Friday, May 12, 2017

भीष्मराज बाम ः थाेर मार्गदर्शक


पोलिस खात्यातील किंवा ‘आयबी’मधील अधिकारी म्हणजे उग्र चेहर्‍याचा, अक्कडबाज मिशा वगैरे असलेला कुणी उंचापुरा तगडा इसम असेल, असा समज होऊ शकतो. पण क्रीडा समूपदेशनात आज राष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या भीष्मराज बाम यांच्या इतिहासात डोकावताना ते ‘आयबी’चे वरिष्ठ अधिकारी राहिलेले आहेत आणि अनेक महत्त्वपूर्ण प्रसंगांचे ते साक्षीदार आहेत ही माहिती हाती आली की गोंधळल्यासारखे होते. घरातील समजुतदार आजोबांसारखे प्रसन्न आणि मिश्किल व्यक्तिमत्त्वाच्या भीष्मराज बाम यांच्याशी रंगणार्‍या गप्पा म्हणजे माहितीचा खजिना. निवृत्तीनंतरच्या आयुष्यात पूर्वायुष्यापेक्षा अधिक मग्न, कार्यरत आणि ऊर्जावान राहता येते हे दाखवून देणारी त्यांची दिनचर्या सर्वासाठी प्रेरक ठरावी. ‘योगशास्त्र हे मानसशास्त्र आहे,’ अशी मांडणी करून मनाची शक्ती वाढविण्यासाठी ते करीत असलेले मार्गदर्शन सचिन तेंंडुलकर, राहूल द्रवीडपासून अंजली भागवतपर्यंत अनेकांसाठी मोलाचे ठरले. भीष्मराज बाम यांच्या योगमग्न कार्याबद्दल...

‘‘कोणताही खेळ खेळताना एकाग्रता महत्त्वाची असते. तुमच्यावर येणारा दबाव योग्य पद्धतीने हाताळता आला की तुम्ही यशस्वी होऊ शकता. ही एक साधी ‘ट्रिक’ असते. ती मला साधली होती. सरावादरम्यान मी सरासरी कामगिरी करीत असे पण प्रत्यक्ष सामन्यात मात्र मी विजयी ठरत असे. स्नूकर, बिलियर्डस्, शूटिंग या क्षेत्रातील माझ्या या कौशल्यामुळे प्रारंभी त्याच खेळाशी संबंधित खेळाडू माझ्याकडे येत. मी त्यांना मार्गदर्शन करीत असे. त्यातील अनेक जण पुढे जागतिक विजेते ठरले. मोठ्या स्पर्धा जिंकू लागले. मग क्रिकेटपटूंचा समावेश झाला. आधी मुंबईचा जतीन परांजपे माझ्याकडे आला. त्याची कामगिरी सुधारली. मग सचिन तेंडुलकर, राहूल द्रवीड हे सुद्धा माझ्याकडे येत गेले. प्रवीण आमरे, सुलक्षण कुलकर्णी असे खेळाडू जणू माझे भक्तच झाले...’’ नाशिकच्या महर्षिनगर भागात असलेल्या प्रशस्त बंगलीच्या एका छोटेखानी कक्षात बैठक मांडलेले एकेकाळचे ‘आयबी’चे ज्येष्ठ अधिकारी आणि आताचे ‘ख्यातनाम क्रीडा समूपदेशक’ भीष्मराज बाम आपल्या छानशा शैलीत विवेचन करीत असतात. मधूनच काही मिश्किल उदाहरणे सांगत, कधी तात्विक विवेचन करीत, योगशास्त्राचा आधार देत त्यांच्या गप्पा सुरू असतात...!

भीष्मराज बाम या नावाभोवती आज आगळे वलय आहे. भारतीय क्रीडाक्षेत्रातील बहुसंख्य ख्यातनाम क्रीडापटू कधी ना कधी तरी बाम सरांकडे आलेले आहेत. त्यांचे समूपदेशन घेतलेले आहे आणि त्यानंतर त्यांच्या कामगिरीत मोठा बदल झालेला जगाने पाहिलेला आहे. मानसशास्त्राशी संबंधित असलेल्या समूपदेशनाच्या विषयात काम करताना मानसशास्त्र हेच योगशास्त्र आहे आणि योगशास्त्र हे मानसशास्त्रच आहे, हा निष्कर्ष ते ठळकपणाने प्रारंभीच मांडतात. त्याच मुद्द्यावरून चर्चेची गाडी पुढे सरकू लागते...!

खरे तर आज त्यांच्याकडे सगळ्याच क्षेत्रातील लोक येताहेत. क्रीडा, कला, समाजकारण आणि अगदी राजकारण सुद्धा...! प्रत्येकालाच समूपदेशनाची गरज असते. काही जण जाहीरपणे मान्य करतात तर काही जण मान्य करीत नाहीत इतकेच! बाम यांचा दरवाजा मात्र सर्वांसाठी खुला असतो. मात्र त्या साठी आधी वेळ ठरवणे आवश्यक असते.

भीष्मराज बाम सांगतात, ‘‘योगशास्त्र म्हणजे अध्यात्म हा काही जणांचा चुकीचा समज आहे. योग आणि अध्यात्माचा कसलाही संबंध नाही. असलाच, तर अध्यात्मात योगशास्त्राचा उपयोग केल्यास त्या व्यक्तीस त्याचा लाभ होतो. योगशास्त्र हे मनाचे शास्त्र आहे. मन म्हणजे काय? त्याची शक्ती कशी वाढवायची? मनाचे व्यवहार कसे करायचे? या सर्वांचे विवेचन योगशास्त्रात उत्तम प्रकारे केलेले आहे. स्वतःचा उत्साह टिकविणे, नैराश्येतून स्वतःला बाहेर काढणे, स्वतःची गुणवत्ता वाढविणे या साठी हे शास्त्र पूरक भूमिका बजावते.’’

पण हे फक्त इतक्यापुरतेच मर्यादित नसते. कर्करोग, मधुमेह, हृदयरोग यासारख्या रुग्णांनाही योगशास्त्राचा चांगला उपयोग होतो, असे निदर्शनास आलेले आहे. हे आयुष्याला सर्वांगाने स्पर्श करणारे शास्त्र आहे. सन 2006 मध्ये भीष्मराज बाम यांचे या विषयावरील पहिले पुस्तक आले. त्याला त्या आधीच्या दहापेक्षा अधिक वर्षांच्या तपश्चर्येचे बळ होते. त्यानंतर या सार्‍या कामाला अधिक वेग आला. तो इतका, की ते आता नोकरीत असतानापेक्षा जास्त ‘बिझी’ आहेत...!

असे हे भीष्मराज बाम आहेत तरी कोण? नाशिकशी त्यांचा काय संबंध? त्यांच्याशी गप्पा मारताना त्याचीही उत्तरे मिळतात.
0000

हा परिवार मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातला. कोळथरे हे त्यांचे गाव. मूळ आडनाव कोल्हटकर. रघुजीराजे भोसले यांचे सेनापती भास्करराव कोल्हटकर... या भास्कररावांनी बंगालवर चढाई करून तेथील नबाबाला नमविलेले होते. त्यांच्या शौर्यावर रवींद्रनाथ टागोरांनी मोठे काव्य केलेले. मुगल फौजा या कोल्हटकरांना घाबरत. भास्कररावांना त्या काळी भास्कर पंडत म्हटले जायचे. रवींद्रनाथांच्या या काव्यात भास्कर पंडतांचा उल्लेख मानाने करण्यात आलेला आहे.

अशा या परिवारात केव्हातरी ‘ब्रह्म’ ही पदवी मिळाली. त्याचा अपभ्रंश होत तो ‘बाम’ असा झाला. अशा या परिवारातील पुरुषोत्तम नारायण बाम (म्हणजे भीष्मराज यांचे वडील) उदरनिर्वाहाच्या शोधात हैदराबादेत गेले. त्या काळात हैदराबादेत निजामाचे राज्य असे. त्या राज्यात पुरुषोत्तम बाम वकिली करीत. ते केवळ नाणावलेले वकीलच नव्हते तर तेव्हाच्या हैदराबाद स्टॉक एक्सचेंजमध्ये ‘बाम अँड सन्स’ आणि ‘बाम अँड खान’ या त्यांच्या स्टॉक आणि शेअर ब्रोकिंग फर्मही नोंदविलेल्या होत्या. त्यांची प्रॅक्टीस चांगली चालत असे. निजामाच्या निकटवर्तियांत त्यांची चांगली उठबैस असे. निजामाचे आर्थिक सल्लागार तारापोरवाला यांच्याशी तर त्यांचा खासा घरोबा. भीष्मराज बाम यांच्यावर त्यांचा भारी लोभ. पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर पुढे परदेशी शिकायला पाठवायचा शब्दही त्यांनी दिलेला होता.

