Tuesday, December 19, 2017

हे अधमरक्तरञ्जिते सुजनपूजिते... श्री स्वतंत्रते...(© दत्ता जोशी, औरंगाबाद)
सेल्यूलर जेलच्या पहिल्या पायरीला वाकून नमस्कार करीत स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या त्या तीर्थस्थळी अत्यंत विनम्रतेने प्रवेश करताना मनात असंख्य भावनांचे काहूर माजलेले होते. शालेय वयात कधीतरी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या नावाचा पहिला परिचय झाला तेव्हापासून भगूर, अंदमान आणि रत्नागिरी या तीन स्थानांची नोंद मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी ‘तीर्थस्थळ’ म्हणून झालेली होती. त्यातील अंदमान सहजसाध्य नव्हते. अनेक वर्षांपासून मनस्वी इच्छा होती. या वर्षी 18 डिसेंबर रोजी ती पूर्ण झाली.

जेलच्या पहिल्या बराकीच्या बाजूने पुढे चालताना उजवीकडे सातव्या बराकीच्या तिसर्‍या मजल्यावरची कोपर्‍यातील कोठडी दिसली आणि मनात अस्वस्थता दाटण्याला सुरुवात झाली. एक एक पाऊल पुढे टाकत होतो तसे मन भूतकाळात जात होते. सूर्यकिरणांप्रमाणे सात दिशांना पसरलेल्या मूळ सात बराकी, त्यांना मध्यभागी जोडणारा उंच टॉवर, त्या बाजूने वरती गेलेला जिना... प्रत्येक पाऊल पुढे टाकताना, एक एक पायरी चढताना शरीराला जडत्व येत होते.

तिसरा मजला चढलो, डावीकडे वळलो, बराकीचा मुख्य लोखंडी दरवाजा पार केला आणि एक एक पाऊल टाकत टोकाकडे निघालो, तशी हृदयाची धडधड वाढली... डावीकडे एक एक कोठडी... तिला असलेला भक्कम दरवाजा... भास होऊ लागला, की आत अंदमानातले ते सारे स्वातंत्र्यवीर आहेत.. ते सारे उच्चरवाने घोषणा देताहेत... ‘भारत माता की जय’... ‘वंदे मातरम्’... ‘इन्कलाब जिंदाबाद’... आणि शरीराच्या रोमरोमी रोमांच फुललेल्या अवस्थेत मी शेवटच्या कोठडीपर्यंत पोहोचतो... या कोठडीला बाहेरून आणखी एक दरवाजा... इथेच तर ब्रिटिशांचा ‘मोस्ट डेंजरस’ कैदी बंद होता ना... एवढी कडेकोट सुरक्षा इथे हवीच...!

माझी पत्नी पद्मजा माझ्या पुढेच चालत होती. तिचीही अवस्था माझ्यासारखीच झाली असावी. तिने पायातले बूट बाहेर काढून ठेवले... मीही बूट-सॉक्स काढले... अनवाणी पायाने, भरलेल्या डोळ्यांनी स्वातंत्र्याच्या त्या गाभार्‍याच्या चौकटीला आम्ही प्रणाम केला आणि आत पाऊल ठेवले... ती काळकोठडी चोहोबाजूने अंगावर धावून आली. याच कोठडीत 10 वर्षांहून अधिक काळ राहून माझ्या देशाच्या स्वातंत्र्यवीराने ब्रिटिशांना घाम फोडला होता. विलक्षण आत्मबळ असलेल्या विनायक दामोदर सावरकर नावाच्या एका बॅरिस्टराने संपन्न वैयक्तिक करिअर बाजूला ठेवून भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी त्यागाचे परमोच्च उदाहरण घालून दिलेले होते.


इथे उभा होतो तेव्हा शंभर वर्षांपूर्वीचा काळ एखाद्या चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोरून धावत होता. जुलमी जेलर विल्यम बॅरी, त्याचे तेवढेच क्रूरकर्मा साथीदार, न्यायाच्या नावाने जगभर भलावण करणारे आणि प्रत्यक्षात रक्तपिपासू असलेले ब्रिटिश राजघराणे, त्यांचे सरकार... या सर्वांना उच्चरवाने आव्हान देणारा स्वातंत्र्यवीर... आपल्या विलक्षण आत्मबळाने आपले अस्तित्त्व सार्थकी लावणारा आणि अंदमानातील इतर राजबंद्यांनाही विजिगिषु प्रेरणा देणारा नरवीर...

कोठडीत लावलेल्या प्रतिमेला नमस्कार केला. लाकडी फळीवर अंथरलेले ब्लँकेट... त्यावर असलेली प्रतिमा आणि समोर ठेवलेले दोन लोखंडी वाडगे... ऊर भरून आला. त्या फळीवर मस्तक टेकवले... दोन्ही वाडगी कवेत घेतली... यातील कणाकणांना सावरकरांचा परीसस्पर्श झालेला... तो स्पर्श मी अधाशासारखा शोषून घेत होतो... तिथून उठलो... भिंतीला अलिंगन दिले... त्यावर कानशिल टेकवताना जणू सावरकरांच्या छातीवरच टेकल्याचा भास झाला... त्यांच्या दमदार श्वासाची धीरोदात्त लय जाणवू लागली... जणू ती सांगत होती, ‘‘अरे, नुसत्या आठवणींनी केविलवाणा झालास? मी 11 वर्षे इथे काढली आहेत. जिथून माझे प्रेतच बाहेर जावे अशी ब्रिटिशांची इच्छा होती तिथून मी जिवंतपणी बाहेर पडलोच, पण त्यांना या देशाबाहेर काढण्याचा सुवर्णक्षणही अनुभवता आला. तुमची पिढी सुदैवी आहे. तुम्ही स्वतंत्र भारतात जन्मलात, आपल्या विचारांचा ब्रिटिशांइतकाच द्वेष करणारी मंडळी शेजारी आहे पण राष्ट्रीय विचारांची ताकदही नक्कीच वाढली आहे. अजून बलशाली व्हा. राष्ट्र बलशाली करा...’’

याच भिंतीवर सावरकरांनी ‘कमला’ उतरवले होते. याच कोठडीत त्यांचे स्वातंत्र्यचिंतन चालू होते. जेलर बॅरीच्या रूपाने ब्रिटिश राजसत्तेचे आघात सोसत असतानाच ते अधिकाधिक दृढनिश्चयी बनत होते.

हे अधमरक्तरञ्जिते सुजनपूजिते श्री स्वतन्त्रते
तुजसाठि मरण तें जनन... तुजवीण जनन तें मरण
तुज सकल-चराचर-शरण चराचर-शरण

अशी स्वातंत्र्यदेवतेची कठोर आळवणी करतानाच

गालावरच्या कुसुमीं किंवा कुसुमांच्या गालीं
स्वतन्त्रते भगवती तूच जी विलसतसे लाली
तु सूर्याचें तेज उदधिचे गांभीर्यहिं तूचि
स्वतन्त्रते भगवती अन्यथा ग्रहणनष्टतेची...

असे आलंकारिक वर्णनही करत स्वातंत्र्यदेवतेची उच्चरवानेे आळवणी करणारा हा स्वातंत्र्यवीर क्रांतीकारकांचा मेरूमणी ठरला.

साडेसात गुणिले बारा फुटांच्या त्या कोठडीत आयुष्याची सुमारे 11 वर्षे विलक्षण मनोधैर्याने काढत असताना ते खच्ची करण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू होताच. त्याच कोठडीच्या बरोबर खाली कैद्यांचे फाशीघर आहे. त्या फाशीघरासमोरच फाशीच्या कैद्यांच्या अखेरच्या अंघोळीची व्यवस्था... दोन बराकींच्या मध्यभागी ब्रिटिशांची छळछावणी... जिथे अर्धपोटी राजबंद्यांकडून कोलू ओढवला जायचा, काथ्या कुटून दोर वळवून घेतले जायचे आणि रोजची मागणी पूर्ण न करणार्‍यांवर अक्षरशः अमानवी अत्याचार केले जायचे. इथून खूप कमी कैदी जिवंत परतले. जे परतले त्यांच्या शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक शक्ती अधिक भक्कम... तात्याराव आणि बाबाराव हे दोन सख्खे बंधू त्यांच्यापैकीच... त्यांनी सारे आयुष्य देशासाठी, देशहितासाठी खर्चले... ते अमर ठरले...

पण या अमरत्वाला आपल्या माकडचेष्टांनी गालबोट लावण्याचा प्रयत्न करणारी मंडळी आजही आहेत. त्या कोठडीतून बाहेर पडताना समोरच्या मैदानात पाहात होतो तेव्हा तेथे तळपणार्‍या दोन ज्योती दिसल्या. पहिली ज्योती मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी जवळ. अटलजींच्या कार्यकाळात तत्कालीन पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांच्या पुढाकारातून उभारली गेलेली. त्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ओळी कोरलेल्या.


पण एका परिवारापलिकडे ज्यांची र्‍हस्वदृष्टी गेली नाही अशा मर्कटवृत्तीच्या नेत्यांनी ती निशाणीही तिथून पुसली. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर या सरकारमधील पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दुसरी एक ज्योती उभारली. पहिल्या ज्योतीवर अन्य क्रांतीकारकांच्या ओळी कोरल्या गेल्या आणि नव्या ज्योतीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या... द्वेषाचे एक चक्र सर्वादराच्या प्रक्रियेने नव्या सरकारने पूर्ण केले...

त्या पुण्यभूमीतून बाहेर पडताना पुन्हा एकदा अनेक विचारांचे काहूर माजले. त्या स्मृतींना वंदन केले आणि माझे काम संपले का? त्यांनी मांडलेला विचार प्रत्यक्षात कुणी उतरवायचा? ज्या प्रबळ राष्ट्रनिर्मितीसाठी सावरकरांनी प्रयत्न केले ते प्रयत्न पुढे कसे जाणार? ज्या जातीभेद निर्मुलनासाठी त्यांनी रत्नागिरीतून प्रारंभ केला त्या मोहिमेचे काय?

जातीभेद विसरून एकत्वाने पुढे जाण्याचा प्रयत्न राष्ट्रीय शक्ती करताना पुन्हा पुन्हा त्यांना अपशकून करण्याचा प्रयत्न तीच जुनी मंडळी करताहेत, ज्यांनी शिवरायांना ‘वाट चुकलेला देशभक्त’ म्हटले होते... ‘मी अपघाताने हिंदू आहे’, अशी दर्पोक्ती केलेली होती. सावरकरांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणार्‍या भारतीय तरुणांना दरवाजातून हकालले होते... भगतसिंगांच्या सुटकेच्या मोहिमेला अपशकून करत ‘हिंसक विचाराच्या’ तरुणांना मुक्त करता कामा नये, अशी भूमिका मांडली होती, त्याच विचाराची मंडळी पुन्हा आपले उपद्व्याप सुरू करीत आहे... जातींचे कंगोरे पुन्हा टोकदार बनवले जात आहेत...

मी यात काय करू शकतो? आपण यात काय करू शकतो? हा विराट हिंदू समाज जातीभेदविरहित होऊन बलशालीपणे उभा राहिला तरच हा देश खंबीरपणे उभा राहू शकेल. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी काय करू शकेन? हा समाज, त्यातील द्रष्टे लोक काय करू शकतील?

मी काहीतरी करेन... माझ्या क्षमतेनुसार काही करेन, एवढा निश्चय मी, आपण केला तरी खूप काही होईल...

आज इतकेच...

Tuesday, November 14, 2017

स्वयंपूर्ण संरक्षणसज्जतेसाठी...

भारतीय सैन्यदलांची वार्षिक खरेदी सरासरी 15 ते 18 हजार कोटी रुपयांची असते. नवी शस्त्रास्त्रे, विमाने, अत्याधुनिक लढाऊ साधने ही खरेदी वेगळी. या खरेदीत सैनिकांच्या गणवेशापासून बंदुकीच्या गोळ्यांपर्यंत विविध वस्तू असतात. सैनिकांसाठीचे बूट, सॉक्स, मच्छरदाण्या, बर्फावर चालणारे बूट अशा या वस्तू. अशा या गोष्टी परदेशातून आयात करण्याची गरज काय? त्या भारतात तयार होऊ शकणार नाहीत? नक्कीच तयार होतात. पण खरेदी कशा होणार?

सत्तेत कोण आहे आणि त्यांचे हेतू काय आहेत यावर बरेच काही अवलंबून असते. आजवर भारतीय उत्पादकांना सैन्यदलापासून दूर ठेवायचे आणि परदेशातून वाढीव दराने आयात करून त्यातील मलिदा खायचा, अशी एक साखळीच या यंत्रणेत निर्माण झाली. साधारण वर्षभरापूर्वी खरेदीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चिला गेला. या पार्श्वभूमीवर पाहायचे तर केंद्रात नवे सरकार आल्यानंतर 2014 पासून ही परंपरा तुटण्यास सुरुवात झाल्याचे लक्षात येत आहे. 2015 पासून त्याला वेग आल्याचे दिसते आणि ‘मेक इन इंडिया’ या अभियानातून तर या क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणचा प्रयत्न होत आहे.

हे नेमके काय घडते आहे? संरक्षण क्षेत्राच्या विषयात अनेक पुस्तकांचे लेखन करणारे, एनडीटीव्हीमध्ये या विषयाचे तज्ज्ञ संपादक म्हणून कार्यरत राहिलेले ज्येष्ठ पत्रकार नितीन गोखले यांच्या औरंगाबाद येथे ‘सीएमआयए’द्वारे आयोजित एका वार्तालापास उपस्थित राहण्याचा योग आला आणि अनेक नव्या गोष्टींची माहिती समोर आली. गोखले यांच्यासारख्या अभ्यासकाच्या नजरेतून जे काही समोर आले ते चित्तवेधक होते. ‘इंडिया फर्स्ट’ या धोरणाद्वारे प्रामाणिक प्रयत्न केले तर काय बदल होऊ शकतात याचे प्रत्यंतर सध्या चालू असलेल्या विविध उपक्रमांतून येते आहे.

भारत आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरक्षासाधनांचा सर्वात मोठा खरेदीदार म्हणून ओळखला जातो. ही बडी बाजारपेठ आपल्या हाती लागावी या साठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध शस्त्र उद्योजक भारतीय धोरणकर्त्यांना आपल्या अंकित करण्याचा प्रयत्न करत राहतात. आदनान खशोगीसारखी आंतरराष्ट्रीय दलाल मंडळी यामुळेच दिल्लीतील सत्तास्थानाच्या आसपास राहण्यात आणि त्यांना सर्वार्थाने ‘खुश’ करण्यात धन्यता मानत. परदेशी उत्पादकांची ही लॉबी इतकी भक्कम असते की त्यांना हव्या तशा ऑर्डर्सच नव्हे तर हवी तशी वार्तांकने प्रसारमाध्यमांद्वारे प्रकाशित करण्यात आणि येनकेनप्रकारेण यंत्रणांवर दबाव आणण्यात ती वाकबगार असते. अर्थात त्यातूनच ‘राफेल’सारखी प्रकरणे घडतात आणि अनेक पटीने अधिक किंमत मोजून भारत अशी साधने खरेदी करतो. त्यातून मिळालेली लाच विविध दलाल आणि राजकीय नेत्यांच्या खजिन्यात जमा होते.

यात गोपनीय काहीच नव्हते. केंद्रात आलेल्या नव्या सरकारने प्रारंभापासून आपले धोरण स्पष्ट ठेवले आहे. जे अपरिहार्य आहे ते परदेशातून आणावेच लागेल पण जे भारतात बनवता येईल ते भारतातच बनवले पाहिजे, त्यात हळूहळू वाढ केली पाहिजे आणि कालांतराने भारताला या बाबतीत स्वयंपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे हे धोरण... दरवर्षी भारत 15 ते 18 हजार कोटींची खरेदी करतो. ‘मेक इन इंडिया’द्वारे हे प्रमाण दरवर्षी 5-10 टक्क्यांनीही घटवता आले तर 10-15 वर्षांत हे प्रमाण शून्यावर येऊ शकते.

