Thursday, November 13, 2014

स्पर्धा चीनशी नव्हे, स्वतःशीच

दैनिक देशोन्नतीच्या दिवाळी अंकात लिहिलेलं `स्पर्धा चीनशी नव्हे, स्वतःशीच` हा माझा लेख...
महासत्ता होण्यासाठी भारताला आधी चीनशी स्पर्धा करावी लागणार आहे, पण त्याही आधी स्वतःशी स्पर्धा आहे. ही स्पर्धा मानसिकतेची आहे, प्रशासनातील खाबुगीरीची आहे, निष्क्रियतेची आहे, राजकारणाला सर्वाधिक महत्व देण्याची आहे... हे कुठे तरी थांबले पाहिजे.
`नेशन फस्ट` हे ठरविणे आज गरजेचे आहे... चीनने नुकतीच 20 हजार नागरिकांना दुसरे अपत्य होऊ देण्याची परवानगी दिली... लोकसंख्येवर नियंत्रणासाठी सक्तीचे उपाय योजले... आपण असा विचार करू शकू का? नोकरशाहीला शिस्त कशी लावायची? नगरी कर्तव्ये सर्वोच्च कशी मानायची? हा खरा प्रश्न आहे... 




Thursday, October 30, 2014

कारण मोदी आणि शहा काहीही विसरत नाहीत...


खूप जणांचे खूप काही वाचल्यानंतर मला वाटले, आज काही लिहिलेच पाहिजे... मला मांडावेसे वाटत असलेले काही मुद्दे खालीलप्रमाणे -

१) मागच्या साधारण महिनाभरात शिवसेनेच्या हितचिंतकांत भरीव वाढ झाली आहे. जे आधी तावातावाने त्यांच्यावर टीका करायचे, ती मंडळी आज शिवसेनेचे वकीलपत्र घेवून तावातावाने भांडताना दिसतात. भाजप-शिवसेना यांचे संयुक्त कार्यकर्ते वेगळे झाल्यावर त्यांची परस्परांवर टीकास्त्र ठीकच, पण हे नवखे पाहुणे कुठून आले? मुळात हे हिंदुत्वाचे विरोधक. या फाटाफुटीनंतर ते अचानकच शिवसेनेच्या पाठीशी उभे राहिले? मला वाटते, शिवसेनेचा इतिहास त्याला कारणीभूत असावा... आज हिंदुत्वादी असलेली शिवसेना उदया त्यापासून नक्कीच दूर राहील, याची त्यांना खात्री असावी..!


`हटाव लुंगी बजाव पुंगी` म्हणत सक्रीय झालेली शिवसेना `वसंतसेना` कधी झाली ते कुणाला कळलेच नाही. प्रबोधनकारांचा वारसा सांगत शिवसेनेने तात्कालिक सोयीची विचारधारा स्वीकारली. जोवर मराठीचा मुद्दा चालला तोवर ती मराठी माणसांची तारणहार होती. १९८८ च्या सुमारास विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनामुळे हिंदुत्वाला बरे दिवस येऊ लागले, तेव्हा सेनेने हिंदुत्वाचा मुद्दा स्वीकारला. मुंबई-ठाणे शहरांबाहेर पडत औरंगाबादेत झेंडा रोवला. या काळात जुना जनसंघ किंवा नवा भाजप भलेही सर्वत्र उपस्थित होता, पण प्रभावी कुठेच नव्हता. शिवसेनेने मुसंडी मारत हे अस्तित्व निर्माण केले. पण ते प्रामुख्याने संघर्षात्मक पातळीवर होते. या दरम्यान भाजप अथवा संघ परिवार रचनात्मक पातळीवर विस्तारत होता.


२) राज्यात शिवसेना-भाजप युतीची सत्ता आली. त्यांच्या झेंड्याला पवारांचा दांडा होता. या साडेचार वर्षांच्या काळात दोन्ही पक्षांच्या जवळ जवळ सर्व नेत्यांनी सर्व प्रकारचा स्वार्थ साधला. सत्तेची चव त्यांनी चाखली. सत्तेची लागलेली चटक बेभान करणारी असते. १५ वर्षे त्यापासून दूर राहिल्यानंतर २०१४ मध्ये सत्तेत येण्याची स्पष्ट चिन्हे दिसू लागलानंतर सत्तेचे तूप कुणाच्या पोळीवर ओढून घ्यायचे, यात चढाओढ लागली तर नवल नव्हते. जुन्या कालपासून `मोठा भाऊ` म्हणून मिरवणाऱ्या शिवसेनेने यात आग्रही राहणे अनपेक्षित नव्हते.


पण या दीड दशकांत खूप पाणी वाहून गेलेले होते. कट्टर हिंदुत्वाचा मुद्दा बराच मागे पडलेला होता. युतीचे तीनही शिल्पकार काळाच्या पडद्याआड गेलेले होते. हिंदुत्वाचा शिवसेनेला संजीवनी देणारा मुद्दा मागील काही वर्षांत `विकासा`कडे झुकला होता. वेगवेगळ्या छोट्या छोट्या प्रश्नांमुळे त्रस्त मतदार नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी एकवटला होता. लोकसभेतील अपूर्व यश ही त्यांची एकहाती करामत होती. काही राज्यांतून १०० टक्के तर एरव्ही जेथून एकही खासदार निवडून जात नाही तेथून झालेली निवड आणि वाढलेली मतांची टक्केवारी हे सारे `मोदी लाट` असल्याचे अधोरेखित करणारे होते. हे योग्य की अयोग्य, हे मुद्दा बाजूला ठेवला तर `हे होते`, हेच सत्य होते. या कडे शिवसेनेने कानाडोळा करण्याचे ठरवले. वास्तविक मोदी लाटेमुळे शिवसेनेचे सुद्धा विक्रमी संख्येने खासदार निवडून आले. हे सत्य नाकारण्याचे शिवसेनेने ठरविले. तेच त्यांना बहुधा महागात पडणार, असे दिसते.


३) इथे २ मुद्दे मला महत्वाचे वाटतात.


अ ) राज्यात पाया मजबूत करण्यासाठी भाजपने शिवसेनेसोबत युती केलेली असली तरी `शत प्रतिशत भाजप`चा नारा त्यांनी मागील १० वर्षांपासून दिलेला होता. एक राजकीय पक्ष म्हणून आपापल्या शक्तीचा विस्तार करण्याचा हक्क प्रत्येक पक्षाला असतो. त्यातूनच शिवसेनेने मध्यंतरी गुजरात आणि उत्तर प्रदेशात भाजप विरोधात आपले उमेदवार दिलेले होते. त्यातील एकही जण निवडून आला नाही, ही बाब अलहिदा. पण प्रयत्न शिवसेनेने सुद्धा केलेला होताच...!


ब) एकदा मिळालेल्या राज्यातील सत्तेनंतर `आम्हीच मोठे भाऊ` हा शिवसेनेचा आग्रह प्रत्येक ठिकाणी चालू राहिला. भाजपने दूरदृष्टीने तात्कालिक संघर्ष टाळला. पण आपला पक्ष मजबूत करण्याचे त्यांचे प्रयत्न चालूच होते. उघड विरोध न करता शिवसेनेचा वरचष्मा मान्य करत गेल्याने शिवसेनेची अरेरावी वाढली, असे भाजप कार्यकर्त्यांचे निरीक्षण आहे. ती इतकी वाढली की जिल्हा किंवा विभागीय स्तरावर भाजपला आवाज उठविणे सुद्धा कठीण होऊ लागले. त्यामुळे `युती तोडा`चा आग्रह मागील ५-६ वर्षांपासून सुरु झाला.

४) या पार्श्वभूमीवर विचार केला तर युती संपण्याचा निर्णय आश्चर्यकारक वाटत नाही. उलट, युती टिकविण्यासाठी भाजपच्या पातळीवर बरेच प्रयत्न झाले. युती तोडण्याची घोषणा भाजपने केली तरी त्या टोकापर्यंत शिवसेनेने ताणलेले होते, हे आता स्पष्ट झाले आहे. `सुईच्या अग्रावर मावेल इतकीही जमीन देणार नाही` आणि `१५१ शिवाय बोलणार नाही` या दोन्ही भूमिकांतील आग्रही अट्टाहास मला फारसा वेगळा करता येत नाही.


