Thursday, July 3, 2014
प्रोटीनयुक्त पशुखाद्याचा देशातील पहिला प्लांट जालन्यात आशिष मंत्री यांचा!
मुंबईतील 'आयसीटी' (जुने नाव युडीसीटी) ही एक नामवंत संस्था. इथे प्रवेश मिळणे ही कसोटीची बाब. इथून बाहेर पडणारा केमिकल इंजिनियर काही तरी वेगळे करण्याची उमेद बाळगणारा... जालना येथील आशिष मंत्री त्यापैकीच एक.
'तुम्ही १० लाखात एक आहात, त्यामुळे १० लाखांची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे', हे आपल्या सरांचे आवाहन आशिष यांनी मनावर घेतले. बालपणापासूनच मनावर झालेले उद्योगाचे संस्कार केमिकल इंजिनियर झाल्यावर प्रत्यक्षात उतरू लागले. सरकीपासून तेल काढण्याची प्रक्रिया जुनीच आहे. पण त्यातूनच उच्च दर्जाचे प्रोटीनयुक्त पशुखाद्य निर्माण करण्याचा प्लांट टाकायचे त्यांनी ठरविले.
हे तंत्रज्ञान भारतात तेव्हा उपलब्ध नव्हते. अमेरिका-जर्मनी ते देण्यास तयार नव्हते. भारतात १९८८ मध्ये असा झालेला प्रयोग अयशस्वी झालेला. यातील केमिकल रीअक्शन इतक्या गुंतागुंतीच्या आणि अत्युच्च तापमानाच्या असतात की स्फोट झाला तर परिसर बेचिराख होण्याची भीती...!
२५ कोटींचा हा प्रकल्प २००८ मध्ये उभा राहू लागला आणि त्यासाठी लागणारी यंत्र सामग्री अमेरिका, जर्मनी, चीन आणि थायलंड मधून आली. २००९ मध्ये 'अभय कोटेक्स' कार्यान्वित झाले. हा देशातील अशा तंत्रज्ञानाचा पहिला प्लांट ठरला. या प्रकल्पाद्वारे त्यांनी ३ प्रोसेस पेटंट आणि १ प्रोडक्ट पेटंट मिळविले आहे.
भारताची सर्की उत्पादनातील क्षमता पहिली, तर त्याच्यावर या पद्धतीने १०० टक्के प्रक्रिया झाली तर आपण १० हजार कोटींचे परकीय चलन वाचवू शकू, असा आशिष यांचा अंदाज आहे. त्यामुळे असेच प्लांट त्यांनी धुळे आणि यवतमाळ येथे उभारले आहेत.
बुद्धिमत्ता, जिद्द, मेहनत आणि प्रतिकूलतेवर मात करून आशिष मंत्री यांनी जालना येथे उभारलेले हे साम्राज्य नक्कीच आशादाई आहे...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment