Saturday, October 26, 2013

एका षंढ नागरिकाचे मनोगत...

नमस्कार
औरंगाबाद या थंड शहराचा एक षंढ नागरिक म्हणून आपणाशी संवाद साधताना मला आनंद होत आहे.

या शहरातील एक जागरूक नागरिक श्री. श्रीकांत उमरीकर यांनी शहरातील खड्डयाविरुद्ध आवाज उठविला आणि त्याची शिक्षा त्यांना मिळाली. सध्या ते हर्सूलच्या तुरुंगात आहेत. वास्तविक, ते माझे मित्र आहेत, पण आज मी `माझे मित्र` अशी त्यांची ओळख सांगणार नाही. मी उगाच काही नेत्यांच्या, अधिकाऱ्यांच्या नजरेत येईन, मग मला त्रास होऊ शकेल. मी बालबच्चेवाला आदमी. उमरीकराना सुद्धा बायका-पोरे आहेत, पण मला काय त्याचे? मी सुरक्षित राहिलो पाहिजे. `मी, माझे कुटुंब, माझा टीव्ही, माझे घर सुरक्षित तर देश सुरक्षित`, असा माझा नारा आहे...!

उमरीकराना काय पडले होते? कशाला त्यांनी आंदोलन केले? आम्ही या शहरात राहत नाही का? आम्ही खड्डे सहन करतोच ना? आमच्यातीलसुद्धा काही जणांना मणक्यांचे त्रास झाले, अपघात झाले, घराबाहेर पडण्याची भीती वाटते, पण आम्ही काही म्हणालो का? रस्त्यात खड्डे पडतच असतात. खड्डे नसतील तर रस्ते कसे? रस्ते नसतील तर कामे कशी? कामे नसतील तर कंत्राटे कशी? कंत्राटे नसतील तर पैसा कसा? पैसे नसतील तर राजकारण काय कामाचे? राजकारण नसेल तर अधिकारी काय कामाचे? काहीच नसेल तर महापालिका काय कामाची? तशी आमची महापालिका जागरूक आहे. त्यांनी शहरात ठिकठिकाणी मोट्ठे बोर्ड लावले आहेत. `अमुक ठिकाणापासून तमुक ठिकाणापर्यंतचा रस्ता अमुक तमुक खात्याच्या आखत्यारीत आहे.` एवढे केले की त्यांची जबाबदारी संपली. इतर रस्ते कसेही असोत, ते तसे असावेत हा त्यांचा हक्कच आहे ना...!
आम्ही प्रातःस्मरणीय महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे सभापती, सदस्य, नगरसेवक, आयुक्त, उपायुक्त, सर्व अधिकारी यांच्याबद्दल पूर्ण आदर बाळगून असे सांगू इच्छितो, की आम्ही उमरीकर यांना पाठींबा देत नाही. त्यामुळे, कृपया आमच्याबद्दल आकस ठेवू नये. सध्या असलेले रस्ते अतिशय उत्तम आहेत. त्याबद्दल आमची तक्रार नाही. आमची कशाबद्दलच तक्रार नाही. रस्त्यांवर पथदिवे नाहीत, त्याबद्दल तक्रार नाही. उड्डाणपुल अंधारात आहे, हे आम्हाला मंजूर आहे. सर्व नाल्या बुजलेल्या अवस्थेत आहेत, या कडे आम्ही दुर्लक्ष करतो. कचरा साठलेला असला, तो उचलला गेला नसला, तरी आमचे काही म्हणणे नाही. पाणीपुरवठा अपुरा होतो, तीन ते चार दिवसाआड होतो हे खरेच, पण तो `होतो` हे काय कमी आहे? समांतर जलवाहिनीचा विषय आम्ही मनातही आणत नाही. कारण त्यासाठी आजवर झालेला खर्च नेमका कुठे जिरला? या बद्दल आम्हाला खरेच काहीही माहिती नाही. रस्त्यात थोडेफार खड्डे आहेत, पण अनेक रस्ते सलग १५ फुटापर्यंत उत्तम अवस्थेत असल्याचे आम्ही अनुभवले आहे. कोणत्याही रस्त्यातील एकही खड्डा २ फुटांपेक्षा खोल नाही, हे आम्ही छातीठोकपणे सांगतो. योगायोगाने, तसे असेल तर त्याकडे दुर्लक्ष्य करावे.
आमची षंढपणाची खात्री आम्ही अनेकदा दिली आहे. क्रांतीचौकातील उड्डाणपूल किती वर्षे रखडला... आम्ही काही म्हणालो? सेवन हिल वरील उड्डाणपुलावरील डांबर पहिल्याच पावसात उखडले, आम्ही काही म्हणालो? त्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली अनेक महिने पुलाची एक बाजू अडवून धरली, त्याकाळात आम्ही अपरिमित त्रास सहन केला... पण आम्ही काही म्हणालो? सध्या संग्रामनगर उड्डाणपुलाचा मुद्दा रखडला आहे. रेल्वेचे निर्लज्ज कंत्राटदार आणि बेमुर्वतखोर अधिकारी यांच्याबद्दल आम्ही काही भूमिका घेतली का? अजिबात नाही. त्रास नसेल तर जगण्यात रस काय? खरे आहे ना?
श्री. उमरीकर यांनी असे काही करावयास नको होते. एक जागरूक नागरिक या नात्याने त्यांनी खाजगीत चर्चा केली असती, तरी चालले असते. पण त्यांनी चक्क रास्ता-रोको केला, त्यांना ४००-५०० जणांनी साथ दिली. समृद्ध लोकशाहीच्या सबलीकरणासाठी हे घातक आहे. लोक आवाज उठवीत असतील, त्यातून असंतोष व्यक्त होत असेल, त्याचे लोण शहरभर पसरले, त्यातून जनआंदोलन झाले, तर सर्वांच्याच बुडाखाली दिवाळी आधी फटाके फुटतील, अशा भीतीपोटी आदरणीय लोकप्रतिनिधी वर्गाने पोलिस यंत्रणेला हात जोडून विनंती केली असावी. त्यातून २४ तासानंतर ही अटक झाली असावी. शहरातील भावी अशांतता टाळल्याबद्दल खरे तर सर्वांचे अभिनंदन करावयास हवे. त्यासाठी महापालिकेत ठराव आणायला हवा.
मी सर्व नागरिकांना विनंती करतो, की कुणीही या विषयावर प्रतिक्रिया देऊ नये. उगाच असंतोषाचे कारण ठरू नये. कारण, असे झाले तर तुम्हालाही `हर्सूल-दर्शन` होऊ शकेल. ज्या व्यवस्थेने अण्णा हजारे पचवले, त्यासमोर उमरीकर काय चीज? तुम्ही उगाच एखाददिवस उद्रेक कराल... पण त्याचा उपयोग नाही. षंढानी षंढाप्रमाणे राहावे. उगाच मर्दानगी दाखवू नये, असे माझे सर्व औरंगाबादकराना आवाहन आहे. दाखविली तर काय होते, याचे उदाहरण व्यवस्थेने दाखवून दिले आहे.
आपण विचार करावा. आपण समजदार आहात.धन्यवाद.
या शहरातील षंढ नागरिक
-    दत्ता जोशी, औरंगाबाद

-    ९४२२ २५ २५ ५०