५) निवडणूक झाली. जनतेने कौल दिला. बहुतेक ठिकाणी मतदाराने समतोल विचार केला आणि ते एकाच उमेदवाराच्या मागे उभे राहिले. काही जागा दोघांच्याही संघर्षात हातच्या गेल्या. पण यातून एकमेकांची खरी शक्ती परीक्षा झाली. भाजप आधीच्या तुलनेत तिप्पट मोठा झाला, तर शिवसेनेला आधीच्या दीडपट जागा मिळाल्या. दोघांच्याही आजवरच्या सर्वोत्तम कामगिरीचा विचार केला तर भाजप साधारण दुप्पट झाला तर शिवसेना साधारण होती तिथेच राहिली.


मला असे वाटते, की `एसी` केबिनमध्ये बसलेल्या सल्लागाराच्या मदतीने पक्ष उभा राहत नाही किंवा चालतही नाही. त्यासाठी समाजाची नाडी कळावी लागते. बाळासाहेबाना ती अवगत होती. उद्धव ठाकरे यांच्याकडे ती कला नाही. त्यांचे मास अपील सुद्धा त्यांच्या वडिलांच्या तुलनेत खूप कमी आहे. जे मुद्दे उद्धव यांनी मांडले, तेच बाळासाहेबांनी मांडले असते तर... जर तर च्या गोष्टी जाऊ द्या... पण निकाल वेगळे लागले असते, हे नक्की.

पण ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी प्रचाराची दिशा पकडली, ती कुठल्याच अंगाने समर्थनीय नव्हती. ती शुद्ध राजकीय आत्महत्या होती. त्यांनी टीकेसाठी निवडलेला पक्ष, त्यासाठी निवडलेले शब्द, उपमा हे सारे कुठल्याच सुसंस्कृत मनाला पटणारे नव्हते. जो संयम युती तुटल्यानंतर भाजप नेतृत्वाने दाखविला, तोच शिवसेना नेतृत्वाने दाखविला असता, तरीही त्यांना थोडाफार फायदा झाला असता. 

शेवटच्या टप्प्यात भाजप (आणि संघ) कार्यकर्ते ज्या त्वेषाने प्रचारात उतरले ते निमित्त त्यांना शिवसेनेनेच पुरविले होते...! शिवसेनेचा रोख कॉंग्रेस राष्ट्रवादी कडे असता तर शिवसेना आणि भाजप यांची मते `ताटातून वाटीत आणि वाटीतून ताटात` पडली असती... आज कॉंग्रेस राष्ट्रवादीला जे संख्याबळ मिळाले आहे, ते कदापिही मिळाले नसते...


६) मतदान संपल्यानंतर आणि निकालाआधी शिवसेनेने घेतलेली भूमिका अनाकलनीय होतीच पण निकालानंतर त्यांच्या प्रमुख सल्लागाराने केलेली टिप्पणी अपरिपक्व होती. `१२३ जागांचा विरोधी पक्ष` हे विधान त्यांना कुठून सुचले, हे तेच जाणोत. पण यातून भाजपला स्पष्ट संदेश गेला – `सुंभ जळाला तरी पीळ गेला नाही...!` त्यामुळे `युती नकोच`वाल्या गटाला आणखी भक्कम आधार मिळाला.७) महत्वाच्या चर्चेसाठी युवा नेत्याला पाठविणे, प्रचारात अश्लाघ्य भाषा वापरणे, अग्रलेखात मोदींचा `बाप` काढणे... हे सारे कुठल्याच निकषांत बसणारे नाही. या पार्श्वभूमीवर तिसऱ्या दिवसापासून सत्तेत सहभागी होण्याचा आग्रह अनैसर्गिक वाटणारा आहे.

`झाले गेले विसरून जा` म्हणायला हे लहान मुलांचे भांडण नाही. महत्वाचे म्हणजे वेगाने देशभर विस्तारत असलेल्या एका राष्ट्रीय पक्षाला इतके गृहीत धरणे चमत्कारिकच आहे. त्यातही, राष्ट्रवादीने मारलेली पाचर शिवसेनेच्या अधिकच अंगलट आली. त्याआधीच शिवसेनेने भूमिका जाहीर केली असती तर आजचा केविलवाणा बाणा झाकला गेला असता. हे टायमिंग बाळासाहेबांकडे होते...!कुणाच्या तरी आधारानेच शिवसेना वाढत आलेली आहे. या पक्षाला आपली मुलभूत मुल्ये दिसत नाहीत. सिझनल व्यापारी ज्या प्रमाणे सिझनप्रमाणे माल विकून पैसा कमावतो, तशी शिवसेनेने सत्ता कमावली. त्यांनी कार्यकर्त्यांची यंत्रणा उभारलेली नाही. शाश्वत टिकणारी सामाजिक कार्ये मोठ्या संख्येने उभी राहतील, या कडे लक्ष दिले नाही... ही उणीव भाजपने भरून काढली. तो मोठा भाऊ ठरला.


सत्तेत सहभागी होण्यासाठी भाजपचे उंबरठे झिजविल्यानंतर आता यु टर्न घेत ` शिवसेनेचा 'ताठ कणा हाच बाणा'! अशी घोषणा सुद्धा खूप विचित्र वाटते. अंबानी यांच्या रुग्णालयाच्या उद्घाटनाला न जाणे ठीक, पण शपथविधी समारंभाचे निमंत्रण नाकारणे हा आणखीच बालीशपणा आहे...


पहिल्या बालिशपणामुळे शिवसेना तुटली. दुसऱ्या बालीशपणामुळे युती तुटली. तिसऱ्या बालीशपणामुळे सत्ता दूर राहणार असे दिसते. मिळालीच तरी अश्रीतांसारखे `मिळेल त्यात समाधान` मानावे लागणार हे नक्की...

कारण मोदी आणि शहा काहीही विसरत नाहीत...


असो, महाराष्ट्राची सत्ता आणि त्यातील शिवसेनेचा सहभाग ही खूप छोटी बाब आहे. शिवसेना सहभागी झाली आणि भाजपने सहभागी करून घेतले तर शिवसेनेच्या गंगाजळीत थोडीफार वाढ होऊ शकेल. ती त्यांना आगामी काही महापालिका निवडणुकीत उपयोगाला येईल. अन्यथा मुंबई, ठाणे, औरंगाबाद महापालिकांत `एकला चलो रे`चा नारा बुलंद होईल...! त्या स्थितीत केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाला `advantage` मिळेल, हे सांगायला माझी गरज काय? 


पुढील १० वर्षांत शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची शक्ती खच्ची करण्यात भाजपला रस असेल. अशाच प्रकारे, केंद्रातील हतबल नेतृत्वामुळे सर्व राज्यांत उभ्या राहिलेल्या परदेशी पक्षांची ताकद कशी कमी होईल या कडे भाजपचे लक्ष राहील. हे प्रादेशिक पक्ष `व्यक्ती केंद्रित` असल्याने `यंत्रणा केंद्रित` असलेल्या भाजपला आज ना उद्या त्यात यश मिळेल...


सर्वांना शुभेच्छा. 

- दत्ता जोशी 

Sunday, July 13, 2014

'स्कीन सिटी`चा निर्माता... डॉ. नितीन ढेपे...