पुरुषोत्तम बाम हे नाणावलेले वकील आणि सत्याची चाड असलेले जागृत नागरिकही. त्या काळच्या निजामशाही मिलमध्ये काही भ्रष्टाचार होत आहे, याची माहिती मिळाल्यानंतर ते 100 रुपयाचा समभाग घेऊन या मिलचे शेअरहोल्डर झाले आणि त्यानंतर बॅलेन्सशीटचा अभ्यास करून थेट तारापोरवालांपासून अनेक मान्यवरांना त्यांनी नोटिसाच पाठविल्या. निजामाच्या दरबारातील अनेक मान्यवर न्यायालयात आरोपीच्या बाकड्यावर बसलेले भीष्मराज यांनी पाहिले. ते वडिलांसमवेत न्यायालयात जात असत. या प्रसंगानंतर तारापोरवालांचा लोभ संपला आणि भीष्मराज यांना परदेशी शिक्षणाचा विचार बाजूला ठेवून आपल्या करिअरसाठी पर्यायी मार्ग शोधण्याची वेळ आली...!

एव्हाना हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी गणित विषयात ‘बीए’ची पदवी मिळविलेली होती. पुढचा मार्ग शोधण्यासाठी साधारण 1962 मध्ये ते पुण्यात आले. बंड गार्डन परिसरातील एका हायस्कूलमध्ये अर्धकालीन शिक्षकाची नोकरी पत्करून त्यांनी उदरनिर्वाहाची सोय करवून घेतली. पुण्यातच त्या काळात रँग्लर परांजपे, रँग्लर महाजनी, रँग्लर केतकर आदी ज्येष्ठांच्या पुढाकारातून ‘यूपीएससी’चे वर्ग सुरू झाले होते. पुढे प्रशासनात नामांकित ठरलेले दिनेश अफजलपूरकर, श्रीकांत बापट आदी अधिकारी त्याच काळात अभ्यास करीत होते. त्यात भीष्मराज सहभागी झाले. पण हा प्रवेश सहजगत्या मिळाला नाही. त्या आधी बरेच काही घडले. त्यात भीष्मराज यांच्या आईची, गोदावरीबाईंची भूमिका त्यांच्या अनुपस्थितीतही महत्त्वाची ठरली! पुणे विद्यापीठाच्या विद्वतसभेवर सदस्य असलेल्या श्री. ढवळे यांच्या ओळखीतून हा प्रवेश झाला. ढवळे हे भीष्मराज यांच्या आजोळचे निकटवर्ती आणि दुसरीकडे ते ना. गोपाळकृष्ण गोखले यांचे जावई. त्यांच्या उच्चपदस्थ वर्तुळात सर्व रँग्लरचा सहभाग. हा वर्ग रँग्लर्सनीच सुरू केलेला...! त्यामुळे ‘गोदेचा मुलगा’ म्हणून ढवळे यांच्याशी झालेली ओळख वर्गात प्रवेश मिळवून देणारी ठरली. भीष्मराज यांच्या उत्तम इंग्रजीमुळे तेथे सगळेच जण प्रभावित होते. त्यांच्याकडे सर्व जण भावी ‘आयएएस’ म्हणूनच पाहात. पण जेमतेम दोन महिन्यांचा वर्ग पार पडला आणि त्यांना वडिलांच्या निधनाचे वृत्त कळले. ते तेथून थेट हैदराबादला परत गेले.

वडिलांचा बिझनेस होता, त्यात बाबूलाल सूरजभान हे निजामाचे ज्वेलर त्यांचे भागीदार होते. त्यांच्याशी भीष्मराज यांची चर्चा झाली. भीष्मराज यांचा स्वभाव बिझनेसला पूरक नाही, हे त्यांच्यातील अनुभवी बिझनेसमनने ओळखले आणि सरळ नोकरी करण्याचा सल्ला दिला. तो शिरोधार्ह मानून भीष्मराज बाम यांनी नोकरीसाठी प्रयत्न केला.
त्यांनी पोलिस खात्यात नोकरीसाठी अर्ज दिला. तेव्हा नानावटी नावाचे पोलिस महासंचालक होते. त्यांनी भीष्मराज यांची मुलाखत घेतली. तेव्हा चीन युद्धाचे सावट पसरलेले होते. त्या पार्श्वभूमीवर विस्ताराने चर्चा झाली, शारीरिक क्षमतेची चाचणी झाली आणि त्यांची पहिली नियुक्ती नाशिक येथे ‘डीवायएसपी’ म्हणून करण्यात आली. 1963 मध्ये ते पोलिस खात्यात रुजू झाले.

