Monday, July 7, 2014

दोन्ही पायांनी अपंग असलेला `आघाडीचा ट्रान्सपोर्टर`




वयाच्या २४ व्या वर्षी झालेल्या एका अपघातात कमरेखालील शरीर निर्जीव झाल्यानंतर हा माणूस जिद्दीने आयुष्यात `उभा` राहिला. लातूरच्या `तिरुपती ट्रान्सपोर्ट`चे दयानंद पेद्दे हे त्यांचे नाव.

लातूरमध्ये या परिवाराने transportचा छोटा व्यवसाय सुरु केला होता. शेतीतील नापिकी आणि व्यवसायातील कमी गती या मुळे कुटुंब डबघाईला आलेले होते. अशा स्थितीत दयानंद यांनी सर्वांना धीर दिला. १९८८ मध्ये छोटा व्यवसाय सुरु झाला आणि १९९० मध्ये हा अपघात... साऱ्यांचा धीर खचला. पण दयानंद जिद्दी होते.

त्यांनी अपघातानंतर ३-४ महिन्यात स्वतःला सावरले आणि सारे जन नव्याने कामाला लागले. कार्यालयीन नियोजन आणि संपर्काची आघाडी दयानंद यांनी स्वीकारली. पाहता पाहता दिवस पालटले.

अपघातानंतर १२ वर्षांनी दयानंद प्रथम प्रवासासाठी बाहेर पडले. तिरुपतीच्या प्रवासात त्यांनी रस्त्यांची बदललेली स्थिती आणि वाहतुकीची अत्याधुनिक साधने पहिली आणि तेथून परतल्यानंतर आधी मल्टी एक्सल ट्रक खरेदी केला. ही २००२ ची गोष्ट. बदलत्या काळाचा वेध घेत त्यानंतर दयानंद यांनी मोठी झेप घेतली. आज त्यांच्याकडे ट्रेलर, १२ चाकी आणि १० चाकी मल्टी एक्सल ट्रकचा ७५ वाहनांचा ताफा आहे. अनेक सिमेंट कंपन्यांची डेपो पुरवठ्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.

दयानंद आणि त्यांचे ४ भाऊ मिळून हा सारा पसारा सांभाळत आहेत. नेतृत्वाची धुरा दयानंद यांच्याकडे आहे...!

क्षुल्लक गोष्टीना महत्व देत हातपाय गाळून बसणाऱ्या आणि छोट्या संकटाना घाबरणाऱ्या तरुणांसाठी दयानंद हे आदर्श ठरावेत...!

No comments: