`दैनिक लोकमत` च्या `हेलो औरंगाबाद` मध्ये दर शुक्रवारी प्रकाशित होत असलेल्या 'संस्कृती, साहित्य वगैरे' या स्तंभात 19-8-2011 रोजी प्रकाशित झालेला हा लेख.
...................................................................................
‘मराठी साहित्य’ या वार्षिक जेमतेम 100 कोटींची उलाढाल असलेल्या चतकोर क्षेत्रात होणार्या गावगप्पा मात्र हजारो कोटींच्या असतात. या समग्र क्षेत्राच्या उलाढालीपेक्षा वाळूजच्या एखाद्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीची उलाढाल जास्त असावी! अशा या क्षेत्रात दरवर्षी ‘अखिल भारतीय’ मराठी साहित्य संमेलन भरविण्याची प्रथा आहे. या वर्षी बडोद्याने झिडकारल्याने संमेलन कुठे भरवायचे यावर ‘वेळात वेळ काढून’ खल चालू आहे. कारण नेमके याच वेळी सिंगापूरचे संमेलन आले! यजमानांच्या खर्चाने फुकटची परदेशवारी महत्वाची की अ.भा. म. सा. सं. महत्वाचे? एवढा व्यवहार कळण्याचे व्यवहारज्ञान या समूहाला निश्चितच आहे.
तर अशा या संमेलनाबाबत मागील आठवड्यापासून बराच धुराळा उडाला आहे. त्याला कारण घडले उंडणगाव हे सात हजार लोकवस्तीचे छोटेसे गाव. ‘‘या गावात 500 व्यक्तींची नीटनेटकी निवासव्यवस्था, 100 स्नानगृहे, 100 शौचालये, पिण्याच्या पाण्याची सर्व ठिकाणी व्यवस्था, मुतार्या, किमान 100 स्त्रियांसाठी वरील सर्व स्वतंत्र व्यवस्था’’ होऊ शकत नसल्यामुळे उंडणगावचे निमंत्रण हे ‘वार्यावरच्या गप्पा’ आहे अशी भूमिका ‘मराठवाडा साहित्य परिषद’ या अ-साहित्यिक कारणांसाठीच प्रसिद्ध असलेल्या संस्थेचे प्रमुख पदाधिकारी असलेल्या एका ‘निम्म्या साहित्यिकाने’ घेतली आहे. (निम्म्या म्हणण्याचे कारण म्हणजे एका जबाबदार साहित्यसंस्थेचे अध्यक्षद गेली अनेक वर्षे ज्या गृहस्थांनी निरंकुशपणे ‘भूषविलेले’ आहे त्यांनी लिहिलेले हे एकमेव पुस्तक आहे. वास्तविक, ज्या विषयावर त्यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे ते पुस्तक महाराष्ट्र साहित्य परिषदेचा एखादा कारकूनही लिहून काढू शकला असता. पण, कारकुनांपैकी कोणी हे काम केले नाही आणि या महोदयांनी ते केले म्हणून त्याचे निम्मे श्रेय यांना देण्यास हरकत नाही! तेवढेच ज्ञानप्रकाशात...!)
मुदलात एक प्रश्न इथे पडतो, तो हा की सदरहु पदाधिकार्यांनी हे पत्रक फक्त स्वतःच्या एकट्याच्या सहीनिशी प्रसिद्धीस का दिले? वास्तविक ‘मसाप’ ही लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या पदाधिकार्यांची संस्था असल्याचे सांगितले जाते. मग याच पत्रकावर असलेल्या इतर चार पदाधिकार्यांच्या स्वाक्षर्या यावर का नाहीत? गेलाबाजार अतकरे-गोरे यांच्या तरी स्वाक्षर्या यावर हव्या होत्या. त्यांचे वेगळे मत असेल, तर मग एकटयानेच केलेल्या या आवाहनास, ‘मराठवाडा साहित्य परिषदेस माध्यमांनी सहकार्य करावे’ असे आवाहन हे सद्गृहस्थ करू शकतात का? त्यांच्या या वर्तनाला कोणी ‘हुकुमशाही’ संबोधले तर मग काय चुकले? अतकरे-गोरे हे सुद्धा याच लोकशाही पद्धतीने निवडून आले आहेत. त्यांना वगळण्याचे धाडस हे गृहस्थ कसे करू शकतात?
या विषयात पुढे जाण्याआधी ‘बडोद्याने का नाकारले’ यावर विचार व्हावा का? साहित्यिक जमातीच्या संभाव्य त्रासामुळे ते घाबरले असावेत का? वर उल्लेख केल्यानुसार तेवढी स्वच्छतागृहे बांधणे त्यांना कदाचित शक्य नसावे! दुसरी एक चर्चा कानावर आली, ती अशी की दिवसभराचा शिणभार हलका करण्यासाठी रात्रीच्या चौथ्या अंकाची अट साहित्यिकांकडून अलिखित स्वरुपात घातली जाते. (सन्माननीय अपवादांनी स्वतःस यातून दूर करावे) ती पाळली गेली नाही तर आयोजक बदनाम होतात. हे तर या मागचे कारण नसावे? काहीही असले, तरी बडोदेकरांनी साहित्यिकांची योग्यता ओळखून त्यांना चार हात दूर ठेवणे योग्य समजले असावे. अर्थात, द्यायची कारणे वेगळी असू शकतात.
