Tuesday, July 19, 2011

भारताच्या रोजच्या मृत्यूचे सोयरसूतक कुणाला?


भारत रोज कणाकणाने मरतो आहे. कधी तो नेत्यांच्या भ्रष्टाचाराने मरतो तर कधी या नेत्यांना तुरुंगातही ‘व्हीआयपी’ ट्रीटमेंट दिल्याचे पाहून मरतो. रेल्वेच्या अपघातांमध्ये तर तो महिन्यातून किमान एकदा मरतो आणि बॉंम्बस्फोटांत तो (राहूलबाबाच्या भाषेत सांगायचे तर) एक टक्का तरी मरतोच मरतो...! या मरणाचे सोयरसुतक कुणाला आहे का?

......................................................
पाक्षिक `शेतकरी संघटक`च्या 21 जुलै 2011 च्या अंकात प्रकाशित झालेला लेख...
......................................................
जिल्हा कोर्टासमोरून जात होतो. पोलिस व्हॅनमधून कोणा व्यक्तीला पोलिस हातकड्या घालून उतरवीत होते. त्या माणसाची रया पूर्णतः गेली होती. अत्यंत मळलेले कपडे, गालावर वाढलेले दाढीचे खुंट, अस्ताव्यस्त पसरलेले केस आणि पाय अनवाणी, डोळ्यातील चमक नाहिशी झालेली... अशी अवस्था झालेल्या या माणसाने कोणता गुन्हा केला असेल, या उत्सुकतेपोटी बंदोबस्तावरील हवालदाराकडे मी सहज चौकशी केली. त्याने उत्तर दिले, ‘x x x x ने घरफोडी केली. नव्वद हजाराचा डल्ला मारला. पळून चालला होता, लोकांनी पकडून फोडून काढला आणि ठाण्यात आणला.’ मला सर्वांचीच कीव आली. पोलिसाची, लोकांची, ज्याच्या घरी चोरी झाली त्याची आणि या चोराचीही. पोलिसांची या साठी, की अशा ‘चिल्लर’ चोरांना पकडण्यात त्यांचा वेळ अकारण वाया जात आहे. लोकांची या साठी की ज्या चोरांना चामडी लोळेपर्यंत फोडून काढून भर चौकात फासावर चढवायला पाहिजे अशा महाचोरांना ते फोडून तर काढत नाहीत, उलट आपले प्रतिनिधी म्हणून निवडून देतात. ज्यांच्या घरी चोरी झाली त्यांची या साठी की आता कुणाच्याच घरी काहीही सुरक्षित राहिलेले नाही आणि चोराची या साठी की फक्त 90 हजारांच्या चोरीसाठी त्याची ही अवस्था झाली. लाखो कोटींचे दरोडे घालणारे पंचतारांकित तुरुंगात सरकारी पाहुणचार घेत आहेत...!


मला ए. राजा, कनिमोळी, सुरेश कलमाडी प्रभृतींचे पोलिसांच्या गराड्यात तुरुंगातून कोर्टात आणि कोर्टातून तुरुंगात जात असतानाचे हषोल्हासित चेहरे आठवले. यांच्या चेहर्‍यावरील आणि कपड्यांवरीलही घडी मोडलेली नव्हती. राजाचे वर्तन तर खरोखरच राजाप्रमाणे होते पण कनिमोळीसुद्धा नुकत्याच एकाद्या ब्युटीपार्लरमधून आल्यासारख्या प्रफुल्लित दिसत होत्या. सुरेश कलमाडी यांचे तर काय सांगावे? एखाद्या सम्राटालाही लाजवील असा त्यांचा अविर्भाव आहे. कोर्टाजवळ चपलेने मारण्याचा प्रयत्न झाल्यानतंरही त्यांच्या मुखकमलावर विलसणारे हास्य पाहून त्यांच्यात लज्जाभाव अस्तित्वात तरी आहे काय, याविषयी शंका निर्माण झाली. भुरट्या चोर्‍या करणाराची अत्यंत वाईट अवस्था पाहताना लाखो कोटींचा भुगा करणारे हे लोक अशा कडक इस्त्रीच्या कपड्यांनिशी कसे राहू शकतात? तुरुंगात डांबण्याचे आदेश असताना एखाद्या महालात असल्यासारखी त्यांची सरबराई कशी होते? हे सुद्धा संबंधित न्यायमूर्तींनी तुरुंगाला भेट दिल्यानंतर लक्षात यावे? याहूनही कळस म्हणजे संबंधित जेलरला अंदमानला पाठविण्यात आले. ज्यांना अंदमानला पाठवायचे ते जेलरच्या कक्षात चहापान करणार आणि बिचारा जेलर काळ्यापाण्यावर? त्याला कशाला बळीचा बकरा बनविण्यात आले? कलमाडींना चहा देण्याचा, तुरुंगाच्या कोठड्यांना कुलपे न घालण्याचा निर्णय घेण्याइतका अधिकार त्याच्याकडे खरेच आहे? असे अधिकार फक्त देशाच्या सरकारला आणि गृहमंत्र्यांना असतात. त्यांना जाब विचारण्याची कुणाची हिम्मत नाही... इथे भारत कणाकणाने मरतो आहे.