ते सांगतात, ‘‘मला पहिली 8-10 वर्षे बराच त्रास झाला. पोलिस खात्यात प्रामाणिकपणे काम करायचे, इथे मी नाव कमवायला आलो आहे- पैसा कमवायला नाही. मिळणार्‍या पगारातच जगायचे आणि कायद्याच्या पालनासाठी कठोरपणे काम करायचे, हे मी ठरविलेलेे होते. पण इतर काही अधिकारी तसे नव्हते. माझ्या विरोधात निनावी तक्रारी जाऊ लागल्या. चौकशा झाल्या. एखादा प्रामाणिक अधिकारी जसा त्रासतो, तसेच ते त्रासले, पोलिस खाते सोडण्याचा विचारही मनात आला. पण वरिष्ठ पातळीवर चांगले अधिकारीही होते. त्यांनी धीर दिला, त्यातून ‘पोलिसिंग काय असते ते दाखवून देण्या’साठी पोलिस खात्यात कायम राहण्याचे त्यांनी ठरविले आणि ते याच विभागात निर्धारपूर्वक कायम राहिले.

एकदा निर्धाराने उभे राहिले की काय होऊ शकते, याचा अनुभव त्यांना येऊ लागला. पहिल्या आठ-दहा वर्षांतील बदल्या आणि बढत्या होत असतानाच मुंबईत पोलिस उपायुक्त असलेल्या दीपक जोग यांनी त्यांना मुंबईत गुप्तचर खात्यात घेण्याची तयारी दाखविली, पण अंतर्गत चौकशीच्या कारणामुळे ते शक्य झाले नाही. पुढे इमॅन्युअर मोडक तेथे आल्यानंतर भीष्मराज यांना मुंबईत संधी मिळाली. 1976 ते 1978 या काळात मुंबईत डी.सी.पी. म्हणून काम केल्यानंतर पुढची 4-5 वर्षे, म्हणजे 1982 पर्यंत ते गुप्तचर खात्यात कार्यरत राहिले. 1982 मध्ये मुंबईत इंटलिजन्स ब्यूरोचे सहायक संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. तेव्हा श्रीकांत बापट त्यांचे वरिष्ठ होते. त्यानंतरची 15 वर्षे त्यांनी सलगपणे ‘आयबी’मध्ये सेवा दिली. दिल्लीत ‘आयबी’चे उपसंचालक म्हणून बढती, तेथून मुंबईत त्याच पदावर बदली पुढे भोपाळमध्ये इन्स्पेक्टर जनरल म्हणून नियुक्ती आणि अखेर मुंबईतून ‘आयबी’चे सहसंचालक असताना निवृत्ती असा हा त्यांचा प्रवास. निवृत्तीनंतर त्यांनी सन 1996 मध्ये नाशिक जवळ केले. तेव्हापासून ते नाशिकमध्येच वास्तव्यास आहेत.