हे आधी होऊ शकले असते का? नक्कीच शक्य होते. पण ते का झाले नाही? असे सांगतात की संरक्षणदलांत रशियन लॉबी खूप प्रभावी आहे. विशेषतः सैन्यदलाला लागणारी विविध साधने रशियातूनच यावीत या साठी ही मंडळी आग्रही असते. त्या साठी एकीकडे लाच देण्याचा प्रकार होतो त्याच वेळी दुसरीकडे भारतीय उत्पादकांना या खरेदी यंत्रणेच्या आसपासही फिरकू न देण्याची खेळी खेळली जाते. कोणी पोहोचलातच तर त्याना नमोहरम कसे करायचे, त्याची फाईल पुढे सरकू द्यायचीच नाही, हे कशा पद्धतीने करायचे यात सचिव, सहसचिव पातळीवरील लॉबी सक्षम होती. स्वच्छ समजले जाणारे लुंगीधारी संरक्षणमंत्री कसलाही निर्णय न घेण्यासाठी प्रसिद्ध होते, पण त्याच वेळी मॅडमना ‘पटेल’ अशा व्यक्तीकडून आलेल्या आदेशानुसार एखादी फाईल 1-2 दिवसांत कशी अंतिम निर्णयापर्यंत यायची, याच्या सुरस कथाही संरक्षण मंत्रालयात उघड आहेत.

सन 2014 नंतर मुळात धोरणे बदलली गेली. भारतीय उत्पादकांना हे सारे माग खुले करण्यात आले. किंबहुना, अशा उत्पादकांनी आपल्यापर्यंत पोहोचावे या साठी संरक्षण खात्याने प्रथमच देशात ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले. उद्योजकांना आपल्या यंत्रणेत थेट प्रवेश दिला. आपल्या गरजा त्यांच्यासमोर शेअर केल्या आणि त्यातील कोणती साधने ते निर्माण करू शकतील याची विचारणा झाली. ‘मेक इन इंडिया’ हे धोरण मुळात याच क्षेत्रासाठी आहे. त्याचे प्राथमिक लक्ष दरवर्षी किमान 5 ते 10 टक्के परकीय आयात कमी करण्याचे आहे. या वेगाने गेल्यास आगामी 10 ते 15 वर्षांत ही आयात कमी होत जाईल आणि शेवटी आजच्या किमतीनुसार 15 ते 18 हजार कोटी रुपयांची बचत होईल. त्या आधी सरासरी 5-10 टक्के वाटा भारतीय बाजारपेठेत येईल. हे शुभलक्षण नव्हे का?

सरकारने ‘आयडीडीएम’ (इंडिजिनियसली डिझाईन, डेव्हलप अँड मॅन्यूफॅक्चर्ड) वस्तूंच्या खरेदीला प्राधान्य देणारे धोरण स्वीकारले आहे. हा मोठा धोरणात्मक बदल मानला जातो. आजही अनेक शस्त्रांच्या खरेदीसाठी भारताला परदेशी उत्पादकांशिवाय पर्याय नाही. त्याचे सर्वात महत्वाचे कारण - भारतातील एकाही शासनकर्त्याने आजवर अशा संशोधन व उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचे धोरण आखले नाही. त्यातील हेतू आपण समजू शकतो. पण ‘इंडिया फर्स्ट’ची आपली घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी नव्या सरकारने कमर कसली आहे, हे आता जाणवू लागले आहे. मुळात भारतीय उत्पादक निर्माण करणे, जे भारतीय उत्पादकांना शक्य नाही त्या साठी परदेशी उत्पादकांना भारतात उत्पादन सुरू करण्यासाठी बाध्य करणे, त्यातून ‘ओईएम’ची फळी उभी करणे आणि कालांतराने भारताने या क्षेत्रात स्वयंपूर्ण होणे, हे ते धोरण. त्यामुळेच आता भारत फोर्ज, एल अँड टी, टाटा, महिंद्रा, रिलायन्स नेव्हल या सारखा कंपन्याही या क्षेत्रात उतरल्या आहेत. त्या परदेशी कंपन्यांशी तंत्रज्ञान करार करून ती उत्पादन भारतात बनविण्यासाठी सज्ज होत आहेत.

अर्थात, या कंपन्या स्वतः थोड्याच या उत्पादनात उतरणार? त्यांच्या पुढाकारातून टीअर2, 3, 4 उद्योग या क्षेत्रात उतरतील आणि उद्योगक्षेत्राला त्यातून गती मिळेल. याच क्रमाने गेल्यास दरवर्षी एक ते सव्वा लाख नवे रोजगार निर्माण होतील. या दृष्टीने आता देशभरात हालचाली सुरू झाल्या आहेत. औरंगाबादसारख्या ‘टीअर 3’ शहरात ‘डिफेन्स क्लस्टर’ निर्माण झाले आहे. शहरातील काही उद्योजकांच्या पुढाकारातून त्यांच्या नव्या पिढीने त्यात स्वारस्य दाखविले आहे. केंद्राच्या नव्या धोरणांत अशा क्लस्टर निर्मितीला प्रोत्साहन मिळते. औरंगाबादकरांनी मंत्रालयाशी संपर्क साधला, प्रस्ताव दिला. एरव्ही अशा प्रस्तावकर्त्यांना फॉलोअप घ्यावा लागतो, असा आपला अनुभव. इथे दिल्लीतून पाठपुरावा सुरू झाला आणि या क्लस्टरला चालना मिळाली. हे क्लस्टर आज संरक्षणदलाच्या गरजांना साद देण्यास सज्ज झाले आहे.

वरच्या पातळीवर बरेच बदल होत आहेत. पर्रीकर यांनी गोव्यात परतल्यानंतर काही काळाने निर्मला सीतारामन यांनी संरक्षण मंत्रालयाची सूत्रे स्वीकारली. एरव्ही न दिसणारे चित्र इथे दिसले. त्यांनी पर्रीकर यांना एक दिवस दिल्लीत निमंत्रित केेले आणि तब्बल 3 तासांची त्यांची ‘वन टू वन’ मीटिंग झाली. दिल्लीच्या वर्तुळात असे मानले जाते आहे की या खात्यातील सुधारणांसाठीचे ग्राउंड पर्रीकर यांनी आपल्या कार्यकाळात तयार करून घेतले आणि आता सीतारामन त्या मार्गावर पुढील उभारणीची भूमिका सक्षमपणे पार पाडतील. पण एक मंत्री आपल्या पूर्वासुरीला चर्चेसाठी विश्वासाने बोलावतो आणि या खात्यातील खाचाखोचा समजून घेतो हे चित्र दिल्लीने तर प्रथमच पाहिले. वरिष्ठ पातळीवर चालणारा भ्रष्टाचार जवळजवळ संपला असल्याचीही चर्चा या वर्तुळात आहे.

पूर्वी फाईल अडवण्यासाठी विरोधकाकडून किंवा पुढे सरकवण्यासाठी उत्पादकाकडून लाच मागणारे निनावी फोन येत असत. 2015 नंतर हे फोन पूर्णतः बंद झाले. या खात्याच्या मुख्य सचिवांसमोरील डॅशबोर्डवर सार्‍या ताज्या नोंदी येत असतात. एखादी फाईल योग्य वाटली नाही तर तसा शेरा लिहा पण फाईल थांबवायची नाही, अशा सक्त सूचना आहेत. एकदा वरून सुधारणांचे सत्र सुरू झाले की ते खाली पोहोचण्यास फार वेळ लागत नाही. त्यामुळे संरक्षण दलातील खरेदीत होणार्‍या लाचेच्या मागणीचा अंत जवळ आला आहे, असे मानण्यास हरकत नाही. पूर्वी ‘आमचे अमुक इतके द्या, किंमत काहीही लावा’ अशी मागणी असायची. आता ‘तुम्ही 10 टक्के म्हणतात पण यात 20 टक्के मार्जीन दिसते आहे. ते 15 टक्क्यांवर आणा. किंमत कमी करा’, असा स्वच्छ आग्रह अधिकार्‍यांकडून धरला जात आहे. नेतृत्त्व स्वच्छ असले की यंत्रणेतील स्वच्छ अधिकार्‍यांना बळ मिळते आणि स्वच्छतेचा आग्रह सुरू झाला की आपोआप यंत्रणा सुधारते... याचेच हे उदाहरण.

पूर्वी शेजारी देशांची आगळीक खपवून घेतली जायची. डिप्लोमॅटिक वे ने मार्ग काढण्याचा आग्रह धरला जायचा. आता चित्र बदलले आहे. अहमदाबादेत झोपाळ्यावर बसून फोटो काढण्याच्या एक दिवस आधी चीनने भारतीय सीमेत 10-12 किलोमीटर घुसखोरी करून हजार सैनिक पाठविले तेव्हा ‘अशा प्रसंगी तणाव कसा वाढवायचा?’ हे जुने धोरण सोडून एकीकडे भारताने 9 हजार सैनिक त्याच्या प्रत्युत्तरादाखल तेथे दाखल केले आणि दुसरीकडे चिनी अध्यक्षांना ‘एकीकडे मैत्रीच्या गप्पा आणि दुसरीकडे अशी कुरापत असे असेल तर संबंध कसे सुधारणार?’ अशी स्पष्ट जाणीव द्यायची... हा धोरणातला बदल आहे. डोलम (चिनी पद्धतीने डोकलाम असा उच्चार, पण मूळ भूतानीत डोलम) बाबतही चीनला जसेच्या तसे उत्तर देत आंतरराष्ट्रीय दबाव आणण्यात भारत यशस्वी ठरला तो याच धोरणाने.

भारत बदलतो आहे, कारण सत्ताधारी बदलले आहेत. कोणत्याही धोरणाचे परिणाम वर्षभरात दिसत नसतात. देशाच्या वाटचालीत 1-2 वर्षे खिजगणतीत धरली जात नाहीत. इथे दशके, शतके मोजली जातात. खूप काळानंतर ‘इंडिया फर्स्ट’ म्हणणारे आणि तसे धोरण प्रत्यक्षात उतरवणारे नेतृत्त्व भारताला लाभले आहे. काही मोजके लोक मात्र मात्र ‘विकास वेडा’ झाल्याची मल्लीनाथी करत बाळबुद्धीचा गौरव करण्यात मग्न आहेत.

-दत्ता जोशी
9422252550

Tuesday, June 6, 2017

रूप बदलवणारा ‘देवदूत’...’ - डॉ. नितीन ढेपे


जिद्दीला कोणतीही मर्यादा आडवी येत नसते! सातत्याने सर्वच बाजूंनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जात अणदूरसारख्या छोट्याशा गावातील एक मुलगा आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त त्वचारोगतज्ज्ञ होतो... आपल्या शिक्षकांच्या नैतिक धाकामुळे स्वतःला सातत्याने समाजाभिमुख ठेवतो आणि देशातील प्रगत त्वचारोग रुग्णालय उभारतो त्याच वेळी सिंगापूरच्या शासकीय ‘नॅशनल स्कीन सेंटर’च्या धर्तीवर पुण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे त्वचारोग केंद्र उभारण्याचे स्वप्न पाहतो... बुद्धिमत्ता आणि जिद्दीचा आविष्कार असलेल्या डॉ. नितीन ढेपे यांच्याबद्दल...

ही गोष्ट साधारण 2003 ची. सोलापुरात जेमतेम दोन वर्षे ‘त्वचारोग क्लिनिक’ची प्रॅक्टीस केलेल्या डॉ. नितीन ढेपे यांनी त्वचारोगावरील उपचारांसाठी असलेले लेझर उपकरण आणण्याचे ठरविले होते. हा खर्च साधारण 35 लाखांचा. तेव्हा त्यांचे बॅलेन्सशीटही केविलवाणेच होते. त्या आधारावर कोणतीही बँक फार तर 12-13 लाख रुपये कर्ज देऊ शकणार होती. ‘जवळच्या’ माणसांनी आधी मदतीची भरघोस आश्वासने दिली होती. वेळा आल्यावर मात्र त्या सर्वांनीच पाठ फिरविली. खूपच पिच्छा पुरविला, तेव्हा ‘त्या’ काही परिचितांनी, ‘सध्या माझ्याकडे नाहीत, माझ्या मित्राकडून उसने आणून देतो पण दोन टक्क्याने व्याज भरावे लागेल’ असे कबूल करून पैसे दिले. स्वतःची बाजारातील पत आणि मानवी स्वभाव या दोन्हींचे प्रत्यंतर त्यांना तेव्हा आले. त्यानंतर आजघडीला जेमतेम आठच वर्षांत परिस्थिती पूर्ण बदलली आहे. त्यांना हवे असलेले काही कोटींचे कर्ज बँका चढाओढीने ‘विनातारण’ मंजूर करू पाहतात. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये येऊन सर्व औपचारिकता पूर्ण करतात. डॉ. ढेपे ही सारी ‘गंमत’ शांतपणे न्याहाळत असतात. सुमारे दीड कोटींची वार्षिक उलाढाल असलेले सोलापुरातील ‘स्कीन सिटी’ हे रुग्णालय त्यांनी आता ‘जानकी ट्रस्ट’ला दान केले आहे. तेथे ते पुण्यातून दोन दिवस जाऊन विनामूल्य सेवा देतात. इतर काळ ते पुण्यातील साधू वासवानी चौकात असलेल्या ‘स्किन सिटी’त असतात. हॉस्पिटलबरोबरच त्वचारोग क्षेत्रातील पदव्यूत्तर शिक्षणाचे देशातील फक्त दोन खाजगी महाविद्यालयांपैकी एक महाविद्यालय ते चालवतात! त्यांच्या यशाची त्रिसुत्री आहे - ‘कठोर मेहनत, कठोर मेहनत आणि कठोर मेहनत.’
डॉ. नितीन ढेपे ‘शिक्षकांचे गाव’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या अणदूरचे. 25 फेब्रुवारी 1974 रोजी जन्मलेल्या नितीन यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण अणदुरात मराठी माध्यमातच झाले. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतून पूर्ण झाल्यानंतर जवाहर विद्यालयातून ते दहावी उत्तीर्ण झाले. 1989 मध्ये दहावीला ते राज्याच्या गुणवत्तायादीत 24 वे होते! पुढील शिक्षणासाठी त्यांनी लातूरच्या शाहू महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि 1991 मध्ये 12वीला 99 टक्के गुण मिळवीत ते राज्याच्या गुणवत्तायादीत सातवे आले! उत्तम गुणानुक्रमामुळे साहजिकच त्यांना पुण्याच्या ‘बी.जे. मेडिकल कॉलेज’ला ‘एमबीबीएस’साठी प्रवेश मिळाला. वयाच्या 17 व्या वर्षांपर्यंतचा हा प्रवास इथे आठ-दहा ओळींत मांडता आला, पण हा प्रवास त्यांच्यासाठी अतिशय खडतर होता. या सर्व काळात त्यांच्या लक्षात राहिल्या त्या दोनच गोष्टी. पहिली - घरचे कमालीचे दारिद्—य आणि दुसरी - वाचनाचे अफाट वेड. त्यांचे वडील विश्वनाथराव पेशाने शिक्षक. पगारावर कर्ज काढून शेती करण्याच्या हौसेपायी घर कर्जबाजारी झालेले. उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. पगाराला अनेक वाटा ! आर्थिक विपन्नावस्थेच्या झळा त्यांना बालपणापासूनच बसल्या. त्या झळा पुढे शिकत असतानाही कायम राहिल्या. दुसरी आठवण - ‘अवांतर वाचना’ची. अणदूरसारख्या ग्रामीण भागातही त्यांच्या शाळेतील ग्रंथालय मोठे समृद्ध होते आणि विशेष म्हणजे वाचू इच्छिणार्‍यांना तेथे मुक्त प्रवेश होता! वाचनवेड्या नितीन यांना जणू खजिनाच गवसला. त्यांच्या या वाचनवेडाला त्यांच्या ग्रंथपालांनीही प्रोत्साहन दिले. नितीन म्हणतात, ‘माझ्या वाचनाच्या वेडाच्या अनेक कथा तेथे प्रचलित आहेत. एकदा प्रवासात वाचतावाचता एकदा मी दोन गावे पुढे निघून गेलो. लक्षात आल्यानंतर परतीची बस पकडून अणदुरात आलो. शाळेच्या ग्रंथालयातील निम्म्याहून अधिक पुस्तके मी वाचून संपविली होती. मराठी साहित्यातील अनेक कसदार साहित्यिक मी त्या शालेय वयातच वाचले. या वाचनाचा माझ्यावर खूप खोलवर संस्कार झाला. खूप कमी वयात माझे विचार प्रगल्भ झाले.’
पुण्यात ‘बी.जे. मेडिकल कॉलेज’ला एमबीबीएसला प्रवेश मिळाला. गुण चांगले होते म्हणून होस्टेलही मिळाले आणि स्कॉलरशिपसुद्धा! यापैकी कोठेही पैसे भरावे लागणार असते, तर कदाचित ते पुढे शिकूही शकले नसते. घरच्या आर्थिक परिस्थितीच्या झळा इतक्या तीव्र होत्या. आर्थिक चटक्यांमुळे परिस्थितीचे भान खूप लवकर येते. तसे त्यांनाही आले. एम.बी.बी.एस. 1997 मध्ये पूर्ण झाले. त्यांना चांगले गुण मिळाले. आता त्या नंतरची वाटचाल बिकट होती. इथे स्कॉलरशिप मिळणार नव्हती. आर्थिक स्थिती तर खूपच वाईट. अशामध्ये एम.डी.साठीच्या प्रवेशाची लगबग सुरू झाली. गुणानुक्रमामुळे त्यांना ‘पेडियाट्रिक’ची शाखा मिळाली. ही शाखा वैद्यकीय क्षेत्रात चांगली मानली जाते. पण नितीन मोठ्या अडचणीत होते. शिक्षणाची इच्छा अपार... बुद्धिमत्ताही होतीच पण आर्थिक भार सोसणे अशक्य झाले आणि अतिशय खिन्न मनाने त्यांनी ती शाखा सोडली आणि तुलनेत कमी खर्चात शिक्षण पूर्ण करता येईल, अशी ‘डर्मिटॉलॉजी’ची शाखा नाईलाजाने निवडली. निर्णयाची ती रात्र वादळी होती. ते म्हणतात, ‘उच्चशिक्षणाची खूप चांगली संधी मी माझ्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मिळविली होती, पण आर्थिक स्थितीमुळे ती ती संधी स्विकारू शकत नव्हतो. मी नाकारलेली संधी माझ्यापेक्षा आठ-नऊ टक्के कमी असणार्‍या विद्यार्थ्याला मिळणार आणि मी मात्र त्या तुलनेत कमी महत्व असलेल्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार, हे सत्य पचवता येणे अशक्य होते. ती रात्र मी झोपू शकलो नाही. डोळ्यातून अश्रू वाहात होते. स्वतःचाच राग येत होता. पण सत्य स्वीकारावेच लागणार होते. मी ‘डर्मिटॉलॉजी’ला प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आणि त्याच वेळी आणखी एक निर्धार केला. या क्षेत्रात मी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करीन. आज ही शाखा दुर्लक्षित मानली जाते, त्या शाखेला महत्व येईल असे काम मी या क्षेत्रात करीन.’
याच दरम्यान, एम.बी.बी.एस.ची एन्टर्नशिप करतानाच त्यांनी आपल्या मामांच्या मुलीशीच विवाह केला होता. त्या वाणिज्य शाखेच्या पदवीधर. स्वतःसोबत पत्नीची जबाबदारी सांभाळतानाच त्यांना एम.डी. करायचे होते. एम.डी.चे शिक्षण घेतानाची आर्थिक स्थिती आणि त्या काळात त्यांना करावी लागलेली कसरत सामान्य कुवतीच्या मुलासाठी अशक्यप्राय वाटावी अशी होती. या शिक्षणासाठी त्यांनी आपल्या पत्नीचे दागिनेही मोडले! दैनंदिन महाविद्यालयीत अभ्यासक्रम पूर्ण करतानाच सायंकाळी ते क्लिनिक चालवायचे. रात्री आपल्या मित्रांचे विविध पेपर्स प्रतिपान 20 रुपये दराने टाईप करून द्यायचे. कमावलेला हा पैसाच ते शिक्षणावर खर्च करीत. जेव्हा इतर विद्यार्थ्यांकडे एखाद्या विषयाचे एकच पुस्तक असे, तेव्हा नितीन यांच्याकडे त्या विषयातील मान्यवर लेखकांची चार-पाच पुस्तके असत! याच काळात त्यांनी आणखी एक उपक्रम सुरू केला होता. तेव्हा मुंबईत नानावटी हॉस्पिटलमध्ये ‘स्कीन सर्जरी लेझर मशीन’ आलेले होते. या कामाचा अनुभव मिळविण्यासाठी ते सलग दोन महिने बिन-पगारी रजा घेऊन मुंबईत राहिले. त्यासाठी लागणारा पैसा त्यांनी त्यांची पत्नी योगिता यांचे दागिने गहाण ठेवून उभा केला. ससूनमध्ये उपलब्ध नसणारी उपकरणे त्यातून विकत घेऊन ती ससूनमधील रुग्णांवर प्रगत उपचारांसाठी वापरली! खरे तर हे प्रशिक्षण एम.डी. पूर्ण केल्यानंतरचे होते, पण एम.डी. पूर्ण केल्यानंतर तातडीने प्रॅक्टिस सुरू करून पैसे मिळविणे आणि घेतलेली कर्जे फेडणे नितीन यांच्यासाठी महत्वाचे होते. ते म्हणतात, ‘माझ्या या प्रयत्नांमुळे आणि घेतलेल्या अनुभवामुळे या दोन वर्षांत मी इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत पाच वर्षे पुढे गेलो.’ पण हे पुढे जाणे अडचणीचे ठरू शकले असते. बुद्धिवंतांना मदत करणारा एक वर्ग जसा अस्तित्वात असतो, तसाच त्यांच्या वाटचालीत अडथळे आणणारेही काही लोक असतात. एम.डी. करताना प्रॅक्टिस करणे, पुढचे प्रशिक्षण घेणे नियमाला धरून नसते. या मुद्द्यावरून तो विद्यार्थी निलंबित होऊ शकतो. काही जण आपली तक्रार विभागप्रुखांकडे करणार आहेत, हे समजताच ते स्वतःच ‘ससून’चे तत्कालीन स्कीन स्पेशालिस्ट व विभागप्रमुख डॉ. अशोक नाईक यांच्यासमोर उभे ठाकले. सारी परिस्थिती त्यांना समजावून सांगितली. ‘अशा प्रकारच्या तडजोडींवर आक्षेप घेणार असाल, तर मी वर्षभर बिनपगारी रजा घेऊन पैसे कमावेन आणि पुढील वर्षी येऊन एम.डी. पूर्ण करेन,’ असेही सांगून टाकले. त्यांच्या मेहनतीची जाणीव असलेले डॉ. नाईक यांनाही आपले तरुणपण आठवले. ते ही याच चक्रातून शिकत गेलेले होते! त्यांनी नितीन यांना हे सारे करण्याची परवानगीही दिली आणि काही अडचण आली तर मदत करण्याचे आश्वासनही! अखेर 2001 मध्ये डॉ. नितीन ढेपे पुण्याच्या ‘बी.जे. मेडिकल कॉलेज’मधून ‘एम.डी. डर्मिटॉलॉजी’ झाले.
पुण्यातून अभ्यासक्रम पूर्ण केला, मुंबईत प्रगत ज्ञानाचा अनुभव मिळविला पण प्रॅक्टिससाठी मात्र त्यांनी सोलापूर निवडले. 2001 च्या जानेवारी महिन्यात ते सोलापुरात दाखल झाले. ऑगस्टपर्यंत जागेचा शोध घेऊन ती जागा क्लिनिकसाठी तयार केली आणि माणिक चौक, नवी पेठ, सोलापूर या पत्त्यावर 350 चौरस फुटांच्या जागेत ‘स्किन सिटी’चा शुभारंभ झाला. ही शाखा त्या काळात खूपच अप्रचलित होती. विशेषत्वाने ‘पांढरे डाग’ हा सर्वसामान्यांच्या चिंतेचा विषय असे. त्यामुळे ‘त्वचेची व्याधी म्हणजे पांढरे डाग’ एवढाच विषय तेव्हा प्रचलित होता. प्रत्यक्षात हे क्षेत्र खूप मोठे आहे.
ही ‘प्रॅक्टीस’ करतानाच या क्षेत्रातील अद्ययावत उपचारप्रणाली आपल्याकडे असली पाहिजे, या हेतूने त्यांनी ‘लाईट शेअर लेसर डायोड’ हे उपकरण आपल्याकडे आणण्याचे ठरविले. हे उपकरण तेव्हा महाराष्ट्रात फक्त मुंबईत नानावटी हॉस्पिटलसह काही मोजक्याच ठिकाणी उपलब्ध होते. त्याच्या किमतीसह पूर्ण सेटअप सुमारे 35 लाखांपर्यंत जात होता! हा निर्णय फार मोठा आणि महत्वाचा होता. त्यांनी या 35 लाखांच्या जमवाजमवीला सुरवात केली आणि त्यांना माणसे ‘कळू’ लागली. आधी भरघोस मदतीची आश्वासने देणार्‍यांनी विविध कारणे शोधली. कोणी ‘माझा एक मित्र व्याजाने पैसे देतो. इतरांसाठी तो पाच टक्के व्याज घेतो. मी आहे म्हणून दोन टक्क्याने घेईल’ असे सांगत व्याज आकारून पैसे देई. त्यांच्या ‘बॅलेन्सशीट’च्या आधारावर बँकेतून फार तर 12-13 लाखांचे कर्ज मिळणार होते. अशा दोन्ही कर्जांची सांगड घालत त्यांनी पैसे उभे केले आणि डिसेंबर 2003 मध्ये हे उपकरण ‘स्किन सिटी’त दाखल झाले. याच टप्प्यावर त्यांच्या लक्षात एकच बाब आली... आपल्याला कोणत्याही संकटातून वाचविणारी एकच गोष्ट आहे - ती म्हणजे आपले बॅलेन्सशीट. अधिकाधिक उत्पन्न मिळवित जाणे आणि त्यावर अधिकाधिक कर भरणे, यातूनच आपले बॅलेन्सशीट मजबूत होत जाईल, आणि साहजिकच आणीबाणीच्या प्रसंगी बँका मदत करतील, हे सत्य त्यांना उमगले. ‘खाजगी सावकारांच्या घशात दोन-तीन टक्क्यांनी पैसे ओतून वरती त्यांचे उपकार घेण्यापेक्षा सरकारला टॅक्स देणे आणि प्रतिष्ठितपणे बँकांकडून कर्ज घेणे मला योग्य वाटले...’ हे सत्य ते जाता जाता सांगून जातात!
पैसे गुंतवले, उपकरण आले पण पेशंट कसे येणार? त्यांना या उपकरणाची माहिती तरी कळली पाहिजे. मुंबईबाहेर राज्यातील इतर कोणत्याही शहरात नसलेले उपकरण सोलापुरात आल्याचे सर्वांना कळवून या पेशंटना सोलापुरात आणण्याऐवजी स्वतःच पेशंटकडे जाण्याचा अतिशय महत्वाकांक्षी आणि दूरदर्शी निर्णय त्यांनी घेतला आणि मग पुढे सुरू झाली सतत साडेतीन वर्षांची भ्रमंती. लगतच्या उस्मानाबाद-लातूर शहरांबरोबरच औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी, नगर, नाशिक, संगमनेर, पुणे, सातारा, पंढरपूर, बारामती, विजापूर, गुलबर्गा, बागलकोट आदि 20 शहरांतून त्यांनी ‘मोबाईल लेझर क्लिनिक’ची सेवा देण्यास सुरवात केली. दररोज सकाळच्या सत्रात एक शहर आणि सायंकाळच्या सत्रात दुसरे अशा प्रकारे साधारण 10 दिवसांत ते 20 शहरांत सेवा देत. या काळात त्यांनी एक ‘क्वालिस जीप’ विकत घेतली होती. या जीपमध्ये यंत्र घेऊन ते या शहरांतून जात. त्यांची एकंदर 16 जणांची टीम होती. काही जण जीपसोबत असत तर काही जण पुढच्या शहरांत जाऊन तयारी करीत. या काळात हॉटेलचा खर्चही वाचविण्याचा त्यांचा प्रयत्न असे. त्यांची पत्नी योगिता भल्या पहाटे उठून पोळी-भाजी तयार करून घेत असे आणि तोच दिवसभरातील त्यांचा आहार असे! दर आठवड्याला सुमारे दोन हजार किलोमीटरला प्रवास ते करीत. साडेतीन वर्षांतील त्यांचे एकंदर ‘रनिंग’ झाले सुमारे चार लाख किलोमीटर! दिवसभर पेशंट पाहायचे, प्रवासात एखाद्या झाडाखाली पोळीभाजी खाऊन घ्यायची आणि दिवसभर पेशंट पाहात रात्रीच्या प्रवासात झोप घ्यायची, असा हा क्रम. 2003 ते 2007 दरम्यान ही भ्रमंती चालू होती. ‘लेझर’साठी केलेली गुंतवणूक मोठी होती. ती परत मिळविणे आवश्यकच होते पण एकाच पेशंटकडून जास्त घेण्यापेक्षा खूप पेशंटकडून थोडे-थोडे मिळविण्यावर त्यांचा विश्वास होता.
याच काळात सोलापुरातही काही बदल होत होते. साडेतीनशे चौरस फुटांच्या क्लिनिकमधून थोड्या प्रशस्त जागेत जाण्याचे त्यांनी ठरविले आणि त्याच रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला एक मोठी जागा भाड्याने मिळवून तेथे इंटिरियरवर बर्‍यापैकी खर्च केला. ते केंद्र सुरू करणार, त्याच काळात हा रस्ता ‘मास्टर प्लान’मध्ये समाविष्ट झाला आणि त्यांच्या दोन्ही हॉस्पिटलवर मधोमध लाल फुल्या मारल्या गेल्या. सुमारे 50 लाखांची त्यांची गुंतवणूक एका रात्रीतून अक्षरशः रस्त्यावर आली! ही गोष्ट 2003 अखेरची. इथे मात्र त्यांच्यातील महत्वाकांक्षी स्वभावाने जबरदस्त उसळी घेतली. ‘आपला सेट-अप उचलावा लागण्याची ही शेवटची वेळ, आता या पुढे कोणीही धक्का लावू शकणार नाही अशीच जागा निवडायची’ असे ठरवून त्यांनी जागा शोधण्यास सुरवात केली आणि 2004 मध्ये बांधकाम सुरू असलेल्या ‘जुना एम्प्लॉयमेंट चौक’ या मोक्याच्या जागेत चार हजार चौरस फुटांचा अख्खा फ्लोअर बुक केला. त्या वेळी त्यांची गरज होती फक्त 400 चौरस फुटांची! खरेदी झाली. एव्हाना बॅलेन्सशीट सुधारत होते. बँकांनी या वेळी मदत केली आणि ही जागा त्यांच्या ताब्यात आली. एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये असाव्यात अशा सर्व सुविधा त्यांनी या जागेत करून घेतल्या. त्या साठी ते पुण्या-मुंबईत अनेक हॉस्पिटल्समध्ये फिरले. ऑपरेशन थिएटर, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हॉलपासून लायब्ररीपर्यंत सर्व सुविधा उभारल्या. नव्या इमारतीचे उद्घाटन करण्याचे ठरले. त्या वेळी त्यांच्या शिक्षकांची शिकवण पुन्हा एकदा त्यांना आठवली... ‘फक्त नव्या इमारतीत जातो आहेस म्हणून नव्याने उद्घाटन कशासाठी? तू नवे काय केले आहेस?’ आणि या नैतिक दबावातून प्रेरणा घेत त्यांनी 2004 मध्ये 11 नवीन लेझर मशीन असलेली प्लॅटफॉर्म टेक्नॉलॉजी आणली! एका रात्रीतून रस्त्यावर आल्यानंतर जेमतेम वर्षभरात घेतलेली ही झेप होती!
याच काळात विस्ताराचा विचार सुरू झाला होता. 2004 मध्येच पुण्याच्या ‘स्टर्लिंग सेंटर’मध्ये त्यांनी एक छोटी जागा भाड्याने घेऊन आठवड्यातून एक दिवस पुण्यात येऊन बसण्यास त्यांनी सुरवात केली. उरलेला आठवडाभर त्यांचा एक डॉक्टर सहकारी क्लिनिक सांभाळे. त्याला ते पगार देत. ते म्हणतात, ‘हे क्लिनिक तोट्यात जात होते. पण केवळ नावामुळे माझ्या अनुपस्थितीतही माझे पुण्यातील स्थान हळूहळू पक्के होत होते!’ सोलापुरात कधीतरी सॅच्युरेशन येणार आणि सोलापूर सोडावे लागणार, याची त्यांना जाणीव होती. ते ओळखून त्यांनी हे पाऊल उचलले होते. पण म्हणून त्यांनी सोलापुरात दुर्लक्ष केले नाही. सोलापुरातील ‘स्किन सिटी’त सर्व अद्ययावत यंत्रणा येणे सुरूच होते. याच काळात त्यांचा एक मित्र सिंगापुरमधून एक फेलोशिप मिळवून आला. आपणही अशी एखादी फेलोशिप मिळवून आपली गुणवत्ता वाढवावी, असे नितीन यांच्या मनात आले. त्यांनी त्या मित्राकडे चौकशी केली... त्यानेही थोडीफार उत्तरे दिली आणि शेवटी हसत हसत टोला मारला, ‘एवढे हॉस्पिटल उभे करताय, तर तुम्हीच तुमची फेलोशिप सुरू करा ना...!’ त्याने गमतीत केलेली ही सूचना डॉ. नितीन यांनी भलतीच मनावर घेतली. पदव्यूत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचा शोध सुरू झाला आणि अल्पावधीतच त्यांनी ‘डी.एन.बी.’ या अभ्यासक्रमासाठी रितसर परवानगी मागितली. सन 1985 मध्ये दिल्लीमध्ये डॉ. पी. एन. बहल यांच्याकडे हा अभ्यासक्रम खाजगी स्वरुपात सुरू झालेला होता. त्यानंतर कोणत्याही हॉस्पिटलला ही परवानगी मिळालेली नव्हती. कारण या साठीचे निकष कठोर होते. काही विशिष्ट संख्या असलेले बेडचे संपूर्ण सुसज्ज हॉस्पिटल, प्रशिक्षित प्राध्यापक, दरवर्षी किमान 5000 पेशंटची ओपीडी अशा प्रकारचे हे निकष. हॉस्पिटल सेट अप आणि वार्षिक 13 हजाराची ओपीडी तेथे मुळातच सुरू होती. विशिष्ट गुणवत्ताप्राप्त एक प्राध्यापक रुजू होतेच. तपासणीसाठी आलेल्या समितीने आणखी एका प्राध्यापकाची नियुक्ती करण्याची सूचना केली आणि डॉ. नितीन यांनी मागितलेल्या 2 ऐवजी 4 जागा मंजूर केल्या! डॉ. बहल यांना सन 1985 मध्ये मान्यता मिळाली होती. त्यानंतर सन 2005 मध्ये डॉ. नितीन ढेपे यांच्या ‘स्किन क्लिनिक’ला ही मान्यता मिळाली. त्यानंतर सन 2011 च्या अखेरपर्यंत कोणत्याही खाजगी संस्थेला ही मान्यता मिळालेली नाही! डॉ. नितीन ढेपे यांच्या शिरपेचातील हा एक मानाचा तुरा ठरला!
सोलापुरातील अद्ययावत हॉस्पिटल सुरळीतपणे चालू लागल्यानंतर त्यांनी हळू हळू पुण्यात लक्ष केंद्रित करण्यास सुरवात केली. आठवड्यातून एक दिवस ते येतच होते. हळू हळू हे प्रमाण वाढवून 2-3 दिवसांवर आले आणि सन 2007 च्या अखेरीस त्यांनी पुण्यातील साधू वासवानी चौकात ‘रुणवाल रिजन्सी’ या भव्य कॉम्प्लेक्सच्या पहिल्या मजल्यावर 8 हजार चौरसफूट जागा भाड्याने घेतली आणि तेथे ‘स्किन सिटी’ची स्थापना केली. आता त्यांचे बॅलेन्सशीट मजबूत म्हणावे असे झाले होते. या सेट-अपच्या उभारणीसाठी त्यांना काहीच अडचण आली नाही. काही कोटींची उभारणी त्यांनी सहजपणे केली. साधारण दोन-तीन वर्षांत पुण्यातील कामकाज उत्तम प्रकारे सुरू झाले पण ‘स्किन सिटी पी.जी. इन्स्टिट्यूट ऑफ डर्मिटॉलॉजी’ सोलापुरातच सुरू होते. तेथे एव्हाना एम.डी. ला समांतर असलेल्या ‘डीएनबी’सोबतच ‘डीडीव्ही’ हा डिप्लोमा अभ्यासक्रम आणि सेशल्स विद्यापीठाचा ‘एम.डी. स्कीन’ हा विशेष अभ्यासक्रम सुरू झाला होता. एकंदर जागांची संख्याही आठवर गेली होती. परदेशातून विद्यार्थी येण्यास सुरवात झाली होती. या सर्वांना सोलापूरला जाऊन शिकणे अडचणीचे ठरू लागले. मग डॉ. नितीन यांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ही ‘इन्स्टिट्यूट’ पुण्यात स्थलांतरीत करून घेतली.
सन 2010 मध्ये सोलापूरचे संपूर्ण हॉस्पिटल त्यांनी आपल्या आजींच्या नावाने ट्रस्ट करून ‘जानकी ट्रस्ट’ला दान केले. हे हॉस्पिटल आता धर्मादाय पद्धतीने चालविण्यात येते. तेथे सुमारे 40 टक्के पेशंटची तपासणी मोफत होते तर उर्वरित पेशंटकडून सवलतीचा दर आकारला जातो. त्यांच्यावरील उपचारांतही मोठी सवलत देण्यात येते. वार्षिक सुमारे दीड कोटींची उलाढाल असलेल्या या हॉस्पिटलच्या दानातून डॉ. नितीन ढेपे यांना मोठे समाधान लाभले. ते आता दर सोमवार व मंगळवारी सोलापुरात येतात आणि आपली सेवा मोफत देतात. या हॉस्पिटलमधून त्यांच्या खिशात एक रुपयाही जात नाही!
पुण्यातील ‘स्किन सिटी’त सध्या तीन प्रकारचे उपचार होतात. पांढर्‍या डागांवर अत्याधुनिक उपचारांबरोबरच कॉस्मेटिक लेझरद्वारे ‘लायपोसक्शन’चा उपचारही येथे होतो. भाजलेल्या व्रणांवरील उपचारही येथे केले जातात. इसब, सोयरासिससारखे जुनाट त्वचाविकारही येथे दुरूस्त केले जातात. आता त्यांनी आपल्या कामाचा रोख हळू हळू बदलत आणला आहे. पहिल्या टप्प्यातील रुग्ण तपासण्यासाठी आता राज्यात अनेक भागांत त्वचारोगतज्ज्ञ आलेले आहेत, त्यांच्याकडून या रुग्णांनी उपचार घ्यावेत आणि ज्यावर राज्यात कोठेच उपचार होत नाहीत, अशा दुसर्‍या टप्प्यातील रुग्णांनीच आपल्याकडे यावे अशी आता त्यांची अपेक्षा आहे.
भविष्यात त्यांना सिंगापूर येथील ‘नॅशनल स्कीन सेंटर’च्या धर्तीवर पुण्यात एक अद्ययावत हॉस्पिटल उभारायचे आहे. त्या साठीची तयारी त्यांनी सुरू केली असून लोहगाव परिसरात विमानतळाजवळ ‘मगरपट्टा आयटी पार्क’ भागात त्यांनी एक एकर जागाही खरेदी करून ठेवली आहे. इथे त्वचेसंबंधातील प्रत्येक विषयावरील संशोधन आणि उपचार होतील, असे त्यांचे स्वप्न आहे. त्वचेशी संबंधित ‘अथ्’ पासून ‘इति’पर्यंत सर्व प्रकारच्या तपासण्या आणि उपचार एकाच छताखाली आणण्याची त्यांची प्रेरणा आहे ती हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीच्या ‘रामोजी राव’ यांची! रामोजी राव यांनी ज्या प्रकारे वृत्तपत्रे, त्यासाठी छापखाना, टीव्ही चॅनल, ट्रान्सपॉन्डर, अनेक भाषांतील चॅनल, त्यांच्या चित्रीकरणासाठी सेट्स, त्यातून चित्रपटांसाठी फिल्मसिटी असा एकातून एक विस्तार केला आणि या विषयीच्या सर्व सेवा एकाच छताखाली आणल्या त्याच प्रकारे ‘स्कीन’ या विषयातील सर्व सेवा एकाच छताखाली आणण्याचा निर्धार डॉ. नितीन यांनी केला होता. त्यातूनच त्यांच्या ‘स्कीन’मागे ‘सिटी’ हे नाव लागले!
आपल्या वैद्यकीय पेशापलिकडे जाऊन त्यांनी अनेक आवडी जोपासलेल्या आहेत. त्यांचे बालपण वाचनाने समृद्ध झाले. अजूनही ते बरेच काही वाचत असतात. त्यांच्या आवडत्या लेखकांमध्ये जी. ए. कुलकर्णी यांचेही नाव आहे! आपल्या या लाडक्या साहित्यिकाबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी त्यांनी मागील चार वर्षांपासून पुण्यातील एका उपक्रमाचे पालकत्व स्वीकारलेले आहे. ‘आशय सांस्कृतिक’ आणि ‘जी.ए. कुटुंबीय’ यांच्या वतीने मागील चार वर्षांपासून दोन दिवसीय ‘प्रिय जी.ए. महोत्सवा’चे आयोजन करण्यात येत असते. या महोत्सवात ‘प्रिय जी. ए. सन्मान’ व इतर काही पुरस्कार प्रदान केले जातात. वरील दोन संस्थांसोबतच आयोजक म्हणून या कार्यक्रमात ‘स्कीन सिटी’ सहभागी असते. सन 2011 चा कार्यक्रम 12 व 13 डिसेंबर रोजी साजरा झाला आणि या कार्यक्रमात ज्येष्ठ संशोधक रा. चिं. ढेरे यांना ‘प्रिय जी. ए. सन्मान’ प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात व्यासपीठावर बसलेले असताना डॉ. नितीन यांनी रा. चिं. ढेरे यांना आपण त्यांची पुस्तके वाचली आहेत आणि विशेषतः त्यांचे ‘खंडोबा’वरील संशोधन वाचल्याचे सांगितले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला! एक डॉक्टर असून संशोधनपर लेखन वाचणारा माणूस त्यांनाही बहुधा क्वचितच भेटत असावा! सोलापुरात आयोजित ‘पुलोत्सवा’लाही त्यांनी मोठी देणगी दिली होती आणि ते ज्या कॉलेजमध्ये शिकले त्या ‘बी.जे. मेडिकल’च्या हिरकमहोत्सवातही त्यांनी मोठी देणगी दिली. त्यांच्यासारख्या ‘ज्युनिअर’ने दिलेल्या ‘आकड्या’चा वापर करून ‘बी.जे.’ने इतर अनेक ‘सिनियर्स’कडून भरीव देणग्या मिळविल्या!
त्यांच्या या संपूर्ण वाटचालीत एक बाब मात्र थक्क करणारी आहे. आज कर्तृत्वाच्या शिखरावर उभे असलेले, विविध राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय परिषदा गाजविणारे डॉ. नितीन ढेपे दहावी - बारावी उत्तीर्ण होईपर्यंत धडपणाने बोलूही शकत नव्हते! त्यांना
बालपणापासूनच तोतरेपणाचा त्रास होता. बालवयातील या त्रासामुळे वर्गातील मुले त्यांना चिडवीत. त्यामुळे त्यांनी स्वतःला आपल्याच कोशात कोंडून घेतले आणि सारे लक्ष केवळ अवांतर वाचन आणि अभ्यासावर केंद्रित केले. सातवीत असताना त्यांना आपल्या या त्रासाचा उबग आला. आपले आई-वडील आपल्यावर उपचार करीत नाहीत, असा त्यांचा आरोप होता. अखेर त्यांच्या आईने थोडे-थोडे करून पैसे जमवून त्या काळी मुंबईतून सोलापुरात येणार्‍या एका चांगल्या डॉक्टरला दाखविले. त्या डॉक्टरांनी तपासणी करून ‘मुलात काहीही दोष नाही’, असे सांगितले. आता नितीन यांच्यावर दबाव आला. आपल्यात कोणताही शारीरिक दोष नसेल, तर आपल्यात सुधारणा करणे आपलीच जबाबदारी आहे, याची खुणगाठ त्यांनी बांधली. तिथून पुढे त्यांचा स्वतःशीच संघर्ष सुरू झाला. ते जात्याच हुशार होते. वर्गात शिक्षकांनी कोणताही प्रश्न विचारला की त्यांचा हात वर जात असे. उत्तर देताना तोतरेपणामुळे वाक्य पूर्ण करण्यासाठी खूप वेळ लागायचा. या वेळी मुले चेष्टा करायची. काही शिक्षक हतोत्साहित करायचे पण नाना गुरुजींसारखे काही जण प्रोत्साहनही द्यायचे. दहावी उत्तीर्ण होईपर्यंत किंचितशी प्रगती झाली. पुढे लातूरच्या शाहू महाविद्यालयात त्यांनी अकरावीला प्रवेश घेतला. डॉ. नितीन म्हणतात, “शाहू कॉलेजची एक गोष्ट मला आवडली. इथे तुमची श्रीमंती पैशात नाही तर मार्कांवर मोजली जायची. चांगल्या अभ्यासामुळे मी नेहेमीच पुढे असायचो. त्यामुळे इथे प्राध्यापकांनी मला खूप प्रोत्साहन दिले. माझा तोतरेपणा घालविण्याचा प्रयत्न त्यांच्या लक्षात येत असे आणि ते मला त्या साठी मदतही करीत. अशा प्रकारे कठोर मेहनत आणि शिक्षकांचा पाठिंबा यांच्या बळावर ही समस्या सोडविण्यात मला यश आले!”
आयुष्यातील सर्व बर्‍यावाईट प्रसंगांवर आपल्या अविचल मनोधैर्याने आणि कठोर मेहनतीच्या बळावर मात करीत डॉ. नितीन ढेपे यांनी आजवरची वाटचाल केली. बुद्धिमत्तेला त्यांनी दिलेल्या कठोर मेहनतीच्या बळावर केवळ आर्थिकच नव्हे तर सर्वांगीण संपन्नतेने ते आज समृद्ध आहेत. या सर्वांहून मौल्यवान आहे, ती त्यांच्या मनाची समृद्धी. विविध उपक्रमांत जिथे गरज आहे तिथे आवश्यक त्या स्वरुपात ते आपला वाटा उचलतात आणि नामानिराळे होतात. सतत नवे काही शिकणे, नव्या प्रवाहांना सामोरे जाणे आणि सातत्याने समाजाभिमुख राहाणे, ही वृत्ती आपल्या शिक्षकांच्या नैतिक धाकामुळेच आपल्यात जोपासली गेली असे आवर्जुन सांगत ते आपल्या प्रगतीचे सारे श्रेय आपल्या गुरुजनांच्याच चरणी अर्पण करतात...!

ंं
डॉ. नितीन ढेपे
‘स्कीन सिटी’, पहिला मजला, रुणवाल रिजन्सी, साधू वासवानी चौक, पुणे-1

Friday, May 12, 2017

भीष्मराज बाम ः थाेर मार्गदर्शक


पोलिस खात्यातील किंवा ‘आयबी’मधील अधिकारी म्हणजे उग्र चेहर्‍याचा, अक्कडबाज मिशा वगैरे असलेला कुणी उंचापुरा तगडा इसम असेल, असा समज होऊ शकतो. पण क्रीडा समूपदेशनात आज राष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या भीष्मराज बाम यांच्या इतिहासात डोकावताना ते ‘आयबी’चे वरिष्ठ अधिकारी राहिलेले आहेत आणि अनेक महत्त्वपूर्ण प्रसंगांचे ते साक्षीदार आहेत ही माहिती हाती आली की गोंधळल्यासारखे होते. घरातील समजुतदार आजोबांसारखे प्रसन्न आणि मिश्किल व्यक्तिमत्त्वाच्या भीष्मराज बाम यांच्याशी रंगणार्‍या गप्पा म्हणजे माहितीचा खजिना. निवृत्तीनंतरच्या आयुष्यात पूर्वायुष्यापेक्षा अधिक मग्न, कार्यरत आणि ऊर्जावान राहता येते हे दाखवून देणारी त्यांची दिनचर्या सर्वासाठी प्रेरक ठरावी. ‘योगशास्त्र हे मानसशास्त्र आहे,’ अशी मांडणी करून मनाची शक्ती वाढविण्यासाठी ते करीत असलेले मार्गदर्शन सचिन तेंंडुलकर, राहूल द्रवीडपासून अंजली भागवतपर्यंत अनेकांसाठी मोलाचे ठरले. भीष्मराज बाम यांच्या योगमग्न कार्याबद्दल...

