Friday, November 4, 2011

आदर्शांच्या शोधात...

अकोला येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक देशोन्नती च्या 'दिवाळी अंक २०११' मध्ये प्रकाशित झालेला लेख. राज्याच्या विविध भागांतील आदर्श मांडणाऱ्या या लेखातून नक्कीच आत्मविश्वास वाढू शकेल...
...........................................................
डोळे उघडे ठेवून शोध घेतला तर ज्यांचा आदर्श घ्यावा अशी लक्षावधी माणसे आपल्याच राज्यात आपल्याला सापडतील. कोणतेही गाव निवडा, तेथे आदर्श घेण्याजोगी माणसे नक्कीच सापडतील. ज्यांचा आदर्श अजिबात घेऊ नये अशी काही माणसे संसद, विधानसभा, न्यायालये, शासकीय कार्यालये आणि समाजात नक्कीच सापडतील. पण ही संख्या किती आहे? 120 कोटींच्या भारतात हे लोक जास्तीत जास्त 1 कोटींपर्यंत असू शकतील. हे प्रमाण 1 टक्क्यांपेक्षाही कमी भरते...

दत्ता जोशी (औरंगाबाद) 
.........................................................................................................

महाराष्ट्रात सध्या ‘आदर्श’ या शब्दाचा अर्थ वेगळाच घेतला जातो. नैतिकतेची सारी परिमाणेच बदलणार्‍या या नव्या अर्थाने राज्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात बरेच बदल घडवून आणले. बर्‍याच उलथापालथी झाल्या. पण मूळ प्रश्न कायम राहिला. हा क्रम मागील पाच-सहा दशकांपासून सुरूच आहे. शिळोप्याच्या गप्पांपासून उच्चस्तरीय चर्चांपर्यंत भ्रष्टाचार, लाचखोरी, बजबजपुरी, लालफितशाही, अनैतिकता याच विषयांचा उहापोह होताना दिसतो. समाजात काही चांगले उरले आहे की नाही, अशी शंका येत एक प्रकारचे वैफल्य मनात निर्माण होते.  याला कोणतेही क्षेत्र अपवाद दिसत नाही. शिक्षणापासून न्यायदानापर्यंत आणि दुग्धव्यवसायापासून संरक्षणखात्यापर्यंत सर्वत्र या रोगाची लागण झालेली दिसते. दुर्दैवाने कोणतेही क्षेत्र  याला अपवाद राहिलेले दिसत नाही. हे सारे सार्वत्रिक अनुभव असले, तरी माझा अनुभव मात्र वेगळा आहे. मला आता असे वैफल्य वगैरे येत नाही. याचा अर्थ, आता मीही या व्यवस्थेला निर्ढावलो आहे किंवा मी प्रवाहपतीत झालो आहे, असे नाही. मी फक्त माझी दृष्टी बदलली आणि खूप काही चांगले दिसायला लागले. या ‘चांगले’पणाला आदर्श म्हणायचे की नाही असा प्रश्न निश्चित समोर येईल. पण हा सुद्धा ज्याच्या त्याच्या दृष्टीचाच भाग आहे. पण माझ्या मनात एक विश्र्वास नक्की आहे. आपली सद्सद्विवेकबुद्धी शाबूत ठेवून विचार केला तर प्रत्येक जण नक्कीच सुखावेल. मला या विषयाची तत्विक चर्चा करायची नाही. तशा अर्थाने मी तत्वज्ञ किंवा विचारवंत नाही. हवेतल्या गप्पा मारण्यावर माझा विश्र्वास नाही. ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल’ अशी भूमिका घेऊन मी विषयाला हात घालत असतो. भारदस्त शब्दांचे पांडित्य दाखवून वाचकांचे डोळे दिपवत आपले मुद्दे समोरच्यांच्या गळी उतरविण्यात मला रस नाही. सामाजिक दृष्टी आणि जाणीव जागृत ठेवणार्‍या, प्रकाशाची बेटं शोधणार्‍या एका पत्रकाराच्या नजरेतून हे सारे टिपण्याचा माझा हा प्रयत्न आहे. अशी विविध उदाहरणे घेऊन मी हा विषय मांडू इच्छितो.

