेंद्रीय खत असते. ते बागेत, शेतात वापरले जाऊ शकते. त्यामुळे अन्य खतांच्या वापराच्या खर्चात बचत होते. ही स्लरी सगळ्याच संयंत्रातून येते. तो प्रकल्पाचा अंगभूत भाग असतो. मात्र ‘एमआयटी’मधले पुढचे वैशिष्ट्य हे आहे की इथे वायू विलगीकरणाची यंत्रणा बसवण्यात आली आहे. हे नेमके काय असते? शास्त्रीय भाषेत त्याला ‘स्क्रबिंग’ म्हणतात. बायोगॅस संयंत्रातून 2 वायू बाहेर पडतात. मिथेन (होय, तोच. नरेंद्र मोदी फेम!) आणि कार्बनडायऑक्साईड. मिथेन ज्वलनशील आहे आणि कार्बनडायऑक्साईड आगीला शांत करणारा. त्यामुळे बायोगॅसमधून बाहेर पडणारा वायू गॅस शेगडीद्वारे जाळण्याआधी त्यातील कार्बनडायऑक्साईड बाजूला केला तर गॅसचे औष्णिक मूल्य वाढते. (सोबतच्या छायाचित्रात पिवळ्या-निळ्या रंगाचे पाईप दिसतात, ते त्याच प्रक्रियेतले आहेत...)
याशिवाय तिसरी गोष्ट इथे वेगळेपणाने केलेली आहे. तयार होणारा मिथेन ‘कॉम्प्रेस’ करून सिलिंडरमध्ये भरण्यासाठीची यंत्रणाही इथे उभारण्यात आलेली आहे. त्यामुळे तयार झालेला वायू दीर्घकाळ, कुठेही घेऊ जाऊन वापरता येऊ शकतो. तो अकारण वाया जात नाही.
मग प्रश्न पडतो, हा प्रकल्प होस्टेलची इंधनाची गरज 100 टक्के वाचवतो का? उत्तर आहे - 100 टक्के नव्हे तर 30 टक्के गरज पूर्ण करतो. पण उष्टे-खरकटे उघड्यावर फेकण्याची गरज मात्र 100 टक्के वाचवतो. इथल्या अन्नाचा एक कणही उघड्यावर टाकावा लागत नाही. औरंगाबादेतील कचर्‍याचा विषय लक्षात घेता हा गुण अतिशय मोलाचा... श्री. कान्हेेरे सांगतात, “दत्ता जोशी, इथली 30 टक्के गरज भागवणे हीच सायुज्जता आहे. ‘त्याज्यात सायुज्यं साध्यते’... सोप्या भाषेत सांगायचे तर टाकाऊतून टिकावू निर्माण झाले पाहिजे. आम्ही वाया जाणारे खरकटे कुठे टाकायचे याचे शाश्वत उत्तर शोधले, विकसित केले आणि समाजासमोर खुले केले.” म्हणूनच त्यांच्या उद्योगाचे नाव ‘सायुज्य ऊर्जा’ असे आहे.
‘एमआयटी’ने हा उपक्रम करताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट केली. या प्रकल्पाला आणि विद्यार्थ्यांना परस्परांशी जोडले. कॉलेजचे उपप्राचार्य श्री. किशोर कुलकर्णी यांच्या माध्यमातून विद्यार्थी या कामाशी जोडले गेले. प्रत्यक्ष काम करून त्यांनी हे तंत्र अवगत केले. उद्या शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते आपापल्या गावी जातील तर तेथे स्थानिक प्रश्नावर आवश्यक असलेले उत्तर त्यांच्याजवळ तयार असेल. आयुष्यात कुठेही हा विषय समोर आला तर किफायतशीर, परिणामकारक आणि प्रभावी मॉडेल त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेले असेल.
तुम्हा कुणालाही हा प्रकल्प पाहायचा असेल तर, समजून घ्यायचा असेल तर तो शक्य आहे. कुलकर्णी सरांशी 9568453678 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधून पूर्वपरवानगीने भेट देता येईल, शास्त्र समजून घेता येईल. या आठवडाभरात गेलात तर कदाचिक श्री. कान्हेरे नावाच्या अवलियाशी आणि थेट सिमेंट वाळूत हात घालून काम करणार्‍या त्यांच्या इंजिनियर सहकार्‍यांशीही भेट होऊ शकते...!

Saturday, June 16, 2018

‘निर्लेप’ आणि ‘बजाज’च्या निमित्ताने...