‘‘कोणताही खेळ खेळताना एकाग्रता महत्त्वाची असते. तुमच्यावर येणारा दबाव योग्य पद्धतीने हाताळता आला की तुम्ही यशस्वी होऊ शकता. ही एक साधी ‘ट्रिक’ असते. ती मला साधली होती. सरावादरम्यान मी सरासरी कामगिरी करीत असे पण प्रत्यक्ष सामन्यात मात्र मी विजयी ठरत असे. स्नूकर, बिलियर्डस्, शूटिंग या क्षेत्रातील माझ्या या कौशल्यामुळे प्रारंभी त्याच खेळाशी संबंधित खेळाडू माझ्याकडे येत. मी त्यांना मार्गदर्शन करीत असे. त्यातील अनेक जण पुढे जागतिक विजेते ठरले. मोठ्या स्पर्धा जिंकू लागले. मग क्रिकेटपटूंचा समावेश झाला. आधी मुंबईचा जतीन परांजपे माझ्याकडे आला. त्याची कामगिरी सुधारली. मग सचिन तेंडुलकर, राहूल द्रवीड हे सुद्धा माझ्याकडे येत गेले. प्रवीण आमरे, सुलक्षण कुलकर्णी असे खेळाडू जणू माझे भक्तच झाले...’’ नाशिकच्या महर्षिनगर भागात असलेल्या प्रशस्त बंगलीच्या एका छोटेखानी कक्षात बैठक मांडलेले एकेकाळचे ‘आयबी’चे ज्येष्ठ अधिकारी आणि आताचे ‘ख्यातनाम क्रीडा समूपदेशक’ भीष्मराज बाम आपल्या छानशा शैलीत विवेचन करीत असतात. मधूनच काही मिश्किल उदाहरणे सांगत, कधी तात्विक विवेचन करीत, योगशास्त्राचा आधार देत त्यांच्या गप्पा सुरू असतात...!

भीष्मराज बाम या नावाभोवती आज आगळे वलय आहे. भारतीय क्रीडाक्षेत्रातील बहुसंख्य ख्यातनाम क्रीडापटू कधी ना कधी तरी बाम सरांकडे आलेले आहेत. त्यांचे समूपदेशन घेतलेले आहे आणि त्यानंतर त्यांच्या कामगिरीत मोठा बदल झालेला जगाने पाहिलेला आहे. मानसशास्त्राशी संबंधित असलेल्या समूपदेशनाच्या विषयात काम करताना मानसशास्त्र हेच योगशास्त्र आहे आणि योगशास्त्र हे मानसशास्त्रच आहे, हा निष्कर्ष ते ठळकपणाने प्रारंभीच मांडतात. त्याच मुद्द्यावरून चर्चेची गाडी पुढे सरकू लागते...!

खरे तर आज त्यांच्याकडे सगळ्याच क्षेत्रातील लोक येताहेत. क्रीडा, कला, समाजकारण आणि अगदी राजकारण सुद्धा...! प्रत्येकालाच समूपदेशनाची गरज असते. काही जण जाहीरपणे मान्य करतात तर काही जण मान्य करीत नाहीत इतकेच! बाम यांचा दरवाजा मात्र सर्वांसाठी खुला असतो. मात्र त्या साठी आधी वेळ ठरवणे आवश्यक असते.

भीष्मराज बाम सांगतात, ‘‘योगशास्त्र म्हणजे अध्यात्म हा काही जणांचा चुकीचा समज आहे. योग आणि अध्यात्माचा कसलाही संबंध नाही. असलाच, तर अध्यात्मात योगशास्त्राचा उपयोग केल्यास त्या व्यक्तीस त्याचा लाभ होतो. योगशास्त्र हे मनाचे शास्त्र आहे. मन म्हणजे काय? त्याची शक्ती कशी वाढवायची? मनाचे व्यवहार कसे करायचे? या सर्वांचे विवेचन योगशास्त्रात उत्तम प्रकारे केलेले आहे. स्वतःचा उत्साह टिकविणे, नैराश्येतून स्वतःला बाहेर काढणे, स्वतःची गुणवत्ता वाढविणे या साठी हे शास्त्र पूरक भूमिका बजावते.’’

पण हे फक्त इतक्यापुरतेच मर्यादित नसते. कर्करोग, मधुमेह, हृदयरोग यासारख्या रुग्णांनाही योगशास्त्राचा चांगला उपयोग होतो, असे निदर्शनास आलेले आहे. हे आयुष्याला सर्वांगाने स्पर्श करणारे शास्त्र आहे. सन 2006 मध्ये भीष्मराज बाम यांचे या विषयावरील पहिले पुस्तक आले. त्याला त्या आधीच्या दहापेक्षा अधिक वर्षांच्या तपश्चर्येचे बळ होते. त्यानंतर या सार्‍या कामाला अधिक वेग आला. तो इतका, की ते आता नोकरीत असतानापेक्षा जास्त ‘बिझी’ आहेत...!

असे हे भीष्मराज बाम आहेत तरी कोण? नाशिकशी त्यांचा काय संबंध? त्यांच्याशी गप्पा मारताना त्याचीही उत्तरे मिळतात.
0000

हा परिवार मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातला. कोळथरे हे त्यांचे गाव. मूळ आडनाव कोल्हटकर. रघुजीराजे भोसले यांचे सेनापती भास्करराव कोल्हटकर... या भास्कररावांनी बंगालवर चढाई करून तेथील नबाबाला नमविलेले होते. त्यांच्या शौर्यावर रवींद्रनाथ टागोरांनी मोठे काव्य केलेले. मुगल फौजा या कोल्हटकरांना घाबरत. भास्कररावांना त्या काळी भास्कर पंडत म्हटले जायचे. रवींद्रनाथांच्या या काव्यात भास्कर पंडतांचा उल्लेख मानाने करण्यात आलेला आहे.

अशा या परिवारात केव्हातरी ‘ब्रह्म’ ही पदवी मिळाली. त्याचा अपभ्रंश होत तो ‘बाम’ असा झाला. अशा या परिवारातील पुरुषोत्तम नारायण बाम (म्हणजे भीष्मराज यांचे वडील) उदरनिर्वाहाच्या शोधात हैदराबादेत गेले. त्या काळात हैदराबादेत निजामाचे राज्य असे. त्या राज्यात पुरुषोत्तम बाम वकिली करीत. ते केवळ नाणावलेले वकीलच नव्हते तर तेव्हाच्या हैदराबाद स्टॉक एक्सचेंजमध्ये ‘बाम अँड सन्स’ आणि ‘बाम अँड खान’ या त्यांच्या स्टॉक आणि शेअर ब्रोकिंग फर्मही नोंदविलेल्या होत्या. त्यांची प्रॅक्टीस चांगली चालत असे. निजामाच्या निकटवर्तियांत त्यांची चांगली उठबैस असे. निजामाचे आर्थिक सल्लागार तारापोरवाला यांच्याशी तर त्यांचा खासा घरोबा. भीष्मराज बाम यांच्यावर त्यांचा भारी लोभ. पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर पुढे परदेशी शिकायला पाठवायचा शब्दही त्यांनी दिलेला होता.

पुरुषोत्तम बाम हे नाणावलेले वकील आणि सत्याची चाड असलेले जागृत नागरिकही. त्या काळच्या निजामशाही मिलमध्ये काही भ्रष्टाचार होत आहे, याची माहिती मिळाल्यानंतर ते 100 रुपयाचा समभाग घेऊन या मिलचे शेअरहोल्डर झाले आणि त्यानंतर बॅलेन्सशीटचा अभ्यास करून थेट तारापोरवालांपासून अनेक मान्यवरांना त्यांनी नोटिसाच पाठविल्या. निजामाच्या दरबारातील अनेक मान्यवर न्यायालयात आरोपीच्या बाकड्यावर बसलेले भीष्मराज यांनी पाहिले. ते वडिलांसमवेत न्यायालयात जात असत. या प्रसंगानंतर तारापोरवालांचा लोभ संपला आणि भीष्मराज यांना परदेशी शिक्षणाचा विचार बाजूला ठेवून आपल्या करिअरसाठी पर्यायी मार्ग शोधण्याची वेळ आली...!

एव्हाना हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी गणित विषयात ‘बीए’ची पदवी मिळविलेली होती. पुढचा मार्ग शोधण्यासाठी साधारण 1962 मध्ये ते पुण्यात आले. बंड गार्डन परिसरातील एका हायस्कूलमध्ये अर्धकालीन शिक्षकाची नोकरी पत्करून त्यांनी उदरनिर्वाहाची सोय करवून घेतली. पुण्यातच त्या काळात रँग्लर परांजपे, रँग्लर महाजनी, रँग्लर केतकर आदी ज्येष्ठांच्या पुढाकारातून ‘यूपीएससी’चे वर्ग सुरू झाले होते. पुढे प्रशासनात नामांकित ठरलेले दिनेश अफजलपूरकर, श्रीकांत बापट आदी अधिकारी त्याच काळात अभ्यास करीत होते. त्यात भीष्मराज सहभागी झाले. पण हा प्रवेश सहजगत्या मिळाला नाही. त्या आधी बरेच काही घडले. त्यात भीष्मराज यांच्या आईची, गोदावरीबाईंची भूमिका त्यांच्या अनुपस्थितीतही महत्त्वाची ठरली! पुणे विद्यापीठाच्या विद्वतसभेवर सदस्य असलेल्या श्री. ढवळे यांच्या ओळखीतून हा प्रवेश झाला. ढवळे हे भीष्मराज यांच्या आजोळचे निकटवर्ती आणि दुसरीकडे ते ना. गोपाळकृष्ण गोखले यांचे जावई. त्यांच्या उच्चपदस्थ वर्तुळात सर्व रँग्लरचा सहभाग. हा वर्ग रँग्लर्सनीच सुरू केलेला...! त्यामुळे ‘गोदेचा मुलगा’ म्हणून ढवळे यांच्याशी झालेली ओळख वर्गात प्रवेश मिळवून देणारी ठरली. भीष्मराज यांच्या उत्तम इंग्रजीमुळे तेथे सगळेच जण प्रभावित होते. त्यांच्याकडे सर्व जण भावी ‘आयएएस’ म्हणूनच पाहात. पण जेमतेम दोन महिन्यांचा वर्ग पार पडला आणि त्यांना वडिलांच्या निधनाचे वृत्त कळले. ते तेथून थेट हैदराबादला परत गेले.

वडिलांचा बिझनेस होता, त्यात बाबूलाल सूरजभान हे निजामाचे ज्वेलर त्यांचे भागीदार होते. त्यांच्याशी भीष्मराज यांची चर्चा झाली. भीष्मराज यांचा स्वभाव बिझनेसला पूरक नाही, हे त्यांच्यातील अनुभवी बिझनेसमनने ओळखले आणि सरळ नोकरी करण्याचा सल्ला दिला. तो शिरोधार्ह मानून भीष्मराज बाम यांनी नोकरीसाठी प्रयत्न केला.
त्यांनी पोलिस खात्यात नोकरीसाठी अर्ज दिला. तेव्हा नानावटी नावाचे पोलिस महासंचालक होते. त्यांनी भीष्मराज यांची मुलाखत घेतली. तेव्हा चीन युद्धाचे सावट पसरलेले होते. त्या पार्श्वभूमीवर विस्ताराने चर्चा झाली, शारीरिक क्षमतेची चाचणी झाली आणि त्यांची पहिली नियुक्ती नाशिक येथे ‘डीवायएसपी’ म्हणून करण्यात आली. 1963 मध्ये ते पोलिस खात्यात रुजू झाले.

ते सांगतात, ‘‘मला पहिली 8-10 वर्षे बराच त्रास झाला. पोलिस खात्यात प्रामाणिकपणे काम करायचे, इथे मी नाव कमवायला आलो आहे- पैसा कमवायला नाही. मिळणार्‍या पगारातच जगायचे आणि कायद्याच्या पालनासाठी कठोरपणे काम करायचे, हे मी ठरविलेलेे होते. पण इतर काही अधिकारी तसे नव्हते. माझ्या विरोधात निनावी तक्रारी जाऊ लागल्या. चौकशा झाल्या. एखादा प्रामाणिक अधिकारी जसा त्रासतो, तसेच ते त्रासले, पोलिस खाते सोडण्याचा विचारही मनात आला. पण वरिष्ठ पातळीवर चांगले अधिकारीही होते. त्यांनी धीर दिला, त्यातून ‘पोलिसिंग काय असते ते दाखवून देण्या’साठी पोलिस खात्यात कायम राहण्याचे त्यांनी ठरविले आणि ते याच विभागात निर्धारपूर्वक कायम राहिले.

एकदा निर्धाराने उभे राहिले की काय होऊ शकते, याचा अनुभव त्यांना येऊ लागला. पहिल्या आठ-दहा वर्षांतील बदल्या आणि बढत्या होत असतानाच मुंबईत पोलिस उपायुक्त असलेल्या दीपक जोग यांनी त्यांना मुंबईत गुप्तचर खात्यात घेण्याची तयारी दाखविली, पण अंतर्गत चौकशीच्या कारणामुळे ते शक्य झाले नाही. पुढे इमॅन्युअर मोडक तेथे आल्यानंतर भीष्मराज यांना मुंबईत संधी मिळाली. 1976 ते 1978 या काळात मुंबईत डी.सी.पी. म्हणून काम केल्यानंतर पुढची 4-5 वर्षे, म्हणजे 1982 पर्यंत ते गुप्तचर खात्यात कार्यरत राहिले. 1982 मध्ये मुंबईत इंटलिजन्स ब्यूरोचे सहायक संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. तेव्हा श्रीकांत बापट त्यांचे वरिष्ठ होते. त्यानंतरची 15 वर्षे त्यांनी सलगपणे ‘आयबी’मध्ये सेवा दिली. दिल्लीत ‘आयबी’चे उपसंचालक म्हणून बढती, तेथून मुंबईत त्याच पदावर बदली पुढे भोपाळमध्ये इन्स्पेक्टर जनरल म्हणून नियुक्ती आणि अखेर मुंबईतून ‘आयबी’चे सहसंचालक असताना निवृत्ती असा हा त्यांचा प्रवास. निवृत्तीनंतर त्यांनी सन 1996 मध्ये नाशिक जवळ केले. तेव्हापासून ते नाशिकमध्येच वास्तव्यास आहेत.

