Monday, January 22, 2018

उद्यम संस्कृती

परिसराच्या संस्कृतीचा आढावा घेण्याच्या यादीत ‘उद्यम संस्कृती’ हा विषय परंपरेत न बसणारा, पण तेवढाच महत्त्वाचा. कुठल्याही संस्कृतीच्या विकसनासाठी उद्यम संस्कृतीचा विकास सर्वाधिक महत्त्वाचा. नागर संस्कृती एकेकाळी नद्यांच्या काठी वसायची, त्यामागे महत्त्व होते ते कृषिसंस्कृतीचे... तिचा पाया आर्थिक. आता नागर संस्कृती ‘हायवे’काठी विकसित होतेय. तिचाही पाया आर्थिक. आर्थिक सुबत्तेचा मार्ग उद्यम संस्कृतीतूनच विकसित होतो. या दृष्टीतून हा आढावा...

(दै. सामनाच्या २३ जानेवारी २०१८ च्या विशेषांकात प्रकाशित लेख)

आशियातील सर्वाधिक वेगाने वाढणार्‍या शहराचा मान आैरंगाबादने मिळविला, त्याला आता बराच काळ लोटला आहे. तो वेगही पुढे मंदावला. ते नैसर्गिकही होते. कुठलाही वेग असा शाश्वत टिकत नसतो. पण त्या निमित्ताने या परिसरात विकसित झालेली उद्यमसंस्कृती पुढील काळात या परिसराच्या विकासासाठी कारणीभूत ठरली. या प्रवासात अनेक टप्पे आले. विविध आव्हाने समोर उभी रहिली. पण त्या सर्वांतून मार्ग काढत आजवरची ही वाटचाल सुरू आहे. सुमारे अर्धशतकापूर्वी ‘निर्लेप’च्या स्थापनेतून इथल्या उद्यम संस्कृतीचा पाया घातला गेला. या संस्कृतीच्या विकासाला काही बड्या उद्योगांच्या आगमनाने चालन मिळाली. विविध पूरक उद्योगांच्या उभारणीतून ही संंस्कृती इथे विकसित झाली आणि आता हळू हळू हे शहर आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकतेत अग्रेसर होताना दिसत आहे. उद्यम संस्कृतीच्या विकासाचे हे टप्पे रंजक आहेत, त्याच वेळी भविष्यातील विकसनासाठी दिशादर्शक ठरणारे सुद्धा आहेत.

एकेकाळी, वाळूज आणि चिकलठाणा औद्योगिक वसाहतील मोठे उद्योग आले आणि त्या पाठोपाठ काही कुप्रवृत्तींचाही शिरकाव झाला. सुदैव असे, की काही मोजक्या हिंसक प्रकारांनंतर इथला कामगार सावध झाला आणि खूप अल्पकाळात ही कुप्रवृत्ती हद्दपार झाली. महाराष्ट्रापुरता विचार करायचा तर संभाजीनगरातील उद्योगक्षेत्र हे तुलनेत सर्वाधिक शांत असलेले उद्योगक्षेत्र मानता येते. औद्योगिक विकास साधायचा तर औद्योगिक विश्वातील शांतता सर्वाधिक महत्त्वाची असते, आपले घर उद्योग चालवतात, स्वार्थी नेते नाही, हे भान इथल्या ‘ब्लू कॉलर’ला आधी आले आणि हे वास्तव स्वीकारत त्यांनी आपल्या भूमिका मर्यादित केला. हक्कासाठी लढा देणे आणि सर्वनाशाकडे लोटणे या दोन वेगळ्या संकल्पना आहेत, हे या सर्वांनी ठसठशीतपणे जाणवून दिले. हाती हात घेऊन पुढे जाता येऊ शकते याचा आदर्श वस्तुपाठ याच औद्योगिक वसाहतींनी जगासमोर ठेवला. उद्यम संस्कृतीच्या पायाभरणीत या जाणिवेचा भाग अतिशय महत्त्वाचा.