अण्णा हजारे यांनी 16 ऑगस्ट 2011 पासून नवी दिल्लीत भ्रष्टाचाराविरुद्धचा संघर्ष पुकारला आणि अनपेक्षितरित्या लक्षावधी लोक देशभरात रस्त्यावर उतरले. पूर्वांचलातील राज्ये अनेकदा देशभरातील अनेक घडामोडींपासून अलिप्त राहताना दिसतात. या आंदोलनात असे झाले नाही. देशातील प्रत्येक जिल्ह्यात लोक रस्त्यावर उतरलेले देशाने पाहिले. भ्रष्टाचाराला आळा घालण्यात ‘लोकपाल’ किती यशस्वी होईल, या विषयी असंख्य शंका मनात घोंघावत असतानाही, या विषयावर देशाच्या भावना किती तीव्र आहेत, हेच सर्वांनी दाखवून दिले. या आंदोलनादरम्यान तर देशातील काळोख अतिशय तीव्रपणे जाणवत होता. 

या स्थितीतही मी वैफल्यग्रस्त झालो नाही. कारण मागील पाच-सहा महिन्यांपासून मी एका वेगळ्याच विश्र्वात वावरत आहे. हे विश्र्व उद्योगी माणसांचे आहे. उद्योगी म्हणजे रूढ अर्थाने फक्त ‘इंडस्ट्रियल’ नव्हे. जीवनाच्या विविध क्षेत्रांत कार्यरत राहून आपापल्या कामांमध्ये मनःपूर्वक रममाण झालेल्या या माणसांचे विश्र्व माझी दृष्टी बदलणारे ठरले. ‘अंधार फार झाला’च्या वातावरणात आपापली पणती तेवत ठेवणार्‍यांचे हे विश्र्व आहे. यामध्ये कोणी उद्योजक तर कोणी लेखक आहेत, कोणी व्यावसायिक तर कोणी शिक्षक आहेत. कोणी सामाजिक कामांमध्ये स्वतःला झोकून दिलेले आहे तर कोणी पर्यावरणाच्या क्षेत्रात आपले योगदान देतो आहे. हे सारे अनुभवताना आणखी एक गोष्ट स्पष्ट होत जाते, की समाजात काळोख नक्कीच आहे पण जागोजागी असलेली प्रकाशाची ही बेटं या काळोखाला नक्कीच दूर सारणारी आहेत. ही संख्या जसजशी वाढत जाईल, तसा अंधःकार नक्कीच दूर होऊ शकेल. 

या विषयात पुढे जात असताना आधी ‘आदर्शा’ची सर्वमान्य व्याख्या करता येईल का? ज्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी अशी व्यक्तिमत्वे - कार्ये म्हणजे आदर्श, असे आपण म्हणू शकू? नक्कीच असे म्हणता येईल. आदर्शाचा संदर्भ सामाजिकतेशी लावण्याचा, त्यांनी सामाजिक कार्यासाठी वेळ किंवा पैसा दिलाच पाहिजे असा हट्टही मी नाकारतो. आपापल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्यरत राहणार्‍यांनाही आदर्श मानले पाहिजे, असे मला वाटते. 
पंढरपूर तालुक्यात मेंढापूर नावाचे एक छोटेसे खेडे आहे. इथे राजेंद्र पवार नावाचा एक तरुण वेगळीच बुद्धिमत्ता घेऊन जन्माला आला. ज्याच्या घरात तीन जण एकत्र आले, तर बसायला जागा पुरणार नाही अशा घरात वाढलेला हा शेतमजुराचा मुलगा भौतिकशास्त्रात जागतिक स्तरावर महत्वाचे योगदान देतो आहे. ‘झिंक ऑक्साईडचे अतिसूक्ष्म कणांत रुपांतर करून त्याचा सौरघट तयार करण्यासाठी वापर’ या विषयावर ‘पीएच. डी.’ करण्यासाठी त्याला दक्षिण कोरियातील हनियंग विद्यापीठाने फेलोशिप दिली आहे. सध्या तो दक्षिण कोरियात अभ्यास करतो आहे. ज्याच्या घरात कोणी मॅट्रिकची पायरी ओलांडली नव्हती, त्या घरातून राजेंद्रने घेतलेली ही भरारी प्रतिकूलतेत शिकणार्‍यांचे मन उजळविणारी ठरेल?