खरे तर हा सारा त्यांच्या आयुष्याचा पूर्वार्ध म्हणावा लागेल. कारण ‘समूपदेशक’ म्हणून त्यांची भूमिका त्यानंतर सुरू झाली. उत्तरार्धाची चर्चा करण्याआधी पूर्वार्धातील काही आठवणींना उजाळा इथे नक्कीच दिला पाहिजे.
इंटलिजन्स ब्यूरो म्हणजे ‘आयबी’ हा भारत सरकारचा गुप्तचर विभाग. गुप्त माहिती संकलित करणे, शत्रूंच्या गुप्त कारवायांचा छडा लावणे ही त्यांची भूमिका. त्यालाच ‘काउंटर इंटलिजन्स’ असेही म्हणता येईल. ‘आयबी’च्या सूचनांनुसार सुरक्षिततेची आखणी केली जाते. आयबीचे कार्यक्षेत्र देशांतर्गत असते तर परदेशातील हेरगिरीसाठी ‘रॉ’ अर्थात ‘रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग’ कार्यरत असते. भीष्मराज बाम यांनी आपल्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे विषय हाताळले. त्यातील बहुसंख्य देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेशी संबंधित असल्यामुळे त्याची वाच्यता होणे योग्य होणार नाही. पण जे विषय उघड करता येऊ शकतील त्यामध्ये ‘मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलना’चा विषय महत्त्वाचा होता. ते सांगतात, ‘‘त्या काळात मी मराठवाडाभर फिरलो. नरहर कुरुंदकरांसारख्या विचारवंतांची भेट झाली. अनंतराव भालेराव, केशवराव धोंडगे यांच्यासारख्या समाजाची नाडी कळणार्‍या माणसांसोबत मैत्री झाली. त्या काळात मराठवाड्यात मराठा आणि दलित समाजात तेढ मोठ्या प्रमाणात वाढलेली होती. तत्कालीन सत्ताधार्‍यांनी तात्काळ नामांतराची घोषणा करण्याचा निर्णय घेतलेला होता. त्या ऐवजी सबूरीचा सल्ला देत भीष्मराज बाम यांनी मराठवाडाभर आधी सुरक्षेचे जाळे विणण्याचा सल्ला दिला. असे काही घडले तर अभूतपूर्व हिंसाचार उसळू शकतो, हे इतिहासात सिद्ध झालेलेच होते. त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी गावोगावी सशस्त्र बंदोबस्त लावण्यात आला आणि अखेर 1994 च्या 14 जानेवारीला, मकर संक्रांतीच्या दिवशी नामविस्ताराची घोषणा करण्यात आली. आधीपासून घेतलेल्या काळजीमुळे फारशा अप्रिय घटना घडल्या नाहीत. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्या वेळी बोलावून घेऊन माझे अभिनंदन केले.’’
अशाच काही अविस्मरणीय गोष्टी मध्यप्रदेशात ते सहसंचालक असताना घडल्या. तेव्हा मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी सुंदरलाल पटवा हे होते. मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशच्या सीमावर्ती भागात असलेल्या एका धार्मिक स्थानाच्या कारणावरून तेथे खूप तणाव पसरलेला होता आणि काही राजकीय नेत्यांचा त्यात हात होता. हे सारे व्यवस्थित जाणून घेण्यासाठी बाम यांनी पोलिस खात्यातील एका इन्स्पेक्टरची मदत घेतली. खूप बारकाईने माहिती मिळविली तेव्हा असे लक्षात आले की ज्या मुद्द्यावरून रणकंदन माजले आहे, तो प्रत्यक्षात मुद्दाच नाही. एका परिक्रमेवरून वाद सुरू होता आणि त्या परिक्रमेत कुठलाही अडथळा नव्हता. तो सारा तणाव निवळण्यास हा निष्कर्ष मोलाचा ठरला. पटवा यांनीही त्यांचे अभिनंदन केले.

मुंबई बॉम्पस्फोटाच्या संदर्भातही त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. त्यांनी केलेल्या गुप्त माहितीच्या संकलनामुळे या गुन्हेगारांना कठोर शिक्षा होण्यात मदत झाली. असाच आणखी एक महत्त्वाचा भाग ठरला तो एका पाकिस्तानी हेराला पकडण्याचा. पाकिस्तानातून आलेला हा मुसलमान धर्माचा माणूस अहमदाबादेत ब्राह्मण म्हणून राहात असे. त्याने तेथे बरेच धार्मिक समारोहही पार पाडले. एका मुलीशी त्याने लग्नही जमविले. पण कितीही बेमालूमपणे सोंग घेतले तरी कुठेतरी चुकते आणि संशय बळावतो. त्याच्याबद्दल संशय निर्माण झाला आणि त्याला भीष्मराज बाम यांच्या ताब्यात देण्यात आले.

अशा प्रसंगी घाई-गडबड करता येत नसते. योग्य पद्धतीने ही बाब हाताळावी लागते. तो इतका उत्तम प्रशिक्षित होता की तपासणीला दाद देईना. 3 दिवस 3 रात्री त्याची उलटतपासणी सुरू होती. अखेर तिसर्‍या रात्री त्याने पहिली चूक केली. त्यानंतर अर्ध्या पाऊण तासात दुसरी चूक केली आणि त्याचे पितळ उघडे पडले. तो पैसे घेऊन नेपाळ मार्गे भारतात आलेला होता आणि काही घातपाती कारवाया करण्यासाठी तयारीत होता. त्याचा ‘आयएसआय’ हँडलर त्याला मार्गदर्शन करीत असे. याच्याकडून माहिती घेऊन त्या हँडलरलाही पकडण्यात आले आणि एक मोठा कट उधळला गेला.

या सगळ्या गोष्टी ते संवेदनशील तपशील वगळून सांगतात, तरीही त्यांचे गांभीर्य कळू लागते. अनेक गोष्टींंंबाबत त्यांची मते स्फोटक आहेत. ही मुलाखत घेतानाच एका तुरुंगातून पळून जाणार्‍या गुन्हेगारांना चकमकीत ठार केल्याचे वृत्त आलेले होते. त्या कृतीचे ठाम समर्थन करताना त्यांनी भूतकाळातील काही दाखले दिले. मुंबईत जे.एफ.रिबेरो आयुक्त असताना ‘गुंडांकडे हिटलिस्ट असेल तर आमच्याकडेही तशीच हिटलिस्ट आहे’, हे त्यांचे विधान खळबळजनक ठरले होते. त्याच काळात एन्काउंटर घडली आणि गुंडांना पोलिसांची दहशत बसली. ही दहशत असलीच पाहिजे, असे ते सांगतात. त्यामुळेच भारतील लष्कराने पाकिस्तानात घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचेही ते भक्कमपणे समर्थन करतात.
000

पोलिस आणि गुप्तचर विभागात प्रदीर्घकाळ सेवा झाल्यानंतर या पूर्णतः वेगळ्या क्षेत्रात कसाक काय प्रवेश झाला? पोलिस आणि योगशास्त्र किंवा समूपदेशन ही वरकरणी तरी पूर्णतः वेगळी टोके दिसतात...! ते सांगतात, ‘‘मी 34 वर्षे सेवा केली. 1 ऑक्टोबर 1996 रोजी वयाच्या 58 व्या वर्षी निवृत्त झालो. मला सेवा सुरू ठेवण्याची ऑफर होती. पण मी ती नाकारली. माझ्या कारकीर्दीच्या सुरुवातीलाच तत्कालीन वरिष्ठ वाघ साहेबांनी मला सांगितले होते, ‘तुमच्यापेक्षा तुमचे काम महत्त्वाचे आहे.’ ते मी प्रामाणिकपणे केले. मला दिलेले काम कसे चांगले होईल याचाच विचार केला. वैयक्तिक बढत्या, बदल्या, आरोप, बदनामी यांची चिंता केली नाही. तुम्ही यशस्वी आहात की नाही, ही बाब गौण आहे. तुम्ही प्रामाणिक आहात की नाही, हे सगळ्यांना समजते. मी प्रामाणिक राहिलो. काम करीत राहिलो. फळाची अपेक्षा केली नाही. म्हणूनच या यंत्रणेत टिकून राहिलो. प्रामाणिकपणाची मस्ती जास्त असते. त्या मस्तीत जगलो...

‘‘ही वाटचाल सुरू असतानाच योगशास्त्राचा अभ्यास सुरू होता. निवृत्तीआधी आणि नंतरच्या प्रारंभीच्या काळात लेखन, व्याख्याने, समूपदेशनाचा प्रसंग आला. त्या दृष्टीने विचार करताना मी योगशास्त्राकडे पुन्हा एकदा वळलो आणि लक्षात आले की आपण मानसशास्त्र म्हणतो ते योगशास्त्रच आहेत. योगशास्त्र आणि मानसशास्त्र यात भेद नाही. मी मुळात खेळाडू होतो. पुण्यातील पर्वती धावत धावत सहज चढून उतरत असे. योगासने नियमींतपणे करीत असे. तो मूळ पिंड होता. समूपदेशनासाठी मानसशास्त्राचा अभ्यास सुरू केला. प्रारंभी पाश्चात्य विचारवंतांची पुस्तके अभ्यासली आणि त्यातील संदर्भ पाहून लक्षात आले की हे सारे मुळात योगशास्त्रात आहे. मग त्याचा विचार जाणीवपूर्वक सुरू केला...

‘‘मी बिलियर्डस्, स्नूकर, शूटिंगमध्ये सहभागी होत असे. अनेक मोठ्या खेळाडूंसोबत मी खेळलो. त्यातील अनेकांना पराभूतही केले. विशेष म्हणजे सरावादरम्यान माझी कामगिरी वाईट असायची आणि सामन्यात मात्र मी विलक्षण चांगली कामगिरी बजावत असे. त्या उलट अनेक खेळाडू सरावात उत्तम कामगिरी करीत आणि प्रत्यक्ष सामन्यात ते ढेपाळून जात. ते विचारण्यासाठी आल्यानंतर माझ्या लक्षात आले की या मागे मानसशास्त्र आहे. मग मी त्याचा अभ्यास सुरू केला...

‘‘पाश्चात्य विचारांत आजारावर उपचार असतात, भारतीय विचार मात्र मुळातच आजारी न पडण्याचाच मंत्र सांगतो. योगशास्त्रात हेच आहे. मनातील आंदोलने कशी नियंत्रित करायची हे योगशास्त्र शिकवते. नुसतीच बोटे मोडून, शिव्याशाप देऊन समस्यांची उत्तरे शोधता येत नाहीत. त्या साठी मानसशास्त्रीय अभ्यासातून आलेले नियंत्रण उपयोगाचे ठरते. प्रतिकूलतेवर मात करण्यासाठी आधी मनोधारणा पक्की होणे गरजेचे असते. जन्म ते मृत्यू या दरम्यान आयुष्याचे अनेक पैलू असतात. बर्‍यावाईटाला कशा प्रकारे हाताळायचे, मैत्री-शत्रूत्वाला कसे सांभाळायचे याची प्रेरणा योगशास्त्रातून मिळते.’’
000

एकेकाळी, पोलिस दलात असताना भीष्मराज बाम हे ‘दक्षता’ या मासिकाचे संपादक होते. प्रारंभीच्या काळात ते उत्साहाने लेखन करीत. त्यांचा उत्साह लक्षात घेऊन पुढे खात्याने ती जबाबदारी त्यांच्याकडेच सोपविली. या लेखनासाठी झालेले वाचन त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरले. प्रदीर्घकाळपासून झालेले वाचन, मनन, चिंतन यातून त्यांची आजची भूमिका साकारली आहे.

आज क्रीडा मानसशास्त्र हा त्यांचा अधिक प्रसिद्ध असलेला विषय आहे. त्याच विषयात त्यांची विविध पुस्तके प्रकाशित आहेत.मूळ इंग्रजी पुस्तकांचा अनुवाद हिंदी, मराठी, तमिळ, पंजाबी आदी भाषांतून झालेला आहे. पण त्यांच्या मते ‘स्पोर्ट सायकॉलॉजी’ ही ‘अप्लाईड सायकॉलॉजी’ आहे. सर्वांचे मूळ योगशास्त्रातच आहे. बाम सरांचे वडील उत्तम ज्योतिषी होते. ती परंपरा पूर्णार्थाने बाम सरांमध्ये उतरली नाही, पण या विषयाशी त्यांची चांगली जानपहेचान नक्कीच आहे. धुळ्यातील अ. ल. भागवत हे त्यांचे अध्यात्मिक गुरू आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून बाम सरांनी आपली वाटचाल सुरू ठेवली.

या वाटचालीत त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे यापैकी कुठल्याही पुरस्कारासाठी ते कधीही आवेदन घेऊन गेले नाहीत. महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार त्यांना 1994 मध्ये प्रदान झाला तर शासनाचाच जीवनगौरव पुरस्कार (2011-12साठी) सन 2015 मध्ये प्रदान करण्यात आला. या शिवाय अनेक पुरस्कार त्यांच्या घराची शोभा वाढवीत आहेत. या सर्व पुरस्कारांपेक्षाही मोठा पुरस्कार म्हणजे त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळवून विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी गाठलेले कर्तृत्त्वाचे शिखर. हा पुरस्कार त्यांना सर्वात मोलाचा वाटतो.

- दत्ता जोशी
औरंगाबाद
‘पोलादी माणसे - नाशिक जिल्हा’ या आगामी पुस्तकासाठी (कै) बाम यांच्याशी चर्चा करून हा लेख लिहिलेला होता.

Tuesday, March 28, 2017

गोविंदराव व नागनाथराव ः व्यावसायिक सचोटीतील आदर्श

औरंगाबादच्या जाहिरात विश्वातील पहिल्या पिढीचे उद्यमी आणि ‘गरूड अ‍ॅड्स’चे संस्थापक (कै.) गोविंद देशपांडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रदान करण्यात येणारा ‘गोविंद सन्मान’ औरंगाबादच्या पहिल्या पिढीतील ज्येष्ठ पत्रकार नागनाथराव फटाले यांना आज (28 मार्च) प्रदान होत आहे. व्यावसायिक सचोटीच्या निकषावर 100 टक्के निष्कलंक म्हणावीत, अशा या दोन्ही व्यक्तिमत्त्वांचा हा आगळा संयोग. पुरस्कार प्रदानाच्या निमित्ताने दोघांच्याही व्यक्तिमत्त्वांचा हा धावता आढावा -

- दत्ता जोशी, औरंगाबाद
--------------------------------------------------------

काही व्यक्तिमत्त्वांच्या पहिल्या भेटीत सुद्धा काही वेगळे घडत असते. अशी माणसे मनाला स्पर्शून जातात. त्यांचे-आपले काहीतरी अंतरंग नाते आहे, असे जाणवू लागते. गोविंद देशपांडे आणि नागनाथ फटाले या दोघांच्याही बाबतीत असेच आहे. निष्कलंक वैयक्तिक आणि व्यावहारिक चारित्र्य, सर्वोच्च व्यावसायिक सचोटी आणि पराकोटीची सामाजिक बांधिलकी जपणारी ही दोन माणसे. आज एकाच्या नावाचा सन्मान दुसर्‍या व्यक्तीला प्रदान होताना हा योग नक्कीच लक्ष्यवेधी ठरतो.

गोविंदराव औरंगाबाद शहरातील जाहिरात विश्वाचेे आदरणीय नाव. औरंगाबादेत स्थापन झालेली ‘गरूड अ‍ॅड्स’ ही दुसरी जाहिरात संस्था. साधारण 1980 च्या दशकात गोविंद देशपांडे आणि विलास कुलकर्णी या रा. स्व. संघाच्या संस्कारात वाढलेल्या दोन मित्रांनी ‘गरूड’ची स्थापना केली. संघाचा संस्कार व्यवसायात जसाच्या तसा उतरवताना ‘गरूड’ने सचोटीचे मानदंड निर्माण केले. ग्राहकांप्रती असलेली पारदर्शी व्यवहारांची बाब असो की दैनिकांप्रती असलेला चोख व्यवहार, प्रत्येक आघाडीवर ‘गरूड’ने आपली प्रतिमा उजळवून ठेवली. दुर्दैवाने हे दोघेही भागीदार अल्पायुषी ठरले. पण त्यांच्या सचोटीच्या उदाहरणांना आता आदर्श वस्तुपाठांचे मोल प्राप्त झालेले आहे.

हेच मोल नागनाथराव फटाले यांच्या पत्रकारितेला सुद्धा प्राप्त आहे. पत्रकारितेच्या बदलत्या स्वरुपात सुद्धा आपली प्रतिमा राखण्यात त्यांना यश आले. आज वयाच्या 80 व्या वर्षीही (जन्म 23 जून 1937) सक्रीय असलेले नागनाथराव मराठवाड्यातील पत्रकारितेच्या पहिल्या पिढीशी आजच्या पिढीचा उपलब्ध असलेला बहुधा एकमेव दुवा आहेत. त्यांच्या आयुष्याचे सिंहावलोकन हा जणू मराठवाड्याच्या पत्रकारितेचा इतिहास मानता यावा!