वेरूळची लेणी असोत, अजिंठ्याची शिल्पकला... नालंदा - तक्षशीलेची बुद्धिप्रधान ग्रंथसंपदा असो की हडप्पा-मोहनजोदारोची संस्कृती, या प्रत्येक ठिकाणच्या आविष्कारामागे भक्कम आर्थिक आधार होता. सैन्य उपाशीपोटी लढू शकत नसतेच. हेे सैन्य रणांगणावरचे असो की कलेच्या क्षेत्रातले... किमान दोन वेळच्या जेवणाची आणि मूलभूत सोयींची पूर्तता करणारा आर्थिक आधार कुणीतरी उपलब्ध करून दिलेला होता, म्हणून कुठल्याही कलाकृती उभ्या राहिल्या. हा आधार हवेतून येत नसतो. तो जमिनीवर साकारला जात असतो. हा आधार देणारे हात आणि त्या मागचा मेंदू जितका सकस, सकारात्मक आणि सशक्त, तितकी अन्य संस्कृतींची जोपासना बलशाली... हेच सूत्र जगभर दिसते. संभाजीनगरही त्याला अपवाद असण्याचे कारण नाही.

उद्यमिता ही सुद्धा एक संस्कृती आहे. ‘कामगारांची पिळवणूक करणारा भांडवलदार’ ही संकल्पना कधीच लयाला गेली आहे. कामगार आणि मालक ही दरी बुजविण्यात या उद्यम संस्कतीचा वाटा अतिशय मोलाचा. ही प्रेरणा दिली जपानी आणि जर्मन उद्योगांनी आणि तिथल्या कार्यसंस्कृतीने. नव्या नव्हाळीच्या विवाहितेला किंवा पहिलटकरणीला अनुभवी पिढीने केलेले मार्गदर्शन जितके मोलाचे तेवढेच या जपान-जर्मनीच्या कार्यसंस्कृतीचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. ‘फाईव्ह एस’, ‘कायझेन’, ‘झीरो डिफेक्ट’, ‘पीपीएम’ ... विविध संकल्पना जगभरातील उद्योगक्षेत्रात रुजत गेल्या आणि त्यातून सर्वोत्कृष्टतेचा ध्यास घेतलेली नवी कार्यसंस्कृती विकसित होत गेली.

या नव्या प्रवाहात आणखी दोन नव्या संकल्पना उद्योग क्षेत्राची परिमाणे बदलत चालल्या आहेत. ‘लीन मॅनेजमेंट’ आणि ‘आयओटी’ अर्थात इंटरनेट ऑफ थिंग्ज. लीन मॅनेजमेंट ही मुळात जर्मन संकल्पना. भारतात आता ती येऊ घातली आहे. काही मोजक्या ठिकाणी ती अंमलातही आली आहे. लीन मॅनेजमेंट एखाद्या अँटीव्हायरससारखे काम करते. तुमच्या यंत्रणेतील, व्यवस्थापनातील त्रुटी ते दूर करते आणि तुम्हाला तुमची संस्था नव्या उंचीवर नेण्यास मदत करते. जिथे कुठे व्यवस्थापन आहे त्या प्रत्येक ठिकाणी याचा उपयोग आहे. ‘आयओटी’ने मात्र आता भारतात चांगलेच हातपाय पसरले आहेत. विविध कंपन्यांचा विस्तार वाढतो आहे, प्रत्येक युनिटवर लक्ष ठेवणे शक्य होत नाही. अशा स्थितीत संचालकांना एकाच वेळी एकाच प्लॅटफॉर्मवर त्यांच्या उद्योगसमूहाचा डेटाबेस उपलब्ध करून देणारे साधन म्हणून ‘इंटिग्रेटेड रिमोट मॅन्यूफॅक्चरिंग मॅनेजमेंट’ आली. त्याचा मुलाधार म्हणजे इंटरनेट.

इंटरनेटचा वापर करून उद्योगातील प्रत्येक पायरीवर लक्ष ठेवणारी, नियंत्रण आणणारी संकल्पना म्हणजे ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’. आज झालेल्या चुकांवर उद्या चर्चा करण्याऐवजी मुळात आजच चुका न होऊ देणारी ही पद्धती. यातून उत्पादनक्षमता वाढते, अचूकता निर्माण होते, वेस्टेज नियंत्रणात येते आणि या शिवाय संबंधित संचालकाला जे काही नियंत्रित करायचे आहे, ते इथे करता येते. मोठी क्षमता असणारी ही प्रक्रिया आहे. या प्रत्येक गोष्टींमुळे उद्योग क्षेत्र अधिकाधिक सक्षम होत चालले आहे. नवनव्या संस्कृतींना आत्मसात करून ही नवी आंतरराष्ट्रीय उद्यम संस्कृती बाळसे धरू लागली आहे.

