`दैनिक लोकमत` च्या `हेलो औरंगाबाद` मध्ये दर शुक्रवारी प्रकाशित होत असलेल्या 'संस्कृती, साहित्य वगैरे' या स्तंभात 2-9-2011 रोजी प्रकाशित झालेला हा लेख.
...................................................................................
एका सिंगापूर डॉलरची किंमत साधारण 25 भारतीय रुपये आहे. अर्थात अमेरिकी डॉलरच्या साधारण निम्मी! अशा अर्थाने अमेरिकेच्या निम्म्या वारीचे पुण्य पदरी बांधून मराठी सारस्वतातील काही-शे फुकट फौजदार मागील आठवड्यात केव्हातरी आपापल्या घरी परतले. त्यांच्या घरच्या मंडळींना वगळता इतर कोणालाही त्याची गंधवार्ता नव्हती. स्वारीवर जाताना ‘कुंकुमतीलक’ आणि (झेंडे गाडून) येताना ‘हारतुरे - औक्षण’ ही खरी भारतीय संस्कृती. पण तमाम मराठी साहित्यरसिकांना याचा बहुदा विसर पडला आणि सिंगापुरी ‘झेंडे गाडून’ परतलेल्या साहित्यमार्तंडांना पुसण्यास (दोन्ही अर्थांनी) कोणीही गेले नाही. (आजकाल लोकांना साहित्याची काही तळमळच राहिली नाही, हे खरे!)
सध्या असेच चालू आहे. साहित्यिकांकडे कुणाचे फारसे लक्षच राहिले नाही हो ऽऽऽ! सिंगापुरी भरलेल्या साहित्यमेळ्यात जागतिक दर्जाच्या तब्बल साडेचारशे रसिकांची उपस्थिती होती म्हणे. या विराट उपस्थितीत भरलेल्या ‘विश्र्व’ मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. महेश एलकुंचवार यांनी समारोपप्रसंगी ‘काही रंजक आणि काही वैचारिक ऐवज घेऊन मी परत जातोय’ असे उद्गार काढल्याचे कळले. यावरून हे साहित्य संमेलन ‘काहीसे रंजक’ झाले असावे अशी दाट शक्यता माझ्या मनात येत आहे. एरव्ही रटाळ होणारे संमेलन रंजक होण्यामागे कोणत्या शक्तीचा हात आहे, हे तपासून पाहायला हवे. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाचा मा. कौतिकराव ठालेपाटील यांचा संपन्न वारसा समर्थपणे चालविणार्या विद्यमान अध्यक्षा मा. उषा तांबे यांनी ‘रसिकाश्रय आहे तोपर्यंत विश्र्व साहित्य संमेलन घेण्यात येईल’ असे जाहिर केले म्हणे. साहित्याच्या प्रांगणात हे विधानही सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखे आहे. (पण ‘रसिकाश्रय’चा अर्थ काय असावा बरे?) तिसर्याच संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी मूळ आयोजकांनी झटकल्यानंतर ऐनवेळी सिंगापूरकरांच्या गळी पडून आयोजित करून घेतले गेलेले हे संमेलन तशा अर्थाने निव्वळ उपचारच ठरले की काय अशी शंका मनात येत असतानाच हे विधान कानावर आल्यामुळे पुढील संमेलनासाठी बहुदा अद्याप कोणी ‘स्पॉन्सरर’ मिळाला नसावा, अशी शक्यता मनात येते आहे. ‘अ.भा.’ साहित्य संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी झटकण्यासाठी संभाव्य आयोजकांना साठ वर्षे लागली, ‘विश्र्व’ संमेलनाची झटकाझटकी तीनच वर्षात सुरू झाली हे चित्र मोठे प्रासादिक दिसते आहे.
सर्व अर्थांनी विश्र्व साहित्य संमेलन अदखलपात्र ठरताना दिसते आहे. आयोजकांच्या खर्चाने (मलेशियाच्या साईट सिईंगचा खर्च चक्क ज्याचा त्याचा स्वतःचा! आठवते, की पहिल्या संमेलनाच्या वेळी सर्व आदरणीय साहित्यिकांचा लाखोंचा सर्व खर्च करूनही - ‘त्यांनी व्हिसाचे साडेपाच हजार घेतले हो’ - असा दरिद्री गळा अनेकांनी काढला होता!) साहित्य संमेलनाची ऐश पदरात पाडून घेऊन परतल्यानंतर एकाही साहित्यिकाला तेथे काय घडले हे सांगण्याची गरज वाटली नाही, यातच सारे आले. थोडक्यात, मराठी साहित्याच्या कर्मदारिदऱ्याला आता वैश्विक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, इतकेच! मात्र, पुढच्या वर्षी कोण, हा प्रश्न आता गंभीर बनला आहे. बहुदा स्वतःच्या खर्चाने साहित्यिकांची इच्छा पूर्ण करण्याचा परदेशी मर्हाटमोळ्या मंडळींना कंटाळा आला असावा. ‘दुरून साहित्यिक साजरे’चे प्रत्यंतर त्यांना आल्यामुळेच ही टोलवाटोलवी सुरू झाली असावी, असे दिसते आहे. एक गोष्ट मात्र ठळकपणे जाणवते, की तेथून परतलेल्या एकाही साहित्यिकाने तक्रारीचा सूर लावलेला नाही, याचा अर्थ स्वच्छतागृहांची व्यवस्था सिंगापूरकरांनी चोख ठेवलेली असावी!
संमेलन 13 आणि 14 ऑगस्टला झाले. त्यानंतर दोन तीन दिवसांच्या हवापालटीच्या सहलीनंतर सारस्वतांचे आगमन मुंबईच्या विमानतळावर झाले. (आगमनाचे फोटो मात्र कुठे दिसले नाहीत. पण ते विमानानेच आले असावेत असा माझा ठाम समज आहे. कारण तिकिटे सिंगापूरकरांनी काढलेली होती) आज 2 सप्टेंबर आहे. आजपर्यंत टीव्ही, रेडिओ, पेपर, वेबसाईट, चर्चासत्रे, कार्यक्रम, उपक्रम अशा कुठल्याही माध्यमातून हे संमेलन कसे झाले याची फारशी चर्चा झाली नाही. याचा अर्थ माध्यमांनी, रसिकांनी आणि अखेर साहित्यिकांनीही हे संमेलन ‘अदखलपात्र’ ठरविले की काय अशी शंका माझ्या मनात बर्याच दिवसांपासून येते आहे. (एरव्हीही संमेलनाच्या चर्चेपेक्षा त्या निमित्ताने इतरच चर्चा अधिक होतात, ही बाब अलहिदा. )
ता. क. ः आता अ. भा. मराठी साहित्य संमेलनाची चर्चा सुरू झाली आहे. उंडणगावचा पत्ता काटण्यात संबंधितांना आधीच यश आले आहे. आता चंद्रपूर किंवा सासवड परिसरात संमेलन घेण्याचे ठरत आहे. स्थाननिश्चितीच्या आधी मराठवाडा साहित्य परिषदेतील वरिष्ठाची एकसदस्यीय समिती गठित करून संबंधित ठिकाणचा दौरा (संभाव्य आयोजकांच्या खर्चाने) आखण्यात यावा आणि तेथे पुरेशी स्वच्छतागृहे - पुरुषांसाठी आणि महिलांसाठी - आहेत की नाही, याची खातरजमा या समितीतर्फे करून त्या नंतरच साहित्य महामंडळाने यजमानपद देण्याचा निर्णय घ्यावा, ही नम्र विनंती.
- दत्ता जोशी