Thursday, July 28, 2011

चंगळवादात होतेय संस्कतीची ऐशी-तैशी !

`दैनिक लोकमत` च्या `हेलो औरंगाबाद` मध्ये दर शुक्रवारी प्रकाशित होत असलेल्या 'संस्कृती, साहित्य वगैरे' या स्तंभात 22-7-2011 रोजी प्रकाशित झालेला हा लेख. 
...................................................................................
काही दिवसांपुर्वी गोव्यातील धार्मिक स्थळांच्या बाबतीत एक बातमी वाचण्यात आली होती. तेथील विविध धार्मिक स्थळांमध्ये पर्यटकांकडून होत असलेल्या असभ्य वर्तनामुळे तोकड्या कपड्यांतील पर्यटकांना प्रवेशच नाकारण्याचा निर्णय तेथील काही पुरातन मंदिरांनी आणि चर्चेसनी घेतला असल्याचे त्या बातमीत म्हटले होते. ज्या कपड्यांमध्ये हे लोक समुद्रकिनारी मजा करीत हिंडत असत, त्याच वेशात मंदिरात - चर्चेमध्येही येत. अशा लोकांच्या झुंडी रोखण्यासाठी संबंधित धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनांनी हा निर्णय घेतला. एका चर्चने अशी बंदी न घालता तोकड्या कपड्यात आलेल्या व्यक्तींना अंगावर पांघरण्यासाठी 
तात्पुरते वस्त्र देण्याचा आणि हे वस्त्र पांघरूनच मंदिरात प्रवेशाची परवानगी देण्याचाही निर्णय घेतल्याचे यात म्हटले आहे.

हे सारे मुळातच धक्कादायक आहे. हा विषय फक्त गोव्यापुरता किंवा मंदिर - चर्चपुरता मर्यादित नाही. पर्यटनसंस्कृतीचा विकास होत असताना मानवी संस्कृतीची जागा विकृती घेत असल्याचे भय यातून डोकावते आहे. उच्छृंखलतेचा कळस गाठणार्‍या घटना मागील चार - पाच वर्षांत सगळीकडेच घडत आहेत. मध्यंतरी शनी शिंगणापूर येथे चोरी झाल्याची बातमी आली होती. विना कडी-कुलपाचे भारतातील हे एकमेव गाव होते. या गावात चोरी झाली तर चोरी करणारा मरतो अशी श्रद्धा - किंवा अंधश्रद्धा - या गावात होती. कदाचित मागील शतकापासून हे चालत आले असेल. त्यामुळे या गावातील पोलिस रेकॉर्ड साफ होते! अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ही ‘अंधश्रद्धा’ दूर करण्यासाठी ‘चला शनी शिंगणापूरला - चोरी करायला’ असे एक अभिनव आंदोलन केले. हे त्याचेच तर ‘यश’ नव्हे? त्या चोराबद्दल अद्याप ठावठिकाणा लागला नाही, त्यामुळे तो जिवंत आहे की मेला, याचा उलगडा झाला नाही. अशा स्थितीत देव-धर्माविषयीची अंधश्रद्धा समाजाच्या मनातून दूर होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करायचा की त्या निमित्ताने पुरातन काळापासून चालत आलेला नैतिकतेचा धाक संपल्याबद्दल खंत व्यक्त करायची, हेच आता समजेनासे झाले आहे. ईश्र्वर आपले काहीही वाकडे करू शकत नाही याची करून दिलेली जाणीव आणि पोलिस काहीच करू शकत नाहीत याची झालेली खात्री अशा दुहेरी बिनधास्तीतून काही जणांचे हे उद्योग चालू असतात. त्यामुळे समाजातील पापिभिरू मने मात्र भयभीत होतात.

सुरवातीला गोव्याचा विषय निघाला, म्हणून आठवले - गोव्याचे पहिले मुख्यमंत्री आणि तेथील जनमानसात परम आदराचे स्थान असलेल्या काकासाहेब बांदोडकरांचा बंगला मीरामार बीचलगत आहे. त्याला स्मारकाचा दर्जा दिला गेला आहे. तेथील कंडक्टेड टूरमध्ये त्याच्या शेजारचा, विख्यात चित्रकार मारिओ मिरांडाचा बंगला दाखविला जातो पण बांदोडकरांच्या बंगल्याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते.

2004 मध्ये गोव्यात तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट झाली होती. गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा दिल्यानंतरच्या काळात दिल्लीत प्रजासत्ताक दिनी सादर होणारा गोव्याचा चित्ररथ कायम समुद्रकिनारा, फेणी आणि पोर्तुगीज जीवनशैली यावर आधारित असायचा. हा विषय त्यांच्याशी छेडला तेव्हा ते सत्तेवर आल्यानंतर तेथील सामान्य लोकजीवन, कला यांना यामध्ये स्थान देण्यास सुरवात करीत असल्याचे ते म्हणाले होते. हे सारे विषय वरकरणी खूप छोटे छोटे आहेत, पण त्यातून ध्वनित होणारे परिणाम खूप महत्वाचे ठरणारे असतात.

देवाच्या दरबारातील वर्तनाबद्दलचा आणखी एक मुद्दा. तिरुपतीच्या मंदिरातही तोकडे कपडे घालून जाण्यास परवानगी नाही. म्हणजे, अगदी बर्म्यूडा आणि टी शर्ट असा वेष असेल, तरीही रांगेतून बाहेर काढले जाते. अशा स्थितीत मनात एक विचार डोकावला, ईश्र्वराला सर्वोच्च शक्ती मानले जाते, तर त्याच्या दरबारात जाताना काही औपचारिक संकेत पाळले जाऊ नयेत? आपापल्या कार्यालयात आपल्या ‘बॉस’समोर जाताना जे निकष - संकेत - प्रोटोकॉल सर्वसाधारणपणे पाळले जातात, त्यांचेच पालन त्या ‘सर्वोच्च बॉस’समोर का होऊ नये? आणि ईश्र्वराच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उमटवायचे असेल, तर मग तिथे कडमडायचेच कशाला?

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील सीमारेषा जशी पुसट आहे, तशी संस्कृती आणि विकृतीतील सीमारेषा पुसट नाही. ती अगदी ठळक आहे. (परत, संस्कृती म्हटले की काही जणांना शेंडी जानवे आठवते!) वर्तन, आचार-विचार, खाद्य-पान, परस्पर सहिष्णुता ही सारी संस्कृतीचीच रुपे नाहीत का? भौतिक सुविधांचा अतिरेक चालू असताना त्याच्या मुळाशी हे अधिष्ठान असेल, तर वर उल्लेखलेले प्रकार घडणार नाहीत. हे प्रकार घडू नयेत, अशी काळजी सर्वांनीच घेतली तर समाजस्वास्थ्यही कायम राहू शकेल.

भक्ती, ईश्र्वर, श्रद्धा हे सर्व विषय बाजूला ठेवले तरी वाढती असहिष्णुता, बेदरकारी, सात्विकतेची कुचेष्टा हे प्रकार सध्या सगळीकडेच वाढत आहेत, हे सत्य नाकारता येत नाही. अशा प्रकारचे वर्तन हा संस्कृतीवरील बलात्कारच नव्हे का? 

- दत्ता जोशी
9225 309010