‘निर्लेप’चे 80 टक्के शेअर्स ‘बजाज इलेक्ट्रिकल्स’ला विकले जात असल्याच्या बातमीने मोठी खळबळ उडाली. अनेकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. एका मराठी ब्रँडचा अस्त, वगैरे शब्दप्रयोगही कानावर आले. यातील ममत्वाची भावना तेवढीच महत्त्वाची होती. या पार्श्वभूमीवर ‘बजाज’शी हातमिळवणीचा ‘निर्लेप’चा निर्णय महत्त्वाचा म्हणावा असाच आहे. एक तर हा भारतीय ब्रँड आहे. घरोघरी पोहोचलेला आहे आणि केवळ ‘किचन अप्लायन्सेस’मध्ये काम न करता घराला लागणार्‍या सर्व प्रकारच्या उपकरणांमध्ये काम करणारा आहे. पंखे, गॅस शेगड्या, ओव्हन, मिक्सरपासून बल्ब - ट्यूबपर्यंत अनेक उत्पादने या उद्योगाने भारतभर रुजविली आहेत. त्यांच्या याच बळाचा वापर ‘निर्लेप’चा ब्रँड अधिक ताकदीने वाढण्यासाठी होणार आहे. मुळात ‘निर्लेप’ हा ‘बजाज’चा स्पर्धक ब्रँड नव्हता. त्यामुळे मार्केटमध्ये अतिशय चांगले गुडविल असलेला नवा ब्रँड मिळवून ‘बजाज’ने नव्या मार्केटची पायाभरणी केली आहे, असेच म्हणावे लागेल. हा ब्रँड अधिक ताकदीने विस्तारण्याची क्षमता त्यांच्यात आहे, त्यामुळे हा ब्रँड केवळ जिवंतच राहणार नाही तर खूप मोठा होईल याची शाश्वती नक्कीच आहे. या कंपनीचा ‘मार्केट अ‍ॅक्सेस’ निर्लेपपेक्षा मोठा असल्याने त्यांचा फायदा या ब्रँडच्या विस्तारासाठीच होणार आहे. भारतातील ‘नॉनस्टिक’चे मार्केट साधारण 400 कोटी रुपयांचे आहे. निर्लेपची आजची विक्री 50 कोटींची असली तरी त्याचे ‘मार्केट व्हॅल्यूएशन’ 90 कोटींचे आहे. त्या आधारावर विचार केला तर चार वर्षांपूर्वीची 100 कोटींची निर्लेपची उलाढाल ताज्या आर्थिक वर्षात 50 कोटींवर आली असली तरी आजही निर्लेपकडे सुमारे 25 टक्क्यांचा मार्केट शेअर आहेच. भारतीय बाजारपेठेत आजही कुठल्याही ‘नॉनस्टिक’ला ‘निर्लेप’ म्हणूनच ओळखले जाते... ही या ब्रँडची खरी ताकद आहे. त्याचा उपयोग ‘बजाज’ला करून घेता येणार आहे...
--------------------

(दत्ता जोशी, औरंगाबाद)

साधारण फेब्रुवारीतील गोष्ट. माझ्या ‘गोईंग ग्लोकल’मधील लेखासाठी मी भोगले उद्योगसमूहाचे अध्यर्यू श्री. रामचंद्र भोगले यांच्याशी चर्चा करीत होतो. चर्चा या उद्योगसमूहातील अन्य उद्योगांबरोबरच ‘निर्लेप’बद्दलही सुरू होती. या आधीही, 2005-06 मध्ये माझ्या ‘झेप’च्या तयारीच्या वेळी ‘निर्लेप’ची संपूर्ण वाटचाल मी शब्दबद्ध केली होती. पण या वेळी चर्चा करताना काहीतरी ‘मिसिंग’ वाटत होते. पाठोपाठ, मे मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या उपस्थितीत ‘निर्लेप’चा सुवर्णमहोत्सव साजरा झाला, तेव्हाही त्या आनंदोत्सवात सहभागी होताना पाचेक वर्षांपूर्वी साजर्‍या झालेल्या भोगले परिवाराच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीच्या आणि त्याच वेळी मराठवाड्याच्या औद्योगिकरणाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याची आठवण मनात ताजी होती. हा सोहळा ‘निर्लेप’चा ‘निरोप समारंभ’ असावा, अशी शंकाही मनात आली नव्हती, पण काहीतरी वेगळे घडते आहे याची जाणीव अंतर्मन देत होते.

काल सर्वत्र ‘निर्लेप’चे समभाग ‘बजाज इलेक्ट्रिकल्स’कडे जात असल्याची बातमी वाचली आणि माझ्याच अंतर्मनाला साक्षी ठेवत मी स्मृतींचे सारे जुने तुकडे जोडू लागलो. मी आणि सारा मराठवाडाच भोगले परिवाराकडे आदर्श उद्योजक म्हणून पाहतो. त्यांची वाटचाल, त्यांचे निर्णय, व्यवहारातील पारदर्शकतेचा - सचोटीचा आग्रह, काळाप्रमाणे त्यांनी केलेले व्यवसायाचे डायव्हर्सिफिकेशन या सार्‍याच गोष्टी अभ्यासण्याजोग्या आहेत. सामाजिक क्षेत्रातही त्यांनी मिळविलेला मान आणि विश्वासार्हता देवदुर्लभ आहे. या पार्श्वभूमीवर ‘परिवाराची ओळख’ असलेल्या उद्योगातून 80 टक्के समभाग अन्य उद्योगाला विकणे ही गोष्ट धक्कादायक पण तरीही काहीशी अपेक्षित वाटावी अशीच ठरली.

या निर्णयाकडे मी थोडा वेगळ्या नजरेतून पाहतो. आपल्या घरात कुपोषित होत असलेल्या मुलाला मरणासन्न सोडायचे की संपन्न घरात दत्तक देऊन त्याच्या भरभराटीत आनंद मानायचा, हा ज्याच्या त्याच्या मानसिकतेचा प्रश्न असतो. उद्योगाच्या बाबतीत हा संदर्भ आणखी वेगळा असतो. विशेषतः मेंदूपेक्षा हृदयाच्या आदेशानुसार चालणार्‍या मराठी उद्योजकांच्या बाबतीत तर तो खूपच वेगळा असतो. पण अशा कुठल्याही भावनिक गुंत्यात न अडकता भोगले परिवाराने घेतलेला ही निर्णय मला त्यामुळेच दिशादर्शक वाटतो. भोगले आणि निर्लेप हे अद्वैत आहे. अशा स्थितीत हा निर्णय घेताना हे लोक कोणत्या मानसिक संघर्षातून गेले असावेत, याची कल्पना आपण कदाचित करू शकणार नाही. पण हा निर्णय ‘निर्लेप’च्या भरभराटीसाठी अतिशय पूरक ठरू शकेल, असे मात्र निश्चितपणे सांगता येईल.