श्री. फटाले यांचे मूळ गाव पूर्वीच्या निझाम संस्थानातील मुधोळी (जिल्हा गुलबर्गा) पण रझाकारांच्या  छळामुळे त्यांचे कुटुंब सोलापुरात स्थलांतरीत झाले. तेथेच नागनाथराव जन्मले. पुणे विद्यापीठाच्या इंटर कॉमर्स परीक्षेत अर्थशास्त्राचे ते 1959 चे सुवर्णपदकाचे मानकरी. 1962 ते 64 दरम्यान त्यांनी सोलापूरच्या संचारसाठी बातमीदारी केली. सन 1967 मध्ये ‘भूज’ पाकिस्तानला देऊ नये म्हणून दीर्घकालीन सत्याग्रह सीमेनजकीच्या खावडा येथे झाला. त्या काळात सत्याग्रहींची व्यवस्था करणे, तेथील बातम्या पाठविणे ही कामे केली. शेवटच्या तुकडीत ते सामील झाले. त्याचा परिणाम म्हणून त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. भूज तुरुंगातून सुटल्यानंतर ते 1968 साली औरंगाबादला आले आणि त्यांनी ‘मराठवाडा’ दैनिकात पूर्ण वेळ बातमीदार म्हणून कामाला सुरूवात केली. 1978 ते 1987 पर्यंत ते ‘टाईम्स ऑफ इंडिया (मुंबई) या इंग्रजी दैनिकाचे तसेच पुण्याहून प्रकाशित होणार्‍या ‘दै. सकाळ’चे अर्धवेळ बातमीदार म्हणून कार्य केले. 1987 पासून ‘दैनिक सकाळ’ चे पूर्णवेळ बातमीदार म्हणून काम पाहू लागले. जून 2004 पर्यंत ते ‘सकाळ’समवेत कार्यरत होते. सन 1978 पासून विद्यापीठ पत्रकारितेच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मानद प्राध्यापक म्हणून त्यांनी वृत्तलेखन आणि विकास पत्रकारिता या विषयाचे अध्यापनही उत्कृष्टपणे केले. 

सार्वजनिक जीवनात श्री. फटाले यांचा मोठा सहभाग राहिला. मराठवाड्यातील पहिली ग्राहक चळवळ सुरू (1972-74) करण्याचा मान त्यांच्याकडे जातो. 1977 च्या आसपास फटाले यांनी कामगार क्षेत्रात प्रत्यक्ष कार्य सुरू केले. एस. टी. हमालांची त्यांनी राज्यस्तरीय संघटना बांधली. साधारण 1968 च्या नंतरचा काळ लक्षात घेता म्हणावे लागते की, त्याकाळी वृत्तपत्रात पाऊसपाणी, पिके यासंबंधी फारच कमी बातम्या येत असत. त्याही काळात शेतीसंबंधी घटना, घडामोडी याही बातमीचे विषय आहेत, हे श्री. फटाले यांनी सातत्याने दाखवून दिले. सन 1985 च्या आसपास दुष्काळाच्या संदर्भातील लेखमालिका लिहिली. त्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय विकास पत्रकारितेबद्दल प्रथम क्रमांक पुरस्कार प्रदान करण्यात आला. मराठवाड्यातील जनजीवन, प्रश्न, सांस्कृतिक- शैक्षणिक प्रगती, विशेषतः दलितांच्या आकांक्षा, मागासलेपणातून निर्माण झालेल्या भावना, गरिबांचे  प्रश्न, बेकारांचे प्रश्न, कलावंत, ऐतिहासिक स्थळे, पैठणी उत्पादन यांचा परिचय श्री. फटाले यांच्या बातम्या व वार्तापत्रांतून मराठवाड्यातील वाचकांना झाला. त्यांची ही कामगिरी नोंद घेण्याजोगी होय.

श्री. नागनाथ फटाले यांचे कार्य फक्त पत्रकारिता व शिक्षण एवढ्यापुरतेच मर्यादित नव्हते तर त्यांनी सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम केले. कामगारांच्या संघटना बांधल्या, उभारल्या, ग्राहक चळवळ उभी केली. याचबरोबर ज्योतिषशास्त्र व परामानसशास्त्र अकादमी, औरंगाबाद येथे उभारली. त्याचे त्यांनी संस्थापक अध्यक्ष म्हणूनही कार्य केले. तसेच ग्रंथालय चळवळीत अनेक वर्षे काम केले. औरंगाबादेतील सिटीझन फोरमचे ते सदस्य आहेत. आरंभीच्या काळात फटाले यांनी काही शासकीय समित्यांवर काम केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेटवर ते पदवीधर मतदारसंघातून निवडून आले. 

विधायक बदलाची नोंद घेण्याबरोबरच विधायक कार्य करण्याला समाजाला प्रवृत्त करण्याची क्षमता विकास पत्रकारितेमध्ये असते. सामान्य जनांना विकासाची प्रेरणा मिळावी आणि विकासकार्यात त्यांचा सहभाग वाढावा आणि त्यातून सामान्य माणसाचा जीवनस्तर उंचवावा ही पत्रकारितेकडन अपेक्षा केली जाते. मराठवाड्यातील ज्येष्ठ पत्रकार श्री. नागनथ फटाले यांनी आयुष्यभर अशा विधायक बदलांची नोंद घेतली. त्यांनी लिहिलेली विकासविषयक वार्तापत्रे  याची साक्ष देतात...
त्यांच्या या कार्यप्रवासाचा गौरव आज ‘गोविंद सन्माना’ने होतो आहे यात श्री. फटाले यांचा सन्मान आहे आणि या पुरस्काराचाही तो आगळा गौरव आहे.

- दत्ता जोशी, औरंगाबाद

Tuesday, March 14, 2017

कैरीची चटणी... माझा ‘वीक पॉइंट’...!

(© दत्ता जोशी, औरंगाबाद)
उन्हाळ्याची चाहूल वेगवेगळ्या मार्गांनी सर्वांना लागत असेल, पण मला लागते ती झाडांवर लगडलेल्या हिरव्यागार कैऱ्यानी. या कैऱ्यानी माझे बालपण समृद्ध केले आहे. देवणी, उदगीर सोडून सुमारे 26-27 वर्षांपुर्वी औरंगाबादेत आलो तेव्हा बसलेल्या अनेक ‘सांस्कृतिक धक्क्यां’मध्ये ‘कैरी विकत घेणे’ हा एक मोठा धक्का होता. जगात काही गोष्टी अशाच जाता-येता घेऊन यायच्या असतात, या मध्ये कैरी ही एक महत्त्वाची गोष्ट असे. ती विकत घ्यायची असते, हे वास्तव पचायला बराच काळ लागला.
कुठलीही गोष्ट माझ्या गावाशी, देवणीशी जोडण्याची माझी सवय काही जात नाही. माझ्या आयुष्यात घडणार्या प्रत्येक गोष्टीत देवणीच्या आठवणी सामावलेल्या असतात. अर्थात, उदगीरच्या आठवणींचा स्पर्शही त्यांना असतो पण मुळात संबंध देवणीचा!
देवणीत बैलबाजाराच्या पलिकडे, नदीच्या काठालगत आमराई आहे. तिथे आंब्यांची दाट झाली. तिथे कुणी राखणदार असायचा. त्याची नजर चुकवून कैऱ्या पाडायच्या आणि पळवायच्या, हा आमचा नित्यक्रम. वर्गातील, गल्लीतील दोस्तांची शेती होती. त्यांच्यासोबत शेतावर जायचे आणि झाडावरील कैऱ्या मनसोक्त पाडून आणायच्या, ही त्यातल्या त्यात सहज-साधी-सोपी गोष्ट. शिवाय, शेतावर जाता येता रस्त्यात लागणार्यार झाडांवरील कैर्यान तोडणे हा एक विशेष कौशल्याचा भाग.
पण या पाडलेल्या कैऱ्याचे काय करायचे?
त्याचे दोन-तीन पर्याय असत. एक तर त्या कच्च्या खायच्या किंवा मग त्याची चटणी करायची किंवा मग कैरी भाजून किंवा उकडून पन्हे तयार करायचे. यातील पहिला मार्ग अधिक आवडीचा. देवणीच्या शाळेत असताना शेजारच्या गावातून दोस्त मंडळी माझ्या वर्गात शिकायला येत. हंचनाळ, संगम, अजनी, विळेगाव ही ती गावे. ही सगळी शेतकर्यानची मुले. त्यांच्या पिशवीत चटणी-भाकरीबरोबर ‘सिझनल’ फळे असत. कैर्याा, बोरं, सीताफळं, बिबे...! त्यांच्यातील काही जणांचे माझ्यावर भारी प्रेम. मला ते या रानमेव्यात वाटेकरी करून घेत.
कैऱ्यांच्या दिवसात आंबट-चिंबट कैऱ्या खाणे हा एक महत्त्वाचा सोहळा. कैरी पडली की आधी देठाजवळचा चीक गाळून टाकावा लागत असे. तो गाळला नाही, तर ओठांच्या कडेला लागून राहायचा आणि तो उतला की जखमा व्हायच्या. आमच्या चोरून कैरी खाण्याचा हा उघड कबुलीजबाब...! पण कैर्यार खाणे थांबायचे नाही. त्या काळात माझ्या खिशात एक खास पुडी असायची. कैरी नुसती खायची नसते... त्याला मीठ लावले की चव वाढते. काही जण मिठात तिखट टाकून आणत. मी त्यात एक व्हॅल्यू अॅरडिशन करीत असे. मीठ आणि लाल तिखटात काळा मसाला, जिरेपूड अशा गोष्टी टाकत असे. त्याची भन्नाट चव अजूनही जिभेवर रेंगाळते. काही कैर्या अतिशय आंबट. काही खोबऱ्यासारख्या गोड. पाडाला आलेल्या पिवळसर गाभा असलेल्या कैर्यांनची चव तर शहरात कधी मिळणारच नाही! ती कैरी थेट झाडावरून तोडूनच खायला हवी...!
देवणीहून उदगीरला आलो. आमचे घर (तेव्हा) गावाबाहेर होते. आजूबाजूला शेती. रस्त्यातत ‘ख्रिश्चन बंगला’ नावाचा एक भलामोठा परिसर. त्याला काटेरी कुंपण घातलेले. त्या कुंपणालगत आंब्यांची झाडे. तिथला रखवालदार मात्र सजग असे. अशा वेळी त्याची नजर चुकवून काही विशिष्ट झाडांवरील कैर्याघ पाडणे ही कौशल्याची गोष्ट असायची. काही विशिष्ट झाडे या साठी की त्या झाडाच्या कैर्याू ‘ओळखी’च्या झालेल्या. काही खूप आंबट तर काही कमी. त्या त्या दिवसाच्या मूडप्रमाणे कैर्याश पाडायच्या. खिशातल्या खास ‘मसाल्या’सह गट्टम करायच्या. कधी दप्तरात टाकून शाळेत न्यायच्या...!
कैरीचे पन्हे करायची कामगिरी आईकडे असे पण कैरीची चटणी ही मात्र माझी खासियत. देवणीत असताना अगदी पहिल्यांदा अशी चटणी आत्यांनी केल्याचे आठवते. आत्या - म्हणजे माझ्या वडिलांच्या आत्या. मैनाआत्या... आम्हीही त्यांना आत्याच म्हणत असू. त्या परभणी जिल्ह्यातील धारासूरच्या. कधीमधी त्या आमच्याकडे येत, आम्ही त्यांच्याकडे जात असू. त्यांच्या हाताला छान गोडी. घरात आलेल्या कैर्यांधची त्यांनी केलेली चटणी वेगळीच होती. सालं काढलेली आणि कोय बाहेर काढून टाकलेली कैरी खलबत्त्यात टाकून वाटायची आणि त्यात वरून तिखट मीठ टाकायचे. ती वाटून एकजीव झाली की त्यावर मस्त फोडणी टाकायची. नंतर केव्हातरी असे लक्षात आले की ही चटणी थोडी तुरट – कडवट लागतेय. शोध घेतल्यावर लक्षात आले की हिरवी साल न काढता चटणी वाटून घेतली की तशी चव येते...! मग कटाक्षाने साले काढून चटणी करणे सुरू झाले.
चटणीचा दुसरा आणि माझा अधिक आवडता प्रकार म्हणजे कैरी किसून घेणे. इथेही हिरवी साल आधी पूर्णतः काढायची. शक्यतो कैरीचे दोन काप करून आतील कोय काढून टाकायची. कोय धरलेली असेल तर की काढून न टाकता तिच्या काठाकाठाने जात ती किसणीने किसून घ्यायची. मग कांदाही किसायचा. कांदा किसताना खरी कसोटी. गोड कांदा असेल तर ठीक, पण तिखट असेल तर डोळ्यांना धारा लागायच्या. तशा स्थितीत हाताला जखम होऊ न देता कांदा किसणे हे ही कौशल्याचेच.
कैरी खूप आंबट असेल तर कांद्याचे प्रमाण वाढवायचे. पण मग चटणी खूप वाढायची. ते नको असेल तर मग दुसरा एक गोड मार्ग... किसलेली कैरी एका पातेल्यात घ्यायची, त्यात पाणी टाकायचे आणि कैरीचा कीस घट्ट पिळून काढायचा. किसाची चटणी आणि अर्क उतरलेल्या पाण्यात आणखी थोडे पाणी वाढवून आणि साखर, मीठ टाकून छान सरबत...!
दुसरीकडे, कीस आणि कांदा एकत्र करायचा, त्यावर तिखट-मिठ टाकायचे. हे मिश्रण हाताने कालवायचे. थोडी चव पाहायची. जे काही कमी असेल ते वाढवायचे. हे सारे झाले की लोखंडी पळीत तेल घ्यायचे, फोडणी टाकायची आणि मोहरी-जिरे फोडणीत फुटले की ‘चर्र’ आवाजाचा आनंद घेत ती फोडणी चटणीवर पसरायची...! चटणीच्या ज्या भागाला थेट फोडणीचा स्पर्श झाला तिची चव खरपूस लागायची. हा खरपूसपणा वाढावा म्हणून मग मी नवी शक्कल लढविली. चटणीत बोटे घुसवून छिद्रे तयार करायची आणि मग फोडणी पसरायची. सपाट पृष्ठभागापेक्षा अधिक भागात चटणी पसरली जात असे...! फोडणीची चव तेवढ्याच जास्त भागात...!
हे सगळे झाले की मग आस्वादाची तयारी. सर्वसाधारणपणे उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या दोन-अडीच महिन्यांत मला वरण-भाजी वगैरे काहीही नसले तरी चालायचे. चटणी पोळी, चटणी भाकरी आणि चटणी भात... कुणाला राक्षसी वाटेल पण भाजीसारखा चटणीचा डोंगर ताटात घ्यायचा आणि तो संपवायचा. एकदा केलेली चटणी फार तर दोन दिवस टिकायची. तेव्हा घरी फ्रिज नव्हता आणि बाहेर ठेवलेले अन्न उन्हामुळे लवकर विटायचे. म्हणून मग संपविण्याचा हा असा मार्ग...!
उदगीर सुटले आणि औरंगाबादच्या मेसच्या जेवणात चटणी दिसेनाशी झाली. वर्षभरातच मेसला वैतागलो आणि खोलीवरच खिचडी - सँडविच - ऑम्लेट सुरू केले. तेव्हाही चटणी बंद होती. लग्नानंतर काही काळ पुण्यात होतो, तेथे चटणीची आठवण यायची. योगायोगाने सिंहगड रोडवर आनंद नगर भागात घराशेजारीच आंब्याची झाडे होती. पण कॅनॉलच्या दुसर्या टोकाला. बेत राहून गेला. चार-दोन वेळा कैऱ्या विकत आणून चटणी करून खाल्ली.
2001 च्या प्रारंभी औरंगाबादेत परतलो आणि चटणीचा सिलसिला कमी प्रमाणात का होईना नव्याने सुरू झाला. अर्थात, कैऱ्या ‘विकत आणलेल्या’ असतात. तयार करण्याची पद्धत तीच.. पारंपरिक. इतर सारा स्वयंपाक पत्नी करते पण चटणीचा विभाग माझ्याकडेच. तिला आणि मुलालाही ही चटणी फारशी आवडत नाही. ताटात वाढलेली चटणी ते फार तर उष्टावतात... मला वाईट वाटू नये म्हणून...!
मला मात्र आजही ही चटणी आवडते. मनसोक्त खाण्याची इच्छा असते. पण मागच्या सात-आठ वर्षांत थोडा त्रास होतोय. तिखट सहन होत नाही. (खाताना अर्थातच छान वाटते पण दुसर्याे दिवशी त्रास होतो!) म्हणून तिखटाचे प्रमाण कमी केलेय. आधी लालभडक होणारी चटणी आता फिकटली आहे. साहजिकच मिठाचे प्रमाणही कमी झालेय आणि तेलाचेही. पण चटणीचा हा किल्ला मी एकहाती लढवीत असतो.
ही चटणी असेल तर आजही मला भाजी-वरणाची गरज वाटत नाही...!
०००

Wednesday, February 8, 2017

पाने पळसाची... आणि काळाचीही !

