Monday, June 25, 2012
सेंद्रीय शेतीकडे चला...
अभिनेता अमीर खान यांच्या ‘सत्यमेव जयते’च्या 24 जून 2012 च्या भागात सेंद्रीय शेतीविषयी प्रभावी जनजागृती करण्यात आली. हा खरोखरच अतिशय जिव्हाळ्याचा विषय. यावर ठिकठिकाणी उत्तम प्रयोग सुरू आहेत. दुर्दैवाने या प्रयोगांना अद्यापही राजमान्यता मिळत नाही. त्यामुळे शेतकर्यांचेही त्याकडे दुर्लक्ष होते.
माझ्या ‘आयकॉन्स’ सिरीजमध्ये अशी माणसे शोधण्याचा माझा प्रयत्न आहे. 1 एप्रिल 2012 रोजी प्रकाशित झालेल्या ‘लातूर आयकॉन्स’मध्ये निष्ठावंत शेतकरी संदीपान बडगिरे यांच्या प्रयोगांचा वेध मी घेतला. हा लेख आपणा सर्वांसाठी...
------------------------------------------------------------------------------
‘‘गोमुत्र ही शेतकर्यांसाठी आणि समाजासाठीही खूप तारक गोष्ट आहे. माणसाची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आम्ही ‘गोशक्ती’ बनवितो आणि पिकांतील रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी आणि कीटकांचा नाश करण्यासाठी ‘गोबाण’. यासाठी आम्ही गोमुत्र जमिनीवर पडण्याआधीच संकलित करतो. त्यावर विविध प्रक्रिया करतो. यासाठी फक्त सेंद्रीय पदार्थांचाच वापर होतो. साधारण 21 दिवसांच्या मेहनतीनंतर ‘गोबाण’ तयार होतो. हा पिकांसाठी रामबाण उपाय आहे, असे मी स्वानुभवाने सांगतो. आम्ही हे प्रॉडक्ट विक्रीसाठी बाजारात आणले. पण शेतकर्यांना फवारणी केल्याबरोबर अळी मरायला हवी असते. सेंद्रीय पद्धतीत ते अपेक्षित नसते. सेंद्रीय खतांतून आणि कीटकनाशकांमधून पिकांना हवी ती जीवनमूल्येही मिळतात आणि कीटक - अळ्यांना हे पदार्थ वेगळ्या प्रक्रियेने नष्ट करतात. आधी किटकांना भोवळ येते. त्यांच्यातील प्रजननक्षमता नष्ट होते. त्यानंतर त्यांची अन्नावरील वासना उडते आणि ते पिकांतील द्रव्ये खाणे बंद करतात. साधारण तीन ते चार दिवसांत ते मरून पडतात. इतकी वाट पाहण्याची अनेकांची इच्छा नसते. मग ते रासायनिक कीटकनाशकांच्या मागे लागतात. दहा वर्षांपुर्वी वापरली जाणारी कीटकनाशके आता चालत नाहीत. कारण ते पचविण्याची कीटकांची क्षमता वाढली आहे. त्याच्या अनेक पटीने क्षमता असलेली कीटकनाशके वापरावी लागतात. त्यामुळे जमिनीतील ‘मायक्रोऑरगॅनिझम’ नष्ट होतो आहे. माणसांवरही त्याचे दुष्परिणाम होत आहेत. पण हे लोकांना कळत नाही आणि सरकारला त्या बाबतीत काहीच करायचे नाही. त्यांना शेतकर्यांना अज्ञानातच ठेवायचे आहे... ही सारी देशाचा विनाश घडविणारी चिन्हे आहेत...’’ संदिपान बडगिरे मनस्वीपणे बोलत होते. त्यांच्या शब्दाशब्दांतून तळमळ व्यक्त होती. एकेकाळी ‘युक्रांद’च्या झेंड्याखाली झुंज देत आणीबाणीतील तुरुंगवास हसतहसत भोगणार्या बडगिरे यांनी आता स्वबळावर सेंद्रीय शेतीचे प्रयोग हाती घेतले आहेत. 1993 पासून ते या मध्ये मग्न आहेत. आपले अनुभव सर्वांना वाटण्यासाठी ते सदैव तत्पर असतात.
लातूरहून बाभळगावकडे निघालो की बाभळगाव गावात शिरण्याआधीच डाव्या हाताला सोनवतीला जाणारा रस्ता लागतो. सोनवती गावातून डावीकडे वळले की साधारण एक किलोमीटर अंतरावर बडगिरे यांचा अकुजा सेंद्रीय फार्म लागतो. वयाची साठी ओलांडलेले पण पन्नाशीचे दिसणारे संदिपान बडगिरे तेथे असतात. त्यांच्या शब्दांब्दांतून त्यांचे कार्यकर्तेपण डोकावत असते. फक्त फरक एवढाच असतो, की या ‘कार्यकर्ते’पणाला ‘कार्या’ची जोड मिळालेली असते. हवेतील गप्पागोष्टी बडगिरेंना मान्यच नाहीत!
संदिपान निवृत्ती बडगिरे मूळचे सोनवतीचेच. 3 मे 1952 ही त्यांची जन्मतारीख. चौथीपर्यंतचे शिक्षण याच गावात झाल्यानंतर पाचवीपासून पुढे शिकण्यासाठी ते लातूरमध्ये दाखल झाले. त्या वेळच्या ‘पीयूसी’नंतर त्यांनी जून 1975 मध्ये बी. ए.च्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला. जुलै 1975 मध्ये आणीबाणी लागू झाली आणि त्यांची रवानगी तुरुंगात! 1977च्या जानेवारीत ते तुरुंगातून सुटले आणि शिक्षणाला रामराम ठोकून ते ‘युवक क्रांती दला’चे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून बाहेर पडले. 1986 पर्यंत त्यांनी स्वतःला याच कार्यात झोकून दिले. पुढे आयुष्याच्या एका वळणावर ते आपल्या गावी परतले आणि शेती करण्यास सुरवात केली. पहिली पाच-सहा वर्षे रासायनिक शेतीचे मार्ग चाचपडल्यानंतर 1993 पासून त्यांनी सेंद्रीय शेतीच्या प्रयोगांना सुरवात केली. त्यांच्या आजोबांची शंभर एकर जमीन होती. पुढील दोन पिढ्यांमध्ये विभागणी होत आता संदिपानजींच्या वाट्याला 12 एकरांची जमीन आली आहे. 1993 पासून ही जमीन ते स्वतः कसतात. त्यांच्या शेतीत 100 टक्के सेंद्रीय खत व कीटकनाशकांचाच उपयोग होतो. कोणतेही रासायनिक घटक येथे वापरले जात नाहीत.
या विषयाची सुरवात 1993 मध्ये झाली. लौकीक शिक्षण बी. ए.च्या पहिल्या वर्षात थांबले असले तरी जीवनाच्या शिक्षणात त्यांनी उच्चशिक्षण प्राप्त केले होते. त्यांच्या कार्याला चिंतनाची, वाचनाची जोड होती. यातूनच शेतीतील पारंपरिक मार्गांची ओळख त्यांना झाली. भारतीय परंपरेत गोधन हे शेतीतील महत्वाचे साधन आहे. गोमुत्र पवित्र मानले जाते खरे, पण या पावित्र्याचा झापडबंद अर्थ न घेता त्यांनी त्यातील सारतत्व शोधण्याचा प्रयत्न केला आणि डोळसपणे त्याचे पावित्र्य तपासले. त्यातील पिकांना आणि माणसांना उपयुक्त असलेले गुणधर्म लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यावर शास्त्रीय प्रयोग केले आणि त्यातून माणसांसाठी आणि पिकांसाठी उपयुक्त ठरणारे ‘गोशक्ती’ आणि ‘गोबाण’ यांची निर्मिती त्यांनी सुरू केली.
ते म्हणतात, ‘‘गावरान गायींच्या मुत्रात नायट्रोजन, सल्फर, अमोनिया, कॉपर, आयर्न, युरिक ऍसिड, फॉस्फेट, सोडियम असे विविध मौल्यवान घटक आहेत. अशा परिपूर्ण घटकांचा समावेश असलेल्या गोमुत्रावर विविध आयुर्वेदिक प्रक्रिया करून आम्ही गोशक्ती बनवितो. माणसांचे शरीर रोगमुक्त राहण्यासाठी याचा उत्तम उपयोग होतो. ‘गोबाण’मध्ये याच गोमुत्रावर काही वेगळ्या प्रक्रिया केल्या जातात. त्यात आणखी काही वनस्पतींचा अर्क मिसळला जातो. साधारण 21 दिवसांच्या प्रक्रियेनंतर ‘गोबाण’ विक्रीसाठी तयार होतो.’’