000
बरोबर 50 वर्षांपूर्वी रुजुवात झालेल्या ‘निर्लेप’वरील मालकी ‘बजाज इलेक्ट्रिकल्स’कडे पुढील 2 वर्षांत टप्प्याटप्प्याने हस्तांतरीत होत आहे. ढोबळ विचार करायचा तर ‘निर्लेप’चे 80 टक्के शेअर्स ‘बजाज’ने विकत घेतलेले आहेत. 20 टक्के शेअर्स भोगले परिवाराकडे आहेत. ‘बजाज’ची उलाढाल साधारण 3 हजार 800 कोटींची आहे तर ‘निर्लेप’ साधारण 100 कोटी रुपये उलाढालीची कंपनी आहे. अर्थात मागील 3 वर्षांत उलाढालीचा हा आकडा उतरता आहे. ही कंपनी हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया साधारणपणे पुढील 2 वर्षे चालणार आहे. या काळात सध्या या कंपनीची जबाबदारी सांभाळणारे श्री. मुकुंद भोगले हेच कंपनीचे कामकाज सांभाळतील. पुढे गरजेप्रमाणे उर्वरित 20 टक्के शेअर्सबाबतचा निर्णय घेण्यात येईल.

‘एका मराठी उद्योगाचा अस्त’ वगैरे चर्चा काही ठिकाणी रंगते आहे. मला या चर्चेत फारसा अर्थ वाटत नाही. औद्योगिकरणाच्या प्रक्रियेत तो उद्योग जिवंत राहणे, त्यांचे मार्केटमधील अस्तित्व वर्धिष्णु असणे आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांचे रोजगार सुरक्षित राहणे महत्त्वाचे ठरते. मागील तीन ते चार वर्षे सातत्याने घसरता आलेख असणार्‍या उद्योगाला प्रतिष्ठेचा विषय करत बुडविण्याऐवजी गुंतवणुकीची योग्य संधी शोधत तो ब्रँड जिवंत ठेवण्याचा व्यावसायिक विचार गरजेचा होता. श्री. राम भोगले यांच्या नेतृत्वाखालील या उद्योगसमूहाने तोच विचार केला आणि भोंगळ मराठी मानसिकतेत न अडकता संपूर्णतः व्यावहारिक विचार करीत त्यांनी परिस्थितीवर मार्ग काढला.

यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ‘भोगले ग्रुप’मध्ये ‘निर्लेप अप्लायन्सेस’वगळता इतर कंपन्यांची मिळून उलाढाल ‘निर्लेप’च्या किमान 10 पट आहे. म्हणजेच, सुमारे 600 कोटींची उलाढाल नोंदविणार्‍या उद्योगांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी नुकसानीत जाऊ लागलेल्या उद्योगाबाबत भोगले परिवाराने परिस्थितीसापेक्ष व्यावहारिक विचार केला आणि एक उद्योग जिवंत ठेवण्यात यश मिळविले.

000
ही आव्हाने नेमकी कोणती? श्री. राम भोगले यांनी या बाबत 3 मुद्दे स्पष्ट केले.

1) ‘निर्लेप’ज्या विषयात काम करते आहे त्या क्षेत्रात मागील 5 ते 6 वर्षांत अनेक मोठे उद्योग आले. त्यांची गुंतवणूक हजार कोटींपेक्षा अधिक आहे. अशा कंपन्यांच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तशाच सक्षम कंपनीशी युती करणे गरजेचे होते.

2) चिनी बाजारपेठेच्या आव्हानांची चर्चा आपण ऐकत असतो. भारतातील काही उत्पादक तिकडून अत्यंत कमी किमतीत ही सामुग्री बनवून आणून भारतात विकत आहेत. त्याला तोंड देण्याची ताकद मिळवायची तर तुमच्यात मोठी गुंतवणूक क्षमता हवी. ती ‘निर्लेप’मध्ये नव्हती.

3) भोगले परिवारातील तिसरी पिढी या उत्पादनात फारसा रस घेण्यास उत्सुक नव्हती. त्यांनी आपले संपूर्ण लक्ष ‘एआयटीजी’अंतर्गत उद्योगांवर केंद्रित केले आहे.

मागील दोन वर्षांत कंपनीची स्थिती अधिक बिकट झाली त्याला परदेशातील उत्पादनांचा बाजारपेठेतील मोठा व तुलनेत स्वस्तात उत्पादने देण्याचा विषय जसा कारणीभूत होता तसाच व्यापारी वर्गाच्या ‘जीएसटी’नंतरच्या अडचणींचा विषयही कारणीभूत ठरला. अर्थात ‘जीएसटी’चा विषय तात्कालीक होता आणि त्या धक्क्यातून हा उद्योग सावरत होताच. पण परकीय आव्हान पेलणे अवघड दिसत होते. मागील 5 वर्षे यावर विचारमंथन सुरू होते. त्यातून पूर्णतः भारतीय कंपनीलाच हा ब्रँड हस्तांतरीत करण्याचा निर्णय भोगले परिवाराने घेतला. हा व्यवहार पार पडलेला असला तरी हा उद्योग, यंत्रसामुग्री आणि मनुष्यबळ औरंगाबादेतच राहणार आहे.

000
चांगले मूल्य पदरात पाडून घेण्यासाठी कुठल्याही बहुराष्ट्रीय कंपनीला आपले समभाग विकण्याऐवजी ‘निर्लेप’ने घेतलेला ‘बजाज’शी हातमिळवणीचा निर्णय महत्त्वाचा म्हणावा असाच आहे. एक तर हा पूर्णतः भारतीय ब्रँड आहे. घरोघरी पोहोचलेला आहे आणि केवळ ‘किचन अप्लायन्सेस’मध्ये काम न करता घराला लागणार्‍या सर्व प्रकारच्या उपकरणांमध्ये काम करणारा आहे. पंखे, गॅस शेगड्या, ओव्हन, मिक्सरपासून बल्ब - ट्यूबपर्यंत अनेक उत्पादने या उद्योगाने भारतभर रुजविली आहेत. त्यांच्या याच बळाचा वापर ‘निर्लेप’चा ब्रँड अधिक ताकदीने वाढण्यासाठी होणार आहे. मुळात ‘निर्लेप’ हा ‘बजाज’चा स्पर्धक ब्रँड नव्हता. त्यामुळे मार्केटमध्ये अतिशय चांगले गुडविल असलेला नवा ब्रँड मिळवून ‘बजाज’ने नव्या मार्केटची पायाभरणी केली आहे, असेच म्हणावे लागेल. हा ब्रँड अधिक ताकदीने विस्तारण्याची क्षमता त्यांच्यात आहे, त्यामुळे हा ब्रँड केवळ जिवंतच राहणार नाही तर खूप मोठा होईल याची शाश्वती नक्कीच आहे. या कंपनीचा ‘मार्केट अ‍ॅक्सेस’ निर्लेपपेक्षा मोठा असल्याने त्यांचा फायदा या ब्रँडच्या विस्तारासाठीच होणार आहे. भारतातील ‘नॉनस्टिक’चे मार्केट साधारण 400 कोटी रुपयांचे आहे. निर्लेपची आजची विक्री 50 कोटींची असली तरी त्याचे ‘मार्केट व्हॅल्यूएशन’ 90 कोटींचे आहे. त्या आधारावर विचार केला तर चार वर्षांपूर्वीची 100 कोटींची निर्लेपची उलाढाल ताज्या आर्थिक वर्षात 50 कोटींवर आली असली तरी आजही निर्लेपकडे सुमारे 25 टक्क्यांचा मार्केट शेअर आहेच. भारतीय बाजारपेठेत आजही कुठल्याही ‘नॉनस्टिक’ला ‘निर्लेप’ म्हणूनच ओळखले जाते... ही या ब्रँडची खरी ताकद आहे. त्याचा उपयोग ‘बजाज’ला करून घेता येणार आहे.

000
या पार्श्वभूमीवर ‘भोगले परिवारा’चे पुढे काय होणार, याची चिंता अनेकांना लागली आहे! अर्थात यातील कुणीही या उद्योगसमूहाला जवळून ओळखत नाही, त्यांना या उद्योगविश्वाचा विस्तार माहिती नाही पण मराठी उद्योजकांविषयीच्या ममत्वातून त्यांना ही चिंता लागली असावी, हे स्पष्ट आहे. वरच नमूद केल्याप्रमाणे हा ग्रुप आज सुमारे 600 कोटी रुपयांची उलाढाल करतो. ‘भोगले ग्रुप’ म्हणून ओळखता येईल अशा सात कंपन्या आज कार्यरत आहेत. ‘ड्युरावेअर प्रा. लि.’ आणि ‘सिल्व्हरलाईट प्रा. लि.’ या दोन नावांनी सुरू असलेले काम आता एकत्रितपणे ‘निर्लेप अप्लायन्सेस प्रा. लि.’ या नावाने सुरू झाले आहे. त्याच बरोबर ‘उमासन्स स्टील फॅब प्रा. लि.’ ‘भोगले कोटिंग्ज अँड पेन्टस् प्रा. लि,’ अशा कंपन्या ‘निर्लेप ग्रुप’मध्ये काम करतात, तर ‘मराठवाडा ऑटो कॉम्पो’, ‘उमासन्स ऑटो काम्पो’, ‘भोगले ऑटोमोटिव्ह प्रा. लि.’ या ऑटोमोटिव्ह आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील कंपन्या ‘एआयटीजी’च्या छत्राखाली एकत्र आल्या आहेत. त्यामध्ये विविध ऑटोमोबाईल कंपन्यांना कौशल्यपूर्ण व दर्जेदार सुटे भाग बनवून देण्यापासून ‘ओरोबोरस’ हा स्वतःचा सायकल ब्रँड आणि बॅटरी संचालित विविध कृषिपूरक उत्पादने ही निकट भविष्यातील या ग्रुपची प्रमुख बलस्थाने ठरणार आहेत.

थोडे विस्ताराने सांगायचे तर 2016 मधील एक प्रसंग सांगता येईल. सन 2016 च्या डिसेंबरमध्ये औरंगाबादेत एका कृषि प्रदर्शनाला भेट देण्याचा योग आला. एक एक स्टॉल पाहत पुढे जात असताना एका स्टॉलवर श्री. राम भोगले त्यांच्या सहकार्‍यांसह दिसले. त्यांची ओळख ‘निर्लेप’ अशी, पण या वेळी सर्वांच्या शर्टवर ‘एआयटीजी’चा लोगो... मी उत्सुकतेने तिकडे खेचला गेलो तर स्टॉलवर वेगळेच उत्पादन. माहिती घेतली तेव्हा लक्षात आले की ते ‘कापूस वेचणी यंत्र’ आहे...! श्री. भोगले म्हणाले - ‘हे आमचे नवे प्रॉडक्ट’.