एखादा अभ्यासक्रम चांगला की कमी चांगला, हे त्या अभ्यासक्रमावरून ठरत नसते. तो पूर्ण करणारी व्यक्ती किती जिद्दीची आहे यावर अभ्यासक्रमाची उंची ठरते. `डरमिटोलॉजि`अर्थात त्वचारोग शास्त्र हा विषय साधारण २५ वर्षांपूर्वी नगण्य समजला जात असे. कुशाग्र बुद्धी, उत्तम मार्क असूनही आर्थिक अडचणीमुळे डॉ. नितीन ढेपे यांना पुण्यात बी. जे. मेडिकल कोलेजात MBBS नंतर 'चांगल्या' विषयात MD करण्याची संधी नाकारली गेली.
त्यांना अत्यंत नाईलाजाने `डरमेटोलॉजि`अर्थात त्वचारोग शास्त्र हा विषय घ्यावा लागला. निर्णयाची अख्खी रात्र त्यांनी तळमळत (आणि रडत) जागून काढली. त्या काळात `प्रतिष्ठा नसलेल्या या विषयाला मी प्रतिष्ठा मिळवून देईन`, असा संकल्प नितीन यांनी केला आणि ते कामाला लागले...!
त्वचा आणि सौंदर्यशास्त्राला किमान महाराष्ट्रात तरी डॉ. ढेपे यांनी नवे परिमाण दिले. सुरुवातीच्या काळात साधारण ५ वर्षे या माणसाने अक्षरशः महाराष्ट्र पिंजून काढला. त्वचेवर उपचार करणारी महागडी यंत्रे जीपमध्ये टाकून अनेक जिल्हा ठिकाणी `व्हिजिटिंग` पद्धतीने उपचार केले.
प्रारंभी सोलापुरात `स्कीन सिटी`चे सुरुवात केली. त्या पाठोपाठ पुण्यात जम बसविला. या विषयावरील खात्रीलायक आणि आद्ययावत उपचार करण्याची विश्वासार्हता त्यांनी प्रस्थापित केली. त्याच बरोबर सामाजिक बांधिलकीही जपली. सोलापुरातील चांगले चालणारे क्लिनिक चक्क स्वतंत्र ट्रस्ट स्थापून दान केले.
`डरमेटोलॉजि` विषयात भारतात सुरु झालेले दुसरे PG Institute दशकापूर्वी 'स्कीन सिटी'त सुरु झाले. राज्यातील हजारो रुग्णांनी त्यांच्या उपचाराचा लाभ घेतला आहे. त्वचारोग तज्ज्ञ म्हणजे केवळ `पांढऱ्या डागांचा डॉक्टर` नव्हे, तर सौंदर्यशास्त्रात सुद्धा त्यांचे महत्वाचे योगदान असते, हे डॉ. ढेपे यांनी सिद्ध केले. उस्मानाबाद सारख्या मागास जिल्ह्यातून बुद्धिमत्तेच्या बळावर पुढे येत आपले स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करणाऱ्या डॉ. नितीन यांच्याबद्दल म्हणूनच ममत्व वाटते...
http://www.skincityindia.com/

... आणि `हरी`चा `हरिभाऊ`झाला, त्याची संघर्षकथा...

हरी नरहर कुलकर्णी... 
एखाद्या मध्यमवर्गीय खात्या-पित्या घरचे नाव वाटावे, असे हे नाव. पण वस्तुस्थिती भयंकर होती... चार वर्षे आणि दोन वर्षे वयाची कच्ची-बच्ची घेवून तिशीतील एक विधवा साधारण चार-पाच वर्षे सांगलीच्या कृष्णेच्या काठी असलेल्या एका झाडाखाली कापडी धडूत्याचा आडोसा करून राहिली. मजुरी करणारा पती निधन पावला, धुणी-भांडी करून आयुष्य काढणाऱ्या एकट्या बाईला अपरात्री घरमालकाने नेसत्या कपड्यानिशी घराबाहेर काढले... कुठलाच आधार नाही... कृष्णेने आधार दिला.

त्यातील मोठा मुलगा म्हणजे हरी. संध्याकाळची धुणीभांडी केल्यावर घरात उरलेले अन्न घेवून येणाऱ्या आईच्या वाटेकडे दोघे भाऊ लक्ष लावून बसत. एखाद्या दिवशी काही मिळाले नाही तर उपास. पण पोट मोठे वाईट... काय करायचे? मध्यरात्री आगडोंब उसळायचा...

अशा वेळी हरी जवळच्या एका तिकटीपर्यंत जायचा. अनेकदा तेथे मंत्रून टाकलेला भाताचा गोळा असायचा. त्यावरील हळद-कुंकू दूर करून तो भात हे दोघे भाऊ खाउन टाकायचे...

असे दिवस पाहिलेल्या हरीभाउची आज दोन हॉटेले आहेत. एक भव्य मंगल कार्यालय उभारण्यासाठी त्यांनी जमीन विकत घेतलेली आहे. लवकरच कोकणात एक फार्म-हाउस ते सुरु करीत आहेत... अतिशय खडतर म्हणता येईल, असा हा प्रवास...!

याची सुरुवात झाली एका घरातील घरकामाने. दोनवेळ जेवण या पगारावर हरिभाऊनी वयाच्या १५व्या वर्षापर्यंत नोकरी केली. मग एका चहाच्या टपरीवर पोऱ्या म्हणून काम केले. त्याची मेहनत पाहून सांगलीच्या जिल्हा कोर्टातील कॅन्टीन चालविण्याची संधी बार असोसिएशनने त्यांना दिली. ते करताना बिरनाळे यांच्या कोलेजच्या मेसची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. प्रचंड मेहनतीने हे सांभाळत त्यांनी चार पैसे जोडले आणि काही काळात सांगलीच्या विश्रामबाग भागात एका उडपी व्यक्तीचे `हनुमान डोसा` नावाने प्रसिद्ध हॉटेल त्यांनी विकत घेतले. दोन वर्षांनी त्याच भागात आणखी एक हॉटेल त्यांनी मिळविले. हे दोन्ही व्यवसाय उत्तम चालविले.

सांगलीच्या जवळच त्यांनी ३ एकर जमीन विकत घेतली. तेथे त्यांना भव्य मंगल कार्यालय उभे करायचे आहे. कोकणात एक फार्म हाउस या वर्षी सुरु होईल... एकेकाळी अन्नान्न दशा असणारी ही व्यक्ती आज हॉटेल आणि मेस मिळून दररोज किमान ३ हजार जणांना जेवू घालते... कठोर मेहनत आणि शुद्ध नियत हे यांचे बलस्थान.

पहाटे ४ ला सुरु झालेला हरिभाऊ यांचा दिवस रात्री १२ ला संपतो. कृष्णेकाठी लागलेली थंड पाण्याच्या अंघोळीची सवय आजही कायम आहे. दिवाळीतही अंघोळ थंड पाण्यानेच...! आजपर्यंत या माणसाने एकही चित्रपट पाहिलेला नाही, मद्याची चवही चाखलेली नाही... काम, काम आणि फक्त काम हीच त्रिसूत्री घेवून पुढे जात असलेल्या हरिभाऊला इंग्रजीचा गंध नाहीच पण आपली सही, नाव वगळता मराठीतूनही नीटसे लिहिता येत नाही. वाचायला ते त्यांच्या मुलाबरोबर शिकले... पण त्यांना वाचण्यापेक्षा घडवणे जमले, हे महत्वाचे....

Monday, July 7, 2014

दोन्ही पायांनी अपंग असलेला `आघाडीचा ट्रान्सपोर्टर`




वयाच्या २४ व्या वर्षी झालेल्या एका अपघातात कमरेखालील शरीर निर्जीव झाल्यानंतर हा माणूस जिद्दीने आयुष्यात `उभा` राहिला. लातूरच्या `तिरुपती ट्रान्सपोर्ट`चे दयानंद पेद्दे हे त्यांचे नाव.

लातूरमध्ये या परिवाराने transportचा छोटा व्यवसाय सुरु केला होता. शेतीतील नापिकी आणि व्यवसायातील कमी गती या मुळे कुटुंब डबघाईला आलेले होते. अशा स्थितीत दयानंद यांनी सर्वांना धीर दिला. १९८८ मध्ये छोटा व्यवसाय सुरु झाला आणि १९९० मध्ये हा अपघात... साऱ्यांचा धीर खचला. पण दयानंद जिद्दी होते.

त्यांनी अपघातानंतर ३-४ महिन्यात स्वतःला सावरले आणि सारे जन नव्याने कामाला लागले. कार्यालयीन नियोजन आणि संपर्काची आघाडी दयानंद यांनी स्वीकारली. पाहता पाहता दिवस पालटले.

अपघातानंतर १२ वर्षांनी दयानंद प्रथम प्रवासासाठी बाहेर पडले. तिरुपतीच्या प्रवासात त्यांनी रस्त्यांची बदललेली स्थिती आणि वाहतुकीची अत्याधुनिक साधने पहिली आणि तेथून परतल्यानंतर आधी मल्टी एक्सल ट्रक खरेदी केला. ही २००२ ची गोष्ट. बदलत्या काळाचा वेध घेत त्यानंतर दयानंद यांनी मोठी झेप घेतली. आज त्यांच्याकडे ट्रेलर, १२ चाकी आणि १० चाकी मल्टी एक्सल ट्रकचा ७५ वाहनांचा ताफा आहे. अनेक सिमेंट कंपन्यांची डेपो पुरवठ्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.

दयानंद आणि त्यांचे ४ भाऊ मिळून हा सारा पसारा सांभाळत आहेत. नेतृत्वाची धुरा दयानंद यांच्याकडे आहे...!