केवळ ही निर्मिती करून ते शांत बसले नाहीत. हा त्यांच्या कार्याचा एक छोटासा भाग आहे. त्यांनी हाती घेतलेले मुख्य कार्य आहे ते सेंद्रीय शेतीच्या व्यापक प्रचाराचे. या साठी त्यांनी अनेक पुस्तिका लिहिल्या आहेत. पत्रके काढली आहेत. अनेक ठिकाणी जाऊन व्याख्याने दिली आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या स्वतःच्या 12 एकर शेतात ते स्वतः याच पद्धतीने शेती कसत आहेत. समर्थ रामदासांनी सांगितलेल्या ‘मूर्ख लक्षणां’मध्ये ’स्वतः न कसे, दुसर्यास कसाया न देई, शेती पाडून ठेवी, तो एक मूर्ख’ असे वर्णन आहे. तो आधार घेत ते शेतकर्यांची आगळी चळवळ उभी करण्याच्या प्रयत्नात आहेत.
त्यांच्या मते सरकार प्रोत्साहन देत असलेली ‘व्यापारी शेती’ शेतकर्यांसाठी आणि देशासाठीही घातक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश पार्लमेंटमध्ये लॉर्ड मेकॉलेने 2 फेब्रुवारी 1835 रोजी केलेल्या भाषणात म्हटले होते, ‘‘भारत हा देश इतका समृद्ध आहे, तिथली नैतिक मूल्ये इतकी उच्च आहेत आणि लोक इतके सक्षम योग्यतेचे आहेत की आपण हा देश कधी जिंकू शकू असे मला वाटत नाही. या देशाची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा हा या देशाचा कणा आहे. आणि आपल्याला हा देश जिंकायचा असेल, तर तोच कणा मोडायला हवा. त्यासाठी त्यांची प्राचीन श्रमाधारित शिक्षणपद्धती आणि त्यांची संस्कृती बदलावी लागेल.’’ पुढचा इतिहास आपल्याला ठावूकच आहे. ब्रिटिशांनी शिक्षण आणि श्रमाची फारकत केली. ब्रिटिशांचे आदेश पाळणार्या गुलामांच्या फौजा त्यांनी निर्माण केल्या. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही यात बदल झाला नाही. आता या फौजा सरकारचे ऐकतात. सरकारला हे चित्र बदलण्याची इच्छा नाही. पण हेच चित्र कायम राहिले तर हा देश नष्ट होईल, असे संदीपानजी सांगतात. या साठी सर्वात आधी शेतकरी शहाणा झाला पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे आणि सरकार शेतकर्याला शहाणा होऊच देत नाही, असा त्यांचा आरोप आहे. यावर उत्तर म्हणून ते स्वतःच ‘सेंद्रीय शेती जनआंदोलन’ चालवीत आहेत. साध्या जीवनपद्धतीचा स्वीकार, श्रमसंस्कृतीची जोपासना, व्यापारी व रासायनिक शेतीपद्धतीचा त्याग आणि शेतकर्यांचे संघटन या चतुःसुत्रीवर त्यांचे काम चालू आहे.
ते म्हणतात, ‘‘निसर्गालाच एक पीक पद्धत मान्य नाही. एकाच शेतात मिश्रपद्धतीने एकदल- द्विदल प्रकारची अनेक पिके आपण घेतली तर जमिनीतील अन्नघटक आणि ओलावा घेण्याची पिकांत स्पर्धा होत नाही. ही पिके कमी-जास्त उंचीची असल्याने आणि वेगवेगळ्या काळात वाढत असल्याने त्यांना सूर्यप्रकाशही भरपूर मिळतो. जमिनीवर सेंद्रीय पदार्थही भरपूर पडतात. त्यामुळे त्यावर जगणारे जिवाणूही योग्य प्रमाणात वाढतात. जमीनीवर सेंद्रीय पदार्थांचे अच्छादन निर्माण झाल्याने पावसाच्या पाण्याची ओल उडून जात नाही आणि वाफसाही लवकर येतो. त्यामुळे पिकांबरोबरच जमिनीचा पोतही सुधारतो.’’