x x x
उत्तर भारतात एकाच दिवशी दोन रेल्वे अपघात झाले. त्यांची सांगण्यात येणारी कारणे वेगवेगळी असली तरी खरे कारण फक्त एकच आहे - बेपर्वाई. स्वातंत्र्यानंतर झालेल्या पहिल्या रेल्वे अपघाताची जबाबदारी घेऊन तत्कालीन रेल्वेमंत्री लाल बहादूर शास्त्री यांनी राजीनामा दिल्याची घटना आता दंतकथा वाटावी अशी स्थिती निर्माण झाली आहे. रेल्वेच्या अपघातावाचून एकही महिना जात नाही. मनमोहनसिंगांच्या सरकारात ज्या मंत्र्यांकडे जी जबाबदारी दिली आहे, त्यानी ती सांभाळाचीच नाही असा अलिखित नियम आहे की काय अशी शंका येते. ममता बॅनर्जी यांच्याकडे मागील अडिच-तीन वर्षे रेल्वे खाते होते. त्यातील अधिकांश काळ त्या कोकोत्यात तळ ठोकून होत्या. स्वतःला वेळ देता येत नसेल तर त्यांच्याच पक्षातील कुणा दुसर्‍या कडे हे खाते का दिले गेले नाही? कोणत्याही लालसा नसलेल्या या बाईंना लाल दिव्याची एवढी लालसा का होती? याचे उत्तर तर त्या ही देऊ शकणार नाहीत.
नुकत्याच झालेल्या या दोन अपघातांमध्ये नेमक्या किती जणांचा बळी गेला, हे 48 तासपर्यंत कळू शकले नव्हते. मदत आणि बचाव कार्याची ही अवस्था? हा यंत्रणेतील दोष की अनास्थेचा परिणाम? देशाचा रेल्वेमंत्री कोण, हे ही देशाला आता आठवत नाही. रेल्वेच्या यंत्रणेतील दोषांवर कशासाठी पांघरूण घातले जाते? दोषारोपांच्या फैरी एकमेकांवर टोलविण्याचा प्रयत्न कशासाठी होतो आहे? दोन - पाच लाखांच्या मदतीनंतर संबंधित कुटुंबांची आयुष्यभराची झालेली हानी भरून येणार आहे का? इथे माणसाचा जीव सर्वात स्वस्त झाला आहे... इथे भारत कणाकणाने मरतो आहे.
x x x 
मुंबईत पुन्हा एकदा बॉम्बस्फोट झाले. मृतांची संख्या मोजायचे तर मी आता बंदच केले आहे. मध्यंतरी एक व्यंगचित्र पाहण्यात आले होते. विज्ञानात तीन स्थिती शिकविण्यात येतात. इंग्रजीत त्याला ‘स्टेट’ म्हणतात. ‘सॉलिड’स्टेट, ‘लिक्विड’स्टेट आणि ‘गॅस’स्टेट. या व्यंगचित्रात या तीनही स्थिती लिहून त्यावर त्याच्या आकृती म्हणून त्या स्थिती दर्शविणारी चित्रे काढली होती. त्यात फक्त आणखी एका स्थितीची वाढ त्यांनी केली होती. ती होती ‘सॉफ्ट’स्टेट. आणि त्यावर चित्र म्हणून भारताचा नकाशा काढला होता. कोणीही यावे आणि हल्ले चढवून जावे, अशी भारताची ही स्थिती बनली आहे. ‘सॉफ्ट’ स्टेट. 
आणि दुर्दैवाची बाब म्हणजे दर वेळी अशा हल्ल्यांनंतर मुंबईकरांचे कौतिक करण्याची चढाओढ लागते. ‘मुंबईकर पुन्हा कामावर’, ‘मुंबईचे जनजीवन अल्पावधीतच पूर्ववत’, ‘मुंबईचा हल्लेखोरांना जबरदस्त जबाब’ वगैरे... पण खरोखरच ही स्थिती आहे का? मुंबईकर खरेच या बॉम्बहल्ल्यांना जबाब देत लगेचच आपले जीवन पूर्ववत करतात? त्यांना तर आपापल्या रोजीरोटीचे पडलेले असते. बाहेर पडले नाहीत तर त्यांचे मरण नक्की असते. कारण या स्पर्धेच्या वातावरणात ते बाहेर पडले नाहीत, तर त्यांची रोटी हिरावून घेण्यासाठी कोणीतरी टपून बसलेला असतो. बाहेर पडले तर मरणाची शक्यता तान वर्षांतून एकदा असते. घरातच बसला तर दुसर्‍याच दिवशी मरण नक्की ठरते... मुंबईकरांच्या जिद्दीला सलाम ठोकण्याच्या गप्पा करण्याआधी ही वस्तुस्थिती कोणी समजून घेईल?... इथे भारत कणाकणाने मरतो आहे.
x x x 
या स्फोटांनंतर सगळ्यात वाईट वाटले, ते भावी पंतप्रधान राहूल गांधी यांच्या वक्तव्याचे. त्यांच्या आजी आणि त्यांचे वडील अशाच भ्याड हल्ल्यांचे बळी ठरले. एखाद्या व्यक्तीच्या नात्यातील दोन व्यक्ती एकाच पद्धतीच्या हल्ल्यात मारल्या जाण्याचे कदाचित राहूल गांधी किंवा त्यांचा परिवार हे एकमेव उदाहरण असावे. कोर्टाच्या भाषेत ही ‘रेअरेस्ट रेअर’ अशी केस. अशी व्यक्ती ‘एक टक्का दहशतवादी हल्ले होतच राहणार’ असे या हल्ल्यांचे समर्थन करते? कोण काहीही म्हणो, राहूल गांधी हे या देशाचे भावी पंतप्रधान आहेत. कदाचित, पुढील निवडणुकीत कॉंग्रेस पक्षच बहुमताने सत्तेवर आला तर त्याच वेळी किंवा हरला तर पुढील निवडणुकीनंतर ते नक्कीच पंतप्रधान होणार आहेत. अशी व्यक्ती जेव्हा काही बोलते, तेव्हा या देशाच्या भविष्याची ती नांदी ठरत असते. ‘एक टक्क्या’ची थइरी अमेरिकेत का नाही दिसली? ब्रिटनमध्ये का नाही दिसली? ब्रिटनमध्ये अतिरेकी समजून निरपराध मुस्लिम व्यक्तीला ठार केल्यानंतर तिथे मानवतावाद्यांचे मोर्चे निघाले नाहीत की पाकिस्तानात घुसून ओसामाला आणि इराकमध्ये घुसून सद्दाम हुसेन यांना मारल्यानंतर अमेरिकेत मानवतावाद्यांनी आवाज केला नाही. अशा भंपकपणाला तेथे थारा नाही. भारतात मात्र हे बाजारबुणगे अशा वेळी पुढे सरसावतात. अशा मंडळींच्या मालमत्तेची कधी चौकशी होत नाही की त्यांच्या उत्पन्नाचे ज्ञान स्त्रोत आणि त्यांची प्रत्यक्षातील संपत्ती यांची मोजदाद होत नाही. त्याची मागणीही कोणी करीत नाही.