असाच आणखी एक पवार विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील पिंपळगावचा. घरची अत्यंत गरीबी. ही गरीबी इतकी, की रोजच्या गरजा भागविण्यासाठी अगदी बालपणापासून त्याला मजुरी करावी लागली, पण ‘फाईन आर्ट’कडे त्याचा ओढा. मोठ्या जिद्दीने उभा राहत, स्वबळावर मदत मिळवीत त्याने मुंबईच्या ‘जेजे’ मध्ये प्रवेश मिळविला. शिल्पकृतींमध्ये त्याने आज आपले स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. परवाच 5 ते 15 सप्टेंबरदरम्यान अत्यंत मानाच्या असलेल्या मुंबईच्या ‘जहॉंगीर आर्ट गॅलरी’त त्याच्या शिल्पकृतींचे प्रदर्शनही पार पडले. अक्षरशः हॉटेलात कपबशा विसळण्याचे काम करत पुढे आलेला, आज जेमतेम पंचविशीत असलेला हा तरुण नव्या पिढीसाठी प्रेरणा ठरू शकेल? 

आंध्रप्रदेशातील हिंदुपूर येथील विद्या कुरकुंबी तेथे साखर कारखाना चालवितात. पतीच्या निधनानंतर मुलाला सांभाळत त्यांनी हा कारखाना वाढविला. मुलाला उच्चशिक्षित करतानाच त्यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार सुरू केला. या बाईंचे आज आंध्रप्रदेशबरोबरच महाराष्ट्रात सांगलीमध्ये साखर कारखाना आहे इतकेच नव्हे तर त्यांच्या व्यवसायाचा विस्तार आता ब्राझीलमध्येही झालेला आहे. तोट्यातील साखर कारखाने खरेदी करून ते नफ्यात आणायचे, असे त्यांचे कर्तृत्व आहे. जगप्रसिद्ध ‘फोर्बस्‌’च्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश झाला आहे. ‘अबला’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या महिलांच्या विश्र्वात त्या आदर्श ठरू शकतील?

मराठवाड्याच्या लातूर जिल्ह्यातील भूकंपग्रस्त सास्तूर गावातून एकेकाळी फक्त अंगावरच्या कपड्यांनिशी आणि मनात मोठी जिद्द घेऊन फुलचंद जैन औरंगाबादेत आले. प्रारंभी छोटी-मोठी नोकरी करीत आणि नंतर खडेमीठ दळून त्याचे पुडे बनवून विकण्यापासून त्यांनी आपल्या उद्योगाला सुरवात केली. सुमारे 25 वर्षांच्या वाटचालीनंतर आजघडीला त्यांची ‘रवि मसाले’ हा उद्योग संपूर्ण मराठवाड्याबरोबरच आजूबाजूच्या जिल्ह्यांतही विस्तारला आहे. सर्वप्रकारच्या लोणच्यांसोबतच तिखट, हळद, विविध प्रकारची ‘रेडी टू कुक मिक्स’ असा प्रचंड विस्तार त्यांनी या काळात केला. आजमितीला काही कोटींची ही आर्थिक उलाढाल करणारे फुलचंद जैन जेमतेम मॅट्रिक आहेत. अल्पशिक्षितांसाठी ते आदर्श ठरू शकतील?

‘एका रानवेड्याची शोधयात्रा’ हे कृष्णमेघ कुंटे याचे पुस्तक अनेकांनी वाचले असेल. रानाच्या प्रेमात असलेल्या सांगलीच्या शरद आपटे यांचे काम आणखी वेगळे आहे. ते जंगलांत हिंडतात आणि विविध पक्ष्यांचे आवाज ‘रेकॉर्ड’ करतात. त्यांनी ध्वनिमुद्रित केलेले पक्ष्यांचे आवाज आपण त्यांच्या लळीवलरश्रश्री.ळपषे या वेबसाईटवर जाऊन ऐकू शकतो. आपटे यांनी केलेले हे काम या विषयातील शास्त्रीय अभ्यास करणार्‍या अभ्यासकांसाठी किती मोलाचे ठरेल?