एकेकाळी असलेले ‘सेलर्स मार्केट’ आता ‘बायर्स मार्केट’ झाले आहे. एकेकाळी स्कूटरसाठी सहा-आठ वर्षांची वाट पाहावी लागायची, तिथे ठरवल्यानंतर सहा तासांत स्कूटर घरी येऊ लागली. हा बदल सगळीकडेच झाला. भौतिक सुबत्तेच्या सार्‍या वस्तू तेवढ्याच वेगाने बाजारपेठेतून घरापर्यंत पोहोचल्या. ही प्रक्रिया फक्त बाजारपेठेत आणि कर्जपुरवठा करणार्‍या वित्तीय संस्थांपुरती मर्यादित नसते. ती उद्योगक्षेत्रातही झिरपावी लागते. बाजारपेठेत झालेला हा बदल स्वीकारल्याशिवाय उद्योगक्षेत्राला तरणोपाय नव्हता. हा बदल किती सहजतेने स्वीकारला जातो त्यावर त्या त्या उद्योगांचे भविष्य ठरणार होते. संभाजीनगरची उद्यमसंस्कृती या संकटावर मात करण्यात यशस्वी ठरली. उत्पादन यंत्रणेतील आधुनिकीकरण, जागतिक स्तरावरील नव्या ग्राहकांचा शोध, तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कामगारवर्गाचे कौशल्यविकसन... प्रत्येक आघाडीवर एकेक पाऊल पुढे टाकत उद्योजक आणि कामगारांनी हातात हात घेऊन प्रगतीकडे वाटचाल सुरू ठेवली आणि त्यातून इथली उद्यमसंस्कृती बहरली. आज उद्योगांच्या नफ्यामध्ये महत्त्वाचा वाटा गुणवत्ता नियंत्रणाचा आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आणि बड्या उद्योगांकडून अधिक स्पर्धात्मक दरात काम करावे लागले, अशा स्थितीत टिकून राहणे आणि प्रगती करणे यात गुणवत्ता नियंत्रण, उपलब्ध यंत्रणेचा पुरेपूर वापर, उपलब्ध कामगारांचा कौशल्यपूर्ण वापर या बाबी खूप महत्त्वाच्या ठरल्या.

 तंत्रज्ञान, भांडवल आणि कुशल मनुष्यबळ या त्रिसुत्रीवर उद्योगाची प्रगती अवलंबून असते. तंत्रज्ञान आणि भांडवल उभे करणे आज तुलनेत सोपे झाले आहे. मुद्दा उरतो तो कुशल मनुष्यबळाचा. औद्योगिक प्रशिक्षण, कामगारांसाठी कल्याणकारी योजना, त्यांच्या आत्मप्रतिष्ठेत वाढ करण्यासाठी उद्योजकांनी उचललेली पावले या आधारावर प्रगतीची पावले या मातीवर उमटली. त्यातून उद्यमसंस्कृती बहरत गेली. बडे उद्योग एकेकाळी आपल्या पुरवठादार कंपन्यांकडून सुटे भाग तयार करून घेत आणि आपल्या उद्योगात त्यांच्या जुळवणीतून अंतिम उत्पादन तयार होत. काळ बदलतोय, तसे या प्रक्रियेतही बदल होताहेत. सुट्या भागांऐवजी ‘असेंब्ली’चीच मागणी मोठ्या उद्योगांकडून होत असताना आपापल्या कौशल्यांत वाढ करण्याचा किंवा तो व्यवसाय सोडण्याचा असे दोनच पर्याय पुरवठादारांसमोर असतात. बहुतेकांनी ‘असेंब्ली’चा पर्याय निवडला, तेथे गरज होती मनुष्यबळाच्या कौशल्यविकासाची.

