फेसबुकबद्दल माझे मत फारसे
चांगले नव्हते. काही अनुभव मी स्वतः घेतले होते. काही ऐकून होतो. त्यामुळे मी
स्वतःला फेसबुकवर दररोज जास्तीत जास्त २० मिनिटे लॉग इन राहण्याचे बंधन घालून
घेतले होते. कोणत्याही नव्या उपक्रमाबद्दल प्रतिक्रिया देताना, त्यात सहभागी
होताना मी खूप साशांकातेने सारे तपासून पाहतो. असे असले तरीही फेसबुक हे
संपर्काचे, माणसे जोडण्याचे उत्तम साधन आहे, याची खात्री अनेक वेळा पटते. कधी कधी
अनुभवता येते. कालच्या रविवारी, १ जुलै रोजी मी सुद्धा याचा एक साक्षीदार झालो. या
आधी आयुष्यात कधीही न भेटलेली १४-१५ माणसे परस्परांशी अकृत्रिम बंधानी जोडली गेली.
औरंगाबादेतील फेसबुक
सदस्यांचा एक मेळावा आयोजित करण्यात आला असल्याचा पहिला मेसेज मी दुर्लक्षित केला
होता. दुसऱ्या मेसेजला मी उत्तर दिले आणि चौकशी केली. ३० तारखेला आठवणीचा मेसेज
आला आणि एखाद्या तासासाठी जाऊन येऊ, या विचाराने, सकाळची पूर्वनियोजित १-२ कामे
आटोपून कार्यक्रम स्थळी पोहोचलो. माझ्या कल्पनेपेक्षा तेथील वातावरण खूप वेगळे
होते... त्यात फेसबुकवर एरव्ही दिसणारा उथळपणा नव्हता. हा मुड परिपक्वतेकडे
जाणारा होता... मी थोडा अधिक वेळ थांबण्याचे ठरविले. हा वेळ कारणी लागला असे मला
वाटते.
विशाखा रुपल आणि अंबिका
टाकळकर या दोघींनी या आयोजनात पुढाकार घेतलेला होता, हे आधीच्या मेसेजवरून लक्षात
आले होते. मी पोहचलो तेव्हा ६-७ जण तेथे होतेच. त्यातील आल्हाद देशपांडे यांनी मला
नावाने ओळखले...! ती आमची पहिलीच भेट होती, पण फेसबुकवरील माझा फोटो त्यांच्या
पक्का लक्षात होता...! एकेकाची ओळख झाली... आणखी काही जण पोहोचले आणि परिचयाचा
राउंड सुरु झाला, तेव्हा लक्षात आले की तेथे पोहोचलेला प्रत्येक जण काही वेगळे
रसायन आहे. आयोजनात पुढाकार घेणाऱ्या विशाखा रुपल एक उत्तम सुत्रसंचालनकार आहेत हे
समोर आले. अंबिका टाकळकर या `ऑटीस्टिक` मुलांसाठी शाळा चालवतात हे फेसबुकरून आधी
कळले होते पण त्या स्वतः या व्याधीने ग्रस्त मुलाच्या आई आहेत आणि अत्यंत धीराने
सावरत आता त्या अशा इतर विशेष मुलांसाठी काम करतात हे पाहून मनाला खूप वेगळे
समाधान वाटले आणि वेदनाही झाल्या...!
विप्रो मध्ये काम करणारे
कवितांमध्ये उत्तम रुची असलेले जयंत जोशी, दूरदर्शन साठी काम करत असताना अभिनयातसुद्धा
रस असणारे, काही चित्रपटांमधून भूमिका केलेले अनिल परब, प्रकाशनाच्या व्यवसायात
असणारे, दिव्य मराठी मध्ये वात्रटिका लिहिणारे विलास फुटाणे, व्यवसायाने
मूल्यांकनकार आणि छंदाने हस्ताक्षर तज्ज्ञ असलेले आल्हाद देशपांडे, आर के कॉन्स्ट्रो
मध्ये व्यवस्थापन सांभाळणारे सुजित गायकवाड, जिद्दीने स्वतःला घडविणारे इंजिनिअर अनिल
ठोंबरे, शून्यातून विराट व्याप निर्माण करणारे सुशीलदत्त शिंदे, गायक आणि संगीत
क्षेत्रात उत्तम ओळख असलेले अरविंद पिंगळे, मुळचे औरंगाबादचे पण सध्या जळगावमध्ये राहणारे
जितेंद्र आणि मुग्धा दाशरथी, प्रा. पद्मा सवाई, शिक्षण क्षेत्रात कार्यरत वैशाली
सुतवणे, आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. अंजली दीक्षित, बीडहून आलेले विद्यार्थी ओंकार आणि विकास
देशमुख... प्रत्येक जण तेथे उत्स्फुर्तपणे पोहचला होता. शेवटी प्राचार्य रा. रं.
