चेतन भगत या सध्या आघाडीचे नाव असलेल्या लेखकाबद्दल बरेच ऐकून होतो. हा भारतातील बेस्ट-सेलर! त्याची ‘REVOLUTION 2020’ ही कादंबरी नुकतीच बाजारात आली आणि त्याविषयी बरीच चर्चा सुरु झाली. चेतन यांच्या बद्दल बरेच ऐकून होतो, पण त्यांचे पुस्तक वाचण्याचा योग आला नव्हता. माझे जालना येथील स्नेही श्री. नितीन काबरा यांच्यामुळे तो आला. या पुस्तकाची एक प्रत त्यांनी मला दिवाळीआधी भेट दिली. बराच काळ ती वाचण्याचा मुहूर्त लागत नव्हता. (मी इंग्रजी वाचन शक्यतो टाळत असतो... माझा इंग्रजी वाचनाचा वेग खुपच कमी आहे, हे त्याचे खरे कारण !) परवा धुळे- जळगाव या परिसरात केलेल्या दोन दिवसांच्या प्रवासात वाचण्यास सुरवात केली आणि काल रात्री तीन वाजता ही कादंबरी वाचून पूर्ण झाली. काहीतरी वेगळे वाचल्याची जाणीव मला झाली. या लेखकाने नव्या पिढीवर आपल्या लेखनाने कसे गारुड केले असावे, या उत्सुकतेपोटी खरे तर मला हे वाचायचे होते. वाचून झाल्यावर मीही त्यांचा चाहता बनलो. पण मनात काही प्रश्न सुद्धा निर्माण झाले.
‘REVOLUTION 2020’ ही एका प्रेम-त्रिकोणाची कथा आहे. याचे कथानक वाराणसीमध्ये जन्मते, कोटा येथे रेंगाळते आणि वाराणसीमध्येच संपते. कादंबरीचा नायक गोपाल, त्याचा बालमित्र राघव आणि बालमैत्रीण आरती या तिघांभोवती कथेचा पट फिरतो. गोपाल हा गरीब घरचा... बऱ्यापैकी बुद्धी असलेला तर राघव हा तुलनेत चांगल्या घरचा आणि कुशाग्र बुद्धीचा. बारावीनंतर राघव आयआयटीत सहज दाखल होतो. गोपाल पहिल्या प्रयत्नात असफल होतो. त्याचे वृद्ध वडील कर्ज काढून त्याला कोटा इथे एआय-ट्रिपलईच्या तयारीसाठी पाठवतात. त्याला आरती आपली जीवनसाथी म्हणून हवी असते. पण ती फक्त मैत्रीसाठी तयार असते. तो कोट्याला गेल्यानंतर आरती राघवचे प्रेम स्वीकारते. यामुळे गोपाल संतापतो. अभ्यासात मागे पडतो. त्याची दुसरी संधी हुकते. तो वाराणसीला परत येतो. त्याच्या अपयशाने त्याचे वडील खचतात. त्यातच त्यांचे निधन होते. एखाद्या सामान्य इंजिनियरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याच्या प्रयत्नात असताना एका मध्यस्ताच्या मदतीने तो स्थानिक आमदाराच्या संपर्कात येतो आणि त्याच्या सहकार्याने चक्क इंजिनियरिंग कॉलेज सुरु करून त्याचा संचालक होतो. राघव आयआयटी करून पत्रकार होतो. त्याच्या बातम्यांमुळे आमदाराला जेलची हवा खावी लागते. पण त्या दरम्यान त्याची आर्थिक घडी विस्कटते. आरती संभ्रमात पडते. याच काळात गोपाल आरतीला प्रभावित करतो. ती लग्नाला नकार देतानाच शरीराने मात्र त्याच्या जवळ येते. ती अखेरीस त्याच्याशी लग्नाला तयार होते पण त्याच वेळी तो राघवला पुढे करतो, त्याला आधार देतो आणि आरतीपासून स्वतः दूर जातो... ही तशी ढोबळ कथा आहे.
कादंबरी प्रत्यक्षात वाचताना मात्र मी लेखकाच्या शैलीने प्रभावित झालो. साधी-सोपी वाक्यरचना हे त्यांचे बलस्थान. त्याच बरोबर सुक्ष्म निरीक्षणशक्ती आणि त्याची सुरेख मांडणी हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे असे मला वाटले. वाराणसी – कोटा इथली परिसराची वर्णने, विविध पात्रांचा परस्पर संवाद, मानवी स्वभावाचे कंगोरे, तत्व आणि व्यवहारांतील तफावत, स्त्री मानसिकता हे सारे खूप सुंदर पद्धतीने वठले आहे. लेखक ‘फेकतो’ आहे, असे कुठे जाणवत नाही. त्यांच्या वर्णनातून तो प्रसंग, परिसर आपल्या डोळ्यांसमोर उभा राहत जातो.
कथाबीज तरुण पिढीला आपलेसे वाटणारे आहे. ‘विनर’ एकच असतो. `रनर’ अनेक असतात. मात्र शिक्षण पद्धतीमधील ‘रनर’ आयुष्यात ‘विनर’ ठरू शकतो. अशा असंख्य ‘रनर’ना हे कथानक ‘अपील’ होते. जगात अशी अनेक उदाहरणे सापडतात. हा मोठा वर्ग आपली प्रतिमा या कथानकामध्ये शोधू लागतो आणि स्वतःला त्या जागी कल्पून पुढे जातो. या कादंबरीमध्ये प्रेम आहे, मैत्री आहे, इर्षा, मत्सर, द्वेष, राजकारण, सेक्स हे सारे आहे... हा सारा मसाला असेल तर विषय ‘हिट’ होणारच!
पण या बरोबरच काही प्रश्न मनात उपस्थित होतात. कादंबरीची नायिका आरती हिच्याबाबत आधी लिहितो... आरती ही एका कलेक्टरची मुलगी. गोपाल गरीबीत जगणारा. अभ्यासात सुद्धा राघव पेक्षा मागे... पण तो आरती वरून जीव ओवाळून टाकत असतो. ती त्याला दाद देत नाही, पण तो कोट्याला गेल्यानंतर राघवला मात्र होकार देते... त्याच बरोबर गोपाल बरोबर मैत्रीचे संबंध कायम ठेवते... हीच आरती पुढे राघव खूप अडचणीत आल्यावर त्याच्यापासून आधी शरीराने आणि मग मनाने दूर जाऊ लागते... त्या काळात उच्च स्थानाला पोहोचलेला गोपाल तिला जवळचा वाटतो... एवढे दिवस त्याच्यापासून जपून ठेवलेले आपले शरीर ती त्याला अर्पण करते... ही स्त्री ची मानसिकता एक वेळ समजू शकते... कारण स्त्री चे मन ही अगम्य गोष्ट आहे, हे मी मान्य करतो. पण जेव्हा ती लग्नाला तयार असते, तेव्हा तिच्या शरीराचा उपभोग घेणारा गोपाल वेगळ्याच मार्गाने जातो. तो आरती आणि राघव एकत्र यावेत यासाठी स्वतःकडे वाईटपणा घेतो. पुरुषी मनाचा हा कुठला प्रकार? हा त्याग असेल तर उपभोग का घेतला आणि या पद्धतीने सूड घ्यायचा तर त्याची पार्श्वभूमी कथानकात नाही. हा वैचारिक गोंधळ आहे का? हा anty-climax मनाला पटत नाही.
बाकी, काही तांत्रिक त्रुटी आहेत. उदाहरणार्थ – आरतीचे वडील जिल्हाधिकारी असतात. पण ते सलग १२ वर्षे एकाच शहरात कसे नियुक्त असतील? पेचप्रसंगाच्या वेळी मुख्यमंत्री एका आमदाराच्या घरी कसे जातील?.... पण असे तपशील डोळ्याआड केले, तर सामान्यपणे ही कादंबरी काही वेगळे वाचल्याचे समाधान देते.