....................................................
दैनिक सामनाच्या औरंगाबाद आवृत्तीमध्ये दि. १७ -९ - २०११ रोजी प्रकाशित झालेला लेख.
....................................................
‘त्या’ पहाटे मनोज टिकारिया यांचा आलेला ‘एसएमएस’ मन घायाळ करून गेला. अर्थ कळूनही तो मेसेज मी तीन वेळा वाचला. या आशेने, की आधी कळलेला अर्थ चुकीचा असेल...! पण ते होणार नव्हते. एक जिंदादिल माणूस या जगातून निघून गेला होता. मृत्यूही असा, की काळजाचा थरकाप व्हावा. अशा वेळी जगन्नियंत्याचा राग येतो. सर्वांच्या मदतीसाठी एक पाऊल पुढे असणारा हा माणूस एक्झिट घेताना सर्वांच्याच असंख्य पावले पुढे निघून गेला. खरे तर या गोष्टी आपल्या हातात नसतात, एक अदृष्य शक्ती हे सारे घडवत असते. आपण त्या शक्तीला निमूटपणे शरण जायचे असते, हेच खरे.
उदय दंताळे यांची आणि माझी पहिली भेट कुठे, केव्हा, कधी झाली हे खरेच मला आठवत नाही. बुद्धीला खूप ताण देऊन पाहतोय, मागच्या वर्षभरात असंख्य वेळा स्मृतीच्या नोंदी असंख्य वेळा चाळून झाल्या. पण पहिल्या भेटीचा क्षण काही हाती लागत नाही. कदाचित ती ओळख औपचारिकपणे झाली नसावी. तसे, उदय कधीच औपचारिक नव्हते. आपल्याच धुंदीत मग्न होऊन रस्त्याने चालत निघावे आणि जाता जाता समानशील सुहृदांची पावले परस्परांशी जुळावीत, हात हाती गुंफले जावेत आणि त्याला कोणत्याही पूर्वपरिचयाची अट नसावी, इतके हे सारे अकृत्रिम... निरागस! अशाच कुठल्यातरी वळणावर हात गुंफले गेले, इतकीच स्मृती. मग इतर आठवणी आहेत त्या विविध कार्यक्रमांतून असलेल्या त्यांच्या विद्युत्गती वावराच्या. चेहर्यावरील हास्य मावळू न देता सगळ्या अडचणी सहज सोडविणारे दंताळे मनात खोलवर उतरत गेले.
काही आठवणी मात्र मनात नक्कीच घर करून आहेत. त्यांच्याशी झालेली पहिली ‘व्यवस्थित’ भेट मात्र पक्की आठवते. तेव्हा मी नोकरी करीत असलेल्या वृत्तपत्रात ‘झेप’ नावाचा स्तंभ लिहीत असे. पहिल्या पिढीतील उद्योजकांचा, त्यांच्या वाटचालीचा आणि संघर्षाचा परिचय तरुणांना करून देणार्या या स्तंभातून त्यांचा परिचय करून देण्यासाठी 2003 मध्ये केव्हा तरी ही भेट झाली. त्यांच्या घरात पहिल्या मजल्यावरील स्टुडिओत झालेल्या या तीन-साडेतीन तासांच्या गप्पांमध्ये उदय दंताळे हे ‘रसायन’ मला व्यवस्थित समजून घेता आलं. 1982 मध्ये मुंबईत जाऊन टीव्ही रिपेअरिंगचा कोर्स करून आलेल्या उदय यांनी त्यानंतर 10 वर्षे हेच काम केले आणि 1994 दरम्यान ‘साईड बिझनेस’ म्हणून सुरू केलेल्या ‘साउंड सिस्टिम’च्या व्यवसायात ते असे गुरफटत गेले की आधीचा व्यवसाय त्यांना बंदच करावा लागला. साधारण सन 2000 मध्ये त्यांनी ‘स्टुडिओ’ सुरू केला. मराठवाड्यातील हा पहिला अद्ययावत स्टुडिओ. पुढे काळाप्रमाणे बदलत आपल्या व्यवसायात त्यांनी असंख्य बदल केले. नव्या तंत्रज्ञानाचा सहज स्वीकार केला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे असंख्य माणसे जोडली!
