Sunday, September 9, 2018

पाेळा म्हटले, की मला हे सगळे आठवते...

(दत्ता जाेशी, आैरंगाबाद)

माणसांसाठी कष्टणार्‍या प्राणीमात्राविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा सण... पोळा. लहानपणी शाळेत कवी यशवंतांची कविता अभ्यासाला होती. ती आठवते... आठवत राहते...

पोळ्याच्या दिवशी आठवतेच आणि एरव्हीही सजून धजून चाललेले बैल दिसले की आवर्जून आठवते...


शिंगे रंगविली, बाशिंगे बांधली
चढविल्या झुली, ऐनेदार ॥

राजा परधान्या,  रतन दिवाण
वजीर पठाण, तुस्त मस्त ॥

वाजंत्री वाजती, लेझिम खेळती
मिरवीत नेती, बैलाला गे ॥

डुल-डुलतात, कुणाची वशींडे
काही बांड खोंडे, अवखळ ॥

कुणाच्या शिंगाना, बांधियले गोंडे
पिवळे तांबडे, शोभिवंत ॥

वाजती गळ्यात, घुंगरांच्या माळा
सण बैल पोळा, ऐसा चाले ॥

जरी मिरवीती, परि धन्या हाती
वेसणी असती, घट्ट पट्टा ॥

झुलीच्या खालती, काय नसतील
आसूडांचे वळ, उठलेले ॥

आणि फुटतील, उद्याही कडाड
ऐसेच आसूड, पाठीवर ॥

सण एक दिन, बाकी वर्षभर
ओझे मर मर, ओढायाचे ॥

का, कोण जाणे पण शेवची तीन-चार कडवी तेव्हा आवडायची नाहीत. छान चित्रावर कुणीतरी शिंतोडे उडवल्यासारखे वाटायचे... जगातले वास्तव कळण्याचे ते वय नव्हते. जे दिसायचे त्यावरच विश्वास टाकायचा... अन् आजूबाजूला दिसायचे ते छान, सुंदरच असायचे.

आमच्या देवणीत असे सगळे सण-उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे होत. घरोघरी बैल-गायी... त्यांचे गोठे. पोळ्याला सारा गाव आपापल्या पशुधनासह नटून थटून घराबाहेर पडायचा.

पोळ्याची खरी सुरुवात असायची त्याच्या आदल्या दिवशी. त्याला आमच्याकडे खळमळणी म्हणायचे. (नागर भाषेत खांदेमळणी असाही एक शब्द आहे.) पोळ्याच्या या आदल्या दिवशी सकाळपासूनच बैलांचे लाड होत असत. एरव्ही गायींवर उगारलेला चाबूक मी कधी फारसा पाहिला नाही, पण बैलांच्या वाट्याला तो सतत यायचा. देवणीत आम्ही बापूराव कारभार्‍यांच्या घरात दीर्घकाळ भाड्याने राहिलो. त्यामुळे आमच्यात वेगळेच नाते तयार झाले. त्यामुळे विशेषतः शेतातले सगळे सणवार आम्ही त्यांच्याकडेच जात असू. ‘येळवशी’ (वेळा अमावस्या) असो की खळं पडल्यानंतर होणारं ‘ढवारं’... म्हणजे रात्रीच्या चांदण्यातलं वनभोजन, आम्ही त्यांच्याच शेतात.

खूप लहान होतो तेव्हा दोन्ही घरांतील बायकांसोबत आम्ही सगळे बैलगाडीत बसून जात असू. मग त्यातही अगदी समोर बसून कासरा धरायचा माझा अट्टाहास. पण गाडी रेणूची, म्हणजे रेणुकादासची... शेतमालकाची. तो कसा मला बसू देईल? मग जानकामावशींच्या, रेणूच्या आईच्या मागे लागून, थोडा वेळ रेणूला बाजूला बसवून मी कासरा हाती घेत असे. कासरा हातात आला, की तो ओढून पाहायचा मोह... ओढला की बैलाच्या नाकातील वेसण ओढली जायची आणि ते त्रासायचे. ते लक्षात आले की तुकाराम मामा, म्हणजे कारभार्‍यांचे सालगडी आमच्यावर ओरडायचे. बैलाला हात लावलेला, त्रास दिलेला त्यांना खपायचा नाही. या मुक्या जनावरांवर त्यांची खूप माया...