क्षुल्लक गोष्टीना महत्व देत हातपाय गाळून बसणाऱ्या आणि छोट्या संकटाना घाबरणाऱ्या तरुणांसाठी दयानंद हे आदर्श ठरावेत...!

Saturday, July 5, 2014

रंगविश्वात रंगलेले `तुलसी पेंट्स` चे कैलास राठी...

रंगांच्या दुनियेत हरपायला लावणाऱ्या असंख्य जाहिराती आपण टीव्हीवर पाहतो. बड्या बड्या नटांना घेवून अनेक बड्या कंपन्या आपल्या मालाचे मार्केटिंग करतात. रंगसंगती- टेक्स्चर पेंट आपल्याला मोहून टाकतात. पण त्याच वेळी याचे दुसरे रूप चक्रावून टाकते.
एका सुप्रसिद्ध कंपनीची `टेक्स्चर पेंट`ची उत्पादने बाजारात येण्याच्या काही वर्षे आधी नांदेडच्या `तुलसी पेंट`ने हे संशोधन बाजारपेठेत आणलेले होते आणि त्यांना त्यासाठी केंद्र सरकारचा उद्योजकता पुरस्कार सुद्धा मिळाला होता...! देशव्यापी टीव्ही जाहिरातांसाठी करोडोंचे बजेट नसल्याने कैलास राठी यांना नाईलाजाने backfoot वर राहावे लागले. तिकडे, सैफ आली खानला घेवून दुसर्या रंग निर्मिती कंपनीने बाजारपेठेत बाजी मारली...! 
कैलास राठी मुळचे नांदेड जिल्ह्यातील हद्गावचे. औरंगाबादच्या GECA मधून ते mechanical इंजीनियर झाले. आपल्याला नोकरी करायची नाही, नंदेद्मध्येच स्वतःचा उद्योग उभा करायचा आहे, या जिद्दीने ते बालपणापासून प्रेरित होते. वेगळे वेगळे पर्याय शोधात १९९८ मध्ये `तुलसी पेंट` चा शुभारंभ केला. सिमेंट पेंट आणि pocket distemper पासून झालेली सुरुवात डेकोरेटीव आणि स्पेशल इफेक्ट पेंट पर्यंत पोहचली. टाईल्स, वालपेपर आणि सनमायका यांना पर्याय ठरणाऱ्या `roystar italian paints` ची निर्मिती त्यांनी २००५ मध्येच केली. त्यासाठी पुरस्कार मिळाला. पण पुढे एशियन पेंट ने याच प्रकारात आक्रमक मार्केटिंग करून बाजारपेठ काबीज केली.
उन्हाळ्यात छताला विशिष्ट रंगाचा थर देऊन घराचे तापमान नियंत्रित करणारे खास उत्पादनही त्यांनी मागेच बाजारपेठेत आणलेले आहे. ग्रामीण भागात सुद्धा बुद्धिमत्ता असते हे सिद्ध करणारा आणि आर्थिक क्षमतेअभावी जाहिराती न झाल्याने उत्तम उत्पादन मागे राहते हे सांगणारा राठी यांचा हा प्रवास...
सध्या `तुलसी पेंट`ची उत्पादने नांदेडच्या ३०० किमी च्या परिघात पोहचतात. ती भविष्यात राज्यभर आणि देशभर जातील असा विश्वास आहे...

Thursday, July 3, 2014

प्रोटीनयुक्त पशुखाद्याचा देशातील पहिला प्लांट जालन्यात आशिष मंत्री यांचा!


मुंबईतील 'आयसीटी' (जुने नाव युडीसीटी) ही एक नामवंत संस्था. इथे प्रवेश मिळणे ही कसोटीची बाब. इथून बाहेर पडणारा केमिकल इंजिनियर काही तरी वेगळे करण्याची उमेद बाळगणारा... जालना येथील आशिष मंत्री त्यापैकीच एक. 
'तुम्ही १० लाखात एक आहात, त्यामुळे १० लाखांची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे', हे आपल्या सरांचे आवाहन आशिष यांनी मनावर घेतले. बालपणापासूनच मनावर झालेले उद्योगाचे संस्कार केमिकल इंजिनियर झाल्यावर प्रत्यक्षात उतरू लागले. सरकीपासून तेल काढण्याची प्रक्रिया जुनीच आहे. पण त्यातूनच उच्च दर्जाचे प्रोटीनयुक्त पशुखाद्य निर्माण करण्याचा प्लांट टाकायचे त्यांनी ठरविले.
हे तंत्रज्ञान भारतात तेव्हा उपलब्ध नव्हते. अमेरिका-जर्मनी ते देण्यास तयार नव्हते. भारतात १९८८ मध्ये असा झालेला प्रयोग अयशस्वी झालेला. यातील केमिकल रीअक्शन इतक्या गुंतागुंतीच्या आणि अत्युच्च तापमानाच्या असतात की स्फोट झाला तर परिसर बेचिराख होण्याची भीती...!
२५ कोटींचा हा प्रकल्प २००८ मध्ये उभा राहू लागला आणि त्यासाठी लागणारी यंत्र सामग्री अमेरिका, जर्मनी, चीन आणि थायलंड मधून आली. २००९ मध्ये 'अभय कोटेक्स' कार्यान्वित झाले. हा देशातील अशा तंत्रज्ञानाचा पहिला प्लांट ठरला. या प्रकल्पाद्वारे त्यांनी ३ प्रोसेस पेटंट आणि १ प्रोडक्ट पेटंट मिळविले आहे.
भारताची सर्की उत्पादनातील क्षमता पहिली, तर त्याच्यावर या पद्धतीने १०० टक्के प्रक्रिया झाली तर आपण १० हजार कोटींचे परकीय चलन वाचवू शकू, असा आशिष यांचा अंदाज आहे. त्यामुळे असेच प्लांट त्यांनी धुळे आणि यवतमाळ येथे उभारले आहेत.
बुद्धिमत्ता, जिद्द, मेहनत आणि प्रतिकूलतेवर मात करून आशिष मंत्री यांनी जालना येथे उभारलेले हे साम्राज्य नक्कीच आशादाई आहे...

दीपक संघवी - आठ वर्षांत ८ कोटीवरून २७५ कोटी!


लोणचे-मसाल्याचा एखादा उद्योग साधारण ७ ते ८ वर्षांत किती पटीने वाढावा ? दुप्पट, तिप्पट, चौपट.. दहा पट...? Nilons या ब्रांडनेम ने बाजारपेठेत असलेला उद्योग ३४ पटींनी वाढला! आठ-सव्वाआठ कोटींची असलेली उलाढाल या काळात थेट २७५ कोटींवर पोहचली. हा उद्योग जळगावचा आणि याचे नेतृत्व करीत आहेत दीपक संघवी...!
वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे वयाच्या २३ व्या वर्षी उद्योगाची धुरा खांद्यावर येऊन पडल्यानंतर त्यांनी नेटाने पसारा सावरला. मुळात १९४० मध्ये सुरु झालेला हा उद्योग खूप हळू हळू वाढत होता. साधारण ६०-६१ वर्षांच्या प्रवासात, २००१ पर्यंत तो सव्वा आठ कोटींच्या उलाढालीवर पोहचला. 
दीपक संघवी यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर धोरणात्मक बदल केले. बहुराष्ट्रीय कंपनीतील अनुभव असलेल्या राजीव अगरवाल यांची त्यांना साथ मिळाली. दोघांनी आपापले फोकस ठरवून घेतले. २०१३-१४ या आर्थिक वर्षाच्या शेवटी ही उलाढाल २७५ कोटींच्या पुढे गेली...! त्यांच्या धोरणातील पहिले सूत्र होते `Nilons चे हित.
हा brand आज देशभर जातो. 'भारत की आखिरी दुकान` अशी पाटी असलेल्या हिमालयातील दुकानापासून कन्याकुमारीपर्यंत आणि पूर्वांचलातील अखेरच्या टोकापासून गुजरातेतील दुसर्या टोकापर्यंत Nilons ची उत्पादने उपलब्ध आहेत. त्यांनी वितरणाची सारी व्यवस्था बदलून टाकली. आपली उत्पादने प्राधान्याने विकली जावीत या साठी मार्केट रिसर्च केलाच पण कोणती नवी उत्पादने बाजारपेठेत चालू शकतील हे शोधण्यासाठी असंख्य प्रकारे आदमास
 घेतला...! 
हा प्रवास विस्ताराने आणि तपशीलाने समजून घ्यायचा तर 'जळगाव आयकॉन्स' वाचायला हवे...!
http://www.nilons.com/

Wednesday, July 2, 2014

अचूक वजनाची खात्री - फिनिक्स !