माझ्या व्यवसायिक वाटचालीत त्यांच्याशी अनेकदा संपर्क येत असे. मी केलेल्या ‘आर्य चाणक्य विद्याधाम’ या विद्यालयाच्या ‘टीव्ही जाहिराती’च्या जिंगलचे रेकॉर्डिंग त्यांच्याच स्टुडिओत झाले. मी लिहिलेल्या शब्दांना मनोज टिकारिया यांनी सुरांमध्ये गुंफले आणि त्याच विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या आवाजात ही जिंगल रेकॉर्ड झाली. 30 सेकंदांच्या जिंगलसाठी जवळजवळ अर्धा दिवस मेहनत झाली. शेवटच्या एका गद्य ‘पंचलाईन’साठी त्यांनी स्वतःचा आवाज दिला. इतर सर्व व्यवहार पूर्ण करून मी उदय यांना त्यांचे मानधन विचारले, तेव्हा त्यांच्या खास शैलीत मिश्किल हसत, हात हवेत फेकत ते उत्तरले, ‘‘सगळी आपलीच माणसं आहेत. शाळा आपलीच आहे. काम तुम्ही करताय. आपल्याच माणसांकडून काय घ्यायचे?’’ आणि खरेच, त्यांनी एकही पैसा घेतला नाही. मात्र त्यानंतर त्यांच्याकडे कामाचा प्रसंग पडला, तेव्हा आधी त्यांचे मानधन कबुल करून घेतले, ते नक्की स्वीकारणार याची खात्री करून घेतली आणि मगच काम सुरू केले...! अशा माणसाशी असेच वागायला पाहिजे, नाही का?
माझ्या एका कार्यक्रमात ऐनवेळी काही समस्या उद्भवली आणि मी व्यक्तीशः इतर नियोजनात गुंतलो, तेव्हा पुण्याहून आलेल्या वाद्यवृंदाचा आणि राज्यातील विविध भागांतून आलेल्या गायकांचा समन्वय साधण्यासाठी उदय यांंनी या सर्वांना स्वतःच्या घरी नेले. सराव करून घेतला. सर्वाच्या नाश्तापाण्याची व्यवस्थाही केली आणि आपण काहीच विशेष केले नाही, अशा अविर्भावात सर्वांना कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊनही आले!
आठवणी किती सांगायच्या? हा माणूस कधी दुर्मुखलेला दिसला नाही. इतरांना दूषणे देत स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्याच्या भानगडीत पडला नाही. एखादे आयोजन सोपवले की तिकडे पुन्हा पाहायची गरज नाही, असा विश्र्वास त्यांनी निर्माण केला होता. रुढ अर्थाने आम्ही ‘दोस्त’ नव्हतो. आम्ही कधी मिळून जेवायला गेल्याचे मला आठवत नाही की दोघांपैकी कोणीही दुसर्याला प्रचंड बिझनेस दिला, असेही झाले नाही. तरीही परस्परआदराचा स्नेहभाव आमच्या ठायी राहिला.
मृत्यू हे अटळ सत्य आहे, हे उमगल्यानंतर मन सुख-दुःखाच्या पलिकडे जाते. मागील अनेक वर्षे अनेकांना अखेरचा निरोप दिला पण डोळ्यात पाणी तरळावे असा प्रसंग अलिकडच्या काळात फक्त मागच्याच वर्षी आला. ही आंतरिक ओढ होती का? मी अंधश्रद्ध नाही, पण एप्रिलमध्ये रामनवमीला मी आयोजलेल्या ‘गीत रामायण’ या कार्यक्रमाच्या आधीच्या रात्री उदय यांनी स्वप्नात येऊन या कार्यक्रमाच्या तयारीची आस्थेवाईकपणे चौकशी केली, हे आठवून मी आजही थरारतो. हे कोणते नाते म्हणायचे? या नात्याला मी नाव देऊ शकत नाही.
सरतेशेवटी एक इच्छा मात्र मनात आहे. मृत्यूनंतरचे जग अस्तित्वात असेल तर उदय तेथे नक्की असतील. मी जेव्हा कधी तेथे पोहोचेन, तेव्हा त्यांची भेट नक्की व्हावी एवढीच इच्छा...! तिथेही ते एक ‘ठेवणीतला’ ज्योक सांगतील आणि मिश्किल हसत टाळीसाठी हात पुढे करतील...!
- दत्ता जोशी 9225 30 90 10