या संदर्भात ते एक मॉडेलही शेतकर्यांसमोर ठेवू इच्छितात. ‘‘तीन फणांच्या औजाराने दक्षिण-उत्तर पेरणी करणार असाल, तर उत्तरेकडे पेरत जाताना बाजूच्या दोन नळ्याने तूर पेरून मधल्या नळ्याने हिरवळीचे पीक (ताग, धेंचा, बाजरी इ. द्विदल बियाणे) 1:2 या प्रमाणात मिसळून पेरावे आणि परत दक्षिणेकडे पेरत जाताना बाजूच्या दोन नळ्यांनी मूग पेरावे आणि मधल्या नळीने पिवळी ज्वारी किंवा आपल्या परिसरातील कोणतीही गावरान ज्वारी पेरावी. या पद्धतीने शेतात आपण दर 20 फुटांवर मुगाच्या ठिकाणी बदल करून उडीद, तीळ व सोयाबीन पेरू शकतो. या पद्धतीने एका शेतात आपण सात-आठ पिके पेरू शकतो. या पद्धतीत हिरवळीच्या लाईनमधील पिकाच्या दीड महिन्यांच्या अंतराने दोन छाटण्या करून तुरीच्या ओळीच्या शेजारी टाकल्याने जमिनीला सेंद्रीय पदार्थ मिळतात व त्यावर जिवाणू वाढतात. तसेच हिरवळीच्या (द्विदल) पिकाच्या व तूर, मूग, उडीद, सोयाबीन पिकांच्या मुळ्यावरील नत्राच्या गाठींमुळे जमिनीतील सेंद्रीय नत्राचे प्रमाण वाढते. तूर व पिवळा उंच वाढण्यापुर्वी मूग, तीळ, उडीद व सोयाबीन निघून जाते. तूर वाढण्यापुर्वी पिवळी ज्वारी निघून जाते आणि तुरीच्या वाढीला जागा मोकळी होते. पिवळ्या ज्वारीच्या मुळ्या जमीनीच्या वरच्या थरात वाढत जात असल्याने त्या मूग, उडीद व तीळ यांच्याशी स्पर्धा करीत नाहीत. तुरीच्या मुळ्या या सर्वांपेक्षा खोल जात असल्याने सर्वच पिकांची जोमदार वाढ होते. ही बहुविध पीक पद्धत असल्याने कोणत्याही पिकावरील अळीला सक्रीय होऊन वाढण्यात अडथळा येतो. ही पीकपद्धत दरवर्षी वेगळ्या जमिनीत घेतल्याने अळीची अंडी मातीत सुप्त अवस्थेत जास्त दिवस राहात नाहीत. या पद्धतीत रासायनिक फवारणी अजिबात केली जात नसल्याने सर्व मित्र किडी, पक्षी सुरक्षित राहतात. त्यामुळे या पद्धतीत पीक कोणत्याही रोगाला बळी पडत नाही. अशा पद्धतीने एकदल-द्विदल पिकांच्या अनेक जोड्या लावून खरीप व रब्बी हंगामात शेतकर्यांना कोणतीही पिके पेरता येतील. या पद्धतीतून कोरडवाहू आणि बागायत जमिनीतून कमी पाण्यात, मातीचा पोत वाढवत हमखास उत्पन्न तर मिळेलच पण त्याच बरोबर कुटुंबाला लागेल ते सर्व प्रकारचे धान्य व भाज्या विषमुक्त, सकस, चवदार व टिकावू मिळतील तसेच जनावरांसाठी वैरणही मिळेल आणि हळूहळू उत्पादनखर्च शून्यावर येईल.’’
स्वबळावर हे सारे उपक्रम करणार्या संदिपानजींचा विविध चळवळींवरील विश्र्वास आता कमी झाला आहे. आपला विचार त्यांनी विविध व्यासपीठांवरून मांडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना तेथे यश मिळाले नाही. म्हणून त्यांनी आता आपला मार्ग स्वतःच बनविण्याचा निर्धार केला आहे. वयाच्या साठीमध्ये हा ‘युवक’ पुन्हा एकदा ‘क्रांती’ची हाक देत शेतकर्यांच्या ‘दला’च्या पुनर्स्थापनेची ललकारी घुमवीत आहे. या चळवळीत त्यांच्या पाठीशी आहे गांधीजींचे तत्वज्ञान...!
ंं
संदिपान बडगिरे
अकुजा सेंद्रीय फार्म, सोनवती, ता. जि. लातूर
Subscribe to:
Posts (Atom)