राजेश भतवाल (धुळे आयकॉन्स)
-----------------------------------
`फिनिक्स` या ब्रांडचे इलेक्ट्रोनिक वजनकाटे आज देशभरातील बहुसंख्य दुकानांतून दिसतात. ही निर्मिती करणारे राजेश भतवाल धुळे येथील रहिवासी. ज्वेलर्स कडे लागणारे `मिलीग्राम` ते `ट्रक`साठी लागणारे १०० टन क्षमतेचे इलेक्ट्रोनिक वजनकाटे ते बनवतात...
इलेक्ट्रोनिक्स इंजिनियरिंग पूर्ण केलेल्या राजेश यांनी जिद्दीने व्यवसायातच उतरण्याचे ठरविले. इंजिनियरिंगच्या शेवटच्या दीड वर्षात त्यांनी अभ्यासाबरोबरच या उत्पादनाचा 'मार्केट रिसर्च' केला. `त्या` काळात इन्टरनेट नव्हते. परदेशातून तंत्रज्ञान शिकण्यासाठी ते विविध देशांच्या वकीलातींमध्ये अनेक तास बसले... तेथील `यलो पेजेस` शोधून विविध देशांशी संपर्क साधला.
उद्योगात उतरल्यावर स्वतः मार्केटिंगसाठी उतरले. एका टप्प्यावर व्यवसाय विस्ताराचा गियर त्यांनी बदलला आणि साधारण २ वर्षांच्या मेहनतीत ते धुळे जिल्ह्यातून देशभर पोहचले. आता त्यांचे उत्पादन सिल्वासा आणि पंतनगर येथून होते, पण कंपनीचे मुख्यालय धुळ्यात आहे...!
(अधिक माहितीसाठी http://nitiraj.net/)

समग्र परिवर्तनाचा अग्रदूत...




डॉ. शरद गडाख (नगर आयकॉन्स)
-----------------------------------
नगर जिल्ह्यात असलेल्या सोनई तालुक्यातील ब्राह्मणी येथे वास्तव्यास असलेल्या डॉ. शरद गडाख यांच्याबद्दल बोलताना नेमके शब्द आठवत नाहीत. हे गृहस्थ राहुरीच्या कृषी विद्यापीठात ज्वारी विभागात `चीफ ब्रीडर` आहेत. विविध १३ नव्या वाणांचे संशोधन यांनी केले आहे. कमी पाण्यावर चांगली उत्पन्न देणारी ज्वारीची `फुले माउली` ही जात हे त्यांचे वैशिष्टपूर्ण वाण...!
पण एवढ्यावर त्यांची ओळख संपत नाही. ब्राह्मणी येथे कार्यरत असलेल्या `माउली दूध`चे ते संचालक आहेत. एकेकाळी हा प्रकल्प उभारण्यासाठी प्राथमिक रक्कम म्हणून १ लाख रुपये उभे करण्यास डॉ. गडाख आणि त्यांच्या ९ सहकार्यांना १ वर्ष लागले होते. अत्यंत जिद्दीने उभ्या राहिलेल्या या प्रकल्पाबरोबर त्यांनी या परिसरातील किमान १२०० शेतकरी कुटुंबांत परिवर्तन घडवून आणलेले आहे. विशेष म्हणजे, या संचालकांपैकी कुणाचीही पुढची पिढी या उद्योगात कार्यरत नाही! त्यांचे आपापले वेगळे व्यवसाय आहेत. नातेसंबंधातून प्रकल्पाचे होणारे वाटोळे त्यांना मान्य नाही...!
एकेकाळी खोपटात राहणारा, सामान्य शेतकऱ्याचा हा मुलगा... हिमतीने शेतीत प्रयोग केले... विद्यापीठात रुजू झाल्यावर तेथे उत्पन्न वाढविणारे प्रकल्प राबविले... आपल्या गावातील किमान ३० तरुणांना त्यांनी व्यवसाय उघडून दिले, त्यांच्यावर लक्ष ठेवले. जिथे बँकेचे कर्ज हवे, तेथे स्वतः हमीदार झाले...
अपार इच्छाशक्ती, उत्तम संघटन कौशल्य, दूरदृष्टी, मार्केटिंगमध्ये केलेले अभिनव प्रयोग आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकरी-ग्राहक-विक्रेते या सर्वांशी असलेले पारदर्शी व्यवहार हे या यशामागील गमक...
स्वतः उभे राहताना असंख्य लोकांना त्याचा लाभ मिळवून देणारे शरद गडाख यांच्यासारखे लोक म्हणूनच `पोलादी माणसे` म्हणून गौरविता येतात...!
( ता. क. - ‘त्या` गडाख यांच्याशी यांचा खूप दुरून संबंध आहे. त्यांच्या स्थानाचा कसलाही लाभ यांनी कधीही घेतलेला नाही...)

