Thursday, February 2, 2017

साय आणि मी... हे जणू अद्वैतच...!



दुधाच्या पातेल्यावर माझी नजर कायम असते. लहानपणी आईची आणि आता बायकोची नजर चुकवून पातेल्यातील दुधावरची साय पळवायची आणि त्या त्या वेळच्या मूडप्रमाणे मनाजोगत्या कॉम्बीनेशनप्रमाणे गट्टम करायची, हा माझा आवडता छंद...!
कधी ही साय वाटीत घ्यायची, त्यात साखर टाकायची आणि बोटाने एकसारखी मिसळून बोटानेच जिभेवर सोडायची, ही एक पद्धत... किंवा मग, घरात ब्रेड असेल दोन स्लाईसमध्ये सायीचा एक जाडसा थर हलकेच पसरायचा आणि त्यावर साखर पेरायची. मग हे स्वर्गसुख साखरेच्या दाण्यांच्या `कुडुम कुडुम` अशा अमृतध्वनिसह जठरापर्यंत पोहोचवायचे...!
या बदल्यात एकेकाळी आईचे फटके खावे लागायचे. तिच्या दृष्टीने ही साय विरजणात जाणे महत्वाचे. असे झाले तर तूप घरी निघायचे...! बायकोचीही हीच धडपड. घरी लागणारे तूप विकत आणले तर काय बिघडले? या प्रश्नाला मला कधीच समर्पक उत्तर मिळाले नाही. तसेही विकतचे तूप घरी यायचेच... येतेच. पण सायीचा मोह सुटत नाही... त्यांचा आणि माझाही...!
परवा असाच मूड लागला आणि पातेल्यातील सारी साय माझ्या पोटात उतरली. पुढे काय झाले, हे इथे सांगणे संसारी माणूस म्हणून प्रशस्त वाटणार नाही, पण म्हणून माझी सायीबद्दलची अभिलाषा कमी होणार नाही, हे निश्चित...!
साय म्हटले की मन वर्तमानात शोध घेते आणि त्याच वेळी भूतकाळातही रेंगाळू लागते. मग मी मनाने थेट देवणीला पोहचतो. उमलत्या वयाच्या माझ्या साऱ्या आठवणी देवणी या (त्या वेळच्या) छोट्या गावाशी जोडल्या गेलेल्या आहेत. (आता देवणी हे लातूर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे.) माझा जन्म या गावचा. त्या काळचे हे पाच हजार लोकवस्तीचे गाव. गावाला एक टेकडी, एक नदी, एक आठवडी बाजार, एक जिल्हा परिषदेची शाळा, एक कन्या शाळा, एक बाजारपेठ... हे सारे लाभलेले. तर अशा या गावात माझे मन आजही रेंगाळते.
साय म्हणजे त्या आधी दुध. दुध म्हटले की दोन व्यक्ती डोळ्यासमोर येतात. पहिला – माझा दोस्त राम डोंगरे आणि दोन - आमच्या दुधवाल्या मावशी – मथुरा माय...!
राम माझा वर्गबंधू. का कोण जाणे, पण त्याचे माझ्यावर खूप प्रेम. कधी वर्गात किंवा रस्त्यात कुणाशी माझे भांडण झाले, तर माझ्या वतीने राम समोरच्या `दुश्मना`शी मारामारी करायचा. राम शेतकरी कुटुंबातला. घरात गुरे-ढोरे. कधी जनावरे चरून आली की त्यांना नदीवर नेवून व्हावू घालायची जबाबदारी रामवर यायची. मग तो चार-सहा जनावरे घेवून नदीवर निघायचा. नदीचा रस्ता आमच्या घरावरूनच जायचा. रामची हाक आली की त्या जनावरांच्या मागोमाग रामसोबत मी निघायचो. तेव्हा नदीला वर्षातले ८-९ महिने पाणी असायचे. जनावरे नदीत डुंबायची. एकेका जनावराला उभे करून राम दगडाने घासायचा आणि मी त्यांच्या पाठीवर पाणी उडवायचो.
एकदा राम म्हणाला - `दुध पिणार का?`
मी बोलून गेलो - `हो`.
राम म्हणाला - `बस खाली`...!
नदीला पाणी कमी होते. मी तसाच गायीच्या आचळाखाली पायाच्या चवड्यावर बसलो आणि रामने चक्क आचाळाची दिशा माझ्या तोंडाकडे करून थेट तोंडात दुध काढायला सुरुवात केली. हे खरेखुरे `धारोष्ण` दुध पिण्याचे भाग्य रामने मला अनेकदा मिळवून दिले. आज राम नाही. काही वर्षांपूर्वी देवाने त्याला बोलावून घेतले, असे मला कळले. वाईट वाटले...