जालना येथे परेश रुणवाल नावाचे जेमतेम पस्तिशीत असलेले गृहस्थ आहेत. शिक्षणाने सीए आणि व्यवसायाने ‘ब्रोकर’ असलेल्या परेश यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर जालन्यातील पहिली ‘कलर फोटो प्रोसेसिंग लॅब’ सुरू केली होती. हा व्यवसाय मार्गी लावल्यानंतर  ते शेअर बाजाराकडे वळले. भारतात ‘कमोडिटी मार्केट’ सुरू होण्याआधीपासून ते या विषयात आग्रही होते. कमोडिटी मार्केटची भारतात सुरवात झाल्यानंतर या विषयाची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्यांना मुंबईत पाचारण करण्यात आले होते. बीएसई, एनएसईसह सर्व प्रकारच्या गुंतवणूक सेवा जालन्यासारख्या शहरात एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे परेश रुणवाल आजमितीला वार्षिक साडेआठ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे मध्यस्थ आहेत! मुंबईच्या बाहेर  राहून शेअर बाजारातील एवढी उलाढाल करणारे आणि ही उलाढाल करताना गुंतवणूकदारांचा एवढा विश्र्वास जिंकणारे परेश आजच्या तरुणांचा आदर्श ठरू शकतील?

नांदेडच्या गुजराती हायस्कूलमधून शिक्षक म्हणून निवृत्त झालेल्या एल. के. कुलकर्णी यांनी जवळजवळ 12 वर्षांच्या परिश्रमातून मराठीतील पहिला भूगोलकोश तयार केला. एल. के. हे एक अजब रसायन आहे. एम. एस्सी. (बॉटनी) असलेल्या एल. के. यांना त्या काळात प्राध्यापकी करण्याची ऑफर आलेली होती. पण त्या ऐवजी ते दहावीखालील वर्गांच्या शिक्षकी पेशात रमले. ‘प्रयोगातून विज्ञान’ची ज्या काळात नुसतीच चर्चा होत असे तेव्हा त्यांनी विद्यार्थ्यांना खरेखुरे प्रयोग करण्यास प्रवृत्त केले. असंख्य अडचणींतून त्यांनी भूगोलकोश सिद्ध केला तेव्हा तो मराठीतील एक अद्वितीय कोश ठरला. शास्त्रीय माहितीबरोबरच लालित्यपूर्ण शब्दसौष्ठवाने हा कोश वाङ्‌मयजगतातही नावाजला गेला. आपले वेगळे स्थान निर्माण करणारे एल. के. कुलकर्णी शिक्षकी पेशात आदर्श ठरतील?

कोकणात वेळास येथे कासव महोत्सव आयोजित करणारे भाऊ काटदरे आज जगभर प्रसिद्ध झाले आहेत. या परिसरात ‘ऑलीव्ह रिडले’ जातीच्या कासवांची नैसर्गिक पैदास होते. एकेकाळी या कासवांची तस्करी होत असे किंवा त्यांचा खाद्य म्हणून वापर केला जात असे. काटदरे यांनी या विषयात लक्ष घालून कासवांच्या रक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी उचलली. कासवे नष्ट होऊ नयेत, साठी चळवळ उभारली. आज त्यांचे काम जगाच्या नकाशावर पोहोचले आहे. पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणार्‍या काटदरेंचा आदर्श आपण घेऊ शकतो? 

धुळे जिल्ह्यातील वारसा परिसरात डॉ. आनंद फाटक 1990च्या सुमारास पोहोचले तेव्हा इकडे कसल्याही वैद्यकीय सुविधांचा लवलेशही नव्हता. डॉ. फाटक यांनी ‘मेडिसीन’ विषयात ‘एम.डी.’ पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर आदीवासी भागात जाऊन काम करण्याचे ठरविले. रा. स्व. संघ आणि वनवासी कल्याण आश्रमाच्या प्रेरणेतून या क्षेत्रात काम करण्याचा त्यांनी निर्धार केला. वारसा हा आदिवासी पाड्यांचा भाग. इथे आयुष्यातील उमेदीची जवळजवळ नऊ वर्षे घालवून डॉ. फाटक यांनी वैद्यकीय सेवा दिली, त्याच बरोबर आदीवासींच्या सर्वांगीण विकासासाठी शेती, पाणीनियोजन, शिक्षण अशा विविध क्षेत्रांत त्यांनी दीर्घकालीन कार्य उभे केले. परिपूर्ण ग्रामविकासाचा हा आदर्श ठरेल का?