कपाशी वेचणीत शेतकर्‍यांना होत असलेल्या त्रासाबद्दल ऐकून होतो. आजकाल शेतीत मजूरच मिळत नाहीत, ही परिस्थिती आहे. शिवाय, कपाशी वेचताना कडक बोंडामुळे बोटे रक्ताळतात, ही मजुरांची तक्रार जुनीच आहे. हे काम सहजतेने होण्यासाठी त्यांनी केलेले हे सुंदर संशोधन...! ‘श्रीजय 380 कापूस वेचणी यंत्र’ या नावाने 2018 मध्ये ते बाजारातही आले आहे. जेमतेम 1100 ग्रॅम वजनाचे, केवळ 12 व्होल्ट डीसीवर चालणारे हे छोटेखानी यंत्र एका छोट्या बॅटरीवर चालते. कापूस बोंडातून अलगद बाहेर ओढला जातो, तो या यंत्रातून मागे खेचला जातो. पाठीवर लावलेल्या पिशवीत तो जमा होत राहतो. पिशवी भरली की मोकळी करायची, काम पुढे चालू. एकदा बॅटरी चार्ज केली की 7 ते 8 तास काम चालू राहते. कुणी डोकेबाज शेतकरी असेल तर तो सोलर पॅनल लावूनही काम करू शकेल...!  8 तासांत एक यंत्र 60 ते 80 किलो कापूस वेचू शकते. महत्त्वाचे म्हणजे त्यात इतर पालापाचोळा खेचला जात नाही. कापूस स्वच्छ राहतो. जेमतेम 6 ते 7 हजारांत हे यंत्र त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहे. मग माहिती मिळविण्याचा माझा प्रयत्न सुरू झाला. ‘अप्लाईड इनोव्हेशन टेक्नॉॅलोजी ग्रुप’च्या (एआयटीजी) अंतर्गत ‘उमासन्स ऑटो कॉम्पो’ची ही निर्मिती. ऑटो कॉम्पोनंट क्षेत्रातील कामे करत असतानाच संशोधनात्मक उत्पादनांची निर्मिती करून स्वतःचे ब्रँड प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने ‘एआयटीजी’ची स्थापना झाली.

000
श्री. राम भोगले सांगतात, “इंजिनिअरिंग उत्पादनात आम्ही अन्य उद्योगांना गुणवत्तापूर्ण उत्पादने पुरवीत आमचे वैशिष्ट्य जपले. पण त्याशिवाय थेट समाजापर्यंत पोहोचणारे इंजिनिअरिंग उत्पादन असले पाहिजे, या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू होते. त्यातूनच ‘कापूस वेचणी यंत्रा’ची निर्मिती झाली. आमच्या नव्या नावातच ‘इनोव्हेशन’ला ‘अप्लाईड’ या विशेषणाची जोड दिलेली आहे. या क्षेत्रात आम्हाला फक्त इनोव्हेशन सिद्ध करायचे नाही तर त्याची उपयोजितता, उपयुक्तताही प्रत्यक्षात उतरवायची आहे. त्या दृष्टीने हे उत्पादन आम्ही भारतात प्रथमच आणले...

“नवी दिशा ठरवताना आम्ही शेतीचा विचार डोळ्यांसमोर ठळकपणे ठेवलेला आहे. कृषिप्रधान मानल्या जाणार्‍या भारतात शेतीसमोर आज असलेली आव्हाने सोडविण्यात आम्ही आमचे योगदान दिलेच पाहिजे, या विचारातून आम्ही ही उत्पादने आणत आहोत. कापसाची वेचणी ही शेतकर्‍यांसमोर मोठी समस्या असते. ती सोडविण्याचा प्रयत्न आम्ही यशस्वीपणे केला. आता पुढील काळात शेतकर्‍यांना अत्यंत उपयुक्त ठरेल असे जमिनीचा पोत मोजणारे वेगळे यंत्र आम्ही बाजारपेठेत आणत आहोत. जमिनीतील ओल, त्यातील सामू (पीएच), त्यातील इतर घटक मोजणारे आणि त्याची आकडेवारी तात्काळ देणारे हे यंत्र शेतकर्‍यांच्या जीवनात क्रांती घडवून आणेल, असे आमचे भाकित आहे. त्या आधारावर पिकांना पाणी, खते व अन्य पूरक द्रव्ये कधी, कशी व केव्हा द्यायची हे ठरविणे शेतकर्‍याला सोपे जाईल. त्याची इतरांवरील अवलंबिता कमी होईल आणि तो वेगाने प्रगती करू शकेल असे आम्हाला अपेक्षित आहे...

“शेतकर्‍यांसाठीच आम्ही आणखी एका यंत्राची निर्मिती करीत आहोत. हे स्वयंचलित ‘ट्रिमिंग मशीन’ आहे. विशेषतः फळशेतीच्या क्षेत्रात, म्हणजे डाळिंब अथवा संत्र्यांच्या बागांमध्ये वा अशा प्रकारच्या अन्य शेतींमध्ये हे यंत्र उपयुक्त ठरणार आहे. प्रत्येक मोसमाआधी अशा रोपांची छाटणी करणे गरजेचे असते. ही एक किचकट आणि कौशल्यपूर्ण प्रक्रिया असते. हाताने छाटणीत बर्‍याचदा एकसमानता नसते अथवा रोपांच्या फांद्या नीटपणे कापल्या जात नाहीत. रोपांची साल सोलवटली गेली किंवा त्यात योग्य प्रकारे छाटणी झाली नाही तर तेथे बुरशीचा प्रादुर्भाव होतो आणि फळबाग धोक्यात येते. हे सारे या यंत्रामुळे टळते आणि नेमकेपणाने छाटणी होऊन शेतकर्‍यांना त्याचा फायदा होतो...

“सन 2012-13 पासून शेतीपूरक उपकरणांवर आमचे संशोधन सुरू झाले आहे. 2015-16 मध्ये आम्ही चाचणीसाठीची यंत्रे विकसित केली आणि 2017 च्या उत्तरार्धात कापूस वेचणी यंत्र बाजारात आणले. आता अन्य यंत्रे क्रमाक्रमाने बाजारात येतील. या उत्पादनांच्या डिझाईन-डेव्हलपमेंटसाठी आम्ही ‘आय इन्व्हेंट लॅब्ज’ ही स्वतंत्र कंपनी स्थापन केली आहे.”