रामनंतर दुधासाठी आठवते `मथुरा माय`. मथुरा माय ही साऱ्या गावाची `माय`! जख्ख म्हातारी. वृद्धत्वाच्या सुरकुत्या चेहऱ्यावर सुरेखपणे पसरलेल्या... आमच्या घरापासून जवळच वीरभद्रच्या मंदिराजवळ त्या राहायच्या. त्यांना दोन मुले. ती शेतीत काम करीत. पण घरातील दुध-दुभत्याची जबाबदारी मथुरा मायची. आम्ही मुले त्यांना `मथुरा मावशी` म्हणत असू. त्यांच्या शेतातला एक एक आंबा मोठ्या तांब्याएवढा. दोन आंब्यांचा रस आमच्या चौघांच्या कुटुंबाला पुरायचा. अशा या मथुरा मावशी आमच्याकडे दुध देत. आमच्याकडे त्याला `वरवा` म्हटले जायचे. दररोज एक लिटर दुधाचा वरवा!
मावशी मोठ्या तांब्यात दुध आणायच्या. बिन पाण्याचे दुध. पण कधी कधी त्यात पाणी असायचे... मोह कुणाला सुटलाय? त्यावर उपाय? दादा दुधाचे चार थेंब डाव्या तळव्यावर घ्यायचे, उजव्या हाताने त्यावर तुरटी फिरवायचे. हे दुध घट्ट राहिले तर दुध `निक्के` म्हणजे शुद्ध आहे आणि फुटले तर त्यात पाणी...! असे पाणी असलेले दुध असेल तर दादा ते घ्यायचे नाहीत. महिन्यातून एक-दोनदा हा प्रकार घडायचा. दुध परत जायचे, नवे यायचे. पण मथुरा मावशीचा वरवा बंद झाला नाही!
अधून मधून त्यांच्याकडे एखादी गाय-म्हैस व्यायची. त्या छोट्या खेड्यात अशा बातम्या वेगाने पसरत. गोऱ्हा झाला की कालवड? कुठल्या रंगाची? वासरू किती वेळात उभे राहिले? ही सारी मौल्यवान माहिती घटना घडल्याच्या १०-१५ मिनिटांत गावभर जायची. पहिले १-२ दिवस पार पडले की मथुरा मावशी एखाद दिवशी दोन तांबे आणत. एक, वरव्याचे दुध आणि दुसरा – गीन्नासाठीचे दुध !
`गिन्ना` म्हणजे खरवस. गिन्ना हा कानडी शब्द. कर्नाटक सीमेपासून ८-१० किलोमीटर अंतरावर असल्याने देवणीत कानडी मोठ्या प्रमाणात बोलली जायचे. असे अनेक शब्द व्यवहारात रुळलेले असायचे. तर, हे गिन्न्याचे दुध आले की ते थेट स्टोव्हवर जायचे. पहिल्या २-४ दिवसांत हे दुध अतिशय वेगाने घट्ट व्हायचे. इतके वेगाने की त्यात साखर विरघळण्यासाठी सुद्धा वेळ मिळायचा नाही...! मला हा गिन्ना खूप आवडायचा.. आवडतो...
वरव्याचे दुध तापवले जायचे. दुभत्याच्या लोखंडी कपाटात ठेवले जायचे. कधी बाहेर राहिले आणि उघड्या खिडकीतून मांजर आले की दुध सांडलेच म्हणून समजा. असे कधीतरी व्हायचेच...! कपाटात ठेवलेल्या दुधावर माझा डोळा असायचा. सकाळी शाळेत जाण्याआधी संधी नसायचीच. संध्याकाळी माझ्याआधी आई शाळेतून आलेली असायची. दुधावरची साय विरजण घालणे, ही तिची पहिली पसंदी. कधी ती विसरायची आणि मग माझ्यासाठी ती सुसंधी...! स्वयंपाकघरात कुणी नाही असे पाहून पातेल्यात हात घालायचा, बोटाच्या चिमटीत सापडेल तेवढी साय काढायची आणि थेट जिभेवर...! अहाहा... हेच ते स्वर्गसुख...!
वय वाढले तरी हा मोह सुटत नाही. मागच्या काही वर्षांत `पचेल तेवढेच खावे` हा साक्षात्कार झाल्यामुळे साय खाण्याचे प्रमाण थोडे कमी झालेय खरे, पण कधी मोह अनावर होतो आणि चरबीत थेट वाढ करणारा हा घटक अलगदपणे घशाखाली उतरतो...!
तर अशी ही कहाणी... साय आणि मी... हे जणू अद्वैतच...!