Wednesday, July 2, 2014

अचूक वजनाची खात्री - फिनिक्स !


राजेश भतवाल (धुळे आयकॉन्स)
-----------------------------------
`फिनिक्स` या ब्रांडचे इलेक्ट्रोनिक वजनकाटे आज देशभरातील बहुसंख्य दुकानांतून दिसतात. ही निर्मिती करणारे राजेश भतवाल धुळे येथील रहिवासी. ज्वेलर्स कडे लागणारे `मिलीग्राम` ते `ट्रक`साठी लागणारे १०० टन क्षमतेचे इलेक्ट्रोनिक वजनकाटे ते बनवतात...
इलेक्ट्रोनिक्स इंजिनियरिंग पूर्ण केलेल्या राजेश यांनी जिद्दीने व्यवसायातच उतरण्याचे ठरविले. इंजिनियरिंगच्या शेवटच्या दीड वर्षात त्यांनी अभ्यासाबरोबरच या उत्पादनाचा 'मार्केट रिसर्च' केला. `त्या` काळात इन्टरनेट नव्हते. परदेशातून तंत्रज्ञान शिकण्यासाठी ते विविध देशांच्या वकीलातींमध्ये अनेक तास बसले... तेथील `यलो पेजेस` शोधून विविध देशांशी संपर्क साधला.
उद्योगात उतरल्यावर स्वतः मार्केटिंगसाठी उतरले. एका टप्प्यावर व्यवसाय विस्ताराचा गियर त्यांनी बदलला आणि साधारण २ वर्षांच्या मेहनतीत ते धुळे जिल्ह्यातून देशभर पोहचले. आता त्यांचे उत्पादन सिल्वासा आणि पंतनगर येथून होते, पण कंपनीचे मुख्यालय धुळ्यात आहे...!
(अधिक माहितीसाठी http://nitiraj.net/)

समग्र परिवर्तनाचा अग्रदूत...
डॉ. शरद गडाख (नगर आयकॉन्स)
-----------------------------------
नगर जिल्ह्यात असलेल्या सोनई तालुक्यातील ब्राह्मणी येथे वास्तव्यास असलेल्या डॉ. शरद गडाख यांच्याबद्दल बोलताना नेमके शब्द आठवत नाहीत. हे गृहस्थ राहुरीच्या कृषी विद्यापीठात ज्वारी विभागात `चीफ ब्रीडर` आहेत. विविध १३ नव्या वाणांचे संशोधन यांनी केले आहे. कमी पाण्यावर चांगली उत्पन्न देणारी ज्वारीची `फुले माउली` ही जात हे त्यांचे वैशिष्टपूर्ण वाण...!
पण एवढ्यावर त्यांची ओळख संपत नाही. ब्राह्मणी येथे कार्यरत असलेल्या `माउली दूध`चे ते संचालक आहेत. एकेकाळी हा प्रकल्प उभारण्यासाठी प्राथमिक रक्कम म्हणून १ लाख रुपये उभे करण्यास डॉ. गडाख आणि त्यांच्या ९ सहकार्यांना १ वर्ष लागले होते. अत्यंत जिद्दीने उभ्या राहिलेल्या या प्रकल्पाबरोबर त्यांनी या परिसरातील किमान १२०० शेतकरी कुटुंबांत परिवर्तन घडवून आणलेले आहे. विशेष म्हणजे, या संचालकांपैकी कुणाचीही पुढची पिढी या उद्योगात कार्यरत नाही! त्यांचे आपापले वेगळे व्यवसाय आहेत. नातेसंबंधातून प्रकल्पाचे होणारे वाटोळे त्यांना मान्य नाही...!
एकेकाळी खोपटात राहणारा, सामान्य शेतकऱ्याचा हा मुलगा... हिमतीने शेतीत प्रयोग केले... विद्यापीठात रुजू झाल्यावर तेथे उत्पन्न वाढविणारे प्रकल्प राबविले... आपल्या गावातील किमान ३० तरुणांना त्यांनी व्यवसाय उघडून दिले, त्यांच्यावर लक्ष ठेवले. जिथे बँकेचे कर्ज हवे, तेथे स्वतः हमीदार झाले...
अपार इच्छाशक्ती, उत्तम संघटन कौशल्य, दूरदृष्टी, मार्केटिंगमध्ये केलेले अभिनव प्रयोग आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकरी-ग्राहक-विक्रेते या सर्वांशी असलेले पारदर्शी व्यवहार हे या यशामागील गमक...
स्वतः उभे राहताना असंख्य लोकांना त्याचा लाभ मिळवून देणारे शरद गडाख यांच्यासारखे लोक म्हणूनच `पोलादी माणसे` म्हणून गौरविता येतात...!
( ता. क. - ‘त्या` गडाख यांच्याशी यांचा खूप दुरून संबंध आहे. त्यांच्या स्थानाचा कसलाही लाभ यांनी कधीही घेतलेला नाही...)