खळमळणीला बैल शेतावर जायचे. दिवसभर त्यांना ना नांगराला जुंपले जायचे ना त्यांच्यावर चाबूक उगारला जायचा. दुपारची भाकरी खाऊन झाली बैलांची पूजा व्हायची. मग सार्‍या शेतकर्‍यांचे बैल शेतातून गावाकडे परत निघायचे. आधी ते नदीवर जायचे. तिथे त्यांना धुवून पुसून काढले जाई. नदीला पाणी असायचे त्यामुळे बैल पोहोणीही करायचे. तिन्हीसांजेला ते आपापल्या घरी परतायचे. रात्री त्यांना गोडेतेल पाजले जायचे. झोपण्याआधी त्यांना, म्हणजे बैलांना निमंत्रण दिले जायचे - ‘पोळ्यादिवशी घरी पोळी खायला या...’
000

पोळ्याचा दिवस उजडायचा तो अतीव उत्साहात. सकाळीच बैलांना ‘डिकमल’ पाजले जायचे. जसे आपण पादेलोण असलेले पाणी पाचक म्हणून पितो, तसे ते बैलांचे पाचक. खडेमिठासह काही विशिष्ट पदार्थ, पीठ कालवून घरधणीन ते तयार करीत असे...! कालचा आणि आजचा दिवस बैलांचा. या दोन दिवसांत त्यांना कामावर जुंपले जायचे नाही की त्यांच्यावर हात उगारला जायचा नाही. न्हाऊ माखू घालणे, अंगावर रंगांचे शिक्के... शिंगांना वॉर्निश, शिंगांच्या टोकाला पितळेच्या शिंगोळ्या... गोंडे... सगळी धमाल. आम्ही छोटी पोंरं तुकाराम मामांना मदतीच्या नावाखाली आपापले हात साफ करून घेत असू. ते ओरडत, आम्ही दूर पळत असू... सगळी धमाल.

त्याच दिवशी अंबाड्याच्या सुताचे छोटे छोटे चाबूक विकायला येत असत. आम्ही ते घेत असू. ते घ्यायचे, बैलांना लावलेल्या रंगातून उरलेल्या रंगात रंगवायचे आणि ते हवेत भिरकावून ‘चट्’ असा आवाज करीत वाजवत गल्लीभर फिरायचे हा आमचा आवडता प्रकार. कधी गंमत म्हणून एखाद्या बैलाच्या अंगावर चाबूक मारायचा अगावूपणाही करण्याचा प्रयत्न आम्ही करत असू पण कुणा मोठ्या माणसाच्या लक्षात आले तर मग आमच्या पाठी मात्र रंगायच्या...! खरे तर त्या इवल्या चाबकाचा मार बसणार तरी किती आणि कसा? पण त्या दिवशी बैलांना ते सुद्धा चालणार नाही म्हणजे नाही...!

पोळ्याच्या दिवशी काही बैल शेतावर जात, काही घरीच राहात. तिन्हीसांजेला सगळे गावाबाहेर पश्चिमेला महादेवाच्या मंदिराजवळ जमत. अंगावर झूल, गळ्यात घागरमाळा (त्याला काही जण घुंगुरमाळा म्हणतात), उत्तम साज चढवून बैल आणि त्यांचे मालक - गडी सार्‍यांचा एकच गदारोळ असे. मग सुरू होई मिरवणूक... बँडबाजा लावून ही मिरवणूक निघे. गावचे पाटील आणि मानकर्‍यांचे मानाचे बैल पुढे आणि बाकी सारे त्या मागोमाग. काही अंतर चालत जात गढीच्या शेजारी, बालवाडीजवळच्या छोट्या चौकात पोहोचून ही मिरवणूक संपत असे. मानकर्‍यांचे बैल आधी आपापल्या मालकांच्या घरी निघत, पाठोपाठ सार्‍या गावाचे...

घरी आले की घरची स्वामिनी बैलांच्या औक्षणासाठी समोर यायची. ‘व्हलग्या व्हलग्या - चालंग पलग्या’चा गजर करीत बैलांना पुरणपोळी प्रेमाने भरवायची. मोठ्या मानाने बैल वाड्यात घेतले जायचे, गोठ्यात जायचे. हिरवा चारा तर मिळायचाच... एरव्हीही प्रेमभराने मस्तकावरून फिरणारा आणि गळ्याखालचे पोळे खाजवणारा हात आज अधिक जिव्हाळ्याचा व्हायचा...

आज शहरात राहताना ही सगळी चित्रं नजरेसमोरून सरकताहेत... कालमानाप्रमाणे धूसर होताहेत... त्या धूसर पडद्याआडून जे काही स्मरणात राहिलं ते मांडलं...

- दत्ता जाेशी
आैरंगाबाद
(विशेष सहकार्य - रेणुकादास कुलकर्णी, देवणी)

No comments: