Thursday, July 7, 2011

साहित्य संमेलने जातींची व्हावीत आणि साहित्य प्रकारांची सुद्धा!

`दैनिक लोकमत` च्या `हेलो औरंगाबाद` मध्ये दर शुक्रवारी प्रकाशित होत असलेल्या 'संस्कृती, साहित्य वगैरे' या स्तंभात 8-7-2011 रोजी प्रकाशित झालेला हा लेख. 
................................................................................

एका ज्येष्ठ वात्रटिकाकारांनी एका जातीच्या साहित्य संमेलनात ‘अशी जातीच्या आधारावरील साहित्य संमेलने असू नयेत’ असे मत मांडले. त्यानंतर मराठी सारस्वतात पुन्हा एकदा या विषयावर चर्चेला तोंड फुटले. जातीनिहाय साहित्य संमेलने व्हावीत की नाही हा मुद्दा पूर्वापार वादाचा ठरलेला आहे. या विषयात सरळसरळ दोन गट पडलेले आहेत. एक गट अशा संमेलनांच्या तीव्रपणे विरोधात आहे. साहित्यिकांमध्ये आणि साहित्यामध्ये भेदाभेद करणारे हे आयोजन योग्य नाही असे त्यांचे ठाम मत असते. या उलट मुख्य प्रवाहातील साहित्य संमेलनात अनेक नवोदितांना स्थान मिळत नाही, उलट जातीनिहाय संमेलनांमध्ये या नवोदितांना स्थान मिळते आणि त्याच बरोबर मान्यवरांचे मार्गदर्शनही मिळते, असा या गटाचा युक्तिवाद आहे.
खरेच जातीनिहाय संमेलन असावे का? अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे चित्र नजरेसमोर ठेवून या विषयाचा विचार करावा, असे मला वाटते. महाराष्ट्रातील तमाम मराठी विश्र्वाचे आणि महाराष्ट्राबाहेरील मराठीजनांचे समग्र प्रतिबिंब या संमेलनात उमटते असा दावा कोणी करू शकेल का? यजमान संस्था, साहित्य महामंडळ आणि त्या त्या संमेलनातील प्रभावशील व्यक्ती यांच्या इच्छेनुसार साहित्य संमेलनाचा चेहरा निश्चित होतो. अनेकदा संमेलनाबाहेरील आणि साहित्यबाह्य दबावगट संमेलनाच्या आयोजनावर परिणाम करून जातात. परस्पर अहंकाराच्या मुद्‌द्यांवरून वादंग उठविले जाते. महाबळेश्र्वरच्या संमेलनात साक्षात संमेलनाध्यक्षांनाच संमेलनाबाहेर काढण्यात आले तर ठाण्याच्या संमेलनात ‘नथुराम गोडसे’ या नावावरून गदारोळ उठला. यामध्ये साहित्याचा मूळ मुद्दा बाजूला राहतो आणि संमेलनाच्या मंडपातही बाकीचेच विषय चघळले जातात. अशा स्थितीत सर्व समाजघटकांना आणि सर्व साहित्यप्रकारांना योग्य स्थान मिळते का? 
जातींचा विचार करताना काही जातीनिहाय नावांचा विचार करू या. विश्र्वास पाटील, आनंद यादव, राजन गवस, रंगनाथ पठारे, सदानंद देशमुख, शेषराव मोरे, फ. मुं. शिंदे,  इंद्रजित भालेराव, रमेश इंगळे उत्रादकर, बाबू बिरादार, प्रवीण बांदेकर आदी साहित्यिक मराठा समाजातून आलेले आहेत. नामदेव ढसाळ, उत्तम कांबळे, नामदेव चं. कांबळे, लक्ष्मण गायकवाड,  विजय जावळे, प्रज्ञा लोखंडे, उर्मिला पवार आदी मंडळी दलित समाजातून आलेली आहे. वसंत आबाजी डहाके, ना. धों. महानोर, प्रकाश होळकर, सौमित्र - किशोर कदम आदी मंडळी ‘ओबीसी’ गटातील आहे. फादर फ्रान्सिस दिब्रिटो, निरंजन उजगरे, सिसिलिया कार्व्हालो आदी साहित्यिक ख्रिस्ती समाजातील आहेत तर डॉ. यु. म. पठाण, हमीद दलवाई, रफिक सूरज, फ. म. शहाजिंदे, फक्रुद्दीन बेन्नुर, अजीम नवाज राही आदी साहित्यिक मुस्लिम समाजातून आलेले आहेत. यांच्या जातीधर्माचे प्रतिबिंब यांच्या साहित्यात कितपत उमटलेले असते? काही प्रमाणात दलित आत्मकथनाचा भाग सोडला तर तशा अर्थाने संबंधित साहित्यिकांचा आणि त्यांच्या जातीधर्माचा काहीही संंबंध नसतो. तेथे संबंध उरतो तो फक्त वाङ्‌मयीन मूल्यांशी. ही मूल्ये कोणत्याही व्यासपीठावरून मांडली तरी त्यात काही फरक पडत नाही. 
वाङ्‌मयाचे मूल्यमापन लेखनावरून व्हावे की सादरीकरणावरून हा प्रश्नही लाखमोलाचा आहे. साहित्य व्यासपीठावरूनच मांडण्याऐवजी पुस्तकांतूनच मांडणे योग्य, असा एक मतप्रवाह आहे. पण आता काळ बदलतो आहे. साहित्यिक प्रेरणा वाढत आहेत. साहित्यिकांची संख्या वाढते आहे. अभिव्यक्तीचे मार्ग वाढत आहेत. साहित्याच्या अभिव्यक्तीसाठी आता केवळ पुस्तके किंवा छापील नियतकालिके एवढेच मार्ग उरलेले नाहीत. विशेषतः इंटरनेटसारख्या माध्यमाचा वापर या साठी मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. ‘फेसबुक कम्युनिटी’, ‘ब्लॉग’ आदींसारख्या माध्यमातून या अभिव्यक्तीला नवनवे धुमारे फुटत आहेत. त्यामुळे आता कोणत्याही परंपरागत औपचारिक मंचाची गरज उरलेली नाही. 
साहित्यचर्चेचा जो हेतू अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून साध्य करण्याचा प्रयत्न होतो तोच हेतू जिल्हा किंवा तालुकास्तरीय साहित्य संमेलनातूनही साध्य करण्याचा प्रयत्न होत असतो. विविध भौगोलिक स्तरांवरील साहित्य संमेलनांना एकमुखी मान्यता मिळते तर मग जातीनिहाय संमेलनांना का नाही? या संमेलनातही साहित्यिक चर्चाच अपेक्षित असतात. अ. भा. संमेलनांत प्रस्थापितांचा सहभाग असतो. तेथे नवोदितांना मिळणार्‍या संधीचा कोणी विचार केला आहे? 24 तास चालणार्‍या कट्‌ट्यांवरून दिली जाणारी संधी खरोखरच न्याय्य असते का? अशा पर्यायांना कोण किती गांभीर्याने घेतो? अशा स्थितीत नवोदितांना स्थान कधी मिळणार? त्यांच्या साहित्याला समाजाचे व्यासपीठ कधी मिळणार? या हेतूने अशी संमेलने आयोजित झाली, तर काय हरकत असावी? 
या पार्श्वभूमीवर फक्त एकच मुद्दाविरोधकांच्या मताला पुष्टी देणारा ठरतो. तो आहे अशा जातीनिहाय संमेेलनात साहित्यबाह्य मुद्‌द्यांचा होणारा शिरकाव आणि अनेकदा त्यांचाच जाणवणारा प्रभाव. अशा प्रकारची जातीनिहाय साहित्यसंमेलने आता द्वेष पसरविणारी केंद्रे बनत आहेत की काय अशी शंका येऊ लागली आहे. काही सन्माननीय अपवाद वगळता आता अशा संमेलनात चर्चा झालेले विषय समाजस्वास्थ्य बिघडविणारे असल्याचे दिसते. अशी संमेलने त्या त्या जातीतील नवोदितांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्याहून मोठ्या व्यासपीठावर पोहचण्याची शिफारस ठरली पाहिजेत. यातून नवे साहित्यिक समाजासमोर आले पाहिजेत. सध्या ज्या जाती अशा संमेलनांचे आयोजन करीत नाहीत, त्यांनीही अशी संमेलने भरविण्याचे मनावर घेतले पाहिजे. इतर कोणा जातीला लक्ष्य ठरवून होणारी चिखलफेक मात्र सर्वांनीच टाळली पाहिजे. साहित्यिक मंचांचे राजकीयीकरण टाळलेच पाहिजे.
याच बरोबर साहित्याच्या कथा, कविता, कादंबरी, लघुकथा, विनोदी साहित्य अशा विविध प्रकारांची संमलने भरायला काय हरकत आहे? जातीनिहाय संमेलनांतून जातीच्या पातळीवर आणि साहित्यप्रकारानुसार संमेलनांतून अशा प्रकारांवर लक्ष केंद्रित करता आले, तर या दोन्ही मार्गांद्वारे साहित्यप्रवाह अधिक समृद्ध होण्यास मदतच होईल.
- दत्ता जोशी
9225 30 90 10