000
आंतरराष्ट्रीय क्षेत्रात शंभराहून अधिक वर्षांपासून उभे असलेल्या ‘फॅमिली बिझनेस’च्या यशकथा आपण वाचतो. भारतात त्या तुलनेत शंभर वर्षांपेक्षा अधिक काळ टिकलेल्या उद्योगांची संख्या बरीच कमी. या पार्श्वभूमीवर ‘भोगलें’सारख्या उद्योजकीय कुटुंबाची काळानुरूप स्वतःत बदल घडवून सातत्यपूर्ण प्रगतीच्या पथावरील घोडदौड भारतीय मनाला नक्कीच समाधान देणारी असते. या परिवाराचे वैशिष्ट्य असे की तो केवळ उद्योगात रमला नाही आणि पैशाभोवती फिरला नाही. त्यांनी सामाजिक भान राखले.

आजही औरंगाबादच्या उद्योगजगताचा आणि समाजविश्वाचा निर्विवाद चेहरा म्हणून भोगले परिवाराला, या परिवाराचे प्रमुख म्हणून श्री. राम भोगले यांना समाजमान्यता आहे. हे लक्षणीय आहे. उद्योगविश्वातील मंदी, व्यावसायिक आव्हाने यांना तोंड देत हा समतोल राखणे ही कसोटीच असते. ती हा परिवार मागील अर्धशतकापासून पार करीत आला आहे.
प्रसंगपरत्वे, भावनेच्या गुंत्यात न अडकता योग्य वेळी योग्य निर्णय घेत जुन्या वाटा बदलत नव्या वाटा शोधणे हे खर्‍या उद्योजकाचे लक्षण असते. भोगले परिवार हेच करतो आहे. नव्या वाटा शोधताना, नवी, अभिनव, समाजाभिमुख उत्पादने बाजारपेठेत आणताना नजिक भविष्यात हा ग्रुप आणखी काही मोठी स्वप्ने प्रत्यक्षात उतरवणार आहे, मोठ्या सहकार्यातून मोठी उलाढाल मराठवाड्यात होणार आहे, हे माझे निरीक्षण.
या ग्रुपच्या वाटचालीला शुभेच्छा.

- दत्ता जोशी, औरंगाबाद

‘निर्लेप’बाबत अधिक जाणून घेण्यासाठी क्लिक करा -
<http://dattajoshis.blogspot.com/2012/04/blog-post_21.html>