उद्यमसंस्कृतीचा विकास होताना या घटकावर विविध उद्योगांनी घेतलेली मेहनत विलक्षण आहे. काही उद्योजकांनी ‘राईट पर्सन इन राईट बस, राँग पर्सन आऊट ऑफ बस’ अशी कठोर भूमिका कुणी घेतली तर आपल्याकडील प्रत्येक कामगार-कर्मचार्‍याला योग्य प्रशिक्षण देत, त्यांना प्रगतीच्या वाटा खुल्या करून दिल्या. प्रगतीचा ब्लू प्रिंट प्रत्येक ठिकाणी एकसारखा नसतो... तो तसा वापरता येत नसतो. प्रत्येक ठिकाणची गरज, उपयुक्तता आणि उपलब्ध कौशल्ये यांच्या आधारावर तो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा वापरावा लागतो. यात बहुतेकांनी यश मिळविले. या यशामुळेच जागतिक मंदीच्या या वातावरणातही इथल्या औद्योगिक वसाहतीत समाधानकारक उत्पादन चालू राहिले. बेकारीची कुर्‍हाड कोसळण्याचे प्रसंग तुलनेत कमी आले.
मुंबई, पुणे किंवा नाशिकच्या तुलनेत संभाजीनगरातील उद्योजकतेला, औद्योगिक वसाहतींना अधिक प्रतिकूलतेचा सामना करावा लागतो. त्यातील सर्वात महत्त्वाचा भाग पाण्याचा. पर्जन्यछायेच्या प्रदेशात असलेल्या या शहर-परिसराला पाणीटंचाईचा सामना नेहेमीच करावा लागतो. त्यातही कधी कुणी न्यायालयात जाते आणि न्यायालयाच्या आदेशावरून कंपन्यांना आपल्या शिफ्ट बंद कराव्या लागतात. अशा सर्व प्रतिकूलतांशी झुंजत प्रगतीच्या वाटेवरील घोडदौड सुरू ठेवली आहे. म्हणूनच इथल्या उद्यम-संस्कृतीबद्दल आवर्जून निरीक्षणे नोंदविण्याची गरज भासली.

प्रत्येक भांडवलदार पिळवणूक करणारा नसतो, प्रत्येक कामगार कामचोर नसतो, कृषि आणि उद्योग ही दोन क्षेत्रे जशी विकसित होतील, तशी भारतासारख्या राष्ट्राची प्रगती होत राहील. दुर्दैवाने एकीकडे कृषिसंस्कृतीसंदर्भात अनेक खूप समाधानकारक वातावरण नाही. ते क्षेत्र रासायनिक खते आणि कीडनाशकांच्या अतिवापरामुळे पोखरले गेले आहे आणि त्यातून बाहेर पडून सेंद्रीय शेतीकडे वळण्याचे त्राण अजून यायचे आहे. समतोल राखत प्रगतीची वाट चोखाळूनच त्या क्षेत्रातील भवितव्य घडेल. या तुलनेत उद्योगाच्या क्षेत्राने हे बदल जलदगतीने स्वीकारले आणि पचवले.

आैरंगाबादच्या औद्योगिक वसाहतींनी सुद्धा ते आव्हान स्वीकारले आणि पेलले सुद्धा.
अंतिमतः पहिला मुद्दा पुन्हा एकदा. उद्यमसंस्कृती आणि अन्य सर्व संस्कृतींचा परस्परसंबंध खूप महत्त्वाचा आहे. कला, साहित्य, क्रीडा... कुठल्याही संस्कृतीच्या विकासाला सर्वात महत्त्वाचा ठरतो तो आर्थिक आधार. म्हणूनच साहित्य संमेलनासाठी असो, कला महोत्सवासाठी असो की क्रीडा क्षेत्रातील उपक्रमांसाठी... प्रत्येक ठिकाणी आवश्यक ठरते तो उद्यम संस्कृतीचा आधार. समाजभान जपणारी उद्यमसंस्कृती अन्य क्षेत्रांच्या प्रगतीसाठी, विकासासाठी पूरक ठरते. आैरंगाबादेतील उद्यमसंस्कृती त्याला अपवाद नाही.

- दत्ता जोशी
(मुक्त पत्रकार व उद्योजकतेचे अभ्यासक)
9422 25 25 50