असाच प्रकार किनवटमधील डॉ. अशोक बेलखोडे यांचा. ते मूळचे नागपूर जिल्ह्यातील. अत्यंत गरिबीतून, प्रसंगी भाजी वगैरे विकून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. शासकीय वसतीगृहाच्या सुविधा उपलब्ध असल्याने त्यांना वैद्यकीय शिक्षण घेता आले. अशा स्थितीत त्यांनी एम. एस. (सर्जरी)चे शिक्षण पूर्ण केले. याच काळात त्यांना ‘सामाजिक कामां’चे व्यसन लागले. बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून त्यांनी किनवट परिसरात आरोग्यसेवा देण्याचा प्रकल्प उभारला. साने गुरुजी रुग्णालयाच्या माध्यमातून 1993 पासून ते इथे कार्यरत आहेत. आयुष्यभरासाठी त्यांनी हे कार्य पत्करले आहे. ‘सर्जरी’त एम.एस. केल्यानंतर खोर्‍याने पैसा ओढण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्यांनी स्वतःला आदीवासींच्या भल्यासाठी झोकून दिले. त्यांचा आदर्श एन्टर्नशिपसाठीही खेड्यांमध्ये जाऊ न इच्छिणार्‍या तरुणांना घेता येईल?

नांदेडच्या स्वाती ठक्कर-चव्हाण यांनी एल.एल.एम. नंतर प्राध्यापकी सोडून न्याययंत्रणेत सहभागी झाल्या. वयाच्या जेमतेम चाळीशीत त्या मुंबईतील अनैतिक वाहतुक (प्रतिबंध) विशेष न्यायालया न्यायाधीश बनल्या. मानवी देहव्यापार आणि तस्करीच्या विरुद्ध विशेष कायद्यान्वये स्थापन झालेल्या या न्यायालयाच्या त्या पहिल्या न्यायमूर्ती आहेत. शासनव्यवस्थेने त्यांच्यावर टाकलेला विश्र्वास त्यांनी आपल्या कार्यातून सार्थ ठरविला. या कामाची दखल अमेरिकी प्रशासनानेही घेतली आणि त्यांची  ‘ट्राफिकिंग इन पर्सन्स हीरो 2011 ऍवार्ड’ या 2011च्या पुरस्कारासाठीनिवड केली. मराठी तरुणींसाठी स्वाती ठक्कर-चव्हाण या आदर्श ठरू शकतील?

शून्यातून आपले उद्योगविश्र्व उभारणारे असंख्य उद्योजक महाराष्ट्रभर कार्यरत आहेत. जालन्यात ‘विनोदराय इंजिनइरर्स’ ही कंपनी ‘स्टोअरेज टँक्स’ बनविण्यासाठी लागणारी यंत्रणा तयार करते. महाराष्ट्रातील अशा प्रकारची ही एकमेव कंपनी आहे. साधारण 2001 पर्यंतची या कंपनीची वाटचाल जेमतेम म्हणावी अशी होती, पण त्या वर्षी दिल्लीतील एका आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभागी झाल्यानंतर या कंपनीने घेतलेली झेप थक्क करणारी आहे. मेकॅनिकल इंजिनइर असलेल्या सुनील रायठठ्ठा यांच्या नेतृत्वाखाली ही कंपनी आज जगभरात सुमारे 40 देशांमध्ये ही यंत्रे निर्यात करते! त्यांच्या कामातून एक नवाच पैलू समोर येतो, तो भारताला मागास देश म्हणणार्‍यांचा. भलेही अमेरिकेसारख्या काही मोजक्या प्रगत राष्ट्रांच्या तुलनेत भारत भलेही मागास असेल, पण उरलेल्या शंभरहून अधिक देशांसाठी आपण पुढारलेले आहोत, मग येथील निर्यातीच्या संधी आपण का शोधू नयेत, या विचारातून त्यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार वाढविला आणि आता तर ते फ्रान्समध्येही निर्यात करतात! क्षमता असूनही स्वतःला कमी लेखणार्‍यांसाठी सुनील रायठठ्ठा आदर्श ठरू शकतात?