Wednesday, May 9, 2018

काश्मिरचे पर्यटन किमान 10 वर्षे विसरायला हवे...
(© दत्ता जोशी, औरंगाबाद)
भारतद्वेष या एकाच मुद्द्यावर सतत हैदोस घालणार्‍या काश्मिरातील धर्मांधांनी परवा एका निरपराध पर्यटकाला ठेचून मारले. श्रीनगरहून गुलमर्गकडे जाणार्‍या मार्गात श्रीनगरलगतच असलेल्या नारबल येथे या पर्यटकांच्या वाहनावर तुफान दगडफेक झाली. काश्मिरात सुरक्षादलांनी नुकत्याच केलेल्या कारवायांत अनेक पाकिस्तानी दहशतवादी ठार करण्यात आले. त्याचा विरोध म्हणून ही दगडफेक होती.
पोलिसांवर दगडफेक चालू होती, या गाडीवर चुकून दगड पडले, अशी भूमिका आता देशद्रोह्यांचा पुळका असलेले काही जण घेत आहेत. पण पर्यटकांची गाडी आहे, हे लक्षात येऊनही त्यावर तुफान दगडफेक झाली आणि त्यातील एक दगड लागून गंभीर जखमी झालेल्या आर. थिरुमणी सेल्वन या चेन्नईच्या युवकाला प्राण गमवावे लागले, हे सत्य दडवता येणार नाही.
‘पर्यटक आम्हाला प्राणापलिकडे प्रिय आहेत’, ‘आम्ही त्यांच्या स्वागतासाठी सदैव तयार असतो’, ‘आम्हाला दहशतवाद मान्य नाही’, ‘भारतच आम्हाला प्रिय आहे’ असे अनेक सुविचार चार वर्षांपूर्वी माझ्या काश्मिरच्या सहलीत मी अनेकदा अनेकांकडून ऐकले होते. सगळ्या पर्यटनस्थळी काश्मिरी समाज चांगले आगत स्वागत करायचा, हेही खरे. पण हे ही तितकेच खरे, की मी माझ्या हाऊसबोटवाल्याच्या मागे लागून श्रीनगरच्या नागरी वस्तीत गेलो, तेव्हा त्याने मला माझा कॅमेरा बाहेर काढू दिला नाही की खाली उतरू दिले नाही. श्रीनगरच्या किल्ल्यावर लिहिलेल्या देशद्रोही घोषणा शहराच्या सर्व भागातून स्पष्ट दिसत होत्या. पर्यटकांच्या आर्थिक आधारावर तिथली अर्थव्यवस्था चालते, हे सगळ्यांनाच ठावूक आहे. या स्थितीत कदाचित स्थानिक पातळीवर अतिरेक्यांशी ‘सामंजस्याचे’ बोलणेही झालेले असू शकते. पण आता हे सामंजस्यही संपुष्टात आल्याचे दिसत आहे.
मला थेट 1988-89 ची आठवण येते. एखाद-दुसर्‍या काश्मिरी पंडिताचा बळी घेण्यापासूनच त्या काळ्याकुट्ट अध्यायाला प्रारंभ झाला होता. त्या वेळीही मानवतावादी, समाजवादी, साम्यवादी यांनी ‘तसे काही नाही’चाच सूर आळवलेला होता. त्यानंतर दोनच वर्षांत काश्मिर खोर्‍यातून साडेपाच लाखावर काश्मिरी पंडितांना सारे काही तिथेच सोडून विस्थापितांचे जीवन जगण्यासाठी पळ काढावा लागला होता. हजारोंचे बळी गेले होते. शेकडो बलात्कार झाले होते. या पार्श्वभूमीवर एका पर्यटकाच्या हत्येकडे वरवरच्या नजरेने पाहणे योग्य ठरणार नाही. काश्मिरच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनेचा निषेध केला आहे, पण त्यांच्याच आदेशाने दगडफेक करणार्‍या हजारो जणांवरील खटले काढून घेण्यात आलेले होते. हा राजाश्रय गंभीर आहे.
इथे माझे उदारमतवादी मित्र लगेच ‘भाजप सत्तेत भागीदार असल्या’ची आठवण करून देणारी घाणेरड्या भाषेतील वाक्ये लिहितील. पण सत्तेत सहभागी असणे आणि मुख्यमंत्री असणे यात फरक असतो. भाजपा सत्तेत आहे म्हणूनच काश्मिरातील देशद्रोह्यांची अंडिपिल्ली बाहेर निघताहेत. फुटीरतावाद्यांचे आर्थिक हितसंबंध पुराव्यांनिशी हाती येताहेत. शेकडो अतिरेक्यांना जन्नतची सैर घडविली जात आहे. हे विसरता कामा नये.
सप्टेंबर 2017 मध्ये ‘जम्मू काश्मिर स्टडी सर्कल’च्या राष्ट्रीय परिषदेसाठी 3 दिवस जम्मूत होतो. जम्मूत असूनही कडेकोट बंदोबस्तात ही परिषद पार पडली. त्यात अनेक गोष्टींचा उहापोह झाला. सगळ्याच गोष्टी इथे मांडणार नाही. पण एक गोष्ट आवर्जून सांगावी लागेल. ती आहे जम्मू विभागाच्या वेगाने सुरू झालेल्या इस्लामीकरणाची. जम्मू-काश्मिर पुण्यभूमी मानली जाते. प्राचीन भारतीय परंपरेचा आरंभ इथूनच झाला. शेकडो-हजारो वर्षांची परंपरा सांगणारी असंख्य मंदिरे इथे उभी आहेत. अशा या राज्याचे तीन भाग पडतात. जम्मू, काश्मीर आणि लडाख. यातील लडाख बौद्धबहुल, काश्मिर मुस्लिम बहुल आणि जम्मू हिंदूबहुल असल्याचे सांगितले जाते.
काश्मिरचा जेमतेम चतकोर भाग भारतात शिल्लक आहे आणि पंडितांच्या विस्थापनानंतर तो पूर्णतः मुस्लिमव्याप्त झाला आहे. लडाखमध्ये बौद्ध आणि मुस्लिमांमधील विवाहसंबंध वेगाने वाढत आहेत आणि तेथे मुस्लिम लोकसंख्या 50 टक्क्यांवर पोहोचली आहे. जम्मू भागातही इस्लामीकरणाला वेग आला आहे. एकीकडे रोहिंग्या मुसलमानांची वस्ती वसवून जम्मूतील दहशतकेंद्राची जणू स्थापनाच तेथे झाली आहे. दुसरीकडे माहिती अशी येत आहे की जम्मू भागातील डोंगर-दर्‍यांमध्ये जिथे कुठे प्राचीन मंदिरे आहेत त्याला लागून जागोजागी नव्या मशिदी उभ्या राहात आहेत. काही ठिकाणी वापरात नसलेल्या मंदिरांचे रूपांतरही मशिदींत झालेले आहे. हा प्रकार गंभीर आहे.