‘दहशतवाद असा चिरडावा लागतो’ असे सांगणारी अफजलखानाचे पोट फाडण्याची शिवरायांच्या कृतीची चित्रे दाखविण्यावर आक्षेप घेणार्‍यांनी आता याच मथळ्याखाली अमेरिकेने छिन्नविच्छिन्न केलेल्या ओसामा बिन लादेनचे चेहरे असलेली पोस्टर लावण्याची परवानगी द्यायला काय हरकत आहे? 
x x x 
स्फोटानंतर देशाचे गृहमंत्री लगबगीने मुंबईत आले आणि हा स्फोट कशामुळे झाला असावा, हे त्यांनी सांगितले. हे सांगण्यासाठी ते मुंबईत आले? हे काम तर संबंधित खात्याच्या दुय्यम अधिकार्‍याचे आहे. त्यासाठ गृहमंत्र्यांनी कशासाठी वेळ द्यावा? राज्यात तुमचे सरकार, केंद्रात तुमचे सरकार. तुमच्या घरात घुसून अतिरेकी मुडदे पाडतात आणि हे मुडदे पाडण्यासाठी त्यांनी काय तंत्रज्ञान वापरले, याचे विश्लेषण गृहमंत्री करतात! ‘सामना’कारांच्या भाषेबद्दल अनेक वेळा मनात उलटसुलट प्रतिक्रिया येत असतात, पण या गृहमंत्र्यांसाठी ते नेहेमी वापरत असलेले ‘लुंगीपुचाट’ हे विशेषण वापरण्याचा मोह मलाही येथे आवरत नाही.
या देशाची स्थिती मोठी विचित्र झाली आहे. ज्यांनी विश्रांती घेत निवृत्त जीवन जगावे, ते पंतप्रधान आहेत. ज्यांना स्वतःच्या ‘इगो’पलिकडे काहीही जपायचे नाही, ते देशाला जपणारे गृहखाते सांभाळत आहेत, ‘मिडविकेट’वर क्षेत्ररक्षक उभा करायचा म्हणजे नेमका कुठे हे ज्यांना कळत नाही, ते क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होत आहेत, एरव्ही प्रत्येक निर्णयावर लक्ष ठेवणार्‍या कॉंग्रेस अध्यक्षा घोटाळ्यांवर घोटाळे उघडकीस येताना तोंड उघडत नाहीत, ज्यांना तातडीने फासावर लटकवायला हवे, ते कसाब, अफजलगुरू याच्यासारखे नराधम तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट घेत सुरक्षितपणे जगत आहेत आणि ज्यांच्या सुरक्षित जीवनाचा मूलभूत हक्क घटनेने मंजूर केला आहे ते या देशाचे नागरिक किड्यामुंग्यांप्रमाणे मरत आहेत... इथे भारत कणाकणाने मरतो आहे.
x x x 
कणाकणाने मरणार्‍या भारतात सुखाने जगत आहेत ते फक्त राजकीय नेते. हे सुख पक्षनिरपेक्ष आहे. ज्या जीवनशैलीत ‘लोकसेवकां’ना ‘सेवकां’चा दर्जा द्यायचा, त्यांना सर्वोच्च मानाचा दर्जा दिल्यामुळे झालेला हा घोटाळा आहे. महात्मा गांधी ते राहूल गांधी या मालिकेत सर्वच नेते ‘लार्जर दॅन लाईफ’ बनले. ही दोन नावे आली म्हणून हा विषय फक्त कॉंग्रेसपुरता आहे असे मानायचे कारण नाही. सिग्नल तोडल्यानंतर अडवणार्‍या पोलिसाला आपल्या वार्डाच्या नगरसेवकाचा फोन लावून देण्यापासून या घोटाळ्याची सुरवात होते. शिक्षणसंस्थेचे उद्घाटन चारित्र्यहीन नेता करतो, मंत्र्यांच्या लाल दिव्याच्या गाड्या जाण्यासाठी अँब्युलन्सपासून सारी वाहने रोखली जातात, मंत्र्यांच्या सांगण्यावरून विमानाचे उड्डाणही लांबविले जाते... ही यादी पार मोठी होऊ शकते. 15 ऑगस्ट 1947 पासून भारत असा कणाकणाने मरतो आहे. पण तो सामान्य भारतीयांप्रमाणेच मोठा चिवट आहे. तो पूर्णतः निष्प्राण होत नाही. कधीतरी हातापायांत बळ येईल, असा त्याला विश्वास वाटत असतो.

दत्ता जोशी
मो. 9225309010