खरे तर हा सारा त्यांच्या आयुष्याचा पूर्वार्ध म्हणावा लागेल. कारण ‘समूपदेशक’ म्हणून त्यांची भूमिका त्यानंतर सुरू झाली. उत्तरार्धाची चर्चा करण्याआधी पूर्वार्धातील काही आठवणींना उजाळा इथे नक्कीच दिला पाहिजे.
इंटलिजन्स ब्यूरो म्हणजे ‘आयबी’ हा भारत सरकारचा गुप्तचर विभाग. गुप्त माहिती संकलित करणे, शत्रूंच्या गुप्त कारवायांचा छडा लावणे ही त्यांची भूमिका. त्यालाच ‘काउंटर इंटलिजन्स’ असेही म्हणता येईल. ‘आयबी’च्या सूचनांनुसार सुरक्षिततेची आखणी केली जाते. आयबीचे कार्यक्षेत्र देशांतर्गत असते तर परदेशातील हेरगिरीसाठी ‘रॉ’ अर्थात ‘रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग’ कार्यरत असते. भीष्मराज बाम यांनी आपल्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे विषय हाताळले. त्यातील बहुसंख्य देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेशी संबंधित असल्यामुळे त्याची वाच्यता होणे योग्य होणार नाही. पण जे विषय उघड करता येऊ शकतील त्यामध्ये ‘मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलना’चा विषय महत्त्वाचा होता. ते सांगतात, ‘‘त्या काळात मी मराठवाडाभर फिरलो. नरहर कुरुंदकरांसारख्या विचारवंतांची भेट झाली. अनंतराव भालेराव, केशवराव धोंडगे यांच्यासारख्या समाजाची नाडी कळणार्‍या माणसांसोबत मैत्री झाली. त्या काळात मराठवाड्यात मराठा आणि दलित समाजात तेढ मोठ्या प्रमाणात वाढलेली होती. तत्कालीन सत्ताधार्‍यांनी तात्काळ नामांतराची घोषणा करण्याचा निर्णय घेतलेला होता. त्या ऐवजी सबूरीचा सल्ला देत भीष्मराज बाम यांनी मराठवाडाभर आधी सुरक्षेचे जाळे विणण्याचा सल्ला दिला. असे काही घडले तर अभूतपूर्व हिंसाचार उसळू शकतो, हे इतिहासात सिद्ध झालेलेच होते. त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी गावोगावी सशस्त्र बंदोबस्त लावण्यात आला आणि अखेर 1994 च्या 14 जानेवारीला, मकर संक्रांतीच्या दिवशी नामविस्ताराची घोषणा करण्यात आली. आधीपासून घेतलेल्या काळजीमुळे फारशा अप्रिय घटना घडल्या नाहीत. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्या वेळी बोलावून घेऊन माझे अभिनंदन केले.’’
अशाच काही अविस्मरणीय गोष्टी मध्यप्रदेशात ते सहसंचालक असताना घडल्या. तेव्हा मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी सुंदरलाल पटवा हे होते. मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशच्या सीमावर्ती भागात असलेल्या एका धार्मिक स्थानाच्या कारणावरून तेथे खूप तणाव पसरलेला होता आणि काही राजकीय नेत्यांचा त्यात हात होता. हे सारे व्यवस्थित जाणून घेण्यासाठी बाम यांनी पोलिस खात्यातील एका इन्स्पेक्टरची मदत घेतली. खूप बारकाईने माहिती मिळविली तेव्हा असे लक्षात आले की ज्या मुद्द्यावरून रणकंदन माजले आहे, तो प्रत्यक्षात मुद्दाच नाही. एका परिक्रमेवरून वाद सुरू होता आणि त्या परिक्रमेत कुठलाही अडथळा नव्हता. तो सारा तणाव निवळण्यास हा निष्कर्ष मोलाचा ठरला. पटवा यांनीही त्यांचे अभिनंदन केले.

मुंबई बॉम्पस्फोटाच्या संदर्भातही त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. त्यांनी केलेल्या गुप्त माहितीच्या संकलनामुळे या गुन्हेगारांना कठोर शिक्षा होण्यात मदत झाली. असाच आणखी एक महत्त्वाचा भाग ठरला तो एका पाकिस्तानी हेराला पकडण्याचा. पाकिस्तानातून आलेला हा मुसलमान धर्माचा माणूस अहमदाबादेत ब्राह्मण म्हणून राहात असे. त्याने तेथे बरेच धार्मिक समारोहही पार पाडले. एका मुलीशी त्याने लग्नही जमविले. पण कितीही बेमालूमपणे सोंग घेतले तरी कुठेतरी चुकते आणि संशय बळावतो. त्याच्याबद्दल संशय निर्माण झाला आणि त्याला भीष्मराज बाम यांच्या ताब्यात देण्यात आले.

अशा प्रसंगी घाई-गडबड करता येत नसते. योग्य पद्धतीने ही बाब हाताळावी लागते. तो इतका उत्तम प्रशिक्षित होता की तपासणीला दाद देईना. 3 दिवस 3 रात्री त्याची उलटतपासणी सुरू होती. अखेर तिसर्‍या रात्री त्याने पहिली चूक केली. त्यानंतर अर्ध्या पाऊण तासात दुसरी चूक केली आणि त्याचे पितळ उघडे पडले. तो पैसे घेऊन नेपाळ मार्गे भारतात आलेला होता आणि काही घातपाती कारवाया करण्यासाठी तयारीत होता. त्याचा ‘आयएसआय’ हँडलर त्याला मार्गदर्शन करीत असे. याच्याकडून माहिती घेऊन त्या हँडलरलाही पकडण्यात आले आणि एक मोठा कट उधळला गेला.