Tuesday, July 1, 2014

सव्यसाचि प्राचार्य - रामदास डांगे

प्राचार्य रामदास डांगे हे परभणीच्या शैक्षणिक आणि आध्यात्मिक इतिहासातील अपरिहार्य नाव. शिवाजी महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची जबाबदारी सांभाळणे असो की साहित्य संस्कृती मंडळाचे मराठी शब्दकोश प्रकल्पाचे प्रमुखपद असो... प्रत्येक जबाबदारी त्यांनी निष्ठेने सांभाळली. श्री ज्ञानेश्वरी मूलपाठ दीपिकेचे त्यांनी केलेले काम सुद्धा अलौकिक म्हणावे लागेल. प्रत्येक जबाबदारी निष्ठेने पार पाडणार्‍या प्राचार्य डांगे यांच्या सव्यसाचित्त्वाबद्दलच्या या आठवणी... आज १ जुलै रोजी पहाटे ते कालवश झाले...
 -------------------------------------------------------
तेया सर्वात्मका ईश्वरा। स्वकर्म कुसुमांची वीरा ।
पूजा केली होये अपारा । तोषालागि॥
‘‘तुम्ही करत असलेले काम हे ईश्वराचे काम आहे, भगवंताचे काम आहे... त्याची पूजा करायची तर ती स्वकर्माने करा... भगवंताला इतर कोणत्याही अवडंबराची गरज नाही...’’, ज्ञानेश्वरीचा दाखला देत डांगे सर सांगत असत.
समोर येईल ते प्रामाणिकपणे, सातत्याने, निष्ठापूर्वक करत जावे...’ , असे सांगताना ते आपले स्वतःचे आयुष्यच त्याच्या उदाहरणादाखल सादर करत..! प्राचार्य रामदास खुशालराव डांगे हे नाव म्हणजे परभणीच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आध्यात्मिक इतिहासातील एक अविभाज्य घटक. एक व्यक्ती किती प्रकारे, किती क्षेत्रांत आपले योगदान देऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे डांगे सर.
डांगे सर सन २००७ पासून पुणे मुक्कामी असत. मराठी शब्दकोश निर्मितीचे अनेक वर्षांपासून रेंगाळलेले काम त्यांनी सन 2007 ते २०१४ या काळात पूर्ण केले.  निवृत्तीनंतर केवळ उपजीविकेपुरते मानधन घेऊन पूर्ण समर्पित भावनेने या कामासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे. सन 1970 मध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेले काम रेंगाळले. मागची 20 वर्षे हे काम सांभाळण्यासाठी कोणीही तयार नव्हते. मधु मंगेश कर्णिक यांनी पाठपुरावा केला आणि सन 2007 मध्ये डांगे सरांनी हे काम हाती घेतले. मराठी सारस्वताच्या प्रांगणातील एक महत्त्वाचे योगदान या निमित्ताने डांगे सरांनी दिले. त्यांच्या आजवरच्या वाटचालीत अशा अनेक नोंदी आहेत. त्यामुळेच त्यांच्याबद्दल सर्वांच्या मनात अपार आदरभाव आहे.
डांगे सर ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व. ऋषीचं कूळ विचारू नये, असे म्हणतात. पण सरांसारख्या ऋषीचं कूळ-मूळ ठाऊक असण्याने त्यांच्या तपश्‍चर्येचे महत्त्व अधोरेखित होते. सरांचे सारे आयुष्य परभणीत गेलेले असले, तरी ते मूळचे परभणीचे नाहीत. विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील भालसी हे त्यांचे जन्मगाव. 12 जून 1936 हा त्यांचा कागदोपत्री जन्मदिनांक. खुशालराव आणि बिंदूबाई यांच्या परिवारातील 10 अपत्यांपैकी सर सर्वात धाकटे. त्यांचे वडील वारकरी. त्यामुळे घरात आध्यात्मिक परंपरा जुनीच. घरची परिस्थिती शिक्षणासाठी अतिशय प्रतिकूल. अशा परिस्थितीत त्यांच्यातील हुशारी जोखून मॅट्रिकपर्यंत नेणारे अमरावतीचे लेले मास्तर त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती ठरले. लेले मास्तरांनी सरांना शिकविले, अन्न-वस्त्राची सोय केली आणि फी सुद्धा भरली...! डांगे सर सांगतात, ‘लेले मास्तरांमुळे माझ्या आयुष्याचे सोने झाले.
सर्व प्रतिकूलतेतून मार्ग काढत ते इंटरपर्यंत पोहोचले. तेव्हा त्यांचा अभ्यासविषय गणित होता. त्यानंतर त्यांनी विषय बदलला. अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयातून ते 1958 मध्ये बी.ए. आणि 1960 मध्ये एम.ए. झाले. मराठी घेऊन पूर्ण केलेल्या या दोन्ही अभ्यासक्रमांत त्यांनी विद्यापीठात प्रथम येत सुवर्णपदके पटकावली. त्या वेळच्या रुढींप्रमाणे बी.ए. करतानाच 1957 मध्ये ते विजयाबाईंशी विवाहबद्ध झाले. त्यांचे लग्न जलीलभाई नावाच्या एका मुस्लिम गृहस्थाने जुळविले. विजयाबाई मूळच्या अकोल्याजवळील टाकळीच्या.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उपजीविकेसाठी नोकरीची गरज होती. अमरावतीच्या शिवाजी महाविद्यालयात त्यांना शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांनी प्राध्यापकाची नोकरी दिली. 1960 ते 1961 या शैक्षणिक वर्षांदरम्यान ते या महाविद्यालयात कार्यरत होते. जून 1961 मध्ये त्यांच्यासमोर वेगळा पर्याय आला. शिशुपालवधया विषयावरील पहिले जुने हस्तलिखित मिळवून त्यावर डॉ. मा. गो. देशमुख अमरावतीत काम करीत होते. त्यांची बदली औरंगाबादला झाली. त्यांच्या भेटीसाठी डांगे सर औरंगाबादेत आले. ज्येष्ठ साहित्यिक ग.त्र्यं. माडखोलकर यांचे चिरंजीव तेव्हा औरंगाबादेत नोकरीत असल्याने ते सुद्धा तेथे आलेले होते. तेव्हा देवगिरी महाविद्यालयाच्या संस्थेचे अध्यक्षपद विनायकराव पाटील यांच्याकडे होते. ते माडखोलकरांचे स्नेही. त्यातून डांगे सरांसमोर औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू होण्याचा प्रस्ताव आला. तो त्यांनी स्वीकारला आणि 15 जून 61 रोजी ते देवगिरीत रुजू झाले. दोन वर्षे देवगिरी महाविद्यालयात काम केल्यानंतर 15 जून 1963 रोजी त्यांना प्रोफेसरपदी बढतीही मिळाली. पण 15 दिवसांतच त्यांच्यासमोर परभणीत शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून रुजू होण्याची ऑफर ठेवण्यात आली. त्या काळातही औरंगाबाद सोडून परभणीत येण्याचा विचार धाडसीच होता. पण ते धाडस डांगे सरांनी केले आणि ते 1 जुलै 1963 रोजी शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून परभणीत दाखल झाले. तेथे ते 12 वर्षे प्राचार्य होते. जनाबाई महाविद्यालयाचे 11 वर्षे आणि महिला महाविद्यालयाचे 10 वर्षे अशी तब्बल 33 वर्षे त्यांनी प्राचार्यपदांची जबाबदारी सांभाळली...! या काळात अनेक पिढ्या त्यांच्या हाताखाली घडल्या.
प्राचार्यपदाची जबाबदारी सांभाळताना सुद्धा त्यांच्यातील सामाजिक भान असणारा माणूस गप्प बसलेला नव्हता. प्राचार्यपदावर असतानाच सामाजिक कारणांसाठी ते तीन वेळा तुरुंगात गेले. पहिला प्रसंग 1972 मध्ये परभणीत कृषिविद्यापीठ स्थापन होण्याच्या मागणीचा. त्या साठी तेव्हा पुकारलेल्या आंदोलनात त्यांना अटक करण्यात आलेली होती. त्यानंतर, 1975 च्या दरम्यान आणीबाणीच्या काळात जयप्रकाश नारायण यांनी पुकारलेल्या आंदोलनात ते सहभागी झाले होते. बराच काळ ते भूमिगत होते. 1992 मध्ये देशभर पेटलेल्या राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनात सुद्धा ते सहभागी झाले होते. त्या काळातही त्यांना काही काळ तुरुंगात टाकण्यात आले होते. त्यांची वैयक्तिक मते त्यांनी प्रत्येक वेळी स्पष्टपणे मांडली असली, तरी परभणीतील अनेक मोठ्या मोठ्या लोकांच्या व्याख्यानांच्या - कार्यक्रमांचे अध्यक्षस्थान भूषविण्याची विनंती विविध विचारधारांच्या संयोजकांनी डांगे सरांनाच केलेली होती. वैयक्तिक मते आणि सामाजिक आचरण यांचा समतोल त्यांनी नेहेमीच साधला. 