परवा प्रवासात डोंगरकाठी फुललेला पळस दिसला. गाडी थांबवली. बांधावर गेलो. पोपटी-हिरव्या पर्णसंभारावरून हलकेच हात फिरवला. पानांच्या खल-वरची चंदेरी लव तळहाताला गुदगुल्या करून गेली. एका देठावर तीन पानांचा नियतीचा, निसर्गाचा नियम निमुटपणे पाळत पळस फुललेला होता... हारीने हिरवी झालेली झाडे वाऱ्यावर डौलाने मिरवत होती... पळसाच्या पानांची संवेदना हातावर उमटत होती आणि काळाची पाने मनात उलगडत होती... टाईम मशीन प्रमाणे मी भूतकाळात पोहचलो होतो...
साधारण १९७९-८० चा काळ असावा... तिथे माझी पळसाची पहिली भेट – ओळख झाली. तिसरी-चौथीत असेन. देवणीच्या झेडपीच्या शाळेत शिकत होतो. आई-वडील देवणीतच नोकरीला. जेमतेम ४-५ हजार लोकवस्तीचे गाव. कुठल्याही दिशेने १०-१२ मिनिटे चालले की आलोच गावाबाहेर.
गावाच्या पूर्वेला नदीचा उतार. तिकडेच थोडी खडकाळ जमीन. एक-दोन किलोमीटरवर हंचनाळ नावाचे आणखी छोटेसे गाव. देवणी आणि हंचनाळच्या मधून गेलेला डांबरी रस्ता नदी ओलांडून यायचा. या रस्त्याच्या बाजूने, खडकाळ जमिनीत पळस फुलायचा. कधी नदीकाठाने चालत तर कधी पांदीच्या रस्त्याने सायकलवर तिकडे जाणे व्हायचे.
त्या काळात अनेक वर्षे आमच्याकडे एक नेम असे. दादा, माझे वडील दररोज त्या भागात जात आणि पळसाच्या पानांचा भला मोठा गठ्ठा सायकलच्या कॅरिअरला बांधून आणत. अनेक वेळा मीही त्यांच्यासोबत जात असे. पाने तोडताना ते काही नियम पाळत. मी अख्खी फांदी तोडू लागलो, की ते आडवत. फांदी नव्हे, पाने तोडायची हे समजावून सांगत. पाने तोडताना देठ कसा अलगद तोडायचा, पान कसे फाटू द्यायचे नाही, हे मी शिकत गेलो. ही तोडलेली पाने घरात आली की रात्री ओल्या कापडाने ती स्वच्छ केली जात आणि मग पत्रावळी, द्रोण लावायला सुरवात होई. त्या काळात रेडीओशिवाय कुठली करमणूक नसे. अशी कामे हीच करमणूक.
पत्रावळी आणि द्रोण लावणे ही पण एक कला असते. पत्रावळ लावायची तर आधी एक मोठे पान निवडायचे. ते मध्यभागी ठेवून त्या भोवती एकमेकांवर चढवत क्रमाने गोलाकार पाने रचायची. ज्या काड्या तोडून पत्रावळ जोडायची त्याला आम्ही चुईट्या म्हणत असू. शेजारच्या घरी ज्वारीच्या धाटांचा कडबा पडलेला असे. त्यातील जाडसर १-२ धाटे निवडून आणायची, त्यावरील पानांचा पातळ पापुद्र काढून टाकायचा. जसे आपण उसाचे कांडे सोलताना वरच्या चुईट्या काढतो तशाच या सुद्धा काढायच्या. दादा त्यासाठी बतई वापरत. बतई म्हणजे पातळ पाते असलेली सुरी. चुईट्या काढायच्या, त्याला आतल्या बाजूने लागून आलेला आतील कांड्याचा थर दूर करायचा. मग या पातळ काड्या बारीक आकारात उभ्या कापायच्या.
ते अशा ४०-५० काड्यांचा एक जुडगा करायचे. असे अनेक जुडगे दुपारच्या वेळेत तयार केले जात. पत्रावळ लावायची तेव्हा ही काडी नेमकी किती लांबीची तोडायची याचाही नियम असे. पाट घट्ट बसायला हवे पण पत्रावळीवर जेवण करताना भात कालवून खाताना काड्या निघायला नकोत...! हे नजाकतीचे काम.
द्रोण लावताना आणखीच जास्त काळजी घ्यायला लागायची. दादा खूप छान ड्रोन लावत. दोन पाने परस्पर विरुद्ध दिशेला देठ करून जोडायची, दोन्ही बाजूला अशी घडी करायची की तळाला सपाट आकार यायला हवा. तळ निमुळता झाला तर द्रोणात वरण, भाजी घेताना कडेने भाताचा आधार द्यावा लागतो. तसा आधार न देता वरणासह उभा राहणारा द्रोण सर्वोत्तम!
आमचे दररोजचे टार्गेट असे. असे द्रोण, पत्रावळीचे गठ्ठे बांधून मधल्या खोलीत रचून ठेवले जात. पत्रावळी वाळताना पाने वाकडी होत असत. ती तशी होऊ नयेत म्हणून त्यावर पाट ठेवला जात असे आणि त्यावर धान्याचा एखादा डबा.
मोठ्या संख्येने अशा पत्रावळी-द्रोण पुढे बराच काळ घरात जेवणासाठी वापरले जात. आईचा भांडी धुण्याचा वेळ आणि कष्ट तेवढेच वाचत. शाळेत जाण्याआधी स्वयंपाक आणि रात्रीच्या जेवानंतर भांडी घासण्यात तिचा बराच वेळ जायचा. तिला एवढा काळ थोडी उसंत...!
मीही दादांकडून पत्रावळी लावायला शिकलो. चांगल्या लावत असे. कदाचित आजही तशाच लावत असे. पुढे देवणीतून उदगीरला शिकायला जाऊ लागलो. हा संबंध कमी होत गेला. पुढे माझेही `नागरीकरण` झाले. आता मुलाच्या `बड्डे`ला किंवा बायकोच्या भिशी पार्टीला `डिस्पोजेबल प्लेट` आणल्या जातात, तेव्हा मला हटकून माझे लहानपण आठवते...!
या पळसपानांनी त्या सुंदर दिवसांची आठवण मनात ताजी केली...

Thursday, February 2, 2017

साय आणि मी... हे जणू अद्वैतच...!दुधाच्या पातेल्यावर माझी नजर कायम असते. लहानपणी आईची आणि आता बायकोची नजर चुकवून पातेल्यातील दुधावरची साय पळवायची आणि त्या त्या वेळच्या मूडप्रमाणे मनाजोगत्या कॉम्बीनेशनप्रमाणे गट्टम करायची, हा माझा आवडता छंद...!
कधी ही साय वाटीत घ्यायची, त्यात साखर टाकायची आणि बोटाने एकसारखी मिसळून बोटानेच जिभेवर सोडायची, ही एक पद्धत... किंवा मग, घरात ब्रेड असेल दोन स्लाईसमध्ये सायीचा एक जाडसा थर हलकेच पसरायचा आणि त्यावर साखर पेरायची. मग हे स्वर्गसुख साखरेच्या दाण्यांच्या `कुडुम कुडुम` अशा अमृतध्वनिसह जठरापर्यंत पोहोचवायचे...!
या बदल्यात एकेकाळी आईचे फटके खावे लागायचे. तिच्या दृष्टीने ही साय विरजणात जाणे महत्वाचे. असे झाले तर तूप घरी निघायचे...! बायकोचीही हीच धडपड. घरी लागणारे तूप विकत आणले तर काय बिघडले? या प्रश्नाला मला कधीच समर्पक उत्तर मिळाले नाही. तसेही विकतचे तूप घरी यायचेच... येतेच. पण सायीचा मोह सुटत नाही... त्यांचा आणि माझाही...!
परवा असाच मूड लागला आणि पातेल्यातील सारी साय माझ्या पोटात उतरली. पुढे काय झाले, हे इथे सांगणे संसारी माणूस म्हणून प्रशस्त वाटणार नाही, पण म्हणून माझी सायीबद्दलची अभिलाषा कमी होणार नाही, हे निश्चित...!
साय म्हटले की मन वर्तमानात शोध घेते आणि त्याच वेळी भूतकाळातही रेंगाळू लागते. मग मी मनाने थेट देवणीला पोहचतो. उमलत्या वयाच्या माझ्या साऱ्या आठवणी देवणी या (त्या वेळच्या) छोट्या गावाशी जोडल्या गेलेल्या आहेत. (आता देवणी हे लातूर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे.) माझा जन्म या गावचा. त्या काळचे हे पाच हजार लोकवस्तीचे गाव. गावाला एक टेकडी, एक नदी, एक आठवडी बाजार, एक जिल्हा परिषदेची शाळा, एक कन्या शाळा, एक बाजारपेठ... हे सारे लाभलेले. तर अशा या गावात माझे मन आजही रेंगाळते.
साय म्हणजे त्या आधी दुध. दुध म्हटले की दोन व्यक्ती डोळ्यासमोर येतात. पहिला – माझा दोस्त राम डोंगरे आणि दोन - आमच्या दुधवाल्या मावशी – मथुरा माय...!
राम माझा वर्गबंधू. का कोण जाणे, पण त्याचे माझ्यावर खूप प्रेम. कधी वर्गात किंवा रस्त्यात कुणाशी माझे भांडण झाले, तर माझ्या वतीने राम समोरच्या `दुश्मना`शी मारामारी करायचा. राम शेतकरी कुटुंबातला. घरात गुरे-ढोरे. कधी जनावरे चरून आली की त्यांना नदीवर नेवून व्हावू घालायची जबाबदारी रामवर यायची. मग तो चार-सहा जनावरे घेवून नदीवर निघायचा. नदीचा रस्ता आमच्या घरावरूनच जायचा. रामची हाक आली की त्या जनावरांच्या मागोमाग रामसोबत मी निघायचो. तेव्हा नदीला वर्षातले ८-९ महिने पाणी असायचे. जनावरे नदीत डुंबायची. एकेका जनावराला उभे करून राम दगडाने घासायचा आणि मी त्यांच्या पाठीवर पाणी उडवायचो.
एकदा राम म्हणाला - `दुध पिणार का?`
मी बोलून गेलो - `हो`.
राम म्हणाला - `बस खाली`...!
नदीला पाणी कमी होते. मी तसाच गायीच्या आचळाखाली पायाच्या चवड्यावर बसलो आणि रामने चक्क आचाळाची दिशा माझ्या तोंडाकडे करून थेट तोंडात दुध काढायला सुरुवात केली. हे खरेखुरे `धारोष्ण` दुध पिण्याचे भाग्य रामने मला अनेकदा मिळवून दिले. आज राम नाही. काही वर्षांपूर्वी देवाने त्याला बोलावून घेतले, असे मला कळले. वाईट वाटले...
रामनंतर दुधासाठी आठवते `मथुरा माय`. मथुरा माय ही साऱ्या गावाची `माय`! जख्ख म्हातारी. वृद्धत्वाच्या सुरकुत्या चेहऱ्यावर सुरेखपणे पसरलेल्या... आमच्या घरापासून जवळच वीरभद्रच्या मंदिराजवळ त्या राहायच्या. त्यांना दोन मुले. ती शेतीत काम करीत. पण घरातील दुध-दुभत्याची जबाबदारी मथुरा मायची. आम्ही मुले त्यांना `मथुरा मावशी` म्हणत असू. त्यांच्या शेतातला एक एक आंबा मोठ्या तांब्याएवढा. दोन आंब्यांचा रस आमच्या चौघांच्या कुटुंबाला पुरायचा. अशा या मथुरा मावशी आमच्याकडे दुध देत. आमच्याकडे त्याला `वरवा` म्हटले जायचे. दररोज एक लिटर दुधाचा वरवा!
मावशी मोठ्या तांब्यात दुध आणायच्या. बिन पाण्याचे दुध. पण कधी कधी त्यात पाणी असायचे... मोह कुणाला सुटलाय? त्यावर उपाय? दादा दुधाचे चार थेंब डाव्या तळव्यावर घ्यायचे, उजव्या हाताने त्यावर तुरटी फिरवायचे. हे दुध घट्ट राहिले तर दुध `निक्के` म्हणजे शुद्ध आहे आणि फुटले तर त्यात पाणी...! असे पाणी असलेले दुध असेल तर दादा ते घ्यायचे नाहीत. महिन्यातून एक-दोनदा हा प्रकार घडायचा. दुध परत जायचे, नवे यायचे. पण मथुरा मावशीचा वरवा बंद झाला नाही!
अधून मधून त्यांच्याकडे एखादी गाय-म्हैस व्यायची. त्या छोट्या खेड्यात अशा बातम्या वेगाने पसरत. गोऱ्हा झाला की कालवड? कुठल्या रंगाची? वासरू किती वेळात उभे राहिले? ही सारी मौल्यवान माहिती घटना घडल्याच्या १०-१५ मिनिटांत गावभर जायची. पहिले १-२ दिवस पार पडले की मथुरा मावशी एखाद दिवशी दोन तांबे आणत. एक, वरव्याचे दुध आणि दुसरा – गीन्नासाठीचे दुध !
`गिन्ना` म्हणजे खरवस. गिन्ना हा कानडी शब्द. कर्नाटक सीमेपासून ८-१० किलोमीटर अंतरावर असल्याने देवणीत कानडी मोठ्या प्रमाणात बोलली जायचे. असे अनेक शब्द व्यवहारात रुळलेले असायचे. तर, हे गिन्न्याचे दुध आले की ते थेट स्टोव्हवर जायचे. पहिल्या २-४ दिवसांत हे दुध अतिशय वेगाने घट्ट व्हायचे. इतके वेगाने की त्यात साखर विरघळण्यासाठी सुद्धा वेळ मिळायचा नाही...! मला हा गिन्ना खूप आवडायचा.. आवडतो...
वरव्याचे दुध तापवले जायचे. दुभत्याच्या लोखंडी कपाटात ठेवले जायचे. कधी बाहेर राहिले आणि उघड्या खिडकीतून मांजर आले की दुध सांडलेच म्हणून समजा. असे कधीतरी व्हायचेच...! कपाटात ठेवलेल्या दुधावर माझा डोळा असायचा. सकाळी शाळेत जाण्याआधी संधी नसायचीच. संध्याकाळी माझ्याआधी आई शाळेतून आलेली असायची. दुधावरची साय विरजण घालणे, ही तिची पहिली पसंदी. कधी ती विसरायची आणि मग माझ्यासाठी ती सुसंधी...! स्वयंपाकघरात कुणी नाही असे पाहून पातेल्यात हात घालायचा, बोटाच्या चिमटीत सापडेल तेवढी साय काढायची आणि थेट जिभेवर...! अहाहा... हेच ते स्वर्गसुख...!
वय वाढले तरी हा मोह सुटत नाही. मागच्या काही वर्षांत `पचेल तेवढेच खावे` हा साक्षात्कार झाल्यामुळे साय खाण्याचे प्रमाण थोडे कमी झालेय खरे, पण कधी मोह अनावर होतो आणि चरबीत थेट वाढ करणारा हा घटक अलगदपणे घशाखाली उतरतो...!
तर अशी ही कहाणी... साय आणि मी... हे जणू अद्वैतच...!