या सगळ्या गोष्टी ते संवेदनशील तपशील वगळून सांगतात, तरीही त्यांचे गांभीर्य कळू लागते. अनेक गोष्टींंंबाबत त्यांची मते स्फोटक आहेत. ही मुलाखत घेतानाच एका तुरुंगातून पळून जाणार्‍या गुन्हेगारांना चकमकीत ठार केल्याचे वृत्त आलेले होते. त्या कृतीचे ठाम समर्थन करताना त्यांनी भूतकाळातील काही दाखले दिले. मुंबईत जे.एफ.रिबेरो आयुक्त असताना ‘गुंडांकडे हिटलिस्ट असेल तर आमच्याकडेही तशीच हिटलिस्ट आहे’, हे त्यांचे विधान खळबळजनक ठरले होते. त्याच काळात एन्काउंटर घडली आणि गुंडांना पोलिसांची दहशत बसली. ही दहशत असलीच पाहिजे, असे ते सांगतात. त्यामुळेच भारतील लष्कराने पाकिस्तानात घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचेही ते भक्कमपणे समर्थन करतात.
000

पोलिस आणि गुप्तचर विभागात प्रदीर्घकाळ सेवा झाल्यानंतर या पूर्णतः वेगळ्या क्षेत्रात कसाक काय प्रवेश झाला? पोलिस आणि योगशास्त्र किंवा समूपदेशन ही वरकरणी तरी पूर्णतः वेगळी टोके दिसतात...! ते सांगतात, ‘‘मी 34 वर्षे सेवा केली. 1 ऑक्टोबर 1996 रोजी वयाच्या 58 व्या वर्षी निवृत्त झालो. मला सेवा सुरू ठेवण्याची ऑफर होती. पण मी ती नाकारली. माझ्या कारकीर्दीच्या सुरुवातीलाच तत्कालीन वरिष्ठ वाघ साहेबांनी मला सांगितले होते, ‘तुमच्यापेक्षा तुमचे काम महत्त्वाचे आहे.’ ते मी प्रामाणिकपणे केले. मला दिलेले काम कसे चांगले होईल याचाच विचार केला. वैयक्तिक बढत्या, बदल्या, आरोप, बदनामी यांची चिंता केली नाही. तुम्ही यशस्वी आहात की नाही, ही बाब गौण आहे. तुम्ही प्रामाणिक आहात की नाही, हे सगळ्यांना समजते. मी प्रामाणिक राहिलो. काम करीत राहिलो. फळाची अपेक्षा केली नाही. म्हणूनच या यंत्रणेत टिकून राहिलो. प्रामाणिकपणाची मस्ती जास्त असते. त्या मस्तीत जगलो...

‘‘ही वाटचाल सुरू असतानाच योगशास्त्राचा अभ्यास सुरू होता. निवृत्तीआधी आणि नंतरच्या प्रारंभीच्या काळात लेखन, व्याख्याने, समूपदेशनाचा प्रसंग आला. त्या दृष्टीने विचार करताना मी योगशास्त्राकडे पुन्हा एकदा वळलो आणि लक्षात आले की आपण मानसशास्त्र म्हणतो ते योगशास्त्रच आहेत. योगशास्त्र आणि मानसशास्त्र यात भेद नाही. मी मुळात खेळाडू होतो. पुण्यातील पर्वती धावत धावत सहज चढून उतरत असे. योगासने नियमींतपणे करीत असे. तो मूळ पिंड होता. समूपदेशनासाठी मानसशास्त्राचा अभ्यास सुरू केला. प्रारंभी पाश्चात्य विचारवंतांची पुस्तके अभ्यासली आणि त्यातील संदर्भ पाहून लक्षात आले की हे सारे मुळात योगशास्त्रात आहे. मग त्याचा विचार जाणीवपूर्वक सुरू केला...

‘‘मी बिलियर्डस्, स्नूकर, शूटिंगमध्ये सहभागी होत असे. अनेक मोठ्या खेळाडूंसोबत मी खेळलो. त्यातील अनेकांना पराभूतही केले. विशेष म्हणजे सरावादरम्यान माझी कामगिरी वाईट असायची आणि सामन्यात मात्र मी विलक्षण चांगली कामगिरी बजावत असे. त्या उलट अनेक खेळाडू सरावात उत्तम कामगिरी करीत आणि प्रत्यक्ष सामन्यात ते ढेपाळून जात. ते विचारण्यासाठी आल्यानंतर माझ्या लक्षात आले की या मागे मानसशास्त्र आहे. मग मी त्याचा अभ्यास सुरू केला...

‘‘पाश्चात्य विचारांत आजारावर उपचार असतात, भारतीय विचार मात्र मुळातच आजारी न पडण्याचाच मंत्र सांगतो. योगशास्त्रात हेच आहे. मनातील आंदोलने कशी नियंत्रित करायची हे योगशास्त्र शिकवते. नुसतीच बोटे मोडून, शिव्याशाप देऊन समस्यांची उत्तरे शोधता येत नाहीत. त्या साठी मानसशास्त्रीय अभ्यासातून आलेले नियंत्रण उपयोगाचे ठरते. प्रतिकूलतेवर मात करण्यासाठी आधी मनोधारणा पक्की होणे गरजेचे असते. जन्म ते मृत्यू या दरम्यान आयुष्याचे अनेक पैलू असतात. बर्‍यावाईटाला कशा प्रकारे हाताळायचे, मैत्री-शत्रूत्वाला कसे सांभाळायचे याची प्रेरणा योगशास्त्रातून मिळते.’’
000

एकेकाळी, पोलिस दलात असताना भीष्मराज बाम हे ‘दक्षता’ या मासिकाचे संपादक होते. प्रारंभीच्या काळात ते उत्साहाने लेखन करीत. त्यांचा उत्साह लक्षात घेऊन पुढे खात्याने ती जबाबदारी त्यांच्याकडेच सोपविली. या लेखनासाठी झालेले वाचन त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरले. प्रदीर्घकाळपासून झालेले वाचन, मनन, चिंतन यातून त्यांची आजची भूमिका साकारली आहे.

आज क्रीडा मानसशास्त्र हा त्यांचा अधिक प्रसिद्ध असलेला विषय आहे. त्याच विषयात त्यांची विविध पुस्तके प्रकाशित आहेत.मूळ इंग्रजी पुस्तकांचा अनुवाद हिंदी, मराठी, तमिळ, पंजाबी आदी भाषांतून झालेला आहे. पण त्यांच्या मते ‘स्पोर्ट सायकॉलॉजी’ ही ‘अप्लाईड सायकॉलॉजी’ आहे. सर्वांचे मूळ योगशास्त्रातच आहे. बाम सरांचे वडील उत्तम ज्योतिषी होते. ती परंपरा पूर्णार्थाने बाम सरांमध्ये उतरली नाही, पण या विषयाशी त्यांची चांगली जानपहेचान नक्कीच आहे. धुळ्यातील अ. ल. भागवत हे त्यांचे अध्यात्मिक गुरू आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून बाम सरांनी आपली वाटचाल सुरू ठेवली.

या वाटचालीत त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे यापैकी कुठल्याही पुरस्कारासाठी ते कधीही आवेदन घेऊन गेले नाहीत. महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार त्यांना 1994 मध्ये प्रदान झाला तर शासनाचाच जीवनगौरव पुरस्कार (2011-12साठी) सन 2015 मध्ये प्रदान करण्यात आला. या शिवाय अनेक पुरस्कार त्यांच्या घराची शोभा वाढवीत आहेत. या सर्व पुरस्कारांपेक्षाही मोठा पुरस्कार म्हणजे त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळवून विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी गाठलेले कर्तृत्त्वाचे शिखर. हा पुरस्कार त्यांना सर्वात मोलाचा वाटतो.

- दत्ता जोशी
औरंगाबाद
‘पोलादी माणसे - नाशिक जिल्हा’ या आगामी पुस्तकासाठी (कै) बाम यांच्याशी चर्चा करून हा लेख लिहिलेला होता.

1 comment:

Sanjay Kolhatkar said...

मुळ आडनाव बामच गाव कोळथरे तेथून नेवरे येथे गेले आणि कोळथरकर बामचे कोल्हटकर झाले