या स्थितीत पर्यायी संमेलनासाठी उंडणगावकरांनी आघाडी उघडली आणि त्यात पुन्हा श्रीकांत जोशी हे नाव पाहताच बहुदा ‘मसाप’ या संस्थेच्या उपरोल्लिखित पदाधिकार्यांचा पारा चढला असावा. कारण उंडणगावच्या मराठवाडा साहित्य संमेलनातही त्यांच्या या पार्याचा अनुभव ग्रामस्थांनी घेतला होता! हा विरोध ‘जोशी’ म्हणून की ‘राजकारणी’ म्हणून? ‘जोशी’ म्हणून असेल तर हा जातीयवाद योग्य नव्हे आणि राजकारणी म्हणून असेल तर जे. के. जाधव, विक्रम काळे, सतिश चव्हाण ही नावे त्यांना कशी चालतात? राजकारण्यांनी साहित्यक्षेत्रापासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे आणि साहित्यिकांनीही तसेच वागले पाहिजे. पण साहित्यापेक्षा ‘इतर’ गोष्टींकडेच साहित्यिकांचे लक्ष असल्याने त्याच्या पूर्ततेसाठी लाखोंची गरज पडते. ही गुंतवणूक राजकारणी लोक करू शकतात. कारण त्यांना ती स्वतःच्या खिशातून करायची नसते! उंडणगावच्या निमंत्रणाबाबत हेच घडते आहे. यात श्रीकांत जोशी यांनी उडी घेण्याचे कारणच काय? मराठवाडा साहित्य संमेलन त्यांनी यशस्वी करून दाखविले हे निःसंशय. पण तेव्हा पदवीधर मतदारसंघातील निवडणूक तोंडावर होती. आताही ते सक्रीय होत आहेत आणि ‘पदवीधर’ची निवडणूक जवळ आली आहे. हे निव्वळ योगायोग कसे असतील? अशा प्रवृत्तींना आयोजकांनीही पारखूनच जवळ केले पाहिजे. या राजकीय मंडळींनीही अशा संमेलनांतून प्रसिद्धी मिळविण्यापेक्षा आपापल्या मतदारांचे हित साधण्यासाठी थेट उपक्रम हाती घ्यावेत. शिक्षक, पदवीधर यांचे असंख्य प्रश्न आहेत. त्यांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करावेत. मतदारांनी त्यांच्यावर टाकलेल्या जबाबदारीला त्यातूनच न्याय मिळू शकेल आणि पुढील निवडणुकीत त्याचा फायदा होईल. ही साहित्यिक मंडळी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत फारशी उपयोगाची नसते!
असो. मूळ मुद्दा आहे उंडणगावच्या निमंत्रणाचा. ‘गाठीशी असलेले अनुभव आणि मला असलेले वास्तवाचे भान’ यांच्या आधारावर उंडणगावच्या प्रस्तावाला प्राणपणाने विरोध करणार्या या गृहस्थांचे लॉजिक मात्र कच्चे असावे असे वाटते. उंडणगावची शाखा अस्तित्वात नाही, असे ते सांगतात. हे तांत्रिक कारण झाले. पण ‘मसाप’तरी अस्तित्वात आहे काय? ‘अस्तित्वा’ची यांची व्याख्या काय? कमल देसाई यांच्यासारख्या विदुषीच्या मृत्यूनंतर श्रद्धांजली सभा घेतली तेव्हा या परिषदेत चार जण सुद्धा उपस्थित नव्हते, असे ऐकीवात आहे. त्यामुळे सभागृहाऐवजी पदाधिकार्यांच्या दालनातच ही ‘श्रद्धांजली सभा’ घेण्यात आली. मसापच्या उपक्रमांना ‘लाभणारी’ गर्दी हा संशोधनाचा विषय आहे. हेच तुमचे अस्तित्व?
साहित्याच्या प्रेमापोटी मोठ्या उत्साहाने पदराला खार लावून गावात चांगला उपक्रम घेण्यासाठी उंडणगावची मंडळी आसुसलेली आहे. या साहित्यप्रेमाला तरी मसापचे सदस्यत्व ‘रिन्यू’ करण्याची पूर्वअट असू नये! राज्य सरकार 25 लाखांची मदत देते. बाकी निधी कसा उभा करायचा हे ग्रामस्थ ठरवतील. उरतो प्रश्न स्वच्छतागृहांचा, तो प्रश्न सन्माननीय पद्धतीने मार्गी लावण्याचे वचन उंडणगावकर आपणास देतील. कारण, साहित्यिकांचा कोठा साफ झाला नाही तर दिवसभर संमेलन रंगणार नाही, याची त्यांना जाणीव आहे!