आणखी एक निरीक्षण असे सांगते की ‘पोट भरण्यासाठी’ काश्मिरातील मुसलमान आता जम्मूमध्ये येतो आहे. जम्मू शहराचे विभाजन करणार्‍या तवी नदीच्या दुसर्‍या टोकाला, जिथे नवे जम्मू वसलेले आहे त्या भागात मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. भारतातील अन्य प्रांतातून तेथे जाऊन वास्तव्य करणार्‍या नागरिकांना कायद्याने मनाई आहे पण बांगलादेशी मुसलमान तेथे सुखेनैव राहतो आहे. त्यांना नागरी सुविधा मिळत आहेत. त्यांच्या हक्कांसाठी सर्वोच्च न्यायालयात कायदेपंडीत कायद्याचा कीस पाडत आहेत. त्याच वेळी काश्मिर खोर्‍यातून जम्मूत मुस्लिमांना आणून त्यांच्या वस्त्या उभविल्या जात आहेत. (अर्थात येथेही मानवतावादी - यामुळे काय होणार? हा तर नागरिकांचा हक्क आहे. असे तारे तोडू शकतात. पण त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की हे सारे जाणीवपूर्वक घडवून आणले जात आहे.)
या सार्‍या पार्श्वभूमीवर काश्मिरमधील या नव्या घटनेकडे पाहावे लागेल. भारतभरातून आणि जगभरातून काश्मिरात जाणार्‍या पर्यटकांवर तेथील अर्थव्यवस्था अवलंबून आहे. त्याच बरोबर केंद्रातून जाणार्‍या प्रचंड निधीवरही त्यांचे अस्तित्त्व अवलंबून आहे. पर्यटनातून अमाप पैसा कमावणार्‍यांकडून राज्याच्या महसुलात फारशी भर पडत नाही. कारण वीज नाममात्र किमतीत मिळते. पाण्याचेही तसेच. कुठल्याही रस्त्यावर टोल नाही. सारा पैसा केंद्र देते आणि स्थानिक नागरिक तो आपला हक्क समजतात.
हे सारे लाटूनही भारताशी एकनिष्ठ राहण्याची त्यांची नियत नाही. तीन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत ज्या सुरक्षा दलांनी त्यांना वाचविले त्यांच्यावरच दगडफेक करण्यात त्यांना शरम वाटत नाही. याचे कारण त्यांच्या धर्मांधतेत व फुटीर वृत्तीत दडले आहे. वाजपेयी सरकारने आणि आता मोदी सरकारनेही पूर्वांचलातील राज्ये आणि जम्मू-काश्मिरसाठी सढळ हाताने मदत केलेली आहे. दिल्लीत येऊन गेलेल्या अन्य सरकारांच्याा तुलनेत ही मदत अनेक पटींत आहे. याची कबुली स्थानिक नागरिकही देतात. पण तरीही ते भारताविरोधात, काश्मिरी पंडितांविरोधात आणि आता भारतीय पर्यटकांविरोधात हाती दगड घेतात. याच दगडांचे रूपांतर उद्या शस्त्रांत होऊ शकते.
आणि आता थोडे मानवतावादी, समाजवादी, साम्यवादी, पाकिस्तानवादी मंडळींबद्दलही लिहिले पाहिजे.
यांच्या ‘सलेक्टीव्ह विज्डम’ला माझा सलाम. 
मुद्दाम ‘सलाम’ करतोय, नमस्कार नाही.
मी देशाच्या अन्य भागात बळी गेलेल्या विविध निरपराधांची नावे घेणार नाही. विविध हत्यांवर या मंडळींनी केलेल्या मातमबद्दल बोलणार नाही. कारण बोलून उपयोग होणार नाही. कारण हे बुद्धीवादी म्हणवतात आणि आपल्या बुद्धीचा उपयोग विकृत युक्तिवादासाठी करतात.
त्यांचे शहाणपण केवळ निवडक विषय, व्यक्ती, प्रसंग आणि समाजांपुरतेच मर्यादित असते. त्यामुळेच ‘मुस्लिम दहशतवादी’ वृत्तींनी ‘काश्मिरा’त एका ‘हिंदू’च्या दगडाने ठेचून केलेल्या हत्येबद्दल बोलण्यात ते त्यांचा वेळ वाया घालणार नाहीत. टीव्हीवर चर्चा झडणार नाहीत. पेपरांत बातम्या येणार नाहीत. फेसबुकवर फोटो काळा होणार नाही. निषेधाच्या कॉमेंट येणार नाहीत. मेणबत्ती संप्रदाय अज्ञातवासात गेलेला असेल.
त्यांना बाजूला ठेवू. या देशाचे सामान्य नागरिक म्हणून एक काम करू... पुढची किमान 10 वर्षे काश्मिरच्या पर्यटनाचा विचार मनातून दूर ठेवू. मी हे लेखन करण्याआधी काही टूर ऑपरेटरांशी अनौपचारिक चर्चा केली. माहिती मिळविली. काही बड्या टूर कंपन्यांकडे पर्यटकांनी केलेल्या बुकिंगपैकी 75 टक्के बुकिंग मागील 2-3 दिवसांत रद्द झाले आहेत. बर्‍याच छोट्या टूर ऑपरेटरकडील निम्म्याहून अधिक ग्रुप अन्यत्र डायव्हर्ट होताहेत. त्यांनी हिमाचल, सिक्कीम-दार्जिलिंग, केरळ आदी पर्याय स्वीकारले आहेत. हे प्रमाण वाढते आहे. 1988-90दरम्यानच्या दहशतवादी उद्रेकानंतर तेथील पर्यटनाचा व्यवसाय थंडावला होता. पुढे सारे हिंदू खोर्‍याबाहेर गेल्याची खातरजमा झाल्यावर तेथील पर्यटनाला चालना देण्यासाठी स्थानिक लॉबीने अनेक नाटके केली आणि अखेर भारतीय पर्यटक तिकडे पुन्हा वळला. मागची काही वर्षे थोड्याफार चढउतारांसह निभावली गेली.
मागच्या वर्षी अमरनाथच्या यात्रेकरूवर गोळीबार झाला. त्यात काहीजणांना हौतात्म्य पत्करावे लागले. आता या निरपराध तरुणाचा बळी. काश्मिरच्या या धुमसत्या बर्फाला आणखी किती बळी द्यायचे? कशासाठी? मोदी सरकार पाकिस्तानातून येणार्‍या अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात तर यशस्वी ठरतेय पण सीमेआतल्या या दहशतवाद्यांशी लढायचे तर आर्थिक रसद बंद करणे गरजेचे वाटते.
जोवर कुठल्याही बंदोबस्ताशिवाय 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला श्रीनगरच्या लाल चौकात ध्वजवंदन होणार नाही, सुरक्षा दलांवर दगडफेकीची शेवटची घटना घडल्याला किमान 3 वर्षे होणार नाहीत, जोवर स्थानिक नागरिक दहशतवाद्यांना आश्रय देणे नाकारणार नाहीत तोवर काश्मिरचे सौंदर्य पाहणे टाळायला हवे. भारतीयांच्या पैशातून देशद्रोही पोसणे योग्य नव्हे. काश्मिरात जाण्यावाचून काही अडण्याचे कारण नाही. टूर आॅपरेटरनी सुद्धा या विषयात सकारात्मक भूमिका घ्यावी आणि पर्यटकांच्या जीविताची नैतिक जबाबदारी घेत तेथील टूर टाळाव्यात.
हा देश आपलाच आहे. देशाच्या सगळ्या भागात आपण गेलाेच पाहिजे. पण जिथे आपल्या जीविताची हमी नाही उलट आपल्या आर्थिक याेगदानातून उलट दहशतवादच फाेफावताेय, तिथे जाणे काही काळ तरी टाळायला हवे.
-दत्ता जोशी
औरंगाबाद