नांदेडजवळ लिंबगाव येथे शेतकरी संघटनेचे एक कार्यकर्ते आर. पी. कदम राहतात. त्यांनी शेतीउत्पादनांवर प्रक्रिया करणारा प्रकल्प 10 वर्षांपुर्वी सुरू केला. शेतीमाल जसा आहे तसा न विकता त्यावर प्रक्रिया करून विकल्यास उत्पादकाला अधिक किंमत मिळते, असा त्यांचा विश्र्वास आहे. फळप्रक्रिया करणारे राज्यातील पहिले युनिट त्यांनी उभारले. आपल्या मुलांनाही त्यांनी या व्यवसायात येण्यास प्रेरणा दिली. आयुर्वेद क्षेत्रात डॉक्टर झालेल्या आपल्या मुलास त्यांनी हेल्थ टुरिझमची प्रेरणा दिली. आता लिंबगाव परिसरात एकाच ठिकाणी त्यांची वनोषधी, फळप्रक्रियाउद्योग आणि आरोग्यकेंद्र अशी विविध कामे सुरू आहेत. आर. पी. कदम यांचा आदर्श शेतकर्‍यांना घेता येईल?

जालन्यालगत सिंधी काळेगाव येथे सीताबाई मोहिते - घोडेगावकर यांचा फळप्रक्रिया उद्योग आहे. एकेकाळी जालन्याच्या कृषिविज्ञान केंद्रातील शेतीवर सालदार म्हणून काम केलेल्या सीताबाई आज याच केंद्राच्या सल्लागार मंडळावर कार्यरत आहेत. त्या अशिक्षित आहेत, तरीही राज्य शासनाने घेतलेल्या स्पर्धेतून त्यांनी महाराष्ट्र आणि गोवा या भागातील उद्योजिकांमधून प्रथम पारितोषिक जिंकले आणि त्याच बळावर त्या परदेशातही जाऊन आल्या. तेथे त्यांनी आपल्या वक्तृत्वाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्या मराठीतून बोलायच्या आणि भाषांतरकार त्याचे इंग्रजीत रुपांतर करायचा. आपल्या अभिनव संकल्पनांच्या जोरावर शेती आणि फळप्रक्रियेत स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणार्‍या सीताबाई यांचा आदर्श अशिक्षित महिलांबरोबरच सुशिक्षित तरुणींना घेता येईल?

संजय केदार नावाचा जालन्यातील 12वी नापास झालेला आणि सध्या ‘रिक्षावाला’ असणारा तरुण आदर्श होऊ शकेल का? एका कारखान्यात मजुरी करताना संजय यांनी एक लोडिंग रिक्षा कर्ज काढून विकत घेतला. मेहनतीमुळे चांगला प्रतिसाद मिळाल्याने वर्षभराच्या आतच त्यांनी दुसरा रिक्षा घेऊन आपल्या धाकट्या भावाला कामाला लावले. उद्योगांची मागणी लक्षात घेऊन पुढच्या वर्षात त्यांनी एक जीप विकत घेतली आणि मराठवाड्यात विविध ठिकाणी कंपन्यांचा माल पोहचविण्यास सुरवात केली. आणखी एक-दीड वर्षात त्यांनी एक ट्रक विकत घेतला आणि राज्यभरात व्यवसाय करू लागले. एव्हाना - या दिवाळीत त्यांनी दहा चाकी ट्रक विकत घेतलेला असेल. मागील 5-6 वर्षांतील हाच वेग कायम राहिला, तर पुढील 7-8 वर्षांत ते एक मोठे वाहतुकदार झालेले असतील, यात शंका नाही. बारावी नापास झाल्यामुळे आत्महत्या करणार्‍यांनी त्या आधी संजय केदार यांना आवर्जुन भेटायला हवे?

पाणी नियोजनातील सरकारी खात्यांत होणारा भ्रष्टाचार ही बाब आता कोणासाठीच नवी नाही. पण सरकारी मदत न घेता अतिशय कमी खर्चात अत्यंत परिणामकारक जलसंधारणाचा पर्याय सुचविणार्‍या विजय केडिया यांच्या ‘केडिया पॅटर्न’ने अनेकांचे लक्ष वेधले आहे. महाराष्ट्राबाहेरही अनेक ठिकाणी त्यांनी अभिनव पद्धतीने उभारलेल्या भूमिगत तलावांच्या प्रकल्पांनी कोट्यवधी लिटर पाण्याचे फेरभरण जमिनीचे कोणतेही नुकसान न होता केले जात आहे. ‘बिट्‌स पिलानी’ येथील मेकॅनिकल इंजिनइर असलेल्या केडिया यांनी स्वतःची शेती फुलविण्यासाठी केलेले प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्याचा फायदा सर्वांना करून देण्यासाठी कंबर कसली आणि एकांड्या शिलेदाराप्रमाणे आज ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचा आदर्श शेती आणि पाण्याच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या तरुणांना घेता येईल?