जून 1996 मध्ये सर निवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर बहुतेक जण सुखाचे आयुष्य जगण्यासाठी घर बांधतात, एखाद्या ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य होतात आणि शिळोप्याच्या गप्पा मारण्यात वेळ घालवतात, हे सार्वत्रिक चित्र. पण डांगे सरांच्या बाबतीत नेमके उलट घडले. नोकरीच्या काळात वेळेअभावी, त्या त्या कामांना पुरेसा वेळ देता येत नसल्यामुळे जी कामे शक्य झाली नाहीत, ती त्यांनी सेवानिवृत्तीच्या नंतर हाती घेतली...! त्यातील पहिले काम होते ज्ञानेश्वरीच्या मूळपाठांचे संशोधन.
संत ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी सांगितली. ती त्यांच्या सच्चिदानंदबाबा या शिष्याने लिहून काढली. त्यानंतरच्या शेकडो वर्षांच्या प्रवासात या ज्ञानेश्वरीच्या असंख्य प्रती लिहिल्या गेल्या. त्यातून लिहिणार्‍याच्या योग्यतेप्रमाणे त्यात असंख्य पाठभेद निर्माण झाले. त्यावर संशोधन करून मूळ ज्ञानेश्वरी सिद्ध करण्याचे आव्हान उचलण्याचे डांगे सरांनी निवृत्तीनंतर ठरविले आणि 1996 ते 2007 या काळात एकट्याने मेहनत करून श्री ज्ञानदेवी मूलपाठ दीपिकालिहून काढली...! हे काम सोपे नव्हते.
वास्तविक हे काम 1962 मध्येच अनौपचारिकरित्या त्यांनी सुरू केले होते. मामासाहेब दांडेकर औरंगाबादेत आले होते तेव्हा त्यांच्याशी झालेल्या चर्चेत या विषयाचे सूतोवाच झालेले होते. तेव्हापासूनच हा विषय सरांच्या मनात घोळत होता. खरे तर त्या आधीही डांगे सरांनी या विषयावर लिहिले होते. 1958 मध्ये बी.ए. करत असतानाच त्यांनी ज्ञानेश्वरीच्या तिसर्‍या अध्यायावर एक टिपण प्रसिद्ध केले. त्यावर प्रा. भाऊ मांडवकर यांनी तेव्हा यवतमाळहून प्रकाशित होणार्‍या लोकमतमध्ये परीक्षण लिहिले होते. ज्ञानेश्वरीतील पाठभेदावरील विचार तेव्हापासून मनात कायम होता. त्यातही, वारकरी संप्रदायाची घरातील परंपरा त्यांना या विषयाकडे पुनःपुन्हा ओढून नेत होती.
ते सांगतात, ‘‘नक्कल उतरवताना लेखक चुका करतो. राम-रमा-रमी... साधारण एकसारखे वाटणारे शब्द... लेखक अशा चुका करू शकतात. त्यातून पाठभेद निर्माण होतात. हे दूर करण्यासाठी काय करायचे? सर्व भागांत प्रवास करून मी 40 प्रती निवडल्या. त्यांचा अभ्यास सुरू केला.’’
प्रती मिळविण्याचे हे काम खूप महत्त्वाचे होते, तसेच जबाबदारीचेही. अभ्यासासाठी नेमकी कोणती प्रत मिळवायची, याचे आडाखे महत्त्वाचे होते. त्या दृष्टीने विचार करून तशी पार्श्‍वभूमी असलेली हस्तलिखिते त्यांनी मिळविली. त्यांचा अभ्यास सुरू केला. 1996 मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी या विषयात पूर्णांशाने लक्ष घातले. ते सांगतात, ‘‘ज्ञानेश्वरी हा श्रेष्ठ ग्रंथ आहे. तो शुद्ध असलाच पाहिजे. या आधीही यामध्ये शुद्धीचे प्रयोग झाले, पण मूळ प्रतीच निवडताना त्या सदोष निवडल्या गेल्या. त्यामुळे प्रमाण प्रत समोर आली नाही. 1907 मध्ये मुंबईत माडगावकरांनी प्रसिद्ध केलेली प्रत महत्त्वाची होती. प्रा. हर्षे, प्रा. बनहट्टी यांनी केलेले काम अपूर्ण राहिले. पण ते चांगले काम होते. मीही काही हस्तलिखिते मिळविली. या पोथ्यांसाठी मी दोन वर्षे भारतभर प्रवास केला. एक प्रत तर मला अंदमानातून मिळाली!’’
हे काम सुरू केले, त्या आधी त्यांची पांडुरंगशास्त्री आठवले यांच्याशी भेट झाली. पांडुरंगशास्त्री म्हणाले, ‘‘या कामासाठी कुणाचे अनुदान घेऊ नकोस. ही माउलींची सेवा आहे.’’ आणि ते खरेच होते. डांगे सरांच्या मनातही हाच भाव होता. कारण, या कामी सरकारी अनुदानासाठी प्रयत्न केला असता, तर कदाचित 8-10 लाखाचे अनुदान पदरात पडले असते. एखादा सहाय्यकही मिळाला असता. पण डांगे सर त्या मोहात पडले नाहीत. चार माणसांचे हे काम त्यांनी एकट्यांनीच पुढे रेटले. कसे असते हे नेमके काम? चार जणांनी एकत्र बसून आपापल्याकडील मूळ प्रतींचे वाचन करायचे. त्यातील शब्दांची रचना शोधायची. त्यातून योग्य पाठ निवडायचा...! ज्ञानेश्वरीतील प्रत्येक अक्षर अशा पद्धतीने वाचायचे...!
डांगे सरांनी हे काम एकट्याने केले. ज्ञानेश्वरीत 9 हजार ओव्या आहेत. प्रत्येक ओवीत 10 शब्द. असे 90 हजार शब्द, त्यांची अक्षरे... अशी साडेतीन लाख अक्षरे... ती सुद्धा 40 पोथ्यांतून तुलना करून घ्यायची... हे काम खूप मोठे आणि कठीण होते. या कृतीला टेक्सच्युअल क्रिटिसिझमम्हणतात. मराठीत त्याला पाठचिकित्साम्हणता येते. पाठचिकित्सेमध्ये संहितानिश्‍चितीकिंवा संहितेचे मूलस्थापनअभिप्रेत असते. उपलब्ध प्रतींच्या आधाराने ग्रंथाच्या मूलरूपाचा शोध घेणे, संहितेची यथामूल पुनःस्थापना करणे हे अशा अभ्यासाचे उद्दिष्ट होय.’ 
प्रतिशुद्ध प्रतीचा इतिहास संत एकनाथांपासून सुरू होतो, असे सांगताना डांगे सर नाथांच्याच काही ओळी समोर ठेवतात -
श्रीशके पंधाराशे साहोत्तरी। तारण नाम संहोत्सरी। 
एका जनार्दनें अत्यादरी। गीताज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली॥
ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध। परि पाठांतरि शुद्धाबद्ध।
तो शोधुनियां एवंविध। प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी॥
या परंपरेत अनेक मान्यवरांनी हे काम केलेले आहे. डांगे सरांनी अलिकडच्या काळात केलेले हे काम त्यामुळेच महत्त्वाचे ठरते. आपली इतर सर्व कामे बंद ठेवून सरांनी 1996 ते 2003 या काळात हे काम पूर्ण केले. या द्विखंडात्मक ग्रंथाचा पहिला खंड पुण्याच्या श्री वामनराज प्रकाशनाने 23 मार्च 2003 रोजी प्रकाशित केला. दुसरा खंड प्रकाशित होण्यास मात्र बराच वेळ गेला. त्याचा अभ्यास 2007 मध्येच पूर्ण झाला, पण अशा ग्रंथांना आर्थिक दृष्टीने मांडलेली गणिते सोडविणे जमत नसते... अखेर डायमंड पब्लिकेशन्स यांनी 16 मार्च 2010 रोजी दुसरा खंड प्रकाशित केला. या दोन खंडांतून डांगे सरांनी आपल्या अभ्यासकौशल्याला पणाला लावून केलेले एकहाती काम अभ्यासकांसमोर आले.
या कामाबद्दलची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतात. डॉ. तुकाराम गरूड, डॉ. अरुण प्रभुणे सांगतात,  ‘‘सरांनी समीक्षित संहितापद्धतीची रूढ चाकोरी सोडून स्वतःची अशी एक व्यवहार्य रीत शोधली व वापरली. पाठभेदाचे अथवा संहिता चिकित्सेचे कार्य पारंपरिक पद्धतीत कागदावर रकाने पाडून व त्या प्रत्येक रकान्यामध्ये चरणातील एक एक अक्षर नोंदवून; ते प्रत्येक अक्षर तपासत जाणे, हे काम आजवर चालत आले आहे. डांगे सरांनी ही पद्धत स्वीकारली नाही. आधारप्रत पाहिजे, असा आग्रह न धरता त्यांनी एका मुद्रित प्रतीत पाठभेद नोंदविण्याचे काम केले. हस्तलिखितांचे दोन गट करून त्यातही पाठभेद त्या प्रतींत नोंदविले. मुद्रित प्रतींचा एक आणि हस्तलिखित प्रतींचे दोन असे तीन संच करून तर्कशुद्ध पाठसंहितभागी लिहून त्या खाली इतर प्रतीतील पाठांची नोंद केली. सरांचा हा नवा प्रयोग व्याप व पसारा कमी करणारा ठरलाच, शिवाय पूर्वीच्या पाठचिकित्सेत होणार्‍या चुका या पद्धतीत संपुष्टात आल्या. पाठचिकित्सा करण्यामागे सरांची भूमिका स्वच्छ दिसते. उगाच गरळ ओकण्यापेक्षा व कोणाची निंदानालस्ती करून संशोधनात कसा गोंधळ चालला आहे हे दाखविण्यापेक्षा विद्वानांच्या अभ्यासपूर्ण मतांचा परामर्श घेणे हा त्यांचा स्वच्छ हेतू दिसतो.’’ 
ही कामगिरी पूर्ण होत असतानाच त्यांच्यासमोर दुसरे आव्हान ठेवण्यात आले.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या प्रेरणेतून सन 1970 च्या सुमारास सुरू झालेले मराठी शब्दकोशाचे काम डांगे सरांकडे सोपविण्याचा निर्णय शासनाने घेतला. हे काम खूप मोठे आहे. साधारणपणे तीन हजार डबलडेमी पृष्ठांचे (म्हणजे या पुस्तकाच्या पृष्ठाच्या दुप्पट आकाराचे पृष्ठ), एक लाख 25 हजार शब्दांचा समावेश असलेले सहा खंडांतील हे काम खूप आधी पूर्ण होणे गरजेचे होते. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या वतीने हे काम होत असल्यामुळे त्याचा दर्जा, गुणवत्ता सर्वश्रेष्ठच असणे अपेक्षित होते. हे काम सुमारे 20 वर्षे ठप्प होते. ज्ञानेश्वरीच्या कामाच्या पूर्ततेनंतर मंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ मराठी साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या पाठपुराव्यातून शासनाने हे काम डांगे सरांकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आणि सन 2007 मध्ये सर पुण्यात डेरेदाखल झाले.
काही लाखांच्या कमाईची चांगली संधी असतानाही पतीपत्नीच्या उपजीविकेपुरते पैसेघेत डांगे सरांनी या कामाला प्रारंभ केला. दोन दशके बंद असलेले काम करताना ते पुन्हा पहिल्यापासूनच सुरू करावे लागते. काळानुरूप भाषा बदललेली असते, नव्या भाषेतील शब्द आपल्या भाषेत आलेले असतात. या सर्वांचा धांडोळा घेत हे काम पूर्ण करावे लागते. या कामासाठी सरांनी कंबर कसली. डोंगराएवढे हे काम सन 2007 ते 2014 या काळात सरांच्या नेतृत्त्वाखाली नेटाने पूर्ण करण्यात आले. ते मार्च 2014 मध्ये 6 खंडांत प्रकाशित झाले. पुरवणीचे कामही सन 2014-15 मध्ये पूर्ण होईल.
हे काम संपते न संपते तोच त्यांच्याकडे व्युत्पत्ती कोशाचे काम सोपविण्यात आले होते. मराठीतील विविध शब्दांची व्युत्पत्ती कशी झाली, याचा शोध यामध्ये घ्यावयाचा आहे. हे काम डिसेंबर 2014 मध्ये संपणे अपेक्षित होते. मराठीतील अनेक मूळ शब्द वेगवेगळ्या भाषांतून आले आणि मराठीत रूढ झाले. तमिळ, कानडी, तेलुगू, पोर्तुगिज, इंग्रजी, संस्कृत, हिंदी, उर्दू, फारसी, अरबी अशा विविध भाषांतून आलेले हे शब्द शोधून त्यांचे मूळरूप शोधून काढायचे.  अलीकडेच तिसरे एक काम प्राचार्य डांगे यांच्याकडे आले आहे. संतकवी दासोपंत विरचित गीतार्णवाच्या शब्दकोशाचे काम राज्य मराठी विकास संस्थेने त्यांच्याकडे सोपविले आहे. गीतार्णवहा मराठी भाषेतील पहिला आणि शेवटचा बृहद्ग्रंथ मानला जातो. या ग्रंथाची ओवीसंख्या आहे सव्वा लाख! संपूर्ण ग्रंथही प्रकाशित नाही. त्यामुळे हस्तलिखिताच्या आधारे हे काम करावे लागणार आहे. हस्तलिखित वाचण्याचा दांडगा अनुभव असल्याने हे काम 2-3 वर्षांत पूर्ण होईल व हे काम प्राचार्य डांगेच करू शकतील, असा संस्थेचा विश्वास होता.
 आपण सिद्ध केलेल्या प्रतिशुद्ध ज्ञानेश्वरीचा सांप्रदायिकांत प्रसार व्हावा म्हणून सौ. डॉ. मीराबाई आणि डॉ. तुकाराम गरूड या दाम्पत्याच्या सहकार्याने प्रस्तुत ज्ञानेश्वरीची पारायण प्रतडांगे सरांनी कोल्हापूरच्या अजब प्रकाशनाच्या मदतीने अवघ्या 50 रुपयांत उपलब्ध करून दिली आहे.
ज्ञानेश्वरीचा सर्वसंग्राहक शब्दकोशहा त्यांचा आणखी एक संकल्प-प्रकल्प. ज्ञानेश्वरीच्या सर्वच कोशांचे एकत्रीकरण तर केलेच आहे. शिवाय ज्ञानेश्वरीचे काही जुने हस्तलिखितकोशही डांगे सरांना उपलब्ध झाले आहेत. तंजावर कोश आणि आरे मराठीचा कोश या मुळे काही नवीन अर्थ समोर येतात. निरंजन रघुनाथांचा कोशही अपूर्ण असाच आहे. त्याचाही उपयोग या कोशात केलेला आहे. ओम् नमोजी आद्याम्हणजे श्री विठ्ठलह्या नव्या अर्थाचे दर्शन मनोहर आहे... ही मोलाची कामे डांगे सरांच्या हातून होत होती !
प्राचार्य रामदास डांगे यांचा हा सारा प्रवास पाहताना हे व्यक्तिमत्त्व अतिशय गंभीर असल्याचे दिसते, पण त्याला हजरजबाबीपणा आणि विनोदाची झालरही असते. असे अनेक प्रसंग त्यांच्या मित्रमंडळीत चर्चेत असतात. प्राचार्य रा. रं. बोराडे सांगतात, ‘‘अमरावती विद्यापीठाच्या सिनेटवर नियुक्ती झाल्याबद्दल आम्ही डांगे सरांचे अभिनंदन केले व त्यांना पेढे मागितले. त्यावर ते उत्तरले एक तारखेला देतो.’ ‘पेढे एक तारखेलाच का?’ असा प्रश्‍न विचारताच ते उत्तरले एक तारखेला पे-डेअसतो...!’’
असाच एक अनोखा प्रसंग थेट विनोबा भावे यांच्यासमोरचा...! डांगे सर विनोबांना आपला आदर्श मानतात. त्यांची ज्ञानार्जन करण्याची वृत्ती आणि साधेपणा आपल्याला भावतो, असे ते आवर्जुन सांगतात. एकदा डांगे सर आचार्य कुलाच्या बैठकीसाठी नागपूर येथे गेले असताना परतीच्या प्रवासात ते पवनार येथे विनोबांना भेटण्यासाठी गेले. डांगे सरांच्या सोबत गोविंदराव देशपांडे होते. विनोबांना तेव्हा खूप कमी ऐकू येत असल्याने गोविंदरावांनी डांगे सरांचा परिचय करून देताना पाटीवर प्राचार्य रामदास डांगेअसे लिहून दाखविले. त्यावर विनोबा मिश्किलपणे हसले आणि ते म्हणाले, ‘शंकर, रामानुज, मध्व, निंबार्क (...आणि या परंपरेतील आणखी 13-14 नावे त्यांनी घेतली) हे सारे आचार्य आणि तुम्ही प्राचार्य... तुम्हाला नमस्कार’’.
साक्षात विनोबांनीच ही फिरकी घेतल्याने डांगे सर गोंधळले, पण लगेचच सावरले. त्यांनी पाटीवर लिहिले, ‘‘प्रशासनाय आचार्यः प्राचार्यः इति मे मतिः’’ अर्थात, ‘प्रशासन सांभाळणारा आचार्य तो प्राचार्य, असे माझे मत.त्यांचा हा खुलासा विनोबांना खूप आवडला. विनोबांना अशी एखादी गोष्ट आवडणे म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या बुद्धीची कसोटीच असे... त्या कसोटीला त्या काळात डांगे सर उतरले...!
वैयक्तिक मते कोणतीही असली, तरी सामाजिक भान राखत सर्वांशी मिळून मिसळून राहणारी, निगर्वी, ‘अजातशत्रूअसलेली त्यांची प्रतिमा त्यांच्या निवृत्तीनंतरही त्यांचा सन्मान करणारी ठरली. म्हणूनच, पदावरून निवृत्ती पत्करल्यानंतर सुमारे 15 वर्षांनी; परभणीतील या माजी प्राचार्याचा भव्य नागरी सत्कार 12 जून 2010 रोजी करण्यात आला. त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्थितप्रज्ञहा गौरवग्रंथ प्रकाशित करण्यात आला. सरांच्या जीवनकार्याचा उत्तम परिचय करून देणार्‍या अनेक लेखांनी हा अंक सजला आहे. एखाद्या प्राचार्याच्या आयुष्यात असा प्रसंग महाराष्ट्रात खूप कमी वेळा येतो...!
सर सांगतात, ‘‘जे समोर येईल ते प्रामाणिकपणे, सातत्याने आणि निष्ठापूर्वक करत गेलो. एकदा एखाद्या कामाला होकार दिला, की मी ते काम करतो. मी कामालाच पूजा मानतो आणि ती मनोभावे करतो.’’ सारे आयुष्य अध्यापनात घालविलेल्या डांगे सर नव्या पिढीसाठी मात्र काहीही सांगण्याचे नाकारत. ते म्हणत, ‘‘प्रत्येक पिढीचे आकाश निराळे असते. स्वधर्मे निधनं श्रेयः, परधर्मो भयावहःएवढेच मी सांगेन आणि धर्मचा अर्थ इथे कर्मअसाच घ्यावा, असे आवर्जून सुचवेन...’’

-    दत्ता जोशी