बोराडे सुद्धा आले... हा एक उत्तम स्नेहमेळा जमला होता...
प्रत्येकाने करून दिलेला
स्वतः परिचय हा या एकत्रीकरणाचा खूप वेगळा पैलू होता. केवळ नाव आणि व्यवसाय एवढीच
माहिती न देता स्वतःचा परिवार, काम, व्यवसाय आणि इतरही माहितीमुळे सर्वांना
एकमेकांना समजून घेणे खूप सोपे गेले... सर्व जण खूप कमी वेळात परस्परांच्या खूप
जवळ आले... इतके की हे सर्व जण केवळ २ तास आधी परस्परांना ओळखतही नव्हते असे
सांगितले असते तर कुणाला खरे वाटले नसते... बालपणीच्या निरागस मैत्रीची एक झलक मला
इथे पहावयास मिळाली !
एकेकाळी अमरप्रीत हॉटेलात
`बेल बॉय` असणारे सुशीलदत्त शिंदे यांनी आज मुंबईमध्ये `पेस्ट कंट्रोल` च्या
व्यवसायात घेतलेली मोठी झेप मला त्यांच्या जिद्दी स्वभावाची जाणीव करून देणारी
ठरली. अगदी हसत खेळत या तरुण व्यक्तीने उभे केलेले मोठे काम मला खूप आवडले.
विदर्भातून औरंगाबादेत येऊन मालमत्ता मूल्यांकनात आपले नाव कमावणारे आणि हस्ताक्षर
तज्ज्ञ म्हणून सुद्धा वेगळी ओळख निर्माण करणारे आल्हाद देशपांडे यांची ओळख मला
आवडली. विलास फुटाणे यांचा माझा परिचय आधी पासून होता. पण त्यांनी अनिल ठोंबरे
यांच्यासोबत सुरु केलेला ज्योतिषविद्येचा विषय माझ्यासाठी नवा होता. शिवाय ठोंबरे
यांनी ज्या जिद्दीने स्वतःला घडविले ते ही मला खूप प्रेरक वाटले. अंबिका टाकळकर
यांच्या विशेष शाळेला मी लवकरच भेट देणार आहे. हे काम खूप अवघड असते, हे मी स्वतः
अनेक ठिकाणी पाहिलेले आहे. मला त्या कामाचा आदर आहे. डॉ. अंजली दीक्षित यांचा आवडीचा
विषय वैद्यकीय क्षेत्रापेक्षा कलेचा आहे, हे ही वेगळे वाटले! प्रत्येक जण आपापल्या
ठिकाणी राहून काही वेगळे करण्याचा प्रयत्न करीत होता. मला प्रत्येकाचा परिचय करून
देण्याचा मोह होतो आहे पण तो आवरता घ्यावा लागेल... पण तिथे आलेला प्रत्येक जण
काही वेगळीच `चीज` होता...
या निमित्ताने फेसबुकवरील संवादाची
पुढची पायरी गाठली गेली, हे मला महत्वाचे वाटते. नव्या तंत्रज्ञानाने जग आणि माणसे
जवळ येत आहेत... त्यातून काही सकारात्मक घडावे याची ही प्रसादचिन्हे दिसतात.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी थोडा लवकर तेथून निघालो होतो. या ग्रुपचे नाव `हसत
खेळत` असे ठेवल्याचे मला नंतर कळले. आता या १५ जणांचे संपर्क क्रमांक परस्परांजवळ
आले आहेत. पुढे सुद्धा हे सर्व जण एकत्र येतील... आणखी काही जण यात सहभागी होतील...
जे माध्यम काही अपवादात्मक प्रकारामुळे काहीसे बदनाम झाले होते, त्याच्याच आधाराने
काही नवे, सकारात्मक, उत्पादक घडते आहे, याचे मला समाधान आहे. ही संकल्पना जन्मास
घालणाऱ्या आणि प्रत्यक्षात उतरविणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.