शेवटी आणखी एक महत्वाचे नाव विचारात घेता येईल. ‘महिको’चे संस्थापक बद्रीनारायण बारवाले यांचे नाव आपण ऐकले असेलच. संकरीत बियाण्यांच्या क्षेत्रात भारतातील पायाभूत कर्तृत्व गाजविणारी ही व्यक्ती साधी मॅट्रिक पास आहे, हे आपल्याला ठावूक आहे? स्वातंत्र्यानंतरही पारतंत्र्यात असलेल्या मराठवाड्याला रझाकाराच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी पुकारलेल्या लढ्यामुळे त्यांनी शिक्षण सोडले. या लढ्यात त्यांनी बंदुक चालविली आणि बॉम्बस्फोटाने पूलही उडवून दिला. त्यानंतर शिक्षणाऐवजी त्यांनी व्यवसायावरल चक्ष केंद्रित केले आणि त्यातून टप्प्याटप्प्याने बियाणेउत्पादकाची भूमिका त्यांनी यशस्वीपणे वठविली! आज ऐंशीव्या वर्षीही ते कार्यरत आहेत. स्वतः एखाद्या विषयात शिकलेले नसतानाही निरीक्षणशक्ती, अचूक आकलन आणि गुणग्राहकतेच्या जोरावर त्यांनी आपले साम्राज्य उभे केले. त्यांचा आदर्श तर सर्वांनाच घेता येईल.

अशी किती नावे घ्यायची? आपल्या हे ही लक्षात आले असेल, की यातील कोणतेही नाव जगप्रसिद्ध नाही. कदाचित यातील एकही नाव या आधी आपल्या कानावर आलेले नसेल. डोळे उघडे ठेवून शोध घेतला तर ज्यांचा आदर्श घ्यावा अशी लक्षावधी माणसे आपल्याच राज्यात आपल्याला सापडतील. कोणतेही गाव निवडा, तेथे आदर्श घेण्याजोगी माणसे नक्कीच सापडतील. ज्यांचा आदर्श अजिबात घेऊ नये अशी काही माणसे संसद, विधानसभा, न्यायालये, शासकीय कार्यालये आणि समाजात नक्कीच सापडतील. पण ही संख्या किती आहे? 120 कोटींच्या भारतात हे लोक जास्तीत जास्त 1 कोटींपर्यंत असू शकतील. हे प्रमाण 1 टक्क्यांपेक्षाही कमी भरते. एक नासका आंबा अख्खी आढी नासवतो हे खरेच, पण एक अगरबत्ती सारा आसमंत सुगंधित करते, हे ही तितकेच खरे. 

समाजात अधःपतीत झालेली माणसे सर्व युगात झाली. अगदी सत्ययुगातही परस्त्रीवर वाईट नजर ठेवणारा रावण झालाच की! त्या दृष्टीने हे कलियुग म्हणजे अधःपतनाची मर्यादाच! अशा युगात ही प्रकाशाची बेटं जागोजागी सापडतात. असं एक बेट त्याचा परिसर उजळविणारे ठरते. काळोखात हरवून न जाता असा बेटांची शोधयात्रा हाती घेतली, तर परिसरातील आणि मनातीलही अंधःकार नक्कीच दूर होऊ शकेल. त्यामुळेच मी वैफल्यग्रस्त होत नाही. अशी माणसे शोधून ती समाजाच्या सर्व स्तरांत पोहोचविणे, हेच माझे काम आहे.
अशी उदाहरणे आपल्याही परिसरात नक्कीच असतील. मी अशा उदाहरणांच्या शोधात आहे. अशी प्रकाशाची बेटं आपल्या माहितीत असतील, तर ती जाणून घ्यायला मलाही नक्कीच आवडेल. चला, सारेच मिळून ‘आदर्शा’चा शोध घेऊ...

दत्ता जोशी, औरंगाबाद
9225 309010

(दत्ता जोशी हे मुक्त पत्रकार असून 21 वर्षांपासून ते जनसंवादाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. औरंगाबाद येथे ते ‘ब्रँडिग व इमेज बिल्डिंग’ क्षेत्रातील ‘द कॅटालिस्ट’ ही संस्था चालवितात.)