Saturday, June 18, 2011

कोण कोण जाणार सिंगापूरला?

`दैनिक लोकमत` च्या `हेलो औरंगाबाद` मध्ये दर शुक्रवारी प्रकाशित होत असलेल्या 'संस्कृती, साहित्य वगैरे' या स्तंभात १७ जून २०११ रोजी प्रकाशित झालेला हा लेख. 
......................................................
श्री. कौतिकराव ठाले पाटील यांनी अतिशय कौतुकाने अमेरिकेतील बे-एरिया परिसरात रुजविलेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे रुपांतर आता भव्य वटवृक्षात होऊ घातले आहे. अर्थात, मध्यंतरीच्या काळात काही वाद-प्रवाद निर्विवादपणे झडले पण मुद्दा हा की त्याची झळ मूळ रोपट्याला पोहोचली नाही. महामंडळाच्या नूतन अध्यक्षा श्रीमती उषा तांबे यांनी अध्यक्षपदावर नसताना या संमेलनाच्या घटनात्मकतेवर प्रश्नचिन्ह उभे केले होते.अध्यक्षपदावर येताच त्यांनाही या संमेलनाची गोडी लक्षात आली. त्यातून घटनादुरुस्तीच्या रितसर प्रक्रियेलाही सुरवात झाली आहे.

या वर्षीच्या संमेलनाचा प्रारंभी फिसकटलेला मॉरिशसचा बेत अखेर सिंगापूरवर येऊन थांबला आणि आता सिंगापूर-मलेशिया-थायलंड अशा त्रिस्थळी यात्रेचे मनसुबे साहित्यिक मंडळी रचू लागली आहेत. या बाबत सिंगापूरच्या महाराष्ट्र मंडळाचे आणि त्यांचे अध्यक्ष श्री. संतोष अंबिके यांचे मराठी सारस्वताने आभार मानावेत तेवढे थोडे आहेत. (मॉरिशसच्या आयोजकांनी नक्की नकार कशामुळे दिला, यामागचे खरे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.) 14 आणि 15 ऑगस्ट रोजी होत असलेल्या संमेलनाच्या निमित्ताने भारताचा स्वातंत्र्यदिन सिंगापूरच्या भूमीवर साजरा करण्याचा मान सुभाषचंद्र बोस यांच्यानंतर या सर्व सारस्वतांना मिळणार आहे.

मराठी साहित्याला जागतिक गोडी लागावी अशा हेतूने या संमेलनांचे आयोजन करण्यात येत असल्याचा हेतू आधीच जगजाहीर झालेला होता. वास्तविक साहित्यातील जागतिक गोडीच्या असंख्य कथा सारस्वतात ऐकायला येतात. पण या बव्हंशी कथा प्रामुख्याने भारतात उपलब्ध असलेल्या जागतिक दर्जाच्या (सेकंडहँड) पुस्तकांवर अवलंबून असतात...! या पुस्तकी पांडित्याऐवजी जागतिक पातळीवरील प्रत्यक्ष ‘फील’ घेण्याच्या हेतूने ही उड्डाणे घेण्याचे ठरले. (तशी साहित्य वर्तुळात रात्रीची दैनंदिन ‘उड्डाणे’ सर्वश्रुत आहेतच म्हणा.) या कामी श्रीगणेशा करण्यात मराठवाड्यातील अध्यक्षांनी पुढाकार घेतला ही मराठवाड्याच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब होती. त्यामुळे अशा संमेलनातील ‘वरमायी’चा मान जरी उषाताईंकडे जाणार असेल, तरी मानाचे वर्‍हाडी म्हणून मराठवाड्यातील साहित्यिकांचाच अग्रक्रम लागायला हवा, ही मराठवाड्यातील साहित्यिक वर्तुळातील (या वर्तुळाचा व्यास निश्चित करण्याचे काम सुरू आहे) मागणी अत्यंत न्याय्य आहे !

अख्ख्या मराठी सारस्वतातून एकंदर फक्त 41 मान्यवरांनाच (आयोजकांच्या खर्चाने) सिंगापूर दर्शन घडणार आहे. त्यामध्ये महामंडळाच्या 19 जणांची तिकिटेही आधीच बुक झाली आहेत. या 19 जणांमध्ये मराठवाड्यातून तीन जण आहेत. संमेलनाचे जनक श्री. ठालेपाटील, श्री. अतकरे आणि श्री. दादा गोरे यांची तिकिटे नक्की आहेत. उरलेल्या 22 जणांमध्ये मराठवाडा, विदर्भ, पुणे आणि मुंबईतून समान संख्येने सारस्वतांचा कोटा ठरलेला असून या शिवाय सदस्य संस्थांमधून प्रत्येकी एक एक सारस्वतास (आयोजकांच्या खर्चाने) सिंगापूर दर्शन घडणार आहे. मराठवाड्यातून अशा प्रकारे अजून एकंदर 5 जणांची नावे निश्चित होणे बाकी आहे. 

मुंबई-सिंगापूर-मुंबई आणि सिंगापूरमधील निवास-न्याहारी-भोजन-प्रवास या पोटी मिळून एकंदर 46 हजार 950 रुपये आणि व्हिसापोटी सुमारे दीड हजार अशा अंदाजे 48 हजार 500 रुपयांची बचत करण्याचा मान मराठवाड्यातील कोणत्या पाच सारस्वतांना मिळणार बरे? श्री. अतकरे म्हणाले, ‘ठाले सरांनी नावे पाठविली’. श्री. ठाले म्हणाले, ‘माझ्या अनुपस्थितीत नावे ठरली’. श्री. गोरे म्हणाले, ‘मला नक्की काही माहिती नाही. पण ही नावे नंतरच ठरतील’. सौ. तांबे म्हणाल्या, ‘अजून संमेलनाला बराच वेळ आहे. नावांची यादी आली की ठरेल’. 

आतापर्यंत वासुदेव मुलाटे, चंद्रकांत पाटील, श्रीधर नांदेडकर, अरुण प्रभुणे, इंद्रजित भालेराव, रा रं बोराडे, अनुराधा पाटील आदींना अशा बचतीचा मान मिळालेला आहे. परंपरा पाहता मसापच्या कार्यकारिणीवरील सदस्यांनाच बचतीची संधी मिळते. त्यामुळे काही नावे डोळ्यासमोर आहेत - देवीदास कुलकर्णी, बाळकृष्ण कवठेकर, ऋषिकेश कांबळे, श्याम देशपांडे, श्रीधर नांदेडकर, विद्या पाटील, रसिका देशमुख, हेमलता पाटील, प्रकाश त्रिभुवन, विलास वैद्य, जगदीश कदम, केशव देशमुख, सुरेश सावंत, किरण सगर, दत्ता बेदरकर...
यातील कोणत्या पाच जणांना बचतीची संधी मिळणार बरे? की ती नावे याहून वेगळीच असतील? 

--------------------------------------------------------------------------------------------------------